अजूनकाही
१.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ स्थापन करण्यामागे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा असलेला हेतू कितपत साध्य झाला, या संदर्भातल्या चर्चा आता शिळ्या झाल्या आहेत. या मंडळाचा कारभार साहित्यानुकूल नाही, अगत्य आणि सुसंस्कृतपणाशी मंडळाला काहीही देणं-घेणं नाही, हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे. फार पूर्वी म्हणजे डॉ. मधुकर आष्टीकर अध्यक्ष असताना या संदर्भात मीही बरंच लिहिलं होतं. साहित्य आणि संस्कृती मंडळाचा ताजा अनुभव फारसा सुखावह नाही, तर आजवरच्या गलथान परंपरेला साजेसाच आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे एक अग्रगणी नेते असे शंकरराव चव्हाण (१४ जुलै १९२०–२६ फेब्रुवारी २००४) यांची जन्मशताब्दी नुकतीच संपली. त्यानिमित्ताने ‘आधुनिक भगीरथ’ हा शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरवग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आला आहे. या ग्रंथासाठी लिहिण्याची संधी मलाही मिळाली. पत्रकारितेच्या धबडग्यात काही लोकांवर लिहायचं राहून गेलं होतं. त्यात विलासराव देशमुख आणि शंकरराव चव्हाण होते. विलासरावांवर तीन वर्षांपूर्वी एका पुस्तकासाठी एक प्रदीर्घ लेख लिहिला, पण ते पुस्तक अजून प्रकाशित झालेलं नाही.
शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरवग्रंथासाठी लेख लिहिण्यासाठी या ग्रंथाचे संपादक डॉ. सुरेश सावंत बरेच मागे लागले. बेगमच्या प्रदीर्घ आजारपणामुळे ते काम बरंच रेंगाळलं, परंतु डॉ. सावंत यांच्या चिवट पाठपुराव्यामुळे ते अखेर पूर्ण झालं हे मात्र खरं. सुमारे साडेचार हजार शब्दांचा तो ‘शंकरराव चव्हाण : काही नोंदी’ हा लेख या ग्रंथात समाविष्ट झालेला आहे. डॉ. सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ग्रंथाचं संपादन अतिशय श्रमपूर्वक, कौतुकास्पद तपशीलवार केलेलं असून देखणा असा हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे. (काही राजकारण्यांचा अपवाद वगळता) सर्वच लेख शंकरराव चव्हाण यांच्या विविध पैलूंचा आढावा घेणारे आहेत. राजकारणात रस असणार्या प्रत्येकाच्या संग्रहात असायला हवा, इतका हा ग्रंथ संदर्भ म्हणून महत्त्वपूर्ण आहे.
जवळजवळ ८०० पानांचा हा ग्रंथ १४ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला. त्याच्या बातम्या वगैरे आल्या तरी हा मजकूर लिहीत असताना ४ डिसेंबरला म्हणजे सुमारे सव्वाचार महिने उलटले तरी त्या ग्रंथाची प्रत अजून काही कुणाही लेखकाला मिळालेली नाही, मग मानधन तर लांबच राहिलं!
..................................................................................................................................................................
‘बिटविन द लाइन्स’ या चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5219/Between-the-Lines
..................................................................................................................................................................
खरं तर, असे संदर्भमूल्य असलेले अनेक महत्त्वाचे ग्रंथ साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले आहेत. मात्र हे ग्रंथ वाचकांपर्यंत पोहचण्याची तसदी पाहिजे तितक्या किमान गांभीर्यानं कधीच घेतलेली नाही, हेही तेवढचं खरं. साहित्य संस्कृती मंडळ ग्रंथाचं प्रकाशन करतं. सरकारी पातळीवर त्याचा एखादा दणदणीत प्रकाशनाचा कार्यक्रम होतो. त्याच्या बातम्या वगैरे येतात. विशेषत: ज्या व्यक्तीची जन्मशब्तादी किंवा अन्य काही महत्त्वाची घटना असेल तर शासनाचं मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’च्या अंकात त्या ग्रंथातील काही मजकुराचा समावेश केला जातो, पण पुढे तो ग्रंथ कुठे कुठे धूळ खात पडतो, हे फक्त साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रशासनालाच माहीत असतं.
बरं, संस्कृती साहित्य मंडळात आपण जावं तर, ते ग्रंथ कुणाकडे आहेत, कोण ते विकणार आहेत, कुठे उपलब्ध आहेत याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी कुणीही उत्सुक नसतं. फोन केले तर या माहितीच्या संदर्भात काही हाती पडेल असंही संभाषण होऊ शकत नाही. साहित्य आणि संस्कृती मंडळानं आजवर प्रकाशित केलेले ग्रंथ, त्या ग्रंथनिर्मितीवर खर्च किती झाला आणि त्यापैकी किती ग्रंथांची विक्री झाली, या संदर्भात खरं तर खास ऑडिट होण्याची आणि मंडळाच्या कामाची झाडाझडती घेतेली जाण्याची नितांत गरज आहे.
साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कारभारात सगळंच काही निराशाजनक नाही. बरंच काही समाधनकारकही आहे, पण आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं याची उर्मीच मंडळाच्या प्रशासनाला नाही. मंडळ व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारून, गेला बाजार एखाद्या खाजगी यंत्रणेची मदत घेऊन या ग्रंथाचं वितरण का करत नाही, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.
पत्रकारितेतील माझे ज्येष्ठ सहकारी सुरेश द्वादशीवर या मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या मंडळाला व्यावसायिक चेहरा देण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे केला होता, कारण द्वादशीवार यांची दृष्टी संपादकाची होती. संपादकाला दररोजचं वृत्तपत्र विकलं कसं जातं आणि कसं विकलं जावं, याचं एक व्यावसायिकही भान असतं. विद्वत्तेसोबत ते भान द्वादशीवार यांच्यामध्ये नक्कीच होतं, पण मंडळाच्या लालफीतशाही कारभाराला द्वादशीवार इतके कंटाळले की, अखेर त्यांनी राजीनामाच देऊन टाकला.
माझी माहिती जर चूक नसेल तर ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांचाही अनुभव असाच उद्वेगजनक होता. मात्र द्वादशीवार आणि बोराडे यांच्यातलं सौजन्य असं की, या संदर्भात त्यांनी कधीही जाहीर वाच्यता केली नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
आता या मंडळाच्या कारभाराच्या संदर्भात फेरविचार करण्याची आणि या मंडळाचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ निर्णायक आली आहे, असं ठामपणे वाटतं. लेखकाला पुस्तक पाठवलं न जाणं एखाद्या खाजगी प्रकाशकाकडून घडलं असतं तर मोठं काहूर उठलं असतं, पण साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित झालेली पुस्तकं लेखकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याच्या संदर्भात काही चर्चा घडली, काही वादविवाद झाले तर त्याची दखलही मंडळाकडून घेतली जात नाही, हा अनुभव निश्चितच क्लेशदायक आहे. या मंडळाच्या प्रशासनाची कातडी किती गेंड्याची बनलेली आहे, याचं हे निदर्शक आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण यांचा आलेला एक अनुभव आवर्जून नोंदवून ठेवण्यासारखा आहे.
२.
राजकारणी असंस्कृत असतात असा बहुसंख्य जनतेचा एक आवडता सिद्धान्त आहे. माध्यमं आणि विशेषत: चित्रपटांनी हा समज फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे. इतकी वर्षं राजकीय वृत्तसंकलनात घालवल्यानंतर मी एक ठामपणे सांगू शकतो की, सगळेच राजकारणी हा जो काही समज पसरलेला आहे, तसे असंस्कृत नसतात. सगळेच राजकारणी असंवेदनशील, रांगडे, रासवट, दुष्ट, खुनशी आणि कट-कारस्थानं करणारे नसतात. या समजाचा एक उपभाग म्हणजे राजकारणी वृत्तपत्राव्यतिरिक्त इतर काहीच वाचत नाहीत.
माझा स्वत:चा अनुभव मात्र असा मुळीच नाही. अनेक राजकारण्यांना वाचनासोबतच संगीत, चित्रकलेची जानकारी असते, हे मला चांगलं ठाऊक आहे. ज्येष्ठतम नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी अतिशय चांगले वाचकच नाहीत, तर त्यांच्या संग्रहालयात मोठी ग्रंथसंपदा आहे. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, जयंत पाटील, छगन भुजबळ अशा कितीतरी विद्यमान मंत्र्यांची नावं, ते चांगले वाचक असण्याबद्दल घेता येतील. माझ्या एका पुस्तकावर एखाद्या समीक्षकाला लाजवेल इतकं अप्रतिम भाषण छगन भुजबळ आणि नितिन गडकरी यांनी केल्याचं स्मरणात आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी एकदा संगमनेरला विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला. त्यांना तर चक्क ग्रेसच्याही कविता पाठ आहेत. आता हयात नसलेल्या अनेक राजकारण्यांची नावेही या संदर्भात सांगता येतील.
सांगायचं तात्पर्य माध्यमं आणि चित्रपट पसरवत असलेले सगळेच समज किंवा रंगवत असलेल्या सर्वच प्रतिमा खऱ्या असतात असं नव्हेच.
वर उल्लेख केलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या संदर्भातल्या ‘आधुनिक भगीरथ’ या ग्रंथाच्या संदर्भात आलेला अनुभव म्हणूनच आवर्जून शेअर करावा असा आहे. गेल्या महिन्यात एक दिवस अशोक चव्हाण यांच्याशी फोनवर बोलणं सुरू असताना त्यांना म्हणालो, ‘नानासाहेबांवरचा (म्हणजे शंकरराव चव्हाण यांच्यावरचा) गौरवग्रंथ खूप चांगला निघाला आहे, असं ऐकण्यात येतं आहे, पण साहित्य संस्कृती मंडळावर अवलंबून राहाल तर तो ग्रंथ वाचकांपर्यंत तर पोहोचणारच नाही... एवढंच कशाला ज्यांनी ज्यांनी या पुस्तकासाठी लेखन केलेलं आहे, त्या लेखकांपर्यंतही ते पुस्तक लवकर पोहचणार नाही, याची मला ठाम खात्री आहे.’
..................................................................................................................................................................
हेही पाहा : उसळे अर्णव, खळबळे रिपब्लिक, हिंदकळे माध्यम, सत्य बुडे
.................................................................................................................................................................
माझ्या म्हणण्याला चव्हाण यांनी उघड दुजोरा दिला नाही, पण ते सूचक हसले. मी त्यांना पुढे म्हटलं, ‘अशोकराव, यापेक्षा या पुस्तकाच्या प्रती साहित्य संस्कृती मंडळाकडून मागवून घ्या. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्या प्रती सहज उपलब्ध होतील. लेखन करणाऱ्या सर्व लेखकांना एका छानशा प्रत्रासह त्या पुस्तकाची प्रत तुमच्या स्वाक्षरीनिशी तुम्हीच सप्रेम भेट म्हणून पाठवा. शंकररावांचे पुत्र, जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, विद्यमान मंत्री आहेत, त्यांनी आवर्जून पाठवलेल्या या भेटीचा लेखकांना अतिशय आनंद होईल.’
अशोक चव्हाण गंभीरपणे ऐकत आहेत हे ओळखून मी पुढे म्हणालो, ‘सरकारमधला एक महत्त्वाचा मंत्री आपण केलेल्या लेखनाची अतिशय आवर्जून दखल घेतोय, त्याला एक वेगळं असं परिमाण लागेल. तुम्ही सुसंस्कृत आहे त्याच्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.’
अशोक चव्हाण यांना ती कल्पना पसंत पडली. ते ‘हो’ तर म्हणाले, पण ती सूचना अंमलात येईल की नाही, याच्याविषयी माझ्या मनात किंचित शंका होती. याचं कारण करोनाचं संकट गडद झालेलं होतं. राज्यातल्या मंत्री आणि प्रशासनावर करोनाच्या कामाचं मोठं दडपण होतं. गेल्या आठवड्यात माझी शंका खोटं ठरवणारं सुखद वर्तन म्हणा की, अगत्य अशोक चव्हाण यांच्याकडून घडलं आणि त्या सुसंस्कृतपणाची दखल आपण घेतलीच पाहिजे असं आवर्जून वाटलं.
‘आधुनिक भगीरथ’ हे चांगलं जाडजूड पुस्तक एका साध्या पण पुठ्ठ्याच्या अतिशय देखण्या बॅक्समध्ये रिबिन बांधून अशोक चव्हाण यांनी सर्व लेखकांना पाठवलं. त्या पुस्तकासोबत अशोक चव्हाण याचं अतिशय एक छानसं पत्रही आहे. त्यासोबत जुलै महिन्यात राज्य सरकारचं मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या नियतकालिकानं प्रकाशित केलेला शंकरराव चव्हाण यांच्यावरचा विशेषांक आणि शंकरराव चव्हाण यांची मुद्रा कोरलेलं एक चांदीचं नाणंही आहे. एका अतिशय सुंदर, नक्षीदार आणि कलात्मक अशा डबीमध्ये ते नाणं पाठवलं आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सर्वच राजकारण्यांना नेहमीच टीकेच्या तोंडी धरणं आपल्याला आवडत असतं, परंतु राजकारणी अनेकदा अनेक चांगल्या गोष्टी अगत्यानं करत असतात, त्याची सकारात्मक दखल मात्र फारशी घेतली जात नाही.
एकीकडे साहित्य आणि संस्कृती मंडळाचा लालफीतशाहीमध्ये अडकलेला हा अनागोंदी व ढिम्म कारभार आणि दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी एका सूचनेची केलेली अंमलबजावणी, हे निर्दशनास आणून देणं हाच या लेखनाचा हेतू आहे.
राज्यातला आणि देशातलाही प्रत्येक मंत्री असा सुसंस्कृतपणे आणि जनतेशी अगत्यानं जर वागेल तर किती छान होईल नाही का?
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment