टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - एच वन बी सुधारणा विधेयक (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 01 February 2017
  • विनोदनामा टपल्या एच-वन बी व्हिसा H-1B visa डोनाल्ड ट्रम्प Donald Trump योगी आदित्यनाथ Yogi Adityanath शिवसेना Shiv Sena मनसे Maharashtra Navnirman Sena गिरिराज सिंह Giriraj Singh राणी पद्मावती Rani Padmavati संजय लीला भन्साळी Sanjay Leela Bhansali

१. अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन बी सुधारणा विधेयक अमेरिकी संसदेत सादर करण्यात आले आहे. प्रस्तावित विधेयकात हा व्हिसा असणाऱ्यांचे किमान वेतन १,३०,००० डॉलर्स करण्याची तरतूद आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडून स्वस्त मनुष्यबळाचा पर्याय म्हणून करण्यात येणाऱ्या परदेशी नोकरदारांच्या आयातीला चाप बसणार आहे. याचा मोठा फटका माहिती व तंत्रज्ञानविषयक निर्यातदार असलेल्या देशांना बसणार आहे. यात प्रामुख्याने भारताचा समावेश आहे. या व्हिसासाठीची सध्याची किमान वेतनमर्यादा ६० हजार डॉलर्स इतकी आहे.

अरे देवा, ट्रम्पतात्या आपल्यालाही 'मुसलमान'च समजतात होय! आता कुठे मुसलमानांचं नाक ठेचलं म्हणून नाच सुरू केला होता, तर ट्रम्पतात्यांनी आमच्याच पायाखालचं जाजम खेचलं! आता मॅडिसन स्क्वेअर ओस पडणार की काय?

…………………………………

२.  सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेवर चहुबाजूनंही टीकेची झोड उठत असताना भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे कौतुक केले असून दहशतवाद रोखण्यासाठी आपल्या देशातही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

आपल्या देशाकडे या सात देशांतल्या किंवा अन्य मुस्लीम देशांमधल्या नागरिकांची रीघ लागली आहे, असा शोध यांना योगविद्येनेच लागला असणार. आदित्यनाथ यांच्या भावनेचं वर्णन करण्यासाठी 'डोनाल्डच्या यज्ञसोहळ्यात आदित्यनाथ सुरागुंग' अशी काही स्वदेशी म्हण नसल्यामुळे नाईलाजाने 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना' याच त्यांना सपशेल नापसंत ठरणाऱ्या म्हणीने करावे लागेल.

……………………………

३. कोणतीही अट न ठेवता महापालिका निवडणुकीत युतीचा प्रस्ताव ठेवणाऱ्या मनसेसमोर शिवसेनेने नवा प्रस्ताव ठेवून मनसेला खिंडीत गाठले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवू नये अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मनसेने उमेदवार उभे केले नाही तर ते मराठी माणसाच्या हिताचा विचार करत असल्याचे स्पष्ट होईल, असे सेनेने म्हटले आहे.

'एकही मारा लेकिन सॉलिड मारा' हा एकच डायलॉग पाठ असल्याचा परिणाम. कधीतरी नियती 'इस थप्पड की गूँज जिंदगीभर सुनाई देगी' अशी स्थिती निर्माण करते. बाकी हे दोन कौटुंबिक वतनाप्रमाणे चालणारे पक्ष निवडणुकीत उतरले नाहीत, तर मराठी माणसाची काही खैर नाही वगैरे आत्मश्लाघा आता विनोदीही उरलेली नाही.

…………………………………..

४. संजय लीला भन्साळी निर्मित ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी उडी घेतली आहे. राणी पद्मावती या हिंदू होत्या. त्यामुळेच त्यांचं चुकीचं चित्रण केलं गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच हिंदू देवतांवर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवण्याची हिमत नसते, असंही त्यांनी म्हटलं आहे. जे लोक भारताचा चुकीचा इतिहास दाखवत असतील तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असंही त्यांनी ठणकावलं.

हे गिरीराज सिंह कोण आहेत? केंद्रीय मंत्री, सिनेमा अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ की गुडघ्यात मेंदू संघटनेचे सदस्य? संजय लीला भन्साळींच्या पद्मावतीमध्ये राणी पद्मावतीची बदनामी झाली आहे किंवा चुकीचं चित्रण झालं आहे, हे ठरवण्याचा यांचा अधिकार काय? पद्मिनी ही ऐतिहासिक नव्हे, काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, हे यांच्या गावी नसणार, हे उघडच आहे; पण, नेमंक काय चित्रण झालंय, हे यांना कळलं कसं? मोहंमद पैगंबरांवर सिनेमा काढण्यापासून यांना कोणी अडवलंय? कोणीही अडाणी इसम भाजपकडून निवडणूक लढवू शकतो, तुम्ही एआयएमआयएमकडून लढून दाखवा, असं यांना कोणी म्हणालं तर? 

……………………………………….

५. माथेरानमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदा बांधकामांवर सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बेकायदा बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला. 

हरित लवादाला तात्काळ हटवून माथेरानचा संपूर्ण विकास केला पाहिजे. सगळे रस्ते पक्के केले पाहिजेत. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या पाहिजेत. म्हणजे पर्यटकांना माथेरानमध्ये सर्वदूरपर्यंत पोहोचून निसर्गाची नासाडी करता येईल. स्थानिकांचे उद्योग-व्यवसाय उत्तम प्रकारे चालणं महत्वाचं. माणूस निसर्गापेक्षा मोठा आहे. फार फार तर काय होईल, माथेरान हे हिल स्टेशनच राहणार नाही ना? ते माथेरानकरांचं नशीब!

…………………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......