उसळे अर्णव, खळबळे रिपब्लिक, हिंदकळे माध्यम, सत्य बुडे
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • अर्णब गोस्वामी व त्यांच्या ‘रिपब्लिक’ टीव्हीचे बोधचिन्ह
  • Thu , 03 December 2020
  • पडघम माध्यमनामा अर्णब गोस्वामी Arnab Goswami रिपब्लिक Republic पत्रकारिता Journalism वृत्तवाहिन्या News Channel

स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या अर्णव गोस्वामीने गेली काही वर्षे भारतीय मीडियामध्ये प्रचंड चिखलफेक केली आहे. तो स्वतःच एका चॅनेलचा चालक-मालक असला तरीही, त्याचाही कोणी एक मालक आहे, ज्याच्यासाठी या अर्णवने रोजचा विध्वंस मांडला आहे. आश्चर्य याचेही नाही, मोदींइतकेच त्याच्याही चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. या चाहत्यांसाठी तो या देशातला खराखुरा देशभक्त पत्रकार आहे. पण ही काय प्रवृत्ती आहे? तिची मानसिकता काय आहे? या मानसिकतेचे साथीसोबती कोण आहेत आणि या साऱ्याचे भारतीय चर्चाविश्वावर काय परिणाम संभवले आहेत... यामागचे पदर उलगडणारा हा लेख...

..................................................................................................................................................................

सत्य, ज्ञान, माहिती, वास्तव, वस्तुस्थिती हे शब्द गेल्या सहा वर्षांत पार बोथट झाले. प्रचार अन् अफवा आणि वावड्या अन् गलका यांना प्रचंड उधाण आले. भरतीचा समुद्र जसा उधाणलेला असतो; तसा असत्य, अर्धसत्य, विपर्यास यांचा अर्णव आपल्या कानांवर जोरजोरात आवाज करत धडकू लागला. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ अशी एक जुनी म्हण आहे. कुणी आकांडतांडव करू लागला की, लोक समजत, यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसावे; म्हणून एवढी आरडाओरड चाललेय!

काळाचा सूड

शांत, गंभीर, सभ्य बोलणारे तेव्हा ‘शहाणे’ समजले जात. किंबहुना जो आवाज चढवून बोलताच नाही, तो शहाणा वा समजूतदार असा तो समज. सोहराब मोदी यांच्या गडगडाटी, तारस्वरातील संवादशैलीवर दिलीपकुमारच्या शांत व अस्फुट संवादांनी मात केली. संवादाशिवाय आणि अत्यल्प संवाद म्हणजे उत्कट अभिनय सादर करण्याची रीत सुरू झाली. गांधीजी, नेहरू, पटेल, जयप्रकाशजी, डॉ. आंबेडकर अशा भारताच्या असंख्य नायकांनी कधीही उग्र अन् भडक वक्तृत्वशैलीचा अंगीकार केला नाही. पण सहा वर्षांपूर्वी जणू सोहराब मोदींचे युग भारतात पुन्हा अवतरले! एक मोदी जाऊन दुसरा मोदी आला. तसाच गडगडाटी दरारायुक्त, जरबेचा, दणकेबाज संवादपटू. आपलेच खरे, मीच बरोबर, है कोई माई का लाल, असं आव्हानात्मक बोलणारा वाक्पटू. तो दिल्लीच्या राजकारणात उगवला अन् सत्तेतच बसला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

झाले! देशाचा कर्ताधर्ताच आक्रमक, बेछूट अन् एकतर्फी बोलणारा झाल्यावर बोलणे व ऐकवणे हेच ज्यांचे काम, त्यांनी मागे का राहावे? बोलणारा टीव्ही ओरडू लागला. हळूहळू तो किंचाळत चालला. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये होणाऱ्या बाचाबाची, हमरीतुमरी, शिवीगाळ, चपला-बूट अशी सारी ‘मवाली संस्कृती’ पसरत चालली. सभ्यता, नम्रता, संस्कृती एकएक करत जायबंदी होऊन या स्टुडिओमधून निघून गेली. तर्क कोकलत पळाला. युक्तीवाद शरमला अन् सटकला. सहिष्णुता दाराबाहेरूनच माघारी गेली. शहाणपणाने आपला मुक्काम या गोंगाटापासून दूर हलवला. सध्या तो कुठे आहे कोणाला पत्ता नाही. कुणीतरी त्याला दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाबाहेर पडताना पाहिल्याने सांगितले. खरेखोटे त्यालाच माहीत.

बहुसंख्यांचा दरारा

खैर, एक-दोन व्यक्ती ऐवढे मोठे परिवर्तन करू शकत नसतात. काही संस्कार, काही प्रशिक्षण, काहीसे बेलगाम बोलण्याचे कसब आणि मुख्य म्हणजे, ते असल्याशिवाय यश नाही आणि कपटावाचून त्याची प्राप्ती नाही, अशी विचारधारा या व्यक्ती जन्मास घालत असते. ही विचारधारा गेले दशकभर जगात स्वैरपणे राज्य करत आहे. या विचारसरणीची साधीच काही मूल्ये आहेत- सत्ता मूठभरांकडे किंवा एकापाशीच एकवटलेली चांगली असते; जे बहुसंख्य असतात, त्यांच्या कलानुसार इतरांनी चालायचे असते; या बहुसंख्याकांचे म्हणणे नेहमीच बरोबर असते; देश आणि सरकार म्हणजे, हे बहुसंख्याक असून त्यांच्याविरुद्ध बोलणे म्हणजे राष्ट्राविरोधात बोलणे; जगात श्रीमंतच साऱ्या गोष्टी घडवत असतात. सबब, त्यांच्यासाठी अवघ्यांनी राबायचे असते; बळ आणि दहशत यांवरच हे जग सुरळीत वा सुरक्षित असते आणि दैवीशक्ती व ईश्वरी आशीर्वाद नेहमीच, त्या ‘एका’ला किंवा मूठभरांना मिळालेले असतात. त्यामुळे लोकांनी त्यांना हटवायचा प्रयत्न करणे म्हणजे, दैवी कोप ओढवून घेणे होय!

भारतात या विचारसरणीला जात हे एक वैशिष्ट्य येऊन चिकटले व ‘सर्वोच्च’ ठिकाणी ज्या एक-दोन जाती असतात, त्यांनाच सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा मिळण्याची सोय जातिव्यवस्थेत असते. त्यानुसार गेली सहा वर्षे सारा कारभार हाकला जात असल्याचे भारत अनुभवतो आहेच. याचा अर्थ, लोकांनी, लोकांसाठी, लोकांचे चालवायचे प्रजासत्ताक (रिपब्लिक) २०१४ पर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतरची सत्ता प्रजेकडे जाण्याऐवजी फक्त दोघांकडेच गेल्याचे आपण पाहत आहोत. लोकांनी चालवायचे ते प्रजासत्ताक आता इतिहासजमा झाले. ‘रिपब्लिक’चा नवा अर्थ अर्णव गोस्वामी व राजीव चंद्रशेखर या दोघांनी देशाला दिलेला आहे. राजीव हे भाजपचे खासदार असून केरळाला त्यांची ‘एशिया नेट’ नावाची एक वाहिनी चालते. तेव्हा हेही रिपब्लिक फक्त दोघे हाकतात हे विशेष. पूर्वी वाजपेयी-अडवाणी ही दुक्कल मान्यताप्राप्त होती. मग मोदी-शहा आली. खूप पूर्वी मधोक-उपाध्याय अशी जोडगोळी असे.

ही कर्कश्श, आदळआपट करणारी वृत्तशैली केवळ अर्णव गोस्वामी याची खुबी नाही. विनय कटियार, डॉ. तोगडिया, साध्वी ऋतंबरा, उमा भारती यांना बातम्या द्यायला बसवले तर ते अभिशाप देतील, तशा शैलीत अर्णव वृत्तान्त देतो. शिवसेनेचे एखादे न्यूज चॅनेल लागले असते, तर तेही शाखाप्रमुख शैलीत वार्तांकन व सूत्रसंचालन करू लागले असते! शिवाय बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर भाषणांमधील शैली महाराष्ट्राच्या परिचयाची होतीच. त्यामुळे अर्वाच्च, निरर्गल असभ्य आणि शिवराळ कशाला म्हणायचे आणि ते सुरू झाल्यावर ऐकत बसायचे की, चॅनेल बंद करायचे हे महाराष्ट्र शिकला होताच की! त्यासाठी सर्वाच्च न्यायालय कशाला लागते? ‘सामना’चा खप मग महाराष्ट्रात सर्वाधिक नसता का झाला! संपादक-मालक म्हणून बाळासाहेबांवर असंसदीय भाषा वापरल्याचे किती खटले झाले आणि त्यांचा काय निकाल लागला, कोणाला आज आठवते का?

आक्रस्ताळे- आक्रमक प्रचाराचे गणित

लक्षात ठेवायची गोष्ट ही की, भारताला अश्लाघ्य भाषा ऐकवली ती राजकारणामधील लोकांनी. ज्यांना संसदीय राजकारणात उतरायचे नव्हते ते सर्व प्रकारच्या भाषिक युक्त्या वापरत. उमा भारती शेवटी सौम्य झाल्या; पण कटियार, तोगाडिया, ऋतंबरा, ठाकरे, राजीव दीक्षित इत्यादी प्रचारक अपसमज आणि सांगोवागी यांचा वापर बेलाशक करत राहिले. बाळासाहेबांवर तर निवडणुकीचा प्रचार करण्यावर बंदी आली. त्यामुळे एस.पी. सिंह यांनी ‘आजतक’ या वृत्तवाहिनीची वार्ताशैली आवाजी, गतिमान, आणि बेछूट बनवली, तो काळ यासाठी अगदी पोषकच होता.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अर्णव गोस्वामी हा आसामचा. त्याने १० वर्षे राजदीप सरदेसाईच्या सावलीत काढली. ‘टाइम्स नाऊ’चा तो संपादक बनला व त्याने २००८चा मुंबईवरच दहशतवादी हल्ला अक्षरश: एक हाती घुसळला. ‘पाकिस्तानावर हल्ला करा’ अशीच त्याची भाषा सुरू झाली. म्हणजे, तो एका घटनेची बातमी देता देता त्याहून मोठी घटना घडवायला सरकारला सांगत होता. आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थव्यवस्था, संरक्षणसज्जता आणि संभाव्य रक्तपात आदींचा अजिबात विचार न करता रस्त्यावर मारामारी करणाऱ्यांना कडेला उभे राहून चिथावणी देणारा जसा असतो, तसा अर्णव पत्रकारिता करत राहिला. ही जी बघ्याची मनोवस्था असते, ती अर्णवने स्वत:बरोबर त्याच्या प्रेक्षकांतही वाढवली. बघ्यांचे काहीच कशात जात नसते. मजा, गंमत, करमणूक एवढीच त्यांची अपेक्षा असते.

अर्णवचे हेच रूप सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्त्येसाठी रिया चक्रवर्तीला आरोपी करताना ठसले. ना पुरावे, ना साक्ष, ना कबुली; अर्णवने रियाविरुद्ध असे काही वातावरण तापवले, जणू ती आता लोकांकडून ठेचली जाणार... सारेच खोटे ठरल्यावरही अर्णव चुकलो, दिलगीर आहे, असं मुळीच म्हणाला नाही. कसा म्हणेल? मीडिया ट्रायल अर्थात माध्यमन्याय द्यायला बसलेला तो एक ब्राह्मण होता. ब्राह्मण कधी चुकतो काय? चुकले तरी फार काय होते? हत्या त्याने करायची, मात्र ब्रह्म हत्या कोणी करू शकत नाही, असा हिंदूधर्माचा प्रघात आहे. अर्णवला हात लावायचा प्रयत्न ब्रह्महत्या बिंबवला गेला आणि झालं काय? ‘पर्सनल लिबर्टीच्या उदात्त व मूलभूत मूल्याच्या आधारे त्याने आत्महत्येच्या प्रकरणात जामीन प्राप्त करवून घेतला.

निवेदकाचा हिंसक चेहरा

काय विसंगती आहे बघा! राजपूतचीही आत्महत्या अन् नाईकांची आत्महत्या! पण एकीत अर्णव रहस्यभेदी ठरतो, तर दुसरीत विनाकारण नाव घेऊन अडकलेला एक निरपराध माणूस! थोडक्यात, दोन आत्महत्या आणि दोन न्याय, अर्णव एकच!

अहंकार व अर्णव एकाच अर्थाने घ्यायला लावले ते माध्यमांनीच. डिसेंबर २०१२च्या ‘कॅराव्हान’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर अर्णव आहे. शीर्षक आहे : ‘फील द नॉईज, अर्णव गोस्वामीज टर्ब्युलांट रीन’. नंतर तो येतो ‘आऊटलूक’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर; ते म्हणले : ‘अर्णव गोस्वामी : द मॅन हू किल्ड टीव्ही न्यूज!’ पुन्हा तो ‘आऊटलूक’वर झळकला तो २ मार्च २०२० च्या अंकावर. येथे मात्र अन्य पाच टीव्ही वृत्तनिवेदकांसह सहावा वृत्तनिवेदक म्हणून तो रेखाचित्रित झाला आहे. हिंदी ‘आऊटलूक’ पाक्षिकाने सप्टेंबर २०२० च्या अंकात ‘मीडिया अदालत : न पेशी, न सुनवाई, सीधे फैसला’ असा मथळा देऊन रिया चक्रवर्ती मुखपृष्ठावर झळकावली आहे. आत अर्थातच अर्णव त्याच्या रिपब्लिक वाहिनीच्या चौकटीत बसून आरडाओरडा करतानाचा फोटो आहेच. अशी दखल घेणार म्हणजे, बातम्यांचा न लेखांचा विषय होणारा माणूस (पत्रकार म्हणावे त्याला?) मस्तवाल होणार नाही. तर काय नम्र?

..................................................................................................................................................................

बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर भाषणांमधील शैली महाराष्ट्राच्या परिचयाची होतीच. त्यामुळे अर्वाच्च, निरर्गल असभ्य आणि शिवराळ कशाला म्हणायचे आणि ते सुरू झाल्यावर ऐकत बसायचे की, चॅनेल बंद करायचे हे महाराष्ट्र शिकला होताच की! त्यासाठी सर्वाच्च न्यायालय कशाला लागते? ‘सामना’चा खप मग महाराष्ट्रात सर्वाधिक नसता का झाला! संपादक-मालक म्हणून बाळासाहेबांवर संसदीय भाषा वापरल्याचे किती खटले झाले आणि त्यांचा काय निकाल लागला, कोणाला आज आठवते का?

..................................................................................................................................................................

‘कॅराव्हान’ मासिक डिसेंबर २०१७च्या अंकात ‘रिपब्लिक टीव्ही’चे एक मालक राजीव चंद्रशेखर यावर मृखपृष्ठकथा लिहिते. त्यातही अर्णवचा मुखडा डोकावतो. हा बातम्यांचा माणूस आहे की, बातम्यातला? जामिनावर सुटून येताना उघड्या वाहनावर उभे राहून हा जोरजोरात ओरडत काय होता, मुठी काय वळवत होता, चेव येऊन युद्धवीरासारखा आवेश काय दाखवत होता... पण हे कशासाठी माहीत आहे? टीव्हीतील ताज्या प्रतिमा नेहमी जुन्या पुसून टाकत असतात. पोलीस पकडायला आले, तेव्हा गांगरलेला, भ्यायलेला, हतबल अन् अतिसामान्य झालेला अर्णव त्याला लोकांच्या लक्षात ठेवायचा नव्हता. पोलिस ठाण्यात झटापट करून गयावया करणारा, जमिनीवर लोळण घेणारा हा सरकारी भोंगा असा कसा संस्मरणीय असेल? सबब त्याने आपली मिरवणूक काढायला लावली आणि स्वत:च स्वत:चा जयजयकार करीत निघाला...

याला बेशरम म्हणावे की लबाड? एका फौजदारी खटल्यात जामीन मिळवून आणलेला दुसरा एखादा संशयित जर असा गाजावाजा करत बाहेर निघाला तर ते किती पत्रकारांना आवडेल? रिया जामीन मिळवून सभ्यपणे आली आणि ती गडप झाली, ती आजवर कोणी पाहिलेली नाही. या दोन जामिनांतदेखील केवढ अंतर! प्रचंड मानखंडना, बदनामी, अपप्रचार आणि उपेक्षा होऊनही ही पोरगी फार धीराने व शांतपणे तुरुंगात जाऊन आली. कुठे तिची संयत साहसीवृत्ती अन् कुठे अर्णवचा थिल्लर पोकरटपणा...

एक मात्र छान झाले. भाजपचे राजकारण असेच दिखाऊ, बाष्कळ आणि भावनिक असते, हे अर्णवने सिद्ध करून टाकले. त्याचे व भाजपचे राजकारण एकवटून आले!

संघ, भाजप आणि अर्णव

भाजप एक ‘प्रतिक्रियावादी’ (रिअ‍ॅक्शनरी) लोकांचे संघटन आहे. त्याच्यापाशी कल्पकता, सर्जन, नावीन्य असे काही नाही. थेट संघ, जनसंघ यापासून हे लोक असेच क्रियाशून्य आहेत. ते क्रियाशून्य असतात म्हणून प्रतिक्रियावादी असतात. क्रियाशूर असते तर १८५७ ते १९४७ या ९० वर्षांत हिंदुत्ववादी म्हणून ते काहीही करू शकले असते. पण त्यांनी सावरकर उधार घेतले. विवेकानंद उसने घेतले. मालवीय व लजपतराय, सुभाष व पटेल जवळ केले. स्वत: स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काहीही केले नाही. किंबहुना, ब्रिटिशांना फायदा पोचेल अशी कृत्ये खूप केली. द्वेष, संशय आणि खोटारडेपणा त्यांच्या राजकारणाचा पाया.

गुलामीविरुद्ध न झगडणारे जसे सत्तेमुळे राष्ट्रभक्त होत चालले, तसे अर्णव गोस्वामीचे आहे. तो पत्रकारितेमधल्या सत्य-शिव-सुंदर मूल्यांसाठी कोठेही, कधीही झगडला नाही. कायम मालकांच्या हितासाठी राबत राहिला. त्याच्या तुरुंगवासाच्या वेळी ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ सोडता कोणीही दु:ख वा निषेध जाहीर केला नाही. का म्हणून करतील?

..................................................................................................................................................................

हेही पाहा : अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भारतीय ‘पत्रकारिता’ अजिबातच धोक्यात आलेली नाही. उलट ती मोदी सरकार आणि त्यांच्या छत्रछायेखाली चरणाऱ्या ‘गोदी मीडिया’वाल्यांनीच धोक्यात आणलेली आहे!

.................................................................................................................................................................

“पत्रकार तटस्थ होऊन कार्यरत असला पाहिजे, त्याने बातमी वस्तुनिष्ठ रीतीने द्यायला हवी. मात्र मालक त्यांना पगार देत असल्याने त्यांचीच धोरणे राबवली जाणार हे उघड आहे. ती अर्थातच व्यापारी धोरणे असत नाही. भारतातल्या एक तृतीयांशापेक्षा जास्त वृत्तवाहिन्या राजकीय मंडळी अथवा राजकीय साथीदार यांच्या मालकीच्या आहेत. या वाहिन्यांचा उपयोग मालकांच्या राजकीय फायद्यासाठी वा विचारसरणीसाठी केला जातो. नवी ‘रिपब्लिक’ ही वाहिनी आपले ध्येय भ्रष्टाचार खणून काढायचे आहे असे सांगते. पण आजतागायत सत्ताधारी भाजपचे एकही गैरकृत्य तिने सांगितलेले नाही. मग ते व्या.प.म. नोकर भरतीचे असो की केरळमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या लाचलुचपतीचे, एकमेव स्रोत असेल तर अशा भानगडी घडल्याचे तुम्हाला कधीच कळणार नाही. (मीडिया इन द मिरर, शशी थरूर, ओपन वीकली, २४ ऑगस्ट २०१७, पान ८१)

नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष असताना त्यांच्या ‘पूर्ती’ समूहाची भानगड अर्णवनेच खणली होती, पण ती मोदींच्या सांगण्यावरून असा एक प्रवाद आहे. प्रमोद महाजन यांचा त्यांच्या धाकट्या भावाने केलेला खून व नंतर त्याही भावाचा मृत्यू यावर किती वाहिन्यानी किती वेळ खर्च केला? मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या १३ वर्षांच्या काळात एकसुद्धा भ्रष्टाचाराचे, गैरकारभाराचे, बेपवाईचे प्रकरण कोण्या वाहिनीने का नाही काढले? गुजरातमध्ये सेवा बजावणारे निवडक- निष्ठावान अधिकाऱ्यांच्या जीवावर पंतप्रधान कार्यालय चालते. त्याचे किती तोटे भारताने सोसले, यावर किती शब्द बोलले गेले?

अंबानी, अदानी याची मक्तेदारी देशभर पसरत चालल्याची दखल अजून कोणती वाहिनी कशी काय घेत नाही? त्याची कारणे आहेत. वार्तेवर खूप खर्च करावा लागतो. प्रवास, भत्ते, बातमीदार, कॅमेरामन, राहणे, खाणे, संदर्भ, संशोधन, इतिहास अशा अनेक गोष्टी फार वेळ खाऊ असतात. शिवाय कायदेशीर पंच, दावे, बदनामी याही मागे लागतात. एक बाजू दिली की दुसऱ्याचीही द्यावी लागते. ती बऱ्याचदा नकोशी असते. एका पक्षाचा व नेत्याचा प्रचार मग कसा करणार? सबब, मालकांनी आता बातम्यांवरचा खर्च घटवला असून फक्त वार्ताहर परिषदा, नैसर्गिक व मानवी दुर्घटना, सण-वार, उत्सव-समारंभ, क्लोज सर्किट टीव्हीचे तुकडे आणि प्रायोजित घटना-घडामोडी (यात आंदोलने, मोर्चेसुद्धा सध्या येतात) एवढ्याच ‘बातम्या’ समोर येतात. प्रक्षेपणाचा प्रचंड खर्च वाचवायला आयते फूटेज वापरण्याचाही रिवाज पडला आहे.

..................................................................................................................................................................

उजवा विचार क्वचितच तर्क, युक्तिवाद, न्यायबुद्धी, संतुलन यांचा आधार घेतो. तो अतिरेकी व आक्रमक असेल तर या गोष्टी उडून गेल्याच असे समजा! वंशवाद, वर्णवाद, धर्म-जातवाद, संस्कृतिश्रेष्ठत्व अशा ‘श्रद्धे’च्या मुद्द्यांवर चर्चा कशी करता? लोकशाही प्रजासत्ताकातला यावर चर्चेला व वादाला मनाई केली पाहिजे, अशा मतांचे राजकारण म्हणजे ‘रिपब्लिक’सारख्या वाहिन्यांचा श्वास.

..................................................................................................................................................................

अशा काटकसरीच्या वातावरणात सायंकाळी पाचपासून सर्व वाहिन्या भर देतात तो चर्चा, वादविवाद अर्थात हमरीतुमरीच्या कार्यक्रमांवर. यात अर्णव एकदम पटाईत. दहा चौकोनांत दहा बोलकी तोंडे बसवून तो असा काही गोंगाट अन् गलबला करून ठेवतो की, पाचवीतल्या मुलांनीही लाजून मान खाली घालावी! या कार्यक्रमात अर्णवच फिर्यादी, अर्णवच वकील, अर्णवच न्यायाधीश आणि बातमीदार अर्थातच अर्णव? चर्चेपेक्षा धमक्या, आव्हाने, टोमणे, अपमान, खोटा आरोप आणि विपर्यास असा सारा विकृत व विद्रुप प्रकार असतो. या लेखाच्या सुरुवातीस त्याचे वर्णन केलेले आहेच.

प्रजासत्ताकाचे माध्यमकेंद्री धिंडवडे

उजवा विचार क्वचितच तर्क, युक्तिवाद, न्यायबुद्धी, संतुलन यांचा आधार घेतो. तो अतिरेकी व आक्रमक असेल तर या गोष्टी उडून गेल्याच असे समजा! वंशवाद, वर्णवाद, धर्म-जातवाद, संस्कृतिश्रेष्ठत्व अशा ‘श्रद्धे’च्या मुद्द्यांवर चर्चा कशी करता? लोकशाही प्रजासत्ताकातला यावर चर्चेला व वादाला मनाई केली पाहिजे, अशा मतांचे राजकारण म्हणजे ‘रिपब्लिक’सारख्या वाहिन्यांचा श्वास. कोणी कोणाला जन्मास घातले हा प्रश्न अलाहिदा. चर्चा व वादविवाद संसदेतही होऊ द्यायचा नाही आणि वृत्तपत्रे, टीव्ही, समुदाय माध्यमे यांतही होऊ द्यायचा नाही, हा उजव्यांचा डाव असतो.

‘आयडेंटिटी पॉलिटिक्स’ अर्थात ‘अस्मितांचे राजकारण’ नेहमीच एकेरी, एकांगी व एकाधिकारवादी असते. अर्णव गोस्वामी त्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला हुशार उमेदवार आहे. आणि वायफळ बोलून मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करायचे हा कावा त्याला छान जमतो. पाकिस्तान, दहशतवाद, कश्मीर, युद्ध, इस्लाम हिंसाचार अशा ठराविक मुद्द्यांवर प्रत्येक चर्चा आणायची यात ‘रिपब्लिक’ला प्रावीण्य मिळाले आहे. कारण ते एक भाजपचेच तोंड आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : पत्रकारितेची हत्या तर सत्ताधाऱ्यांकडूनच झालेली आहे. मग भाजप कुठल्या पत्रकारितेवरील हल्ल्याविषयी बोलत आहे?

.................................................................................................................................................................

भाजपचा कोणताच नेता जसा विद्वान, अभ्यासू, गंभीर अन् विचारी वाटत नाही, तसा अर्णव वाटत राहतो. त्याच्या बोलण्यात ना कधी पुस्तकाचे संदर्भ, लेखकाचा हवाला, संशोधनांचे दाखले, ना तज्ज्ञांचे तपशील. भावनांचा आक्रस्ताळेपणा आणि शाब्दिक खेळ्यांवर जसे भाजपचे भागते, तसे अर्णवचे. टीव्हीच्या या प्रकारच्या (पक्षपाती) वर्तनामुळेच त्याला ‘इंडियट बॉक्स’ म्हटले जायचे. पण आता तो ‘विस्डम बॉक्स’ झाला आहे. त्याचेच म्हणणे लोकांना पटते, पण हे विस्डम शांत, संयमी नाही. ‘शहाण्याने कोर्टाची पायरी कधी चढायची नाही’ असा मराठीतला इशारा आहे. जर शहाणपणाच कोर्टाची पायरी उतरून चालता झाला तर काय करावे? शहाणपणाला न्यायालयाची पायरी तुम्ही चढू देत नाही अन् तिकडे न्यायालयात जाताही येत नसेल त्याला तर कसं व्हावे? न्यायमूर्ती असे म्हणू शकतात की, आमच्यासमोर जे प्रकरण येते, त्यावर आम्ही निकाल देतो. कोणते प्रकरण कसे पुढ्यात आले आम्हाला काय माहीत?

अहो, तुम्ही काही डॉक्टर नाहीत, हातातला रुग्ण सोडून इमर्जन्सी धावायला. अर्णव काही तातडीची बाब होती का? आता तो मातला, तर कोण जबाबदार?

माध्यमातले मक्तेदार

‘रिपब्लिक टीव्ही’ आता प्रादेशिक भाषांतही बोलणार आहे. तसे अर्णवनेच त्याच्या सहकाऱ्यांसमोर सांगितले. बाकी कोणत्या भाषेत ही वाहिनी सुरू होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र ती मराठीत उघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे, सूड, प्रतिशोध, बदला यांचा वृत्तावतार आता महाराष्ट्राला पाहायला मिळणार. कधी एकदाचे हे ठाकरे सरकार पाडीन अशी घाई, या गोस्वामीला लागली आहे. सरकार पाडणारे संपादक म्हणून अरुण शौरी आणि प्रीतीश नंदी यांनाच कीर्ती लाभली आहे. अर्णवला तिसरा ताकदवान संपादक म्हणवून घ्यायचे दिसते. पण तो नुसता संपादक नव्हे. ‘रिपब्लिक’च्या मालकीत त्याचाही वाटा आहे. त्याची पत्नी या कंपनीचा कारभार बघते. त्यामुळे दोन घराणी एकमेकांशी भिडणार. केंद्र सरकारच्या जिवावर एखादे राज्य सरकार उलथवणे पत्रकारांसाठी सोपे असू शकते, मालकांना नाही.

अर्णव संपादक आणि नागरिक असा स्वत:त फरक करू शकत नाही. तो राजकीय मंडळींकडे शत्रू-मित्र एवढ्याच दुरंगी चष्म्यातून बघतो. याचा अर्थ हा की, हा गडी आता पूर्ण संघ परिवारमय झालेला आहे. पत्रकाराला कसले आले शत्रू-मित्र? व्यावसायिकता वेगळी आणि राजकारण वेगळे. परंतु संघात जसा पोरकट शत्रू-मित्र विचार शिकवला जातो, तसा भारतीय पत्रकारितेत संघीय भेदभाव रुजवला जातो आहे. उभे तुकडे पत्रकारितेत पडू लागले आहेत. राजकीय मतांप्रमाणे जर वाचक प्रेक्षक विभागण्याचे प्रकार उद्भवू लागले तर?

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण तेवढेच कशाला, आता जातीप्रमाणे पाठिंबा, प्रचार, टीका, विरोध माध्यमांमधून सुरू झाले आहेत. कऱ्हाडे ब्राह्मण ज्या बडगा वृत्तपत्राचे संपादक असतात, त्यांचा सरसंघचालक कऱ्हाडे ब्राह्मण असल्याने संघाला पाठिंबा असतो. मराठा मालकीचे दैनिक आपसूक मराठा जातीच्या आंदोलनांच्या बातम्या भडक व ठळक छापत निघाले आहे. जैन व मारवाडी मालक आपोआप भाजपच्या शेठजी-भटजी गाभ्यावर फिदा असतात म्हणून हा पक्ष कायम साजूक शुद्ध राहतो. दलित जातींचे माध्यमांतील प्रमाण वा प्रभाव मोजमाप करता येत नाही, कारण त्यांची पत्रकारितेतली उपस्थिती नसल्यासारखी आहे. मुसलमानांचा तर प्रश्नच नाही. उर्दू असेल तर ते त्यात आपली सुखदु:खे शोधत राहतात. अन्यथा, ज्या प्रादेशिक भाषेत ते जगतात, तीत मुसलमान कुठेच नसतो. दलित जातींना इंग्रजी पत्रकारितेत अद्यापही ठिकाणा सापडलेला नाही. संपादक होणे तर फार दूर. अर्णवच्या वाहिनीत किती दलित, मुसलमान, आदिवासी, ओबीसी आहेत, त्याचाही शोध घ्यायला हवा. इंग्रजी अजूनही सवर्ण, धनवान व सत्तावंत यांच्या दावणीला बांधलेली वाटते.

त्यामुळे मराठीत ‘प्रजासत्ताक’ अर्थात ‘रिपब्लिक’ आले तरी ते ‘श्री पब्लिक’ याच अर्थाने असेल याची खात्री बाळगतो. पसर्नल लिबर्टी मुबारक हो...!    

..................................................................................................................................................................       

हा लेख ‘मुक्त-संवाद’च्या १ डिसेंबर २०२०च्या अंकात प्रकाशित झाला आहे. लेखक व संपादकांच्या पूर्वपरवानगीने तो इथे पुर्नप्रकाशित केला आहे.   

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......