‘भाजप’नुकूल कल!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • तेजस्वी यादव, नितीशकुमार आणि चिराग पासवान
  • Tue , 10 November 2020
  • पडघम देशकारण बिहार Bihar लालूप्रसाद यादव Lalu Prasad Yadav नितीशकुमार Nitish Kumar नरेंद्र मोदी Narendra Modi राहुल गांधी Rahul Gandhi चिराग पासवान Chirag Paswan तेजस्वी यादव Tejashwi Yadav

हा मजकूर लिहायला घेतला तेव्हा रात्रीचे आठ वाजले असून बिहार विधानसभा निवडणुकीचे कल आता पुरेसे स्पष्ट झालेले आहेत. या निवडणुकीचे सर्व निकाल हाती येण्यास अजून वेळ आहे, परंतु मतमोजणीच्या बहुसंख्य फेऱ्या संपल्या आहेत. त्यामुळे हे कल कायम राहतील असं दिसतंय. करोनामुळे जे काही सावधगिरीचे उपाय अवलंबण्यात आले, त्यात मतमोजणी यंत्रांची संख्या साधारणपणे ३५ टक्के वाढवल्यामुळे मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पूर्ण निकाल येण्यास कदाचित मध्यरात्र उलटेल. मात्र, आतापर्यंत जे काही कल हाती आले आहेत, त्यानुसार सध्याचे जे चित्र आहे, त्यात काही फार मोठा बदल होईल असं काही दिसत नाही.

आताच्या चित्रानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आघाडीला बहुमतापेक्षा साधारणपणे ४ ते ६ जागा जास्त मिळतील. म्हणजे यापूर्वीच्या मजकुरात जो अंदाज वर्तवला होता, त्याप्रमाणे निसटतं का असेना बहुमत भाजप-जेडीयूला मिळालेलं असेल आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील. (हाही अंदाज गेल्या मजकुरात व्यक्त करण्यात आला होता, तोच खरा ठरतोय.)

सुशीलकुमार मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही? अद्याप अस्पष्ट आहे. ‘बिहारच्या  निवडणुकीचे कल बदलत आहेत का?’ असा प्रश्न गेल्या आठवड्यात मी व्यक्त केला होता. त्यासाठी बिहारमधून येणारे काही रिपोर्टस् हा आधार होता. त्यानुसार या निकालात बिहारमध्ये अनेक कल बदलले आहेत. या बदलेल्या कलांचा फायदा केवळ भाजपला झालेला आहे आणि फटका अन्य सगळ्या पक्षांना बसलेला आहे.

बिहारच्या निवडणुकीत जर पराभव पत्करावा लागला तर भाजपला येणाऱ्या काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल, तमीळनाडू, आसाम इत्यादी राज्यातील विधानसभा निवडणुकात फार मोठ्या आव्हानांना सामोरे जावं लागेल, असा जो अंदाज प्रस्तुत भाष्यकाराने व्यक्त केला होता, तो खरा ठरणार नाही, असं बिहारच्या या निकालातून स्पष्ट होतंय असंच म्हणावं लागेल.

शिवाय उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपनं अपेक्षेप्रमाणे उत्तम कामगिरी बजावली असल्यानं दिवाळी जोरात साजरा करण्याचा आणि विरोधकांच्या नाकावर टिच्चून फटाके फोडण्याचा भक्तांचा मार्ग मोकळा झालेला आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

गेल्या चार निवडणुकांचा आढावा जर घेतला तर भाजप हा बिहारमध्ये ‘धाकटा भाऊ’ होता. या निवडणुकीच्या निकालातून भाजपकडे बिहारमधेही भाजपकडे ‘मोठ्या भावा’ची भूमिका आलेली आहे आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड आता धाकट्या भावाच्या भूमिकेत गेलेला आहे. मात्र असं असलं तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असं भाजपच्या बहुतेक सर्व नेत्यांनी स्पष्ट केलंय. मनोजकुमार तिवारी हे भाजपचे नेते तर म्हणाले की, ‘नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील, हे आमचं युती करताना ठरलं होतं आणि आम्ही युतीधर्म पाळणार आहोत.’ ते ऐकताना प्रश्न इतकाच निर्माण होतो की, जो युतीधर्म भाजप बिहारमध्ये पाळतो, तो महाराष्ट्रामध्ये का पाळत नाही? हाच युतीधर्म पाळून महाराष्ट्रात पहिली अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे दिलं असतं तर, महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसण्याची वेळ भाजपवर आली नसती. पण ते असो…

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत यावेळेस अनेक उलथापालथी घडलेल्या आहेत. सुरुवातीला भाजप आणि जनता दल युनायटेडला म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना सहज-सोपा वाटणारा विजय मतदानाच्या पहिल्या टप्प्यानंतर अधिकाधिक अवघड होत गेला, अशा बातम्या, असे वेगवेगळ्या संस्थांचे अहवाल हाती येत गेले, कारण तेजस्वी यादव अचानक एका वादळासारखे पुढे आले. त्यामुळे भाजप आणि जनता दल युनायटेड समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं, असं वाटत होतं.

३० वर्षांच्या तेजस्वी यादवनं या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना चांगलाच घाम फोडला, यात शंका नाही. ही निवडणूक भाजप आणि नितीशकुमार या दोघांसाठीही भाजप आणि जनता दल युनायटेड म्हणजे नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार या दोघांसाठीही अतिशय प्रतिष्ठेची होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मदतीला घेऊन तेजस्वी यादवनं जे काही आव्हान उभं केलं होतं. त्यामुळे भाजप आणि जनता दल युनायटेड या गोटात बरीच खळबळ माजलेली होती. खरं तर, खळबळ माजण्यापेक्षा घबराट माजलेली होती असंच म्हणावं लागेल. कारण शेवटी अशा निवडणुकात जो हुकमाचा पत्ता खेळायचा असतो, तो नितीशकुमार यांना खेळावा लागला आणि ‘ही माझी शेवटची निवडणूक आहे’, असं भावनिक आव्हान त्यांना करावं लागलं.

बिहारमधली मतमोजणीचे कल आज सकाळपासूनच सतत इकडून तिकडे झुकत होते. सकाळी साधारण ११ पर्यंत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांचं महागठबंधन निसटतं का असेना बहुमत प्राप्त करणार असं चित्र हाती आलेल्या कौलातून दिसून आलेलं होतं. मात्र हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि हा मजकूर लिहीपर्यंत निसटतं बहुमत भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडकडे स्पष्टपणे झुकलं आहे आणि आता त्यात फार काही बदल होणार नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या निवडणुकीमधून एक गोष्ट अतिशय स्पष्ट झाली की, भाजप हा बिहारमधला एक मोठा राजकीय पक्ष ठरलेला आहे. गेल्या पंधरा वर्षांच्या राजकारणात सतत नितीशकुमारचा म्हणजे प्रादेशिक पक्षाचा पदर धरून भाजपनं बिहारमध्ये सत्ता मिळवली. खरं तर २०१०च्या निवडणुकीत भाजपला ९० पेक्षा जास्त जागा होत्या आणि जनता दल युनायटेडला ११५ जागा होत्या. पण तेव्हाही मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आग्रही राहिला नाही.

याचं कारण भाजप ज्या पद्धतीने संघटनात्मक उभारणी करतो त्यात आहे. पहिल्याच झटक्यात भाजप कधीच विजयाची आशा बाळगत नाही. हा पक्ष हळूहळू पाय पसरत जातो. त्या आजवरच्या अनुभवाप्रमाणे नितीशकुमार हा चेहरा समोर करून भाजपने आपले हातपाय अधिक पसरले आहेत, मुळं अधिक मजबूत केली आहेत. भाजपला जवळपास ७५ जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत आणि बाकी सगळेच पक्ष या मतदानाचा हा जो काही कौल आणि कल बदललेला आहे, त्याचे बळी आहेत.

गेल्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला ८० जागा होत्या. त्यावेळेस त्या जवळजवळ २५ ने कमी होतायेत असं दिसतंय. काँग्रेसची अवस्था बिहारमध्ये दिवसेंदिवस अधिकच केविलवाणी होतेय. अलीकडच्या २५-३० वर्षांत बिहारमध्ये काँग्रेसचा फार मोठ्या प्रमाणावर संकोच होत गेला आणि जनता पक्ष/दलाचे विविध गट वेगवेगळ्या नावानं सातत्याने आघाडीवर राहिले.

या निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव ज्या पद्धतीनं ओसरला त्याचा फटका राष्ट्रीय जनता दलाला बसलेला आहे यात शंकाच नाही. जेमतेम २० जागा काँग्रेसला या निवडणुकीत मिळतील असं सध्याचं चित्र आहे. भाजपनं काँग्रेससोबत आघाडी केली तेव्हा हे दोन्ही पक्ष मिळून साधारण ११० ते ११५ पर्यंत जातील असं चित्र मतदानात्तर कौलातून समोर आलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाहीये. त्यामुळे काँग्रेससोबत केलेल्या आघाडीचा येत्या काही दिवसांत राष्ट्रीय जनता दलानं फेरविचार केला तर फारसं आश्चर्य वाटायला नको.

शिवाय काँग्रेस पक्षानं सगळ्यात मोठी केलेली चूक म्हणजे राहुल गांधी वगळता एकही महत्त्वाचा नेता बिहारमध्ये प्रचाराला उतरवला नाही. पक्षाकडून जिंकण्यासाठी आवश्यक जी काही ‘रसद’ हवी असते, तीसुद्धा पुरेशा प्रमाणात पुरवली नाही, अशी माहिती आता हाती येते आहे. थोडक्यात काँग्रेसनं कचखाऊ भूमिका निभावली असं म्हणण्यास वाव आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : बिहारचा राजकीय कल बदलतोय?

..................................................................................................................................................................

या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की, रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची फार मोठी हवा माध्यमांनी निर्माण केलेली होती आणि त्याच वेळी माध्यमांनी ही भाजपची ‘बी टीम’ आहे असं म्हटलेलं होतं. केंद्रामध्ये लोक जनशक्ती पक्ष एक घटक पक्ष आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान अगदी परवा परवापर्यंत केंद्रात मंत्रीही होते. त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरुद्ध भूमिका घेतली, तरी त्यात विचित्र राजकीय पवित्रा होता. ‘आमचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा आहे, मात्र नितीशकुमार यांना विरोध आहे, अशा पद्धतीचा तो त्यांचा पवित्रा होता. त्यातून लोक जनशक्ती पक्षाच्या काठीने भाजप नितीशकुमारांना मारू इच्छित आहे हे स्पष्ट होत होतं.

राजकारण म्हणून हे ठीक आहे, परंतु युतीधर्म पाळण्याच्या दृष्टीकोनातून अशा पद्धतीने दुसऱ्याच्या काठीने कुणाला तरी मारण्याची भाजपची ही राजकीय नीती यापुढे देशाच्या राजकारणात अनेक ट्रेंड प्रस्थापित करेल असं दिसतंय. महाराष्ट्रातसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात असताना स्वत: फडणवीस आणि भाजपनं युतीतील शिवसेनेची सातत्याने कोंडी आणि संकोच करण्याचा प्रयत्न केलेला होता.

हेच फडणवीस बिहारच्या निवडणुकीचे भाजपचे मुख्य मोहरे म्हणून काम करत होते आणि बिहारमध्येही भाजपने अशाच पद्धतीने नितीशकुमार यांची कोंडी केलेली आहे, हा काही निव्वळ राजकीय योगायोग म्हणता येणार नाहीये.

अतिशय प्राथमिक माहिती जी काय मिळते आहे, त्यानुसार जनता दल युनायटेडला साधारण २७ जागी ५०० ते ७०० मतांनी पराभव स्वीकारलेला आहे. मताधिक्यांची ही आकडेवारी लक्षात घेतली तर जनता दल युनायटेडच्या या सर्व जागी झालेला पराभव हा निसटताच म्हणायला हवा. हा पराभव  घडवून आणण्यामध्ये चिराग पासवान यांनी मोलाची भूमिका बजावली असावी असा एक अंदाज आहे.

अर्थात हा अंदाज ठाम नाही, पण चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायतेडचे पंख कापण्यात मोलाची भूमिका बजावली आहे यात शंकाच नाही. चिराग पासवान यांची भूमिका अर्थातच बिहारमध्ये भाजपच्या पथ्यावर पडली आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : सरसंघचालक मोहन भागवत ‘बिहार’च्या निवडणुकीमुळे गुळमुळीत बोलले का?

..................................................................................................................................................................

आणखी एक मुद्दा असा की, निवडणुकांचे जे प्रारंभी येणारे जे कौल असतात ते अंतिम नसतात. त्यामुळे मतप्रदर्शन करण्याची घाई करू नये, नाही तर तोंडघशी पडण्याची वेळ येते असा इशारा पुन्हा एकदा सर्व तथाकथित माध्यम तज्ज्ञांना आजच्या दिवसानं दिलेला आहे. सकाळी साधारण ११ वाजेपर्यंतच चित्र लक्षात घेतलं तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री झाल्यातच जमा आहे, अशा पद्धतीची वक्तव्यं बहुतेक सगळ्या पक्षांकडून आणि प्रकाश वृत्तवाहिन्यांवर बोलणाऱ्या राजकीय विश्लेषकांकडून केली गेली. मात्र हे सर्व जण तोंडघशी आपटलेले आहेत. ‘मॅन ऑफ द मॅच’ होण्यासाठी फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अशा तीनही क्षेत्रात जी चौफेर कामगिरी करावी लागते आणि त्याचा फायदा आपल्या चमूला करून द्यावा लागतो, असं तेजस्वी यादवकडून घडलेलं नाही हे स्पष्ट केलं पाहिजे.

मात्र तेजस्वी यादव यांच्या बाबतीत काहीच चांगलं घडलं असं नाही, हेही त्याचवेळेस लक्षात घेतलं पाहिजे. तेजस्वी यादव यांची निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप हेटाळणी झाली. त्यांच्या शिक्षणाचा खूप मोठ्या प्रमाणात उल्लेख करण्यात आला. वडिलांनी म्हणजे लालूप्रसाद यादव यांनी जो पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाला बिहारभर पसरवलं ते वडिलांचं ऋणही तेजस्वी यादव विसरले, याबद्दलही खूप तारे तोडले गेले. मात्र लालूप्रसाद यांच नाव बाजूला ठेवणं ही तेजस्वी यादव यांची अपरिहार्य अगतिकता होती. कारण लालू यांची प्रतिमा गैरव्यवहारांच्या आरोपामुळे डागाळलेली आहे, ते तुरुंगात आहेत. त्यांचं छायाचित्र समोर करून मत मागणं तेजस्वी यादव यांना खूप अडचणींचं  ठरलं असतं.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अशी परिस्थिती असूनही स्वत:च्या बळावर त्यांनी राष्ट्रीय जनता दलाला राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बाजावली आहे यात शंकाच नाही आणि भाजपला बिहारमधे तेच टक्कर देऊ शकतात हे समोर आलेलं आहे. त्याच वेळेस नितीशकुमार यांची बिहारमधली सद्दी संपत आलेली असल्याचंही त्यांनी सिद्ध केलेलं आहे. 

शेवटी भक्तांनी या विजयाचा फार उन्माद करू नये कारण हा विजय निसटता आहे आणि भाजपला जरी चांगलं यश मिळालं असलं तरी नितीशकुमार हे राजकारणातल्या संधीसाधू वृत्तीचं एक अत्यंत ‘अप्रतिम’ असं उदाहरण आहेत. ते कुठल्याही क्षणी भाजपला टांग मारू शकतात हे भाजपने लक्षात घेतलं पाहिजे. तसंही अलीकडच्या काळात महत्त्वाचे मित्रपक्ष भाजपपासून दुरावले आहेत. बिहार निवडणुकीच्या निकालाचे आकडे बघितल्यावर भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी लगेच आज नाही, पण भविष्यामध्ये घेतला आणि सत्तेसाठी बिहारमध्ये एक नवीन आघाडी अस्तित्वात आली तर फारसं आश्चर्य वाटायला नको.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......