अजूनकाही
१. शिवसेनेवर घाणेरडी टीका करणार असाल तर आज फक्त घसा बसलाय, उद्या कायमचे घरी बसाल. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंगार आहे. या आगीशी खेळू नका. : शिवसेनेचा इशारा
मुंबईतला मराठी माणूस जोपर्यंत या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या तीन अंकी ऐतिहासिक भरजरी बडबडनाट्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर हौसेने या अंगारांचे चटके खात कल्याण-विरारपल्याड शिफ्ट होण्याची पाळी येतच राहणार.
………………………………….………………………………….
२. डॉ. मनमोहन सिंग परदेशात भ्रष्ट देशाचा पंतप्रधान म्हणून ओळखत असत. पण, नरेंद्र मोदींमुळे जागतिक नेतृत्वाची हिंमत भारतामध्ये निर्माण झाली. जगभर देशाचा मानसन्मान वाढला. भाजपाच्या सरकाराने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावताना, सर्वसामान्यांच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे सर्वत्र विश्वासाचे वातावरण असल्याने सध्या भाजपा हा देशातील सर्वांत मोठा पक्ष बनला असून, निवडणुकांमधील घवघवीत यशाची मालिका कायम राहील. : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
टाळ्या टाळ्या टाळ्या. दानवेसाहेब, हा बलशाली, हिंमतबाज भारत नेमका कुठे आहे, ते तरी सांगून टाका. बऱ्याच लोकांना आवडेल तिकडे शिफ्ट व्हायला. बाकी ते जगाचं नेतृत्व वगैरे जरा हळूच बोला. तिकडे ट्रम्पतात्यांनी ऐकलं तर ते भारतातून येणाऱ्यांवरही व्हिसाबंदी लादतील आणि मग मॅडिसन स्क्वेअरवर जगाचे नेते भाषण कुणासमोर करतील?
………………………………….………………………………….
३. माझ्यामध्ये कम्पाऊंडर बनण्याचीदेखील पात्रता नव्हती. मात्र मला केंद्रीय आरोग्य मंत्री बनवण्यात आले. : भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा
शांतता शांतता! शत्रुघ्न सिन्हा यांनी हे विधान फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त भूतपूर्व एनडीए सरकारमधल्या त्यांच्याच निवडीबद्दल केलं असून या विधानाचा विद्यमान सरकारमधल्या कोणाच्याही नियुक्तीशी कसलाही संबंध जोडू नये… खामोश!!!
………………………………….………………………………….
४. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास मज्जाव घातल्यानंतर जगप्रसिद्ध कॉफी चेन स्टारबक्सने पाच वर्षांमध्ये १०,००० निर्वासितांना नोकरी देऊन ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणार असल्याचं जाहीर केलं.
अरे देवा, आता उदारमतवाद्यांना स्टारबक्सची ती बेचव कॉफी केवळ तत्त्वाचा प्रश्न म्हणून वारंवार प्यावी लागणार की काय! ट्रम्प निवडून आल्यामुळे ही वेळ येईल, अशी अमेरिकनांना पुसटशी जरी कल्पना असती, तरी त्यांनी केवळ त्या भीतीने हिलरी क्लिंटनना निवडून दिलं असतं.
………………………………….………………………………….
५. पाच राज्यांमधल्या निवडणुकांमधील उमेदवारांसाठी बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा शिथिल करून वाढवावी असे पत्र निवडणूक आयोगाने रिझर्व्ह बँकेला लिहिले आहे. उमेदवारांना प्रचारासाठी रोख रकमेची आवश्यकता असल्याने आठवड्याला २४,००० रुपये त्यांना कसे पुरतील? असा सवाल करून ही मर्यादा वाढवून आठवड्याला दोन लाख रुपये करावी, अशी विनंती निवडणूक आयोगाने आरबीआयला केली आहे.
सर्वपक्षीय उमेदवार बँकेतून आठवड्याला दोन लाख रुपये काढून त्यातून प्रचार करणार आहेत, अशी निवडणूक आयोगाची गैरसमजूत कशामुळे झाली असेल? एखादा उमेदवार असं करतो आहे, असं मतदारांना कळलं तर तो त्याच्यासंदर्भात 'अपप्रचार' ठरून त्याची सीट धोक्यात येईल.
………………………………….………………………………….
६. राहुल गांधींनी लग्नाचा विचार केल्यास त्यांचं येणारं बाळही आगामी काळात विरोधी पक्षाचा नेता होईल. : अमित शाह
खरं आहे. पण, साधनशुचितेचा जप करणाऱ्या शुचिर्भूत पक्षाला तडीपार, दंगलखोर गुंड अध्यक्ष म्हणून लाभण्यापेक्षा ही स्थिती कमी लाजिरवाणी असेल, नाही का?
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment