बाप-लेक या नात्याचा वेध घेणारा एक संपादित स्वरूपाचा मराठी कथासंग्रह नुकताच वाचनात आला. त्यातील काही जुन्या मराठी कथा आणि इतर काही अनुवादित कथा वाचताना या नात्यातील अंतरंग आणि अंतर दोन्हीची नव्यानं ओळख झाली. क्षणभर वाटलं की, आपण यावर पूर्वी विचार केलाच नव्हता. आपल्या मनातील आविष्कार उघडपणे न दाखवता व्यक्त होणारं हे नातं हा एक मोठा विषय आहे. मग सहजपणे रुपेरी पडद्यावर या नात्याचा शोध घेत गेलो. मात्र हे खरं आहे की, आपल्या सिनेमानं हा विषय फारसा गंभीरपणे घेतलेला नाही. त्या नात्यातील तरलता, अंतर, ताण, गोडवा किंवा अंतरंग फारसं परिणामकारकरीत्या कुठे आलं नाही. अगदी पहिल्यांदा आठवले आले ते दोन चित्रपट - ‘शक्ती’ आणि ‘मुघल-ए-आझम’...
या दोन्ही सिनेमांत तसं साम्य इतकंच आहे. बाकी ते संपूर्ण वेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. या दोन्ही सिनेमांत बाप-लेक हे संघर्षाच्या पावित्र्यात आहेत. मात्र एक खरं की, या दोन सिनेमांखेरीज अन्य सिनेमे फारसे आठवले नाहीत. कदाचित असतीलसुद्धा. पारंपरिक विचार केला तर भावनेच्या आहारी न जाता निर्णय घेणं हा बापाचा स्वभाव. या अशा स्वभावाचा बाप हाच बाप म्हणून शोभतो वगैरे शिक्कामोर्तबदेखील आपण गेली कित्येक वर्षं सातत्यानं केलं आहे, करतो आहोत!
‘शक्ती’मधील बाप हा जसा कर्तव्य कठोर आहे, तसा ‘मुगल-ए-आझम’मधील अकबर (पृथ्वीराज कपूर) नावाचा बापदेखील आहे. आपल्या प्रेमाखातर प्रत्यक्ष बापाच्या साम्राज्याला आव्हान देणारा सलीम इथं दिलीपकुमार यांनी साकार केला आहे. अखेर त्यांची गाठ रणभूमीवर पडते आणि सम्राट अकबर हे आव्हान स्वीकारतो. ‘मोहे पनघट पे नंदलाल’पासून सुरू झालेली ही भावनिक मालिका अखेर ‘ए मुहब्बत झिंदाबाद’पर्यंत येते आणि बाप-लेक हे नातं मागे पडतं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos
..................................................................................................................................................................
‘मुघल-ए-आझम’ची सगळी भव्यता ही त्यांच्या चित्रणाइतकीच त्याच्या संवादातही आहे. त्यामुळे त्या अलौकिक भाषा-वैभवात बाप-लेक या नात्यातील तरलता तपासणं तसं अवघड जातं. अगदी गाण्यातून ‘झुक ना सकेगा इश्क हमारा… चारो तरफ है उनका नजारा’ हेच मनात घुमत राहतं. सलीमला मृत्युदंडाची शिक्षा देणारा सम्राट अकबर एक बाप म्हणून व्यथित आहे. मात्र त्या व्यथेतही कर्तव्यात कसूर न करणारा आदर्श असा न्याय आपण निर्माण करत आहोत, असा एक संकेत आहे.
भारतीय इतिहास या अपूर्व न्यायाचं कौतुक करेल, असा एक विश्वास त्याच्या मनात आहे. सम्राट अकबरच्या अंतर्मनातील बाप फारसा कुठे जागा होत नाही. तो अस्वस्थ आहे, दु:खी आहे, पण तरीही त्याचा सम्राट अधिक प्रभावी ठरतो.
‘मुघल-ए-आझम’ संदर्भात आणखी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, हा अनेक शतकापूर्वीचा इतिहास आहे. त्याचा तो काळदेखील आपण लक्षात घ्यायला हवा. अशा या सम्राटाला आणि राजपुत्राला बाप-लेक या नात्याचे निकष आपण लावायचे का, हाही एक प्रश्न आहेच. इतिहास नेहमीच असं ओझं आपल्यावर टाकतो. त्यामुळे वर्तमान तपासताना आपण गोंधळून जातो. आपण आपल्या तोलामोलाचा वारस निर्माण करू हा विश्वास तुटलेला सम्राट अखेरीस बाप होतो. पण एक सम्राट म्हणून मात्र तो ‘अनारकली’ला मात्र दरबारात नृत्य करण्यास उभं करतो आणि अखेर भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा सुनावतो. त्याच्यानंतर ती शिक्षा मागे घेऊन तो तिला सुटकेचा मार्गदेखील दाखवतो. अनारकलीची आई सम्राट अकबराकडे अनारकलीच्या आयुष्याचं दान मागते, जे अकबराकडे उधार असतं. कारण हीच ती आई असते, जिने सलीमच्या जन्माची आनंदवार्ता अकबराला दिलेली असते.
‘शक्ती’मधील संघर्ष (दिग्दर्शक-रमेश सिप्पी) हा आधुनिक काळातील आहे. लेक- विजय हा वाहवत गेलेला बंडखोर आणि बेफिकीर आहे. आपल्या बापाबद्दल त्याच्या मनात एक आकस आहे. त्याची कारणं त्याच्या बालपणात आहेत. एक पोलीस अधिकारी या नात्यानं आपलं कर्तव्य बजावण्यात कसूर न केलेला बाप स्वत:बद्दल एक कैफ मनात बाळगून आहे.
इथंही बाप या नात्यानं त्याने घेतलेली भूमिका टोकाची वाटू शकते. ‘माझ्या मनातील कर्तव्य कठोर माणूस हा वात्सल्यापुढे कधी झुकणार नाही, तेव्हा विजय विरुद्धचा हा लढा माझ्याकडेच सोपवा...’ असे तो वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगतो. आपल्या कर्तव्याबद्दल असणारी ही ऊर्मी पडद्यावर बघायला छान वाटते. मात्र सिनेमाच्या काळोखातून बाहेर पडताना मनात प्रश्न निर्माण करते, हे खरं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘शक्ती’मधील सलीम-जावेद यांचे संवाद सिनेमॅटिक वाटतात, कारण ते दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यासाठीचे संवाद आहेत. त्यातून बाप-लेक मनात उतरत नाहीत. आपली सल्तनत सांभाळणारा सम्राट अकबर असो किंवा विजयचा बाप असो… दोघांच्या मनात एक सल आहेच..
वरील दोन्ही उदाहरणं ही हिंदी सिनेमाच्या जगातील टोकाची उदाहरणं आहेत. मात्र दोन्ही सिनेमांतून ठळकपणे दिसतो तो फक्त संघर्ष. या सिनेमांची समीक्षा मी करत नाही. पण बाप-लेक या नात्यात हा दुरात्मभाव थोडासा असतोच, त्याचं एक भयंकर टोक आपण या दोन्ही सिनेमांत पाहतो. हे अंतर का असतं याला उत्तर नाही. मात्र हा विषय वेगळा आहे. जे भावबंध आहेत, ते आपल्या सिनेमात मात्र फार क्वचित उतरलेले दिसतात. आईच्या संदर्भात ते जसे प्रगट होतात, तसे बापाच्या संदर्भात झाले नाहीत हे खरं. आणि त्याचं कारण त्यांच्यातील एक छुपा तणाव हे असावं. माझ्या मुलामध्ये मला माझी प्रतिमा दिसली पाहिजे, या अपेक्षेनं हे नातं असं शुष्क होत असावं काय? हिंदी सिनेमांत बाप-लेक हे नातं फारच ढोबळ किंवा खरं तर, उथळपणे सादर झालं आहे, असंच म्हणावं लागतं.
काही सिनेमे पाहू.
अशोक कुमार आणि नलिनी जयवंत यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘संग्राम’ (दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी, १९५०) या सिनेमात मात्र एक वेगळा बाप आहे. आईविना वाढवलेल्या या लेकाचे कुठलेही हट्ट पुरवणारा हा बाप एक अजब किरदार म्हणायला हवा. (इथंही पुन्हा आईचं उदात्तीकरण नकळत आहेच) अखेर लेक गुन्हेगार होतो. मोठा झाल्यावर तो एक कॅसिनोतल्या मोठ्या गुन्ह्यात अडकतो. हा चित्रपट प्रत्यक्ष पाहिला नाही, मात्र असं कथानक अन्यत्र कुठे पाहायला मिळालं नाही. अखेर इथंदेखील बापाच्या गोळीनं लेक मरतो. ‘शक्ती’मधील हा दुर्दैवी अखेर त्याच्या कितीतरी आधी ‘संग्राम’मध्ये येऊन गेला आहे, याचं आश्चर्य वाटतं. बाप-लेक यांच्यामधील नात्याचं अंतरंग शोधताना सिनेमांत असं काही भयंकर सापडेल असं मात्र वाटलं नव्हतं.
आयुष्यातील गंमत हरवून बसलेला लेक आणि वयाची शंभरी ओलांडलेला बाप असं एक भाव-विश्व (?) ‘१०२ नॉट आउट’ (दिग्दर्शक- उमेश शुक्ला)मध्ये दिसलं होतं. हा सिनेमा रंजनाच्या विनोदी ढंगात सादर होतो. बापाला (अमिताभ बच्चन) आयुष्याच्या सगळ्याच गोष्टीत रस आहे, त्यातील गंमत अनुभवत तो दीर्घायुष्याचा विक्रम करण्यात मश्गुल आहे. लेक (ऋषी कपूर) मात्र सदैव दुर्मुखलेला, आयुष्याची सगळी गंमत हरवून बसलेला, उदास आहे. तो वयाच्या सत्तरीत आहे. प्रत्येकाच्या स्वभावाचा, प्रवृत्तीचा प्रश्न आहे, असं मान्य केलं तरी लेकाच्या उदास दृष्टिकोनाचा उलगडा होत नाही. जगण्याची उर्मी लेकासाठी ठेवून बाप आपलं आयुष्य संपवतो.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
या सिनेमात एक गोष्ट मला जाणवली की, लेकासोबत बोलताना हा बाप सदैव त्याची खिल्ली उडवताना दिसतो. त्यात त्याचा अव्यक्त जिव्हाळा दिसतो, पण तो कधीच कसा व्यक्त होत नाही? बाप आणि लेक या नात्यात ही एक कायम गोची असावी. हे असं का असावं? नेमक्या या कारणांचा शोध घेताना हा सिनेमा कमी पडतो हे खरं. ज्या समस्या असतात, त्याची उकल करताना हलकाफुलका विनोद मात्र निर्माण होतो. ही ‘lighter vein’ नात्यातील तणाव अदृश्य ठेवते. पण हे जे ‘अंतर’ आहे, ते किंचित का होईना या सिनेमात आहे...
अर्थात प्रत्येक वेळी तणावच असला पाहिजे असं नाही. अनेकदा ते नुसतं अंतरदेखील असतं. पण या दुराव्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्याचा वेध आपल्या सिनेमात दिसत नाही. दिसतो तो नुसता संघर्ष. शेवटी जोडलेली, लेकाची (तो परदेशी कुठेतरी असतो) कथा हा भाग तर विनोदाचं मांगल्यसुद्धा घालवून टाकतो. हा चित्रपट अभिनेत्यांनी जिवंत केला आहे, अन्यथा अवघड होतं.
बाप-लेक हे नातं अनेक वेळा तणावाचंच असतं. प्रेम, जिव्हाळा नसतो असं नाही, पण ते अव्यक्त असंच राहतं. आपल्या भावनेचा आविष्कार दाखवायला पिता तयार नसतो. असं का? ‘नॉट आउट १०२’ हा तसा काही अंशी आहे, हे खरं, पण तरीही खूप काही अस्पर्शित राहिलं असं वाटत राहतं.
..................................................................................................................................................................
‘पिता-पुत्र’ या मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केलेल्या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5216/Pita-Putra
..................................................................................................................................................................
पूर्वी कधीतरी ‘Postman in the Mountain’ (दिग्दर्शक हुयो जीयांकी) हा सिनेमा पाहिला होता. बाप-लेक नात्याचा शोध घेताना तो सारखा आठवत होता. चीनमधील निसर्गरम्य दुर्गम भागातील कथा आहे. या नितांत सुंदर सिनेमात बाप-लेक हीच दोन पात्रं प्रामुख्यानं दिसतात आणि त्यांच्यातील अवघड नातं प्रकर्षानं समोर येतं. बाप पोस्टमन, उद्यापासून निवृत्त होणार असतो. आपलं हे काम उद्यापासून आपल्या लेकानं करानं अशी त्याची इच्छा असते. दऱ्याखोऱ्यातून, नदीनाल्यातून, पर्वतरांगांतून हा सिनेमा सरकतो.
लेकाचा पहिला दिवस. त्यासोबत बाप आपल्या आयुष्याचा फ्लॅशबॅक पाहतो आणि त्याच वेळी आपल्या लेकाला त्याचं काम समजावतो. आपल्या कामातील मानवी मूल्य आणि बारकावे, भेटणारी माणसं याची माहिती सांगतो. लेक शांतपणे ऐकतो, पण इतकी सगळी साधनं उपलब्ध असताना ही पायपीट का करायची, हे त्याच्या लक्षात येत नाही. मात्र त्याच्या हे लक्षात येतं की, आपला बाप ही एक अफलातून व्यक्ती आहे आणि तो सगळ्यांना हवाहवासा वाटतो. या साफल्याचं काही मूल्य नसतं. त्याच्या या प्रवासात येणाऱ्या वाड्या-वस्त्या, रस्त्यात भेटणारे नागरिक, सरकारी लोक हे सगळे त्याच्या बापाला खूप मानतात. हे कसं याचं उत्तर शोधत लेक अखेर हे काम स्वीकारतो.
‘Postman in the Mountain’मधील हा बाप सुखाच्या, समाधानाच्या ठाम कल्पना असणारा एक सज्जन माणूस आहे. आपण आपला संसार आणि आपली माणसं या चौकटीतलं सुख व समाधान अन्यत्र कुठे नाही… माणसाला तेवढं पुरं असतं याची खुणगाठ त्याने मनाशी बांधली आहे. प्रत्यक्ष काही न सांगता (अर्थात सगळे संवाद समजत नाहीत) लेकानं हाच मार्ग स्वीकारावा असं त्याला वाटत असतं. ही सगळी पायपीट, कालबाह्य वाटेल असं काम मुलाला पटेल अशा भ्रमात तो नाही. आणि तरीही तो लेकाला सांगतो की, प्रत्यक्ष श्रम केल्याशिवाय हे साफल्य आपोआप सापडत नाही.
पोस्टमनचं काम हे फक्त सरकारी काम नाही, तर पोस्टमन असलेला आपला बाप खूप वेगळं काही करतो आहे, हे लेकाला हळूहळू कळू लागतं. या सिनेमात अनेक प्रसंग एक मोठा आशय आपल्यापुढे उभा करतात. नात्यामधील हे पापुद्रे अतिशय तरल वाटतात. आपल्या कामाचं महत्त्व सांगताना हा बाप आपल्या कामातून ते सांगतो.
एका प्रसंगात एका ठिकाणी ते विश्रांती घेत आहेत. अचानक वारा सुटतो आणि पिशवीवर ठेवलेली पाकिटं उडू लागतात. बापदेखील वाऱ्याच्या वेगानं आणि जीवाच्या आकांतानं ती विखुरलेली पत्रं गोळा करू लागतो. गोळा केली ती पत्रं लेकाच्या स्वाधीन करताना एक मंदस्मित त्याच्या चेहऱ्यावर दिसतं.
..................................................................................................................................................................
‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
‘मायलेकी-बापलेकी’ या ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL
..................................................................................................................................................................
हा प्रसंग आणि त्यातून मिळालेला संस्कार लेकाच्या मनावर कायमचा कोरला जातो. आपल्याला नेमून दिलेलं काम काटेकोरपणे केलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे... लेकानंदेखील त्याचे सर्व नियम पाळले पाहिजेत अशी त्याची धारणा आहे. आपण सोपवत आहोत ही केवळ एक सरकारी जबाबदारी नाही, तर आयुष्यभरचा आनंद आहे. बापाचं हे भाबडेपण अतिशय मोहक आहेच, पण त्याचसोबत आपल्याला संपन्न करणारं आहे.
‘Postman in the mountain’मध्ये बाप-लेक हे नातं ज्या ताकदीनं आलं आहे, तसं आपल्या सिनेमांत दिसत नाही. विदेशी सिनेमांतून मात्र ते अधिक तरलपणे आलेलं दिसतं. डस्टीन हॉफमन आणि मेरील स्ट्रीप यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘Krammer Vs Krammer’ या चित्रपटात पती-पत्नी यांच्यातील तणाव आणि लेकाची त्यामुळे होणारी अवस्था असा विषय आहे. कोर्टाच्या नियमानुसार लेकाचा ताबा पत्नीला मिळतो. एक समंजस बाप म्हणून त्याचा दृष्टीकोन फारच विचार करायला लावतो. वास्तविक त्याला या निर्णयाविरुद्ध अपिल करायचं आहे. त्याचा वकील त्याला सांगतो की, या अखेरच्या निकालामध्ये हा निर्णय तुमच्या लेकाला घ्यावा लागेल. त्याच्या त्या अजाण वयात त्याला असा ताण देणं योग्य नाही असं त्याला वाटतं. त्या वेळची त्याची तडफड खूपच बोलकी आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
बापाला अखेरचा ‘गुडबाय’ करण्यासाठी तो आईसोबत येतो. ती त्याला म्हणते, ‘मला तुझ्या वडिलांशी थोडं बोलायचं आहे’. विशेष म्हणजे लेक आईसोबत बापाच्या खोलीत जात नाही, तर खाली एकटा वाट पाहत राहतो. एक अनाहूत समज त्या मुळात कशी निर्माण होते? बोलण्याचं स्वातंत्र्य नाही, पण सहन करण्याची सक्ती मात्र आहे, हे बापाच्या वाट्याचं ओझं त्याला वागवावं लागतं.
घटस्फोटामुळे निर्माण होणारी परिस्थिती हा या सिनेमाचा विषय आहे, पण तितकाच तो लेकाच्या मानसिकतेचा आणि बापाच्या अव्यक्त भावनेचादेखील आहे. ‘मासूम’ या हिंदी सिनेमावर ‘Krammer Vs Krammer’ची छाया आहे, पण त्याची मांडणी वेगळी आहे.
आणखी दोन सिनेमांचा उल्लेख मी करणार आहे – ‘बायसिकल थीव्हज’ आणि ‘अपूर संसार’ हे ते दोन सिनेमे. ‘बायसिकल थीफ’ हा वित्तोरीया डी सिका या दिग्दर्शकाचा चित्रपट, तर ‘अपूर संसार’ हा सत्यजित राय यांच्या प्रसिद्ध ट्रायोलॉजीमधील अखेरचा चित्रपट. ‘अपूर संसार’मध्ये बाप आणि लेक यांच्यातला दुरावा संपतो आणि तो चित्रपटदेखील. मात्र अपुला ही जाणीव उशीरा होते आणि तीदेखील त्याच्या एका मित्रामुळे. मात्र लेकाला घेऊन आल्यावर त्याच्या आयुष्याला एक दिशा मिळते. लेक वयानं लहान आहे, तरीही एका परिपूर्तीचा आनंद देत सत्यजित चित्रपट संपवतात. एक सूचक, आशादायक वाट अपुला सापडते. सिनेमातील हे त्यांचं एकत्र असणं काही वेळेचं असलं तरी बाप-लेक या नात्याचं एक आगळं दर्शन घडतं.
‘postaman in the mountain’मध्ये वृद्ध बापाला थंड पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून लेक त्याला खांद्यावर घेतो. ‘अपूर संसार’मध्ये अपु आपल्या दुरावलेल्या लेकाला खांद्यावर घेऊन प्रवास सुरू करतो, त्यावेळी देखील असाच एक सांधा जोडला जातो! श्रेष्ठ कलाकृती अशा काही साधर्म्यामुळे नकळत एक छुपं पण वैश्विक सत्य सांगून जातात. खरं म्हणजे ते शब्दांत पकडणं अवघड असतं.
लेकाच्या संदर्भात सतत विचार करणारा बाप हा अदृश्य असतो, अबोल असतो. स्वत:चं भविष्य लेकात पाहात राहणं हा बापाचा छंद असतो. ‘बायसिकल थीफ’ या चित्रपटात मात्र बाप आणि लेक हे सतत फ्रेममध्ये आहेत. गरिबीमुळे बापाला मिळेल ते काम करावं लागतं. अशात त्याला शहरात पोस्टर्स लावण्याचं काम मिळतं. त्यासाठी सायकल आणि शिडी गरजेची असते. हे काम करताना तो लेकाला घेऊन जातो. पण अचानक त्यांची सायकल चोरीला जाते. जीवाचं रान करत ते दोघं शहरभर सायकल हुडकत हिंडत राहतात. पोलीस तक्रारदेखील करतात. कोणीही त्यांना मदत करत नाही. अखेर हताश होऊन ते घरी परतत असतात.
या शेवटच्या एका प्रसंगात बाप किती जागरूक असतो, याचं चित्रण येतं. लेक सतत त्याच्या सोबत आहे. हताश होऊन घरी परतत असताना एके ठिकाणी त्याला एक (दुसरीच) बेवारशी सायकल दिसते. ही सायकल आपण चोरावी असं त्याच्या मनात येतं. पण हे चुकीचं आहे आणि आपण लेकासमोर हे करायला नको, असंही त्याच्या मनात येतं. लेकाला तो ‘तू पुढे जा, मी ट्रामने नंतर येतो” असं सांगतो. आणि ती सायकल चोरतो. त्याचं ते काम यशस्वी होत नाही, तो लोकांच्या मारहाणीची शिकार होतो. काही कारणानं ट्राम न मिळालेला लेक परत आलेला असतो आणि तो हे सर्व दुर्दैवी दृश्य पाहतो. बाप अत्यंत व्यथित होतो. आपण पाहिलेलं स्वप्न तुटल्याची त्याची भावना होते. हीदेखील एक अबोल नात्याची कथा नक्कीच आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
बाप-लेक या नात्याचा शोध घेणं सोपं नाही. त्यातील कंगोरे खूप गुंतागुंतीचे आहेत. साहित्यातून ते जितके ताकदीनं उभे राहिले, तितके सिनेमात दिसत नाहीत हे खरं. आपला हिंदी चित्रपट तर ते खूपच ढोबळपणे पडद्यावर आणतो. ‘पा’ या सिनेमाची (दिग्दर्शक आर. बाल्की) तर केवळ बाप आणि लेक अशीच कथा आहे. असाध्य आणि विचित्र आजाराशी सामना करणारा लेक (अमिताभ बच्चन) आणि त्याचा बाप (अभिषेक बच्चन) यांच्या नात्यावर बेतलेला हा चित्रपट पूर्णपणे व्यावसायिक सिनेमा आहे. त्यामुळे अतर्क्य घटनांची उतरंड अपेक्षित परिणाम देत नाही, असं म्हणावं लागतं.
बाप-लेक हे नातं तसं गुंतागुंतीचं आहे. माय-लेक या नात्यासारखं ते फारसं उघडपणे व्यक्त होत नाही. एकाच वेळी स्वप्नं पाहायचं आणि भावूक न होता व्यवहार करत राहायचं ही सर्कस बाप कायम करत असतो. ‘Postman in the mountain’सारखा एखादाच चित्रपट त्याचे पदर हळुवारपणे उलगडतो. एरव्ही सिनेमे म्हणून ते परिणामकारक असले तरी ‘शक्ती’सारखे ते बटबटीत वाटत नाहीत. बाप-लेक या नात्याच्या नाजूक अनुबंधाचं चित्रण अवघड असावं! मात्र आपल्या साहित्यातून ते परिणामकारकरीत्या आलेलं दिसतं.
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment