अजूनकाही
‘A public library is the most democratic thing in the world’ या डोरिस लेसिंगच्या या शब्दांना युरोपीय समाजानं किती बेमालूम स्वतःत मुरवून घेतलंय! लोकशाही तत्त्वाला श्वासाइतकं मोल देणारा हा समाज कला-साहित्याचीही तितकीच कदर करताना दिसतो. लिखित शब्दांना अतोनात जपणार्या सार्वजनिक ग्रंथालयांची इथं उभी-आडवी पसरलेली वीण हेच तर सांगत राहते...
युरोपमधल्या कुठल्याही गावा-शहरात तुम्ही फिरत असाल तर लहान-मोठं एखादं तरी ग्रंथालय तुमचं लक्ष वेधून घेतंच. निदान कुठल्याशा कोपर्यावर ग्रंथालयाकडचा रस्ता दाखवणारी लहानशी पाटी तरी तुम्हाला ओलांडावी लागतेच.
मुख्य म्हणवली जाणारी एक सेंट्रल लायब्ररी अन तिच्याशी जोडून प्रभागानुसार जागोजागी विखुरलेल्या तिच्या अनेक छोट्या छोट्या शाखा ही इथल्या गावा-शहरांनी जपलेली खासीयत आहे. शब्दांचं वेड असणारा कुणीही मुसाफिर ही ग्रंथालयं पाहिल्या-अनुभवल्याखेरीज क्वचितच परतत असेल.
वस्तू-चित्रांच्या कलादालनाइतकंच हे साहित्याचं दालनही अचंबित करणारं आहे. कातळातून आखीव-रेखीव होत गेलेलं, व्हिक्टोरियन काळाच्या खाणाखुणा जपणारं, गॉथिक शैलीतलं भव्य कमनीय वास्तूशिल्प अशीच या ग्रंथांनी बहरलेल्या बहुतांशी इमारतींची दर्शनी ओळख मनात रुजते. सावकाशीनं ती नजरेत भरून घेत घेत आपली पावलं आत वळतात. आणि समोर असतो पुस्तकांचा पॅलेस.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos
..................................................................................................................................................................
दुनियाभरच्या कुठल्याही कोपर्यातलं कुठलंही ग्रंथालय हे काळाच्या वाहतेपणाशी इमान राखत, इतिहासाचं पुनर्जागरण पुढ्यात ठेवणारं शब्दांचं जादुई बेटच तर असतं! घडत्या, सरकत्या वर्तमानाला संदर्भ पुरवत आतला आवाज ठळक करणारं…ज्ञान-संस्कृतीतल्या संघर्षाचं, निखळ अभिव्यक्तीतल्या कागदी ताकदीचं अमिट प्रतीक. जाणत्या शब्दांच्या सोबतीनं अधिक माणूस बनवणारं.
युद्ध-संहाराचा निष्ठूर विखार पचवलेल्या पश्चिमी समाजानं एकाधिकारशाही धुडकावत लोकशाहीशी आपली नाळ घट्ट करत नेली, तेव्हा साहित्य-कलांची, शब्द-संवादाची, त्यातल्या मुक्त अभिव्यक्तीची अन मुख्य म्हणजे माणूसपणाची अनिवार आस्था आवश्यक मानली. इथं जागोजागी उभा असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांमधून ही आस्था कायम झुळझुळताना दिसते. म्हणूनच केवळ पुस्तकांचा संग्रह या पलीकडे ही ग्रंथालयं बरंच काही असतात. सामान्यांचं रोजचं जगणं सहजसोपं करत त्यांना एकमेकांशी जोडत राहतात...
पुस्तकांच्या देवघेवीसोबत सुरू असणारे रिडिंग, रायटिंग ग्रुप्स, इंग्लिशसहित अन्य परकीय भाषांचे लर्निंग व प्रॅक्टीस ग्रुप्स, बुक तथा फिल्म क्लब, रेफ्युजींसाठीचे लँग्वेज क्लासेस, कम्युटर कोर्सेस, मीट-अप्स अशा कितीतरी उपक्रमांनी ही स्थानिक ग्रंथालयं गजबजून गेलेली असतात. इंटरनेट व कम्प्युटर वापराची मोफत व अमर्यादित सेवा ही गजबज आणखी वाढवत राहते. खेरीज अगदी रांगणार्या बाळांपासून ते शाळकरी मुलांपर्यंत वयानुरूप चालवले जाणारे र्हाईम, स्टोरीटेलिंग सेशन, रिडिंग चॅलेंज सेशन बालदोस्तांना पुस्तकं, गोष्टी, गाण्यांशी जोडून घेत राहतात. शिवाय मुलांची पुस्तकं हवी तर त्यांच्या नावे स्वतंत्र खातं काढावं लागण्याची गोड अटही असते. प्रत्येक ग्रंथालयात या सगळ्या नियमित लगबगीकरता एक कोपरा राखलेला असतोच. अर्थात पुस्तकांसोबतचा एकांत मिळवून देणार्या जागा तिथून काहीशा अंतरावर असतात. दीर्घ मौनाची गंभीर शांतता पांघरलेल्या...
इथं वाचनाची बीजं अशी कोवळ्या वयातच पेरली-रुजवली जातात. वाचनसाहित्याच्या अनंत वाटा मुबलकपणे उपलब्ध करून दिल्या जातात. पुस्तकं, वाचन ही इथं चैन नव्हे तर अपरिहार्यता असते! आणि यात भरीव वाटा उचलतात ती आसपासची स्थानिक ग्रंथालयं. वाचणाऱ्यांना निवांत वाचू देणारी, लिहित्या हातांना लिहू देणारी अन बोलण्याची आस असणाऱ्यांना यथेच्छपणे बोलू देणारी अशी जागा. एक पैदेखील न देता तुमची होऊन जाणारी. वय, वर्ग, वर्ण, भाषा अन संस्कृतीतले अस्मितादर्शी दुभाजक ओलांडत माणसं इथं मिसळत, उसळत राहतात. ज्ञान-माहितीतले अर्क स्वतःत उतरवत राहतात.
कित्येक जण तर पुस्तकांची नव्हे, तर माणसांची सोबत हवी म्हणून लायब्ररीत येतात. गप्पा मारायला, दोस्ती करायला, संवादाची भूक शमवायला, एकटेपण जिरवायला. शिवाय कुठे-कुठे सुरू असलेल्या, होऊ घातलेल्या एकूण एक कार्यक्रमाची, उपक्रमाची, स्पर्धा-योजनांची निश्चित माहितीही इथूनच मिळते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अनेकदा लहानसा ओपन कॅफेही बाजूलाच असतो. गॉसिप-गप्पांची आवर्तनं, येत्या विकेंडच्या भटकंतीचे, होऊ घातलेल्या इव्हेंट्सचे प्लॅन्स आणि दबक्या आवाजातल्या गंभीर चर्चा… सारं काही ऐकत राहतो. शेजारच्या टेबलाशी थरथरत्या हातानं कॉफी घेत बसलेले एकटे आजोबा किंवा एकटी आजी अथवा एखादं थकलेलं जोडपं हमखास असतंच. निव्वळ आसपासचा कोलाहल अनुभवायला आलेलं. चुकून नजरानजर होताच सुरकुत्यांच्या आडून स्नेहाळ स्माईल देणारं. उलट हसून त्या सुरकुत्यांचं कमालीचं ‘आत्मनिर्भर’ असणं मनाशी नोंदलं जातंच मग.
इथं ग्रंथालय हे असं पुस्तकांसकट शाब्दिक-निःशब्द संवादाचा सामाजिक पैस पुरवत राहतात. एकटं राहणार्या, वाटणार्या अथवा परदेशातल्या अनोळखी माहोलात नव्यान रहायला आल्यानं भांबावून गेलेल्या, होमसिक झालेल्या कुणाहीसाठी ही हमखास आश्वस्त करणारी जागा असते. नव्या ओळखी, नव्या मैत्र्या बहुतेकदा इथंच जन्माला येतात. परकं वाटणारं हे गाव-शहर आपलंसं वाटू लागण्याची सुरुवातदेखील अनेकदा इथूनच होते.
डिजिटल क्रांतीतली आक्रमकता अन आर्थिक मंदीतली अनिश्चितता उभ्या जगाला भेडसावत निघालीय. हाय स्ट्रीटवरची ब्रँडेड दुकानं असोत की, गल्लीबोळातली रेस्टॉरंटस, बुकशॉप्स…एकेक करत अनेकांनी आपली शटर्स कायमची खाली ओढण्याला सुरुवात झालीय. निव्वळ ‘पब्लिक सर्व्हिस’ म्हणून रुजलेल्या, केवळ कौन्सिलच्या फंडिंगवर विसंबून असणाऱ्या ग्रंथालयांच्या दारात ही झळ पोहचू लागली.
अखेर जिथंतिथं पसरलेलं स्थानिक ग्रंथालयांचं दाट जाळं काहीसं विरळ करण्याचा प्रयास सुरू झाला आहे. वर्षागणिक अनेक ग्रंथालयांची दारं कायमची बंद होत, रिकामे होत चाललेले कोपरे लोकांना अस्वस्थ करू लागले. पुस्तकं, कार्यक्रम याकरता मुख्य अथवा थोड्या दूरवरच्या ग्रंथालयात डोकावता येणार असतंच की! पण प्रश्न मुळात घराजवळचा ‘लोकशाही अवकाश’ आकसत जाण्याचा आहे, कम्युनिटी स्पेस संपण्याचा आहे. यातूनच लोकांच्या हाडीमासी रुजलेली व्हॉलेंटिअरिंगची (volunterring) जुनीजाणती परंपरा या अस्वस्थेवरचा इलाज बनली. स्थानिकांनी एकत्र येऊन फक्त व्हॉलेंटिअर्सच्या (volunteers)च्या बळावर ग्रंथालयं सुरू ठेवण्याचं ठरवलं आणि कित्येक ग्रंथालयांचे अवकाश कायमचे लुप्त होण्यापासून सावरत गेले. अजूनही सावरतायेत.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
निव्वळ लोकसहभागातून कितीतरी ग्रंथालयं आज चालवली जात आहेत. कौन्सिल फंडिंगला पब्लिक फंडिंगचा पर्याय वापरून. देखभालीपासून ते रोजचं कामकाज सुरू ठेवण्यापर्यंत सगळ्या जबाबदार्या स्थानिक लोक उत्साहानं पार पाडतात. काही ठिकाणी कौन्सिल आणि लोकसहभाग असा मध्यही साधला जातो. काही ग्रंथालयांची कुलपं कौन्सिलच्या निर्णयाला थेट विरोध करत वा चर्चा-दबावातून वाचवली जातात. काहींची दारं ‘सेल्फ सर्व्हिस’ या तत्त्वावर उघडी ठेवली जातात. अनेक चॅरिटीज केवळ ‘सार्वजनिक ग्रंथालय’ या प्रश्नावर काम करतात. अर्थात, हे सारं काही ‘सार्वजनिक ग्रंथालय’ नावाचा लोकशाही ऐवज जिवंत ठेवण्याच्या निश्चयानं केवळ...
आणि अशातच कुठलासा जंतू येतो अन माणसांचं सळसळतं जग क्षुब्ध, मलूल करून टाकतो. सगळंच तर्काच्या पलीकडचं... या जीवावरच्या उलथापालथीत ग्रंथालयं तरी कशी तग धरणार होती! तीही मूक होऊन गेली. ऑनलाईन वाट शोधती झाली. निमूटपणे पुस्तकांना कडीकुलपात बंद करून...
हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. कम्प्युटर, इंटरनेटच्या जगात मिसफिट असणार्या वयोवृद्धांकरता तर केवढा तरी अधिक. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.
मुळात या बंदिस्त दिवसांत ग्रंथालयांची, पुस्तकांची लोकांना फारशी उणीव न जाणवता वाचनातून हा कठीण काळ सुसह्य होत रहावा म्हणून ग्रंथालयांनी ऑनलाईन वाचनसाहित्य मुबलक स्वरूपात उपलब्ध करून दिलं. तसंही अनेक वर्तमानपत्रं, मासिकं, ऑडिओबुक्स एरवीही उपलब्ध होतीच. त्यात कित्येक इ-बुक्स, इ-मॅगेझिन्सची नव्यानं भर घातली गेली. लहानांच्या र्हाईम व स्टोरी सेशनचे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी युट्युब व्हिडिओ बनवले. त्यांच्याकरता खास ऑनलाईन उपक्रम सुरू केले. आणि लोकांच्या असंख्य ऑफलाईन प्रश्नांना ऑनलाईन उत्तरंही लिहिली...
आणखी म्हणजे या कर्मचाऱ्यांनी या अनेकार्थानं व्हल्नरेबल असणार्या लोकांची यादी बनवून फटाफट त्यांना फोन करणं सुरू केलं. बहुतेक ग्रंथालयांतून मोफत दिले जाणारे सॅनिटरी नॅपकिन्स, तसेच कौंसिलकडून पुरवली गेलेली अन्नाची पाकिटंही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दारादारात पोहोचवली. फोनवर त्यांच्या तब्येतीची, आजारपणाची विचारपूस करणं, कोविड संदर्भात माहिती देऊन त्यांच्या शंका मिटवणं, अन मुख्य म्हणजे तासनतास त्यांच्याशी गप्पा मारून दुरूनच सोबतीची खात्री देणं, हे सारं काही हा कर्मचारी वर्ग आपुलकीनं करत राहिला. या अवघड दिवसांत मनोबल वाढवत त्यांचं एकटेपण सुसह्य करत राहिला. ही थकलेली मनंही आठवड्यातून येणार्या या कॉल्सची आससून वाट पहात असायची. सततचा संवाद अनेकांमध्ये भावनिक ओलही जागवून गेला. ते मग केवळ ‘वेल्फेअर कॉल्स’ न राहता खर्याखुर्या काळजीपोटी केले जाणारे कॉल्स बनले.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘इप्सविच लायब्ररी’नं तर माणुसपणाची एक निराळीच वाट जागी केली. १०२ वर्षांच्या आजीबाईं नेहमीच्या फोनवरच्या बातचितीमध्ये एक पुस्तक वाचण्याची इच्छा सहज बोलून गेल्या. पुस्तकं वाचून दाखवणार्या आपल्या वडिलांच्या आठवणीत हळव्या झाल्या. त्या पुस्तकाची या सार्वजनिक ग्रंथालयात ना हार्ड कॉपी उपलब्ध होती, ना सॉफ्टकॉपी. अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी जातीनं शोधाशोध करून, खिशातून पैसे अदा करून ते साताठशे पानांचं कादंबरीवजा बाड मिळवलं आणि टीमवर्कमधून ते रेकॉर्ड करून त्याचं रीतसर ऑडिओबुक आजीबाईंसाठी उपलब्ध करून दिलं. कौन्सिलपासून मीडियापर्यंत सर्वच स्तरावर या उपक्रमाआडच्या माणूसपणाविषयी कौतुकाचे शब्द फिरत राहिले. ग्रंथालयांचं सामान्यांशी असलेलं सजीव नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं...
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
इतका काळ भयावह शुकशुकाट अनुभवलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांची दारं काहीच दिवसांपूर्वी अखेर उघडली गेलीत. विजनवासातली धूळ झटकत पुस्तकंही पुन्हा वाचकांच्या हाती जायला अधीर झालीत... ‘न्यू नॉर्मल’ला सामोरं जात माणसंही दबकत सार्वजनिक ग्रंथालयाकडे वळू लागलीत. मात्र पुस्तकं हाताळू न देणारी, शेल्फाशी रेंगाळू न देणारी, पुस्तक वाचत खुर्चीत विसावू न देणारी अन संवादाची कुठलीच शक्यता नसणारी कोविडप्रणित सार्वजनिक ग्रंथालयाची ही नवी कोरडी रीत अपार अस्वस्थ करणारी आहे. फिरून फिरून एकच वाटायला लावणारी की, इथली ती पूर्वीची निर्धास्त सळसळ कधीच का परतून येणार नाही?
..................................................................................................................................................................
लेखिका शुभांगी गबाले स्कॉटलंडनिवासी फ्रीलान्स लेखिका आहेत.
shubhangigabale@rediffmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment