‘लुडो’ : हा सिनेमा पॉपकॉर्न खाता खाता, घरबसल्या टाईमपास म्हणून बघण्यासारखा नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
सुहास किर्लोस्कर
  • ‘लुडो’चे पोस्टर
  • Mon , 23 November 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा लुड अभिषेक बच्चन Abhishek Bachchan आदित्य रॉय कपूर Aditya Roy Kapur राजकुमार राव Rajkummar Rao पंकज त्रिपाठी Pankaj Tripathi

‘लुडो’ हा दोन किंवा चार खेळाडूंनी खेळावयाचा पट-सोंगट्याचा खेळ. तो नियोजनपूर्वक खेळणं आवश्यक असतं. अनुराग बसू यांनी चार खेळाडूंचा ‘लुडो’ आपल्याला गुंगवून टाकत शिताफीनं दाखवला आहे. चार नायक-नायिका यांच्या चार वेगवेगळ्या कथा एकमेकांत कशा गुंतत जातात आणि एकमेकांवर कुरघोड्या कशा करतात हे दिग्दर्शक या नात्यानं दाखवण्याची अवघड कामगिरी अनुराग बसू यांनी केली आहे.

हा खेळ नेटफ्लिक्सवर बघण्यासाठी आपल्याला खेळ, खेळाचे नियम, त्यातील चाली आणि त्यामधील सवाल-जवाब समजून घ्यायला हवेत. अन्यथा खेळाचे नियम माहीत नसलेल्या प्रेक्षकाला सामना बघताना, शेजारचे काही लोक टाळ्या का वाजवत आहेत असा प्रश्न पडेल. एकानं फासा टाकल्यानंतर काही घरं चाल करून गेल्यावर दुसरा खेळाडू खेळ खेळतो. अशा क्रमानं खेळ खेळला जातो आणि तशाच पद्धतीनं सिनेमा पुढे जातो. अर्थातच हा सिनेमा जणू काही आपणच ‘लुडो’ खेळत आहोत, अशा भावनेतून लक्षपूर्वक बघायला हवा. 

लुडो हा खेळ कसा खेळला जातो, याची माहिती असेल तर या चित्रपटाची गंमत वेगळीच. या खेळात प्रत्येकाकडे पिवळा, लाल, निळा, हिरवा यापैकी एका रंगाच्या चार सोंगट्या असतात. पहिला फासा टाकल्यानंतर ज्याला जास्त गुण मिळतात तो/ती खेळाडू पहिल्यांदा खेळू शकतो/शकते. सर्वांत जास्त म्हणजे सहाचा फासा पडल्याशिवाय तुम्ही खेळण्यास सुरुवात करू शकत नाही. एका खेळाडूच्या दोन सोंगट्या एकाच घरात असल्यास दुसऱ्याचा रस्ता ब्लॉक होतो. दुसऱ्याची सोंगटी असलेल्या घरात तुमची सोंगटी गेली, तर दुसऱ्याची सोंगटी पुन्हा मूळपदावर म्हणजे होममध्ये जाते. जिंकण्यासाठी तुम्हाला विरुद्ध पक्षाची किमान एक सोंगटी मारावी लागते. ज्या खेळाडूच्या चारही सोंगट्या Home Triangleमध्ये पहिल्यांदा जातात, तो खेळाडू जिंकतो. विशेष म्हणजे यानंतर इतर खेळाडू खेळ सुरू ठेवू शकतात. ‘लुडो इज लाईफ, लाईफ इज लुडो!’ इथं प्रत्येकाचा रंग आणि ढंग वेगळा आहे, पण फासे कसेही पडले तरीही आपण बुद्धीचा वापर करून आयुष्यात जान आणू शकतो!  

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

सिनेमाची कथा याच स्वरूपाची आहे. प्रत्येक खेळाडूची वेशभूषा, त्याच्या कारचा रंग, याकडे बारकाईने लक्ष दिल्यास संदर्भ उमजण्यास सुरुवात होते. लाल रंग आहे बटुकेश्वर तिवारीचा (अभिषेक बच्चन), पिवळा रंग ‘कलाकार’ आकाश चौहानचा (आदित्य रॉय कपूर), हिरवा रंग आलोक (राजकुमार राव)चा, निळा रंग राहुल (रोहित सराफ) चा. खेळाच्या पटावर ज्याप्रमाणे सोंगट्या त्याच ‘घरा’मधून इतरांना मागे टाकत टाकत पुढे जातात, तद्वत चित्रपटात काही प्रसंग पुन्हा दिसतात, पण त्याचा संदर्भ वेगळा असतो. तो आपल्याला फोकस – आउट ऑफ फोकसमधून समजतो. अजय शर्मा यांनी एडिटिंगमधून चतुराईनं चार कथांचा असा मेळ घातला आहे की, त्यातले बारकावे समजले तर आपल्याला कोडं सुटल्याचं समाधान मिळतं. खून कोणी केला, आरोप कोणावर आहे, कोणाचा रंग कोणता आहे, ते रंग एकमेकांत कसे मिसळतात, हे चित्रपटातील प्रसंग कट कसे केले आहेत आणि त्याला दुसरा प्रसंग कसा जोडला आहे, असे अनेक गुंते सोडवत सोडवत चित्रपट बघणं हा अनोखा अनुभव आहे.     

अनेक अभिनेत्यांच्या गर्दीमध्ये अभिषेक बच्चन कमीत कमी संवादामधून फार अप्रतिमरीत्या व्यक्त झाला आहे. त्याने ‘युवा’, ‘गुरू’, ‘पा’, ‘सरकार’ अशा चित्रपटांत अभिनयाचे विविध पैलू त्या पात्राच्या मानसिकतेचा विचार करून दाखवले आहेत. त्याचं प्रत्यंतर याही चित्रपटात येत राहतं. छोट्या इनायत वर्माने केलेली मिनीची भूमिका उत्स्फूर्त वाटते. अभिषेक आणि इनायत या दोघांमधील नातेसंबंध कोणत्याही ड्रामाशिवाय प्रभावी झाले आहेत.

पंकज त्रिपाठीचा डॉन अनोखा आहे. राजकुमार रावने स्टायलिश भूमिका त्याच लकबीनं इतक्या शिताफीनं केली आहे की, ‘न्यूटन’सारखे चित्रपट करणारा हाच आहे, यावर विश्वास बसत नाही. सान्या मल्होत्रा, फातिमा शेख, शालिनी वत्स, पर्ली मानी यांनी साकारलेली पात्रं वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि कलाकारांच्या गर्दीतही लक्षात राहतात. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी पार्श्वसंगीत या स्वरूपात येतात, तरीही ती त्रासदायक आहेत. चित्रपटाच्या शेवटी येणारं गाणंही अनावश्यक आहे. या चित्रपटामधील चार रंग संगीतांमधूनही दिसले असते, तर संदर्भ सापडण्याचा ‘लुत्फ’ अजून उत्कटतेनं घेता आला असता! 

‘लाईफ इन मेट्रो’ या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग बसू चित्रपटामधून वेगवेगळे प्रयोग करत असतात. या चित्रपटामध्येही त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन याचा तोल सांभाळत एक वेगळा प्रयोग केला आहे. थोडा लांबलेला हा चित्रपट वेगळा प्रयोग म्हणून अवश्य बघावा. खेळामधील काही अर्थ समजले नसल्यास आपण जसे तोच खेळ पुन्हा खेळून बघतो, तसंच हा चित्रपट पुनश्च बघितल्यास काही गुंते सुटण्यास मदत होईल. OTTवर ते शक्यही आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, हे अनुराग बसू यांनी या सिनेमामधून सिद्ध केलं आहे. आणि प्रेक्षक हुशार असतात असं समजून केलेल्या चित्रपटाचा दर्जा वरचा असतो, हेही. अनुराग बसू यांनी संवादकाची भूमिका केली आहे. त्यांच्याच तोंडी असलेल्या संवादामधून शेवटच्या प्रसंगाचे वेगवेगळे अर्थ ज्याचे त्याने आपापल्या समजुतीप्रमाणे लावावेत. 

वैधानिक इशारा – पॉपकॉर्न खाता खाता, घरबसल्या टाईमपास म्हणून हा सिनेमा बघण्यासारखा नाही. डोकं बाजूला ठेवून कोणताही सिनेमा बघणं हा अदखलपात्र गुन्हा आहे, असं कुणीतरी कधी म्हणून ठेवलंय, असं ऐकिवात आहे!   

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख