अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक यांची राजकीय समीकरणे ट्रम्प यांच्या राजवटीत खुल्या मैदानात यावी हा योगायोग नाही. सिलिकॉन व्हॅलीतील भारतीय तंत्रज्ञांचे वाढते प्रभावक्षेत्र आणि व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण होत चाललेल्या राजकीय आकांक्षा लक्षणीय आहेत. या विकसनशील राजकीय अर्थशास्त्राची दखल घेण्याजोगी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या झेनोफोबिक परिदृष्टीला पोषक नेतृत्व आणि वातावरण भारतात आता निर्माण झाले आहे. त्याच्या तळाशी असणारी आर्थिक गणिते भक्कम होत चालली आहेत. ‘हाऊडी मोदी’, ‘नमस्ते ट्रम्प’ आणि ‘ट्रम्प बरे व्हावे’ म्हणून भगवे झेंडे फडकावत अमेरिकेत मंत्रोच्चारण करणारे केशरी कफन्यांमधील भारतीय (आणि अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प विजयी व्हावेत म्हणून भारतात यज्ञयाग करणारे त्यांचे बंधू) हा व्यापक भांडवली अर्थव्यवस्थेच्या समीकरणांचा आविष्कार आहे.
अमेरिकेशी भारताच्या असलेल्या संबंधांना एक पूर्णपणे वेगळा इतिहासही आहे. पहिल्या महायुद्धानंतर जगातील विविध देशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे परिणाम परस्परांवर घडत आले आहेत. त्यामुळे राजकीय नीतीतही फरक पडत आले आहेत. फक्त त्यावरचा दबाव यापूर्वी स्वातंत्र्य, समता या मूल्यांचा होता. वंचितांच्या संघर्षांना जागतिक संघर्षांचे भान होते. मात्र गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणात जग व्यापलेल्या आंतरराष्ट्रीय भांडवली आर्थिक संरचनांमधून राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद संकोचायचे काम झाले. त्यातून जगभरातच संकुचित राष्ट्रवाद आणि त्याचे समर्थन करणारी नेतृत्वे बळकट होत चालली आहेत. त्याचा परिणाम म्हणून व्यापक राजकीय भान बाळगणे अशक्य होत चालले आहेत. राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीयवादाच्या संबंधाची मूळ तात्त्विक बैठक बाजूला पडून या तत्त्वाचे पूर्ण विडंबन आता बघायला मिळते आहे. अर्थव्यवस्थांच्या नफाकेंद्री विस्तारीकरणातून वाढणाऱ्या विषमतेचे सामाजिक परिणाम सर्वत्र दिसत आहेत. अशा वेळेस कशा प्रकारचा राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद आपण निर्माण केला पाहिजे? या प्रश्नाच्या संदर्भात अमेरिकेतील कार्नेगी मेलन विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असलेले निको स्लेट यांनी लिहिलेल्या ‘Colored Cosmopolitanism : The Shared Struggle for Freedom in the United States and India’ (Harvard University Press, 2012) या पुस्तकाचा परिचय मी इथे करून देत आहे. त्यांची अनेक पुस्तके व लेखन प्रसिद्ध झाले आहे, ते इंटरनेटवर पाहता येईल. (पहा - https://nicoslate.com)
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
भारतात जागतिकीकरणाच्या स्वीकारातून होणारे बदल आत्मसात करण्यासाठी आपण सज्ज व्हावे म्हणून जे प्रयत्न १९९०पासून सुरू झाले, त्यांनी आता प्रचंड वेग घेतला आहे. हे जागतिकीकरण निव्वळ संपर्क तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणापुरते मर्यादित न राहता अत्यंत आक्रमक मूल्यात्मक हस्तक्षेप त्यातून निर्माण झाला आहे. अस्मितांचे बंदिस्त राजकारण, त्यातून हितसंबंधांचे राजकारण, हिंसेला मिळणारी वैधता हे सगळे आज आपण हताशपणे स्वीकारत चाललो आहोत. (१ ऑक्टोबरच्या दै. ‘लोकसत्ता’मधील बातमीनुसार गांधीजयंतीच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सामान्य नागरिकांना रायफलचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेतील ‘गन कल्चर’ आता केवळ चित्रपट किंवा वेबसीरिजपुरते मर्यादित राहणार नाही, असे दिसते.) वैश्विक कथनांपुढे प्रश्नचिन्हे उभी करणाऱ्या ओळखींच्या राजकारणाने ८०-९०च्या दशकात अनेक वैध मुद्दे उपस्थित केले होते, मात्र त्याचा व्यापक राजकारणाशी आणि समाजकारणाशी संपर्क तुटत गेला. जगभरातच हे चित्र आहे.
अशा वेळेस सुसंगत राष्ट्रीय (स्थानिक) आणि आंतरराष्ट्रीय (वैश्विक) उद्दिष्टे व धोरणे काय असू शकतात?
कशा प्रकारचे राजकारण आज जागतिक पातळीवर मूल्यात्मक हस्तक्षेप करू शकले असते? किंवा अजूनही करू शकेल? हा प्रश्न आज सगळ्यांच्याच समोर आहे. पण त्याची उत्तरे दिवसेंदिवस अधिक जटिल होत चालली आहेत. अशा राजकारणाचे एक प्रारूप निको स्लेट यांनी लिहिलेल्या पुस्तकातून समोर येते. पहिल्या महायुद्धानंतर दक्षिण आशियातील स्वातंत्र्य चळवळी आणि आफ्रिकन अमेरिकन वंशवादविरोधी लढे यांतील आंतरसंबंध वाढत गेले. वंशवादाचा आणि त्याच्या विरोधाचा इतिहास, साम्राज्यवाद आणि त्याच्या विरोधातील संघर्षांचा इतिहास, नागरी हक्क कायदे आणि त्याचे वैश्विक पडसाद, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध आणि कोल्ड वॉर यांचे इतिहास या सगळ्यांमध्ये हे आंतरसंबंध गुंतलेले आहेत.
या आंतरसंबंधांमधूनच राष्ट्र नावाची संकल्पना उलगडत नेण्याचे प्रयत्नही अत्यंत रोचक आहेत. साम्राज्यवादी राष्ट्रे जेव्हा ‘व्हाईट मॅन्स बर्डन’चा बहाणा पुढे करून वंशवादी सत्तासंबंधांचा पुरस्कार करत होती, तेव्हा जगभरातील काळ्या लोकांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेतील वंशवादविरोधी चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील नाते अत्यंत महत्त्वाचे ठरते. वंशवाद आणि साम्राज्यवाद यांना दोन्हींच्या विरोधातील स्वातंत्र्यलढ्यांना जोडणारी ही मर्मदृष्टी राष्ट्र नावाच्या संकल्पनेला अगदी वेगळ्या स्वरुपात बघते.
वंशवादविरोधी आणि साम्राज्यवादविरोधी चळवळींनी एकमेकांशी संपर्क प्रस्थापित केला, तसा भारतीय स्वातंत्र्यलढा हा गौरेतरांच्या अस्तित्वाच्या लढ्याशी जोडला गेला. त्या दृष्टीने अमेरिकेत काही संस्थाही उभारल्या गेल्या. २ जानेवारी १९१९ ला ‘इंटरनॅशनल लीग ऑफ डार्कर रेसेस’ (International League of Darker Races)ची स्थापना होऊन त्यांची पहिली सभा हडसन नदीच्या काठावर घेतली गेली. तिथून पुढे या चळवळींनी एकत्रित संघर्षाचे विविध मार्ग आखायला सुरुवात केली. १९२०मध्ये आंतरराष्ट्रीय समस्यांचा आवाका असणाऱ्या आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांनी ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ विमेन ऑफ डार्कर रेसेस’ अशी संघटना स्थापन केली. चार वर्षांनी त्यात दोन भारतीय विद्यार्थिनी सामील झाल्या. कमलादेवी चट्टोपाध्याय आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्याशी या संघटनेचा संपर्क होता. १९२५मध्ये अमेरिकेतील डाव्या संघटनांनी कामगार, पत्रकार, चळवळीतील कार्यकर्ते यांना एकत्र आणून अमेरिकन निग्रो लेबर काँग्रेसची स्थापना केली.
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
निको स्लेट दाखवून देतात त्याप्रमाणे साम्राज्यवादाचे वंशवादी स्वरूप १८८४-८५मधल्या बर्लिन कॉन्फरन्समध्ये निश्चित झाले. युरोपिअन शक्तींनी आफ्रिका आपापसात वाटून घेण्यावर त्यात शिक्कामोर्तब झाले. भारतीय उपखंडातले १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध चिरडून टाकून इंग्लंडच्या राणीची सत्ता प्रस्थापित करण्याचा हाच काळ. म्हणजे जागतिक साम्राज्यवादी शक्तींनी गौरेतर जगाला अंकित करण्याचा हा काळ. राष्ट्रांच्या सीमा जशा घट्ट होत गेल्या, तशा त्या सीमा ओलांडून जाण्याची इच्छाही वाढत गेली. बेले यांच्या म्हणण्याचा दाखला देत स्लेट सांगतात की, १९व्या शतकाच्या अखेरीस वर्णश्रेष्ठत्त्व मानणाऱ्या गौरवर्णीयांचे नेटवर्क असेच देशांच्या सीमारेषा ओलांडून प्रस्थापित झाले. ज्या ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात लढून अमेरिका स्वतंत्र झाली होती, तीच ब्रिटिश सत्ता भारतात सत्ता गाजवत असताना तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट म्हणाले होते, “इंग्रजांनी केलेले भारतीय साम्राज्याचे यशस्वी प्रशासन ही गेल्या दोन शतकांतील गोऱ्या वंशाची सर्वात कौतुकास्पद कामगिरी आहे.” (“The successful administration of the Indian Empire by the English has been one of the most notable and most admirable achievements of the white race during the past two centuries.”, पान ८)
मॅक्स म्युलर यांनी १८४७मध्ये ब्रिटिश असोसिएशन फॉर द अॅकडव्हन्समेंट ऑफ सायन्स (British Association for the Advancement of Science)च्या बैठकीत वेदांचा आधार घेऊन भारतातील वांशिक नकाशाची मांडणी केली. त्यांच्या मांडणीत त्यांनी भारतातील उच्चजातीय आर्यवंश आणि युरोपिअन कॉकेशन वंश यांच्यात संबंध प्रस्थापित केला. आर्यांनी मूळ निग्रॉईड वंशाच्या लोकांना जिंकून घेऊन त्यांना जातिबाह्य केले असेही त्याने सांगितले. याची मांडणी स्लेट यांनी त्यांच्या पुस्तकात दिली आहे. (पान ११०-११)
या सांस्कृतिक राजकारणाला उलटवण्याचे काम फुल्यांनी केले. एतद्देशीय ब्राह्मणी संस्कृतीशी लढायचे तर शोषितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये संवाद असावा लागेल हे त्यांनी जाणले. त्यामुळेही पंडिता रमाबाईंचे धर्मांतर इथल्या ब्राह्मणांना जेवढे गर्हणीय वाटले, तेवढे फुल्यांना वाटले नाही. ताराबाई शिंदेंच्या पाठीशी ते जसे उभे राहिले तसेच पंडिता रमाबाईंच्याही. एकूण आधुनिक राष्ट्राची कल्पना त्यांना नेमकेपणाने करता आली. मॅक्स म्युल्लरच्या मांडणीनंतर वर्णश्रेष्ठत्वाच्या चर्चांमध्ये जातिव्यवस्थेचा समावेश झाला. भारतीय वंशाच्या लोकांचे अमेरिकेतील जनतेशी असणारे संबंध जसे साम्राज्यवाद विरोधाच्या चर्चेने भारले गेले, तसेच जातिव्यवस्थेच्या चर्चेने ताणलेही गेले.
गांधींनी फुल्यांचे काही मुद्दे उचलले. स्त्रियांची स्वातंत्र्याची ऊर्मी चेतवणे आणि सत्यशोधन या बरोबरीने वंचितांच्या आंतरराष्ट्रीय लढ्यांचे भान हाही फुल्यांचा मुद्दा गांधींनी पुढे नेला. त्यातून त्यांच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा त्यांना ओलांडता आल्या. दरम्यान भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक नेते इंग्लंड अमेरिकेत राहून गेले. दादाभाई नवरोजी यांचा संपर्क अमेरिकेतील आफ्रिकन पत्रकार इडा बी वेल्सशी इंग्लंडमध्ये १८९३मध्येच आला होता. अमेरिकेत निग्रोंना ठेचून मारण्याच्या प्रथेविरुद्ध ती आवाज उठवत होती. १९००मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने त्रिनिदादमधील सिल्व्हेस्टर विल्यम्स या काळ्या कार्यकर्त्याला पॅन आफ्रिकन परिषद लंडनमध्ये घेण्यासाठी मदत केली होती. (डू ब्लॅक लाईव्ज मॅटर टू साउथ एशियन्स? दिनयार पटेल, हिमल साऊथ एशियन्स, ४ जुलै २०२०) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काहींनी अमेरिकेतील राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. निको स्लेट यांनी त्यांच्या पुस्तकातून त्यांची अत्यंत तपशीलवार मांडणी केली आहे. ती प्रामुख्याने अमेरिकेतील काळ्या लोकांच्या चळवळींचा गांधींशी आणि काँग्रेसच्या नेत्यांशी असणारा संपर्क व भारतीय नेत्यांचा अमेरिकेतील वंशवादविरोधी आंदोलकांशी असणारा संवाद यांची आहे. या पुस्तकात मांडलेले ऐतिहासिक तपशील पुढे देत आहे.
लाला लजपत राय पहिल्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेत पाच वर्षे राह्यले होते. त्यांचा संपर्क प्रामुख्याने काळ्या लोकांच्या चळवळींशी आणि लेखक व नेत्यांशी होता. ‘नॅशनल असोसिएशन फॉर दि अॅपडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल’ (National Association for the Advancement of Colored People, NAACP) या संघटनेच्या संस्थापक मेरी ओव्हिंग्टन आणि ओसवाल्ड विलर्ड यांनी त्यांची गाठ अनेक आफ्रिकन-अमेरिकन नेत्यांशी घालून दिली. जॉन होप, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, बुकर टी वॉशिंग्टन यांनी त्यांना दक्षिण भागातील काळ्या लोकांच्या वसाहतींमध्ये नेले. प्रसिद्ध विचारवंत ड्यूबॉईस आणि लाला लजपत राय यांच्या अनेकदा भेटी होत. त्या दोघांनी मिळून इंटर कॉलेजिएट सोशालिस्ट सोसायटी (Inter-collegiate Socialist Society)मध्ये एकत्रित पणे जाहीर केले की, "हिंदूंचा आणि निग्रोंचा अंतर्गत प्रश्न केवळ स्थानिक प्रश्न नाही तर त्या जागतिक समस्या आहेत. (“The problem of the Hindu and of the negro and cognate problems are not local, but world problems.”, पान ३९) नीग्रो आणि हिंदू यांच्या समस्या या जागतिक राजकारणाच्या समस्या आहेत असे त्यांनी जाहीरपणे म्हटल्यामुळे अमेरिकेतील युद्धखात्याला लाला लजपत राय यांची दखल घेणे भाग पडले. आर्य समाजाचे सदस्य म्हणून आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पाईक म्हणून लाला लजपत राय यांना जसे हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी लढायचे होते तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठीही. साहजिकच वंशभेद, जातिभेद आणि साम्राज्यवाद यांना एका वैश्विक सत्तेचे आविष्कार मानून जगभरातील गौरेतर लोकांची एकजूट साधण्याचा प्रयत्न त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन नेतृत्त्वाच्या साथीने केला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
दक्षिण आफ्रिकेत गांधींनी केलेल्या कामामुळे अमेरिकेतील आफ्रिकन लोकांना त्यांच्याबद्दल कमालीची उत्सुकता होती. अमेरिकेतील वंशभेदाविरोधात संघर्ष करण्यासाठी त्यांनी गांधींचा आदर्श अनेक प्रकारे तपासून बघितला होता. त्यात श्रद्धाळू ख्रिश्चन लोकांनी गांधींना येशूचा संदेश प्रत्यक्षात आणणारा नवा प्रेषित/संत अशा रूपात बघितले. डाव्या कृष्णवर्णीय चळवळींना त्यांच्या अहिंसात्मक संघर्षाबद्दल विश्वास वाटत नसला तरी गांधींच्या निग्रहाबद्दल आदर वाटत होता. त्यांनी साम्राज्यवादाच्या विरोधात ठामपणे लढणारे नेतृत्त्व म्हणून गांधींकडे बघितले. ड्यूबॉईस या प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन विचारवंताने व राजकीय नेत्याने गांधींना लाखो ब्राऊन लोकांच्या संघर्षाचा नेता म्हणून मांडले. त्यांच्या असहकार चळवळीबद्दल त्याला खूपच उत्सुकता होती. पहिल्या महायुद्धानंतर गांधींचे नाव काळ्या चळवळींमध्ये अनेकदा पुढे येताना दिसते.
मार्कस गार्वी या जमैकातून येऊन अमेरिकेत स्थायिक झालेल्या आणि न्यूयॉर्कमधून ‘द निग्रो वर्ल्ड’ नावाचे साप्ताहिक चालवणाऱ्या काळ्या कार्यकर्त्याने गांधी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही जगभरातील काळ्या लोकांच्या साम्राज्यवादी संघर्षाशी जोडली. गार्वीने काँग्रेसने खिलाफत चळवळीशी जोडून घेण्याचे प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील समताभावाचा नमुना म्हटले. त्याच सुमारास इस्लाम हा वर्ण, वंश आणि जातिपलीकडे जाऊन बंधुभाव मानणारा धर्म आहे असे अहमदी पंथाने मांडले. त्यामुळे १९३० च्या सुमारास एलिजा मुहम्मद याच्या नेतृत्त्वाखाली डेट्रॉईट, शिकागो, आणि उत्तर अमेरिकेतील इतर काही शहरांमधून काळ्या लोकांनी इस्लाम स्वीकारला. माल्कम एक्स हा या चळवळीतील महत्त्वाचा नेता होता. मात्र तेव्हा जिनांनी कलकत्त्यात जाहीरपणे सांगितले की, त्यांना भारतातले मुस्लीम लोक अमेरिकेतील काळ्या लोकांच्या परिस्थितीत ढकलले जायला नको आहेत.
मार्च १९१८मध्ये ‘द इंटरनॅशनॅलिस्ट’ या नियतकालिकाच्या संपादकाला लिहिताना ड्यूबॉईस यांनी आफ्रिकन लोकांबरोबरच भारतीय लोकांनाही मतदानाचा अधिकार नाही याबद्दल खंत व्यक्त केली होती.
ड्यूबॉईस ‘द डार्क प्रिन्सेस’ नावाची कादंबरी १९२७मध्ये लिहिली. ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्धचा भारतीय स्वातंत्र्यलढा आणि अमेरिकन वंशवादाविरुद्धचा आफ्रिकन लोकांचा संघर्ष यांच्यात पूल बांधण्याचे जे प्रयत्न पहिल्या महायुद्धानंतर जोरात सुरू झाले, त्याची एक निष्पत्ती म्हणून या कादंबरीकडे बघावे लागेल. यात दक्षिण भारतातील काळ्या वंशाची राजकन्या कौटिल्या आणि अमेरिकेतील आफ्रिकन वंशाचा डॉक्टर मॅथ्यू यांच्या प्रेमाची ही कथा अनेक सामाजिक संदर्भ आणि त्यातून निर्माण केलेली सामाजिक संभाषिते घेऊन येते. कौटिल्या सांगते की, ‘काळ्या भारतातूनच जग जन्माला आले.’ दक्षिण भारताची ओळख सांगताना ती म्हणते, ‘आर्य आक्रमकांचा तिरस्कार करत आम्ही ब्वोदपूरमध्ये स्थलांतर केले आणि तिथे आम्ही कुरळ्या केसांच्या काळ्या बुद्धाला जन्म दिला.’ ती गौरेतर लोकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची नेता आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
इथे ड्यूबॉईस आफ्रिकन आणि दक्षिण भारतीय लोकांमध्ये संबंध निर्माण करतो. मॅथ्यू कू क्लुक्स क्लान विरोधात काम करण्यासाठी स्वतःचे शिक्षण सोडतो. तो कौटिल्याच्या संघटनेत सामील होतो. कादंबरी संपते तेव्हा ते दोघं एका मुलाला जन्म देतात तो सगळ्या काळ्या वर्णाच्या जगाचा प्रेषित असेल असे सुचवून कादंबरी संपते. त्यात गौरवर्णीय लोकांच्या वर्णवर्चस्वाला विरोध करत असतानाच वर्गीय संघर्षाची आशयसूत्रेही आलेली आहेत. मॅथ्यू म्हणतो- ‘इथे अमेरिकेत काळ्या लोकांनी कारखानदारीवर लोकशाही नियंत्रण आणण्यासाठी श्रीमंतांचे राज्य उधळले पाहिजे आणि त्यातील संपत्ती पहिल्यांदा काळ्या लोकांमध्ये आणि नंतर गोऱ्या कामगारांमध्ये वाटली पाहिजे.’ कौटिल्या म्हणते, ‘माझ्या भारतात आम्ही पहिल्यांदा आम्हाला दुबळं करणाऱ्या, आमची दिशाभूल करणाऱ्या, अत्यंत धूर्त इंग्लंडपासून मुक्त होणं गरजेचं आहे.... मग आम्ही राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापित करुन आमच्या स्थानिक उद्योगधंद्यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे.’
एका अर्थाने ड्यूबॉईस नेहरूंचा कार्यक्रम कौटिल्याच्या तोंडून मांडतो आहे. कौटिल्याच्या व्यक्तिरेखेसाठी त्याच्या डोळ्यासमोर सरोजिनी नायडू असाव्यात, असे या पुस्तकाचे लेखक सुचवतात. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे नायिका ही अनुनभवी, नाजूक मुलगी म्हणून दाखवली नाही तर राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि कृतिशील बाई दाखवली आहे. ती मॅथ्यूला अनेकदा संकटातून वाचवते. ‘आता राजकन्या निर्णय घेईल,’ असेही तिच्या दरबाऱ्यांना सुनावते. तिचा मुलगा जन्माला येतो तेव्हा मॅथ्यूची आई येशूला साकडं घालते आणि धर्मगुरू ‘बायबल’मधील ‘बुक ऑफ रिव्हिलेशन’मधील गीते गातो, तर कौटिल्या तिचे बाळ आकाशाकडे तोंड करून उंच धरते व ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे स्तवन करते. मग सगळे गातात आणि काळा प्रेषित जन्माला आल्याचे जगाला सांगतात.
या कादंबरीच्या प्रकाशनानंतर वर्षभरातच लाला लजपत राय ब्रिटिशांकडून मारले गेले, तेव्हा ड्यूबॉईसने त्याच्या ‘द क्रायसिस’ या नियतकालिकातून लाला लजपत राय यांना हुतात्मा म्हणून श्रद्धांजली वाहिली आणि जगभरातील ८० कोटी काळ्या लोकसंख्येचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा असून इंग्रजांच्या हिंसाचाराचा ते निषेध करतात असे जाहीर केले. लजपत राय यांच्या ‘द पीपल’ या वर्तमानपत्रात त्यांना श्रद्धांजली वाहताना ड्यूबॉईस म्हणतो, ‘जेव्हा यांच्यासारखा माणूस क्रांतिकारक होता असे म्हटले जाते आणि तो थोर सभ्य सरकारकडून मारहाण करून संपवला जातो, तेव्हा सर्व शहाण्या माणसांनी क्रांती करणे हे त्यांचे कर्तव्य बनते.’
भारतीय स्वातंत्र्यलढा जसा प्रखर होऊ लागला, तसा जातिव्यवस्थेचा प्रश्नदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः वंशभेदविरोधी राजकारणात अनेकदा चर्चेत आला. साहजिकच स्वातंत्र्यलढा जर साम्राज्यवादविरोधी आणि वंशवादविरोधी लढ्याचा भाग मानायचा असेल तर जातिव्यवस्थेचे स्पष्टीकरण कसे द्यायचे? हा प्रश्न विवेकानंदांपासून आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना काळ्या लोकांबद्दल ममत्त्व असले तरी जातिव्यवस्थेचे नीट आकलन आधुनिक राष्ट्राच्या अवकाशात त्यांना मांडता आले असे दिसत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
एका बाजूला रवीन्द्रनाथ टागोर किंवा सुभाषचंद्र बोस यांनी जातिव्यवस्थेकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला. टागोरांनी जातिव्यवस्थेला वंशवाद आणि वंशविच्छेद यांना एक पर्याय अशा स्वरूपात बघितले. त्यातून भारतात आलेल्या विविध वंशाच्या लोकांना संरक्षण मिळाले, असे ते म्हणतात. बोसांनीही विविध वांशिक समूहांनी साहचर्याचा केलेला प्रयत्न म्हणजे जातिव्यवस्था असे म्हटले. गांधींनीपण या टप्प्यावर जातिव्यवस्थेचे समर्थन केलेले दिसते. त्यांनी भारतातील अस्पृश्यांची परिस्थिती अमेरिकेतील काळ्या लोकांची परिस्थितीपेक्षा बरी आहे असे म्हणताना चार कारणे दिली
१) भारतातील अस्पृश्यता ही अमेरिकेतील जिम क्रो कायद्यांसारखी राज्यव्यवस्थेने केलेल्या कायद्याने जाहीर केलेली नाही.
२) भारतात जाहीर ठेचून मारण्याच्या पद्धतीला मान्यता नाही
३) भारतात दलित संतांना संत म्हणून मान्यता आहे, तशी अमेरिकेत काळ्या संतांना मान्यता नाही.
४) अस्पृश्यतेबाबतचा पूर्वग्रह भारतात हळूहळू निवळतो आहे.
१९२७मध्ये लाला लजपतरायांनी ड्यूबॉईसकडे अमेरिकेतील निग्रोंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल माहिती मागवली होती आणि ड्यूबॉईसने ‘द क्रायसिस ’चे अंक व लिंचिंगचे (जाहीररीत्या ठेचून मारण्याचे) फोटो पाठवले होते. आंबेडकरांनी मात्र अमेरिकेतील काळ्या लोकांच्या परिस्थितीचे तुलनेने बरे चित्र मांडलेले दिसते. त्यांच्या ‘Negroes and Slavery’ या अप्रकाशित निबंधात ते म्हणतात, ‘‘यातील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, हे स्वतंत्र नसलेले कोणतेही अधिकार नसलेले वर्ग आता वेगळे वर्ग म्हणून अस्तित्वात नाहीत. या थोर (अमेरिकन) समाजाचेच ते एक अविभाज्य भाग बनले आहेत.” (“What is of importance is that these unfree, unprivileged classes have disappeared as a separate class and have become part and parcel of the great Society.”, पान ६२)
गांधींचे या संदर्भातले विचार उत्क्रांत होत गेलेले दिसतात. १९२६मध्ये ‘Race Arrogance’ या त्यांच्या लेखात ते म्हणतात, “आपण तथाकथित अस्पृश्यांना देत असलेली वागणूक ही गोरा माणूस काळ्या माणसाला देत असलेल्या वागणुकीपेक्षा कोणत्याही प्रकारे अधिक बरी नाही.” (“Our treatment of the so- called untouchables is no better than that of coloured people by the white man”, पान ६३). १९३०मध्ये गांधी अनेक आफ्रिकन अमेरिकन नेत्यांना भेटले. त्यांची आफ्रिकन लोकांच्या संदर्भातली काहीशी बुरसटलेली मते (त्यांचे झुलू वंश आणि भारतीय वंश यांच्याबद्दलचे दक्षिण आफ्रिकेत असताना व्यक्त केलेले मत-असभ्य (uncivilized) आफ्रिकन्स आणि सभ्य (civilized) भारतीय- अरुंधती रॉय यांच्या जहाल टीकेचे लक्ष्य झालेले आहे.) लक्षणीयरित्या बदललेली दिसतात.
१९३३ मध्ये गांधींनी स्पष्टपणे लिहिले, “भारताला गुलामगिरी नाहीशी करण्यासाठी लढलेल्या वीरांकडून बरेच शिकण्यासारखे आहे. कारण आपल्याकडची गुलामगिरी ही तथाकथित धार्मिक मान्यतेवर आधारलेली आहे आणि तिच्या पाश्चात्य आविष्कारापेक्षा अधिक विषारी आहे.” (“India has much to learn from the heroes of the Abolition of Slavery, for we have slavery based upon supposed religious sanction and more poisonous than its Western fellow.”, पान ११९-२०) दुसऱ्या महायुद्धापर्यंत गोऱ्या साम्राज्यवादाचा कठोर धिःक्कार करणारे आणि भारतीय जातिव्यवस्थेची उत्तरोत्तर अधिक जहाल निर्भत्सना करणारे गांधी हा बदल ते आफ्रिकन नेत्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे झालेला असावा असे निको स्लेट यांचे म्हणणे आहे.
एका अर्थाने कलर्ड कॉस्मॉपॉलिटनिझम हा वंश, धर्म, राष्ट्र अशा विविध भेदांना उठाव देत मानवतावादाच्या एका छत्राखाली आणण्याची कसरत करत होता. वंशभेद आणि साम्राज्यवादाचा इतिहास अशा दोन अक्षांवर जगभरातील गौरेतरांना एकत्र आणण्याचा तो प्रयत्न होता. आंबेडकरांची भूमिकाही यासंदर्भात पुढे काहीशी बदललेली दिसते. म्हणजे अमेरिका त्यांना आधी ग्रेट नेशन वाटत होती त्याऐवजी निग्रोंची प्रतारणा करणारा देश अशी प्रतिमा ते मांडताना दिसतात. १९४५मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘What Congress and Gandhi Have Done to the Untouchable’, या लेखात आंबेडकरांनी सिव्हिल वॉर नंतर अमेरिकेने आफ्रिकन-अमेरिकन लोकांची केलेली प्रतारणा सांगत असे जाहीर केले की, “निग्रोंच्या वाट्याला जे आले ते अस्पृश्यांना विसरून चालणार नाही. निग्रोंची जी प्रतारणा (लिंकनने) केली तशी अस्पृश्याची होऊ नये म्हणून या ‘स्वातंत्र्यासाठीच्या लढ्या’कडे ते वेगळ्या दृष्टीने बघतात.” (“The Untouchables cannot forget the fate of the Negroes. It is to prevent such treachery that the Untouchables have taken the attitude they have with regard to this ‘Fight for Freedom.”) आंबेडकरांनी लिंकन आणि गांधी यांची तुलना करून दोघांनाही त्या प्रतारणेबद्दल दोषी ठरवले आहे. (पान- ११८)
गांधींचे नेतृत्त्व हा वंशभेदाच्या विरोधात लढण्याच्या प्रयत्नांना प्रेरणा देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक होता. त्यांचा निग्रह, नेता म्हणून त्यांची विश्वासार्हता, त्यांच्या अहिंसात्मक लढ्याचे वेगळे प्रारूप, प्रसंगी प्राण देण्याची तयारी यांच्यामुळे अनेक ख्रिश्चन लोकांना त्यांच्याबद्दल कमालीचे प्रेम वाटत होते. काळ्या लोकांचाही त्याला अपवाद नव्हता. असे स्लेट दाखवून देतात. राजकारणात हिंसा वापरायला त्यांनी दिलेला ठाम नकार आणि त्यातून राजकारणाला नैतिक निर्णयांशी जोडणारे अध्यात्म, या गोष्टी तत्कालीन परिस्थितीत फक्त चर्चचे अधिकारीच नव्हेत तर ड्यूबॉईससारख्या लेखकांनाही लक्षात घेण्याजोग्या वाटल्या.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१९२२ साली गांधींनी इंग्रजांच्या न्यायाधीशासमोर उभा केलेला प्रश्न त्यांना एक ख्रिश्चन माणूस म्हणून कमालीचा भिडला. “त्या दिवशी गोरा ख्रिश्चन धर्म गांधींसमोर उभा राहिला आणि आपण सगळ्यांनीच मान्य केले पाहिजे की, तो अगदी केविलवाणा दिसला. या तपकिरी रंगाच्या माणसाने नर्व्हस झालेल्या गोऱ्या न्यायाधीशाच्या नजरेला नजर देत शांतपणे बजावले की, ‘कायदा लागू करणे आणि मला तुरुंगात धाडणे हे तुमचे काम आहे; जर हा कायदा योग्य नाही अशी तुमची खात्री असेल तर मग तुम्ही राजीनामा द्यायला हवा. तुम्ही असा न्यायाधीश राजीनामा देईल अशी कल्पना तरी करू शकता का? गांधी तुरुंगात आहेत. आणि इंग्लिश ख्रिश्चन धर्मदेखील.” (“White Christianity stood before Gandhi the other day and, let us all confess,it cut a sorry figure. This brown man looked into the eyes of the nervous white judge and said calmly, “It is your business to enforce the law and send me to jail; or if you do not believe that the law is right, it is your business to resign. Can you imagine such a judge resigning? Gandhi is in jail. So is English Christianity.”, पान ७३)
असे असले तरी लाला लजपत राय ब्रिटिशांकडून मारले गेल्यानंतर ड्यूबॉईस म्हणतात की, आता भारतातील कोणत्याही माणसाला क्रांती हाच त्याचा धर्म आहे असे वाटले तर त्यात गैर नाही. म्हणजे एका अर्थाने ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची खरी ओळख काळ्या नेत्यांना असल्यामुळे ते गांधींचे मार्ग सरसकट अनुकरणीय मानताना दिसत नाहीत.
१९४६ साली अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या परराष्ट्र खात्याचे तेव्हाचे सचिव राम मनोहर लोहिया यांनी ड्यूबॉईसना लिहिले होते, “आम्हालाही आमच्या अमेरिकेतील निग्रो साथींबरोबर घनिष्ट संबंध प्रस्थापित करायला आवडतील.” १९५०मध्ये लोहिया अमेरिकेत गेले असताना त्यांनी आफ्रिकन-अमेरिकन लोकांना अमेरिकेतील वंशवादाविरुद्ध अहिंसक कायदेभंगाची चळवळ उभी करण्यास सांगितले. पुढे १९६० मध्ये नागरी हक्क चळवळींमध्ये भाग घेण्यासाठी ते अमेरिकेत आले. निग्रोंना समान हक्क मिळण्यासाठी चाललेल्या लढ्यात ते सहभागी झाले आणि त्यांना मिसिसिपीमध्ये अटकही झाली.
ड्यूबॉईस इतकाच महत्त्वाचा नेता सेड्रिक डोव्हर. हे खरे तर १९०४मध्ये कलकत्त्यात जन्माला आलेले अँग्लो-इंडियन होते. पण ते स्वतःला युरेशियन म्हणवून घेत. त्यांचे बहुतेक आयुष्य इंग्लंडमध्ये गेले, पण त्यांनी सर्वकाळ गौरेतरांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड-अमेरिकेतील काळे लोक आणि भारतातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, विशेषतः नेहरू, यांच्यातील एक भक्कम दुवा म्हणजे डोव्हर. पॉल रोबसन, लांगस्टन ह्यूजेस, चार्ल्स जॉन्सन हे त्यांच्या निकटच्या वर्तुळातले लोक. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास अशा विविध अभ्यासशाखांना एकत्र आणून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यातील १९३७ मध्ये लिहिलेले ‘Half-caste’ हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. ते ‘वंश’ या शब्दासाठी ‘मिश्रवर्णीय’ असा शब्द वापरतात. त्यांनी वांशिक श्रेष्ठत्वाच्या पाठीशी उभे केलेले कृतक विज्ञान मोडून काढण्याचा प्रयत्न केला. शुद्ध वंश गेल्या दहा हजार वर्षांत अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. “जगासमोर असलेल्या आंतरवंशीय समस्या या मिश्रवर्णीयांचा वंश विकसित होऊनच सुटतील. मिश्रवंशीय विवाह झाले की, वंशावंशातील संघर्ष संपुष्टात येतील. आणि जगात मिश्र वर्ण पसरले की, शांतता नांदेल.” (“The inter- racial difficulties of the world will be solved by the development of mixed breeds, and that the removal of racial friction by marriage will ultimately lead to the peaceful occupation of the whole world by one composite race.”, पान ८३-८४) असे त्यांनी सांगितले. वांशिक सरमिसळीतूनच स्वतंत्र जग जन्माला येईल असे त्याचे म्हणणे होते. ‘Half-caste’ या १९३७मध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी ही मांडणी केली आहे.
गांधींचे अमेरिकेतील सहकारी ग्रेग आणि अॅन्ड्र्यूज यांनीही कार्व्हर आणि बुकर टी वॉशिंग्टन यांच्या कार्याचा भारतीयांना परिचय करून देण्यात मोठा सहभाग घेतला. कार्व्हर यांच्या टस्केजी विद्यापीठातून टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची देवाणघेवाण अॅन्ड्र्यूज यांनी घडवून आणली. कार्व्हर हे शास्त्रज्ञ होते. निग्रोंच्या आहारातील पोषणमूल्यांवर त्यांनी संशोधन केले होते आणि शेंगदाण्याचे पोषणमूल्य सिद्ध केले होते. गांधींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगांमध्ये आहार हा महत्त्वाचा घटक होता. पण त्यांच्या नेतृत्त्वाचे मोल लक्षात घेता त्यांनी पोषणमूल्यांकडे दुर्लक्ष करू नये असे कार्व्हर यांना वाटे. त्यामुळे त्यांनी गांधींना शेंगदाण्याचे दूध घेण्याचा सल्ला दिला. त्या दोघांमधील असे संवाद बराच काळ चालू होते.
गांधीच्या ग्रामीण विकासाच्या आध्यात्मिक संकल्पनेला व्यवहारात आणण्याचे काम त्यातून झाले. दारिद्र्यनिर्मूलन हा विविध ज्ञानशाखांमधून सोडवण्याचा प्रश्न आहे, हे त्यातून अधोरेखित झाले. पण यात भारतात खोलवर रुजलेली आर्थिक विषमता पुरेशी लक्षात घेतली गेली नाही, त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न पुढे जाऊ शकले नाहीत असे स्लेट नोंदवतात. दोघांचेही ग्रामीण विकासाचे कार्यक्रम फसले, कारण त्यांची मदतीची आवाहने प्रत्यक्षात आली नाहीत. अमेरिकन वंशवादात काय किंवा भारतीय ग्रामीण व्यवहारात काय जी व्यवस्थात्मक विषमता आणि सरंजामी अर्थव्यवस्था रुजलेली होती, त्यांना विश्वस्तवृत्तीची आवाहने फार हलवू शकली नाहीत. भारतातील जातिव्यवस्था आणि साम्राज्यवादाची अमानुष पिळवणूक यांच्यामध्ये हे आर्थिक प्रारूप पराभूत झाले. गांधींचे अहिंसात्मक लढ्याचे आणि कायदेभंगाचे मार्ग कार्व्हरना कौतुकास्पद वाटले तरी अमेरिकेतील हिंस्त्र वंशवादात त्यांनी त्यांचा वापर करण्याचे टाळले.
१९३२मध्ये वल्लभभाई पटेल अमेरिकेतील टेनेसीमध्ये येऊन काळ्या नेत्यांना भेटले होते आणि १९३४मध्ये मणिलाल पारेख गांधींचा संदेश देण्यासाठी अटलांटाला आले होते. १९३५मध्ये रेव्हरन्ड थर्मन्स (रॅन्किन चॅपेलचे धर्माभ्यासक) आणि कॅरोल (येलमधून डिव्हिनिटीमध्ये पदवी घेतलेले धर्मगुरू) त्यांच्या कार्यकर्त्या पत्नींसह गांधींना भेटायला भारतात आले. ते दक्षिण आशियात त्यांच्या चर्चतर्फे यात्रिक म्हणून हिंडायला आले होते. दक्षिण आशियात ख्रिश्चनांनी काळ्या लोकांवर केलेल्या अत्याचारावर श्रीलंकेत थर्मन्सना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी खुलेपणाने ‘येशूची धार्मिकता’ आणि ‘साम्राज्यवादी धर्म’ यात फरक केला आणि धार्मिक अत्याचारांचा निषेध केला. गुलामगिरी आणि वर्णविद्वेष यांच्याबद्दल त्यांची मते अत्यंत जहाल होती आणि ती खुलेपणाने व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याच्या अटीवरच ते चर्चतर्फे या दौऱ्यावर आले होते.
त्यांच्या चर्चेचा समारोप करताना त्यांनी कमालीच्या दुःखाने मान्य केले की, ‘अमेरिकन लोक ब्रिटिशांना अनुसरत पाशवीपणात त्यांच्याच इतके प्रगल्भ आणि विचारशील होत चाललेले बघून त्यांना विलक्षण निराश वाटते.’ (’...he was filled “with complete despair” by the fact that Americans seemed to be following the British in “becoming mature and reflective” in their “brutality.”, पान ११४) गांधींनी दोघांचेही मनापासून स्वागत केले.
अमेरिकेतील वंशभेदाविरुद्धचा संघर्ष निग्रो लोकच बायबलच्या संदेशानुसार पुढे नेऊ शकतील असे गांधींनी सांगितले तर थर्मन्स यांनी अमेरिकेतील निग्रो आणि भारतातील दलित यांच्या वेदनेत कोणताही फरक नाही असे सांगितले. दोघांनीही साम्राज्यवाद आणि वंशवाद यांच्या विरोधी काळ्या लोकांच्या एकजुटीला एक अध्यात्मिक पाया दिला. १९३५मध्ये मेज नावाचे आणखी एक काळे नेते भारतात आले होते. दक्षिण भारतात असलेल्या दलितांसाठीच्या शाळेत त्यांची ओळख अमेरिकेतील अस्पृश्य अशी करून देण्यात आली. तेव्हा त्यांना वंशवाद आणि जातिव्यवस्था यांतील नाते लक्षात आले असे त्यांनी नोंदवले आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
या वंशवादाला स्त्रियांचा प्रतिसाद कसा होता? स्लेट यांनी प्रामुख्याने कमलादेवी चट्टोपाध्याय, सरोजिनी नायडू आणि विजयालक्ष्मी पंडित यांचा विस्ताराने उल्लेख केला आहे. आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांचा स्वतंत्रपणे नेत्या म्हणून उल्लेख नाही. त्या अर्थाने उच्चशिक्षित भारतीय स्त्रिया राजकारणात कृतिशील होत्या असे चित्र त्यातून उभे राहते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी अमेरिकेत वंशवादाचे थेट अनुभव घेतले आणि त्याविरुद्ध ठामपणे संघर्षही केला. सरोजिनी नायडूंनी गांधीना काळा येशू म्हटले आणि काळ्या चळवळीला जाहीर पाठिंबा दिला.
भारत स्वतंत्र झाल्यावर राष्ट्रप्रमुख म्हणून संघर्षात्मक राजकारणाला पाठिंबा देण्याच्या संदर्भात नेहरुंवर ज्या मर्यादा आल्या त्यातून विजयालक्ष्मी पंडितांनी संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय प्रतिनिधी म्हणून आफ्रिकन अमेरिकन लोकांना जाहीर पाठिंबा देऊन मार्ग काढला.
१९३९मध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी कोपेनहेगेन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत साम्राज्यवादाचा निषेध करण्याचा प्रस्ताव मांडायचा आग्रह धरला पण तो मान्य झाला नाही म्हणून त्या परिषदेतून बाहेर पडल्या. पुढे १९४२ मध्ये त्या अमेरिकेत आल्या तेव्हा त्यांनी अनेक आफ्रिकन अमेरिकन नेत्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे राहिल्या. त्याचवेळेस चीनकडून आलेल्या चँग कै शेक यांच्या पत्नीने मात्र काळ्या लोकांपासून अंतर ठेवले कारण त्यांना अमेरिकेला दुखवायचे नव्हते. वल्लभभाई पटेलही कमलादेवींबरोबर त्यावेळेस अमेरिकेत होते. पॉल रोबसन या आफ्रिकन अमेरिकन नेत्याने त्यांना काळ्या लोकांना भोगाव्या लागणाऱ्या वर्णद्वेषाची माहिती दिली, तेव्हा पटेलांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्याबद्दलचा अनिवार संताप व्यक्त केला. त्यांनी लिहिले होते, “जेव्हा मी रोबसन आणि त्याच्या लोकांना भोगाव्या लागलेल्या भयानक क्रौर्य आणि अन्यायांचा विचार करतो तेव्हा माझं सगळं अस्तित्त्व पेटून उठतं. मी संतापून धगधगायला लागतो. ज्या व्यवस्थेमध्ये असले रोग निर्माण होतात त्या व्यवस्थेबद्दल यत्किंचितही दयाभाव माझ्या हृदयात शिल्लक राहात नाही.” (“Whenever I think of the terrible cruelties and injustices they—[Robeson] and his people—have to suffer my whole being revolts and I burn with anger and have no pity left in my heart for the system that breeds such diseases.”, पान १४३)
पटेल आज असते तर टेक्सासमधल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमानंतर किंवा अहमदाबादेतल्या ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमानंतर काय म्हणाले असते?
१९४२मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या धुमाळीत गांधींनी साम्राज्यवाद आणि वंशवाद यांच्यातील ढोंगीपणा थेट मांडला. मित्रराष्ट्रांचा लोकशाही वाचवण्याचा दावा म्हणजे निखालस ढोंग आहे. जोवर ब्रिटन त्याची भारतातील सत्ता काढून घेत नाही आणि जोवर अमेरिकेतील राज्यकर्ते वंशवादाला मूठमाती देत नाहीत, तोवर त्यांना लोकशाही रक्षणाचे दावे करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. असे गांधींनी सुनावले. अमेरिकेतील वंशवादाचा प्रत्यक्ष अनुभव भारतीय जनतेला याच काळात आला. दुसऱ्या महायुद्धात भारत-चीन-ब्रह्मदेश या आशियातील महायुद्धाच्या रंगभूमीवर अमेरिकेने दोन लाख सैन्य तैनात केले. त्यातले २२ हजार आफ्रिकन अमेरिकन होते. सैन्यातही त्यांना दुय्यम सैनिकाची वागणूक मिळत असल्याचे भारतीय लोकांनी बघितले. अनेक वर्णद्वेषी धोरणे सैन्यातही राबवली जात होती. प्रामुख्याने विलगता जोपासण्याचे धोरण. त्याचबरोबर आफ्रिकन अमेरिकन लोकांशी गोऱ्या लोकांपेक्षा अधिक निकटचे नाते निर्माण झाल्याच्या सैन्याच्या अहवालाचा लेखकाने उल्लेख केला आहे. अर्थात काळ्या सैनिकांना भारतीयांनी वाळीत टाकल्याचा अनुभव किंवा त्यांनी भारतीयांवर अत्याचार केल्याच्या घटनाही घडल्याच्या नोंदी त्यात आहेत.
१९४२मध्ये क्रिप्स मिशन अयशस्वी ठरल्यावर अमेरिकेतील वॉल्टर व्हाईट या आफ्रिकन अमेरिकन नेत्यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला. हे अत्यंत रोचक राजकारण होते. १९४१ मध्ये चर्चिल आणि रुझवेल्टनी अटलांटिक प्रस्तावावर सह्या केल्या होत्या. त्यानुसार जगातील सर्व लोकांना त्यांच्या पसंतीचे सरकार निवडण्याचा आणि त्यांना राज्य करू देण्याचा अधिकार आहे, असे म्हटले होते. त्यात अर्थातच काळ्या लोकांचा समावेश नव्हता. व्हाईटनी पॅसिफिक प्रस्ताव मांडला. त्यानुसार रुझवेल्ट, गांधी, नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद, चँग कै शेक यांनी एकत्रितपणे काळ्या लोकांच्या हक्काचा प्रस्ताव मांडावा असे सुचवले. रूझवेल्टच्या स्टेट सेक्रेटरीने भारतातील लोक निग्रोंना समान पातळीवरचे मानत नाहीत, इतकेच नव्हे तर त्यांच्यातील जातिव्यवस्थेमुळे ते त्यांच्यातील लोकांनाही विषमतेची वागणूक देतात असे सांगितले. त्यामुळे असा काही प्रस्ताव मांडायला रुझवेल्टच्या कार्यालयाने नकार दिला. ‘छोडो भारत’ चळवळीने आफ्रिकन अमेरिकन लढ्याला नव्याने बळ दिले. त्याच वेळेस २६ आफ्रिकन अमेरिकन विचारवंतांनी रूझवेल्टना पत्र देऊन भारतातील समस्येत हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
ड्यूबॉईस किंवा गार्वीसारख्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वांना भारतातील जातिव्यवस्थेतील शोषणाचा अंदाज होता, असे म्हणता येते, कारण दोघेही त्यांच्या चर्चांमध्ये एका गोष्टीची दखल घेताना दिसतात. ती म्हणजे अमेरिकेतही भारतीयांना आफ्रिकन वंशाच्या लोकांपेक्षा वेगळी वागणूक मिळते आणि काही भारतीयांना शक्यतो गोऱ्या वंशाच्या लोकांशी जोडून घ्यायला आवडते, कारण ते स्वतःदेखील आर्य वंशीय असल्याचे त्यातून ते सिद्ध करू पाहतात. त्यामुळे वर्णरेषांच्या अंतर्गतही वर्णरेषांचे भेदभाव आणि त्यातून गौरवर्णीय साम्राज्यवादाविरुद्धच्या लढ्याला जाणारे तडे यांची कल्पना त्यांना नक्कीच होती.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१९५०मध्ये राम मनोहर लोहियांनी ड्यूबॉईस बरोबर संवाद साधून काळ्या लोकांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दिला. लोहियांचे जातिव्यवस्थेचे विश्लेषण हे दलितांना वर्णसंघर्षाशी थेटपणे जोडणारे होते. १९६०मध्ये लोहियांनी अमेरिकेतील मिसिसिपी येथे काळ्या लोकांच्या वर्णविद्वेषाविरुद्धच्या संघर्षात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली.
कमलादेवी चट्टोपाध्यायांनी १९३९मध्ये कोपेनहेगेन येथे झालेल्या स्त्रियांच्या संमेलनात लिंगभावाच्या जोडीने साम्राज्यवादाचा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, पण तो स्वीकारला गेला नाही म्हणून त्या त्यातून बाहेर पडल्या. पुढे त्या अमेरिकेत गेल्या. त्यांच्या या भेटीत कमलादेवी रूझवेल्ट यांच्या शपथग्रहण समारंभात उपस्थित होत्या. रिपब्लिकन पार्टीची सभाही त्यांनी पाहिली व गर्भ नियंत्रणाचा प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्या मार्गरेट सँगर्स यांना भेटल्या.
युद्धे, साम्राज्यवाद आणि वंशवादाला विरोध करणे ही धार्मिक बांधीलकी मानणाऱ्या ख्रिश्चन अमेरिकनांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. १९३९मध्ये हार्लेममधल्या NAACPच्या शाखेत बोलताना त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादाचा धिःकार करत जगभरातील गौरेतरांशी भक्कम बांधीलकी जाहीर केली. (पान १३७) अमेरिकेतील दक्षिण भागात हिंडताना त्यांनी फक्त काळ्या लोकांच्याच घरात राहण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या महायुद्धात भारतीय सीमेवर अमेरिकेने सैन्य पाठवले, तेव्हा त्यात काळ्या सैनिकांची संख्याही मोठी होती. पण अमेरिकन सैन्याचे काळ्या-गोऱ्या सैनिकांमध्ये अलगता ठेवण्याचे धोरण आणि काळ्या लोकांवर केला जाणारा अन्याय भारतीयांनी बघितला. कलकत्ता आणि मुंबई इथे काळ्या सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. त्यामुळे अमेरिका स्वातंत्र्य आणि लोकशाही यांचे दावे करत असली तरी त्यातला हा वंशवादी दोष प्रत्यक्ष पाहायला मिळाला. काळ्या लोकांनाही भारतीय लोकांकडून भेदभाव सहन करावा लागला. एका अर्थाने भारतातील जातिव्यवस्थेचे दर्शन त्यांनाही झाले. त्यामुळे अमेरिकेतील काळ्या लोकांची भारतीय स्वातंत्र्यलढ्याबद्दल असणारी बंधुभावाची अपेक्षा तितकी वाजवी नसावी, असे त्यांच्याही लक्षात आले. गांधी, नेहरू, पटेल आणि बऱ्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या काळ्या लोकांच्या लढ्याशी व काळ्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. दोन्हीकडच्या नेत्यांनी अमेरिकेतील वंशवाद आणि भारतीय साम्राज्यवाद यांची सांगड घालून ब्रिटिश, तसेच अमेरिकन राज्यकर्त्यांकडे एकमेकांच्या स्वातंत्र्याची मागणीही वेळोवेळी केली होती. गौरेतरांवरील अन्याय हा जगभरातील गौरेतरांची एकजूट साध्य करू शकतो, असे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी पहिल्या महायुद्धापासूनच प्रयत्न सुरू झाले होते.
दुसऱ्या महायुद्धात ते अधिक जोरकसपणे केले जाऊ लागले, कारण त्याच वेळेस भारतातील स्वातंत्र्यलढ्यालाही उधाण आले होते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या विक्राळ स्वरूपात लोकशाही जपण्याची आवाहने आणि त्यासाठी मिळेल तिथून मदत घेण्याचे प्रयत्न दोस्त राष्ट्रांनाही अडचणीत आणत होती. कारण लोकशाहीची भाषा करायची आणि आफ्रिकन लोकांवर व भारतीय लोकांवर अपरिमित अत्याचार करायचे याचे स्पष्टीकरण आता मागितले जाऊ लागले. काळ्या लोकांची एकजूट बांधायची भाषा वैश्विक बंधुत्वाचे स्वप्न बघत होती. प्रसिद्ध आफ्रिकन-अमेरिकन पियानोवादक डॅन बर्ली कलकत्त्याला आला असताना त्याने भारतीय लोकांना प्रश्न केला, “आफ्रिकन-अमेरिकन, भारतीय, बर्मी, चिनी, मलायन लोकांच्या आदर्शांमध्ये एकमयता असू शकत नाही का?”
अमेरिकन सैनिक भारतीय उपखंडात असताना कराचीतून प्रसिद्ध होणाऱ्या सिंध ऑबझर्वरमध्ये फ्रेनी तल्यारखान नावाच्या पत्रकारबाईंनी ‘Strictly Feminine’ या स्तंभात ‘अनाम अमेरिकन सैनिकाला खुले पत्र’ लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते- “तुम्ही अमेरिकन लोक अजूनही निग्रो समस्येने ग्रासलेला आहात हे आमच्यासाठी हे धक्कादायक आहे. आम्हाला तुम्ही अमेरिकन म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य, मुक्तता यांचे प्रतीक वाटता. काळा सैनिक तुमच्यासाठी लढतो आहे, हे तुम्ही विसरू नका. तो तुमचाच देशबंधू आहे. तुमच्या इतकाच त्यालाही हवेत मोकळा श्वास घ्यायचा अधिकार आहे. तुम्ही लोकशाहीसाठी लढता आहात आणि मरता आहात--निदान तसं म्हणत तरी आहात. तेव्हा त्याचाही त्यावर जन्मसिद्ध हक्क आहे. एकदा का शांतता प्रस्थापित झाली की आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून असू.” (पान १५८). दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन सैन्यातून समोर आलेला वंशवाद बघून भारतीय उपखंडातील लोक मोठ्या संख्येने कम्युनिझमकडे वळले असे रेडिंग नावाचा लेखक म्हणतो.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अमेरिकेतील आफ्रिकन अमेरिकन आणि जगभरातील गौरेतर लोकांचे साम्राज्यवाद आणि वंशवादाविरोधात संघटन करण्याचे स्वप्न मोठे होते आणि त्याला पाठिंबाही मिळाला, पण याला विरोध करणारे जातिवादी किंवा वंशवादी प्रयत्न त्याही काळात होत होते. फक्त स्वातंत्र्य आणि लोकशाही या शब्दांना तेव्हा जी मान्यता होती, त्यात ते उघडपणे रेटणे शक्य झाले नसावे. या पुस्तकातली दोन उदाहरणे पुढे देते.
१९२८ साली अमेरिकन सेनेटर रॉयल कोपलँड आणि प्रतिनिधी एमॅन्युएल सेलर यांनी अमेरिकन प्रतिनिधी गृहात बिल मांडले. त्यानुसार हिंदू हे कायदेशीरदृष्ट्या गोरे म्हटले जातील आणि त्यामुळे अमेरिकन नागरिकत्त्वासाठी पात्र समजले जातील असे बिलात मांडले होते.
त्याच सुमारास ‘शिकागो डिफेन्डर’मध्ये आर्यन प्रपोगंडा सोसायटीचे डायरेक्टर रोमोला यांचे एक विवाद्य पत्र प्रकाशित झाले, ‘निग्रोंच्या वर्तमानपत्रांमधून ड्यूबॉईससारख्या भुक्कड लेखकांनी काळ्या वंशाबद्दल फार लिहिले आहे. पण इथे कोणाला जायचे आहे त्या काळ्या काफिल्यात? आमच्या भारतीय जातिव्यवस्थेत जे आर्य (गोरे) नाहीत त्यांना प्रवेशच नाही. आणि इथे (अमेरिकेत) देखील जे निग्रोंमध्ये मिसळतात त्यांच्यावर आम्ही बहिष्कार घालतो.’ (“A Hindu Speaks His Mind About Us,” The Chicago Defender, November 29, 1930, 14.”) असे त्यांनी म्हटले होते. अर्थात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयाने रोमोलांच्या या पत्राच्या आधी सात वर्षे भगत सिंग थिंड यांच्या केसमध्ये आर्यन म्हणजे गोरे हे समीकरण अवैध ठरवले होते.
यापुढे जात रोमोला म्हणाले होते, ‘जर नजीकच्या १०-२० वर्षांत आम्ही स्वतंत्र झालो तर आम्ही देखील आमच्या वाटणीचा आफ्रिका मिळवण्याच्या मागे लागू. कारण तिथल्या रानटी लोकांना तिथल्या संपत्तीचा काही उपयोग नाही.’ न्यूयॉर्कमधले मार्कस गार्वींच्या ‘द निग्रो वर्ल्ड’चे संपादक असलेले मुद्गल आणि शिकागोचे प्राध्यापक राव यांनी रोमोलांवर झाडून टीका केली आणि त्यांच्या म्हणण्याशी असहमती जाहीर केली. माधो सिंग यांनी रोमोलांच्या वतीने सर्व काळ्या लोकांची माफी मागितली. (“One Hindu Speaks,” The Chicago Defender, December 6, 1930, 14.) एक मुस्लीम वाचक रहमान यांनी पण रोमोलांवर टीका करत सांगितलं की, ‘गेल्या १३०० वर्षांमध्ये इस्लामने जगभरातल्या विविध भागांत वंश आणि वर्ण यांतून निर्माण होणारे भेदभाव पूर्णपणे पुसून टाकले आहेत.’ (पान ९०)
‘कलर्ड कॉस्मॉपॉलिटॅनिझम’ ही आधी म्हटल्याप्रमाणे एक गुंतागुंतीची राजनीती होती. भेद उठावदारपणे मांडून भेदभाव नष्ट करणे हे काम केवळ एका समूहातंर्गत होणे शक्य नाही, तर विविध समूहांनी एकत्र येऊन करण्याची ती गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने समतापूर्ण सहजीवन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्हीही पातळ्यांवर एक विश्वासार्ह भूमिका सांभाळावी लागेल. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला हे किती शक्य झाले? याविषयीदेखील या पुस्तकात मांडणी केली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१९४७च्या जानेवारीमध्ये नेहरूंनी भारताच्या अमेरिकेतील प्रतिनिधीला सूचना देऊन ठेवली होती की, आपली निग्रोंच्या लढ्याला पूर्ण सहानुभूती आहे, मात्र अमेरिकन सरकार दुखावेल अशी भूमिका जाहीरपणे घेऊ नका. १९४९ मध्ये नेहरू अमेरिकेत आले तेव्हा त्यांनी कोणत्याही काळ्या नेत्याबरोबर किंवा संघटनांबरोबर अधिकृत बैठक ठरवली नाही. मात्र आफ्रिकन अमेरिकन नेते वॉल्टर व्हाईट यांनी काही अनौपचारिक भेटीगाठी घडवून आणल्या. विजयालक्ष्मी पंडित, राम मनोहर लोहिया यांनी आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या चळवळींना उघड पाठिंबा दिला तरी भारत एक राष्ट्र म्हणून उघडपणे वंशवादविरोधी चळवळींच्या पाठीशी उभे राहिले नाही ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच.
यातूनच आपण उभ्या करू पाहात असलेल्या राष्ट्र नावाच्या रचिताच्या मर्यादा स्पष्ट होतात. तिथे मग गांधी मदतीला येतात. ‘हिंद स्वराज’मध्ये केवळ रंगावरून किंवा धर्मावरून राष्ट्रीयत्त्व ठरवण्याला त्यांनी विरोध केला होता. ब्रिटिश आहे किंवा ख्रिश्चन आहे किंवा गोरा आहे म्हणून कोणी ‘परका’ ठरवता येणार नाही, तसेच या मातीतला आहे म्हणून त्याला ‘देशभक्त’ म्हणता येईलच असे नाही. मानवी सन्मान, करुणा, सत्य, अहिंसा हेच निकष मानवतेच्या अस्तित्वाला पायाभूत असतील असे त्यांनी म्हटले. विश्वमानुषत्वाच्या संकल्पनेकडे वाटचाल करण्याची आज गरज आहे. गांधींची भूमिका आणि मार्ग कायमच मूलगामी राहिले आणि त्यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेमुळे ते जागतिक नेते बनले. त्याचा परिणाम आजही ठिकठिकाणच्या परिवर्तनवादी विचारांमध्ये दिसून येतो.
निको स्लेट यांनी त्यांच्या एका लेखात सांगितले आहे की अरब स्प्रिंग-इजिप्तमधल्या लोकशाही हक्कांच्या चळवळींमध्ये मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्यावरील चित्रमालारूप गोष्टीचे पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात वाचले जात होते आणि प्रेरणादायी ठरले. त्यात किंगनी त्यांच्यावरील गांधींच्या प्रभावाविषयी सांगितले आहे.
गांधी त्यांच्या मृत्यूनंतरही अमेरिकेत तेवढेच प्रेरणादायी राहिले. विशेषतः मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांनी उभ्या केलेल्या अहिंसक लढ्याला गांधींपासून प्रेरणा मिळाली. जुलै १९५९मध्ये पहिली साऊथवाईड इन्स्टिट्यूट ऑफ नॉन व्हायोलंट रेझिस्टन्स टू सेग्रिगेशन (Southwide Institute on Nonviolent Resistance to Segregation) ही परिषद झाली. त्यात फक्त मार्टिन ल्यूथर किंगच नव्हे तर गांधींसोबत काम केलेल्या नेल्सन आणि रिचर्ड ग्रेग यांची भाषणे झाली. त्यात एक ठराव असाही झाला की, “आम्ही जगातील सर्व शोषित आणि दडपलेल्या लोकांसाठी काम करणे हे आमचे ध्येय समजतो. विशेष करून अजूनही पारतंत्र्यात असलेले आफ्रिकेतील लोक आणि भारतातील पूर्वास्पृश्य लोक यांच्यासाठी. आम्ही त्यांना आवाहन करतो की आपल्या सामायिक विश्वलढ्यासाठी अहिंसेच्या तत्त्वाचे पालन करावे.” (पान २२७) गांधींना श्रद्धांजली वाहताना किंगनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला लिहिले की, “आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जर गांधींचे अनुकरण करण्याचे नाकारले, तर आपण स्वतःच स्वतःचा विनाश ओढवून घेऊ. आता हिंसा की अहिंसा असा पर्याय नाहीये तर अहिंसा की नामशेष होणे असा पर्याय आहे.” (पान २३२)
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अमेरिकेतील वंशवाद आजही तीव्र आहे. ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’चे गेल्या दहा वर्षांमधले संघर्ष हे अमेरिकन समाजात रुजलेल्या व्यवस्थात्मक हिंसेविरुद्ध आहेत. आफ्रिकन-अमेरिकन लोक पोलिसांची शिकार का होतात? त्यांचे दारिद्र्य संपत का नाही? त्यांना शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी प्रचंड झगडावे का लागते? याच प्रश्नांबरोबर मूलनिवासी इंडियन लोकांच्या अस्तित्वाचे संघर्षही अमेरिकेच्या लोकशाही समाजव्यवस्थेच्या दाव्यांसमोर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. स्त्रियांवरील हिंसाचार तितकाच हिंस्र आहे. अमेरिकन उद्योगपती एपस्टिनने चालवलेल्या अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या व्यापारात जागतिक नेते सामील होते.
भारतात गेल्या काही वर्षांत मुस्लीम, दलित आणि डाव्या चळवळींवरील वाढलेले दडपण याला समांतर म्हणता येईल. स्त्रियांवरील अत्याचाराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत अमेरिका भारतीय समाजाइतकाच पाशवी आहे. व्यवस्थात्मक हिंसा रुजली की, त्याचे परिणाम समाजातील सर्वांत कमकुवत घटकांवर मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे भारत एक राष्ट्र म्हणून कोणते प्रारूप समोर ठेवेल, हा प्रश्न आज सतत विचारला गेला पाहिजे. कारण सध्याच्या स्वरूपातील ‘राष्ट्रवाद’ नावाचे रसायन मानवी मूल्यांचे अन्वयार्थ कसे विकृत करत जाईल, याचा भरवसा नाही. भीषण विषमता, पर्यावरणीय ऱ्हास, हिंसा, अत्याचार यांचा सामना करायची गरज आहे. तो सामना आपण कोणत्या मूल्यांनिशी करणार आहोत, यावर केवळ एका राष्ट्राचेच नाही तर जगाचेच अस्तित्व पणाला लागले आहे.
..................................................................................................................................................................
वंदना भागवत
onlyvandan@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment