अजूनकाही
मिलिंद सोमणने त्याचा पंचावन्नावा वाढदिवस गोव्यामध्ये (त्याच्याहून निम्म्या वयाच्या) त्याच्या जोडीदारासोबत साजरा केला आणि त्याची इन्स्टाग्रामवर छायाचित्रं टाकली! त्यामुळे खरं तर नेहमीसारखे काही उष्ण उसासे, काही असूयायुक्त निःश्वास फक्त पडले असते!! पण त्याने त्या छायाचित्रांमध्ये स्वतःचं किनाऱ्यावर नागवा धावतानाचं एक छायाचित्र टाकलं आणि त्यामुळे पुष्कळच खळबळ उडाली. म्हणजे उसासे नुसते दीर्घ न राहता प्रदीर्घ झाले; काहींची असूया आकाशाला भिडली, पण महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी त्या छायाचित्राकडे पुन्हा पुन्हा बघत काही ना काही प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिली.
बऱ्याच नेटीझन मंडळींनी विनोदाचा आधार घेतला. त्याने मास्क कुठे आणि कसा घालायला हवा होता, अशा वात्रट चर्चा झडल्या. त्यात टिंगलटवाळीही अधिक होती. मोजक्या काही जणांनी मिलिंदच्या कृतीचं फिटनेसच्या संदर्भात स्वागत केलं. अनेकांनी त्याला झोडपलं. संस्कृती रक्षकांची आय-माय-बहिणींवरून शिव्या घालण्याची सगळी हौस या निमित्ताने कशी ओसंडत बाहेर पडली!
बऱ्याच जणांनी लगोलग पूनम पांडेवर केस झालेली स्मरून पुरुष आणि स्त्रिया यांना कसा वेगळा न्याय लावला जातो हे स्पष्ट केलं. (त्यासाठी अर्थातच त्यांनी पूनमची ती छायाचित्रं निर्मम चित्तानं केवळ विशुद्ध पुरावा म्हणून सोबत जोडली!) आणि मग बघता बघता खरोखर गोव्यामध्ये या नग्न मदनावर केस ठोकली गेलीच.
काहींनी यात राजकारण पाहिलंच. आणि असावंही. नुकतंच पंतप्रधान मोदी यांनी फिटनेस संदर्भात जो ऑनलाईन कार्यक्रम घेतला, त्यामध्ये ऋजुता दिवेकर, विराट कोहली यांच्यासोबत मिलिंद होताच. त्याचं वय पंतप्रधानांनी कौतुकानं विचारलं होतं. त्या प्रश्नाचं उत्तर तो त्याच्या पंचावन्नाव्या वाढदिवसाला अशा तऱ्हेनं संपूर्ण आरपार आरस्पानी होऊन देणार आहे, अशी कल्पना त्यावेळी कुणालाच नसावी. पण त्याने ते दिलं आणि लगोलग गोव्यामधील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी गोव्याच्या अस्मितेचा मुद्दा मांडत मिलिंदवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. तीन-चार दिवस असा हंगामा उठल्यावर आता दिवाळी आणि आयपीएल यामुळे समाज पुढे सरकला आहे आणि सगळं काही शांत शांत आहे.
पण या निमित्ताने काही प्रश्न आणि काही उत्तरे पडत-मिळत आहेत आणि ती मात्र थोडक्यात मांडली पाहिजेत असं वाटत आहे. कपडे घालणं हा समाजमान्य संकेत आहे आणि तो जगभर आहे. अगदी पोहतानाही निर्वस्त्र होऊन कुणी पोहत नाही. अर्थात देशागणिक हे संकेत बदलतात हेही ध्यानात घ्यायला हवं. जपानमध्ये गरम पाण्याची जी कुंडं असतात, त्यात संपूर्ण नग्न होऊनच उतरावं लागतं. (सचिन कुंडलकरांच्या ‘शरीर’ या लेखात त्या अनुभवाचा अर्क आहे.)
मध्यंतरी किंडल अनलिमिटेडच्या कृपेने जी अनेक पुस्तकं समोर येऊन वाचली जातात, त्यात मी ‘गोइंग बेअर’ नावाचं एक पुस्तक वाचलं होत. म्हणजे पुस्तक यथातथाच होतं, पण तो लेखक सहकुटुंब फ्रान्समधल्या एका ‘न्यूड रिसॉर्ट’ला मुक्कामाला कसा गेला, त्याला काय अनुभव आले, काय संकोच वाटला वगैरे गोष्टींचं प्रामाणिक चित्रण त्यात होतं. त्या लेखकाला तो तरणा पुरुष असल्यामुळे ही स्वाभाविक भीती होती की, जर लिंगउद्दीपन झालं तर किती अवघडल्यासारखी परिस्थिती येईल. प्रत्यक्षात त्या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये सगळे स्त्री-पुरुष, आबाल-वृद्ध निर्वस्त्र पोहत असतानाही त्याला तसा काही धोका स्वानुभवायला मिळाला नाही.
बाकी अशा न्यूड हॉटेलची माहिती फार जणांना नसली तरी न्यूड बिचेसची माहिती जणांना असतेच. पॉर्न बघताना चवीने समुद्री काल्पनिक घुसळण अनेक जण अनुभवत असतात. आणि इथेच आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो की, लैंगिकता आणि नग्नता यांची फारकत कधी आणि केव्हा करायची…
अगदी उघड आहे की, नग्नता आणि लैंगिकता या गोष्टी जवळच्या आहेत. पण त्या तशाच असल्या पाहिजेत असा काहीसा भारतीय जनमानसाचा गोंधळ झालेला दिसतो. नग्नतेचं एक वेगळं सौंदर्य असतं. चित्रकलेत आणि शिल्पकलेत असतं. असेन मी चौथीत. आम्हा मुलांची घरी शिकवणी घेणाऱ्या आमच्या शेजारी असलेल्या तळवलकर बाई आम्हाला एक पुस्तक दाखवत होत्या. त्यात युरोपमधील सुंदर शिल्पं आणि चित्रं होती. बघता बघता सावर डेव्हिडचा नग्न पुतळा दिसला आणि आम्ही मुलं खीऽऽखी करून हसू लागलो. तेव्हा बाई आधी हसण्यात सामील झाल्या, पण नंतर त्यांनी नग्न चित्रं आणि शिल्पं याचं सौंदर्य, त्यासाठी लागणारी मेहनत, शरीरशास्त्राच्या अचूक अभ्यास आदी गोष्टी विशद केल्या. ते तेव्हा फारसं कळलं नसावं. पण एक गोष्ट पक्की झाली : पुढे कधीही नग्न शिल्प समोर आलं तर मन दचकलं नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मला वाटतं हा महत्त्वाचा संस्कार आपल्या समाजात आजही होताना दिसत नाही. त्यामुळे पुढे तर माणसं मोठी झाली की, नग्नतेचा संबंध लैंगिकतेशी जोडतात. लगेच आणि अपरिहार्यपणे. पण आपण शरीराला सूर्यनमस्कार करायला लावून पाठ वळवण्याची जशी सवय लावतो, तशी मनालाही सवय लावता येते.
छोटा स्कर्ट पाहिला की, लगेच संपूर्ण भान कामभावनेत विसर्जित झालं पाहिजेच असं काही नाही. प्रत्येक स्त्री समोरून जाताना तिचा घाट ‘एक्स-रे’ व्हिजनने पाहण्यात शक्ती जातही असते हेही कळायला हवं. आणि राहिली गोष्ट ‘परफॉर्मन्स’ची : त्याच्या आणि याचा काही फार संबंध नसतो. उलट योग्य त्या वेळी एकाग्र झाल्याने काही अधिक यशस्वी आणि आनंदी होतात. तेव्हा नुसता नागवा जीव – स्त्री\पुरुष कुणाचाही पाहिला - तर इतकं वेगळं वाटलं पाहिजे असं नाही, हे आधी मनाला सांगायला हवं.
मिलिंद सोमणचं छायाचित्र मी पाहिलं. त्यात obscene - अश्लील असं तर नक्कीच काही नाही. एक तर म्हणायलाच ते नग्न छायाचित्र आहे. त्याच्या पळताना पुढे आलेल्या पायाने इंद्रिय झाकलेलंच आहे. दुसरं म्हणजे ते छायाचित्र झूम केलेलं आणि जवळून घेतलेलं नाही. मला तर आधी त्याचं सपाट पोटच दिसलं आणि व्यायामाला प्रेरणा मिळाली! पण अनेकांना कसंसं झालं. तेही ठीक. अनेक पुरुषांना भलताच राग आला.
ट्विटरच्या इंग्रजी कॉमेंट्सहून मला मराठी चॅनेलच्या बातमीखालच्या कॉमेंट हिंस्त्र वाटल्या. कुणी त्याच्या पार्श्वभागावर अगरबत्तीने चटके देण्याची शिक्षा सुनावली, कुणी त्याला ‘कुत्रा’ म्हटलं, कुणी त्याला लिहिलं की घरात निजव की तुझी... वगैरे वगैरे (माझे शब्द फार सौम्य आहेत हे लिहिताना - मूळ कॉमेंट्स अधिक चटकदार आणि हिंस्त्र होत्या) जर कुणी नुसतं नग्न धावण्यामुळे समाजाची सभ्यता दुखावणार असेल तर अशा प्रतिक्रियांनी ती सभ्यता नुसती दुखावत नाही, तर मोडकळीस येते, हे आपल्याला कधी कळणार!
किती विरोधाभास आहे या दोन गोष्टीत! अनेक जण असेही होते- ज्यांना सगळं पुरोगामी असं मिरवायला आवडतं - त्यांनी सोमणचं भरमसाठ कौतुक केलं. इतक्या मधाळ भाषेत की, जणू प्रत्येकाने वाढदिवसाच्या दिवशी असेच बर्थ डे सूटमधली छायाचित्रं सोशल मीडियावर टाकायची सक्ती करावी असा अर्ज किंवा सह्यांची मोहीम निघेल असं मला वाटू लागलं. आणि मग त्या कल्पनेनं हसतानाही जाणवलं की, उद्या असा संकेत निघाला तर किती पुरुषांची छायाचित्रं सुंदर दिसतील? - तर अगदी मोजक्या पुरुषांची. बहुतेकांची वाढलेली पोटं, हडकुळे दंड आणि काडीपैलवान पायच दिसायचे.
याचाच एक महत्त्वाचा अर्थ असा की, सोमणकडे ही एक विशेष शक्ती आहे. आता त्याने ही शक्ती कशी वापरली - विशुद्ध भावनेनं का? तर तसंही पटकन म्हणवत नाही. फिटनेस दाखवायला अंगावर असलेले कपडे आड येत नाहीत. खुद्द सोमणच्या मातोश्री - ज्या ८१ वर्षांच्या आहेत - त्या नववारीत पळतात मॅरेथॉन! आणि तशाच साडीत दीड मिनिटं प्लॅन्क करतानाच त्यांचा व्हिडिओही मी पहिला आहे.
बरं, कपडे अंगावर नसले तर हॉट हॉट छायाचित्रं निघतात का? तर नाही - उलट योग्य त्या गोष्टी आणि तेवढ्याच गोष्टी कलात्मकरीत्या झाकलेली छायाचित्रं अधिक उद्दीपक असतात, हे जाणत्यांना माहीत आहेच. तेव्हा सोमणचा हेतू नक्की काय होता कळेना! नुसता पब्लिसिटी स्टंट होता का? तर मग तो काही प्रमाणात अंगाशी शेकला आहे?
कुठलीही प्रसिद्धी ही चांगलीच असते अशा धारणेनं हे छायाचित्र टाकलं होतं का? का फार विचार न करता, स्वतःच्या देहावर खुश होऊन छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकलं गेलं? ही शक्यता असू शकते. साधीसुधी माणसंही पाच किलोमीटर चालून झालं की, फेसबुकवर एक घामानं संपृक्त असा सेल्फी टाकतात.
बरं, नग्नता ही काही सोमणसाठी नवी नाही. मॉडेल म्हणून त्याने आणि मधू सप्रे यांनी अजगर अंगावर खेळवत पूर्ण नग्न फोटोशूट फार पूर्वीच केलेलं नव्हतं का? सोमण यांच्यासारखी माणसं ज्या प्रतलात वावरतात, त्या जगात हे अगदी नॉर्मल आहे. ‘न्यू नॉर्मल’देखील नाही - ओल्ड, कन्फर्मड नॉर्मल! पण मग सगळं जग तसं मोकळं नाही, हे भान सोमण यांचं सुटलं असं म्हणावं लागेल. एखादी गोष्ट सोशल मीडियावर टाकताना त्या त्या सामाजिक जगाचे संकेत निदान थोडे तरी पाळायला हवेत. आणि मुद्दाम तोडायचे असतील तर अधिक ठाम, खोल जाणारं असं संवेदन हवं - एखादा असा फोटो नव्हे!
कायदेशीररीत्या जो निकाल लागायचा तो लागेल. पण या छायाचित्रानं पुन्हा एकदा भारतीय समाज वरून बदललेला असला तरी आत तसाच आहे, हे ध्यानात आलं. बलात्कार केल्यावर जीभ कापून मारणारे लोक या देशात आहेत. त्यांच्या विकृत वासनेच्या, चुकीच्या लैंगिकतेच्या धारणांमागे हे एक छोटं पण महत्त्वाचं कारण आहेच - भारतीय डोळ्यांनी नग्नतेची लैंगिकतेशी करकचून बांधलेली गाठ. मला माझ्या भारतीय मित्रांना एवढंच सांगायचं आहे की, जरा मोठं व्हा. जरा नजर व्यापक करा आणि मिलिंद सोमणला असं सांगायचं आहे की, तुम्ही ज्या समाजात राहता, काम करता त्या समाजाचंही एक मूलभूत भान ठेवा. आणि बंडखोरी करायची तर अधिक मोठी, उसळणारी आणि खोल पाया असलेली करा.
आणि मीडिया काही ऐकणार नाही म्हणा, पण त्यांनाही जाता जाता सांगतो : बातम्यांच्या नावाखाली वेबपोर्टलवर गरम बटाटेवडा कर्जत स्टेशनला मिळतो तसा उष्ण, तिखट, गरम, वाफाळता माल आणि मसाला सारखा सारखा विकू नका!
ग्रेसांची कविता सहज आठवते आहे : वस्त्र काढता काढता देह शहारून येतो, हाडामासाला देवही किती नेकीने झेलतो! निर्वस्त्र होण्याच्या व्याख्या इतक्या सोप्या आणि कमकुवत नसतात, हे आपण सगळ्यांनीच यानिमित्तानं ध्यानात ठेवायला हवं.
..................................................................................................................................................................
लेखक आशुतोष जावडेकर लिहितात, गातात आणि दात काढतात.
ashuwriter23@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Hemant Kothikar
Thu , 12 November 2020
लोकांच्या मानसिकतेवर अजूनही कपडे पांघरले आहेत. ते एकदा काढून टाकायला पाहिजेत. अशा लेखांनी ते होईल !!
Swatija Manorama
Wed , 11 November 2020
फारच महत्वाचा दृष्टीकोन. ध्नन्यवाद डॉक्टर. जाता जाता एक, नग्नतेचे वस्तुकरण झाल्यानंतर आपण उभे केलेल्या प्रश्नाचे मूळ कशात आहे हे प्रकर्षाने लक्षात आले.
Bhagyashree Bhagwat
Wed , 11 November 2020
चाबूक लेख आहे! खण खण खण वाजतोय!