‘डोंगरावर कंदील’ : अनुवादात निसटलेल्या कविता
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
विकास पालवे
  • ‘पहाड़ फर लालटेन’ या हिंदी कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ, मंगलेश डबराल आणि ‘डोंगरावर कंदील’ या त्यांच्या कवितासंग्रहाच्या मराठी अनुवादाचं मुखपृष्ठ
  • Fri , 13 November 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो मंगलेश डबराल पहाड़ फर लालटेन डोंगरावर कंदील

१.

हिंदी भाषेत कविता लिहिणारे जनकवी बाबा नागार्जुन यांनी मंगलेश डबराल यांचा ‘पहाड़ फर लालटेन’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ‘हिंदी कवितेत हा कवी खूप मोठी मजल गाठेल’ अशी भविष्यवाणी केली होती. डबराल यांनी हिंदी साहित्यविश्वात आज कवी म्हणून जे काही स्थान प्राप्त केलं आहे, ते पाहता नागार्जुन यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे, असंच म्हणावं लागेल. डबराल यांचा हा पहिला कवितासंग्रह ‘डोंगरावर कंदील’ या शीर्षकानिशी ‘वर्णमुद्रा’ या प्रकाशनसंस्थेकडून मराठीत रूपांतरित करण्यात आला आहे. रूपांतर असं म्हटलं जातं, तेव्हा अनुवादक गैरवाजवी स्वातंत्र्य घेतो असं बऱ्याचदा दिसून येतं. डबराल यांच्या या रूपांतरित संग्रहातही बऱ्याच गंभीर चुका झालेल्या आहेत. त्यांच्या चर्चा लेखाच्या उत्तरार्धात केली आहे.

डबराल यांचं लहानपण, तरुणपणातील काही वर्षे त्यांचा जन्म ज्या पहाडी भागात झाला, तिथेच गेली आहेत. त्यामुळे तिथल्या भागातील लोकांचा संघर्ष, नात्यांतील ताणेबाणे, निसर्गाशी असलेला संबंध यांची कधीही न पुसली जाणारी अशी एक छाप त्यांच्या मनावर उमटलेली आहे. ते ‘वसंत’ या कवितेत वसंत ऋतूत जाणवणारे अनेक बदल नोंदतात. ‘गारव्याने मरून गेलेल्या इच्छांना जिवंत करणारा हा ऋतू आहे’ असं त्याचं सार्थ वर्णन करतात. ‘चहूकडे दगडांमध्ये लपलेला चेहरा दिसणं’ वा ‘उतरण्यांवरून एखाद्या प्रवाशासारखं अंधाराचं पुढे जाणं’ या प्रतिमांमधून एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. केवळ आवाजांतून दृश्यं निर्माण करणारी ‘आवाज’ ही फार सुंदर कविता आहे. ‘तुझं प्रेम’ ही पहाडी लोकगीतावर आधारित कविता अगदी साध्या भाषेत, नेहमीच्या परिचित प्रतिमांचा सुयोग्य वापर करत लिहिली आहे. डोंगर भागांतील नदीच्या पाण्यासारखी अंतर्बाह्य निर्मळ अशी ही प्रेमाची अनुभूती व्यक्त करणारी कविता आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.facebook.com/aksharnama/photos

..................................................................................................................................................................

हिमालयात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते, त्यावेळी दूरवरून पाहणाऱ्याला ते दृश्य रोमँटिक वाटू शकतं, पण त्यामुळे तिथलं स्थानिक जनजीवन किती आणि कशा प्रकारे विस्कळीत होऊन जातं याचं चित्रण ‘कोसळणं’ या कवितेत केलेलं आहे. विकासाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नष्ट होत असलेल्या नद्यांविषयी लिहिलेली ‘इथे होती ती नदी’ ही अविस्मरणीय कविता आहे. लहानपणी गावातील नदी सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होती. ‘तिच्या पाण्यात पाहिलं की डुचमळणारे चेहरे दिसायचे’, तिच्या देहावर तरंगणारी ‘नाव वाटत पाहत राहायची’ पण आता मात्र तिच्या जागेवर काहीच शिल्लक नाहीय. प्रगतीचा ध्यास घेतलेल्या विकासपुरुषांना, नवधनाढ्यांना आणि आत्ममग्न मध्यमवर्गीयांना या नष्ट झालेल्या नदीच्या तडपण्याचा आवाज येणं शक्यच नाही. हा आवाज फक्त कवीला आणि त्याच्यासारख्या संवेदनशील मनांनाच ऐकू येऊ शकतो. कवी लिहितो की, ‘रात्री जेव्हा लोक झोपेत असतात, तेव्हा त्या वाळूच्या पात्रातून एक आवाज ऐकू येतो कधी कधी.’

नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागांतून शहरात स्थलांतर केल्यानंतर तिथे येणारा अनुभव, आपल्या घराविषयी वाटणारी ओढ यांविषयी अनेक कविता या संग्रहात आहेत. शहरात पदोपदी जाणवणारी परकेपणाची भावना आणि त्याच वेळी त्याचं वाटणारं आकर्षण, या शहरात आपलं व्यक्तिमत्त्व हरवून बसण्याची होणारी जाणीव ‘शहर-१’, ‘शहर-२’ या कवितांतून  व्यक्त झाली आहे. महानगरी वास्तव्याने आपल्या मातीशी, संस्कृतीशी जुळलेली नाळ तुटते आणि एका अर्थशून्य, अमानवी अशा जगण्याचा एक भाग बनावं लागतं. त्यातूनच या कवीला ‘या शहरातील मैदानं संपत चालली आहेत आणि लोक आपला जीव वाचवत कसेबसे जगतायत’ अशी अनुभूती येते. ‘अखेरची घटना’ या कवितेत शहरच एक प्रमुख पात्र म्हणून उपस्थित आहे.

शहरात आल्यानंतरही अनेक वर्षे काहीही न घडता निघून गेल्याची आणि स्वप्नांचा मृत्यू झाल्याची होणारी जाणीव ‘थकवा’, ‘एकटा मनुष्य’, ‘एक दिवस’, ‘पानांचा मृत्यू’, ‘पावलांच्या मागे’, ‘गूपचूप’ अशा काही कवितांत व्यक्त झाली आहे. जगण्यात कोणतीही हालचाल होत नसताना, प्रेम आणि घृणादेखील अनुपस्थित असताना निर्जीवपणे ‘फाटक्या दिवसांना बातम्यांनी झाकून’ आपल्या एकट्या शब्दांच्या विश्वात परतून येत राहणं किती यातनादायी असू शकतं, याचा प्रत्यय ‘गुपचूप’ ही कविता वाचल्यानंतर येतो. हताश आणि उदास झाल्याचा सूर त्यांच्या अनेक कवितांच्या मुळाशी असल्याचं दिसतं. त्यांनी आकाराने छोट्या असणाऱ्या अनेक कविता लिहिल्या आहेत. या कवितांतून एखादा अनुभव, स्वप्नं, दृश्य यांची अभिव्यक्ती होते. या कवितांत अनुभवांची अगदी नेमक्या शब्दांत मांडणी केली आहे. त्यांना चिंतनशीलतेची डूब आहे. त्यातल्या बऱ्याचशा कवितांतून निसर्गाविषयीची आत्मीयताही व्यक्त होते. या दृष्टीने ‘अंगांमधून’, ‘सावली’, ‘घर’, ‘पहाड़’, ‘थरथर’, ‘शब्द’ या कविता पाहता येतील.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्यांच्या कवितांत अनेकदा दृश्यात्मक मांडणी केल्याचं पाहता येतं. ‘चिमणी’ या कवितेतील घरात शिरून मरून पडलेल्या चिमणीचं वर्णन अंगावर काटा आणणारं आहे. ‘हवा त्या चिमणीच्या पंखांना लपेटून मरून पडली आहे’ या एका ओळीतूनच कवी चिमणीच्या मृत्यूसोबत बाहेरचं जगही कणाकणाने मरतंय याचं संसूचन करतो. ‘रेल्वेतल्या सात कविता’ या रेल्वे प्रवासातील अनुभव, प्रवासात केलेलं चिंतन, पाहिलेल्या दृश्यांची निरीक्षणं यांवर आधारित छोट्या सात कविता आहेत. त्यांत मागे पडणाऱ्या काळाची जाणीव आहे, तसेच पाहिलेल्या दृश्यांचा अमिट ठसा मनावर उमटू देण्यातला उत्साहदेखील दिसून येतो.

हिंदीत अनेक कवींनी स्त्रियांविषयी कविता लिहिलेल्या आहेत. स्त्रियांचे अनुभव, त्यांची स्वप्नं, आकांक्षा, सुख-दु:खं व्यक्त करणाऱ्या डबराल यांच्या कविता हिंदीतील स्त्रियांवरील कवितांच्या मांदियाळीत आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहेत. या संग्रहातील कवितांत स्त्रियांचं पारंपरिक वातावरणात रूढ मार्गावरून चालत राहणं, आखून दिलेल्या वर्तुळात वावरणं, अनेक यातना सहन करूनही सहनशीलता न गमावणं, यांविषयी भाष्य केलं आहे. ‘एक बाई’ या कवितेत ते लिहितात, ‘सगळा दिवस राबल्यावर/ एक बाई आठवून पाहते/ उद्याची कामं,’ इथे पूर्ण दिवसभर कष्ट केल्यानंतर फुरसतीच्या वेळेतही कामांचाच विचार तिच्या मनात येत असेल तर ती या कोंडवाड्यात किती खोल रुतली आहे, हे लक्षात येतं. ‘दु:स्वप्न’ या कवितेतही अशाच प्रकारचा अनुभव व्यक्त झाला आहे.

डबराल यांनी अवतीभवतीच्या सामाजिक आणि राजकीय स्थितीलाही आपल्या कवितांतून प्रतिसाद दिला आहे. ‘हुकूमशहा म्हणतो’ ही कविता एका हुकूमशहाची मनोवृत्ती कशा प्रकारची असते यावर भाष्य करते. ‘सम्राज्ञी’ ही कविता इंदिरा गांधी यांच्यावर उपरोधिकपणे टीका करणारी आहे. डबराल यांच्या कवितांत हताशेचा सूर प्रमुख असला तरी ते पूर्णत: नाउमेद झाले आहेत असं वाटत नाही. ‘खिडकी’ या कवितेत ते ‘आपण आपली खिडकी उघडणं ही अनेक खिडक्या उघडण्याची सुरुवात आहे’ असं लिहून ही खिडकी फक्त आपल्यापुरती उघडली जावी, असा अल्पदृष्टीचा विचार आपण करत नाही, हे स्पष्ट करतात. ‘डोंगरावर कंदील’, ‘मुक्ती’ या कवितांतही लढण्याची वृत्ती दिसून येते. एकंदरीत, डबराल यांच्या सकारात्मक दृष्टीचा प्रत्यय येतो.

२.

या कवितांचा मराठीतील अनुवाद मात्र म्हणावा तितका समाधानकारक झालेला नाही. साधारण पंधरा कविता बिनचूक म्हणाव्यात अशा अनुवादित केल्या आहेत, उर्वरित कवितांत बऱ्याच चुका आहेत. हिंदी शब्दांचा अर्थ न कळण्यातून झालेली गडबड, मूळ हिंदीतील वाक्यच नीट न समजल्यामुळे कधी चुकीचा, तर कधी अनाकलनीय झालेला अनुवाद, मूळ हिंदी कवितेत नसलेले शब्द मराठी अनुवादात घुसडणे यांमुळे अनुवादात चुका झालेल्या आहेत.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

हिंदीतील अनेक शब्द वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला इतके परिचित झालेले असतात आणि मराठीत आपल्या सोयीने त्यांचा वापर होत असतो की, त्यांचा नेमका मराठी अर्थ हरवून जातो. पण अर्थात अनुवाद करणारा/री ही सबब देऊ शकत नाही. या संग्रहातील ‘आते-जाते’ या कवितेत दोन ओळी अशा आहेत :

‘यहां आते-जाते मैंने

ऊब के बारे में सोचा...’

या ओळींचा अनुवाद असा केला आहे :

‘इथे येता जाता मी

विचार केला उबेबद्दल’

हिंदीतील ‘ऊब’चा अर्थ वीट येणं, कंटाळा येणं किंवा अस्वस्थ वाटणं असा आहे, जो वरील अनुवादात हरवून गेला आहे. या संग्रहात आणखी एक कविता आहे ‘आ़खिरी वारदात’. या शीर्षकाचा अनुवाद ‘अखेरची घटना’ असा केला आहे. हिंदीत ‘घटने’साठी (प्रसंग या अर्थाने) ‘घटना’ असाच शब्द आहे. मूळ कवीने ‘वारदात’ असा शब्द वापरला आहे, त्याचा मराठी अनुवाद ‘दुर्घटना’ असा असायला हवा. ‘शहर-२’ या कवितेत दोन ओळी अशा आहेत : ‘अपनी मुरझायी टांगें बटोरकर/ हम एक-दुसरे की पीड़ाओं पर झुके ऊंघते हैं.’ त्यांचा अनुवाद असा केला गेला आहे : ‘आपल्या सुकलेल्या तंगड्या वाटत/ एकदुसऱ्याच्या दु:खांवर वाकत पेंगतो आम्ही.’ इथे ‘बटोरना’ या शब्दाचा मराठीतील अर्थ ‘गोळा करणं’ किंवा ‘एकत्र करणं’ असा आहे, हे ठाऊक नसल्यामुळे त्याचा अनुवाद ‘वाटणं’ असा केला गेला आहे.

‘तानाशाह कहता है’ या कवितेत तीन ओळी अशा आहेत :

‘... तानाशाह नेपथ्य से आता है

जो हमारा नहीं उसकी ख़ैर नहीं

कहकर मुसकराता है.’

या ओळींचा अनुवाद असा केला आहे :

‘हुकूमशहा येतो समोर विंगेतून

जो आमचा अंकित नसेल तो कुठेच नसेल

हसत म्हणतो हुकूमशहा.’

दुसऱ्या ओळीचा अनुवाद पूर्णपणे चुकलाय आणि तिसऱ्या ओळीत हुकूमशहा ‘बोलून हसतोय, तो ‘हसत बोलत’ नाहीय. काहींना असं वाटू शकतं की, यामुळे फार मोठा अर्थबदल होत नाही. पण अशा प्रकारच्या बदलांचं स्वातंत्र्य अनुवादकानं केव्हा घ्यायचं असतं, याचाही विचार करायला हवा. स्त्रोत भाषेतील एखादी संकल्पना, एखादा शब्द यांना लक्ष्य भाषेत सुयोग्य पर्याय थेट उपलब्ध नसेल, तेव्हा अशा प्रकारचं स्वातंत्र्य घेणं ठीक आहे. याचं भान या संग्रहाच्या अनुवादात न बाळगल्यामुळे अनावश्यकरीत्या आपल्या पदरचे शब्द काही ओळींत घुसवले गेले आहेत.

‘सबसे अच्छी तारीख़’ या कवितेत दोन ओळी अशा आहेत :

‘तारीखें होती हैं नदी के किनारों पर

झाग की तरह छुटी हुईं’

या ओळींचा अनुवाद असा केला आहे:

‘तारखा असतात नदीकाठी जमत असलेल्या

पाण्याचा सप्तरंगी फेस.’

इथे ‘सपतरंगी’ या शब्दाचं प्रयोजन लक्षात येत नाही. मूळ ओळींत तर तो नाहीच आहे आणि तो अनुवादात नसता आला तरी अर्थबोधात काही हानी झाली नसती असं वाटतं. याच कवितेत शेवटच्या ओळी अशा आहेत :

‘सबसे अच्छी तारीख़ है वह

... जिसे हम काम से भरते हैं

वह तारीख़ जो बाहर रहती है कैलेंडर से.’

या ओळींचा अनुवाद असा केला आहे :

‘सगळ्यात चांगली तारीख ती असते

...जिला आम्ही भरून टाकत असतो आमच्या कामांनी

ती तारीख कॅलेंडरच्या बाहेर उखडून पडलेली असते.’

या ठिकाणी तिसऱ्या ओळीतील ‘उखडून पडलेली’ हा अनुवाद बरोबर वाटत नाही. हे अधिकचे शब्द घुसडण्याची घाई असल्यामुळे की काय पण मूळ संहितेतल्या ओळींतून जाणवणाऱ्या अर्थांकडे फारसं लक्ष दिलं गेलेलं दिसतं नाही.

‘रेल में सात कविताएं’ या कवितेच्या तिसऱ्या भागाच्या सुरुवातीच्या दोन ओळी अशा आहेत :

‘नीचे देखने पर मुझे

अपनी छाया दिखायी देती हैं जमीन पर’

या ओळींचा अनुवाद असा केला आहे :

‘खाली पाहिल्यावर मला

माझी सावली दिसून पडते जमिनीवर’

दुसऱ्या ओळीचा अनुवाद हा शब्दश: अनुवाद केल्यासारखा आणि म्हणून मराठीत वाचताना खटकतो. अशाच प्रकारे ‘पानी की रात’ या कवितेतील ‘पत्थरों पर पानी सिर फोडता था/ पानी के आदमियों जैसे हज़ार सर’ या ओळींचा अनुवाद असा केला आहे : ‘दगडांवर डोकं फोडून घेत होतं पाणी/ पाण्याची माणसं असावीत अशी हजार हजार मुंडकी.’ इथेही दुसऱ्या ओळीत शब्दश: भाषांतर केल्याचं लक्षात येतं.

काही वेळेला साध्या-सरळ ओळींचा अनुवाद करताना निष्कारण दूरचा रस्ता घेतल्यासारखा वाटतो. ‘पहाड़ फर लालटेन’ या कवितेतील शेवटच्या ओळी अशा आहेत : ‘जंगल से लगातार एक दहा़ड़ आ रही है/ और इच्छाएं दांत पैने कर रही हैं/ फत्थरों फर.’ यांतल्या शेवटच्या दोन ओळींचा केलेला अनुवाद पहा : ‘आणि आकांक्षांचे सुळे पाजवले जाताना दगडांवर होणारा/ घासल्या जाण्याचा आवाज.’

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आकाराने मोठ्या असलेल्या कवितांतील काही ओळींचे अनुवाद चुकलेले आहेत, तसे ते छोट्या कवितांच्या अनुवादातही भरकटले आहेत. हिंदीत ‘मकान’ या शीर्षकानिशी असलेली कविता अशी आहे :

‘यह मकान सारा कुछ छिपाये हुए है

अपने अंधकार में औरत

औरत का स्वपन

औरत का बच्चा

औरत की मौत.’

या कवितेचा अनुवाद असा केला आहे :

‘ह्या घराच्या पोटात सारं काही दडवलेलं आहे

त्याच्या अंधारात बाई

बाईचं स्वप्न

बाईचं मूल

बाईचं मरण.’

हिंदी कवितेतली पहिली ओळ वाचली तर लक्षात येतं की, त्या एका ओळीवर पूर्ण कविता उभी आहे आणि नेमक्या त्याच ओळीचा अनुवाद चुकीचा केला गेलाय. मराठी अनुवादातली पहिली ओळ वाचली तर असं वाटतं की, बाहेरून कोणीतरी या घरात काही तरी दडवलेलं आहे, जे मूळ ओळीत तसं नाहीय. याच ओळीचा नीट अर्थबोध न झाल्यामुळे पुढल्या ओळीतील ‘अपने’चा अनुवाद ‘त्याच्या’ असा केला गेलाय, जो ‘आपल्या’ असा असायला हवा. त्यामुळे पुढल्या ओळींच्या अनुवादाला काही अर्थच राहत नाही. ‘वहां’, ‘तुम्हारे’, ‘हमारे’ अशा साध्या शब्दांचे अनुवाद इतरही अनेक कवितांत चुकलेले आहेत. अनेकदा कोणत्या काळातील वाक्य आहे, हेही लक्षात घेतलेलं नाहीय.

‘शहर-१’ ही हिंदीतील कविता अशी आहे :

‘मैनें शहर को देखा और मैं मुस्कराया

वहां कोई कैसे रह सकता है

यह जानने मैं गया

और वापस न आया.’

या कवितेचा अनुवाद असा केला आहे :

‘मी शहराला पाहिलं नि हसलो गालातल्या गालात

इथे कुणी कसं राहू शकतं

ते पाहावं म्हणून मी गेलो

आणि परतून येऊ शकलो नाही मग.’

आता पहिला ओळीतील ‘गालातल्या गालात’चं प्रयोजन काय आहे, हे लक्षात येत नाही. मूळ कवितेत तसं काही सुचवलेलं नाही. ‘जानने’ चा अनुवाद ‘पाहणं’ असा नाहीय, ‘समजून घेणं’ असा आहे. आणि शेवटच्या ओळीत ‘येऊ शकलो नाही मग’च्या ऐवजी ‘नाही आलो’ असं असतं तर ते मूळ संहितेशी सुसंगत ठरलं असतं.

या संग्रहाचा अनुवाद अधिक काळजीफूर्वक, गांभीर्याने आणि जबाबदारीने केला गेला पाहिजे होता असं वाटतं. संग्रहाच्या सुरुवातीला दिलेल्या निवेदनात या संग्रहाचा अनुवाद सुरुवातीला एका व्यक्तीने केला व नंतर त्यात अनाम अनुवादक संघाने फेरबदल सुचवले आणि मग हा अंतिम तर्जुमा तयार झाला असं नमूद केलं आहे. अनुवाद करताना अनेक व्यक्तींचं सहकार्य घेणं यात काही गैर नाही. पण ज्या एका व्यक्तीने सुरुवातीला अनुवाद केला आहे, तिलाच या अनुवादासाठी जबाबदार धरलं पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव न देण्याचं कारण काही स्पष्ट केलेलं नाही.

स्थलसंकोचामुळे इथं केवळ काही जुजबी उदाहरण दिली आहेत. संपूर्ण संहितेचीच पुन्हा एकदा पुनर्तपासणी करण्याची गरज आहे, असं वाटतं.

..................................................................................................................................................................

लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......