किशोरकुमारचा दैवी आवाज हा असंख्य भारतीयांच्या आयुष्याचा आनंदाचा भाग आहे आणि त्यांना कित्येक पिढ्या रिझवत राहिला आहे. त्याचे यॉडलिंग हा आवाजाच्या दुनियेतला चमत्कार आहे. पण अष्टपैलू किशोरची अभिनयाची इनिंग ही बऱ्याच जणांना ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘पडोसन’ या सिनेमांपलीकडे स्मरणात नसते. मात्र एक काळ असा होता की, अभिनेता किशोरकुमार बॉक्स ऑफिसवरचे चलनी नाणे होता. हलकेफुलके विषय घेऊन हमखास मनोरंजनाची हमी देणाऱ्या त्याच्या सिनेमांवर रसिकांच्या उड्या पडत होत्या आणि किशोरकुमार वितरक मंडळींच्या गळ्यातला ताईत होता.
ही गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. ‘बेगुनाह’ हा किशोरकुमारची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा १९५७मध्ये प्रदर्शित झाला. महिपत राय शहा आणि अनुपचंद शहा यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन नरेंद्र सुरी यांनी केले होते. त्याला संगीत दिले होते शंकर-जयकिशन यांनी आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे एका गाण्यासाठी जयकिशन स्वतः पडद्यावर पियानो वाजवत गाणे म्हणताना दिसले होते! देखण्या जयकिशनला पडद्यावर आवाज दिला होता मुकेश यांनी.
यातील प्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेल्या ‘ए प्यासे दिल बेजुबां, तुझको ले जाऊं कहां’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर किशोरकुमार यांचे उचकी देत गायलेले त्याच्या स्टाईलचे तऱ्हेवाईक गाणेही रसिकांच्या पसंतीस उतरले. लता मंगेशकर, मन्ना डे, उषा मंगेशकर यांनीही शैलेंद्र आणि हसरत जयपुरी यांनी लिहिलेली गाणी गायली होती आणि एचएमव्ही कंपनीची ही रेकॉर्ड भलतीच लोकप्रिय झाली होती.
किशोर गायक अभिनेता असूनही एका गाण्यात मन्ना डे यांनी त्याच्यासाठी पार्श्वगायन केले होते. चित्रपटाच्या गीत-पुस्तिकेमध्ये गायिका म्हणून मीना मंगेशकर यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे या तीन मंगेशकर भावंडांनी एकत्र पार्श्वगायन केलेल्या मोजक्या सिनेमांपैकी हा एक आहे. हिंदी सिनेसृष्टीतील एक अनोखी वल्ली असलेल्या आय. एस. जोहर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली होती. अर्थात ही कथा त्यांची नव्हती, हे लवकरच उघडकीस आले आणि त्यामुळे भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक वेगळेच पान लिहिले गेले.
..................................................................................................................................................................
‘बिटविन द लाइन्स’ या चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines
..................................................................................................................................................................
८ मार्च १९५७ला ‘बेगुनाह’ सर्वत्र प्रदर्शित झाला, पण त्याअगोदर त्याची खूप जाहिरात आणि प्रसिद्धी केली गेली होती. किशोर आणि शकीला या नायक-नायिकांचे मोठमोठी छायाचित्रं सिनेमाविषयक नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाली होती.
योगायोगाने हॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता डॅनी के त्याच वेळेस मुंबई दौऱ्यावर आला होता. १९५४मध्ये आलेल्या ‘नॉक ऑन वुड’ या त्याच्याच सिनेमावर ‘बेगुनाह’ आधारित असल्याचे त्याला समजले आणि पॅरामाऊंट स्टुडिओने मुंबई न्यायालयामध्ये त्यासंबंधी दावा दाखल केला. एप्रिल १९५७च्या ‘फिल्म इंडिया’ या प्रसिद्ध नियतकालिकाच्या बातमीमध्ये ‘बेगुनाह’ हा सिनेमा मुंबईच्या स्वस्तिक आणि अन्य सिनेमागृहांत चांगला चालत असल्याबद्दलची बातमी प्रसिद्ध झाली होती.
‘बेगुनाह’ची केवळ कथाच नव्हे तर बहुतांश सीन हे ‘नॉक ऑन वुड’मधून जसेच्या तसे घेतले होते, असा दावा दाखल करण्यात आला. मूळ इंग्रजी सिनेमातील नायक हा बोलक्या बाहुलीची कला सादर करणारा कलाकार असतो, तर भारतीय सिनेमामध्ये तो नट आणि गायक दाखवला गेला. नायिका मनोविकारतज्ज्ञाऐवजी केवळ डॉक्टर असल्याचे दाखवले गेले.
न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतर केसची सुनावणी अतिशय जलद गतीने झाली. भारतीय निर्मात्यांना ‘बेगुनाह’ हा स्वतंत्र सिनेमा असल्याचे न्यायालयामध्ये सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली. ‘फिल्म इंडिया’च्या नोव्हेंबर १९५७च्या अंकामध्ये त्याविषयी उल्लेख आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’सारख्या प्रतिष्ठित अमेरिकन दैनिकानेही या घटनेची दखल घेतली आणि १२ नोव्हेंबर १९५७ दिवशीच्या अंकात ‘भारतीय सिनेमावर बंदी’ अशी बातमी दिली.
केवळ बंदीवरच हे चौर्य प्रकरण थांबले नाही, तर सिनेमाच्या निगेटिव्ह आणि सर्व रिळे नष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले. कॉपीराईटच्या कायद्याअंतर्गत कारवाई झाल्याचे भारतीय सिनेमा इतिहासातील कदाचित हे पहिलेच उदाहरण असावे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अशा प्रकारे एखाद्या सिनेमाची कॉपी केली म्हणून रीतसर कायद्याने बंदी आणि सिनेमाच्या प्रती नष्ट करण्याचे दुसरे उदाहरण १९५७ अगोदर अस्तित्वात नाही. प्रदर्शित झाल्यापासून त्यावर बंदी येण्यापर्यंतच्या कालावधीमध्ये खूप रसिकांनी हा सिनेमा पाहिलेला होता. त्यामुळे किशोर कुमारच्या हरहुन्नरी आणि अष्टपैलू अभिनयाची जादू पुन्हा एकदा चाहत्यांना अनुभवायला तर मिळालीच, पण विशीतल्या देखण्या जयकिशनची पडद्यावरची छबी सिनेमाबद्दलचे आकर्षण आणि कुतूहल वाढवायला कारणीभूत ठरली.
अर्थात आपल्याला पन्नासच्या दशकातली परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. दळणवळणाची आणि संपर्काची साधने मर्यादित असल्यामुळे न्यायालयाचा आदेश भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सर्व प्रांतांमध्ये पोचायला नक्कीच वेळ लागला असणार. त्यामुळे निकाल लागून वर्ष झाल्यानंतरही या सिनेमाचे प्रदर्शन काही भागात सुरूच होते.
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अरुणकुमार देशमुख यांनी हैदराबादमध्ये हा सिनेमा पाहिल्याची नोंद केली आहे. त्याचबरोबर १९६०पर्यंत त्या भागात या सिनेमाचे प्रदर्शन सुरू असल्याचीही घटना त्यांनी सांगितली आहे. ज्या वेळी तत्कालीन निजाम प्रांतामध्ये हा चित्रपट बंदीनंतरही बिनधोक दाखवला जात असल्याबद्दलची बातमी पॅरामाऊंट स्टुडिओला कळाली, तेव्हा त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याबद्दलची पुन्हा तक्रार दाखल केली. न्यायालयाने या वेळी मात्र निर्मात्यांना कडक शिक्षा तर सुनावलीच आणि जबर दंडही ठोठावला. त्याबरोबरच आपल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सक्त ताकीद दिली. अशा तऱ्हेने चोरीचा मामला ठरलेला हा सिनेमा पडद्याआड गेला.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
परंतु किशोर कुमार आणि शंकर जयकिशन यांचे जगभर पसरलेले चाहते स्वस्थ बसले नाहीत. बऱ्याच चाहत्यांच्या मते या सिनेमातील किशोरकुमारचा अभिनय हा त्याच्या कारकिर्दीमधला तोपर्यंतचा सर्वोत्तम होता. एचएमव्ही कंपनीने बाजारात आणलेली गाणी तर उपलब्ध होतीच आणि लोकप्रियही झाली होती. पण या गाण्यांना सजीव रूप देणारी पडद्यावरची हलतीबोलती चित्रे मात्र नष्ट केली गेली होती. शंकर-जयकिशन यांच्या चाहत्यांना तर जयकिशनला पडद्यावर पाहण्याची अनिवार इच्छा होती. आपल्या अलोट गोडीच्या संगीताने कानसेनांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवलेल्या या महान संगीतकार जोडीतील जयकिशनचे पडद्यावरील दुर्लभ दर्शन पाहण्यासाठी रसिकांचे अपरंपार प्रयत्न सुरू होते. जयकिशनच्या या गाण्यासाठी, किमान त्याची एक झलक पाहण्यासाठी केवळ भारतामध्येच नाही तर आफ्रिका, यूरोप, अमेरिका खंडांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या सिनेमाचा शोध घेतला गेला.
या गाण्याच्या निर्मितीचीमागची कथाही तितकीच रंजक आहे. सुप्रसिद्ध गायक मुकेश यांना त्यावेळी पैशांची तातडीने गरज भासली. तशाच मनःस्थितीत ते शंकर जयकिशनच्या रेकॉर्डिंग रूममध्ये गेले. उदासवाण्या मुकेशना पाहून शंकर यांनी त्यामागचे कारण विचारले. ते कळल्यावर त्यांनी तत्काळ निर्माते महीपत शहा यांना फोन केला आणि त्यांनी नवीन रेकॉर्ड केलेले गाणे ‘बेगुनाह’साठी घेण्याविषयी सुचवले. संगीत अभ्यासक आणि शंकर जयकिशन यांच्या सर्व गाण्यांचा खंड संपादन करणारे संदीप आपटे यांच्या मते त्या काळात या संगीतकार जोडीची इतकी चलती होती की, त्यांना नाही म्हणायची कुठल्याही निर्मात्याची छाती नव्हती. त्यामुळे नाईलाजाने का होईना, पण या गाण्यासाठी एक सिच्युएशन तयार करण्यात आली.
खलनायकाच्या घरामध्ये एका मेजवानीचा प्रसंग रचण्यात आला आणि त्यामध्ये गाणे म्हणण्यासाठी खुद्द जयकिशनला पाचारण करण्यात आले. या आधीही जयकिशनने राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या सिनेमातील ‘मुड मुड के ना देख’ या गाण्यात आपली छबी दाखवली होती, पण ती काही क्षणांसाठी होती. इथं मात्र एका संपूर्ण गाण्यामध्ये त्याचे दर्शन होत होते आणि तेही पियानोवर स्वर वाजवत गाणे म्हणताना! त्यामुळे हा चित्रपट नाही तर निदान हे गाणे मिळवण्यासाठी कित्येक वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू होते. अर्थात बऱ्याचशा चाहते मंडळींनी चित्रपट संग्रहालयाकडे या संदर्भात वारंवार विचारणा केलेली होती. मात्र काही छायाचित्रं आणि गाण्याची पुस्तिका या व्यतिरिक्त ‘बेगुनाह’ची बाकी काही सामग्री अर्काईव्हकडे नव्हती.
सिनेमाअभ्यासक आणि किशोर कुमारवरील अभ्यासपूर्ण वेबसाईटचे निर्माते कौस्तुभ पिंगळे यांनी तर पार अमेरिकेत पॅरामाऊंट स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष जाऊन या चित्रपटाबद्दल तपासणी केली. इतकेच नव्हे तर भारतीय सिनेमांचे विदेशातील वितरक कोण आहेत याची माहिती मिळवून त्यांच्याकडे ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. एका शंकर जयकिशन चाहत्याने ‘बेगुनाह’ आफ्रिकेमध्ये पाहिल्याची आठवण सांगितली आणि म्हणून तेथेही शोध घेतला गेला.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : उसळे अर्णव, खळबळे रिपब्लिक, हिंदकळे माध्यम, सत्य बुडे
.................................................................................................................................................................
एव्हाना या सिनेमाबद्दल खूप दंतकथा तयार झाल्या होत्या. अमुक एका ठिकाणी हा सिनेमा आहे, तमुक एका संग्राहकाकडे हे गाणे आहे, अशा बातम्या अधूनमधून पसरत असायच्या. काही लोकांनी तर अर्काइव्हमध्ये हा सिनेमा त्यांनी पाहिला असल्याचे ठामपणे सांगितले! सिनेमाची दुनिया मायावी असते खरी, पण या सिनेमाबद्दलचे गूढ मात्र वाढतच चालले होते. अशा वेळी काही चाहत्यांनी पुन्हा आमच्याशी संपर्क साधला.
सिनेमा मिळवणे आणि त्यांचे जतन व संग्रह करणे, हे आमचे रोजचे काम असले तरी काही प्रसंगी आम्हीही अशा विशेष सिनेमांच्या शोधात असतो. त्यासाठी देशभर पसरलेल्या अनेक चित्रपट संग्राहकांच्या आम्ही कायम संपर्कात असतो. कुठून तरी काही एक सूचना मिळते आणि त्याचा माग काढत आम्ही प्रयत्न करतो. काही वेळेला यश मिळते; बऱ्याच वेळेला हाती काही लागत नाही.
‘बेगुनाह’बद्दलही असेच झाले. बऱ्याच दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर एक रीळ असल्याची मला माहिती मिळाली. मी वेळ न दवडता तिकडे धाव घेतली, ते १६ मिमीचे रीळ मिळवले आणि पडद्यावर पाहिले. ते ‘बेगुनाह’चेच असल्याबद्दलची खात्री केली. परंतु रिळाची अवस्था खराब होती. चित्रे नाजूक अवस्थेत होती, तर आवाज कमकुवत होता. सिनेमाची कथा मधूनच सुरू झाली होती आणि सुरुवातीची श्रेयनामावली या रिळामध्ये नव्हती.
किशोरकुमारच्या चिरपरिचित लीला पडद्यावर दिसत होत्या, पण जयकिशनचे गाणे मात्र गायब होते. पेला अजून अर्धाच भरला होता! पुन्हा एकदा आणखी काही रिळे सापडतात का याचा शोध सुरू झाला. दोनेक महिन्यांनी नशिबाने पुन्हा साथ दिली आणि आणखी एक रीळ उपलब्ध असल्याचा निरोप मिळाला. मोठ्या उत्कंठतेने हे नवीन रीळ पडद्यावर पाहिले. हे रीळ म्हणजे सिनेमाचा शेवटचा भाग होता. त्यातील एका दृश्यामध्ये जयकिशनने सुटाबुटात पडद्यावर एंट्री घेतली; त्याची बोटे पियानोवर फिरू लागली आणि त्या तालावर शीला वाझचे नृत्य सुरू झाले! मुकेशचे स्वर छोट्याशा प्रिव्ह्यू थिएटरमध्ये भरून गेले आणि गाण्याच्या शेवटी तार स्वरात जयकिशनने दोन्ही हातांनी एकाच वेळी पियानोची बटणे जोरकसपणे दाबून क्रेसेंडो गाठला आणि गाणे संपले!
या संपूर्ण घडामोडीमध्ये न्यायालयाने दिलेला निकाल नक्की काय होता याबद्दल संदिग्धताच आहे. कारण ते निकालपत्रच आजतागायत उपलब्ध नाही. बरीच शोधाशोध करूनही आम्हाला ते मिळाले नाही. मग आम्ही रीतसर मुंबई उच्च न्यायालयाला विनंतीपत्र पाठवले. परंतु नेमका केस नंबर आणि निकालाची तारीख असल्याशिवाय ते शोधणे कठीण असल्याचे उत्तर आम्हाला मिळाले. आम्ही पॅरामाऊंट स्टुडिओलाही पत्र पाठवून रीळ मिळाल्याची माहिती दिली. शेवटी हे न्यायविषयक प्रकरण असल्यामुळे कायदे मंत्रालयाचा सल्लाही आवश्यक असल्यामुळे त्यांनाही लिहिले गेले.
कारण हे प्रकरण घडून जरी ६३ वर्षे उलटली असली तरी आता मिळालेल्या दोन रिळांचे काय करायचे हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. बऱ्याच अभ्यासकांचे मत आहे की, सिनेमाची कथा जरी चोरलेली असली तरी त्यामानाने दिलेली शिक्षा खूप कठोर होती. या सिनेमानंतरही बरेच सिनेमे बनवले गेले जे हॉलिवूड किंवा अन्य चित्रपटसृष्टीतील कथांची चोरी करून बनले होते. गाण्यांच्या धुनांची चोरी तर हमखास होत होती. अशा वेळी ‘बेगुनाह’वर केवळ बंदीच घातली नाही, तर तो पूर्ण नष्ट करण्याची शिक्षा कठोरच होती, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी नोंदवल्या.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
काही लोकांचे असेही मत आहे की, निर्मात्यांनी जर सुरुवातीलाच मूळ सिनेमाचा ऋणनिर्देश केला असता आणि आपला चित्रपट हा हॉलिवूडच्या सिनेमावर आधारित आहे, असे जाहीर केले असते तर ही वेळ कदाचित आली नसती! आता इतकी वर्षे उलटल्यावर आणि विशेषतः मूळ सिनेमा ‘Knock on Wood’ यूट्यूबवर सर्वांना पाहायला उपलब्ध असताना बंदीचा पुनर्विचार आवश्यक आहे असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे आश्चर्यकारकपणे ही दोन रिळे सापडल्यानंतर निदान कोणतेही मूल्य न लावता प्रेक्षकांना पहायला मिळावीत, अशी प्रार्थना केली जात आहे.
या संपूर्ण घडामोडीमध्ये एक नैतिक मुद्दाही विचारात घेणे आवश्यक आहे. सिनेमांचे जतन हे अर्काइव्हचे प्रमुख काम आहे, मग त्यामध्ये बंदी घातलेल्या आणि नष्ट करण्याचा आदेश असलेल्या सिनेमांचे जतन करायचे की नाही याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. मिळालेली रिळे नाजूक अवस्थेत असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करून ती दाखवण्यायोग्य बनवणे, हेही या जतन प्रक्रियेमधील महत्त्वाचे काम आहे. आणि जतनामागील उद्देश केवळ सध्याच्या पिढीसाठी नाही, तर भविष्यातील कित्येक पिढ्यांसाठी असतो. म्हणून जर सिनेमाकला ही आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे, तर चौर्य काम करून बनवलेला सिनेमाही त्या वारशामध्ये येतो की नाही, हाही एक वेगळा मुद्दा आहे.
या विविध प्रश्नांची उकल होण्यासाठी आणखी काही काळ थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. ‘बेगुनाह’ने गुन्हा तर नक्कीच केला होता, पण त्याची शिक्षा अजूनही चालूच ठेवायची का, याच्या उत्तरासाठीही प्रतीक्षेशिवाय दुसरा पर्याय सध्या नाही!
..................................................................................................................................................................
लेखक प्रकाश मगदूम ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे’चे (National Film Archive of India, Pune) संचालक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची व्यक्तिगत आहेत.
prakashmagdum@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment