व्लादिमीर नोबकोव्ह यांची मास्टरपीस समजली जाणारी ‘लोलिता’ ही कादंबरी मध्यवयीन हंबर्ट हंबर्टच्या लोलिता या १२ वर्षीय मुलीबरोबरच्या हिंसक प्रेमप्रकरणाची शोकात्म कहाणी आहे. हंबर्ट हंबर्ट, लोलितावर स्वामित्व गाजवणारा, तिला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा आणि आपल्या तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसर्यांचं आयुष्य आणि आकांक्षा पणाला लावणारा चाळिशीतील पुरुष.
नोबोकोव्हच्या अत्यंत मोहक आणि आकर्षक शैलीची तारीफ होते, पण अल्पवयीन मुलीला फूस लावून जाळ्यात ओढण्याच्या आक्षेपार्ह प्रकरणाला प्रणयानुनयाचे आवरण लावून बुद्धीला पटतील अशी कारणमीमांसा म्हणजेच ही कादंबरी. नोबोकोव्ह यांच्या शैली आणि ट्रीटमेंटमुळे हंबर्ट बलात्कारी राक्षस म्हणून पुढे येत नाही. मात्र भाषेचा पडदा बाजूला केल्यावर त्याआडची त्याची हिंसा दिसू लागते.
गेली अनेक वर्षे प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतूनही अल्पवयीन मुलींचं लैंगिकीकरण होत आहे. ‘Reddit’ या ऑनलाइन व्यासपीठावर प्रौढ पुरुष आपल्या किशोरवयीन मुलींबद्दलच्या आकर्षणाबद्दल उघडपणे चर्चा करतात. या प्लॅटफॉर्मचा शोध घेताना अत्यंत धक्कादायक ऐवज पुढे आला. लहान असताना आपल्याकडे, आपल्या शरीराकडे लैंगिक नजरेने बघितल्या गेल्याच्या आठवणी स्त्रिया शेअर करत होत्या. या मुलींच्या मागे त्यांच्या वयाचीच मुलं लागली असणार असं वाटू शकतं, पण सत्य भयंकर होतं. प्रौढ पुरुषच डोळे फाडून या मुलींकडे बघत होते. आणि या मुली तेव्हा होत्या ११ आणि १२ वर्षांच्या. ‘लोलिता’मधल्या हंबर्टचा वावर सगळीकडे असतो.
१२ वर्षीय लोलिता उर्फ डोलरेस हेज ही हंबर्ट हंबर्टची सावत्र मुलगी. खरं तर लोलिता आपल्या जवळ असावी, ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणूनच हंबर्ट हंबर्ट तिच्या आईशी लग्न करतो. ‘मला तिच्या चेहर्याचं वर्णन करायला आवडेल, पण ती जवळ असली की माझ्या तीव्र इच्छांमुळे माझी मती कुंठित होते. मी माझे डोळे बंद करतो... स्थिरचित्रासारखी तिची छबी माझ्या डोळ्यासमोर येते... आणि माझ्या अंगात शिरशिरी येते’. हंबर्टला मोकळं मैदान मिळतं. सारं काही प्लॅनप्रमाणे घडून आलेलं असतं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
एक काळ होता जेव्हा एखाद्या कादंबरीचं मोल साहित्यिक मूल्यांच्या आधारावर ठरवलं जायचं. नैतिक चष्मा लावून साहित्याकडे पाहू नये असा प्रवाह होता, अजूनही तो जिवंत आहे. गेल्या काही वर्षांत साहित्य अनेक अंगांनी तपासलं जातं. पण नैतिक-अनैतिकतेची चर्चा बाजूला ठेवून ‘लोलीता’तील विखारी मर्दानगीची मांडणी होणं अत्यंत आवश्यक आहे.
‘लोलिता’तील निवेदकाच्या ओघवत्या कथनामध्ये वाचकाला भारून टाकण्याची शक्ती आहे. हंबर्ट हंबर्टला आपल्या इच्छा-आकांक्षा झळकवण्याची जरुरी वाटते आणि भाषाही. भाषा हेच त्याचं आयुध आहे, ज्याच्या बळावर तो आपल्या रानटी आणि प्रमाथी भावनांना गोंडस रूप देतो.
हंबर्टच्या अतिरेकी भावना आणि कृत्य केवळ त्याच्या शारीर इच्छांतून निर्माण झालेल्या नसून त्याच्या नियंत्रण ठेवण्याच्या, जिंकण्याच्या आणि मालकी हक्क गाजवण्याच्या गरजांतून निर्माण झाल्या आहेत, याच्या खाणाखुणा या कादंबरीत जागोजागी दिसतात. त्याच्या लेखी स्त्रियांवर मालकी हक्क गाजवायचा असतो आणि तो हक्क गाजवण्यासाठी पुरुषांमध्ये चढाओढ लागायला हवी. सामान्य पुरुषांपेक्षा आपली लैंगिकता ‘विलक्षण’ आहे, तसंच रुची ‘विशुद्ध आणि उच्च दर्जाची’ आहे, असं तो मानतो. स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मर्दानगी आणि त्यातून निघालेल्या सत्ता आणि नियंत्रणाच्या संकल्पना किशोरवयीन मुलींना वश करण्यासाठी कशा वापरता येतात, याचा वस्तूपाठच या कादंबरीतून मिळतो.
अलीकडे ‘टिकटॉक’सारख्या माध्यमांतून किशोरवयीन मुलींचे बोल्ड व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर टाकले जातात. या सॉफ्ट लैंगिक पोस्टना लाखो लाईक्स मिळतात आणि तेही प्रौढांचे.
हंबर्ट हंबर्ट आपल्या सामर्थ्याची जाणीव सतत करून देतो. या कादंबरीचा बाज आत्मकथनात्मक असल्यामुळे लोलिताची गोष्ट हंबर्ट हंबर्टच्या निवेदनातून उलगडत जाते. लोलिता भेटायच्या अगोदर हंबर्ट हंबर्टचं लग्न झालेलं असतं. ‘लग्न केल्यामुळे माझ्या अपवित्र आणि धोकादायक इच्छांचं विरेचन होईल, निदान त्या नियंत्रणात राहतील असा विचार करून मी व्हॅलेरीयाशी लग्न केलं’. ती विशीची असली तरी ती लहान मुलीसारखी दिसायची या कारणासाठी तो तिच्याशी लग्न करायला तयार झालेला असतो, हेही तो सांगायला कचरत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पण लवकरच हंबर्टचं मन चाळवायला लागतं. ‘लग्न झाल्यानंतर एकदोन वर्षांच्या काळातच ती प्रौढ दिसायला लागली आणि तिच्या अंगावरच्या केसांची मला किळस वाटयला लागली.’ व्हॅलेरीयाबद्दल हंबर्ट हंबर्टला काडीचाही आदर वाटत नाही. कादंबरीची दोन पानं व्हॅलेरियाची आणि तिच्याबरोबरच्या लग्नाची टवाळी करण्यात खर्च झाली आहेत. हंबर्ट हंबर्टच्यालेखी स्त्रिया आदरास पात्र नाहीत. स्त्रिया त्याच्या आसाभोवती फिरणार्या बैलासारख्याच. अखेरीस व्हॅलेरीया दुसर्या माणसाच्या प्रेमात पडते आणि घटस्फोटाची मागणी करते. त्याचा स्फोट होतो. त्याच्या संतापाची कारणमीमांसाही ही अशी आहे!
‘‘माझा संताप उफाळून आल्यामुळे मला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. त्या ‘मजेच्या वस्तू’प्रती मला कवडीचीही आस्था वाटत नव्हती. पण लग्न मोडणं किंवा चालू ठेवणं याचा निर्णय घेणं हा माझा हक्क असताना तिने म्हणजे माझ्या ‘विनोदी’ बायकोने निर्लज्जपणे असं पाऊल उचललं आणि मला सोडायला ती तयार झाली म्हणून माझा जळफळाट झाला. ‘तुझ्या याराचं नाव काय?’ मी मागणी केली.”
या प्रकरणामुळे हंबर्टला संताप का आला असावा याची संगती लागते. पहिलं कारण म्हणजे आपल्या ताब्यात आणि नियंत्रणात असलेली स्त्री स्वतंत्रपणे आपला निर्णय घेते. असं करत असतांना त्याच्या इच्छा आणि भविष्याचा ती विचारही करत नाही. तसंच एक परका पुरुष त्याच्या अवकाशावर अतिक्रमण करतो आणि त्याला हे समजतही नाही! त्यामुळे आपल्या पौरुषावर अतिक्रमण झाल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्याच्या आत्मप्रतिमेला ठेच पोचते. हे प्रकरण फार दिवस टिकू नये असं त्याला वाटू लागतं. व्हॅलेरियाला धडा शिकवण्याची जरुरी त्याला वाटू लागते, पण ‘लवकरच मला बदला घेतल्याचं समाधान आपोआप मिळालं.’
व्हॅलेरिया आणि तिच्या मित्राला चार वर्षं अभावात काढावी लागली आणि अखेरीस बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून हंबर्टला आसुरी आनंद होतो. बदला घेतल्याचं समाधान त्याला मिळतं. एव्हढंच नव्हे तर आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीत केल्याचा आनंद मिळाल्यानंतरच तो अमेरिकेत स्थलांतर करतो.
व्हॅलेरियानंतर शार्लट हेझचा प्रवेश होतो. मध्ये काही काळ गेलेला असतो आणि अनेक घटना घडून गेलेल्या असतात. पण हंबर्टच्या लेखी त्या काळाला आणि घटनांना काही महत्त्वच नाही. त्याबद्दल तो फारसं नोंदवतही नाही.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
शार्लटशी लग्न करताना त्याचं एकच ध्येय असतं, तिची मुलगी लोलीता... तिला मिळवायचंच!
“मी कल्पना करतोय, आईच्या नवर्याने आईला दिलेले प्रेमळ स्पर्श त्याच्या लोलीतालाही मिळणार आहेत. माझ्या सगळ्या कटकटी दूर होणार आहेत. मी निरोगी आयुष्य जगू शकणार आहे.”
शार्लटशी लग्न झाल्यानंतर लोलीतावर हात टाकायला त्याचे हात शिवशिवत असतात. तिला जाळ्यात ओढण्याचा प्लॅन मनात तयार झालेला असतो. ‘काही करून तिला मिळवायचंच’, हंबर्टचं नियोजन सुरू होतं.
लोलिता सतत डोळ्यासमोर दिसू लागलेली असते. ‘धीर ठेवायला हवा’, हंबर्ट मनाला समजवतो. पण माशी शिंकते आणि शार्लट मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेते. हंबर्ट हादरतो, लोलीताचा विरह सहन करणं त्याला शक्यच नसतं. मग मनातल्या मनात शार्लटच्या खुनाचं प्लॅनिंग सुरू होतं. पण ते वाटतं तेवढं सोप्पं नसतं. शार्लटवर आपलं नियंत्रण नाही, याची त्याला लाज वाटायला लागते.
‘‘लोलीताला दूर बोर्डिंगमध्ये पाठवण्याचा प्लॅन तिला बदलायला सांगणं एवढं कठीण असायला नको.” पण असा काही प्लॅन शार्लट स्वीकारणारच नाही याची जाणीव त्याला होते आणि तो हडबडतो. ‘‘या सर्वसामान्य अमेरिकन स्त्रीची मला भीती वाटू लागली. माझ्या भावनोत्कटतेचा वापर करून मी तिला माझ्या बाजूने वळवू शकेन असं मला वाटत होतं. पण मी चुकीचा ठरलो होतो.”
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
केवळ बारा वर्षांच्या लोलीताला हस्तगत करण्यासाठी आणि शार्लटला संपवण्यासाठी हंबर्ट अनेक योजना बनवतो. त्या नंतर काही दिवसांतच शार्लट हेझ कार अॅक्सिडेंटमध्ये मरण पावते. या सामान्य दिसणार्या शार्लटने त्याला नमवलं होतं. त्याच्या पौरुषाला तिने आव्हान दिलं होतं. तिने त्याच्या ताब्यात राहणं हेच त्याला अपेक्षित होतं. पण प्रत्येक गोष्ट त्याच्या म्हणण्याप्रमाणे होणार नव्हती. शार्लटवर आपलं नियंत्रण नाही, या विचाराने तो अस्वस्थ झालेला असतो.
त्या आधी शार्लटचे मित्र जॉन आणि जीओ फार्लो यांच्यासोबत हंबर्टची मैत्री झालेली असते. अख्ख्या पुस्तकात हंबर्टचे मित्र म्हणता येतील असं हे अमेरिकन फार्लो जोडपं. या दोघांना सोडून अजून कोणी मित्र हंबर्टला जोडता आलेला नाही. अपशब्द न वापरता वर्णन केलेल्या या दोनच व्यक्ती कादंबरीत सापडतात. जास्त न बोलणारा जॉन फार्लो बुद्धिमान आणि कर्तबगार असतो. चित्रकार असलेली जीओ अनेक कलाकृती निर्माण करत असते. हंबर्ट त्यांचा चाहता असतो. जिओला हंबर्टबद्दल आकर्षण वाटू लागलेलं असतं. हंबर्टला ते समजेललं असतं, पण तो तिला फारसा प्रतिसाद देत नाही.
‘अवरग्लास लेक’ या ठिकाणी शार्लट, लोलिता, हंबर्ट आणि फार्लो पतिपत्नी विहारासाठी गेलेले असतात. सरोवरात पोहत असताना हंबर्ट शार्लटला बुडवून मारण्याच्या प्रयत्नात असतो. पण तळ्याकाठी चित्र काढत असलेल्या जीओची नजर आपल्या मैत्रिणीवर असल्यामुळे हंबर्टची योजना सफल होत नाही.
दरम्यान जीओला कॅन्सर होतो आणि त्यात तिचा मृत्यू होतो. हंबर्ट जॉन फार्लोंचा आदर करत असतो, पण त्याचं सौजन्य, सहानुभूती आणि कळकळ तो लैंगिक कमजोरीशी जोडण्याचा अट्टहास करतो. अमेरिकन मोकळेढाकळेपणा त्याला बायकी वाटायला लागतो. बाईला वश करून तिच्या पुरुषाला नामोहरम करण्याचा खेळ खेळण्यातही तो माहीर आहे.
या प्रकरणाचा मूळ कथेशी संबंध नसला तरी हंबर्टचं पौरुष विवाहबंधनात स्थिर आणि एकनिष्ठ असलेल्या स्त्रियांनाही आकर्षित करतं, हे दाखवून देण्याचा तो खटाटोप आहे. तसंच हंबर्टच्या विखारी मर्दानगीपुढे जॉन फार्लोचा उदारमतवाद म्हणजे कमअसल पौरुष अशी साधी फोड हंबर्टच्या मनात असते. हंबर्टने हा प्रसंग तपशिलात कथन केला आहे, कारण आपण ‘अल्फा मेल’ आहोत, हे ठसवणं त्याला महत्त्वाचं वाटतं.
फार्लो इतरांच्या हिताची काळजी करतात हे हंबर्टला माहीत असतं. त्यामुळे त्याला आपण प्रभावित करू शकत नाही, हे त्याच्या लक्षात येतं. आपण जिला ‘ब्लॅन्ड अमेरिकन शार्लट’ म्हटलं तिच्यावरसुद्धा आपली सत्ता चालू शकली नव्हती आणि लोलीताला इतरांचं पाठबळ मिळालं तर तीही आपल्या नियंत्रणात राहणार नाही, या विचारांनी तो अस्वस्थ होतो.
लोलीताच्या कहाणीचे दोन भाग करता येतात. पहिल्या भागात तो तिला वश करतो. दुसर्या भागात तो तिला गमावतो. पहिल्या भागात तो तिचा पिच्छा पुरवतो आणि तिला प्राप्त करतो. दुसर्या भागात ती त्याच्या कचाट्यातून सुटते.
त्यातील एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. शार्लट गेल्याच्या काही काळानंतर ‘ती रडत रडत मध्यरात्री माझ्या खोलीत शिरली. ‘मी तिला सावरलं आणि मग आम्ही मश्गूल झालो. मी सोडून तिला होतं तरी कोण?’
या क्षणापर्यंत हंबर्टची लोलीतावर पूर्ण सत्ता चालत होती, तसाच हंबर्टही पूर्णपणे तिच्या आहारी गेला होतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लोलिता आणि त्याच्या नातेसंबंधात फक्त सेक्स महत्त्वचा नसतो. महत्त्व असतं सेक्सच्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन करताना त्यातील हंबर्टच्या पूर्ण नियंत्रणाचं. त्यातील एक प्रसंग अत्यंत धक्कादायक आहे. ‘तिला ब्रॉन्कायटिस झाला होता. तापसुद्धा आला होता. तिच्या उष्ण अंगाची मला ओढ वाटायला लागली. माझ्या बाहूत ती थरथरत होती, कण्हत आणि खोकत होती. पण माझं मन माझ्या ताब्यात राहिलं नाही.”
“आणि हे कसं विसरता येईल? ती आराम खुर्चीत बसून गृहपाठ करत होती. तिचे दोन्ही पाय तिने आरामखुर्चीच्या भुजांवर ठेवले होते. तिच्या तोंडात पेन्सिल होती. तिला बघून माझ्या मनात उर्मी दाटून आली. माझा सर्व अभिमान सोडून मी रांगत तिच्यापर्यंत पोचलो.”
या अशा प्रसंगातून कोणाकडे किती अधिकार होते हे लक्षात येतं. लोलीताकडे असलेल्या लैंगिक शक्तीमुळे हंबर्ट तिच्याकडे ओढला जातो. या शक्तीमुळे तो तिचा अंकित झालेला असतो. काहीही असो, त्याला प्राप्त झालेलं नंदनवन सत्तेच्या एका नाजूक हिंदोळ्यावर उभं होतं. सत्तेच्या या खेळात तो हरायलाही तयार झालेला असतो.
लोलीताला नामोहरम करत असताना एक दिवस ती आपल्याला आवडेनाशी होईल, हे तो जाणून असतो. तसंच अमेरिकन समाज आणि संस्कृतीवर टीका करणंही तो सोडत नाही. पण अजूनही सत्ता गाजवण्याची त्याची खुमखुमी संपलेली नसते.
अमेरिकन पॉप आणि सम्मीलीत संस्कृतीची त्याला घृणा वाटते. अमेरिकन लोक, त्यांची भाषा, त्यांचे आचारविचार त्याला खालच्या दर्जाचे वाटतात. आपल्या ‘युरोपीय उच्च संस्कृती’चा त्याला अभिमान असतो.
अमेरिकेतील अशाच एका मेळाव्यात तो लोलीताबरोबर जातो. ‘रेड इंडियन नृत्य, प्युबेलो ड्वेल्लिंग - अमेरिकेतील मूळ निवासींच्या कडेकपरीतील घरांच्या प्रतिकृती- आणि आदिवासी भित्तीचित्रांवर तो ‘हिडीस कमर्शियल आर्ट’, असा शेरा मारतो. शिवाय या मेळाव्यात गळ्यावर उंचवटा असलेला १२ वर्षांचा ‘लोलोलीता’चा मित्र त्याला आवडत नाही. या मित्रासोबत गप्पा मारण्यात लोलिता गर्क झालेली असते. इतकी की आपल्यासोबत हंबर्ट आपल्यासोबत आहे, हे ती काही काळ विसरून गेलेली असते. या १२ वर्षांच्या किडकिडीत मुलाची हंबर्टला एकाच वेळी घृणा आणि असूया वाटायला लागते. लोलिता त्याला आवडतच असते, पण त्याच्यापेक्षा अधिक आसुरी आनंद त्याला मिळतो, तो लोलीताच्या मित्राची आणि अमेरिकन हॉचपॉच संस्कृतीची टिंगलटवाळी करण्यात. त्याच्या युरोपीय मर्दानी संस्कृतीची अमेरिकन भेसळीच्या संस्कृतीशी तुलना होऊच शकत नाही, असं त्याला वाटत असतं.
अखेरीस लोलीताला गमावण्याची वेळ येते. जे होऊ नये असं वाटत असतं ते प्रत्यक्षात येतं. नाटककार आणि सॉफ्ट पॉर्न फिल्म निर्माता दिग्दर्शक क्लेअर क्विल्टीसोबत ती राहायला लागते. लोलिता त्याच्याबरोबर निघून गेली याचं त्याला वाईट वाटतंच, पण त्याच्यापेक्षा दुसर्या एका पुरुषाने आपली स्त्री ‘पळवली’ म्हणून त्याला क्लेअरचा कडेलोट संताप येतो.
“अरे, आपण तर एक दुसर्यासारखेच आहोत”, क्विल्टी त्याला सांगतो. लोलिता निघून गेल्यानंतर हंबर्ट त्याचा पाठलाग करतो. “जे मी नाही केलं ते तू सगळं केल्यामुळे मी तुला जिवंत ठेवणार नाही” हंबर्ट त्याला धमकी देतो आणि बदला घ्यायला निघतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
लोलीताचे क्लेअर क्विल्टीसोबत सुरुवातीचे काही दिवस अत्यंत आनंदात जातात. पण लवकरच लोलीताने बालपॉर्न फिल्ममध्ये काम करावं असं क्लेअर सुचवतो. लोलिता ठामपणे त्याला नकार देते. दोघांमध्ये तणाव निर्माण होतो. पण दरम्यान लोलीताला दिवस गेलेले असतात.
क्विल्टीमुळे हंबर्टच्या मर्दानगीला आव्हान मिळालेलं असतं. त्याचा अधिकार ज्यांच्यावर चालू शकत नाही, अशा प्रौढांपासून हंबर्ट एक तर दूर पळतो किंवा त्यांना संपवतो. क्विल्टीने मात्र त्याला पूर्ण नामोहरम केलेलं असतं. त्याचा काटा काढणं हंबर्टच्या दृष्टीने आवश्यक झालेलं असतं. लोलिता आता आपल्याकडे परत येणार नाही, हे तो जाणून असतो. तो आपल्याला मारून टाकणार हे क्विल्टीला माहीत असतं. “आपण सारखेच आहोत - सेक्समध्ये, आपली साहित्यातली रूचीही सारखी आहे”, तो हंबर्टला सांगण्याचा प्रयत्न करतो. क्विल्टी हंबर्टची प्रतिकृतीच असल्यासारखा असतो, पण हंबर्टला जे जमलं नाही ते त्याने करून दाखवलेलं असतं.
लोलीतासाठी क्विल्टी वडीलधारा आणि प्रेमीसुद्धा असतो. शिवाय हंबर्टचा स्पर्धक. क्विल्टीच्या तुलनेत हंबर्ट वयस्क आणि निस्तेज. ‘आपण मित्र आणि सखा होऊ शकतो' क्विल्टीने मैत्रीचा हात पुढे केलेला असला तरी झालेला अपमान गिळणं हंबर्टच्या मर्दानगीला मान्य नसतं. क्विल्टीचा खून करण्याशिवाय त्याच्याकडे काही उरत नाही. क्विल्टी संपल्यानंतर मात्र हंबर्टकडे आपला रोब जमवण्यासाठी समोर कोणी राहत नाही.
लोलीतासोबत असताना एकदा हंबर्टला असा परमानंद झाला होता, जो आता मिळण्याची शक्यता मिटली होती. “मी अशा प्रदेशात प्रवेश केला जिथे माझ्या शरीरात आनंदाचा अर्क उतरू लागला. दुसर्या कशालाही अर्थ उरला नव्हता. माझ्या शरीराच्या गाभ्यात सुखद असा ताण मला जाणवू लागला. मी मनाच्या अशा स्थितीला पोचलो होतो, जिथे मला संपूर्ण निश्चितता, आत्मविश्वास आणि सुरक्षितता जाणवू लागली, जी पूर्वी माझ्या आयुष्यात लाभलीच नव्हती.” हे सारं परमसुख क्विल्टीमुळे हिरावलं गेलं. हंबर्ट पूर्णपणे मोडून जातो.
पण एक प्रकारे हंबर्टचं म्हणणं ठीक होतं, कारण त्याच्या आधी व्हॅलेरियासोबतचं त्याचं नातं असंख्य मुद्द्यांमुळे त्रस्त झालेलं होतं. अर्थात लोलीतासोबतच्या नात्यामध्येही अखेरीस ताण निर्माण झाला. बहराचा काळ ओसरल्यानंतर लोलिता नकार देऊ लागली, सहज वश होईनाशी झाली. तरीही तो तिला सोडायला तयार नव्हता. याचं मुख्य कारण म्हणजे तिच्यावरची सत्ता आणि नियंत्रण हंबर्टला सोडायचं नव्हतं. त्याला जे हवंसं वाटू लागतं, त्याच्यावर ताबा मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं. त्यासाठी एका मुलीच्या आयुष्याची होळी झाली, याची पर्वा करण्यातला हंबर्ट नव्हताच.
“आमची भांडणं, तिचा ओंगळपणा, तिचे विभ्रम, नात्यातील असंख्य संकटं आणि भीषण विषण्णता असूनही माझ्या अंतरंगातील माझ्या निवडीच्या स्वर्गात मी आनंदाने विहार करत होतो... स्वर्ग ज्याचे रंग नरकातील ज्वाळांच्या रंगांचे होते.” त्याची शारीर हिंसा आनुषंगिक होती आणि त्याच्या कार्यक्षेत्रात—म्हणजे स्त्रीला अंकित करण्याच्या क्षेत्रात तो माहीर होणं ही त्याची निकड होती.
'लोलीता’ प्रकाशित होऊन ६५ वर्षं झाली. ‘लोलिता बाललैंगिक अत्याचाराची कहाणी नाही. हंबर्टला लहान मुलींबद्दल आकर्षण वाटतं आणि तसं आकर्षण अनेक विषमलिंगी पुरुषांनाही वाटतं. लेखक व्हिक्टोरियन नीतीमत्तेच्या खुळचट कल्पनांची समीक्षा करत आहे,’ ‘लोलिता’बद्दल या आणि अशा युक्तीवादांचा प्रवाह अजूनही जिवंत आहे. पण लहान मुलींचं क्षणिक आकर्षण वाटणं, आणि लोलीतावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी जंगजंग पछाडणं, तिच्या आईचा खून करणं, तिच्या प्रियकराचाही खून करणं हे कशाचं द्योतक आहे?
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
लहान मुलींचं लैंगिकीकरण पूर्वी होत होतं आणि आताही होत आहे. लोलीताची गोष्ट अपवादात्मक नाही. टेलिव्हिजनवरच्या टॅलेंट स्पर्धांमधून लहान मुली कामूक आणि अश्लील गाण्यांवर नृत्य करताना दिसणं आपल्या अंगवळणी पडलं आहे.
फॅशन आणि ब्युटी इंडस्ट्रीत अल्पवयीन मुली आल्या आहेत. कपड्यांच्या आणि इतर लक्झरी आयटम्सच्या जाहिरातीतील किशोरवयीन मुलींना राजरोस उत्तान कपड्यात दाखवलं जातं. इंस्टाग्रामवर अल्पवयीन आणि किशोरवयीन मुलींचे अगदी नित्यनेमाने अर्धनग्न छायाचित्रं आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. समाजमाध्यमांमधून या अल्पवयीन मुलींचं लैंगिकीकरण झालेलं आहे. या सगळ्यांमुळे लहान मुलांचं बालपण हिरावलं जातंय आणि ही एकप्रकारची छुपी हिंसाही आहे.
एकंदरीत सगळा समाजच आता चाइल्डपॉर्नचा ग्राहक झाला आहे. हंबर्टचे आणि लोलीताचे अवशेष प्रत्येक काळात आणि प्रत्येक समाजात दिसतात. आपल्या लहान मुलांचं लहानपण टिकवण्यासाठी समाज म्हणून आपण काय करणार आहोत, हा प्रश्न आहे.
साभार - ‘पुरुषस्पंदनं’ दिवाळी २०२०मधून
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment