अजूनकाही
काही पुस्तकं, चित्रपट, गाणी त्यातल्या कथानकामुळे तुमच्या मनाचा ठाव घेतात, तर काही वेळा ते कथानक कशा प्रकारे सांगितलं गेलं आहे, कुठल्या चष्म्यातून वाचकापर्यंत पोहचवलं गेलं आहे, यामुळे मनात भरतात. हा विचार मनात येण्याचं कारण म्हणजे नुकतीच वाचलेली एक समृद्ध कादंबरी – ‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’.
तशी ही कादंबरी एक दशक जुनी म्हणजे २०११ सालची आहे, पण तिचं कथानक कट्टरतावादाकडे झुकणाऱ्या सद्य भारताच्या संदर्भात आत्ता जितकं महत्त्वाचं आहे, तितकं गेल्या दशकांत कदाचित कधीच नव्हतं. ‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’ ही मूळ इंग्रजी कादंबरी, जॉन बायेन यांनी लिहिलेली. आजवर तब्बल ४२ भाषांमध्ये या कादंबरीचा अनुवाद झाला आहे, हे तिचं स्थळकालातीत यश म्हणावयास हवं. अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या या पुस्तकावर एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. ही कादंबरी मराठीमध्येही प्रकाशित झाली आहे. मुक्ता देशपांडे यांनी तिचा मराठी अनुवाद केला आहे.
दुसरं महायुद्ध, ज्यूंची मनात धडकी भरवणारी कत्तल, गॅस चेंबर्स, आत्यंतिक टोकाचा राष्ट्रवाद आणि वंशवाद, हुकूमशाहीची जगानं पाहिलेली परिसीमा, यांमुळे १९३५-४५ हा काळ थरकाप उडवणारा होता. मानवी आकांक्षांना जर योग्य वाट मिळाली नाही तर त्या कुठल्या थराला जाऊ शकतात, याचं प्रात्यक्षिक आणि अनेक महत्त्वाचे धडे जगाला देणारा हा काळ होता. अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून या काळाचं मानवी मूल्यांच्या दृष्टीनं विश्लेषण केलं आहे. आत्मचरित्र, राजकीय चरित्रं, कादंबऱ्या, नाटकं, आठवणी, कविता अशा विविध प्रकारे त्याविषयी बरंच लिहिलं गेलं आहे. परंतु महायुद्ध, गॅस चेंबर, नाझी हे शब्दसुद्धा न वापरता या काळाचं दाहक वास्तव वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम ‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’ या कादंबरीच्या माध्यमातून जॉन बायेन यांनी मोठ्या हुशारीने केलं आहे.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos
..................................................................................................................................................................
शेवटी कुठल्याही कलेचा उद्देश काय असतो, तर एखादी भावना लोकांपर्यंत पोहोचवणं, अनुभूती देणं. मग ते तुम्ही अगम्य, किचकट, तांत्रिक शैलीमध्ये करा किंवा सोप्या, निरागस, सुटसुटीत पद्धतीनं, हा मुद्दा या कादंबरीच्या निमित्तानं अधोरेखित करावासा वाटतो. या कादंबरीचा मराठी अनुवादही अतिशय सरस झाला आहे.
ब्रुनो हा नऊ वर्षांचा जर्मनीच्या बर्लिन शहरात राहणारा मुलगा. त्याचं स्वगत असं म्हणता येणार नाही, पण त्याच्या मनातील भावविश्व म्हणजे ही कादंबरी. ब्रूनोचे वडील हिटलरच्या सैन्यातील एका महत्त्वाच्या हुद्द्यावर आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काही ‘खास’ कामगिरी पार पाडणारे. या कामगिरीसाठी ब्रूनोच्या कुटुंबाला घर, शहर बदलावं लागतं आणि त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील ही सर्वांत मोठी उलथापालथ घडवणारी घटना असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, नवीन घर, घराच्या खिडकीतून कुंपणाच्या पलीकडे दिसणारी पट्ट्यापट्ट्यांचे कपडे घालणारी ‘ती’ माणसं, जुन्या घराच्या प्रिय आठवणी, जुन्या घरी ‘फ्युरी’ (हिटलर) येण्याचा प्रसंग, आयुष्यातील नवीन बदलासाठी जुळवून घेणं, यातून कादंबरीकार जणू ब्रुनोच्या मनाची सफर आपल्याला घडवतात.
ही सफर अनुभवताना आपण हसतो, भावनिक होतो, कधी कधी आपल्याला वाईट वाटतं, राग येतो आणि कधी कधी भीतीनं अंगावर काटाही येतो. ब्रूनोची ‘अशक्य ढ बहीण’, त्याचे ‘आयुष्यभरासाठी पक्के असलेले’ मित्र, त्याचे आई-वडील, वडिलांपेक्षा वेगळी राजकीय विचारधारा असणारी आजी, घरातील नोकर माणसं, ब्रूनोचा कुंपणाच्या पलीकडचा मित्र, घरी येणारा नवतरुण लेफ्टनंट, अशा अनेकांना आपण भेटतो. पण ब्रुनो आपल्याला नेईल तसं, तो जितकं आपल्याला परिचित करेल तितकं. या इतर लोकांच्या भावविश्वात नेण्याचा ना लेखकाचा अट्टाहास आहे, ना वाचक म्हणून आपल्याला ब्रुनोचं मन सोडून कुठे जाण्याची भुरळ पडते! एका विशिष्ट गतीनं पसरलेलं कथानक अखेरीस हृदयाचे ठोके वाढवणारा अनुभव देऊन कादंबरीचं धक्कातंत्र देणारं मूल्य उत्तमरीत्या जपतं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पौगंडावस्थेच्या आधीचं वय म्हणजे साधारण ८ ते १२ या वयाची काही वैशिष्ट्यं असतात. जगाशी जास्त संपर्क यायला लागलेला असतो. भोवताली घडणाऱ्या घटनांना एका सुसंगत विचारात, शब्दांत मांडता येण्याची ऊर्मी उफाळत राहते. ‘आपण मोठे झालो आहोत’ हा विचार मनाला शिवू लागतो. मोठ्या माणसांसारखं वागणं, तसं करायचा प्रयत्न केला जातो, पण आपला निरागस अवकाश न सोडता. बऱ्याचदा मी आणि माझं कुटुंब म्हणजे ‘अशी’ माणसं आणि ‘ते दुसरे’ म्हणजे ‘तशी’ माणसं, असे मानवनिर्मित भेदाभेद समजायला लागतात, त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. मानवशास्त्र परिभाषेत या सांस्कृतिक जडणघडण प्रक्रियेला ‘Enculturation’ असं म्हणतात.
मुलग्यांसाठी हे अजूनच वेगळं असतं, कारण ‘पुरुष’ होण्याची तालीम मिळायला लागते. आपल्या भावना न दाखवणं, डोळ्यात पाणी येऊ नये, ते दुसऱ्याला दिसू नये, याची धडपड करणं, जास्त शारीरिक जवळीक न करणं, ‘जबाबदार’ आणि ‘निडर’ पुरुष असणं, हे पुरुषसत्ताक परंपरेचं ‘बाळकडू’ मिळायला सुरुवात होते. या कादंबरीत ही सगळी जडणघडण ब्रुनो, त्याचं जग आपल्याला दाखवतं आणि नकळत आपल्या स्वतःच्या ‘त्या वयात’ आपण डोकावत जातो. माणूस हा जन्मतः कुठलेच भेदाभेद मानणारा नाही, कुणावर होणारा अन्याय सहन करणारा नाही, हे सत्य मनात पुन्हा पुन्हा रुंजी घालायला लागतं.
आपल्या देशाच्या परिघात राहून जगाच्या इतिहासाशी संबंधित काही वाचणं हेसुद्धा नवीन अर्थबोध घडवणारं. आज आपला देश एका विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीमध्ये आहे. उघड उघड आणि छुप्या पद्धतीनं विचारधारांचं युद्ध खेळवलं जात आहे. एका विशिष्ट सांस्कृतिक परिस्थितीमध्ये एक अख्खी पिढी घडत आहे. पण आपल्याला कुठे माहिती आहे की, आपल्या देशातील असंख्य ‘ब्रुनो’ काय विचार करत आहेत? त्यांना काय वाटतं? मग ते कुठल्याही विचारधारेच्या कुटुंबातले, शाळेतले असोत. आजूबाजूचे लोक काय बोलतात, कसा विचार करतात, सेलिब्रिटी व्यक्ती कशा वागतात, कसं वागायला पाहिजे आणि नाही पाहिजे, याचं सर्व शिक्षण त्यांचं मन स्पंजसारखं नकळत टिपून घेत असतं. कधी त्यांचे स्वतंत्र विचार घडतात, तर कट्टरतावादी समाजात ते कुठल्या तरी भलत्याच प्रभावाखाली येण्याची शक्यता असते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
एखाद्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जगाचा संदर्भ हा सामान्यतः त्या काळातील फक्त प्रभावी समाज घटकांच्या नजरेतून पाहिला जातो. साधारणपणे मोठी माणसं, पुरुष, वरच्या आर्थिक वर्गातील आणि सामाजिक थरातील माणसं ही घटना सांगतात, लिहितात आणि त्याचे अर्थ लावतात. पण या मूठभर गटाच्या पलीकडे, त्यांच्या भावविश्वापलीकडे खूप काही असतं.
अशी असंख्य भावविश्वं टिपणं, उलगडणं ही कला, साहित्य यांची फक्त भूमिका नाही तर जबाबदारीही असते. येणाऱ्या पिढ्यांना फक्त एका चष्म्यातून आत्ताचं जग दाखवायचं की, विविध चष्म्यांतून, हा समाज म्हणून आपला निर्णय असतो.
प्रस्तुत कादंबरी ही जबाबदारी पेलते आणि समकालीन साहित्यासाठी एक प्रात्यक्षिक ठेवून जाते, हे नक्की!
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘द बॉय इन द स्ट्राईप्ड पायजमाज्’ या सिनेमाचा ट्रेलर
..................................................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानवशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment