‘पुरुषस्पंदनं’ : ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’ यांचा आढावा घेणारा रौप्यमहोत्सवी वर्षातला नावीन्यपूर्ण दिवाळी अंक
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • ‘पुरुषस्पंदनं’ दिवाळी अंक २०२०चं मुखपृष्ठ
  • Fri , 13 November 2020
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank पुरुषस्पंदनं हरीश सदानी Harish sadani मावा MAVA मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲन्ड अब्युज Men Against Violence and Abuse

भारतीय समाज हा पुरुषांचं वर्चस्व असलेला समाज आहे. अशा समाजात स्त्री-पुरुष समानता ही कायमच विषमतेच्या पातळीवर राहत आली आहे. या दृष्टिकोनात बदल घडवून आणावा यासाठी ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲन्ड अब्युज’ अर्थात ‘मावा’ ही संघटना गेली २५ वर्षं महाराष्ट्रात काम करत आहे. महिलांवरील हिंसा आणि लिंगभाव यांविषयी युवक व पुरुषांमध्ये जनजागृती करण्याचं काम ही संस्था करते. स्त्री-पुरुषांकडे पाहण्याची पारंपरिक, साचेबद्ध चौकट मोडून लैंगिक विविधतेचा उदारपणे कसा स्वीकार करावा, यासाठी या संस्थेकडून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.

पण पुरुषी वर्चस्व कमी करून लैंगिक असमानतेबाबतचा समाजाचा दृष्टिकोन बदलणं ही सोपी गोष्ट नाही, नसते. त्यासाठी खूप चिकाटीनं प्रयत्न करावे लागतात. संयमानं हे प्रश्न हाताळावे लागतात आणि तितक्याच संयमानं ते तरुण आणि पुरुषांपर्यंत पोहचवावेही लागतात. हे आव्हान पेलत ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूज’ ही संघटना काम करते. या संस्थेचे सह-संस्थापक हरीश सदानी त्यासाठी विविध उपक्रम, कार्यशाळा, स्पर्धा, चित्रपट महोत्सव यांचा आधार घेतात.

याचाच एक भाग म्हणून या संस्थेतर्फे दरवर्षी ‘पुरुषस्पंदनं’ हा दिवाळी अंकही काढला जातो. ‘माणूसपणाच्या वाटेवरची’ असं या दिवाळी अंकाचं घोषवाक्य आहे. यंदाचा ‘पुरुषस्पंदनं’चा २५वा दिवाळी अंक आहे. गेली २५ वर्षं लैंगिक असमानतेबाबतचे वेगवेगळे पैलू केंद्रस्थानी ठेवून हा अंक प्रकाशित होतो आहे. त्यासाठी हरीश सदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करायला हवं.

यंदा करोनामुळे बहुतेक दिवाळी अंकांसमोर जाहिरातींपासून लेखनापर्यंत आणि वितरणापासून प्रसिद्धीपर्यंत अनेक संकटं उभी ठाकली आहेत. तरीही अनेकांनी आपापल्या परीनं त्या संकटांवर मात करत दिवाळी अंक काढण्याची जोखीम पत्करली आहे. ‘पुरुषस्पंदनं’ हा तर रुढार्थानं वाचकप्रिय नसलेल्या, वाचकांचं कुठल्याही प्रकारे मनोरंजन न करणाऱ्या, किंबहुना अप्रिय विषयावरचा अंक. त्यामुळे अशा प्रकारच्या अभिनव आणि उपक्रमशील अंकांची वाचकांनीही प्राधान्यानं दखल घ्यायला हवी.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

यंदा ‘पुरुषस्पंदनं’ची पानं इतर अनेक दिवाळी अंकांसारखीच थोडीशी कमी झाली आहेत. जेमतेम दीडशे पानांचा हा दिवाळी अंक आहे. हा अंक दरवर्षी एकाच विषयाला वाहिलेला असतो. ते विषय स्त्री-पुरुषांमधील लैंगिक विषमतेशी संबंधित असतात. त्यानुसार यंदाचा विषय आहे – ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’. त्याअनुषंगाने या अंकात या विषयाचा मागोवा घेणारे वैचारिक व ललित लेख आणि कविता यांचा समावेश आहे.

या अंकाच्या संपादकियामध्ये हरीश सदानी यांनी म्हटलं आहे – “लिंगभेद तसेच लिंगभेदावर आधारित हिंसा या संदर्भात एक महत्त्वाचा विषय अलीकडे काही वर्तुळात बोलला जातोय – Toxic Masculinity अर्थात विषारी स्वरूपाची मर्दानगी\पुरुषत्व. या स्वरूपाच्या मर्दानगीचा स्त्रियांवर होणारा वा एकंदर समाजावर कसा प्रभाव पडतो, याविषयी चर्चा, अभ्यास अनेकदा होताना दिसतो. मात्र या स्वरूपाच्या मर्दानगीचा पुरुषांवर, मुलग्यांवर काय प्रभाव\पुष्परिणाम होतो, याबद्दल चर्चा, अभ्यास फारसा होताना दिसत नाही. २०२०च्या ‘पुरुषस्पंदनं’ अंकासाठी आम्ही हाच विषय मध्यवर्ती कल्पना म्हणून घेतला आहे… ‘विषारी मर्दानगी’ व त्याचा स्त्रियांवर तसेच पुरुषांवर, मुलग्यांवर होणारा परिणाम हा तसा work in progress असलेला विषय… स्त्रियांप्रमाणे पुरुषांवरही दुष्प्रभाव, वर्चस्ववादी, मर्दानगीला नाकारून पर्यायी, समताधिष्ठित मर्दानगी अंगीकारण्याची प्रेरणा ‘पुरुषस्पंदनं’च्या अंकाद्वारे वाचकांना मिळो, ही सदिच्छा.”

संपादकांचा हेतू व सदिच्छा मनात ठेवून क्षणभर थांबावं आणि मग या अंकातला ‘ईडनची गिधाडं’ हा अंजन अलवंडर, भूमी थॉमस व अॅमी दिवाण यांचा पहिलाच लेख वाचायला सुरुवात करावी. हा लेख आहे अमेरिकेतल्या तीन भारतीय तरुणांनी लिहिलेला. त्यांची पहिली पिढी अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतरची ही पूर्णपणे अमेरिकेत वाढलेली दुसरी पिढी. वडिलांच्या निधनानंतर मुलाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न, आईचं मूक होणं, वडिलांचं आईशी असलेलं वर्तन, वडिलांचा पोलिसी पेशा, त्यांची समाजातली प्रतिमा आणि घरातला व्यवहार, यांचा आढावा या लेखात आहे. मानसिक आघातांचे परिणाम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे होतात, याचं हा लेख भेदक चित्रण करतो. तेही ‘गिधाड’ या प्रतीकाचा वापर करत.

मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद कल्याणी मुळे यांनी समरसून केल्यामुळे हा लेख वाचताना अंगावर शहारा येतो. विखारी पौरुषत्वाच्या कल्पनेला आव्हान देणारा या लेखातला मुलगा वडिलांच्या सरंजामी मानसिकतेमुळे आईला सहन कराव्या लागलेल्या त्रासाबद्दल आणि तरीही वडिलांचं निधन झाल्यानंतर तिला आलेल्या खिन्नतेबद्दल ज्या पद्धतीनं लिहितो, त्यातून त्याच्या दु:खाची गडद किनार स्पष्ट होते. हा अनुभव अमेरिकेतला असला तरी कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय ताणेबाणे तीव्रपणे नमूद करतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘मानुषी जगण्यासाठी नाकारा ही मर्दानगी…’ या हरीश सदानी यांच्या लेखात पुरुषत्व\मर्दानगीबाबत सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या १) पुरुष म्हणून आपली कामगिरी सतत सिद्ध करणं, २) जोखीम घेण्याची प्रवृत्ती आणि ३) कामगिरी सिद्ध न झाल्यास हिंसक, आक्रमक होण्याची पुरुषी प्रवृत्ती या तीन लक्षणांचा उहापोह केला आहे. याचा नकारात्मक परिणाम केवळ स्त्रियांवरच होतो असं नाही तर पुरुषांवर, मुलांवरही होतो. अनेक मुलांना, पुरुषांना या लादलेल्या प्रवृत्तीचाही त्रास होतो. त्यांनी ‘आपल्या मनात साचलेला, अव्यक्त असा तुंबारा ओकायला हवा; स्वच्छपणे, खुलेपणाने व्यक्त व्हायला हवे. मानुषी जगण्यासाठी, सशक्त समाजनिर्मितीसाठी हे करायलाच हवे’ असं सदानी लेखाच्या शेवटी म्हणतात. शांतपणे हा लेख वाचला तर तो पुरुषांना, मुलांना अंतर्मुख नक्की करेल.

‘सोशल मीडिया, विखारी पुरुषत्व आणि मी’ हा गौतम मेंगळे पत्रकाराचा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्त्रियांवर केले जाणारे विनोद, त्यांच्यावर केली जाणारी निरर्गल टीका आणि त्यांना कमी लेखण्याचे केले जाणारे प्रयत्न, यांना शक्य तिथं उत्तर देण्याचं काम मेंगळे करतात. पुरुषांकडून टर उडवूनही जाऊनही करतात आणि ‘तू कधीपासून ‘फेमिनिस्ट’ झालास?’ असे प्रश्न मैत्रिणींकडूनच विचारले जाऊनही करतात. साध्या साध्या गोष्टींतून कधी विधायक, सकारात्मक काम करता येतं, याचं हा लेख उत्तम उदाहरण आहे.

‘पुरुषातला राक्षस’ हा अवधूत परळकर यांचा लेखही आवर्जून वाचावा असा आहे. परळकर काहीशा तिरकसपणे पण संयत आणि विचक्षणपणे एखाद्या प्रश्नाकडे पाहतात. बारकाईनं विचार करतात. त्यामुळे त्यांची मांडणी एका शांत लयीत असते. असे लेख सहसा वाचकांना उद्दीपित करत नाहीत. पण त्यातली भूमिका अतिशय मननीय असते. “पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करायचा म्हणजे पुरुषाचं राज्य खालसा करून स्त्रीप्रधान राज्य प्रस्थापित करणं नव्हे, तर स्त्रीकडे पाहण्याची पुरुषवर्गाची विखारी आणि भोगवादी भूमिका बदलण्याचे प्रयत्न करणं; स्त्रीपुरुषस्वभाव-विशेषांचं भान ठेवून समाजात समतेचं वातावरण निर्माण करणं हा आहे” ही परळकरांची या लेखातली मध्यमवर्ती भूमिका आहे.

‘माझ्या प्रवाही पुरुषत्वाचा प्रवास’ हा ओमकार वाक्कार यांचा लेख. या लेखाबद्दल म्हटलं तर बरंच लिहिता येईल. पण हा लेख सांगण्याचा नाही तर थेट वाचण्याचा विषय आहे. मुलींऐवजी मुलांबद्दलच आकर्षण वाटणाऱ्या एका मुलाचा प्रवास यात सांगितला आहे, एवढं म्हटलं तरी पुरे. पण तो ज्या निर्मम, साधेपणाने आणि कुठलीही पोझ न घेता सांगितला आहे, ते या लेखाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हा लेख वाचलाच पाहिजे, याचं प्रमुख कारणही आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

‘व्यक्त होण्यास कारण की…’ हा प्रगती बाणखेले सोशल मीडियावर महिलांबाबत पुरुषांकडून होणारं ट्रोलिंग याबद्दल आहे. अनेक महिलांशी बोलून आणि त्यासंदर्भात झालेल्या काही संशोधनाचा आधार घेत त्यांनी हा लेख लिहिला आहे. त्यामुळे तो अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.

‘मर्दानगी आणि लैंगिकता’ हा अनिकेत गुळवणी यांचा लेखही असाच अभ्यासपूर्ण आहे. लेखक मानवशास्त्र व लैंगिकता या विषयांचे अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या लेखाला शास्त्रकाट्याची कसोटीही आहे. “शारीरिक जवळिकीची-स्पर्शाची गरज सतत सर्वांनाच असते. त्यामागे लैंगिक भावना खूप कमी वेळा असते आणि त्याच व्यक्तीचा वेगवेगळ्या वेळेस होणारा स्पर्श वेगवेगळ्या कारणांनी असतो; हे आपण भारतीय लोक किती विसरलेले असतो! ज्या व्यक्तींकडे राजरोसपणे आणि सतत जिव्हाळ्याचा, मायेचा, आधाराचा, खोडकरपणाचा शारीरिक स्पर्श करण्यासाठी इतर व्यक्ती नसतात, ते मानसिकदृष्ट्या खूप काही महत्त्वाचे गमावतात, वंचित असतात. आणि जे प्रत्येक स्पर्शाला लैंगिक स्पर्श समजतात, ते अगदीच अरसिक असतात.” हा शेवट या लेखाचा युएसपी आहे.

‘पुरुषत्वाच्या प्रतिमा आणि विखारी मर्दानगी’ हा रेणुकादास उबाळे यांचा लेख म्हणजे चारु गुप्ता यांच्या ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’ या इंग्रजी मराठीमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकाचा सविस्तर परिचय आहे. विखारी मर्दानगीमागचा आक्रमकपणा हा जात, धर्म यांचं वर्चस्व आणि पितृसत्ताक व्यवस्था या घटकांना कशा प्रकारे नवसंजीवनी देण्याचं काम करतो आणि आक्रमक पुरुषत्वाला प्रोत्साहित करण्यासाठी जातजमातीतील पुरषसत्ताक परंपरा कशा प्रकारे मदत करतात, याचा आढावा या पुस्तकाच्या निमित्तानं घेतला आहे. मूळ पुस्तक वाचण्याची प्रेरणा हा लेख वाचून होते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘आवाज’ : ‘खिडकी चित्रां’चा शिल्पकार, खपाचे विक्रम करणारा हा दिवाळी अंक यंदा ७० वर्षांचा झाला!

..................................................................................................................................................................

‘भाषा पुरुषाची आणि स्त्रीचीही’ या अश्विनी धोंगडे यांच्या लेखातून त्याच्या शीर्षकाप्रमाणे स्त्री-पुरुषांच्या भाषेचा आढावा घेतला आहे. भाषेतून असमानता, मालकी, वर्चस्व यांच्या सीमारेषा कशा प्रकारे अधोरेखित होतात, हे प्रतीत होतं.

‘शैलामागे लपलेला राक्षस’ या लेखात अलका गाडगीळ यांनी व्लादिमीर नोबकोव्ह यांच्या ‘लोलिता’ या जगप्रसिद्ध कादंबरीची समीक्षा केली आहे. ‘‘नोबकोव्हच्या अत्यंत मोहक आणि आकर्षक शैलीची तारीफ होते; पण अल्पवयीन मुलीला फूस लावून जाळ्यात ओढण्याच्या आक्षेपार्ह प्रकरणाला प्रणयानुनयाचे आवरण लावून बुद्धीला पटेल अशी कारणमीमांसा म्हणजेच ही कादंबरी. नोबकोव्ह यांच्या शैली आणि ट्रीटमेंटमुळे हंबर्ट (या कादंबरीचा नायक) बलात्कारी राक्षस म्हणून पुढे येत नाही. मात्र भाषेचा पडदा बाजूला केल्यावर त्याआडची त्याची हिंसा दिसू लागते.’’ या गाडगीळ यांच्या या विधानांतून या कादंबरीची त्यांनी कशा प्रकारे वास्तवाधारित चिरफाड केली आहे, याची कल्पना यावी. हंबर्ट आणि लोलिता यांचे वारसदार आपल्या अवतीभवतीही दिसतात. त्यामुळे त्यांचं लहानपण, निरागसपण टिकवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची कशी गरज आहे, ही कळकळ गाडगीळ यांनी या लेखातून व्यक्त केली आहे.

‘विषारी मर्दानगी संपवते जिंदगानी’ हा संजय सोनटक्के यांचा लेखही मर्दानगीच्या संकल्पना संवेदनशील पुरुषांना कशा जाचक ठरतात, याचा आढावा घेतो. विषारी मर्दानगी ही हिंसाचार, धार्मिक संकुचितता, लैंगितकतेच्या विकृत कल्पना अशा अनेक गोष्टींमधून जन्म घेते. ती बंदिस्त कुटुंबसंस्थेची उपज असते. त्याचा मनस्ताप संवेदनशील पुरुषांना होतो. अशा पुरुषांना त्यासाठी सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. त्यामुळे अशा पुरुषांना बळ देण्याची, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता असल्याचं हा लेख कळकळीचं आवाहन करतो. ते आवाहन तुम्हीआम्हीआपणसगळ्यांनीच स्वीकारलं पाहिजे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

याशिवाय या अंकात डॉ. पद्मरेखा धनकर, गुरुनाथ तेंडुलकर, रोहिदास कवळे, ऐश्वर्य पाटेकर यांच्या कथाही आहेत. त्यांचे विषयही मर्दानगी, स्त्री-पुरुष विषमता यांच्याशी संबंधितच आहेत.  

साहिर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. नीता पांढरीपांडे यांनी त्यांचं व्यक्तिगत जीवन आणि शायरी यांचा घेतलेला आढावाही वाचनीय आहे.

अनिल दाभाडे, महेश केळुस्कर, भारती बिर्जे-डिग्गीकर, गणेश विसपुते, संदेश कुडतरकर, हेमंत गोविंद जोगळेकर, विजय पांढरीपांडे यांसारख्या कवींच्या कवितांचाही समावेश आहे.

या अंकाचं मुखपृष्ठ चित्रकार दाभाडे यांनी केलं आहे. त्यांनीच आतील प्रत्येक लेखासाठीही चित्रं काढली आहेत. ती थोडीशी गडद असली तरी विषयाला समांतर म्हणावी अशी आहेत. ‘पुरुषार्थ म्हणजे’ या विषयीची पानपुरकं, साहिर लुधियानवी (ताजमहल, औरतने जनम दिया मरदों को), गौरव सोलंकी (जेंटलमॅन् किसे कहते है?) यांच्या हिंदी कविताही आवर्जून वाचाव्या अशा आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......