‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक २०२०चं मुखपृष्ठ
  • Thu , 26 November 2020
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank ऋतुरंग Ruturang अरुण शेवते Arun Shevte

यंदा करोनाने दिवाळी अंकांवर संक्रांत आणली असली तरी नेहमीच्या दिमाखात जे काही अंक प्रकाशित झाले आहेत, त्यात अरुण शेवते यांच्या ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाचा समावेश करावा लागेल. ‘ऋतुरंग’चे या वर्षी दोन वेळा पुनर्मुद्रण करावे लागले, यातून या अंकाची लोकप्रियता करोनाकाळातही अबाधित कशी अबाधित राहिली आहे, याचा दाखला मिळतो.

गेल्या २५-२६ वर्षांत ‘ऋतुरंग’ने आपले ‌वैशिष्ट्यपूर्ण स्थान मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेत निर्माण केले आहे. त्यामुळे या अंकांतील लेखांची अनेक पुस्तके शेवते यांनी संपादित केली आहेत. हा दिवाळी अंक एकाच विषयावर असतो. या वर्षीचा या अंकाचा विषय आहे – ‘लढत’. करोनामुळे मानवी जीवनावर जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्याची पार्श्वभूमी या विषयाला आहे. शेवते यांनी आपल्या संपादकियात म्हटल्याप्रमाणे ‘लढत’ हा मानवी जीवनाचा स्थायीभावच आहे. त्यामुळे केवळ करोनाभोवती हा अंक नसून एकंदर माणसांनी वेगवेगळ्या पातळीवर दिलेली लढत या अंकांतून पाहायला मिळते. म्हणजे या लढतीचे वेगवेगळे आविष्कार या अंकातून पाहायला मिळतात.

एकंदर ५५ छोट्या-मोठ्या लेखांचा समावेश आहे. त्यांची सोयीसाठी ‘लढतीचा एपिसोड – एक’, ‘लढतीचा एपिसोड – दोन’, ‘लढतीचा एपिसोड – तीन’, ‘लढतीचा एपिसोड – चार’ आणि ‘लढतीचा एपिसोड – पाच’ अशी पाच विभागांत विभागणी केली आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

‘लढतीचा एपिसोड – एक’ या पहिल्या विभागात गुलज़ार, अमिताभ बच्चन, मेलिंडा गेट्स, रवी आमले, विनय सहस्त्रबुद्धे आणि संजय पवार यांच्या लेखांचा समावेश आहे. गुलज़ारांचा लेख करोनातल्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवाविषयी आहे. त्यामुळे तो वाचनीय आहे. अमिताभ बच्चन यांच्या लेखाचे शब्दांकन मात्र फारसे चांगले झाले नाही. त्यामुळे त्यांच्या ‘संघर्षातील माझे साथी’चे प्रत्ययकारी दर्शन या लेखातून पुरेसे चांगल्या प्रकारे होत नाही. मेलिंडा गेट्स यांच्या लेख हा त्यांच्या पुस्तकातील बहुधा शेवटच्या प्रकरणाचा संपादित अंश आहे. तोही चांगला आहे, पण त्याच्या संपादनात किंवा अनुवादात गडबड झालेली असल्याने तोही पुरेशी पकड घेत नाही. विनय सहस्त्रबुद्धे यांचा लेख ठीक आहे. रवी आमले यांच्या ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेतील एका डबल एजंटविषयीचा लेख मात्र अतिशय उत्कंठावर्धक आहे. तो आमले यांच्या कथनशैलीमुळे शेवटपर्यंत पकड धरून ठेवतो. एखाद्या रहस्येसारखा तो उलगडत जातो. ‘माझे अवस्थांतर’ हा संजय पवार यांचा या पहिल्या विभागातील लेख सर्वांत चांगला म्हणावा लागेल. परळमधल्या त्यांच्या पूर्वायुष्याविषयीच्या या लेखातून शिवसेनाप्रेम ते शिवसेनाविरोधक हा पवार यांचा प्रवास, आई-वडिल यांची व्यक्तिचित्रे आणि पवारांची जडणघडण अतिशय चांगल्या प्रकारे उलगडून सांगितली गेली आहे.

‘लढतीचा एपिसोड – दोन’मध्ये भारतातील निवडणुकीच्या शताब्दीच्या निमित्ताने प्रशांत गडाख, दिनकर रायकर, सुशीलकुमार शिंदे, मधुकर भावे आणि किशोर मेढे यांच्या पाच लेखांचा समावेश आहे. प्रशांत गडाख, सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे निवडणुकीचे अनुभव लिहिले आहेत; तर दिनकर रायकर, मधुकर भावे या दोन ज्येष्ठ पत्रकार-संपादकांनी त्यांच्या आठवणीतील निवडणुकांविषयी लिहिले आहे. किशोर मेढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लढवलेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीविषयी लिहिले आहे. या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांच्या ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाचे केवळ तीन उमेदवार निवडून आले. खुद्द आंबेडकरांचाही पराभव झाला. हा खरं तर अतिशय रोमहर्षक विषय होता, पण लेखकाने त्यासाठी पुरेसा अभ्यास केला नसल्याचे दिसते. त्यामुळे हा लेख ठाकठीक म्हणावा असाच झाला आहे. असो. या विभागातले प्रशांत गडाख, सुशीलकुमार शिंदे यांचे लेख वाचनीय आहेत. दिनकर रायकर, मधुकर भावे यांचे लेख केवळ संदर्भासाठी म्हणून अभ्यासकांच्या\पत्रकारांच्या उपयोगाचे ठरू शकतील. बाकी त्यातून फार काही हाती लागत नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘पुरुषस्पंदनं’ : ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’ यांचा आढावा घेणारा रौप्यमहोत्सवी वर्षातला नावीन्यपूर्ण दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

‘लढतीचा एपिसोड – तीन’ या विभागतल्या सातही व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिलाच लेख आहे तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचा. त्यांनी आपल्या आयुष्याची चित्तरकथा या लेखातून मांडली आहे; तर श्रीपती खंचनाळे या पहिल्या हिंदकेसरी पहिलवानांनी आपला प्रवास सांगितला आहे. या दोन्ही लेखांचं शब्दांकन अनुक्रमे संतोष खेडलेकर आणि दशरथ पारेकर यांनी चांगलं केलं आहे. त्यामुळे ते वाचनीय झाले आहेत. ‘ती सतरा वर्षांची मुलगी’ या लेखात शुभदा चौकर यांनी ग्रेटा थुनबई या मुलीच्या ‘ग्रेट’पणाचे सतरा पैलू सांगितले आहेत. अतिशय ओघवत्या शैलीत आणि रसाळ निवेदन करत त्यांनी ते सांगितल्यामुळे हा लेख कमालीचा वाचनीय झाला आहे. श्रीकांत बोजेवार यांनी इरफान खानविषयी लिहिले आहे. हाही लेख ओघवता आणि वाचनीय आहे. मात्र तो पटकन संपतो. रेखा शहाणे यांनी फुलपाखरांच्या दुनियेची सफर घडवली आहे. फुलपाखरांच्या विश्वाविषयीची काहीशी विस्मयकारक, अदभुत माहिती या लेखातून मिळते. शेतकरी विलास शिंदे आणि फॅशन डिझायनर वैशाली शडांगुळे यांच्या लेखांचं शब्दांकन मात्र तितकंसं चांगलं झालेलं नाही. त्यामुळे ते पुरेसं समाधान देण्यात कमी पडतात. पण दुसऱ्या विभागातल्या लेखांपेक्षा या विभागातले लेख जास्त वाचनीय आहेत, हे मात्र नक्की.

‘लढतीचा एपिसोड – चार’ या विभागाची सुरुवात गुलज़ारांच्या करोनाकाळाविषयीच्या पाच कवितांनी होते. मूळ कविता आणि त्यांचा मराठी कवयित्री मलिका अमरशेख यांनी केलेला मराठी अनुवाद असे दोन्ही दिल्याने फायदा झाला आहे. गुल़ज़ारांची काव्यशैली आणि मराठी अनुवाद या दोन्हींचा पडताळा त्यातून घेता येतो. ‘आज महात्मा गांधी असते तर’ हा डॉ. अभय बंग यांचा लेख ‘द लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित नियतकालिसाठी लिहिलेल्या मूळ इंग्रजी लेखाची सुधारित व वाढीव आवृत्ती आहे. अतिशय उत्तम म्हणावा असा हा लेख आहे. आजच्या करोनाकाळात गांधी असते तर त्यांनी कशावर भर दिला असता, याचा कल्पनाविलास आपल्या एकंदर ध्येयधोरणांवर, नियोजनावर आणि आरोग्य व्यवस्थेवर मार्मिकपणे बोट ठेवतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘आवाज’ : ‘खिडकी चित्रां’चा शिल्पकार, खपाचे विक्रम करणारा हा दिवाळी अंक यंदा ७० वर्षांचा झाला!

..................................................................................................................................................................

त्यानंतरचे दोन उत्तम लेख आहेत अंबरीश मिश्र आणि दिलीप माजगावकर यांचे. मिश्र यांनी ‘मुंबई नि कोरोना’ या लेखात मुंबईतल्या ‘वॉनबी’ (‘आय वाँट टू बी’) लोकांवर करोनाच्या निमित्ताने प्रकाश टाकला आहे. मिश्र यांची प्रसन्न शब्दकळा, मार्मिकता, उत्कट संवेदनशीलता आणि अनुभव-निरीक्षणे यांमुळे हा लेख अतिशय सुंदर झाला आहे.

दिलीप माजगावकर यांनी ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ या त्यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या लेखिका डॉ. मृदुला बेळे यांना पत्र लिहिले आहे. माजगावकरांच्याच उल्लेखाप्रमाणे हे पत्र काहीसे हरदासी थाटाचे झाले असले तरी त्यातून या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया त्यांनी सविस्तर सांगितली आहे. एका पुस्तकामागे किती आणि कसा विचार असतो, पुस्तक कसं घडतं जातं, हे अतिशय सृजनशील प्रवासाचा भाग असतो. तो या पत्ररूप लेखातून समजून घेता येतो. आणि त्यामुळे ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक वाचनातली खुमारी वाढते.

याशिवाय संजय राऊत यांचा ‘देवांनी मैदान सोडले’, हेरंब कुलकर्णी यांचा ‘अजुनि चालतोची वाट’, सचिन इटकर यांचा ‘डॉ. के. ए. हमीद : तरुणांचा आदर्श’, राजू शेट्टी यांचा ‘माझ्या म्हशीचे बाळंतपण’ हे लेख वाचनीय आहेत. याशिवाय मलिका अमरशेख यांच्या करोनाकाळाविषयीच्या दोन कविता, माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांचे करोनानुभव आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे पी. डी. पाटील यांच्या ‘कोरोना लढ्यातील आमचा सहभाग’ या लेखाचाही या विभागात समावेश आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘लढतीचा एपिसोड – पाच’ हा या अंकातला सर्वांत मोठा विभाग आहे. यात एकंदर २६ लेखांचा समावेश आहे. यातले बहुतांश लेख दोन-तीन पानांचे आहेत. ‘उमेदीच्या काळातली एक आठवण’ असे या लेखांचे स्वरूप आहे. आयुष्यमान खुराणा, रणवीर सिंग, अरिजित सिंग, तापसी पन्नू, या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे अनुभव आहेत. एकाच आठवणीवर त्यात फारसा भर नाही, त्यामुळे हे चारही लेख त्रोटक झाले आहेत. दासू वैद्य, मुकुंद कुळे, विनोद शिरसाठ, मीना कर्णिक, धनंजय गांगल, आनंद अवधानी, रविप्रकाश कुलकर्णी आणि रामदास फुटाणे यांचे लेख मात्र चांगले आहेत, ते त्यांनी केवळ एकाच आठवणीवर भर दिल्यामुळे. त्यामुळे हे लेख अतिशय वेधक, वाचनीय झाले आहेत. थोडक्यात त्यांची भट्टी जमून आली आहे.

अन्वर हुसेन यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि सतीश भावसार यांची रेखाचित्रे (व अंकाची मांडणीही) यांनी या अंकाच्या सौंदर्यात, वाचनीयतेत आणि प्रेक्षणीयतेतही भर घातली आहे. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......