अजूनकाही
अर्णब जेलात(च), भाजप बिहार‘बाहेर’ आणि बायडन व्हाइट हाउसमध्ये
ट्रम्प पराभूत, बिहार भाजप‘मुक्त’ आणि अर्णब ना-‘जामीन’प्राप्त
बायडन राष्ट्राध्यक्ष, अर्णब कैदेत आणि तेजस्वी मुख्यमंत्री
अर्णबची गठडी वळली, भाजप बिहारमधून गायब आणि ट्रम्प व्हाइट हाउस‘मुक्त’
सुसह्य : रिपब्लिक टीव्ही, अमेरिका आणि बिहार
अशा आशयाचे विविध पतंग मागच्या काही दिवसांत सोशल मीडियाच्या माध्यमातून उडवले जात होते. आज वसुबारस. म्हणजे दिवाळी सुरू झाली आहे. यंदा करोनामुळे फटाक्यांवर बंदी असल्याने फटाके फोडले जाणार नाहीत, पण शब्दांचे फटाके आणि घोषणांची आतषबाजी मात्र गेल्या काही दिवसांत बरीच पाहायला मिळाली. वरील विधानांतला आशय त्यापैकीच.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प खरोखरच पराभूत झाले. (जो बायडेन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष होणार असतील, पण आपण काही निवडणूक हरलो नाही, यावरचा ट्रम्प यांचा विश्वास अजूनही प्रगाढ आहे!) त्यांच्याविषयी बहुतेक भारतीयांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरला. अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे काहींना झालेला आनंद मात्र अखेर क्षणभंगूर ठरला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याचबरोबर बिहार भाजप‘मुक्त’ झाले नाही, तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले नाहीत.
गंमत पहा, अमेरिकेत काय घडेल या विषयीचा बहुतेकांचा अंदाज बरोबर निघाला, पण बिहारचे आणि अर्णब गोस्वामींचे काय होईल, या विषयीचे बहुतेकांचे अंदाज मात्र साफ कोलमडले.
भाजप बिहारमधून ‘बाहेर’ झाला नाही. उलट या पक्षाने मागच्या विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली, तर नीतीशकुमारांची कामगिरी मागच्या वेळेपेक्षा वाईट ठरली. त्यांना ‘anti-incumbency’चा बऱ्यापैकी फटका बसला. काँग्रेसने नेहमीप्रमाणे बिहारमध्ये माती खाल्ली. ध्रुवीकरण टाळण्यासाठी आणि भाजपला टीका करण्याची फार संधी द्यायची नाही, अशी काँग्रेसची रणनीती होती म्हणे! त्यासाठी राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त प्रचारात काँग्रेसचे इतर कुणी दिग्गज फारसे दिसले नाहीत. राहुल गांधींनीही तेजस्वी यादव यांच्यासोबत एकही प्रचारसभा घेतली नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस जाणीवपूर्वक ‘सायलेंट मोड’वर होती, असेच म्हणावे लागेल. आपल्याला तर माहीतच आहे की, मोबाईल ‘सायलेंट मोड’वर असतो, तेव्हा आपली ‘रिंगटोन’ कितीही भारी असली तरी तिचे श्रवणसुख इतरांचे सोडा पण आपल्यालाही लाभत नाही. काँग्रेसचे या निवडणुकीत काहीसे तसेच झाले आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे बिहारची विधानसभा निवडणूक करोनाच्या सावटाखाली पार पडली. परवा या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात एनडीएने बाजी मारली आहे. भाजपची ‘बी टीम’ म्हटल्या जात असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला अवघी एक जागा मिळाली. तर बिहारचे सेनापती नीतीशकुमार यांनीही सपाटून मार खाल्ला. या वेळी भाजपच्या जागा नीतीशकुमार यांच्यापेक्षा जास्त निवडून आल्या.
त्यामुळे अशी गंमत झाली आहे की, नीतीशकुमार यांच्या पक्षाला सर्वांत कमी जागा, पण तेच भाजपने जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री होतील. या निवडणुकीत एकटा पक्ष म्हणून सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांना मिळाल्या आहेत. पण त्यांच्याशी युती असलेल्या काँग्रेस आणि इतर पक्षांनी सपाटून मार खाल्ला. त्यामुळे सर्वांत जास्त आमदार निवडून येऊनही तेजस्वी यादव किंवा त्यांच्या पक्षातील इतर कुणी विरोधी पक्षनेता होईल. त्यानंतर भाजपचा क्रमांक लागतो. पण त्यांच्या पक्षाला उप-मुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागेल. आणि तिसऱ्या क्रमांकावर असूनही नीतीशकुमार मात्र मुख्यमंत्री होतील.
शिवसेना, राष्ट्रवादी, ईएमआय-बसप यांच्याकडून तशाही कुणी फार आशा बाळगलेल्या नव्हत्या. हे पक्षही बिहारमध्ये निवडणूक लढवत आहेत, याची माहितीही बहुतेकांना नसेल. त्यामुळे त्यांची फार दखल घेण्याची गरज नाही.
भारतात निवडणुका निवडणूक आयोग घेतो आणि राजकीय पक्ष त्या जिंकून किंवा हरून दाखवतात. सत्तेत असलेल्या पक्षाने आपल्या पाच वर्षांच्या सत्तेच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचे किंवा हरण्याचे तंत्र आता मागे पडले आहे. जनतेचे प्रश्न, त्यांनी दिलेली आश्वासने आणि त्यांची पूर्तता, चांगला कारभार या जोरावर निवडणूक जिंकण्याचा जमाना तर कधीच संपुष्टात आला आहे.
आता निवडणूक तंत्र आणि कौशल्याचा जोरावर जिंकली जाते. ज्याच्याकडे ते आहे किंवा जे त्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकतात, तेच निवडून येतात, हा सरळसाधा हिशोब झाला आहे. हा हिशोब ज्यांना जमवता येत नाही त्यांचे भारतीय राजकारणातले स्थान दिवसेंदिवस घसरत चालले आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
करोनाचे कारण देत विरोधी पक्षांनी बिहारची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती, पण ती मान्य झाली नाही. कारण भाजप निवडणुकीच्या बाजूने होता. करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आपल्याला पुरेपूर फायदा उठवता येईल, असा भाजपला भरवसा असावा. एनडीए निवडून आली तर बिहारी जनतेला करोनाची लस फुकटात दिली जाईल आणि १९ लाख नोकऱ्या दिल्या जातील, असे प्रलोभनही भाजपनेत्यांनी त्यासाठी दाखवले. बिहारची एकंदर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थितीगती पाहता या प्रलोभनाचा भाजपला निदान काही प्रमाणात तरी फायदा झाला असावा.
दुसरा फायदा झाला तो चिराग पासवान यांचा. त्यांनी एनडीएपासून फारकत घेऊन नीतीशकुमार यांच्या विरोधात झेंडा फडकावला. त्याचा फायदा त्यांना काहीही झाला नाही, पण भाजपला बराच फायदा झाला आणि नीतीशकुमार यांना बराच तोटा. याची खात्री भाजपच्या रणनीतीकारांना आधीपासूनच असावी. ती उचित ठरली असेच म्हणावे लागेल.
भाजपचे नीतीशकुमारांचे पंख कापण्याचे मनसुबे, चिराग पासवानची ‘बी टीम’ उभी करण्यामागचे बेत, तेजस्वी यादव-राहुल गांधी यांना ‘जंगलराजचे युवराज’ म्हणून हिणवणे; राममंदिर, कलम ३७०, नागरिकता कायदा यांचे पंतप्रधानांनी दिलेले दाखले, महागठबंधनच्या नेत्यांना ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणून हिणवणे आणि बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा, अशी भाजपची रणनीती या निवडणुकीत दिसली.
बाकी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्या या केंद्र सरकारपेक्षाही तावातावाने आणि हिरिरीने भाजपचा प्रचार करतात. तो त्यांनी या वेळीही केलाच. पण तरीही त्यांना तेजस्वी यादव यांच्या सभांना झालेली गर्दी नाकारता आली नाही. त्यामुळे त्याचा उल्लेख त्यांना अधूनमधून करावाच लागला.
बिहारच्या निवडणुकीत सर्वांत लक्षवेधी कुठली गोष्ट ठरली? तर ती तेजस्वी यादवांच्या सभांना होत असलेली गर्दी. कधी कधी तर त्यांनी एका दिवसात चार चार सभा घेतल्या! एका सभेत त्यांच्यावर चप्पलही फेकून मारली गेली. पण त्याही मतदारसंघात त्यांचाच आमदार निवडून आला.
तेजस्वी यादव यांनी आपल्या सभेला जमत असलेल्या हजारोंच्या गर्दीचे व्हिडिओ सातत्याने ट्विटरवर टाकले. त्याच्या बातम्या झाल्या. त्यावर ढिगाने कमेंटस पडल्या, कित्येकांनी ते शेअर केले. ‘तेजस्वी यादव’ हा बिहारचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहे, असे अनेकांनी सांगायला सुरुवात केली.
खरे तर तेजस्वीकडे पंतप्रधान मोदींसारखे फर्ड वक्तृत्व नाही. त्यांच्याकडे फार आक्रमकपणाही नाही. विखारी भाषासुद्धा नाही. तरीही त्यांच्या सभांना महामूर गर्दी होत होती. ती नीतीशकुमारांच्या प्रशासनाला कंटाळलेल्या तरुणांची होती, असे सांगितले गेले. असेलही.
तेजस्वी हे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र. त्यात लालूप्रसाद सध्या तुरुंगात. पण तेजस्वीने त्याचेही फार भांडवल केले नाही. निकालानंतर आपले वडील बाहेर येतील आणि नीतीशकुमार आत जातील, असे ते म्हणाले. पण त्यावर तेव्हाही फार कुणी विश्वास ठेवला नसेल. पण हे खरे की, तेजस्वी यांनी लालूप्रसाद यांचे नाव वापरून किंवा पुण्याई वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तसे करून ती त्यांना मिळाली असती का, हाही प्रश्न आहेच. पण हे कार्ड वापरण्याचा मोह त्यांनी टाळला हे खरेच. त्यामुळे ही निवडणूक त्यांनी पूर्णपणे स्वत:च्या बळावर लढवली, असेच म्हणावे लागेल.
काहींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही तेजस्वी सभांना जास्त गर्दी जमते आहे, असेही सांगायला सुरुवात केली होती. निवडणूक प्रचाराच्या काळात विशेषत: दोघांच्याच सभांची जास्त चर्चा झाली. एक तेजस्वी यादव आणि दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नीतीशकुमार पंतप्रधानांसोबत होते, पण हवेत, वातावरणात मोदीच राहिले. ‘सुशासन बाबू’ अशी ओळख असलेल्या नीतीशकुमारांची या निवडणुकीत जादू चालली नाही. ते सुरुवातीपासूनच काहीसे केविलवाण्या स्थितीत राहिेले.
या निवडणुकीत भाजपला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजपची बिहारमध्ये जादू चालली असेही म्हणता येणार नाही. बिहारमध्ये फक्त तेजस्वी यादव यांची जादू चालली. भलेही त्यांची युती निवडणूक जिंकू शकली नाही, पण त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. प्रचाराच्या काळात त्यांच्या सभांना सर्वाधिक प्रमाणात गर्दी होत होती. त्यांत तरुणांचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यांनी बेरोजगार तरुणांना १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. त्याचा तो कदाचित परिणाम असावा. महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे ते उमेदवार होते. त्यामुळेही तरुण त्यांच्याकडे आकर्षित झाले असतील.
काहीही असो, बिहारची निवडणूक एनडीएने जिंकली. नीतीशकुमार ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री होतील. पण या निवडणुकीचा खरा आणि एकमेव विजेता तेजस्वी यादव आहेत! या निवडणुकीत त्यांनी एकट्याच्या बळावर आपला करिष्मा दाखवून दिला. त्यामुळेच बहुतांश मतदानोत्तर निवडणूक अंदाज सर्वोक्षणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला सर्वाधिक जागा मिळतील, असे सांगितले गेले होते. हेही अलीकडच्या काही वर्षांतले आक्रितच म्हणावे लागेल.
तेजस्वी यांची ‘खेळी’ सुरुवातीपासूनच दमदार राहिली. तेजस्वी २००८ ते २०१२ या काळात ‘दिल्ली डेअर डेव्हिल्स’ या क्रिकेट संघात होते. क्रिकेटमध्ये काही त्यांना आपला जम बसवता आला नाही. पण बाप तुरुंगात असताना आणि काँग्रेसची म्हणावी तशी साथ नसताना त्यांनी बिहारच्या राजकारणाच्या मैदानावर मात्र दमदार ‘खेळी’ केली! त्यामुळे क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘बिहार निवडणुकीचा सामना भाजपने जिंकला, पण ‘मॅन ऑफ द मॅच’ तेजस्वी यादव ठरला!!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment