जर हिंदी सिनेमासृष्टीत ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ नसतं तर...
दिवाळी २०२० - जर...तर
अमोल उदगीरकर 
  • यु टीव्ही स्पॉटबॉय
  • Sat , 21 November 2020
  • दिवाळी २०२० जर...तर हिंदी सिनेमा यू टीव्ही स्पॉटबॉय UTV Spotboy आमिर खान Aamir Khan पिपली लाईव्ह Peepli Live दिल चाहता है Dil Chahta Hai लगान Lagaan रॉनी स्क्रूवाला Ronnie Screwvala सिद्धार्थ रॉय कपूर Siddharth Roy Kapur द वॉल्ट डिस्ने कंपनी The Walt Disney Company फँटम फिल्म्स Phantom Films

‘छोटी फिल्म’ म्हणजे नेमकं काय, यासंदर्भातला एक रोचक किस्सा आहे. किस्सा आहे तो ट्रेंड सेटर आमिर खानचा. त्याने ‘पिपली लाईव्ह’ नावाच्या सिनेमाची निर्मिती केली होती. त्याचं बजेट मर्यादित होतं. सिनेमात कुणीही मोठा स्टार नव्हता. सिनेमा बनून तयार झाला होता. त्याचं प्रमोशन कसं करायचं, यासाठी आमिरच्या मार्केटिंगशी संबंधित लोकांसोबत मीटिंग्ज चालू होत्या. त्या मिटिंगमध्ये मार्केटिंग टीममधले लोक सतत ‘‘पिपली लाईव्ह’ ही छोटी फिल्म आहे’, असा उल्लेख करत होते. आमिरने दोन-तीनदा याकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा एकदा तसाच उल्लेख होताच त्याने बोलणाऱ्याला थांबवलं आणि त्या टीमची पद्धतशीर झाडाझडती घेतली. तो म्हणाला, “आपण फिल्मचं मार्केटिंग करत आहोत, फ्रिजचं नाही. छोटी फिल्म आणि मोठी फिल्म म्हणजे काय असतं? एखाद्या सिनेमाचं छोटं किंवा मोठं असणं त्याच्या बजेटवर नाही, तर सिनेमाच्या कंटेंटच्या श्रीमंतीवर ठरतं असतं. निर्माता म्हणून माझ्यासाठी ‘पिपली लाईव्ह’ ही जगातली सगळ्यात मोठी फिल्म आहे.”

आमिरच्या त्या आक्रमक भाषणानंतर मिटिंगचा नूरच बदलला आणि सिनेमाच्या आक्रमक मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या रणनीती आखण्यात आल्या. एकही मोठा स्टार नसणारी ‘पिपली लाईव्ह’ रिलीज झाली आणि तिकीटखिडकीवर यशस्वीही झाली. आमिर खान हा ‘मार्केटिंग जिनियस’ आहे, यावर अजून एकदा शिक्कोमार्तब करणारा हा प्रसंग! हा किस्सा बरंच काही सांगून जातो. आपल्या फिल्म इंडस्ट्रीच्या आणि प्रेक्षकांच्या मानसिकतेवर पण.

भारतीय जनमानसाला असणारं भव्यदिव्यतेचं आकर्षण अनादी अनंत आहे. तेच आपल्या सिनेमाच्या आवडीतही उतरलं आहे. भारतीय प्रेक्षकाला भव्य सेट्स, भव्य वाद्यवृंद वापरून तयार केलेलं संगीत, सिनेमात दाखवली जाणारी विदेशी लोकेशन्स, ‘लार्जर दॅन लाईफ’ अभिनेते या सगळ्या गोष्टींचं फार अप्रूप आहे.

अर्थात प्रत्येक देशातल्या, समाजातल्या लोकांच्या आवडीनिवडीचा एक साचा असतो. भारतीय प्रेक्षक त्याला अपवाद नाही. पण भारतीय प्रेक्षकाने आपलं झुकतं माप बिग बजेट, मोठ्या स्टार्सच्या सिनेमांच्या पदरात टाकलं असल्याने छोट्या बजेटच्या, काही वेगळे प्रयोग करू पाहणाऱ्या सिनेमांवर कायम अन्याय झाला आहे.

सत्यजित रे आणि रित्विक घटक या जागतिक दर्जाच्या दिग्दर्शकांचे सिनेमे असोत की, सत्तरच्या दशकात उदयाला आलेली समांतर सिनेमाची चळवळ असो किंवा सध्याच्या पिढीतल्या चैतन्य ताम्हाणे आणि आदिश कौल यांचे सिनेमे असोत, भारतीय प्रेक्षक या प्रयोगशील कलाकारांना आणि त्यांच्या सिनेमाला तिकीट खिडकीवर भरभरून प्रतिसाद देत नाही, हे कटू वास्तव आहे.  अर्थात भारतीय प्रेक्षक वेगळे प्रयोग करू पाहणाऱ्या छोट्या बजेटच्या सिनेमांपेक्षा मनोरंजन करणाऱ्या, गल्लाभरू सिनेमाला जास्त प्राधान्य का देतो, याची एक कारणमीमांसा आहे, पण विस्तारभयामुळे आणि लेखाचा मुख्य विषय तो नसल्याने त्याबद्दल इथं लिहिणं योग्य नाही.

हा लेख अशाच एका ‘छोट्या फिल्म्स’ला जनमान्यता मिळवून देणाऱ्या एका प्रॉडक्शन हाऊसबद्दल आहे – ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

२००१ हे वर्ष बॉलिवुडला वेगळं वळण देणारं वर्ष ठरलं. बॉलिवुडचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात या वर्षाचा विशेष उल्लेख केला जाईल. २००१ साली प्रदर्शित झालेले ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ हे चित्रपट याला मुख्यत्वे कारणीभूत आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये आमिर खान मुख्य भूमिकांमध्ये होता, हा योगायोग नाही! या दोन चित्रपटांनंतर ‘बुद्धिमान लोकांचा नायक’ अशी आमिरची प्रतिमा स्थिरावू लागली. ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’चं महत्त्व फक्त तिकीट खिडकीच्या यशापुरतंच मर्यादित नाही.

खरं तर त्या वर्षीचा सगळ्यात मेगा हिट चित्रपट या दोघांपैकी नव्हता, तर तो सनी देओलचा ‘गदर’ होता. ‘दिल चाहता है’ला सरासरी यशच मिळालं होतं. पण ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ने बॉलिवुड सिनेमाचं आणि पर्यायाने भारतीय सिनेमाचं व्याकरण पूर्णपणे बदलून टाकलं. दोन्ही चित्रपटांच्या कथा या अतिशय वेगळ्या विषयांवर आधारित होत्या. असे विषय- जे भारतीय सिनेमात यापूर्वी कधीही हाताळले गेले नव्हते.

क्रिकेट मॅचच्या माध्यमातून भारतीयांच्या तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांवर मात करण्याची मुलखावेगळी गोष्ट दाखवणाऱ्या ‘लगान’ने भारतीय चित्रपटांच्या स्टोरी टेलिंगमध्ये क्रांती घडवली. सिनेमा कसा असावा आणि कसा असू नये, यासंदर्भातले सगळे ‘मिथ्स’ ‘लगान’ने मोडीत काढले.

एक तर ‘लगान’च्या मुख्य पात्रांची भाषा हिंदी नव्हती, तर अवधी होती. दुसरं म्हणजे ‘स्पोर्टस ड्रामा’ हा जॉनर भारतात फारसा चालत नाही, असा आतापर्यंतचा इतिहास होता. तिसरं म्हणजे आशुतोष गोवारीकरने कलात्मक सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा यांची ‘लगान’मध्ये जी सांगड घातली होती, ती एक अभूतपूर्व घटना होती. समांतर सिनेमा आणि मेनस्ट्रीम सिनेमा यांच्यातल्या भिंती पाडून टाकणारी ही घटना.

सुरुवात, मध्य आणि शेवट या सरधोपट कथनशैलीला ‘दिल चाहता है’ने मोडीत काढलं. चित्रपट ‘भारी’, ‘कडक’ असायलाच हवा असं नाही, तो ‘कूल’पण असू शकतो, याची जाणीव पहिल्यांदाच झाली. नंतर ‘दिल चाहता है’ कसा तितकासा क्रांतिकारी सिनेमा नाही, यावर बरंच वाचनात आलं. काही लोकांनी त्याची केलेली क्रूर चिरफाडही ऐकली, पण ‘दिल चाहता है’ फरहान अख्तरच्या ‘ताज्या’ दिग्दर्शकीय दृष्टिकोनामुळे कायम आवडता चित्रपट राहील.

या वर्षी ‘दिल चाहता है’च्या प्रदर्शनाला पंधरा वर्षं पूर्ण झाली, तरीपण हा सिनेमा लोकांच्या लक्षात आहे. फरहानच्या या सिनेमातली पात्रं कुठलाही गिल्ट न बाळगता श्रीमंत आहेत. त्यांना सर्वसामान्य माणसासारख्या रोजच्या विवंचना नाहीत. एकूणच आपल्या संस्कृतीत आणि त्यामुळे सिनेमात दिसणारा श्रीमंतीबद्दलचा अपराधगंड ‘दिल चाहता है’मध्ये औषधालाही दिसत नाही. त्याच्या पुढच्या अनेक चित्रपटांमध्येही हा पॅटर्न दिसून येतो.

‘दिल चाहता है’मधलं फॅशन स्टेटमेंट हे आतापर्यंत कुठल्याच बॉलिवुड किंवा भारतीय चित्रपटांमध्ये दिसलं नव्हतं. त्यातल्या पात्रांचे कपडे, त्यांची केशभूषा, त्यांची आभूषणं हा एक असा भन्नाट प्रकार होता, जो प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच बघितला नव्हता.

..................................................................................................................................................................

मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला या वर्षी १० वर्षं पूर्ण झाली आणि देशात राजकीय स्थिरताही आली होती, हाही एक योगायोग. पण ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ने बॉलिवूडमध्ये सुरू केलेली बदलांची प्रक्रिया पुढे कशी जाणार, हा कळीचा प्रश्न होता. ही प्रक्रिया पुढं नेण्यासाठी लागणारे, प्रेक्षकांच्या नवीन पिढीच्या बदलत्या आकांक्षांना, बदलत्या आवडीनिवडीला जोखणारे लेखक, निर्माते, दिग्दर्शक आपल्याकडे आहेत का, याबद्दल पण प्रश्नचिन्हच होतं. या सगळ्या काहीशा निराशादायक वातावरणात एंट्री झाली ती ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची.

..................................................................................................................................................................

‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’चं भारतीय चित्रपटांना अजून एक मोठं योगदान म्हणजे त्यांनी भारतीय चित्रपटांमध्ये ‘लिप सिंक साऊंड’ आणला. यापूर्वी शूटिंग झाल्यानंतर नटांना आपल्या संवादाचं डबिंग करावं लागायचं. या प्रक्रियेत अभिनेत्यांची उत्स्फूर्तता हरवून जायची. आणि वेळेचा अपव्यय व्हायचा, तो वेगळाच. ‘लिप सिंक साऊंड’ने हे सगळं साफ बदलून टाकलं.

याच वर्षी पाकिस्तानवर आग पाखडणारा अनिल शर्माचा ‘गदर’ आणि करण जोहरचा भारतीय कुटुंबव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थांना सोडू नका, असा संदेश देणारा ‘कभी खुशी, कभी गम’पण आले. भरपूर चाललेही. पण हे वर्ष ओळखलं जाईल ते ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’मुळेच.

मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला या वर्षी १० वर्षं पूर्ण झाली आणि देशात राजकीय स्थिरताही आली होती, हाही एक योगायोग. पण ‘दिल चाहता है’ आणि ‘लगान’ने बॉलिवूडमध्ये सुरू केलेली बदलांची प्रक्रिया पुढे कशी जाणार, हा कळीचा प्रश्न होता.

ही प्रक्रिया पुढं नेण्यासाठी लागणारे, प्रेक्षकांच्या नवीन पिढीच्या बदलत्या आकांक्षांना, बदलत्या आवडीनिवडीला जोखणारे लेखक, निर्माते, दिग्दर्शक आपल्याकडे आहेत का, याबद्दल पण प्रश्नचिन्हच होतं.

त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे रामगोपाल वर्मा त्या वेळेस फुल फॉर्मात होता. रामूने अनेक नवीन लेखक-तंत्रज्ञाना संधी द्यायला सुरुवात केली होती. पण एकटा रामू या फिल्म इंडस्ट्रीमध्ये साचलेल्या स्थितिस्थापकवादी व्यवस्थारूपी डोंगराला किती हलवू शकणार होता? बॉलिवुडची भाकरी फिरवण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या संस्थेनं (पक्षी : निर्मितिगृहाने) नवीन दमाच्या लेखक-दिग्दर्शकांच्या मागे उभं राहणं नितांत गरजेचं होतं. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार होतं? पैसा हाच धर्म असणाऱ्या या धंद्यात आर्थिकदृष्ट्या आतबट्ट्याच्या ठरू शकणाऱ्या  या व्यवहारात शिरायची कुणाची हिंमत होणार होती?

या सगळ्या काहीशा निराशादायक वातावरणात एंट्री झाली ती ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची. पडद्यावर खलनायकांचं पारडं जड असतं. त्याच्या शस्त्रधारी गुंडांनी सज्जन लोकांना चारी बाजूनी घेरलेलं असतं, तेव्हा दरवाजा तोडून आपला नायक धमाकेदार एंट्री करतो. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची एंट्री काहीशी अशीच होती .

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

यु टीव्हीचा संस्थापक रॉनी स्क्रूवाला हा अवलिया माणूस. त्याने १९९०मध्ये स्थापन केलेल्या ‘यु टीव्ही ग्रुप’ने भारतीय मनोरंजन क्षेत्रात क्रांती केली. रॉनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केबल टीव्ही ऑपरेटर म्हणून केली होती हे विशेष. ‘शांती’सारखी मेगा सिरियल तयार केली. भारतीय टेलिव्हिजनवरचा तो त्या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. चित्रपटनिर्मितीमध्ये भारतात स्टुडिओ कल्चरचं पुनरुज्जीवन करणारी जी मंडळी आहेत, त्यात रॉनीच नाव महत्त्वाचं आहे.

‘यु टीव्ही मोशन पिक्चर्स’ या आपल्या चित्रपट निर्मितिगृहाद्वारे ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘लाईफ इन अ मेट्रो’ अशा अनेक भारतीय चित्रपटांना वेगळं वळण देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती त्याने केली. छोट्या आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ या स्वतंत्र स्टुडिओची निर्मिती करण्याची कल्पना रॉनी आणि त्याचा सहकारी सिद्धार्थ रॉय कपूरची.

२००७ साली ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची स्थापना होऊन त्याच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा खरं तर कुणालाच या नवीन खेळाडूकडून काहीही अपेक्षा नव्हत्या. कारण भारतात कायमच व्यावसायिक सिनेमाने समांतर सिनेमाला एका हद्दीच्या पलीकडे कधीच मोठं होऊ दिलं नव्हतं. समांतर सिनेमा फक्त फिल्म फेस्टिवल्समध्ये आणि एका मर्यादित वर्तुळात बघितला जाणारा सिनेमा, असंच सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटायचं.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ म्हणजे समांतर सिनेमाला अजून थोडं ग्लोरिफाईड करून प्रेझेंट करणार असंच बहुतेकांना वाटतं होतं. मोठं नाव असलेले दिग्दर्शक, जबरदस्त ओपनिंग मिळवून देणारे सुपरस्टार, पब्लिकला आवडणार संगीत, एखादं दिलखेचक आयटम साँग टाकलं की, झाली पूर्ण हिट फिल्मची रेसिपी, असं सरळसाधं समीकरण होतं. अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा, सुरुवातीच्या काळातला मधुर भांडारकर असे काही एकाकी योद्धे आपल्या मर्यादित कुवतीनुसार या साचेबद्ध सिस्टिमविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करत होते. पण साधे ओरखडे उमटवण्याशिवाय अजून काही होत नव्हतं.

या अशा वातावरणात आघाडीच्या एका चित्रपटगृहाने वेगळे प्रयोग करण्याची इच्छा असणाऱ्या लेखक-दिग्दर्शकांच्या मागे उभं राहणं ही फार महत्त्वाची घटना होती. पण एकूणच ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’बद्दल इंडस्ट्रीमध्ये एकाच वेळेस उत्सूकता आणि संशयाचं वातावरण होतं हे नक्की.

..................................................................................................................................................................

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या बहुतेक चित्रपटांनी बाजारपेठेत नवीन ट्रेंड आणला होता. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एका टिनेजरचा स्वतःच्या बापाशीच होणारा संघर्ष दाखवणाऱ्या विक्रमादित्य मोटवानेच्या ‘उडान’ने दाखवणाऱ्या भारतातल्या ‘कमिंग ऑफ एज’ सिनेमाला अनेक नवीन आयाम दिले. अनुराग कश्यपच्या एकविसाव्या शतकातल्या ‘देवदास’वरचा टेक असणारा ‘देव डी’ चक्क म्युझिकल होता. हा सिनेमा जितका अनुराग कश्यप आणि अभय देओलचा होता, तितकाच संगीतकार अमित त्रिवेदीचाही होता. ‘देव डी’मधल्या पारो आणि चंद्रमुखी या त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा हजार हिश्शांनी वेगळ्या होत्या. मुख्य म्हणजे ‘देव डी’चा शेवट ‘देवदास’च्या शेवटापेक्षा ३६० अंशात वेगळा होता.

..................................................................................................................................................................

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’चा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता राजकुमार गुप्ता या नवख्या दिग्दर्शकाचा ‘आमिर’. एक तरुण मुस्लीम (राजीव खंडेलवाल) विदेशातून भारतात आपलं उच्च शिक्षण पूर्ण करतो आणि मुस्लीम दहशतवाद्यांच्या हातचं खेळणं कसं बनतो आणि शेवटी तो युवक दहशतवाद्यांचा डाव त्यांच्यावरच कसा उलटवतो, याची गोष्ट या सिनेमात सांगितली आहे.

अवघ्या दीड तासाचा हा थ्रिलर. पण शेवटी थ्रिलरच्या पलीकडे जाऊन अनेक सामाजिक-राजकीय गोष्टींवर भाष्य करतो. केवळ दिग्दर्शक राजकुमार गुप्ताचाच हा पहिला चित्रपट नव्हता, तर राजीव खंडेलवालचाही हा पहिलाच सिनेमा. राजीव हा टेलिव्हिजनवर मोठा स्टार असला तरी त्याचा हा पहिलाच सिनेमा. त्याचबरोबर अजून दोन लोकांनी या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी आणि गीतकार अमिताभ भट्टाचार्य ही ती दोन माणसं.

‘आमिर’ रामगोपाल वर्माच्या ‘सरकार राज’सारख्या मोठ्या फिल्मसोबत प्रदर्शित झाला आणि त्याने चांगलं यशही मिळवलं. या सिनेमातून पदार्पण केलेली राजकुमार गुप्ता, अमित त्रिवेदी आणि अमिताभ भट्टाचार्य ही आजच्या बॉलिवुडची त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली आघाडीची नावं आहेत.  राजीव खंडेलवाल अजूनही धडपड करत असला तरी तो एक चांगला अभिनेता आहे, याबाबत दुमत नाही.

‘आमिर’ सिनेमाची टॅगलाईन होती – ‘कौन कहता है आदमी अपनी किस्मत खुद लिखता है?’ पण या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या आउटसाइडर्सनी घराणेशाहीचा बुजबुजाट असणाऱ्या बॉलिवुडमध्ये आपलं नशीब स्वतःच लिहिलं.

पहिल्याच चित्रपटांमधून अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्यावर ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ आता पुढचे प्रोजेक्ट कुठले करते, याबद्दल एक उत्सुकता निर्माण झाली. त्यांचा पुढचा प्रोजेक्ट होता  ‘वेलकम टू सज्जनपूर’. समांतर सिनेमाच्या चळवळीचे नेतृत्व करणारे आणि आता काहीसे अडगळीत पडलेले श्याम बेनेगल यांची ‘वापसी’ या सिनेमाद्वारे झाली.

पुढच्या सात वर्षांत ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने अनेक वेगवेगळे प्रयोग करणारे सिनेमे दिले. ‘देव डी’, ‘उडान’, ‘ओये लक्की लक्की ओये’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘पानसिंग तोमर’, ‘सात खून माफ’, ‘शाहिद’ ही काही उल्लेखनीय नावं.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या बहुतेक चित्रपटांनी बाजारपेठेत नवीन ट्रेंड आणला होता. स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एका टिनेजरचा स्वतःच्या बापाशीच होणारा संघर्ष दाखवणाऱ्या विक्रमादित्य मोटवानेच्या ‘उडान’ने दाखवणाऱ्या भारतातल्या ‘कमिंग ऑफ एज’ सिनेमाला अनेक नवीन आयाम दिले. अनुराग कश्यपच्या एकविसाव्या शतकातल्या ‘देवदास’वरचा टेक असणारा ‘देव डी’ चक्क म्युझिकल होता. हा सिनेमा जितका अनुराग कश्यप आणि अभय देओलचा होता, तितकाच संगीतकार अमित त्रिवेदीचाही होता. ‘देव डी’मधल्या पारो आणि चंद्रमुखी या त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा हजार हिश्शांनी वेगळ्या होत्या. मुख्य म्हणजे ‘देव डी’चा शेवट ‘देवदास’च्या शेवटापेक्षा ३६० अंशात वेगळा होता.

राजकुमार गुप्ताचाच सत्यघटनेवर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ हा सिनेमा पुन्हा पॉवरफुल स्टोरीटेलिंगचं उदाहरण होता. दिबांकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ हा एका चोराची आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अतरंगी माणसांची स्टोरी सांगणारा सिनेमा हा एक अप्रतिम आणि तितकाच अंडररेटेड सिनेमा आहे.

नितीन कक्करच्या ‘फिल्मीस्तान’मध्ये सिनेमा हा भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना जोडणारा एक महत्त्वाचा घटक कसा आहे, हे नर्मविनोदी शैलीत दाखवलं आहे. तिगमांशू धुलियाचा ‘पानसिंग तोमर’ आणि हंसल मेहताचा ‘शाहिद’ हे अस्सल भारतीय मातीमधले बायोपिक्स होते. इरफान खान या अफाट अभिनेत्याला ‘पानसिंग तोमर’ने दुय्यम भूमिका करणाऱ्या अभिनेत्यापासून ते मुख्य अभिनेत्यापर्यंत आणून सोडलं. इरफान खानला मुख्य भूमिकेत घेऊन सिनेमा बनवणं हा एक मोठा जुगार होता, तो ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने खेळला आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्यासमोर आहेतच.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या सिनेमांचं एक ‘टेम्प्लेट’ होतं. सिनेमाचं बजेट अतिशय काटेकोर असायचं. मुळात आपल्याकडच्या अनेक सिनेमांचं बजेट वाढतं, ते सिनेमातल्या ‘स्टार सिस्टिम’मुळे. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या सिनेमात ‘नो वन किल्ड जेसिका’सारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता कधीही मोठे स्टार्स नसायचे. स्टार्सची गलेलठ्ठ मानधन द्यायची गरज नसल्याने सिनेमाचं बजेट अतिशय मर्यादेमध्ये राहायचं. त्यामुळे सिनेमा हिट झाला तर लगेच गुंतवणुकीवर परतावा मिळून जायचा. आणि सिनेमा नाही चालला तर होणार नुकसान मर्यादेत राहायचं.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या सिनेमांचं संगीत हे तरुण प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं असायचं आणि. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या चित्रपटांचे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि गीतकार हे तरुण होते आणि त्यांनी चित्रपटांच्या संगीतामध्ये अनेक वेगळे प्रयोग करून ‘ट्रेंडी’ संगीत बनवलं. भारतीय प्रेक्षकांची आवडनिवड ही एका विशिष्ट साच्यातली असून चित्रपटाचं संगीत ‘मेलोडियस’ असावं, असा एक जो नियम होता, तो या नव्या दमाच्या लोकांनी मोडीत काढला.

‘यू टीव्ही स्पॉटबॉय’च्या जवळपास प्रत्येक चित्रपटाचं संगीत तरुण पिढीनं उचलून धरलं. टेलिव्हिजनवरच्या अनेक लोकप्रिय चेहऱ्यांना ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने सिनेमात संधी दिली. टेलिव्हिजनवरच्या कामामुळे या अभिनेत्यांना जी एक लोकप्रियता मिळाली होती, तिचा फायदा सिनेमाला व्हायचा. या अभिनेत्यांनाही मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळायची. अशी दोन्ही पक्षांसाठी ही ‘विन विन सिच्युएशन’ होती!

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची एक खासीयत म्हणजे सिनेमासाठी जितकं बजेट असायचं, जवळपास तितकंच बजेट सिनेमाच्या मार्केटिंगसाठी आणि प्रमोशनसाठी असायचं. आक्रमक मार्केटिंगचं महत्त्व ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या टीमच्या पुरेपूर लक्षात आलं होतं. नवीनच उदयाला येणाऱ्या सोशल मीडियाचा वापर टीमने सिनेमाच्या प्रमोशनसाठी केला. यापूर्वीचे समांतर किंवा इंडी सिनेमे हे कधी यायचे आणि कधी जायचे, हे मार्केटिंगअभावी कळायचं पण नाही. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने ही परिस्थिती बदलली. ‘यु टीव्ही मोशन पिक्चर्स’ची भक्कम वितरण व्यवस्था होती, त्याचा फायदा ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ला व्हायचा. सिनेमा बनवणं जितकं अवघड असतं, तितकंच त्याला प्रदर्शित करणं अवघड असतं. पण सिनेमांमध्ये मोठे स्टार नसताना पण ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या सिनेमाला देशभरात थिएटर्स मिळायची. फिल्म इंडस्ट्रीमधल्या असंख्य आउटसाइडर लोकांच्या, मग ते पडद्यावरचे असो वा पडद्याबाहेरचे कामाला थिएटर रिलीजच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचं पुण्य ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या खात्यात जमा आहे. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’चं हे टेम्प्लेट नंतर वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्या अनेक प्रॉडक्शन हाऊसनी वापरलं. पण खऱ्या अर्थानं पायंडा पाडण्याचं श्रेय ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’लाच द्यावं लागेल.

पण सगळं सुरळीत चालू असतानाच सिनेमात जसा एकदम कॉन्फ्लिक्ट येतो, तसा तो इथं पण आला. एका मुलाखतीमध्ये रॉनी स्क्रूवाला म्हणाला होता, ‘कुठलाही नवीन बिझनेस सुरू करण्यापूर्वीच मी माझी ‘एक्झिट पॉलिसी’ तयार करत असतो.’ ‘यू टीव्ही मोठा ब्रँड झाल्यावर ‘द वॉल्ट डिस्ने कंपनी’ने जेव्हा टेकओव्हर करण्याची तयारी दाखवली, तेव्हा हा भिडू घसघशीत मोबदला घेऊन लगेच तिथून बाहेर पडला. रॉनी बाहेर पडताच ‘यु टीव्ही मोशन पिक्चर्स’ची आणि पर्यायाने ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची रयाच गेली. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’मध्ये काम करणाऱ्या मंडळींना आता मोठी तारकादळे खुणावू लागली होती. रॉनी स्क्रूवाला ‘यु टीव्ही’मधून बाहेर पडताच इतरही अनेक लोक तिथून बाहेर पडले. 

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’चा कर्ताधर्ता विकास बहेल, त्यांची क्रिएटिव्ह हेड ऋचा पाठक ही सगळी मंडळी तिथून बाहेर पडली. रयाच गेली. पण जे रॉनीला जमलं, ते डिस्नेला जमलं नाही. त्यांना भारतीय मार्केटचा अंदाजच आला नाही. चार वर्षांतच त्यांची धूळधाण उडाली.

‘यु टीव्ही मुव्हीज’ने नेहमीच बाजारपेठेत ट्रेंड तयार केले. ‘स्वदेस’, ‘खोसला का घोसला’, ‘रंग दे बसंती’, ‘आमिर’, ‘उडान’, ‘देव डी’ असे भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळे वळण देणारे चित्रपट त्यांनी तयार केले. डिस्ने इंडिया मात्र ‘स्टार पॉवर’वर नको तितकी अवलंबून राहिली. ‘कंटेंट’कडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष त्यांना भोवलं. २०१७ला प्रदर्शित झालेला रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. सध्या डिस्ने इंडिया फक्त त्यांच्या हॉलिवुड चित्रपटांच्या भारतामधल्या वितरणावर लक्ष देत आहेत.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ला टाळं लागणं हे फक्त एका स्टुडिओचं बंद होणं नाहीये, तो एका लिगसीचा शेवट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’चं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल.

..................................................................................................................................................................

इतिहासात आणि वर्तमानकाळात पण अमुक गोष्ट झाली नसती, तर काय झालं असतं, यावर खल करणं हा मानवी कल्पनाशक्तीचा आवडता खेळ आहे. एडवर्ड विल्सन हे प्रख्यात पुलित्झर विजेते प्राध्यापक आणि लेखक आहेत. त्यांच्या एका शोधनिबंधात त्यांनी असं म्हटलं आहे की, जगाला वेगळं वळण देणाऱ्या शक्ती या ऐतिहासिक नसतात तर जैविक असतात. याचं अतिशय योग्य उदाहरण म्हणजे पृथ्वीवर एकेकाळी निरंकुश वावर असणारे डायनॉसॉर हे अवाढव्य प्राणी धुमकेतूची धडक बसून नामशेष झाले. ही घटना घडली नसती तर मानवाची उत्क्रांती कशी झाली असती?

..................................................................................................................................................................

आता लेखाचा शेवटचा आणि महत्त्वाचा भाग. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ नसतं तर आजची हिंदी फिल्म इंडस्ट्री कशी असती? कुठलंही प्रॉडक्शन हाऊस हे फक्त काही लोक काम करायला जमतात, ती जागा नसते. प्रत्येक प्रॉडक्शन हाऊसची एक संस्कृती असते. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने मोठ्या स्टार्सची बटिक बनलेल्या बॉलिवुडमध्ये एक नवीन संस्कृती आणली. फिल्म म्हणजे फक्त त्यात काम करणारे अभिनेते-अभिनेत्री असं नसतं. फिल्मची स्क्रिप्ट, फिल्मचा विषय हाच सगळ्यात मोठा नायक ही जाणीव ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने मुख्य धारेत आणली. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ नसतं तर ही जाणीव रुजायला अजून कित्येक वर्ष लागली असती, किंबहुना कुणाला माहीत, ही जाणीव कधीही रुजली पण नसती.

आज आयुष्मान खुराणा, राजकुमार राव आणि कित्येक आउटसाइडर अभिनेते बॉलिवुडवर राज्य करत आहेत. खान, कपूर, कुमार या नावांच्या पलीकडे पण नायक असू शकतात, याची प्रेक्षकांना जाणीव करून देण्याचं काम पण ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’चं. आज इंडस्ट्रीमध्ये अनेक असे ‘न नायक’ कार्यरत आहेत, ज्यांना त्यांच्या आयुष्यातली पहिली संधी ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’च्या सिनेमांमधून मिळाली आहे.

‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ नसतं तर आज आयुष्मान खुराणा आणि राजकुमार राव कुठे असते? १५-२० परिवारांची बॉलिवुडवर वर्षानुवर्षं असणारी मक्तेदारी यू टीव्ही स्पॉटबॉयने या परिवारांच्या पलीकडे नेली. एक प्रकारे फिल्ममेकिंगचं ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने केलेलं हे विकेंद्रीकरण बॉलिवुडच्या पथ्यावर पडलं.

विकास बहेलने नंतर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि मधू मंटेना यांच्यासोबत ‘फँटम फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची लेगसी नंतर ‘फँटम फिल्म्स’ने पुढे चालू ठेवली. त्यांनी ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने वापरलेलंच निर्मिती टेम्प्लेट वापरलं. हेच टेम्प्लेट आनंद राय, रजत कपूर, मनीष मुंद्रा यांच्यासारख्या काही निर्मात्यांनी वापरलं. ‘content driven cinema’ला यामुळे सुगीचे दिवस आले. काही तरी नवं सांगू पाहणाऱ्या आणि पाटी कोरी असणाऱ्या लेखक दिग्दर्शकांसमोर आता अनेक प्रॉडक्शन हाऊसचे पर्याय उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ‘फँटम फिल्म्स’ पण फुटली. आता त्याच्या चारही भागीदारांनी स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ने जी एक गुणवत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया चालू केली आहे, त्याचा आता गुणाकार सुरू झाला आहे. कमी बजेटच्या पण हाय कॉन्सेप्ट फिल्म्स हे सध्याचं चलनी नाणं आहे. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ नसतं तर हे कदाचित कधीच झालं नसतं.

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्येही एका ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ची नितांत गरज आहे, अशी भावना जाता जाता मांडावीशी वाटते. बघुयात कुणी हे शिवधनुष्य उचलतंय का?

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

इतिहासात आणि वर्तमानकाळात पण अमुक गोष्ट झाली नसती, तर काय झालं असतं, यावर खल करणं हा मानवी कल्पनाशक्तीचा आवडता खेळ आहे. एडवर्ड विल्सन हे प्रख्यात पुलित्झर विजेते प्राध्यापक आणि लेखक आहेत. त्यांच्या एका शोधनिबंधात त्यांनी असं म्हटलं आहे की, जगाला वेगळं वळण देणाऱ्या शक्ती या ऐतिहासिक नसतात तर जैविक असतात. याचं अतिशय योग्य उदाहरण म्हणजे पृथ्वीवर एकेकाळी निरंकुश वावर असणारे डायनॉसॉर हे अवाढव्य प्राणी धुमकेतूची धडक बसून नामशेष झाले. ही घटना घडली नसती तर मानवाची उत्क्रांती कशी झाली असती? आपला सगळ्यांचा पूर्वज असणारा आदिमानव या अमानुष ताकदवान प्राण्यांसमोर तग धरू शकला असता का, हा आपल्या सध्याच्या अस्तित्वाच्या अनुषंगाने असणारा लाख मोलाचा प्रश्न आहे.

बॉलिवुडमध्ये घडलेली ही क्रांती अशीच हाडामांसाच्या, गुणदोषांचा आपल्यासारखाच सेट असणाऱ्या काही माणसांनी केली. ‘यु टीव्ही स्पॉटबॉय’ हे त्या क्रांतीचं दृश्य स्वरूप. ती झाली नसती तर काय झालं असतं, याची कल्पना करून पण अस्वस्थ व्हायला होतं…

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......