६.
या लेखाच्या पूर्वार्धासाठी इथे क्लिक करा
आपल्याकडची ग्रामीण कवितासुद्धा एका विशिष्ट साच्यामध्ये अडकलेली होती. ती कविता लिहिणारे पहिल्या पिढीतले कवी खेडेगावातून शहरात आलेले, मध्यमवर्गीय, आणि ब्राह्मण होते.
न्याहरीचा वखुत होईल
मैतरणी बिगी बिगी चाल
‘तिकडे भूक लागली असेल, तिकडे अस्वस्थ व्हायचं झालं असेल’ अशा पद्धतीचा, आपल्या नवऱ्याबद्दल (शेतकऱ्याच्या बायकोला कुठला आलाय प्रियकर?) एक मध्यमवर्गीय ‘गोड’ भाव त्या कवितेत आहे. शेतकऱ्याची बायको न्याहरी घेऊन गडबडीने शेताकडे जाईल. पण का? तर न्याहरीनंतर तिला शेतात राबायचं आहे, तण उपटायला बसायचं आहे किंवा घरी येऊन पुन्हा दहा कामं करायची आहेत. एकदा न्याहरी झाली की, तिने काय खाल्लं, की नाही खाल्लं, हे कुणी विचारणार नाही. पुलंचं म्हणणं असं होतं की, यशवंतांची ही कविता मराठीतली पहिली ग्रामीण कविता. पण ‘मराठीतल्या नागर कवींनी लिहिलेली ग्रामीण कविता’ हे तिचं वर्णन बरोबर ठरलं असतं. पण आपल्याकडे कादंबरीमध्ये, कवितेमध्ये, कथेमध्ये, सिनेमामध्ये शेतकऱ्याचं वर्णन अशाच नागर जाणीवेने केलं गेलेलं आहे.
ही नागर जाणीव शेतकऱ्याच्या व्यक्त होण्यामध्ये कशी अडथळे आणते त्याचं एक उदाहरण सांगतो. शेतकरी संघटनेने चांदवडला महिला अधिवेशन घ्यायचं ठरवलं. ‘आम्ही मरावं किती?’ ही महिला अधिवेशनाच्या बॅनरवरची ओळ नारायण सुर्व्यांच्या कवितेवरून घेतली होती-
डोंगरी शेत माझं गं
मी बेणू किती?
आलं वरीस राबून
मी मरू किती?
त्यावेळी माझं आणि शरद जोशींचं काहीतरी बिनसलं होतं. जोशीसाहेब म्हणाले, ‘मला तुमच्या कुणाची गरज नाही. मी एक अॅड एजन्सीमधला प्रोफेशनल माणूस पकडलेला आहे. तो तुम्हाला सगळ्यांना भारी आहे.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे. ‘घी देखा लेकीन बडगा नही देखा!’ बघून घेऊ तुम्हालाही.’ त्या माणसाला ते आठ दिवस ‘शेतकरी स्त्रीचं शोषण’ हा विषय समजावून सांगत होते. ‘हे सगळं लक्षात घेऊन उद्या मला पोस्टरचं डिझाईन आणून दे’ असं त्यांनी त्याला सांगितलं. ‘सर्व बाजूंनी लंबवर्तुळ असलेली एक दणदणीत शेतकरी बाई, तिच्या डोक्यावर एक पाटी, छान झकपक नऊवारी लुगडं, कडेवर कुंची घातलेलं शेतकरी पोरगं आणि ती दोघं खदाखदा हसत आहेत’ असं चित्र त्याने काढून आणलं. ‘शरद जोशींच्या वाट्याला आलेलं विकट (बिकट?) हास्य’ असं त्या चित्राचं वर्णन करता येईल. ते त्याला समजावून थकले. पण काही केल्या तो मुद्दा त्याच्या डोक्यात शिरत नव्हता.
आठव्या दिवशी शरद जोशी मला म्हणाले, “बाबा रे, मी तुला शरण आलो. मी बोललेलं सगळं विसरून जा.” मी म्हटलं, “हे व्हायचंच होतं. माझ्या डोक्यात ‘केव्हा’ एवढाच फक्त प्रश्न होता.” ते म्हणाले, “मला दोन तासात कॅम्पेन पूर्ण करायचं आहे. संध्याकाळी मी प्रचाराला बाहेर पडणार आहे. नाशिकला जायचं आहे.” मी म्हटलं, “एक माणूस आहे, माझ्यापेक्षा जास्त चक्रम आहे. पण तो जर मिळाला तर सगळं व्यवस्थित होईल.”
दिलीप माजगावकरांना मध्ये घालून मी सुभाष अवचटला फोन केला. शरद जोशी स्वतः येणार म्हटल्यावर सुभाष क्लीनबोल्डच झाला. आणि चांदवड मेळाव्याचं ते अप्रतिम पोस्टर तयार झालं. यात दोष शरद जोशींचा किंवा त्या ‘प्रोफेशनल’ चित्रकाराचा नव्हता. ग्रामीण भागासंबंधी, शेतकऱ्यासंबंधी, शेतकरी स्त्रीसंबंधी आधीच्या सगळ्या कवींनी, गीतकारांनी, सिनेमावाल्यांनी जो पूर्वग्रह दिलेला होता, त्याच्यामुळे हा घोटाळा झाला होता. आजही जाहिरातींमधले शेतकरी पाहिले तरी हेच चित्र दिसतं. जाहिरातींमध्ये मॉडेल कुठलंही घ्यायला हरकत नाही, पण त्या मॉडेलमधून विषयाची वास्तवता तर व्यक्त झाली पाहिजे? चुकीच्या फँटसी तुम्ही दाखवू नका. ‘खत असेल कसदार, पीक येईल जोमदार’ (हात उभारून दाखवून) या निव्वळ थापा आहेत. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये एक प्रसंग आहे. दुष्यंत म्हणतो, ‘शांतं इदं आश्रमपदं स्फुरतिच बाहू कुतो फलं इहास्य?’ या शांत असलेल्या आश्रमातसुद्धा माझा बाहू स्फुरण पावणार असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी भानगड करायला स्कोप आहे, असा त्याचा स्पष्ट शब्दांमध्ये अर्थ आहे. तसं हे सगळं अवास्तव आहे. अवास्तव असायलाही हरकत नाही. बालकवींची कविता कुठे वास्तव आहे?
खिल्लारेही चरती रानी
गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा
श्रावणमहिमा एकसुरे
गुराख्यांनी पावा वाजवलाच पाहिजे, हे कवींनी त्यांच्यावर लादलेलं आहे, कारण, केव्हा तरी तो कृष्ण फू फू फू करून पावा वाजवत होता. अत्र्यांनी म्हटलं होतं, “मराठी कवी उठसूट कृष्णाला बासरी वाजवायला लावतात. या कृष्णाला फेशिया पॅरालिसिस कसा झाला नाही अजून?” कुणीही फडतूस कवी उठतो आणि म्हणतो, ‘वाजिव वाजिव कान्ह्या मुरली’ आणि त्याचं चित्र असं काढतात की, तो बासरी वाजवतो आहे की, ऊस सोलून खातो आहे हेही कळत नाही. हा सगळा गोंधळ पूर्वसंकेतांमुळे झालेला आहे. निसर्ग कविता आणि ग्रामीण कविता म्हणजेच शेतकऱ्याची कविता हा समजही पूर्वसंकेतांतूनच आलेला होता. इंद्रजितची कविता यायला लागल्यानंतर हे सगळं फसवं वास्तव लोकांच्या समोर आलं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos
..................................................................................................................................................................
सुरुवातीला मलासुद्धा ही कविता समजत नव्हती. माझ्याबाबतीत दोन प्रसंग असे घडले की, त्यानंतर मला इंद्रजित कुठे चालला आहे, आणि कसा चालला आहे, हे लक्षात आलं.
खानावळीही बदलून पाहिल्या जीभ बदलणे शक्य नव्हते
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला गरम मसाला तोच तोच भाजीपाला
तीच तीच खवट चटणी तेच तेच आंबट सार सुख थोडे दुःख फार
असंच माझ्या वाढदिवसाचंही व्हायला लागलं होतं. त्याचा एक साचा बनून गेला होता. म्हणून मग नंतर मी वाढदिवसाला दरवर्षी पुण्याबाहेर जायचो. एकदा राजन गवसच्या घरी गेलो. आणि गवसने माझी परीक्षा पाहायचं ठरवलं. त्याच्याकडे जाणारे सगळे मराठी लेखक म्हणजे शरीरानं थकलेले आणि एकजात लुळेपांगळे! कुणाला बीपी आहे, कुणाला डायबिटीस आहे, कुणाला अजून काही. काहीतरी वैगुण्य असल्याशिवाय कविता कशी लिहिणार? आतमध्ये ‘वेदना’ पाहिजे ना! पण ती अपचनाची वेदना नसावी. त्याच्यावर दुसरे उपाय आहेत, कविता नाही लिहिली तरी चालेल. ‘कुणाचा द्वेष करू नये’ हा मोठा उपाय आहे. पण ते मराठी साहित्यिक-कवींना कसं जमावं?
त्या वर्षी पाऊस वेळेवर आला होता, ‘इघीन’ म्हणून आलेला नव्हता. धो-धो पावसात आम्ही दोन दिवस फिरत होतो. शेवटचे जवळजवळ पाच किलोमीटर, एक पाय गुडघाभर चिखलात घालायचा आणि दुसरा काढायचा असं करत आम्ही घरी आलो. गवसची आई चुलीपाशी भाकऱ्या बडवत होती. भिजून आलो होतो म्हणून मी चुलीपाशी जाऊन बसलो. ती म्हणाली, ‘हा आमचा पोरगा सतरावी-अठरावी शिकला आहे. तो इतकी माणसं आणतो. मी भाकऱ्या बनवून घालते. पण तुमच्यासारखं आतपर्यंत कुणी आलं नव्हतं. काय बोलू मी तुमच्याशी?’ मी म्हटलं, ‘तुमची स्टोरी सांगा.’ आणि तिने तिची सबंध कहाणी मला ऐकवली. तिचा नवरा वारकरी होता. भारत काळेच्या कादंबरीमध्ये एक वारकरी आहे. ‘विठोबा’ म्हटल्याशिवाय त्याच्या तोंडातून शब्दच येत नाही. तसा तो होता. आता त्याला पापभीरू म्हणायचं किंवा नेभळट म्हणायचं तो तुमचा प्रश्न आहे. आणि या नवरा-बायकोच्या वाटची सगळी जमीन सासरा हडपत होता. सासऱ्याला ती जमीन दुसऱ्या मुलाला द्यायची होती. त्या बाईने सासरा आणि दिराविरुद्ध जबरदस्त लढा दिला! पण सतत तिच्या मनात भीती असायची की, आपल्याला चार मुलगे आहेत. दिराला फक्त मुलीच आहेत. आपण जर जमीन त्याला दिली नाही तर तो आपल्या मुलाला विष घालून मारेल.
कोल्हापूर जिल्ह्यामधली भाऊबंदकी ही नुसत्या शिवीगाळीवर थांबत नाही. कारण तिथं जमीन चांगली आणि थोडी. त्यामुळे जमीन म्हणजे जीवन-मरणाच्याच लढाया असतात. नंतर गवसने मला सांगितलं की, आम्ही कोल्हापुरात येईपर्यंत मी बाहेर काही खात नव्हतो. ती सबंध कहाणी मी ऐकली. मग एक दिवस ‘साधना’चा दिवाळी अंक चाळत असताना इंद्रजितची कविता मला वाचायला मिळाली. त्या दिवशी मला इंद्रजितची कविता समजली. ‘काबाडाचे धनी’मधलं हे आईचं वर्णन आहे.
माय उभी चुलीपासी राख उडते वाऱ्यानं
पान्यातल्या मासोळीशी केला संसार पाऱ्यानं
माय उभी दारापासी कुरकुरते चौकट
दार भरल्या घराचे भुंगा कोरीतो हल्कट (‘हलकट’ शब्द आलाय का मराठी कवितेत? फारसा नाही आलेला.)
माय उभी विहिरीशी डोईवरती घाघर
भुईतल्या रांजनाला कुनी फोडीले पाझर
माय उभी बांधावर भाउबंदकीचा लोंढा
थोपवून धरताना होई काळजाचा धोंडा
माय उभी नदीवर प्रवाहाला थोपवित
उलनारा ऊर उभा पदरात लपवित
माय उभी पाताळात उंच आभाळाएवढी
दुष्काळात वाहनारी नदी सुकाळाएवढी
माय उभी राउळात तुकारामाची जिजाऊ
पुसतसे पाषाणाला तुला गिळू किंवा खाऊ
माय उभी रखुमाई पंढरीच्या वाटेवर
विठू घरचा बोलावी पांढरीच्या वाटेवर
माय उभी माहेरात उभी तिथेच माहेर
मायीपासून सासर उभे दाराच्या बाहेर
माय उभ्या उभी आली तशी उभ्या उभी गेली
खाली बसाया सवड आम्ही तिला कव्हा दिली
हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या - द्वारकाबाई गवस! अशी दुसरी कविता मराठीत नाही.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पुढे एकदा माझं आणि गवसचं काहीतरी भांडण झालं. आता गवससुद्धा महत्त्वाचा लेखक आहे, त्यामुळे भांडण तर मिटवायला पाहिजे. पण तो कोल्हापूरचा आणि मीसुद्धा कोल्हापूरचा. त्यामुळे आम्हाला भांडण्यामध्येच जास्त इंटरेस्ट! पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ‘शोले’ सिनेमा चालू राहतो! मग मी एक युक्ती केली. गवसला पत्र लिहिलं- ‘बाबा, तुझं-माझं काहीही असेल पण ही कविता तेवढी तुझ्या आईला वाचून दाखव. एवढं माझं काम कर’ आणि आमचं भांडण मिटलं.
७.
शेतकऱ्याचा बाप हा मराठी साहित्यामध्ये ‘व्हिलन’ म्हणून दाखवायची पद्धत होती. अनंत यादवांचं ‘झोंबी’ नावाचं आत्मचरित्र आहे, पु. ल. देशपांड्यांनी त्याच्यावर लिहिलं, तेव्हा त्यांनी असं म्हटलं आहे की, या आंद्याच्या नशिबाला असा खलनायक बाप यावा आणि त्याच्यातून मार्ग काढून हा इतका चांगला लेखक व्हावा याचं खरोखर कौतुक केलं पाहिजे. चांगला लेखक म्हणजे काय? शेतकरी बापाविषयी द्वेष बाळगणारा, आणि आईबद्दल कणव असणारा. पण ती कणवसुद्धा बापाच्या अत्याचाराला बळी पडणारी बाई म्हणून; जन्मभर शेतात राबून जिला काही मिळालं नाही, अशी बाई म्हणून नाही. असा हा ‘व्हिलन’ बाप इंद्रजितच्या कवितेत कसा आला आहे?
बाप शेत कसायाचा सारे नियम पाळून
जाता येता पाहायचे वाटसरू न्याहाळून
धुरे बंधारे बंदिस्ती नीटनेटकी राह्याची
उगा कुठं पडलेली नाही काटकी राह्याची
आधी कपाळाला माती मग पाऊल रानात
रोज शेतात निवद नेई केळीच्या पानात
उभ्या पिकात दिशेला कव्हा बसायचा नाही
कस कमी झाल्यावर रान कसायचा नाही
दोरी न लावता सारं दोरीमधी असायचं
उगवणारं धानही वरी खाली नसायचं (हे जरा मला अद्भुत वाटतं. कारण इरवड असतातच प्रत्येक शेतात. पण तेवढं इंद्रजितला माफ आहे.)
बैल वाकडातिकडा चालला की ईकायचा
गडी वाकडातिकडा वागला की हाकायचा
नांगराच्या नीट धारा तिफनीची नीट तासं
रान पितांबरावानी जरीकाठी आडतास (विठ्ठलाशी याचा सांधा आहे. ‘कासे पितांबर, कस्तुरी लल्लाटी’)
कुपाटीच्या काट्यातरी किती चोपूनचापून
जनू वाकडेतिकडे बाल घेतले कापून
गोठा आखाडा नव्हंच जनू ऋषीचा आश्रम
महादेवाच्या नंदीचे बैलं गाईची वासरं
नाही दिसणार कव्हा तिथं गोचीड गोमाशी
नाही ओढनार दावं गाय उपाशी आधाशी
शहरी आणि ग्रामीण यांच्या सीमारेषेवरचं हे वाक्य आहे. हे सगळं वर्णन वाचण्यासारखं आहे. या कवितेत शेवटी इंद्रजित म्हणतो की, इतक्या प्रामाणिकपणे ज्याने शेती केली त्या माझ्या बापाच्या वाट्याला अशी दुर्दशा आणि निराशा का येते? शेतकऱ्याच्या आईच्या वतीने, त्याच्या बापाच्या वतीने, त्याच्या भावा-बहिणीच्या वतीने हे प्रश्न इंद्रजितशिवाय दुसर्या कुणी विचारलेले नाहीत. हे वाचलं आणि मग मला इंद्रजितच्या कवितेतले शेतकरी कोण आहेत, ते कळायला लागलं. या कविता समजायला लागल्यावर ते कळायला लागलं आणि शेतकरी संघटनेमध्ये येऊन शेतकऱ्यांना ओळखल्यावर मला या कविता समजायला लागल्या. असा माझा दुहेरी प्रवास पाच वर्षं चालू होता.
८.
शेतकरी संघटनेमध्ये तीन-चार स्तर होते. शरद जोशी एका पातळीवर, त्यांच्या वैचारिक पातळीच्या जवळपास असणारी दोन-चार माणसं, त्यानंतरच्या पातळीवरची महाराष्ट्रात जवळजवळ हजारभर माणसं होती आणि ती २०० तालुक्यांत विखुरलेली होती. प्रत्येक तालुक्यात पाच-सहा माणसं अशी होती, ज्यांना शरद जोशी जे सांगतात ते कळायचं, समजायचं, पटायचं आणि काही जणांना ते व्यक्तही करता यायचं. संघटनेचा बिल्ला आम्ही सगळेच लावत होतो, पण चौथी पातळी फक्त बिल्ला लावणाऱ्यांची. आणि या सगळ्यांशिवाय खूप माणसं असायची. संघटनेत असताना आम्ही फार मोठी गर्दी पाहिलेली आहे. त्यावेळी लाख माणसं जमली म्हणजे काहीच जमली नाहीत, असं आम्हाला वाटायचं.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/
..................................................................................................................................................................
माझा पहिल्यापासून एक नियम असा होता की, व्यासपीठावर बसायचं नाही. नाहीतर आमचे काही कार्यकर्ते असे होते की, एक जोशीसाहेबाच्या डाव्या पायाशी बसायचा आणि एक जोशीसाहेबाच्या उजव्या पायाशी. म्हणजे फोटोमध्ये हे कायम! आपण तसं कधी केलं नाही. या चौथ्या किंवा पाचव्या पातळीवर असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शरद जोशींच्या भाषणांमधलं विज्ञान, त्याच्यातलं अर्थशास्त्र, त्याच्यातला सिद्धान्त कसा पोहोचत आहे, हे पाहण्यात मला जास्त रस असायचा. ते सगळं त्यांना समजत होतंच असं नाही, पण त्यांना एक कळत होतं की, हा बामण असला तरी आपल्या भल्याचं बोलतो आहे. आणि आपल्याला शेतीच करायची आहे, दुसरं काही करायचं नाही. त्यामुळे हा माणूस आपला आहे; मग त्याची जात काहीही असो, तो शहरी असो-नसो, त्याचं याच्या आधीचं आयुष्य कसंही असो. ही माणसं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर माझा इंद्रजितकडे आणि त्याच्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ही खरीखुरी माणसंच त्याच्या कवितेत ‘साक्षात’ दिसत होती.
पायवाट पांढरी तयातून अडवी-तिडवी पडे
हिरव्या कुरणामधुन चालली काळ्या डोहाकडे
हे वास्तव नाही.
काट्याकुट्यातनं जातोय रस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता
हे वास्तव आहे. आणि मराठवाड्यातलं वास्तव काय सांगावं? माझा एक मित्र मुखेड तालुक्यातला. तो मला म्हणाला, ‘माझ्या गावाकडे येशील का?’ मी म्हटलं, ‘नक्की येईन. कुठे आहे तुझं गाव?’ त्याचं गाव मुखेड तालुक्यात पार आतमध्ये कुठेतरी होतं. मी त्याला विचारलं की, कसं यायचं? तो म्हणाला, ‘मुखेडपर्यंत बस येते. तिथं तू उतर. तुला घ्यायला घोडं पाठवू की, उंट पाठवू?’ मला कळेचना. आपण अरबस्तानात आहोत की, सहारा वाळवंटात? मराठवाड्याशी तो माझा पहिलाच परिचय होता. मी त्याला म्हटलं, ‘उंटाच्या लिफ्टपेक्षा मी पायी चालत येतो.’ (‘उंटावरचा शहाणा’ मी स्वतः होतोच!) असे बारीक-सारीक तपशील म्हणजे वास्तव असतं. ते कथेत भेटत नाहीत, सिनेमात भेटत नाही; नाटकामध्ये तर नाहीच. ग्रामीण भागातले अत्याचार, खुनाखुनी किंवा ग्रामीण भागातलं पुढारीपण एवढंच तिथं दिसतं. दुर्दैवानं आमच्या रा. रं. बोराड्यांसारखे ज्येष्ठ आणि ताकदवान लेखकसुद्धा ‘मरणदारी’सारख्या कादंबरीत त्याच सापळ्यात सापडले.
शेतकरी जीवन सुंदरही आहे, भीषणही आहे, आश्चर्यचकित करणारंही आहे आणि गुंतवणारंही आहे. आणि गुंतवणारं म्हणजे अडकवणारंसुद्धा आहे. शेतीमध्ये उत्पादक श्रमसुद्धा आहेत आणि ती गुलामगिरीही आहे. मानवी संस्कृतीचा इतका प्रवास झाला, पण अजूनही पाण्यावर नाक राहील, इतपतच शेतकऱ्याला ठेवायचं हा सगळ्या संस्कृतींचा आणि सगळ्या राजकीय विचारप्रणालींचा नियम आहे.
चीनची क्रांती म्हणे शेतकऱ्यांची क्रांती होती. खरं आहे; पण कुठल्या अर्थानं? क्रांतीत किती शेतकरी मेले ते सोडूनच द्या. माओच्या राजवटीत चीनमध्ये आठ कोटी शेतकरी मेले. आणि माओने आपल्या अधिकाऱ्यांना असा जाब विचारला की, मी जे धोरण आखलं होतं त्याच्यानुसार २० कोटी मरायला हवे होते. आठच कोटी शेतकरी मेले, याचा अर्थ तुम्ही सरकारी धोरणं नीट राबवलेली नाहीत. असं म्हणून माओनं त्या अधिकाऱ्यांनाही मारलं. शेतीला पोकळ उत्तेजन देणं, शेतीचं अद्भुतीकरण करणं, शेतीबद्दल प्रचंड गळे काढणं किंवा शेतकरी एकमेकांचे गळे कसे कापतात एवढ्याचंच वर्णन करणं या सगळ्यापलीकडे जाऊन शेतकरी जीवनाचं वास्तव चित्रण मला या कवितेत वाचायला मिळालं.
इंद्रजित कविता लिहीत होता, त्या वेळी आम्ही चळवळीत होतो. किंबहुना चळवळीचं काम म्हणूनच मी पहिल्यांदा परभणीत आलो होतो. तेव्हा आम्ही काही वेळा इंद्रजितवर रागावलेलो असायचो. आम्हाला वाटायचं, इंद्रजितनेही चळवळीत यावं. त्यानेही आमच्यासारखं जेलमध्ये यावं. असं वाटलं नाही ते फक्त शरद जोशींना. आणि त्यांना हे कळलं, हे इंद्रजितला कळलं म्हणून तो जोशींचा उल्लेख कायम ‘तीर्थरूप शरद जोशी’ असा करायचा. कवींनी, लेखकांनी चळवळीत यावं की नाही? चळवळीत आल्यामुळे त्यांचं काव्य, त्यांचं लेखन याच्यामध्ये चांगले बदल होतील की, वाईट बदल होतील? चळवळीसाठी लिहिणं म्हणजे केवळ प्रचारकी लिहिणं का? (मीही सगळ्या चळवळींवरती लिहिलं आहे. पण प्रचारकी अजिबात लिहिलेलं नाही.) प्रचाराचं काम कवींनी करावं का? शेतकरी संघटनेत तर कवितेच्या बाबतीत सगळा आनंदीआनंदच होता!
एकदा संघटनेच्या कार्यकारणीमध्ये चर्चा चालली होती की, आलतूफालतू संस्था-संघटनासुद्धा आपल्या गाण्यांच्या कॅसेट काढतात किंवा त्यांची कलापथकं असतात. आपली तर एवढी मोठी संघटना आणि आपली काय आई मेली? आपल्या संघटनेमध्ये एकही कवी असू नये? (यामुळेही आम्हाला वाटायचं की, इंद्रजितने आमच्याकडे यावं.) त्यावर शरद जोशी त्यांच्या खास ‘जोशी टच’ने असं म्हणाले, “हे पहा, आपल्याकडे गाणी नाहीत, कविता नाहीत म्हणून आपलं काही बिघडलेलं नाही” आणि गाणी किंवा कविता का नाहीत? तर म्हणे, “गाणी-कविता लिहायला प्रचंड निराशा लागते. बारक्या-बारक्या चळवळींच्या मागे पाच-दहा माणसं आहेत. त्यांना घोर निराशा असते. आपल्यामागे लाखो माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला निराशा येत नाही आणि आपण कविता लिहीत नाही. पण या विषयातली अधिकारी व्यक्ती विनय आहे, आपण त्याला विचारू या.” मी म्हटलं, “नेत्याची पर्सनॅलिटी चळवळीला येते. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कुठे काव्याचा स्पर्श आहे?” शरद जोशींसाठी काव्य म्हणजे थेट कालिदास, भवभूती, व्यास, वाल्मिकी आणि भर्तृहरी. त्यांचं ते ज्ञान पक्कं होतं. पण त्याला शेतकरी संघटनेमध्ये वाव नव्हता. एकीकडे ‘शेतकऱ्याचा आसूड’ घेऊन उभं राहायचं आणि दुसरीकडे कालिदास - भवभूती सांगायचे, हे त्यांनी केलं नाही ते बरं केलं. नाहीतर शेतकरी संघटनेचे तेव्हाच दोन तुकडे झाले असते!
“तुमचं व्यक्तिमत्त्व, तुमच्या आवडी-निवडी जशा आहेत; तशीच आपली संघटना आहे. टिळकांनी देश पेटवला, त्या काळात टिळकांच्या नावावर एक तरी कविता झाली का? आणि नंतरही एवढी मोठी कामगिरी करून सगळ्यात कमी काव्य ज्याच्यावर लिहिलं गेलं असा माणूस कुणी असेल तर तो टिळक आहेत. तुमचा पिंड टिळकांसारखा आहे.” (आंबेडकरांनीही एवढं मोठं काम केलं, पण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर कविता झाल्या नाहीत. आणि आता मात्र असा काय धुमाकूळ चालतो की, तो पाहून केव्हातरी बाबासाहेब ‘परित्राणाय साधूनां...’ पुन्हा एकदा अवतार घेतील आणि आधी या कविता बंद करतील असं वाटायला लागतं!) संघटनेत काव्याची परिस्थिती अशी होती. कवी, अविष्कारस्वातंत्र्य या तर आमच्याकडे शिव्याच होत्या.
९.
इंद्रजितबाबत माझी एकच तक्रार आहे. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक’ हे गाणं त्याने कुणब्याच्या पोरांची पहिली पिढी म्हातारी झाल्यावर लिहिलं. ते त्याने दहा-पंधरा वर्षं आधी लिहिलं असतं तर आमच्या चळवळीला त्याचा उपयोग झाला असता. परभणीला आम्ही जो रौप्यमहोत्सवी मेळावा घेतला, त्याचं मुख्य गाणं ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शीक’ हेच होतं. आणि त्यावर शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनीच हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं की, ‘आमच्या विदर्भात ‘कुणबी’ नावाची जात आहे. त्यामुळे ‘कुणब्याच्या पोरा’ हे बदलून ‘शेतकऱ्याच्या पोरा’ असं करावं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
इंद्रजित तेव्हा अतिशय भडकला आणि संतापानं लाल झाला. पण अशा वेळी काय करायचं त्याला माहीत होतं. मगाशी म्हटलं तसा बेरकी आहेच तो! त्याने सांगितलं, ‘मी या विषयावर एक अक्षर बोलणार नाही. जे काही करायचं ते विनय हर्डीकरांना करू द्या.’ विनय हर्डीकरांकडे सोपवल्यानंतर पुन्हा तो विषय कुणीही काढणार नाही, हे त्याला माहीत होतं. त्यामुळे नंतर तो विषयच निघाला नाही. पण मला अजूनही असं वाटतं की, शेतकरी संघटनेसाठी इंद्रजितने काही गाणी लिहायला हवी होती. शेतकरी संघटना जे मांडू पाहत होती, ते त्याच्या कवितेत होतंच आणि ‘टाहो’मध्ये, ‘आम्ही काबाडाचे धनी’मध्ये ते अतिशय प्रभावी स्वरूपात आलेलं आहे.
आमची पहिल्यांदा भेट झाली ती ८५-८७च्या दरम्यान. त्या वेळी त्याने आमच्यासाठी काही गाणी लिहिली असती तर इंद्रजितचं आमच्या मनातलं स्थान जिव्हाळ्याचं आहेच, पण ते आणखी प्रेमाचं झालं असतं. शेतकरी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना इंद्रजित भालेराव ‘कवी’ या अर्थानं माहीत नाहीत. समूहांसाठी लिहिण्यामध्ये मोठा आनंद असतो. मी वयाच्या सतराव्या वर्षी ‘ज्ञानप्रबोधिनी’साठी गाणं लिहिलं. ते अजूनही ज्ञानप्रबोधिनीचं एक नंबरचं गाणं आहे. कारण त्याच्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीचं तत्त्वज्ञान, ज्ञानप्रबोधिनीचा कार्यक्रम हे सगळं आलेलं आहे. १९६६मध्ये मी ते लिहिलं. यावर्षी दसऱ्याला त्याला ५० वर्षं पूर्ण होतील. एक ५० वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि दुसरं ४४ वर्षांपूर्वी लिहिलेलं अशी दोन गाणी अजूनही ज्ञानप्रबोधिनीची दोन प्रमुख गाणी आहेत. याच्यामध्ये एक वेगळंच समाधान असतं. आमच्यासाठी इंद्रजितने काही गाणी लिहायला हवी होती, एवढी त्याच्याविषयी माझी एकच तक्रार आहे.
आणखी एक गोष्ट मला त्याला सुचवायची आहे. नाहीतरी इंद्रजित त्याच्या सगळ्या आसमंताकडे परत चाललेला आहे. शेवटच्या संग्रहातल्या त्याच्या कवितांची नावं गवत, शेत अशीच आहेत. तर ‘शेतकऱ्याचं रामायण’, ‘शेतकऱ्याचं महाभारत’ म्हणावं असं भव्य काम त्याच्याकडून व्हावं. शेतकरी संघटनेसारखी एवढी मोठी चळवळ त्याने पाहिलेली आहे, तिच्यामध्ये तो वावरलेला आहे. ते सगळे अनुभव एकत्र करायचे झाले तर या एक-दोन पानांच्या कविता त्याला पुरणार नाहीत. अशा किमान शंभर-दीडशे कविता त्याच्याकडून लिहून व्हाव्यात. आणि हे प्रचार म्हणून नाही, आम्हालाही हे सगळं समजून घ्यायचं आहे. कार्यकर्ते म्हणून आमचं जे यशापयश आहे त्याच्याबद्दल काही गोष्टी आम्हाला वाटतात. पण आमच्याबद्दल पूर्णपणे आत्मीयता असणारा एक प्रतिभावान कवी म्हणून पूर्णपणे मोकळेपणाने, वस्तुनिष्ठपणे (पण ‘पी एच.डी. थिसिससारखं नको. ते काव्यात लिहिताही येणार नाही) असं त्याच्या हातून काहीतरी लिहिलं जावं. सध्या तो तब्येतीनं नाजूक झाला आहे. पण त्याचा त्याने फार विचार करायची गरज नाही. गेल्या महिन्यात मी ६७ वर्षांचा झालो. आणि मी शंभर वर्षं जगण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे इंद्रजित निदान अजून ३३ वर्षं तरी तुला राहायचं आहे. नाहीतर माझ्यावर कविता कोण लिहील?
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
काल मी अनंतरावांना असं म्हटलं होतं की, इंद्रजितचं आयुष्य एखाद्या परीकथेसारखे चाललं होतं. पण परीकथेचा असा नियमच आहे की, परीकथेत सात उद्यानं लागतात, मग सात डोंगर लागतात, मग सात जंगलं लागतात, मग सात नद्या लागतात, त्यानंतर सात वाळवंट लागतात. पण हे डोंगर, ही जंगलं, ही वाळवंटंसुद्धा परीकथेचाच एक भाग असतात. परीकथेमध्येच हे वर-खाली, कमी-जास्त घडत असतं, हे त्यानं लक्षात ठेवावं. त्याचं औषध म्हणजे त्याची कविताच आहे. ते औषध तो स्वतःच स्वतःला देऊ शकतो. आम्ही तर त्याच्या बरोबर आहोतच.
शेवटी बोलायचं ठरवलंच आहे, तर म्हटलं कवीसाठी कविताच लिहावी! ती आता म्हणतो.
१.
बोट बहिणाबाईचं जेंव्हा जाणून धरलं
कुल-शील कवितेचं तुझ्या तिथेच ठरलं
तुकारामाचं आकाश भूमी गाडगेबाबाची
जोतिरावाचा आसूड मुळं तुझ्या कवितेची
तशी ग्रामीण कविता होती आम्हालाही ठावी
एकसुरी नटवी ती नुस्ती पिवळी हिरवी
शेणामातीचा दर्वळ तुझ्या शब्दातून आला
बळीराजाचा चेहरा प्रथमच प्रकटला
बळीराजाच्या शेजारी, उभी घरची लक्षुमी
सोसण्याचा जिचा वसा, काही पडू दे ना कमी
माय बाप दादा वैनी दूर दिलेल्या बहिणी
कष्टकरी सालदार कोमेजल्या कुळंबिणी
रंग कोरडवाहूचे, तुझ्या कवितेत आले
सारे काबाडाचे धनी माझे सोयरेच झाले
तुझ्या शब्दांच्या शेतात वाटा माझाही असू दे
शेतकरी वास्तवाचे भान सजग राहू दे !
२.
येत होता कवितेला तुझ्या नवीन बहर
देशभर केला आम्ही आंदोलनाचा कहर !
आंबेठाणच्या मळ्याचा हाती घेऊन अंगार
लुटारूंचं कारस्थान टांगलंच वेशीवर !
लाखो रस्त्यावर आले जाब विचारू लागले
किती तुरुंगात गेले काही जिवानिशी मेले !
घरोघरच्या लक्षुम्या रणरागिण्याच झाल्या
कारभार्यांच्याही पुढे दोन पावलं चालल्या
विसरलो घरदार आणि बारसं बारावं
तरी आमच्या हाताला का रे अपशय यावं?
ज्याच्या स्वातंत्र्याच्यासाठी, दिल्या प्राणांच्या आहुत्या
तरी थांबत नाहीत शेतकरी आत्महत्या !
जिथे वाहिला एकदा स्वातंत्र्याचा झंझावात
तिथे हताश हुंदके कसं घडलं आक्रित?
म्हणे भोळा बळीराजा वागे कसा विपरीत
स्वत:हून धाव घेतो कसायाच्या जबड्यात
नाही विसरत जात आणि खानदानी वैर
ज्यांना मारावं जोड्याने चालू देतो त्यांचे थेर !
सांग कविराजा, सांग काय आमचं चुकलं
बळीराजाचं स्वातंत्र्य कसं हातून हुकलं?
बळीराजाचं गणित मला सुटता सुटेना
स्वत:शीच घेतलेली माझी होडही मिटेना !
तूच म्हणाला होतास, ‘लागे करावा उपाय’
चल तोच ध्यास धरू, आणि तुला सांगू काय?
शब्दांकन : सुहास पाटील
..................................................................................................................................................................
लेखक विनय हर्डीकर पत्रकार, लेखक आणि कार्यकर्ते आहेत.
त्यांचा मोबाईल नं. - ९८९०१ ६६३२७.
vinay.freedom@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sat , 21 November 2020
नमस्कार विनय हरडीकर!
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही लेख वाचनीय आहेत. आंबेडकरांनी पुनर्जन्म घेऊन त्यांच्यावरील कवितांचं निर्दाळण करावं ही कल्पना वाचून जाम हसलो.
सारड जोशी म्हणायचे की गाणीकविता लिहिण्यासाठी एक प्रकारची निराशा असावी लागते. माझ्या मते इथे निराशाच्या ऐवजी रितेपणा हा शब्द चपखल बसला असता. रित्या मनी जे भाव दाटून येतात त्यांतनं कविता उमलते. भरगच्च मनात कवितेला जागाच नसते. असो.
द्वारकाबाई गवशीची कविता वाचतांना जनू म्हाजीच माय डोयाफुडं हुबी ऱ्हायली.
आपला नम्र,
-गामा पैलवान