वर्षाखेर आणि नववर्षारंभ : आता कशाला उद्याची बात, बघ उडुनी चालली रात…
पडघम - साहित्यिक
राम जगताप
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 03 December 2020
  • पडघम साहित्यिक साहित्य संमेलन साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार लोकमंगल साहित्य पुरस्कार राज्य वाङ्मय पुरस्कार

‘२०२०’ हे वर्ष सर्वार्थाने महाभयंकर ठरले असे म्हणावे लागेल. करोनाने जवळपास संपूर्ण जगाला वेढा घातला. करोनावरील लसीची चर्चा सुरू झालेली असली तरी करोना महामारीचे जसे भारतासह जगभरच्या राजकारण्यांनी आपापल्या फायद्यासाठी ‘राजकारण’ केले, तसेच आता त्यावरील ‘लसी’चेही ‘राजकारण’ होऊ घातले आहे. पण ते असो.

करोनाने मराठी साहित्यक्षेत्रावर मोठा दुष्परिणाम केला आहे. आता हेच पाहा ना, वर्षाची अखेर आणि नववर्षारंभ हा साहित्यक्षेत्रासाठी अतिशय चैतन्याचा काळ असतो. म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी या काळात विविध पुरस्कार, मानसन्मान जाहीर होतात. पण नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर सुरू झाला तरी त्या पातळीवर अजून कुठलीच घडामोड घडताना दिसत नाही.

एरवी एव्हाना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, संमेलनाध्यक्षांची निवड, त्याची चर्चा, वाद आणि उलटसुलट बातम्या सुरू झालेल्या असतात. यंदा मात्र दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार की नाही, याविषयीही काहीच समजू शकलेले नाही. दरवर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत नियोजित संमेलनस्थळ जाहीर होऊन संमेलनाध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झालेली असते. संमेलनस्थळ साहित्य महामंडळाने जाहीर केले की, त्या ठिकाणी मोठी धांदल सुरू होते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष, उदघाटक यांच्या नावांची चर्चा सुरू होते. संमेलनाचे स्वरूप, निधी, कार्यक्रम यांविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागतात. संमेलनाध्यक्षाविषयी वेगवेगळी नावे पुढे येऊ लागतात, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुचवली जातात.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

गेल्या दोन वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत नाही, तर साहित्य महामंडळ एकमताने संमेलनाध्यक्षांची निवड करते. त्यामुळे हे पद कुणाला मिळणार याची उत्सूकता साहित्यप्रेमींना लागून राहते. पण त्याबाबतीतही अजून सगळे कसे शांत शांत आहे. डिसेंबर महिना हा साहित्य संमेलन आणि संमेलनाध्यक्षांविषयीच्या उलटसुलट बातम्यांनी भरलेला असतो. यंदा तेही घडण्याची शक्यता नाही. कारण अजून ना संमेलनस्थळ जाहीर झाले आहे, ना संमेलनाध्यक्ष. किंबहुना साहित्य संमेलन या वेळी होण्याची शक्यताच फारशी नाही. 

त्याचबरोबर याच काळात साहित्य अकादमीचे पुरस्कार, लोकमंगल साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार, केशवराव कोठावळे स्मृती पारितोषिक, राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर होतात. त्यामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण होते. लेखक, पुस्तके, साहित्यचर्चा, समीक्षा, वाद-प्रतिवाद, सन्मानसोहळे आणि साहित्यविषयक बातम्या यांच्यामुळे मराठी साहित्यक्षेत्रात एक प्रकारचे चैतन्य सळसळू लागते. पण यंदा यातले अजून काहीच घडलेले नाही. घडेल की नाही, याची शाश्वती नाही.

साहित्य अकादमीचे पुरस्कार तर २४ भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. अलीकडच्या काळात त्यात अनुवाद पुरस्कार, युवा साहित्यिक पुरस्कार, बालसाहित्यिक पुरस्कार यांचीही भर पडली आहे. म्हणजे साहित्य अकादमीचे तब्बल चार पुरस्कार मराठी साहित्यासाठी जाहीर होतात. ते कुणाला मिळणार याची मराठी साहित्यक्षेत्रात खूप उत्सूकता असते. कारण हे पुरस्कार अतिशय मानाचे समजले जातात. ते मिळतात चारच साहित्यिकांना, पण त्याकडे आशाळभूतपणे डोळे लावून बसलेल्यांची संख्या बरीच मोठी असते. त्यामुळे ज्यांना हे पुरस्कार मिळतात त्यांचे एकीकडे कौतुकसोहळे सुरू होतात, (एक छोटासा गट पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या पात्रते-अपात्रतेबद्दल बोलू लागतो), तर दुसरीकडे ज्यांना हे पुरस्कार मिळत नाहीत त्यांची धुसफूस, रागलोभ उफाळून येतात. त्यामुळे साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या निमित्ताने मराठी साहित्यातील राजकारणाची थोडीशी उघडपणे आणि बरीचशी अप्रत्यक्ष चर्चा सुरू होते. आणि बरी-वाईट चर्चा तर होत राहायला हवीच ना, त्याशिवाय साहित्यक्षेत्रात सळसळ निर्माण होणार कशी?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यानंतर उत्सूकता असते ती राज्य वाङ्मय पुरस्कारांची. या पुरस्कारांची संख्या मोठी (जवळपास ५० पेक्षाही जास्त) असल्याने आणि अलीकडच्या काळात यातल्या पुरस्कारांच्या रकमा वाढवल्या गेल्या असल्याने त्याबद्दलही मराठी साहित्य क्षेत्रात उत्सूकता असते. हेही पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लॉबिंग, वशिलेबाजी, साटेलोटे आणि राजकारण यांची चर्चा होतेच. ती बातम्यांचा विषय फारसा होत नाही, कारण बऱ्याचदा ती साहित्यातल्या वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये खाजगीपणे होते.

असाच प्रकार महाराष्ट्र फाउंडेशन आणि ‘लोकमंगल साहित्य’ पुरस्कार यांबद्दलही होतो. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिले जाणारे ‘साहित्य जीवन गौरव’ आणि इतर ‘साहित्य पुरस्कार’ हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्याकडेही अनेकांचे कान-डोळे लागलेले असतात. त्याखालोखाल चर्चा असे ती ‘भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कारा’ची. मात्र अलीकडेच हा पुरस्कार बंद झाला आहे, पण सोलापुरातूनच ‘लोकमंगल साहित्य पुरस्कार’ सुरू झालेला आहे. त्याकडे ‘भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कारा’चे नवे रूप या दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याने तोही महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये गणला जाऊ लागला आहे.

पण अजून यापैकी कुठलेच पुरस्कार जाहीर झालेले नाहीत आणि निदान अजून तरी हे पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी त्याबाबत कुठले खुलासेही केलेले नाहीत.

याशिवाय भारतात साहित्यक्षेत्रातला सर्वोच्च मानला जाणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ यंदा कुणाला मिळणार, याचेही मोठे कुतूहल मराठी साहित्यात असते. दरवर्षी काही मराठी साहित्यिकांच्या नावांची चर्चा अनेक साहित्य वर्तुळांमध्ये होत असते. हा पुरस्कार सहसा मराठी साहित्याच्या वाट्याला येत नाही, पण जेव्हा केव्हा येतो, तेव्हा मात्र मराठी साहित्यात आनंदाच्या, चैतन्याच्या लाटांची भरती सुरू होते. त्यानिमित्ताने मराठी वर्तमानपत्रे, वाङमयीन नियतकालिके, साहित्यसंस्था यांच्यात उत्साहाचे वातावरण तयार होते. हा माहोल पुढे वर्षभर तरी या ना त्या निमित्ताने कायम राहतो.

.................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘कुठाँव’ : इतके दिवस व्यवस्थेनं ‘या’ विषयावरचा सोयीनं धरून ठेवलेला मौनाचा पडदा टराटरा फाडणारी कादंबरी!

..................................................................................................................................................................

यंदा साहित्य संमेलन जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात घेणे शक्य नाही, हे समजण्यासारखे असले तरी साहित्य अकादमी, राज्य वाङ्मय, लोकमंगल, महाराष्ट्र फाउंडेशन यांच्यातर्फे दिले जाणारे पुरस्कार जाहीर व्हायला काहीच हरकत नाही. त्यांचे पुरस्कार सोहळे घेता येणार नसले, तरी संबंधित साहित्यिकांच्या घरी जाऊन त्यांना ते निवडक मान्यवरांच्या उपस्थित देता येणेही शक्य आहे.

जागतिक पातळीवर सर्वोच्च मानली जाणारी ‘नोबेल पारितोषिके’ यंदाही, करोनाकाळातही ठरल्याप्रमाणे जाहीर झालीच की! भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता आणि साहित्य या सहाही क्षेत्रासाठीची ‘नोबेल पारितोषिके’ ऑक्टोबर महिन्यात जाहीर झाले. त्यांचा पुरस्कार प्रदान सोहळा मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे १० डिसेंबरला होऊ शकणार नाही. तो नंतर कधीतरी होईलच किंवा पुरस्कारविजेत्यांच्या घरी जाऊन त्यांना निवडक मान्यवरांच्या उपस्थित सन्मानित केले जाईल.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मराठी साहित्याला नोबेल पुरस्कार का मिळत नाही, याची मराठी साहित्यात वर्षानुवर्षे तावातावाने, अहमहमिकेने आणि काहीशी निराशेने चर्चा होत आली आहे. मराठी साहित्यही नोबेलच्या तोडीचे आहे, याचे दाखलेही अनेकवार अनेकांनी दिलेले आहेत. त्यामुळे मराठी साहित्यातल्या श्रेष्ठींनी, ज्येष्ठांनी आणि मान्यवरांनी नोबेल पुरस्कार समितीकडून करोनाकाळातही पुरस्कारांत खंड न पडू देण्याची स्वागतार्ह बाब स्वीकारायला हरकत नाही.

मोठ्या संकटातच आपल्या सत्वाची कसोटी लागत असते. त्या प्रसंगी आपले वर्तन कसे असते, यावरूनच आपली पारख होते. साहित्य संमेलन हा गर्दी, सुरक्षा आणि आरोग्य या तिन्ही बाजूंनी हाताळायला कठीण विषय आहे, पण पुरस्कारांच्या बाबतीत तसे काहीच नाही. त्यामुळे त्या पातळीवरील चैतन्यदायी घटना घडायला आणि त्यानिमित्ताने मराठी साहित्यातली करोनानिर्मित मरगळ दूर व्हायला काहीच हरकत नाही. पुरस्कारासाठी कुठलाही साहित्यिक लिहीत नाही (जे लिहितात त्यांना मानाचे पुरस्कार सहसा मिळतही नाहीत!), पण पुरस्कार ही त्याच्या साहित्य योगदानाला दिलेली मानवंदना असते. ती देण्यात यंदा खंड पडू नये एवढेच.

..................................................................................................................................................................

लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......