प्रत्युत्पन्नमती विरुद्ध पश्चातबुद्धी उर्फ लेस्प्री द लेस्कालिये
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 23 November 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar शब्दांचे वेध प्रत्युत्पन्नमती पश्चातबुद्धी लेस्प्री द लेस्कालिये L'esprit de l'escalier

शब्दांचे वेध : पुष्प पंधरावे

आमच्या शाळेत वर्गातल्या फळ्यावर रोज एक नवा, वेगळा सुविचार लिहिण्याची पद्धत होती. वर्गातल्या प्रत्येकच मुलाला पहिल्या तासात ते काम पाळीपाळीने करावे लागायचे. (ते काम कसे केले जायचे, किती खुशीने केले जायचे, हे सगळे सोडा!) मला त्यातले काही सुविचार अजूनही लक्षात आहेत. एक होता, ‘पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार, यांची किंमत सारखीच!’

या सुविचाराचा मतितार्थ खऱ्या अर्थाने शाळा-कॉलेज संपल्यावर गृहस्थी सुरू झाल्यावर समजला. मूळ विचार तर योग्य वेळी सुचायलाच पाहिजे, पण एखाद्या गोष्टीवरची वैचारिक प्रतिक्रियासुद्धा अनेकदा उत्स्फूर्त अशी असली तर बहार येते, हे अनुभवाने कळू लागले. मात्र आपल्यातले सर्वच जण काही ‘प्रत्युत्पन्नमती’ नसतात. त्यामुळे अनेकदा अशी प्रतिक्रिया उत्स्फूर्त असण्याऐवजी फुरसतीने मनात आलेली असते.

हजरजबाबीपणा हा एक बुद्धिचातुर्याचा भाग आहे. तो सगळ्यांजवळ असतोच, असे नाही. बऱ्याचदा एखाद्या प्रसंगी काय बोलावे, समोरच्याला काय उत्तर द्यावे, हे आपल्या पटकन ध्यानात येत नाही. समोरच्याच्या बोलण्याने आपण एक तर गांगरतो किंवा थातुरमातुर, गुळमुळीत असे काही तरी बोलून आपण वेळ मारून नेतो. वादविवाद होतात, तेव्हा तर या कलेत माहीर असणारे लोक अनेकदा बाजी मारून नेतात. आपल्या अमोघ वक्तृत्वासोबतच आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या विन्स्टन चर्चिलचे नाव आजही या बाबतीत घेतले जाते.

न्यायालयांमध्ये, विधिमंडळांमध्ये, विद्वतसभांमध्ये हजरजबाबीपणाला फार महत्त्व आहे. अशा ठिकाणी तोच वक्ता चमकतो, जो स्वतःच्या विचारांना तर अस्खलित शब्दांत सादर करतोच, पण त्याचसोबत जो विरोधी वक्त्यांच्या वाक्बाणांना लीलया झेलून त्यांच्या मुद्द्यांचाही तत्क्षणी त्यांच्याच भाषेत  मुकाबला करतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

उत्तराला ताबडतोब, एक क्षणही न जाऊ देता तशाच किंवा अधिक प्रभावी शब्दांत प्रत्युत्तर देणे, या क्रियेला ‘retort’, ‘comeback’, ‘repartee’ असेही ओळखले जाते. आपण याला ‘हजरजबाबीपणा’ म्हणतो. या चपखल प्रत्युत्तरात चातुर्यासोबतच किंचित विनोद, उपरोध, टोमणा हेदेखील असते. तुमची कुरापत काढणारा त्यामुळे लगेच गारद झाला पाहिजे, एवढी त्या प्रत्युत्तरात ताकद असायला हवी.

बेसी ब्रॅडक नावाच्या एका महिला खासदाराने एकदा चर्चिलच्या अती दारू पिण्यावरून त्याच्यासमोरच त्याला चारचौघांत नावं ठेवली. ‘तू झिंगला आहेस’, असं ती म्हणाली. तेव्हा हे म्हातारबुवा तिला म्हणाले, ‘My dear, I am drunk, and you are ugly; but tomorrow I shall be sober, and you will still be ugly.’

अत्र्यांचेही असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या त्यांच्या घोषणेतल्या ‘झालाच’मधल्या ‘च’वरून यशवंतराव चव्हाणांनी अत्र्यांना कोपरखळी मारली असता, ‘झालाच’मधला ‘च’ हा ‘चव्हाण’मधल्या ‘च’ इतकाच महत्त्वाचा आहे, असं अत्र्यांनी त्यांना कसं समजावून सांगितलं होतं, हाही किस्सा प्रसिद्ध आहे.

सर्वसाधारणपणे हे असे शाब्दिक हल्ले ‘अ‌ॅड होमिनम’ (Ad hominem) म्हणजे व्यक्तीविरुद्ध असतात. विरोधकाच्या विचारांचा बौद्धिक, तात्त्विक आणि सभ्य पद्धतीने मुकाबला करण्याऐवजी त्यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली जाते. एकदा पिलू मोदी किंवा टी. टी. कृष्णमाचारी यापैकी कोणी तरी एकानं फिरोझ गांधी यांना ‘अरे, हा तर नेहरूचा लाडका कुत्रा (lapdog) आहे’, असं हेटाळणीच्या स्वरात संबोधलं होतं. त्यावर फिरोझ गांधी लगेच म्हणाले, ‘मी ‘लॅपडॉग’ आहे ना, ठीक आहे. आणि तुम्ही स्वतःला ‘लोकशाहीचा आदर्शस्तंभ’ (pillar of the nation) समजता. एखादा कुत्रा खांबा/पिलर दिसल्यावर जे काय करतो, अगदी तसंच मी आता तुमच्यासोबत करणार आहे.’ आणि त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी खरोखरच त्यांच्या त्या विरोधकाला आपल्या वाक्चातुर्याने चारी मुंड्या चित केलं होतं.

या सर्वांत instant reaction महत्त्वाची आहे. ताबडतोब, त्वरीत, क्षणाचाही विलंब न लावता समोरच्याच्या वाक्यावर आपली प्रतिक्रिया (तीही अचूक आणि परिणामकारक) व्यक्त करता येणं ही खरी ‘प्रत्युत्पन्नमती’!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हे असं बोलणं नाही जमलं तर अगदी फार काही बिघडतं असं नाही, पण आपल्या मनाला एक चुटपूट, एक हळहळ उगीचच लागून राहते. आपण त्यावर विचार करत राहतो. मग ती वेळ निघून गेल्यावर काही काळानं, काही तासांनी, काही दिवसांनी समोरच्याच्या त्या शब्दांना आपण कसं उत्तर द्यायला हवं होतं, हे आपल्या ध्यानी येतं. समोरच्याच्या युक्तिवादाला आपण जर असं उत्तर त्या दिवशी दिलं असतं, हे जर आपल्याला आधी सुचलं असतं, तर किती छान झालं असतं, अशी खंत मग मनाला राहून राहून छळत राहते. पण याचा तेव्हा काही उपयोग नसतो, कारण ती वेळ केव्हाच निघून गेली असते.

मला वाटतं, अगदी चर्चिल काय किंवा आचार्य अत्रे काय, थोड्याफार फरकानं आपल्या सर्वांनाच हा असा वेळेवर मती स्तंभित होण्याचा अनुभव कधी ना कधी तरी आलेला असतो. (तुम्ही हे अर्थात नाकारू शकता, बरं!)

मी जेव्हा शब्दांचा अभ्यास करू लागलो, तेव्हा ‘ऐन वेळी मती गुंग होण्याची, निरुत्तर होण्याची’ ही जी मानसिक अवस्था असते, तिच्यासाठी मला एक खूप छान शब्द सापडला, ‘जिन्यातले शहाणपण’ किंवा ‘L'esprit de l'escalier’ (लेस्प्री द लेस्कालिये). ही मूळ फ्रेंच भाषेतली एक संज्ञा असून इंग्रजीत ती जशीच्या तशीच वापरतात. या फ्रेंच शब्दांचा अर्थ होतो- ‘जिन्यातलं शहाणपण’, म्हणजेच ‘staircase wit’. (काही लोक याला ‘एस्कलेटर विट’ असंही म्हणतात, पण हे चूक आहे. ‘स्टेअरकेस विट’ हाच योग्य शब्द आहे!)

‘मेरियम वेब्स्टर’ शब्दकोशानुसार ‘L'esprit de l'escalier’ म्हणजे - A witty remark thought of too late, on the way home; the clever comment you wish you had delivered. वेळ निघून गेल्यानंतर सुचलेले शहाणपण. बिनकामाचं, निरुपयोगी. Hindsight wit or afterwit, afterthought. म्हणजेच ‘पश्चातबुद्धी’…

.................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘उबुंटू’ आणि ‘डाडिडी’ : अफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन आदिवासी समाजाने इंग्रजीसह जगातल्या सर्व भाषांना दिलेले अनोखे, सुंदर आणि समर्पक शब्द!

..................................................................................................................................................................

एखाद्या सभागृहात चारचौघांच्या समोर कोणीतरी तुम्हाला काही तरी म्हणतो. त्या वेळी त्याला काय उत्तर द्यावं हे तुम्हाला सुचत नाही आणि तुम्ही काही न बोलता थोड्या वेळानं बाहेर पडता. जिना उतरून खाली जाताना अगदी शेवटच्या पायरीवर असताना तुम्ही त्याला त्या वेळी, मगाशी काय उत्तर द्यायला हवं होतं, हे तुम्हाला अचानक सुचतं. एक परफेक्ट, माकुल, नेमकं उत्तर. पण आता तुम्ही काही पुन्हा तो जिना चढून वर जाऊन त्या माणसाला ते ऐकवणार नसता. कारण ती वेळ निघून गेलेली असते. जिन्यावर सुचलेल्या शहाणपणाची ही अशी प्रतिमा या शब्दांतून व्यक्त होते!

‘लेस्प्री द लेस्कालिये’ या शब्दाचं जनकत्व प्रसिद्ध फ्रेंच तत्त्वज्ञ आणि लेखक दनि दिदरो (Denis Diderot - १७१३-८४) याच्याकडे जातं. रंगभूमी आणि नाट्यकलेवर त्याने लिहिलेल्या (पण त्याच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेल्या) ‘Paradoxe sur le Comédien’ (Paradox of the Actor) या निबंधात हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला गेला होता. तो म्हणतो - L’homme sensible, comme moi, tout entier à ce qu’on lui objecte, perd la tête, et ne se retrouve qu’au bas de l’escalier. म्हणजे, (माझ्यासारख्या) एखाद्या भावनाप्रधान माणसाला खटकेल, मनाला लागेल, असं जर काही कोणी अचानक बोललं, तर त्या क्षणी तिथं काय उत्तर द्यावं, हे त्या भावनाप्रधान माणसाला कळत नाही (मेंदू बधीर होतो) आणि नंतर घरी जाताना जिना उतरून खाली उतरताना अगदी शेवटच्या पायरीवर त्याचं डोकं ताळ्यावर येतं, त्याला प्रत्युत्तर सुचतं.

(टीप - युरोपात १८व्या शतकात बांधलेल्या भव्य प्रासादांमध्ये, हवेल्यांमध्ये दिवाणखाना, drawing room, reception room या तळमजल्यावर नसून वरच्या एखाद्या मजल्यावर (बहुधा पहिल्या) असत. झाक नक(अ) (Jacques Necker) या राजकीय नेत्याच्या घरी एकदा रात्रभोजनाला दिदरोला बोलावलं होतं. तिथं त्याच्याविरुद्ध कोणीतरी असं काही तरी वक्तव्य केलं की, तो निःशब्द झाला. यावर काय बोलावं हे त्याला कळेना. मग घरी जाताना जिना उतरताना त्याला ते उत्तर सुचलं, पण तोवर उशीर झाला होता. ‘Paradox of the Actor’मध्ये ‘l’esprit de l’escalier’ हा शब्दप्रयोग करताना त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग होता.)

मात्र इंग्लंड अमेरिकेत जुन्या पद्धतींच्या घरांत शयनकक्ष वरच्या मजल्यावर असतात. त्यामुळे जिना चढून वर ‘शयनकक्षात जाताना सुचलेलं शहाणपण’ असाही याचा अर्थ काही लोक काढतात. अमेरिकन लेखिका मेरी एलिझाबेथ विल्सन शेरवुड (Mary Elizabeth Wilson Sherwood - १८२६-१९०३) म्हणते - (that) belated wit which the French call “l’esprit de l’escalier”—the wit of the stair-case—the good things which we remember that we might have said as we go upstairs to bed after the party is over.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इंग्रजीत ‘स्पिरिट’ या शब्दाचे अनेक अर्थ होतात. त्यातला एक अर्थ भूत, प्रेतात्मा असा होतो. ‘L'esprit de l'escalier’ या शब्दात फ्रेंच लोकांना जे ‘esprit’ (स्पिरिट) अभिप्रेत आहे, ते हे इंग्रजी भूत नाही, हे आवर्जून ध्यानात घेतलं पाहिजे. हे फ्रेंच ‘esprit’ म्हणजे बुद्धिचातुर्य, wit. इंग्रजीत हा शब्दप्रयोग जसाच्या तसा वापरात आणण्यापूर्वी इंग्रजांमधल्या मंदबुद्धींना हा फरक आधी समजावून सांगायला हवा, अशी सूचना फाऊलर बंधूंनी आपल्या ‘The King’s English’ (आवृत्ती दुसरी) या जगविख्यात ग्रंथात १९०६ सालीच करून ठेवली होती, हे विशेष. इंग्लंडमध्ये ‘L'esprit de l'escalier’ हा शब्दप्रयोग १८४२मध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला, अशी नोंद आहे. या उलट अमेरिकेत रॅल्फ वॅल्डो इमर्सन याने ‘English Traits’ या आपल्या पुस्तकात १८५६ साली हा शब्दप्रयोग पहिल्यांदा केला होता.

यिडीश भाषेतल्या ‘trepverter’ आणि जर्मन भाषेतल्या ‘Treppenwitz’ या शब्दांतूनदेखील हीच संकल्पना व्यक्त होते. मी मराठी आहे, त्यामुळे मी आपल्या मराठी ‘पश्चातबुद्धी’वरच खुश आहे!

तुमच्या जवळही जर असे तुमच्या हजरजबाबीपणाचे किंवा पश्चातबुद्धीचे अनुभव असतील, आणि ते सांगावेसे वाटत असतील, तर जरूर शेअर करा...

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......