इ. स. १५१६ मध्ये केनान हा प्रांत ओटोमान साम्राज्याच्या हाती गेला. ओटोमानचा सम्राट/ सुलतान सलीम पहिला याने मामलुक राजवटीचा खात्मा करून हा भाग आपल्या साम्राज्याला जोडला. १५२० मध्ये तो मेल्यावर त्याचा तरणाताठा आणि तडफदार मुलगा गादीवर आला. हाच तो प्रसिद्ध की कुप्रसिद्ध सुलतान सुलेमान. हा कडवा मुस्लीम! त्याची राज्यकारभारावरची पकडही चांगलीच मजबूत होती. १५६६ मध्ये सुलेमान मरण पावला. त्यानंतर आलेले सुलतान सलीम दुसरा (राजवट १५६६-७२), त्याचा मुलगा सुलतान मुराद (राजवट १५७२-७४) आणि त्याचा मुलगा सुलतान महमद तिसरा (राजवट १५७४-९५) हे तितके कडवे तसेच कार्यक्षम नव्हते. शिवाय ते बरेचसे उदारमतवादी होते. त्यामुळे त्यांच्या राजवटीत अन्य धर्मियांवरचे अन्याय-अत्याचारही कमी होऊ लागले, तसे हळूहळू यहुदी परत आपल्या प्राणप्रिय केनानच्या पुण्यभूमीत येऊन राहू लागले. १६व्या शतकापासून तुर्की ओट्टोमान सत्ता दुबळी होत चालली होती. इंग्लंड, फ्रान्स, प्रशिया आदी युरोपीय सत्ता केव्हापासून तिच्या नाकाभोवती सूत धरून बसल्या होत्या की, कधी ही शेवटचा आचका देते आणि तिच्या भूभागाचे आपण लचके तोडतो, पण ही तुर्की राजसत्ता तशी बरीच चिवट निघाली. ती अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत तग धरून होती आणि त्याबरोबर आजची अरब राष्ट्र (पूर्वी हे सगळे रानटी, रासवट आणि टोळ्यात विभागले गेलेले होते.) आणि इस्रायलच्या सर्व भूभागावर नियंत्रण कायम ठेवून होती. त्यामुळे पहिल्या महायुद्धात सपशेल हार खाईपर्यंत आणि नंतर केमाल पाशा आतातुर्क याने खलिफापद आणि तुर्की साम्राज्य खालसा करून वेगळा आणि आकाराने बराच छोटा तुर्कस्तान निर्माण करेपर्यंत, तिथं राहणाऱ्या यहुद्यांना कसलंही भवितव्य नव्हतं.
१९व्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपात ओद्योगिक क्रांतीमुळे, विज्ञान, तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे वातावरण हळूहळू निवळू लागले होते. यहुदीही त्यांच्या बंदिस्त घेटोतून बाहेर पडून शिक्षण, व्यापार, उद्योग, संशोधन यात नशीब अजमाऊ लागले होते. अशात रशियाचा झार अलेक्झांडर हा यहुद्यांच्या बाबतीत भलताच उदार निघाला आणि त्याने यहुद्यांना व्यापार उद्योग, वित्त पुरवठा, संशोधन आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षणक्षेत्राची द्वारे खुली केली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. यहुदी आपल्यातल्या एकी आणि निरलसपणे काम करत राहण्याच्या हातोटीमुळे सधन, संपन्न आणि प्रसिद्ध बनले. मान्यवर संशोधक, विचारवंत, लेखक, कलावंतांची एक पिढीच त्यातून निर्माण झाली. मागे इजिप्शियन राजे जसे मत्सरग्रस्त झाले, तसेच युरोप, रशियातले इतर गैरयहुदी लोक आता परत यहुद्यांचा मत्सर करू लागले. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी.
यातून निर्माण झालेल्या यहुदी विरोधी लाटेला Anti-semitism असं नाव आहे. अर्नेस्ट रेनार हा फ्रेंच विचारवंत- मानववंशशास्त्रज्ञ या विचारधारेचा उद्गाता. पण त्याने आपल्या विचारधारेला Anti-semitism हे नाव दिलं नव्हतं. मोरीत्झ स्ताईनश्नायडर या जर्मन यहुदी विचारवंताने रेनारचा विरोध करताना Anti-semitism हा शब्द प्रथम वापरला आणि तो अगदी या विचारधारेला फिट्ट बसला. तिथून पुढे रेनारच्या विचारधारेला तेच नाव पडलं. (नोवाचे तीन पुत्र शेम, हाम आणि जाफेत, त्यांच्यापासून सेमिटिक, हेमेटिक आणि जाफेटिक असे तीन गट पडले, जे हिब्रू, अरबी, आर्मेनियन अशा भाषा बोलत. हळूहळू हेमेटिक आणि जाफेटिक ही नावं मागे पडली आणि फक्त सेमेटिक नाव उरलं. हे सेमिटिक लोक आर्यकुलीन लॅटिन, जर्मन आदी भाषा बोलणाऱ्या आर्यवंशीयापेक्षा हीन आणि म्हणून गुलाम होण्याच्या लायकीचे असं समजलं जाई.- हा मुख्यत्वे जर्मनीत प्रचलीत असलेला विचार होता. पण तो हळूहळू इतर राष्ट्र जी पूर्वी रोमन साम्राज्याचा भाग होती, तिथं पसरला आणि रोमच्या पतनाला {अशास्त्रीय आणि अनैतिहासिकदृष्ट्या} या सेमेटिक लोकांना जबाबदार धरलं जाऊ लागलं.)
Anti-semitism चळवळीचं एक पोस्टर
ही साधारण १८६० च्या सुमाराची गोष्ट. अशात १८८१ साली झार अलेक्झांडरची हत्या झाली आणि त्यानंतर आलेला झार निकोलस याने परत यहुदी विरोधी भावनेला खतपाणी घातलं. तिथं यहुद्यांच्या वंशसंहाराचं सत्रच सुरू झालं. हा वंश संहार ‘पोग्रोम’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. याचा परिणाम अपरिहार्य होता. आजचा इस्रायल जो तेव्हा पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जात होता, तिथं साधारण २५००० यहुदी राहत होते. तेथे युरोप आणि रशियातून निर्वासित यहुद्यांचा ओघ वाहू लागला. या निर्वासित यहुद्यांच्या लाटेला ‘आलीया’ असं संबोधन आहे. म्हणजे झायोनिस्ट यहुद्यांच्या स्थलांतराची लाट. १८८५ ते १९१४ या काळात अशा अनेक लाटा आल्या आणि ३० वर्षांच्या छोट्या कालावधीत त्यांची लोकसंख्या वाढून ती जवळपास १ लाख झाली. याचा दबाव तिथल्या मुस्लीम रहिवाशांवर पडत होता. पण फक्त तेवढीच बाब त्यांच्याकरता चिंतेची नव्हती. हे निर्वासित यहुदी पूर्वीप्रमाणे गरीब, दिनदुबळे नव्हते. ते बहुसंख्येनं झायोनिस्ट होते. आधुनिक इस्रायलच्या स्थापनेत या झायोनिझमचा वाटा सिंहाचा आहे.
झायोनिझम
शतकानुशतकाच्या परवडीपासून आणि मत्सर छळ यातून सुटका हवी असेल तर जगभरातल्या सर्व यहुद्यांनी एकत्र येऊन स्वत:चं स्वतंत्र राष्ट्र उभं करणं याला पर्याय नाही. हा झायोनिस्ट विचारधारेचा पाया आहे. ही विचारधारा चूक कि बरोबर याचा विचार आपण आता करत बसण्यात अर्थ नाही. एकतर १९व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्र संकल्पना युरोपात बऱ्यापैकी दृढमूल झाली होती आणि जवळपास सगळीच युरोपीय राष्ट्र नवराष्ट्रवादाच्या नशेनं झिंगून गेलेली होती. त्यातून यहुद्यांमधून नव्याने तयार झालेले विचारवंत बुद्धिवादी सुटणं शक्य नव्हतं. शिवाय इस्रायल या आपल्या पौराणिक ऐतिहासिक पुण्याभूची त्यांची शतकानुशतकी जुनी आस होतीच. त्यालाच या नवराष्ट्रवादाची चुरचुरीत फोडणी दिली आणि झायोनिझमचं खमंग रसायन तयार झालं. ते सर्व यहुद्यांमध्ये जोमानं लोकप्रिय झालं. जगभरात पसरलेल्या, अनेक शतकांपासून एकमेकांच्या संपर्कात नसलेल्या, भाषा, पोशाख, चालीरीती, खाणंपिणं यात प्रचंड अंतर पडलेल्या सर्व यहुद्यांना एकत्र आणायला या झायोनिझमची मांडणी केली गेली.
ही संकल्पना १८६२ पासून हळूहळू उत्क्रान्त होत गेली. मोझेस हेस, लिओ पिन्स्कर, थीओदोर हर्झल अशा अनेक विचारवंतांनी वेळोवेळी त्यात सुधारणा करून ती आपापल्या परीने यहुदी समाजात प्रसिद्ध केली. हब्बत झीओन या संस्थेनं ती उचलून धरल्यानं ती झायोनिस्ट चळवळ म्हणून प्रसिद्ध झाली. Anti-semitismचं पश्चिम युरोपातले प्राबल्य आणि त्यापायी आल्फ्रेड द्रेफूस या फ्रेंच लष्करी अधिकाऱ्यावर झालेला अन्याय यामुळे यहुद्यांमध्ये झायोनिस्त चळवळ लोकप्रिय होणे अपरिहार्य होते. (संदर्भ - The Man on Devil's Island : Alfred Dreyfus and the Affair that Divided France - Ruth Harris) यहुद्यांवर ते केवळ यहुदी आहेत म्हणून कसा धडधडीत अन्याय होत असे, याची ही ज्वलंत उदाहरणं होती.
१९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपलं आणि ओट्टोमान साम्राज्य एकदाचं पंचत्वात विलीन पावलं. ४०० वर्षानंतर पॅलेस्टाईनचा भाग प्रथमच इंग्रजांच्या अंमलाखाली आला आणि यहुद्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तत्कालीन परराष्ट्रमंत्री आर्थर बाल्फोर यांच्यापुढे झायोनिस्ट यहुद्यांनी आपली स्वतंत्र इस्रायलची मागणी ठेवली. इतर युरोपीय राष्ट्राप्रमाणेच इंग्रजानाही ही यहुद्यांची ब्याद देशातून जाईल तर बरं असंच वाटत होतं, पण त्यासाठी ते अरबांना दुखवायला तयार नव्हते. अजून तेल सापडलं नसलं तरी सुवेझ कालव्यामुळे इंग्रजांना व्यापार उदिम निर्धोक राहावा, तसंच पूर्वेकडच्या आपल्या वसाहतींशी संपर्क करणं सुलभ व्हावं म्हणून या भागात शांतता हवी होती. त्यामुळे त्यांनी यहुद्यांना दोन पर्याय दिले. एक तर आफ्रिकेतला युगांडाचा काही भाग घ्या किंवा सायनाई हा इजिप्तच्या अखत्यारीतला पश्चिमेचा वाळवंटी भाग घ्या. (हे दोन्ही भूभाग काही इंग्रजांच्या मालकीचे नव्हते, पण हे कावेबाज युरोपियन लोक असेच.) झायोनिस्ट चळवळीची सगळी वाटचाल त्यांच्या पुण्यभू इस्रायलच्या पायावर उभी असल्याने त्यांनी हे दोन्ही पर्याय नाकारले. झायोनिस्ट चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे इंग्लंडमध्येदेखील यहुदी लोक संघटित होऊ लागले होते, त्यांच्यात नवजागृती येऊ लागली होती. हे इंग्लंडला परवडणारं नव्हतं. त्यामुळे त्यांना काहीतरी करणं भाग होतं. त्यांनी पॅलेस्टाईनच्या भूभागाची फाळणी करण्याचा प्रस्ताव मांडला. तो त्यांच्या संसदेत मंजूर ही करून घेतला (जसा काही हा त्यांचाच भूभाग.) त्यांच्या या कृत्यामुळे अरब जगतात संतापाची लाट उसळली, तर यहुद्यांमध्ये आनंदाची.
आता गंमत बघा, झायोनिस्टांनी भावनेला आवाहन करून यहुदी जनमानसात स्थान मिळवलं, त्यांना गैर यहुद्यांकडून झालेल्या विरोधानं ते स्थान अजूनच पक्क झालं, पण जेव्हा प्रत्यक्षात यहुदी आपल्या पुराणातल्या पुण्याभूमीकडे जाऊ लागले, तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला. ही काही सुजलाम सुफलाम धरती नव्हती. ती होती मरुभूमी- वाळवंट. तिथं आयुष्य सोपं नव्हतं. त्यामुळे तिथून काही लोक अमेरिकेत जाऊ लागले. त्यामुळे अमेरिकेतही त्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. अमेरिकेची द्वारं तेव्हा जगाला नुकतीच उघडली होती. अमेरिका महासत्ता बनण्याच्या वाटेवर होता. १८८१ मध्ये जेव्हा पहिली आलीया सुरू झाली तेव्हा पॅलेस्टाइनमध्ये याहुद्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या चार टक्के होते, ते झपाट्याने वाढून १९३९ साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा ते ३० टक्के झालेलं होतं. यावरून किती झपाट्यानं यहुदी तिथं आले, ते आपण समजू शकतो. अर्थात यामुळे अरबी राष्ट्रात संताप धुमसू लागला होता, पण इंग्रज तिथं पक्के पाय रोवून असल्याने अरबांना फार काही करता येत नव्हतं. याच सुमारास तिथं तेल मिळू लागल्याने अर्थात साऱ्या विकसित जगाचंच लक्ष तिकडे गेलं. यहुदी भरपूर संख्येनं असले तरी निर्वासित होते. आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर तर या प्रदेशाला तेलामुळे साहजिक महत्त्व आलं. अरबांना चुचकारून तेल उत्खननाचे ठेके मिळवण्यासाठी आता इंग्रजांना आपलं धोरण बदलणं भाग पडलं. त्यांनी यहुद्यांच्या तिकडे येण्याच्या संख्येवर मर्यादा घातली. इकडे युरोपातली राष्ट्रं नाझी जर्मनी पुढे धडाधड कोसळून पडत होती आणि त्या त्या राष्ट्रांमध्ये असलेले यहुदी जर्मनीच्या भक्ष्यस्थानी. लवकरच खाडी पलीकडचा इंग्लंड हा एकाच देश उरला जो अजून जर्मनीशी लढत होता आणि एकंदरीत १९४०-४१ मध्ये त्याची अवस्था फार चांगली नव्हती. अशात त्यांनी युरोपातून पॅलेस्टाइन मध्ये येणाऱ्या यहुद्यांच्या संख्येवर मर्यादा घातली. सगळ्यांना दूर अमेरिकेत जाणं शक्य नव्हतं. असे लक्षावधी दुर्दैवी यहुदी लोक नाझी जर्मनांच्या कचाट्यात सापडले. या गदारोळात जवळपास ६० लाख यहुदी जर्मनीच्या फक्त छळछावण्यांत सापडून मारले गेले. नाझी जर्मनी जसा याचा दोषी आहे, तसाच काही भार इंग्लंडलाही उचलावा लागणार (आणि काही अरबांना...)
डेव्हिड बेन गुरियन आणि इस्रायलचा राष्ट्र ध्वज
नाझी लोक यहुद्यांचे काय करतात हे पोलंडमध्ये जवळून पाहिलेला आणि जीव मुठीत घेऊन तिथून वेळीच पळून आलेला एक तरुण डेव्हिड बेन गुरियन हे सगळे पाहून अस्वस्थ होत होता. तेलासाठी इंग्रजांनी अरबांची मनधरणी करायला सुरुवात केल्यापासून अरबांचं मनोधैर्य वाढीला लागलं होतं. त्यांनी आता निर्वासित याहुद्यांच्या वस्त्यांवर हल्ले, जाळपोळ लुटालूट सुरू केली. युरोपातून पळून आलेल्या यहुद्यांनी भरलेली जहाजं इंग्रज बंदरात अडवत. त्यातील लोकांना उतरू देत नसत. पण हे अरब त्यावर हल्ला करत, बरं जहाज खोल समुद्रात नेऊन उभी करावी तर युद्ध सुरू होतं. जहाज रसातळाला जायची भीती होती. अशात आपण फक्त गप्प बसून भागणार नाही हे गुरीयनने ओळखलं. त्यानं ‘हगाना’ ही यहुदी निर्वासितांची रक्षा करणारी लष्करी संस्था स्थापन केली. हे लोक अरब हल्लेखोरापासून यहुदी वस्त्यांचं रक्षण करणं, बंदरात उभ्या असलेल्या यहुदी निर्वासितांचं रक्षण करणं, त्यांना गुपचूप जहाजावरून काढून सुरक्षित स्थळी पोहोचवणं अशी कामं करत.
सुरुवातीला लहान असलेली ही संस्था पुढे चांगलीच फोफावली. त्यात युरोपातून पळून आलेले आणि तिथे लष्करी प्रशिक्षण घेतलेले लोकही होते. त्यांना पैसा अमेरिकेतले सधन आणि सुरक्षित असलेले यहुदी पुरवत असत. १९१८ साली फक्त पॅलेस्टाईनच्या फाळणीचा प्रस्ताव संसदेत मंजूर करून पुढे २०-२२ वर्षं फक्त चालढकल करत बसलेले इंग्रज, आपली फारशी मदत करणार नाहीत हे गुरियन यांनी ओळखले. अरब मागास असंघटीत होते आणि तसे हगना पुढे कच्चे होते. खरं आव्हान इंग्रजांचं असणार होतं, म्हणून मग त्यांनी हळूहळू आपला मोहरा इंग्रजाकडे वळवायला सुरुवात केली. हगानाचे लोक आता ब्रिटिश लष्करी तळांना लक्ष्य करू लागले. त्यापायी ब्रिटिशांना आपल्या तिथं तैनात करायच्या लष्करी शिबंदीत वाढ करावी लागली. ऐन युद्ध चालू असताना इथं त्यांचं जवळपास १ लाख सैन्य अडकून पडलं होतं. याचा फार मोठा बोजा त्यांच्या तिजोरीवर पडत होता. अखेरीस युद्ध संपलं पण तरीही ब्रिटिशांना इथून सैन्य काही काढून घेता येईना. आता हगाना अधिकच आक्रमक झाली होती. शिवाय दुसरं महायुद्ध संपल्याने अमेरिकेतून शस्त्रास्त्रांची मिळणारी मदत आता निर्धोकपणे त्यांच्या हाती पडू लागली. जर्मनीनं यहुद्यांवर केलेले अत्याचार जगाने बघितल्यामुळे यहुद्यांद्दल सहानुभूतीची लाट उसळली होती. त्यामुळे हगानाचा कठोर उपायांनी बंदोबस्त करणं अवघड जात होतं.
तशात आता पूर्वेकडचे भारत, श्रीलंका, सिंगापूर इथल्या वसाहतींना स्वातंत्र देण्याचंही इंग्रजांनी ठरवलं होतं. अशा वेळी फार उशीर न करता हे जवळपास ३० वर्षं भिजत पडलेलं आणि आताशा भलतच अवजड झालेलं घोंगडं त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या गळ्यात टाकलं. आपला तिथला बाडबिस्तरा गुंडाळला. जगाचा भार आपल्या शिरावर घेऊन जिथं तिथं नाक खुपसण्याची (आणि बऱ्याचदा ते कापून घेण्याची) अनिवार हौस असलेला अमेरिका आता मध्ये आला. त्याने लगेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या भात्यातून पहिला तीर मारला, तो १९१८ पासून फक्त कागदावर असलेला फाळणीचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणण्याचा. तशी औपचारिक घोषणा झाली आणि कार्यवाहीही सुरू झाली. हा पहिलाच तीर अरबी मधमाशांच्या पोळ्यावर लागला आणि अरबी माशा चवताळून उठल्या. अरबी निदर्शकांचा नेता शेख साबरी याने ही फाळणी रद्द करण्याची जोरदार मागणी केली, शिवाय यहुद्यांना हा भूभाग सोडून जाण्याची अन्यथा सगळ्यांना जीवे मारण्याची धमकीच दिली. झालं, यादवी माजायला एवढे कारण पुरेसं होतं, पण यहुदी आपल्याला जड जातायत हे पाहून त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला फाळणी रद्द करा नाहीतर तेल पुरवठा बंद करू म्हणून दम दिला. ही मात्रा लागू पडणार असं दिसू लागलं.
गुरियन यांच्या पोटात गोळा आला. गुरियन हा जात्याच कणखर स्वभावाचा आणि निर्णय घेताना न डगमगणारा नेता होता. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाने फाळणी रद्द करण्याच्या आधीच म्हणजे १४ मी १९४८ रोजी संध्याकाळी इस्रायल या देशाच्या स्थापनेची घोषणा करून टाकली. हा जगाला मोठाच धक्का होता. धक्का ओसरल्यावर अरब गप्प बसणारा नाहीत, ते हल्ला करतील हे गृहीत धरून आधीच त्याची व्यूहरचना आखली जात होती. त्याचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी स्वत:ला नवीन इस्रायल देशाचा पंतप्रधान म्हणून जाहीर करून टाकलं आणि लगेच सूत्रं हाती घेतली. इकडे अमेरिकेत मोठा पेच प्रसंग उभा राहिला. अरबांनी हल्ला केल्यावर काही भलतंसलतं झालं तर अमेरिकेची नाचक्की होणार होती. शिवाय यहुद्यांची त्यांच्या निर्वासितांची सोय ही पहावी लागणार होती. त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नव्हतं. अनेक यहुदी शास्त्रज्ञ, व्यापारी, उद्योजक, कालावंत अमेरिकेत होते आणि त्यांची लॉबी चांगलीच प्रभावशाली होती. तिचा दबाव होताच. त्यामुळे घाईघाईने त्यांनी इस्रायलला मान्यता देऊन टाकली. अमेरिकेने मान्यता दिल्यावर अमेरिकेच्या गोटातले इतर देशही मान्यता देणार हे उघड होतं. पण त्याने काय होणार! अरबांनी आक्रमण केलंच. पश्चिमेकडून इजिप्त तर पूर्वेकडून सौदी अरेबिया, जोर्डन, इराक, लेबनान, सिरिया यांनी संयुक्तपणे आक्रमण केलं. अरबांनी केलेल्या या आक्रमणात ३० हजार सैनिक, १५० च्यावर तोफा, १८० रणगाडे, तर साधारण ५०-६० लढाऊ विमानं सामील झाली होती. इस्रायलकडे होत्या ५ तोफा, रायफल्स आणि काही मशीन गन्स. सैनिक होते २६००० च्या आसपास. या संघर्षात इस्रायलचा निभाव लागणं कठीण होतं. अरबी सैनिक कमी शूर किंवा कमी देशभक्त होते, असं म्हणणं वेडेपणाचं होईल नाही! पण इस्रायलकडे एक फार महत्त्वाची गोष्ट होती, जी अरब राष्ट्राकडे नव्हती... आजही तितकी कार्यक्षम नाही ती म्हणजे प्रभावी गुप्तचर यंत्रणा.
शिन बेत
इस्रायलच्या स्थापनेच्या आधी पासूनच्या काळातली शिन बेत ही गुप्तचर यंत्रणा होती. ब्रिटिशांशी गनिमी युद्ध खेळताना हगानाला महत्त्वाची माहिती पुरवणं, इंग्रज सैनिकांची दिशाभूल करणं, चोरून माणसं, लष्करी साहित्य, रसद इकडून तिकडं पोहोचवणं अशा महत्त्वाच्या कामासाठी हगानामधूनच काही अनुभवी माणसं वेगळी करून शिन बेत स्थापिली होती. शिन बेतने या पहिल्याच युद्धात फार मोलाची कामगिरी पार पडली. सैन्यात घातपाती कारवाया पार पाडणं, संदेशवहन बंद पाडणं किंवा चुकीचे संदेश प्रसारित करून दिशाभूल करणं. अशा कारवाया करून त्यांनी अरबी हल्ला लांबवला, त्याचा प्रभाव कमी केला, शिवाय त्यांच्या महत्त्वाच्या मोहिमांची, हालचालींची खबरबात इस्रायली सैन्याला दिली. त्यांच्या दोन मोठ्या कामगिऱ्या म्हणजे लीनो नावाचं जहाज इटलीहून ८००० रायफली घेऊन जॉर्डनला निघालं होतं. ते भर समुद्रात बुडवलं. पण त्याआधी त्यावरच्या रायफली काढून घेतल्या. इटलीनेच इजिप्तला चार लढाऊ विमानं विकली होती. ती त्यांच्या हाती पडण्याआधीच नष्ट केली. यामुळे अरबी सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाला.तयारी करायला, मदत मिळवायला हवा असलेला महत्वाचा वेळ इस्रायला मिळाला. त्यांनी धनिक अमेरिकन यहुद्यांकडून पैसा गोळा केला. या पैशाच्या आधारावर अधिक शस्त्र सरंजाम विकत घेतला. आता इस्रायलची बचाव सोडून आक्रमक व्हायची पाळी होती. त्यांनी जोरदार हल्ला चढवत संयुक्त अरबी सैन्याला पिटाळून तर लावलंच, पण पुढे जाऊन त्यांच्या प्रदेशावरही हल्ला केला. त्यांच्या या झंझावातापुढे अरब राष्ट्र हबकून गेली. त्यांच्या आक्रमणाचा कणाच मोडला. १६ मे १९४८ ला सुरू झालेलं हे युद्ध २२ जुलै १९४९ला संपलं. तेव्हा पूर्वी पॅलेस्टाइनच्या फाळणीत ५५ टक्के भूभाग मिळालेलं इस्रायल आता ८० टक्के भूमीचं मालक होतं. आज ७० वर्षं होत आली तरी हा भूभाग इस्रायालींनी कधीही सोडला नाही. ते तो सोडणारही नाहीत.
शिन बेत या गुप्तचर संघटनेचं बोधचिन्ह
हिटलर आणि त्याच्या नाझी भस्मासुराने ६० लाख यहुदी छळछावण्यांत मारलं. इस्रायल जेव्हा स्थापन झालं तेव्हा त्याची लोकसंख्या होती जेमतेम आठ लाख जेमतेम. सैन्य संख्या होती ३० हजार. पण त्यांनी किडामुंगीसारखं छळछावणीत प्रतिकार न करता मरण्याऐवजी शत्रूशी प्रतिकार करायचं ठरवलं. पुन्हा कधी ही अशी वेळ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या यहुद्यावर येणार नाही. आम्ही ती येऊ देणार नाही. आम्ही जगाच्या चांगुलपणाच्या आणि न्यायीपणाच्या भरवशावर राहणार नाही, असं गुरियन यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं. आजपर्यंत तरी त्यांनी आणि इस्रायलने आपलं म्हणणं खरं करून दाखवलं आहे.
ज्या अरब राष्ट्रांशी जन्मापासून उभा दावा इस्रायलचा आहे, तिथे गेली सतत ७० वर्षं लोकशाही नांदते आहे. अरब राष्ट्रांचं काय! इस्रायल हे अरबी लांडग्यांच्या घोळक्यात सापडलेलं एक दुर्बळ कोकरू नक्कीच नाही. पण त्यांच्याकरता हा संघर्ष जीवन-मरणाचा, अस्तित्वाचा आहे, हेही आपण विसरून चालणार नाही. ते तर विसरत नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीकडे पाहताना हा पैलू लक्षात घेणं गरजेचं आहे.
संदर्भ : १. Mossad : The Greatest Missions of the Israeli Secret Service- Michael Bar-Zohar, NissimMishal
२. Gideon's Spies : The Secret History of the Mossad (Updated) by Gordon Thomas
३. Israel's Secret Wars : A History of Israel's Intelligence Servicesby Ian Black, Benny Morris
४. Mossad : The Untold Stories of Israel's Most Effective Secret Serviceby Mike Livingston
५. यु- ट्यूब वरील अनेक documentaries
……………………
लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
SACHIN PATIL
Thu , 02 February 2017
I would have been mote happy if u had written what Israelte doing with Palestinians also. They have eroded their legitimacy by doing the same what Nazis did
ADITYA KORDE
Wed , 01 February 2017
बऱ्याच जणांनी इस्रायल आणि मोसाद ह्या लेखमालेतल्या खालील वाक्यावर स्पष्टीकरण मागितले बऱ्याच जणांना नाझी जर्मनांच्या हातून मेलेल्या यहुद्यांच्या बलिदानाचा तो अपमान हि वाटला म्हणून हे स्पष्टीकरण "त्यांनी किडामुंगीसारखं छळछावणीत प्रतिकार न करता मरण्याऐवजी शत्रूशी प्रतिकार करायचं ठरवलं. आपण जेव्हा होलोकॉस्ट चे काही जुने विडीयो यु ट्यूब वर पाहतो तेव्हा शेकडो यहुदी स्त्री-पुरुष, वृद्ध, मुल, अगदी तान्ही बाळ ह्यांना एकत्र करून, विवस्त्र करून गास चेंबर मध्ये ढकलत असलेले किंवा फायरिंग स्क्वाड समोर उभे केले जात असलेले दिसते, आता पुढे काय होणार हे डोळ्यासमोर दिसत असताना त्यांच्या पैकी एकही जण प्रतिकार करायचा साधा प्रयत्नही करत नाही! मरायचेच आहे तर किमान एक दगड, एक लाथ, अगदी एक बुक्की तरी मारू असे एकालाही वाटत नाही? लहानसे मांजराचे पिल्लू आपण जर कोपऱ्यात कोंडले तर ते पळून जायचे सगळे उपाय थकले हे समजून, शेवटचा उपाय म्हणून आपल्यावर हल्ला करते, ते कितीही लहान, अशक्त असले तरीही. ही नैसर्गिक प्रेरणा आहे.पण हे यहुदी! हि तर माणसं होती! मग ही अशी निमूटपणे मृत्युच्या दाढेत का गेली? ते देखील आपल्या म्हाताऱ्या अपंग गलितगात्र आई वडील, बायको, बहीण भाऊ ते अगदी तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन. नाझींच्या अत्याचारापेक्षा त्यांची हि अगतिकता, परिस्थितीपुढे पत्करलेली शरणागती मला कधी कधी जास्त क्रूर वाटते. मला ह्या घटनेचे आश्चर्य वाटते. अनेक प्रकारे मी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला पण समाधानकारक उत्तर अजून तरी नाही मिळाले. Gas chambers ही त्यांना न्हाणी घरच आहेत असे वाटत राहिले , जर्मनांनी व्यवस्था अशी लावली होती कि त्यांना कळूच नये आपण मरायला चाललोय ह्या सारखी स्पष्टीकरण मी हि ऐकली / वाचली आहेत . मला ६० लाख मृताची हि प्रचंड संख्या पाहता ते पटत नाही. हे खरे कि यहुद्यानी अगदीच प्रतिकारही केला नाही असे अजिबात नाही पण ते प्रयत्न फार कमी आणि अगदी अपवादात्मक म्हणावे असे होते. त्यामानाने पराभूत फ्रान्स मधली भूमिगत चळवळ जर पहिली तर कुणाही फ्रेंच माणसाचा उर अभिमानाने भरून येईल असा तो होता ... त्यामुळे ६० लाखांच्या शिरकाणाबद्दल जेव्हढा राग जर्मनाबद्दल किंवा नाझ्यान्बद्दल ज्यूंना वाटतो तसेच जे ६० लाख मेले त्याच्या मृत्युला ते शहादत मानत नाहीत, ते स्वातंत्र्य लढ्यात मेले नाहीत ह्याची जाणिव त्यांना आहे. असो यहुदी नंतर ह्यातून खूप शिकले हा सगळ्यात महत्वाचा भाग. आनि ह्याबद्दल स्वत: याहुद्यानीच अनेक वेळा वरील प्रमाणे विचार व्यक्त केले आहेत. हॅना आरेण्ट ही अशीच एक ज्यू बाई. छळछावणीत काही दिवस काढून तिथून अमेरिकेत पलायन केलेली. पुढे प्राध्यापिका - लेखिका - तत्त्वज्ञ म्हणून मान्यता पावलेली. मोस्साद तर्फे अॅडॉल्फ आइखमन हा नाझी क्रूरकर्मा पकडला गेला नि त्यावर खटला चालवला जाणार असल्याचं तिनं ऐकलं. तेव्हा 'न्यू यॉर्कर'तर्फे त्या खटल्याचं वार्तांकन करण्याची इच्छा तिनं दर्शवली. त्या खटल्यादरम्यान आइशमनला न्याहाळताना तिला इतरांहून निराळं काही जाणवलं. ती इतरांसारखी त्याच्या क्रौर्यानं स्तंभित झाली नाही. त्याच्याबद्दलच्या सूडाच्या भावनेनं पेटून उठली नाही. यातनांच्या आठवणींनी खचून गेली नाही. तिला जाणवलं ते त्याचं क्षुद्र पशुवत अस्तित्व. व्यवस्था नामक पोकळीला शरण जाऊन वाट्टेल ते करायला तयार होणारं. स्वतंत्र विचार करणं हे माणूसपणाचं लक्षणच जर माणसानं सोडून दिलं, तर किती पराकोटीचा सैतानीपणा अस्तित्वात येऊ शकतो, त्याच्या साक्षात्कारानं ती चरकली. पण ती तेवढ्यावर थांबली नाही. ज्यू नेत्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका आणि माणसांनी विचार करायला दिलेला नकार या भांडवलावर हे भयानक हत्याकांड होऊ शकलं. एखाद्या माणसाच्या एखाद्या पक्षाच्या विचारधारेच्या सैतानी मेंदूवर त्याची जबाबदारी ढकलून आपण निर्दोष ठरू शकणार नाही, हे तिनं ठामपणे आणि जाहीरपणे लिहिलं - मांडलं. लोकांच्या संतापाचे स्फोट झेलूनही.असेच विचार Hitler's secret partners- ह्या पुस्तकात james pool हा लेखक मांडतो.अशी अनेक पुस्तक आहेत (३-४ तर माझ्याच संग्रही आहेत) मी वर व्यक्त केले विचार सगळ्यांना पटतील अशी अपेक्षाच नाही पण मी काही थोडे फार वाचन करून ते बनवले आहेत आणि ते अगदीच अपरिवर्तनीय नाहीत.समाधानकारक उत्तर अजून मिळाले नाही ह्याचा अर्थ मग तो काय? कुणी तसे समाधानकारक उत्तर दिल्यास मला माझे मत बदलायला नक्की आवडेल... फक्त विचार व्यक्त करताना , प्रतिवाद करताना तिरकसपणा हेटाळणी कुचेष्टा करू नये अशी अपेक्षा. ---आदित्य
Anand Shinde
Tue , 31 January 2017
Very good article
Chetan Wani
Tue , 31 January 2017
very good article.Thank you very much for such a nice article.Keep providing many more interesting article.
MUNDIP Nanda
Tue , 31 January 2017
very good article.Thank you very much for such a nice article.Keep providing many more interesting article.