आईमुळे केवढे मोठे संस्कार आमच्यावर आमच्या नकळत झाले!
दिवाळी २०२० - लेख
वासंती दामले
  • वासंती दामले यांच्या मातोश्री
  • Mon , 16 November 2020
  • दिवाळी २०२० लेख वासंती दामले बडोदा हुजूरपागा सयाजीराव गायकवाड

असेच एकदा माझ्या बहिणी आणि मी गप्पा मारत बसलो असताना, ‘आईने असे सांगितले होते...’ असे बहीण म्हणताच, प्रमिला माझी घर मदतनीस फणकाऱ्याने म्हणाली, “तुम्हाला सगळे तुमच्या आईनेच शिकवले का?” तिला स्वैपाक किंवा घरकामातील काही वैशिष्ट्यं शिकवताना मी नेहमी ‘माझ्या आईने मला असे सांगितले’ असं म्हणायची. सतत आईचा होणारा उल्लेख ऐकून व बहिणींच्या तोंडूनही तेच ऐकून तिला फणकारा आला होता. आई खूप जगावेगळी होती किंवा तिचे व माझे संबंध नेहमीच उत्तम होते असं नाही. पण वय वाढत गेलं, वेळोवेळी काही अनुभव आले व अनेक आत्मचरित्रं वाचताना मला किती चांगलं बालपण मिळालं या विचारानं वाटलं; आपले अनुभव वाटून घ्यावेत. तोलस्तोय म्हणालाय की, ‘all happy families are alike’. तरीही आईच्या आम्हाला वाढवण्यातील वेगळेपण मागे वळून पाहताना जाणवतं.

माझा जन्म झाला तेव्हा माझी आई बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला होती. अर्थात हे सर्व ऐकलेलं.... वडिलांनी जेव्हा तिच्याशी लग्न करायची इच्छा माझ्या आजोबांकडे व्यक्त केली, तेव्हा त्यांच्याकडून ‘तिचे शिक्षण पूर्ण करीन’ असं वचन आजोबांनी घेतलं होतं. त्या काळच्या मानानं तसा तिच्या लग्नाला उशीरच झाला होता. शिवाय वडिलांना भीती होती की, दुसरा कुणी मध्ये आला तर? वडील गोरे, कोकणस्थ व मामलेदारांचा लेक, तर आईचे वडील शाळेत संगीत शिकवणारे व घरी शास्त्रीय गाण्याच्या शिकवण्या घेणारे! शिवाय कोकणस्थ नाही. त्यामुळे माझ्या वडिलांच्या आईला फारसं पसंत नव्हतं.

दोन्ही घरचं मी पहिलं नातवंड, पण वडिलांकडील आजोबा खूप पूर्वी वारलेले व त्यामुळे कुटुंब थोडेसं विस्कळीत झालेलं! शिवाय त्या घरात स्त्रियांच्या शिक्षणाचं अगत्य कुणाला नव्हतं. माझ्या आत्या व मोठी काकू आठवी-नववीपर्यंत शिकलेल्या. म्हणून आईच्या घरानं मला सांभाळायची जबाबदारी घेऊन तिला कॉलेजला जायला व अभ्यास करायला मोकळी दिली. मावशी गाण्याचा रियाज मला समोर दुपट्यावर टाकून माझ्याकडे बघत करायची. मधला मामा मॅट्रिकला होता. त्याच्या मांडीवर माझं खेळणं व झोपणं त्याचा अभ्यास चालू असताना व्हायचं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

आई अशी बी.ए. झाली व बाबा नोकरी घेऊन बडोद्याला आले. बडोद्याच्या उन्हाळ्याचा मला जास्तच त्रास झाल्यानं मोठ्या मामानं सांगितलं की, आता प्रत्येक उन्हाळ्यात पुण्यालाच यायचं. त्यामुळे माझं बालपण जास्त पुण्यात व सर्वांकडून लाड करून घेण्यातच गेलं.

मी का व केव्हा पुण्यात आजोळी राहायला आले ते आठवत नाही; पण आई-बाबा केव्हातरी येणारे व भरपूर लाड करणारे असेच आठवतात. फक्त ‘आईची आठवण येते’ असं म्हटलं की, परवचा म्हणण्यापासून सुटका होते, एवढी अक्कल होती.

बाकी मामा-मावशीवर हक्क गाजवणं मला नेहमीच नैसर्गिक वाटत आलं आहे. मोठी झाले व त्यांना त्यांची कुटुंबं झाली, तरी माझे लाड चालू होतेच. चौथीपर्यंत पुण्यात हुजुरपागेत काढून मला बडोद्यात आणण्यात आलं. हुजूरपागा तेव्हा हिरवीगार व प्रशस्त होती. त्यामानानं बडोद्याची शाळा रुक्ष होती. पण धाकट्या दोन बहिणींच्या सहवासात दिवस ठीक चाललं होतं. पुण्यात मी सगळ्यात लहान होते. त्यामुळे मला भांडता येत नव्हतं. खेळताना मी जर रडत आईकडे गेले तर आईनं ‘तुला मारलं आहे, तर तू एक दणका दे’ असं अनेक वेळा सांगितल्यावर एकदा हिंमत करून बहिणीच्या पाठीत दणका दिला. ती तेव्हा बारकुलीशी होती. दणका जरा जोरात लागला. त्यानंतर आमचं सख्य झालं.

भांडणातसुद्धा आईचे नियम सांभाळून भांडावं लागे. म्हणजे गालावर मारायचं नाही, कारण चुकून जोरात लागलं तर कायमचं बहिरेपण येऊ शकतं, हे तिने जवळ घेऊन समजावून सांगितलं होतं. कुल्यावर मारायचं, पाठीतही शक्यतो कमी व नियमाविरुद्ध वागल्यास जो चुकेल त्याला आई शिक्षा करील. नियमात राहून मारामारी करणं तसं कटकटीचंच होतं आणि वाचत बसणं मला अधिक प्रिय होते. त्यामुळे मी लवकरच या सगळ्यातून दूर झाले.

आईने ‘चांदोबा’ मासिक मी येणार म्हणून चालू केलं होतं. ते देण्यासाठी आम्हाला रोज पेपर देणाऱ्या उपासनीकाकांची बहीण यायची. कधी कधी त्यांना उशीर व्हायचा, बाजारात मासिक आलेलं असायचं व मला घाई असायची; म्हणून एकदा कुरकूर केल्यावर आईने ठाम आवाजात, मला समजावून सांगितलं की, त्या विधवा आहेत, भावाच्या आश्रयानं राहतात, त्यांना थोडी मदत होते; तेव्हा त्या आणतील तेव्हाच ‘चांदोबा’ वाचायचा.

मला नाचायला खूप आवडायचं व आमच्या ‘मोहोल्या’तील गणपतीत मी खूप नाचायची. गाणाऱ्या घरातील असल्याने सुरात गायची पण! त्यामुळे दरवर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनात मी ग्रुपडान्समध्ये नाव द्यायची व शिक्षिका म्हणायच्या ‘ग्रुपसाँगमध्ये ये’ कारण इतर मुली बेसूर गातात. मग जरासं रुसणं होऊन मला दोन्हीत भाग घ्यायची परवानगी मिळायची. त्यामुळे मला नाच शिकण्याची तीव्र इच्छा होती.

मी दहा वर्षांची असताना ‘झनक झनक पायल बाजे’ हा सिनेमा पाहिला व मला गोपीकृष्ण फारच आवडला. माझ्या स्वप्नात येणारा पहिला पुरुष गोपीकृष्ण. स्वप्नात मी त्याच्याकडून कथ्थक शिकायची. दोन-तीन वेळा तरी तो सिनेमा मी पाहिला असेल. आणि प्रसंग, डॉयलॉग, तोंडपाठ. तसंच त्याच वेळी ‘आशा’ हा सिनेमा आलेला आठवतो. त्यात वैजयंतीमालाच्या नाचावर मी फिदा. किशोरकुमारही त्याच्या नाचामुळे व गाण्यामुळे खूप आवडायचा. पण आईने मला बडोद्यात सोय असूनही नाच शिकू दिला नाही. त्या रागापायी गाणं शिकायला पण मी खळखळ केली. खरं म्हणजे मला दोन्ही आवडायचं, पण माझ्या नाचण्यामध्ये गाणं कडमडायचं. त्याचा राग माझ्या मनात अनेक वर्षं होता.

..................................................................................................................................................................

नवरा तिचा छळ करत होता, तिने घरी सांगताच, ‘तुझं लग्न करून दिलं आहे. तुझं तू बघ,’ असं घरच्यांनी सांगितलं. डॉक्टर नवऱ्यानं हळूहळू विष दिलं. मालविकाला आपण मरतोय याची कल्पना असताना, ती तशीच अंथरुणात पडून होती. मी सर्व ऐकत तिथं होतेच. वय वर्षं १०-१२. लगेच आईला म्हणाले, “मी अशी कुणाच्या हातानं मारणार नाही हं! तू असं म्हणालीस तर घरातून पळून जाईन, पण मरणार नाही.” आई सर्व ऐकून हादरलीच होती. वर माझं बोलणं ऐकून रडायलाच लागली व म्हणाली, “तुमचं लग्न मी तुमच्या सुखासाठी लावून देणार. माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील.”

..................................................................................................................................................................

पुढे आईशी चर्चा करताना तिने तिचं म्हणणं, “वयानं मोठं झाल्यावर गाणं आपण स्वान्तसुखाय म्हणू शकतो. तसं तू नाच करू शकणार नाहीस. गाणं कायम आपल्या बरोबर राहतं.” मला फारसं पटलं नाही; पण त्या काळच्या समजुतीप्रमाणे तिचा निर्णय होता हे आता कळतं, पण तरीही नाराजी होतीच.

तसंच नाटकातून काम करण्याबद्दल! बडोद्यात मराठी नाटकांची संस्कृती होती. कॉलेजमध्ये गेल्यावर काही वर्षं नाटकातून कामं केली. ती चांगली होऊन अनेक नाटकातून आमंत्रणं येऊ लागल्यावर, तिने काहीतरी कारणं सांगून मला काम करू दिलं नाही. त्यावर आमचे वाद झालेच व काही वर्षांनंतर तिला कारण विचारलं असता, ‘तू व्यावसायिक नाटकात जाशील अशी भीती वाटली’ असं म्हणाली. पण मला त्याचा राग आला नाही, कारण दिल्लीत जाऊनही मी नाटकांत काम करत होते. व्यावसायिक नाटकात काम करण्याचा विचारही नव्हता व ती हौस त्यामानानं भागली होती.

बडोद्यात कॉलेजमध्ये नाटक शिकवणारे आमचे गुरुजी श्री यशवंत केळकर हे अल्काझींचे शिष्य. त्यांनी शिकवल्यामुळे नाटकाचं भान जास्त चांगल्या तऱ्हेनं आलं. पण हे बरेच पुढे. पण त्या काळात वैजयंतीमालाचा ‘लडकी’ नावाचा सिनेमा आला होता. आई-बाबा दोघेच सिनेमा बघायचे, पण मुलींना दाखवण्यासारखा असला की, परत आम्हाला घेऊन जायचे. तर ‘लडकी’ बघताना, वैजयंतीमाला सुरुवातीलाच घोड्यावरून चालली आहे, गाणं चालू आहे- “मै हूं भारत की नार...”, तेवढ्यात तिला बायकोला मारणारा पुरुष दिसतो. ती घोड्यावरून उतरून हातात असलेल्या लगामानेच त्या माणसाची पाठ सोलून काढते. आई आम्हाला सांगत होती, ‘असं मुलींनी झालं पाहिजे... अन्याय सहन करता कामा नये.’ त्यामुळे पुढेही छेड काढणाऱ्या मुलाच्या तोंडात मी भडकावली किंवा माझ्या सायकलीला कट मारून मला पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पाडलं, तेव्हा ती माझ्या पाठीशी उभी राहिली.

आई-बाबा तसे आधुनिक. जवळजवळ रोज बाबा ऑफिसमधून आले की, दोघं बाहेर जायचे. आमच्या सोबतीला आमच्या बाई असायच्या व आई घरी येईपर्यंत त्या थांबायच्या. त्या आईपेक्षाही वयानं मोठ्या होत्या. त्यांना मुलंबाळं नव्हती. माझ्या नंतरच्या बहिणींच्या जन्मापासून त्या होत्या. त्या तिला ‘सोन्या’ व धाकटीला ‘पट्या’ (पोपट) म्हणायच्या. ही फक्त त्यांची नावं होती, दुसऱ्या कुणीच त्यांना त्या नावानं हाक मारली नाही. त्यांच्या मुलं नसण्याचा उल्लेखही आम्ही कधी ऐकला नव्हता किंवा त्यांची जात कुठली हे आजही मला माहीत नाही. त्या कोकणच्या होत्या व राजवाड्यात कामाला होत्या, एवढंच आम्हाला माहीत होतं. कधीकधी राजवाड्याच्या गमतीजमती त्या आम्हाला सांगायच्या म्हणून ते माहीत होतं. त्या वयानं मोठ्या म्हणून ‘अहोजाहो’ करायला आईने शिकवलं होतं. नवीन साडी नेसल्यावर आई त्यांच्या पाया पडायची व आम्हीही सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या पाया पडायचो.

आमच्या घरात भिंतीला टांगलेला छोटासा देव्हारा होता. त्यात आईला लग्नात मिळालेली अन्नपूर्णा व बाळकृष्ण होता. आई घरात नसली की, तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावण्याची जबाबदारी बाईंची होती. पुढे मोठी झाल्यावर वर्गातील मुलींना याचं आश्चर्य वाटल्याचं आठवतं. माझ्या मोठ्या मामाच्या लग्नाला आमच्या बरोबर त्या पुण्याला आल्या होत्या. तिथली मजेदार आठवण आहे. मला वाटतं की, लग्न होऊन बडोद्याला आल्यावर त्या माहेरी कधीच गेल्या नसाव्यात. त्यामुळे त्या प्रवासात त्यांना बालपणीची खूप आठवण येत होती. गावची नदी, झाडं, तिथं मिळणारे चिकूच्या रंगाचे आळू वगैरे त्या प्रवासात त्या आम्हाला सांगत होत्या. पुण्यात त्यांना ताप आला. त्यामुळे झोप लागेना. रात्रभर त्यांची तक्रार चालली होती की, पुण्यात घड्याळेच नाहीत. आम्हाला काही कळेना... मग लक्षात आलं की, बडोद्यात सयाजीरावांनी ठिकठिकाणी घड्याळे असलेले टॉवर उभे केलेले आहेत. गोरगरिबांना त्यांच्या टोल्यांवर आयुष्य काढायची सवय झालेली असणार. ते टोले ऐकू न आल्यानं त्यांची रात्र सरत नव्हती. त्या आजारपणात आईने त्यांचे पायही चेपून दिले, पण त्याची फारशी चर्चाही घरात झाली नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

वळून बघताना केवढे मोठे संस्कार आमच्या नकळत आमच्यावर झाले, हे जाणवतं. आम्ही पुण्याला गेल्यावर बाबांना सुट्टीच्या दिवशी कधी कधी कंटाळा यायचा, म्हणून ते स्वैपाकघरातले पत्र्याचे डबे काढून रंगव वगैरे उद्योग करायचे. त्यांनी स्वैपाकघरात अशी लुडबूड केलेली बाईंना मुळीच आवडायची नाही. ‘ताईंना तुमचं नाव सांगीन’ अशी धमकी मग बाबांना मिळायची. आम्ही तिघीही घर सोडून गेल्यावर त्यांनी रोजचं काम सोडलं, पण आमच्यापैकी कुणीही बडोद्याला आल्याचं कळल्यावर त्या कामावर हजर व्हायच्या. शेवटच्या त्या आल्या ते धाकट्या बहिणीची मुलगी चालायला लागेपर्यंत.

आमचे घरमालक अण्णा बाम दुसऱ्या महायुद्धातून पळून आले होते असं ऐकलं होतं. ते घरातच असायचे. त्यांनी हे घर स्वत: उभं राहून बांधलं होतं. युद्धकाळात म्हणे ते इंग्लंडला होते. त्यामुळे त्या वेळी म्हणजे १९४२-४३ साली आमच्या घरात स्वैपाकाचा उभा ओटा होता. त्या शेजारी भांडी घासायचं सिंक, फ्लटचा दरवाजा बंद केल्यावर बाथरूम व संडास वेगवेगळे. एका दालनाला लागून ड्रेसिंगरूम व स्वैपाक घराला लागून स्टोअररूम! असं आधुनिक घर होतं. पाण्याची टाकी खाली होती व पंपानं वर पाणी चढवायची सोय होती, पण माणूस अतिशय खडूस असल्यानं त्यांनी भाडेकरूंना हे सुख कधीच मिळू दिलं नाही. कायम आम्हाला खालून पाणी आणून भरायला लागायचं. आईवर ते ‘खुश’ होते, पण आईला ते अजिबात आवडायचे नाहीत. मी लाडकी होते, पण त्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या असल्याने आई आम्हाला त्यांच्याकडे जाऊ द्यायची नाही. त्यामुळे सगळ्या शिव्या मला माहीत होत्या, पण त्याचा अर्थ पुढे दिल्लीत गेल्यावर कळला.

अण्णा बाम व आम्ही पहिल्या मजल्यावर व खाली आकाबेन व सुज्ञाबेन अशी दोन कुटुंबं होती. आकाबेनचे पती, मोटाभाई आफ्रिकेत पेढीवर काम करायचे. त्यांच्या घरात चार मुली व एक मुलगा असे होते. सुज्ञाबेनचे पती लालजीभाई रेल्वेत बदलीच्या ठिकाणी होते, कधीकधी असायचे. त्यांच्या घरात निलधराबेन (नीलाबेन) व सुभाषभाई अशी दोन मुलं होती. शिवाय सुज्ञाबेनच्या भावाचे मित्र फत्तुभाई पालेजवाला हे येऊनजाऊन असायचे.

खालच्या घरांची रचना अशी होती की, त्यांच्या तिन्ही खोल्यांचे दरवाजे सताड उघडे ठेवायलाच लागायचे. त्यामुळे प्रायव्हसी अशी नव्हती. सुज्ञाबेनचा मोठा मुलगा मला आठवतेय तेव्हापासून विवाहित व मुंबईला असायचा. आकाबेनची दोन नंबरची मुलगी रमा ही माझ्यापेक्षा सहा-सात वर्षांनी मोठी; पण आई शिकलेली व मी आले तेव्हा एक वर्षाची. त्यामुळे सुश्लाबेन-सुश्लाबेन (सुशीलाबेन) करत ती आईच्या आणि माझ्यामागे असायची. मला तिचा एवढा लळा की, आई-बाबांनी मला विचारलं, ‘तू आमच्याबरोबर बाहेर किंवा सिनेमाला येणार आहेस का?’ तर ‘रमा येणार असली तर!’ हे माझं उत्तर असायचं. एकदा विजयभाई रुसले, ‘नेहमी रमाबेनलाच सिनेमाला नेतात, मला नाही’ म्हणून. त्या दिवशी तेही बरोबर होते. रमाबेनचं लग्न होईपर्यंत मी तिचं शेपूट होते. तीही उत्तम मराठी बोलायला लागली होती.

आकाबेनची धाकटी विशाखा ही माझी धाकटी बहीण वर्षापेक्षा काही महिन्यांनी मोठी. कधीकधी वर्षा हक्कानं विशाखाला बाजूला सारून आकाबेनच्या मांडीवर बसायची. त्याही तिला बाजूला सारून वर्षाला मांडीवर घ्यायच्या. विशाखाची मोठी बहीण बीना ही व माझी मधली बहीण शरदिनी या जन्मापासून मैत्रिणी. त्यामुळे आकाबेनच्या घरात आम्ही सतत असायचो.

आता आठवलं की, कळतं की आफ्रिकेहून मोटाभाई पैसे पाठवायच्या त्यावर आकाबेन काटकसरीनं संसार चालवायच्या. त्यामुळे कधी कोणी आलं की, थोडं दूध घ्यायला किंवा थोडी साखर घ्यायला रमा यायची. पण यावर आमची आई काही बोलायची नाही. निलाबेन शास्त्रीय संगीत शिकलेल्या व उत्तम गरबा करणाऱ्या म्हणून बडोद्यात माहीत होत्या. संगीताच्या आवडीमुळे त्यांचं व आईचं गुळपीठ होतं. त्यांचं देसाई कुटुंब नागर ब्राह्मण होतं. त्यांच्याकडे मुलाकडून लग्नाची मागणी येते. आकाबेन खेडवळ होत्या. त्यांची मोठी मुलगी प्रविणाबेन व निलाबेन जोडीच्या.

ही दोन्ही कुटुंबं आजही आमची सख्खी नातेवाईक आहेत. बडोद्याला गेल्यावर त्यांना भेटणं आवश्यकच होतं. त्याही एकदा भेटायला माझ्या घरी आल्यावर शेजारणींनी विचारलं की, ‘नातेवाईक’ होते का? तेव्हा मी होकारच दिला. आकाबेनच्या एका पुतणीला नवऱ्यानं हळूहळू विष देऊन मारलं. ती गंभीर आजारी असल्याचं कळल्यावर आकाबेन गावी गेल्या होत्या. ती मालविका, आमच्याकडे येणारी होती, म्हणून आकाबेननी वर येऊन काय काय झालं ते सविस्तर सांगितलं.

नवरा तिचा छळ करत होता, तिने घरी सांगताच, ‘तुझं लग्न करून दिलं आहे. तुझं तू बघ,’ असं घरच्यांनी सांगितलं. डॉक्टर नवऱ्यानं हळूहळू विष दिलं. मालविकाला आपण मरतोय याची कल्पना असताना, ती तशीच अंथरुणात पडून होती.

मी सर्व ऐकत तिथं होतेच. वय वर्षं १०-१२. लगेच आईला म्हणाले, “मी अशी कुणाच्या हातानं मारणार नाही हं! तू असं म्हणालीस तर घरातून पळून जाईन, पण मरणार नाही.” आई सर्व ऐकून हादरलीच होती. वर माझं बोलणं ऐकून रडायलाच लागली व म्हणाली, “तुमचं लग्न मी तुमच्या सुखासाठी लावून देणार. माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील.” ही खात्री कायम आमच्यासोबत होती. या नातेसंबंधांबद्दल विचार करताना जाणवतं की, आकाबेन, सुज्ञाबेन व आई आपापल्या घरात कामात व्यस्त असायच्या व कधीही आमच्याकडे जास्त चौकशी किंवा एकमेकींच्या राहणीवरून बोलणं होत नसे. काही विशेष असेल तर वर येऊन व्यवस्थित सांगायच्या. आईही कधी त्यांच्याबद्दल गॉसिप करायची नाही.

बडोद्यात त्या वेळी महाराष्ट्रीय सुशिक्षित समाज छोटा होता. त्यामुळे साधारणपणे एकमेकांना ओळखणारा होता. मी कॉलेजमध्ये गेल्यावर काहीबाही मैत्रिणींकडून कानावर यायचं. आईला सगळं सांगायची लहानपणापासून सवय, पण ती दुसऱ्या बाजूच्या शक्यता दाखवून द्यायची. शाळेत असताना एकदा माझ्या वर्गमैत्रिणीच्या मोठ्या बहिणीला लग्नाआधी दिवस गेले. वर्गातल्या मैत्रिणींनी ‘हॉ...हू’ करत बातमी पसरवली. घरी येऊन मी आईला तस्संच ‘हॉ..हू’ करत सांगितली. मी लहान म्हणजे १२-१३ वर्षांची होते. साहजिकच कळत काही नव्हतं. त्या दिवशी आईनं ‘त्या बिचाऱ्या मुलीबद्दल दुःख व्यक्त केलं. तिचा मित्र सगळं करूनसवरून नामानिराळा राहिल्याबद्दल संताप व सामाजिक रूढी कशा स्त्रीवर अन्याय करणाऱ्या आहेत, म्हणून मुलींनी जपून राहायला पाहिजे वगैरे जाणीवही करून दिली.

अशा घटना नंतरही बडोद्यात घडल्या, पण मी कधीच हॉ..हू करू शकले नाही. दिल्लीला हॉस्टेलवर गेल्यावर मुलींच्या गॉसिपमध्ये सामील होणं मला जड गेलं. माझ्या घरच्या वातावरणापेक्षा मागास वातावरणामुळे मला मुलींशी जमवून घेण्यास अधिक वेळ लागला. नंतर कधीतरी गॉसिप करणं थोडेफार जमूही लागलं. पण अजूनही दुसऱ्यांच्या चौकशा करणं, उगाच मैत्रीचा आव आणून माहिती काढणं जमत नाही व माहिती नसल्यास त्रासही होत नाही.

मी पुण्याहून बडोद्याला आले, तेव्हा शाळा सुरू झाली होती व वडिलांनी माझा प्रवेशही घेऊन ठेवला होता. आमच्या वर्गशिक्षिकेने पुण्याची मुलगी येणार म्हणून माझी भरपूर प्रसिद्धी करून ठेवली होती. म्हणून पहिल्याच दिवशी देशपांडे नावाच्या मुलीनं माझ्याशी मैत्री करून वर्गातल्या सगळ्यांशी परिचय करून देण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. दिघे नावाच्या मुलाबद्दल सांगताना, “तो नं, खूप तोफांनी आहे. एकदा सरांना उलट उत्तर केलं म्हणून सर त्याला मारायला आले तर हा दौडत दौडत आला, बारीवरून कुदला. खाली डोल ठेवली होती, ती उन्धी करून पळून गेला.”

मला काही कळलं नाही. खरं म्हणजे बोलायला लागले तेव्हापासून मला जसं मराठी येतं, तसं गुजरातीही येते. आपण ज्या प्रांतात राहतो, तिथली भाषा आपल्याला आली पाहिजे, अशी विचारसरणी आई-बाबांची असल्यानं गुजराती पेपर कायम घरात यायचा. त्यामुळे मी गुजराती वाचू व लिहूही शकायचे. पण हे बडोद्याचं मराठी पहिल्या दिवशी मला कळलं नाही. बडोद्याच्या मराठीचा अक्सेंट गुजराती असतो व अनेक गुजराती शब्द त्यात असतात. मी त्या वेळी सहा-सात वर्षांची होते. काही दिवसांनी मला गंमत वाटायला लागून तशी भाषा मी घरात वापरली. एकदोन दिवसांनी आईनं मला स्पष्ट बजावले, “तुला गुजरातीत बोलायचं असेल तर गुजरातीत बोल, मराठीत बोलायचं तर मराठी. पण अशी भेसळ केलेली धेडगुजरी बोलायची नाही. भाषा बिघडते.” त्यामुळे व असेही उन्हाळ्याचे दोन महिने पुण्याला जाऊन राहात असल्यानं माझी भाषा पुणेरी राहिली. पण बडोद्याची मराठी दुरूनही कानावर पडली तरी छान वाटतं. त्यानंतर काही दिवसांतच लता मंगेशकरांची एक मुलाखत वाचनात आली. त्यात त्यांनी, “अरे, ये मराठन उर्दू तलफ्फूज क्या दुरुस्त बोलेगी!” असं दिलीपकुमार म्हणाल्याचं वाचनात आलं. मनात आलं, तलफ्फूज अशीही भानगड असते तर! या दोन्ही कारणांमुळे लोकांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकण्याकडे माझा कल झाला. पुढे दुसऱ्या भाषा शिकताना मला त्याचा फायदा झाला.

बालपण माझं चांगलंच गेलं. दोन महिने पुण्यात, नवी नाटकं बघणं, मराठी सिनेमे, घरी एखाद दिवशी सर्व एकत्र बसून मामा आजोबांनी जमवलेल्या शास्त्रीय संगीताच्या, पिन व भोंगावाल्या  रेकॉर्ड लावायचो. मामाची ध्रुव लायब्ररी होती. मी आल्यावर मामा ती पुस्तकं माझ्या स्वाधीन करायचा. मग रोज एक पुस्तक बदलून आणायचं व वाचायचं. कधीकधी दामले काका व  आत्यांकडे जायचे. परत यायची वेळ आली की वाईट वाटायचं, पण बडोद्याला परत आल्यावर पुढचे आयुष्य चालू.

हल्लीहल्ली एकदा मामी म्हणाल्या की, तुम्हाला कधी फ्रॉकची कापडं घेण्याचीही आमची ऐपत नव्हती. हे ऐकून मी गोंधळून गेले. मागे वळून विचार करताना जाणवलं की, पुण्यात दरवर्षी नातेवाईकांची लग्नं व्हायची, आहेर व्हायचे, पण बडोद्याला आल्यावर कुणी काय दिलं वा दिलं नाही, यावर आईनं कधीच चर्चा केली नाही. आम्ही काही खूप पैसेवाले नव्हतो, पण आईचे कष्ट- आमचे नव्या फॅशनचे कपडे ती घरीच शिवायची. पुण्याला गेल्यावर मामेबहिणींना तिनेच शिवलेले कपडे लागायचे, तेही शिवायची. मामी कधीकधी आईला म्हणायच्या की, मुलींना तुम्ही कामाला लावत नाही. त्यांना सासरी जायचं आहे. त्यावर आईनं त्यांना उत्तर दिलं, “अशिक्षित स्त्रियाही घरकाम व स्वैपाक उत्तम करतात. माझ्या मुली शिकलेल्या आहेत. अंगावर पडलं की करतील.” त्यामुळे व अभ्यास व इतर उद्योगांमुळे मला घरकामाची मुळीच आवड नव्हती. चहा-कॉफीही अनुमानधपक्यानं वयाच्या १९ वर्षांपर्यंत करायचे. पण एकदा आईशी बोलताना मी तिला म्हटलं की, मला हे आवडत नाही. मी नोकर ठेवीन. त्यावर तिने सांगितलं, “माझी मनापासून इच्छा आहे की, तुझी सांपत्तिक स्थिती अशी असेल की तुला नोकर ठेवता येतील. पण ज्या दिवशी नोकरांना कळेल की तुला काहीच येत नाही, त्या दिवसापासून तुला आवडेल ते नाही तर त्यांना आवडेल ते तुला खावं लागेल.”

या संभाषणानंतर थोड्याच दिवसांत काहीतरी कामासाठी पुण्याला जावं लागलं आणि तिच्या सांगण्याची प्रचीती मला आली. मी लगेच बाबांना व बहिणींना सांगितलं की, मी बनवेन ते खायला लागेल. त्या वेळेपासून स्वैपाकातील माझे प्रयोग सुरू झाले. आईला एकदा मी म्हटलं की, तू जर आणखी काटकसर केलीस तर आपलं घर होईल. तेव्हा आईनं समजावलं की, फिरती लायब्ररी असणं, गाण्याच्या मैफिलींना जाणं, नाटकं बघणं (बडोद्यात तेव्हा मराठी निवडक नाटकं यायची), दिलरुबा वाजवण्याचा रियाज करणं व त्यासाठी तबलजी येणं, या गोष्टी तिच्या दृष्टीनं आवश्यक आहेत. यातील मर्म आता मला कळतं. माझं बालपण समृद्ध झालं, कारण मी मोठी झाल्यावर या सर्व सांस्कृतिक बाबींमध्ये मलाही सहभागी करून घेतलं गेलं.

..................................................................................................................................................................

आईनं कशाला ‘नाही’ म्हटलं की, बाबा ‘हो’ म्हणणार नाहीत व बाबांनी ‘हो’ म्हटलं की आई ‘नाही’ म्हणणार नाही, हे ते पाळायचे. म्हणून एखादी गोष्ट हवीच आहे असं वाटल्यास आम्ही सरळ बाबांनाच विचारायचो. ते पगार आईच्या हाती आणून द्यायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची जाणीव तिला जास्त असायची किंवा एखाद वेळी मागणाऱ्या लाडक्या लेकींना नाही म्हणणं बाबांना जीवावर यायचं. आम्हीही याचा फायदा कमी वेळा उठवायचो. पण हे त्यांचे संबंध हेही एक शिक्षण होतं, हे आता विचार करताना वाटतं.

..................................................................................................................................................................

आईचे व माझे वाद भरपूर झाले. मी मोठी होत असताना हे वाद झाले. मागे वळून पाहताना, यात दोष हा माझ्या स्वभावाचा, मी ज्या तऱ्हेनं वाढले त्याचा जास्त व थोडा आईचा. मी तीन वर्षांची असताना आजोबांनी मला लिहा-वाचायला शिकवलं. घरच्यांनी व मामाचे एक मित्र किंकरमामांनी मला खूप पुस्तकं घेऊन दिली. लहान असताना, “ये! मी तुला गोष्ट सांगतो/सांगते.” असं म्हटलं की, मी म्हणायची, “नको. ती गोष्ट ज्या पुस्तकात आहे, ते पुस्तकच द्या.” कारण माझी पक्की समजूत होती की, बहुतेक वेळी मोठी माणसं गोष्ट सांगताना शॉर्ट कट मारतात. त्यापेक्षा आपणच वाचू. वाचण्यात माझी एकाग्रता खूप असायची, अजूनही आहे. एकदा वाचलेलं लक्षात राहायचं व पुढील वर्षाची पुस्तकं आली की, गणित सोडून सर्व विषयांची पुस्तकं ताबडतोब वाचून व्हायची. वाचलेलं समजायचं पण.

मी इतर काही वाचताना आढळलं की, आई ‘अभ्यास कर’ म्हणून मागे लागायची. अभ्यास झालाय म्हणून सांगितले की, परत परत वाच म्हणायची. ज्याचा मला कंटाळा यायचा. आई मुलींच्या बाबतीत महत्त्वाकांक्षी होती. मुलींनी करिअर करावं म्हणजे फक्त नोकरी नाही, असं तिला व बाबांना वाटायचं. इतर मासिकं जी घरात यायची त्यात मुलांवर काही लादू नका, असे अनेक लेखांतून सांगितले असायचे. मी डॉक्टर व्हावं ही तिची मनापासून इच्छा होती. पण ही डॉक्टरकी माझ्या अवांतर वाचनाच्या आड यायची म्हणून माझा विरोध!

मासिकातील लेखांमुळे माझ्या बंडाला बळ मिळायचं. बाकीचे विषय आपोआप लक्षात राहायचे, मग गणिताकडे साफ दुर्लक्ष व्हायचं. चांगले मार्क मिळाले तर डॉक्टर व्हायला लागेल ही भीती. तशी मी पहिल्या पाचात असायची, स्नेहसंमेलनात नाचणं, गाणं, नाटकात अभिनय, प्रोजेक्ट सगळ्यात पुढाकार. गणितात जेमतेम मार्क. त्यामुळे मला वाचायला काही कसं मिळणार नाही, असा घरच्यांचा प्रयत्न व माझा प्रयत्न शेजाऱ्यांकडून पुस्तकं मिळवूनही वाचायचे. त्यामुळे मी  गुजराती, हिंदी व कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजी पुस्तकंही वाचू लागले. कॉलेजमध्ये मेडिकलला प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर मी बिनबोभाट आर्ट्सला गेले. त्यानंतर आमच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाची लायब्ररीच मला मिळाली. तेव्हा ती अतिशय समृद्ध लायब्ररी होती व लेक्चर्स संपल्यावर घरी जाण्याऐवजी मी कधीकधी लायब्ररीत वाचत बसायची. शिवाय हट्टानं इतिहास विषय घेतल्यानं अभ्यास ही माझीच जबाबदारी होती.

माझ्या अवांतर उद्योगांवर गदा येऊ नये म्हणून अभ्यास उत्तमच केला पाहिजे, ही अक्कल सुदैवानं त्या १६-१७च्या वयात मला आली होती. आई या काळात माझी ‘बेस्ट फ्रेंड’ झाली. आमचं घर बडोद्यातील सर्वांत मोकळं वातावरण असलेलं घर होतं. मित्रांना घरी यायला मुक्त वाव, वर्षातून एकदा मित्र-मैत्रिणींसाठी पार्टी. त्या पार्टीत आई-बाबा एकदा येऊन सगळ्यांशी परिचय करून जायचे, पण मग खाणं पोचवण्या व्यतिरिक्त घरचं कोणीच मध्ये यायचं नाही. एरव्हीही मी एखाद्या खोलीत गप्पा मारत बसले असता तिथं कुणी फिरकायचं नाही. घर फार मोठं नव्हतं, पण या गोष्टीकडे एका मैत्रिणीच्या आईने निर्देश केल्याने जाणवलं.

बऱ्याच वर्षांनी आईशी चर्चा करताना, मी तिला विचारलं की, बडोद्यात तसं उदारमतवादी वातावरण होतं, पण आपल्या घरचं थोडं जास्त का होतं? त्यावर ती म्हणाली की, “तसं केलं नसतं तर तू मुलांना बागेत जाऊन भेटली असतीस. आणि या तुमच्या गप्पा साध्यासुध्या तर असायच्या. त्यात अडवण्यासारखं काय होतें?” या शेवटल्या भागाशी मी सहमत आहे, पण कुणालाही बागेत भेटायला मी आतुर नव्हते, असं आता विचार करताना वाटतं, कारण माझ्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी चाललेल्या असायच्या. पण आईशी मी काहीही बोलू शकायचे हे मात्र खरं. हे पुढेही कायम राहिलं.

दिल्लीला जाताना तिने मला सांगितलं की, ‘विवाहित असणं व अविवाहित असणं या दोन्हीत फायदे व तोटे आहेत. तू त्याचा विचार करून निर्णय घे.’ त्यानंतर कधीही मी काय करते, यात इंटरेस्ट घेतला, पण मर्यादेपलीकडे जास्त चौकशी केली नाही. शेवटी अगदी म्हातारपणी मला म्हणाली की, “मला जसं जगायला आवडलं असतं तशी तू जगतेस”.

या सर्व कथनात बाबा-माझे वडील फार कमी डोकावले आहेत. आमच्या काळाप्रमाणे मुलांना वाढवणं ही आईचीच जबाबदारी होती. आमच्या बाबांनी आईच्या प्रेमात पडून पुण्याच्या चित्पावन मामलेदाराच्या कुटुंबात, कऱ्हाडे शाळामास्तरची मुलगी आणली होती. सुनांच्यातच नाही तर संपूर्ण कुटुंबात सर्वांत जास्त शिकलेली होती. बाबांचं तिच्यावरील प्रेम व तिच्या शहाणपणावरील विश्वास शेवटपर्यंत टिकून होता. एकमेकांशिवाय त्यांचे कुठलेच उद्योग नसायचे. म्हणजे त्यांची नोकरी व आईचे दिलरुबा वादन सोडून. आईसाठी ते रडके हिंदी सिनेमे बघायचे व त्यांच्यासाठी आई दारासिंगांचे. आईसाठी ते शास्त्रीय संगीताच्या बैठकींना दिवसभर काम करूनही जायचे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्या काळी आमच्या शास्त्रीय संगीतांच्या बैठकी रात्रीच्या जेवणानंतर, पहाटे तीनपर्यंत वगैरे चालायच्या. मी मैफिलींना जायला लागल्यावर कधीतरी ते घरी राहायचे. मग त्यांना पुरुषी इगो वगैरे नव्हता का? तर होता. कधी कधी सगळ्यांसमोर आईची अक्कल वगैरे काढायचे. पण एकटे सापडल्यावर आईने त्यांना सांगितलं की, लोकांना कळतं कुणाला किती अक्कल आहे ते. त्यांचे वाद, भांडणं चालत ते ती दोघंच असताना. आमच्या समोर किंवा इतरांसमोर कधीच नाही. एकटं असताना आई त्यांना झापायची, हेही मला आईनं मी मोठी झाल्यावर सांगितलं म्हणून कळलं.

आईनं कशाला ‘नाही’ म्हटलं की, बाबा ‘हो’ म्हणणार नाहीत व बाबांनी ‘हो’ म्हटलं की आई ‘नाही’ म्हणणार नाही, हे ते पाळायचे. म्हणून एखादी गोष्ट हवीच आहे असं वाटल्यास आम्ही सरळ बाबांनाच विचारायचो. ते पगार आईच्या हाती आणून द्यायचे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीची जाणीव तिला जास्त असायची किंवा एखाद वेळी मागणाऱ्या लाडक्या लेकींना नाही म्हणणं बाबांना जीवावर यायचं. आम्हीही याचा फायदा कमी वेळा उठवायचो. पण हे त्यांचे संबंध हेही एक शिक्षण होतं, हे आता विचार करताना वाटतं.

बाबांनी आम्हाला हट्टानं सामिष खायला घातलं. त्यांचं आवडतं प्रतिपादन होतं, “इतर खातात ते मूर्ख आहेत का? किंवा तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला त्रास होईल.” आमच्या घरात जर कधीही कसलीही पूजा, मुहूर्त बघणं झालं नाही, जातीची, धर्माच्या श्रेष्ठत्वाची चर्चा झाली नाही, त्यात दोघांचंही एकमत होते. दोघंही गांधींना, स्वातंत्र्य चळवळीला मानणारे होते, म्हणून बाबा संडास स्वतः धुवायचे. अशा कुटुंबात संगोपन झालं, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते!               

..................................................................................................................................................................

लेखिका वासंती दामले मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......