मराठी कवितेतली मर्ज्य समूहनिष्ठता म्हणून या कवितेचे महत्त्व अधोरेखित होतेच, पण ‘मुस्लीम मराठी’ असा काही उच्चार केल्यास ती ‘एकमेव’ ठरते!
ग्रंथनामा - झलक
जी. के. ऐनापुरे
  • ‘मंथन’चे मुखपृष्ठ
  • Sat , 28 November 2020
  • ग्रंथनामा झलक मंथन Manthan फ. म. शहाजिंदे F. M. Shahajinde

मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी कवी फ.म. शहाजिंदे यांच्या कवितेची समीक्षा करणारा ‘मंथन’ हा लेखसंग्रह जी. के. ऐनापुरे व कलीम अजीम यांनी संपादित केला आहे. या पुस्तकाला ऐनापुरे यांनी प्रदीर्घ म्हणावी अशी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

‘औराद शहाजानी’ असं इतरांना विचित्र वाटणाऱ्या आणि इस्लामिक भूतकाळ दर्शवणाऱ्या गावात असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख प्रा. फ.म. शहाजिंदे शेवटपर्यंत नोकरीला होते. त्यांना महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या नावावर ‘निधर्मी’ (१९७९), ‘शेतकरी’ (१९८६), ‘आदम’ (१९९१), ‘ग्वाही’ (१९९६), ‘झोंबणी’ (२०१४) असे कवितासंग्रह आहेत. कवी म्हणून प्रस्थापित होण्यासाठी हे पुरेसे आहे. त्यांचं पहिलं आणि शेवटचं प्रेम कविताच आहे.

३५-४० वर्षे सातत्याने कविता लिहिणाऱ्या, समाजचिंतन करणाऱ्या शहाजिंदे यांच्यावर ‘मंथन’ हा समीक्षाग्रंथ सिद्ध होतोय. या ग्रंथात त्यांच्या कवितेवरील निवडक समीक्षा समाविष्ट केली गेली आहे. ही निवड काळापरत्वे आणि चोखंदळ अशीच आहे. त्यात समूह ओळख, विचारधारा अशा गोष्टींना थारा दिलेला नाही. शहाजिंदे यांच्या कवितेतील आशय आणि त्याचा विविधांगी घेतलेला धांडोळा हाच या लेखांच्या निवडीमागचा मुख्य निकष राहिलेला आहे. डॉ. सुधीर रसाळ आणि डॉ. अशोक बाबर असे दोन्ही टोकाला असणाऱ्या, सिद्धान्तांची मांडणी करणारे समीक्षक आहेत. भा.ल. भोळे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.श्रीराम गुंदेकर, डॉ.श्रीपाल सबनीस असे समाजचिंतक आहेत. डॉ.भालचंद्र फडके, डॉ.सूर्यनारायण रणसुभे, डॉ.शेषराव मोहिते, डॉ.रविंद्र ठाकूर असे भाषा आस्वादक आहेत. या सगळ्यांनी शहाजिंदे यांच्या कवितेचा अभ्यासपूर्ण असा शोध घेतलेला आहे. जबाबदारीने काही विधाने केली आहेत. हा शोध मराठी साहित्य संस्कृतीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे.

२.

भारतातील बौद्धिक, सांस्कृतिक जग (मराठीसुद्धा याला अपवाद नाही) दोन भागांत विभागलेले आहे. ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाबाहेरचे. जे शैक्षणिक जग आहे, त्यातून अभिजनवर्ग तयार होतो. तर शिक्षणाबाहेरच्या जगातनं वंचित, कष्टकरी, शोषित समाज तयार होतो. तो सांस्कृतिकदृष्ट्या अभिजन समाजाच्या मुठीत असतो. भारतात अभिजन वर्गाच्या निर्माण होण्यावर जातिव्यवस्था आणि धर्मसत्तेचा प्रभाव राहिला आहे. शिक्षण घेत असलेल्या युवावर्गावर अभ्यासक्रमाच्या नियोजित आणि वर्चस्ववादी आखणीमुळे जातीव्यवस्था आणि धर्मसत्तेचा प्रभाव कायम राहतो. याचा अर्थ शिक्षण घेत असताना, तो परंपरा बळकट कशी करायची याचाच अभ्यास करत असतो. यातून त्याचं निर्माण होणारं अव्वल स्थान जातिव्यवस्थेनुसार नाममात्रच असतं. शिक्षण पूर्ण करून तो अगोदरच शिक्षणाच्या बाहेर असलेल्या समूहात मिसळायला लागल्यावर त्याच्या ध्यानात येतं, आपण घेतलेले शिक्षण म्हणजे आपल्या शोषणासाठीच्या तयारीला लावलेला हातभारच. तो विरोध करायला लागतो. हा त्याचा विरोध परिपक्व होण्याअगोदरच तो निवृत्त होतो. अभ्यासक्रमाच्या एकाधिकारी समूह नियोजनामुळे सांस्कृतिक प्रभुत्व आणि अनुकरणाचा संसर्ग या दोन्ही गोष्टीच्या तळाला, अज्ञानात शिक्षणाच्या बाहेर असलेल्या वर्गाला रहावं लागतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या दोन्ही संकल्पनांचे विवेचन याच अंगाने केलेले आहे. जात आणि धर्म याचा अधिक प्रभाव असल्याने प्रभुत्व आणि संसर्ग हा भारतात एकाच समूहाभोवती केंद्रित झाला आहे. हे टिकून राहणं आणि नव्यानं तयार होणं भारतात सोपी गोष्ट राहिली आहे. हिंदू -मुसलमान दंगली, पाकिस्तान विरोध ही त्याची खास उदाहरणं आहेत. ग्रामची या दोन्ही संकल्पना सांगताना वर्गाचा आधार घेतो. संस्कृती रुजवण्यासाठी, तिचा विस्तार करण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी अभ्यासक्रम किती महत्त्वाचा आहे, हे शिक्षणाच्या आत असलेल्या लोकांना कळलेलं नाही. सांस्कृतिक क्रांती अंग धरत नाही, प्रभावी ठरत नाही; विचारधारेच्या अंगाने त्याचं हे मुख्य कारण. असे झाल्याने कलावादाचा प्रभाव या ना त्या कारणामुळे मराठी साहित्यावर अनेक शतके टिकून राहिला आहे. एकाच समूहाकडे सांस्कृतिक प्रभुत्व राहिल्याने असे झाले असावे.

मराठी साहित्य मध्यमवर्गीय होऊन, अराजकाकडे, समाजापासून अधिक दूर जाण्याला, पिढीतील अंतर पडण्याला हे प्रभुत्व अधिक जबाबदार आहे. या सांस्कृतिक, बीभत्स अराजकाबद्दल प्रभुत्व असलेल्या समूहातील व्यक्तींचं अवलोकन पाहण्यासारखं आहे. यात अभ्यासक्रमाचा संदर्भ आहेच.

या व्यवहाराबद्दल खेड्यापाड्यातले लेखक कवी अजूनही अनभिज्ञ आहेत. पण फ.म. शहाजिंदे सारख्यांना या सगळ्याचे प्रखर भान आहे. खेड्यापाड्यातील तरुणांना या भयंकरापासून लांब ठेवण्यासाठी काही वेळा मार्गदर्शकाची, सांस्कृतिक पालकत्व अशा अंगाने जाणारी भूमिकाही त्यांनी स्वीकारली आहे. त्यांची ही भूमिका आजही व्यस्त आणि कायम आहे.

भूमी प्रकाशन हे त्याचेच अपत्य. असे असले तरी जुन्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि नव्या शतकाच्या दोन दशकाच्या काळात म्हणजे अलीकडच्या ३० वर्षांच्या काळात मराठी कविता जीर्ण, गद्यात्मक, पश्चिमी संज्ञा आणि कल्पनाच्या जाळ्यात अडकून, प्रयोगशीलतेचं खोटं मूल्य जवळ करत, आशयहीन शब्दांचा खेळ करत शेवटच्या घटका मोजत आहे.

या मृत्यूपंथाला लागलेल्या कवितेला पाणी पाजायचं सोडून तरुण कवी अस्थिर, असुरक्षित जगण्यामुळे या कवितेचा गळा घोटायच्या मागे लागलेला आहे. आपण कविता लिहितोय म्हणजे, हे गंभीर काम करतोय याचे त्यांना भानसुद्धा नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या नव्या शतकात शहाजिंदे यांचा ‘झोंबणी’ (२०१४) हा एकमेव कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. शेवटचा कवितासंग्रह आणि नवा कवितासंग्रह यातील अंतर तब्बल १८ वर्षांचं आहे. याचा अर्थ आपण आपल्याच विचारावर विस्तारणारी कविता लिहीत आहोत आणि ती एक सामाजिक क्रिया आहे, हे त्यांचे भान समूहनिष्ठेमुळे अधिक टोकदार आणि आक्रमक आहे. ‘झोंबणी’मधील कविता या अशाच आणि त्यांच्या सलग चिंतनाचा उत्तरार्ध आहे.

मराठी कवितेचा इतिहास दुरुस्तीसह पाहिल्यावर फ.म. शहाजिंदे यांच्या कवितेत विस्तारणाऱ्या आशयाचे महत्त्व आपोआपच नजरेत भरते. मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे सुरुवातीचा काही अंशात्मक भाग वगळला तर या कवितेचा आणि प्रस्थापित मराठी कवितेचा सांधा कोणत्याही अर्थाने जुळत नाही.

एक मूलभूत आस्थेवाईक विचार या कवितेच्या तळाशी आहे. हा विचार पहिल्यांदा धर्म आणि नंतर जात असा जोडून मानवतेबरोबर कायमच राहिल्याने अगदी शेवटच्या ‘झोंबणी’ या कवितासंग्रहापर्यंत या कवितेचा स्वर रिमिक्सच्या काळातसुद्धा शुद्ध राहतो. ही कविता अशी शुद्ध राहण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिची संख्या. संख्येच्या दृष्टीने ही कविता अधिकच अल्पसंख्याक आहे.

३.

‘निधर्मी’ अशा नावाने सुरू झालेल्या या कवितेच्या अंतरंगात शिरताना आशयाची जी एक-दोन मुख्य केंद्रके सापडतात, त्याचा आपण पहिल्यांदा विचार करणार आहोत. कारण या कवितेच्या अभ्यासाच्या दिशा तेथूनच सुरू होतात. किंवा त्या अभ्यासाचा आरंभबिंदू ही केंद्रकेच आहेत. त्यातले पहिले केंद्र जयप्रकाश नारायण यांची संपूर्ण क्रांती, त्यानंतर आलेली जनता पक्षाची, राजवट, या सगळ्या वातावरणातनं तयार झालेला धर्मनिररपेक्षतेचा जयघोष आणि त्याचे सार्वजनिक परिणाम हा आहे.

याच काळात जातीबाहेर जाणे हा जसा परवलीचा शब्द बनला, तसा ‘निधर्मी’ हा शब्दसुद्धा या शब्दाबरोबर चर्चेत राहिला. भारतातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर या संपूर्ण क्रांतीचे खोलवर परिणाम झालेले दिसतात. याचे राजकीय परिणाम सुद्धा गंभीर झालेले आहेत. आणीबाणी (१९७७) आणि या कालखंडावरील अनेक निष्कर्ष सकारात्मक-नकारात्मक पद्धतीने समोर आले आहेत. यातील अनेक रहस्ये अजून समोर यायची बाकी आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

कवी फ.म. शहाजिंदे अशाच वातावरणाला भारावलेले आणि नंतर हे वातावरण कोसळल्यावर देशप्रेमी अशा अर्थाने काळजीत पडलेले कवी आहेत. निधर्मीपणाचा उदयास्त आणि निधर्मीपणाची समूहनिष्ठ, संशयात्मक विभागणी अशा दोन्ही अनुभवापर्यंत ही कविता विस्तारते.

शहाजिंदे यांच्या कवितेच्या अंतरंगात गेल्यानंतर समोर आलेला पहिला प्रश्न म्हणजे एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्षता का स्वीकारते आणि तीच व्यक्ती त्या धर्मनिरपेक्षतेचा स्वतः पुरता अर्थ काढून लांब का जाते? या प्रश्नाचे उत्तर धर्मनिरपेक्षतेची गरज कुणाला आहे? या प्रश्नाबरोबर जोडले जाते. ही धर्मनिरपेक्षता, विविधता अशा अंगाने भारतात असलेल्या (अस्तित्वात) सर्व धर्माशी जोडताना त्यातून मिळणारा फायदा हा भारतीय लोकशाहीला पुष्ट करणारा असेल, असा एक विचार धर्मनिरपेक्षतेच्या स्वीकृती मागे गृहीत धरला होता. पण या विचाराचे अपयश थक्क करणारे आहे.

धर्मसत्तेच्या विरोधात लढाईसाठी म्हणून धर्मनिरपेक्षता हे मुख्य हत्यार होऊ शकले नाही. unity in diversityच्या सुलभीकरणात धर्मनिरेपेक्षतेचे काय झाले, याचा खास अंदाज लागतो. धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात कोणता समूह त्याच्या बाजूने गंभीर राहिला, असा प्रश्न चर्चेचा केल्यास ‘सगळ्यात शेवटी मुस्लीम’ हे विधान बहुमताकडे जाईल. धर्मनिरपेक्षता कोणालाच नको, पण हा देश धर्मनिरपेक्ष आहे, असा खोटा आग्रह, देशप्रेमी या नात्याने भारतातल्या लोकांच्या विचारव्यूहात रुजला आहे. त्याचे काय करायचे, हा प्रश्नच आहे.

कवी फ.म. शहाजिंदे याला अपवाद होता होता बचावले आहेत. निधर्मीपणाच्या अनेक छटा- शक्यता पार करत करत ते आपल्याच समूहाजवळ आले आहेत. असे करणारे ते एकटेच नाहीत. तर ऐंशीच्या दशकात जे जे भारावलेले होते, ते ते सगळे विसाव्या शतकाच्या अंतिम पर्वात आपल्या आपल्या समूहाकडे परतले. जे काही शिल्लक राहिले त्यांनी आपल्यातली धर्मनिरपेक्षता मरू दिली नाही. सांस्कृतिकदृष्ट्या ते दुर्लक्षित झाले. याचे अनुभवकथन शहाजिंदे यांची कविता करते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : “याच्या एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही...”

..................................................................................................................................................................

आशयाचे दुसरे केंद्र, कवितेचे दुसरे वळण हे निधर्मीपणापासून सुटत सुटत आपल्या समूहाजवळ येण्याचे आहे. इथेसुद्धा त्यांच्यासमोर मुसलमानांमुळे हिंदू की हिंदूंमुळे मुसलमान, असा दुहेरी पेच आहे. याला धर्मांतर म्हणायचे की हतबलतेमुळे पत्करलेली शरणागती, अशा द्विदल मानसिकतेतून आलेले पछाडलेपण हा या दुसऱ्या वळणाचा मुख्य भाग आहे.

४.

आपल्या काव्य प्रवासाच्या शेवटच्या पर्वात मुस्लीम असल्याची झोंबणी मनाशी बाळगत कवी कबीर, सूफी तत्त्वज्ञान, शेती, फुले-आंबेडकर असा घुटमळत राहतो. समूहाबद्दलची नाराजी व्यक्त करताना खुरटत गेलेली सृजनात्मकता, स्थिर नसलेली जातिव्यवस्था, न्यायव्यवस्थेतील धर्मांतरित काझी आणि ब्राह्मण, शिक्षणावरील दुर्लक्ष, नवनिर्माण क्षमता हरवत गेलेला इस्लाम, असे अनेक गंभीर मुद्दे समोर आणतो. स्व-समूहाबद्दल इतक्या थेटपणे बोलण्याचे धाडस मराठीतल्या कुठल्या कवितेत सापडत नाही. आणि मुस्लिम जगतात तर शक्य नाही.

ही कविता भारतीय समूहापासून सुरू झाली आणि स्व समूहाजवळ आली. तिथेही ती रमण्याच्या मन:स्थितीत नाही. तेथून तिचा प्रवास सूफी परंपरेकडे सुरू झाला. भारतीय मानसिकता असलेल्या कवीचे हे आत्मीय ढासळणे आणि त्यातून आलेल्या जगण्याचा बचावसुद्धा आहे. कवितेच्या अखंड प्रवासात आशयाच्या विस्तारात नव्या नव्या शक्यता बाहेरच्या रेट्यामुळे आत येत असतात. हा सामाजिक प्रक्रियेचा भाग व्यक्तीगत-सामुदायिक असा असतो. यात कुठल्या भागाला जास्त जवळ करायचे, अशा अर्थाने कवी प्रश्नार्थक बनतो.

ही संक्रमणशीलता कवीसाठी क्लेशकारक आणि विन्यासाच्या अंगाने दमनकारी बनते. कवी आपल्याच कवितेचे वळण गिरवत बसतो. तुकारामाच्या परंपरेत कविता लिहिणाऱ्या किंवा बौद्ध परंपरेला जोडून घेणाऱ्या कवींनी ही संक्रमणशील स्थिती कायमच दूर ठेवली आहे. नामदेव-ढसाळ - तुळशी परब - प्रकाश जाधव यांच्या कवितेत ही पडताळणी अगदी संशोधनाच्या पातळीवर पाहता येण्यासारखी आहे. शहाजिंदे यांना ही स्थिती -काव्यप्रवासाचा उत्तरार्थ (कविता लेखन थांबवण्याचा आरंभबिंदू) - अशा अर्थाने त्रासदायक झाली आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तुकाराम- महात्मा फुले- नामदेव ढसाळ- तुळशी परब- प्रकाश जाधव आणि ज्ञानेश्वर- केशवसुत- मर्ढेकर- दिलीप चित्रे- अरुण कोलटकर- ना.धों.महानोर- अनुराधा पाटील, या मराठी कवितेतल्या दोन वेगवेगळ्या परंपरा सामाजिक, आधुनिकता, स्व-समूह हे या दोन परंपरेतील अंतर दाखवणारे महत्त्वाचे घटक. फ. म.शहाजिंदे यांची कविता यातील पहिल्या परंपरेशी घट्ट जोडलेली आहे. पहिल्यापासूनच मराठी कवितेचे विचारव्यूह आणि सौष्ठव नाकारणारी ही कविता आहे.

पहिल्यांदा सामाजिकता म्हणून निधर्मीपणा किंवा धर्मनिरपेक्षता हा या कवितेचा मुख्य आशय होता. नंतर या आशयाचे केंद्र कृषीजन्य संस्कृतीला वास्तवाकडे ढकलणारे, सरंजामी प्रवृत्तीतून मुक्त करणारे, श्रमसंस्कृती हे बनले (गिरणगांव विरुद्ध गिरगांव), उत्तरार्धात ही कविता स्व-समूहाच्या बचावासाठी सूफी अधिक बुद्धपरंपरेकडे (फुले-आंबेडकर) जाण्याचा सृजनात्मक शहाणपणा सिद्ध करते. स्व-समूह अशा अर्थाने ते अनुकरणीय आहे. मराठी कवितेतली मर्ज्य किंवा विसर्जित होणारी समूहनिष्ठता म्हणून या कवितेचे महत्त्व अधोरेखित होतेच. पण ‘मुस्लीम मराठी’ (?) असा काही उच्चार केल्यास ती ‘एकमेव’ ठरते. त्याचे कारण,

माझ्या मुळ्या रुजतील अशा भूमीच्या

आज मी शोधात आहे (२०१५ : १५४)

असा तिचा स्वतंत्र आवाज उरतोच.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......