अजूनकाही
‘सूप तो सूप, छलनी भी बोले जिस में छेद बहत्तर!’ भाजपला ‘रिपब्लिक’ टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे लोकशाही धोक्यात आल्याचा साक्षात्कार झाला आहे. इतरांचं सोडा, पण माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्रकारिता धोक्यात आल्याचं दिसू लागलंय. मोदी सरकारच्या प्रत्येक मंत्र्याला इंदिरा गांधींच्या आणीबाणीची आठवण होऊ लागली आहे. मोदींचं बिच्चारं सरकार! या सरकारला नि:पक्ष पत्रकारिता आणि लोकशाही संस्थांच्या मान्यतेविषयी किती प्रेम आहे, हे जगजाहीर आहे!
चार दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलंय, आणि विचारलं की, तुम्हाला मध्य प्रदेश निवडणुकीच्या संदर्भात कमलनाथ यांच्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार कुणी दिला? नक्कीच निवडणूक आयोग हे मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून करत होता. खुद्द सर्वोच्च न्यायालयावर अलीकडच्या दिवसांत बोट दाखवलं गेलंय. संसदेचे हाल तर आपण सर्वजण जाणूनच आहोत. मागच्या सत्रात राज्यसभेत कृषी विधेयकं ज्या घाईगडबडीनं पारित केली गेली, त्यापेक्षा लोकशाहीची मोठी चेष्टा होऊ शकत नाही! मोदी सरकारने देशाची लोकशाही ज्या प्रकारे खिळखिळी केली आहे, तसं आजवर कधीही झालेलं नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
त्याच मोदी सरकारला आता पत्रकारितेवरील धोका दिसू लागला आहे. पण हे नकाराश्रू कुणाला पान्हा फोडू शकणार! पत्रकारितेमध्ये या सरकारच्या इशाऱ्यावर काय नाही झालं! एनडीटीव्हीवरील ईडीचा छापा आठवतो? एनडीटीव्ही मोदी सरकारच्या विरोधात आहे, म्हणून तो छापा टाकण्यात आला होता, हे कोण ओळखून नाही! गौरी लंकेश यांच्यासारख्या निर्भीड पत्रकार महिलेची हत्या कोण विसरेल? त्या मोदी सरकारच्या विरोधात निर्भीडपणे लिहीत होत्या, म्हणून त्यांना एका हिंदुत्ववादी संघटनेनं घरात घुसून मारलं. मोदी सरकारवर टीका करणाऱ्या कितीतरी पत्रकारांना घाबरवून-धमकावून गप्प करण्याचे प्रयत्न केले गेले नाहीत?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एक ट्विट केल्यामुळे ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्याविरोधात एफआरआय दाखल करण्यात आला. हिंदी टीव्ही पत्रकारितेचे आधारस्तंभ विनोद दुआ यांच्यावर सरकारवर टीका केली म्हणून हिमाचल प्रदेश सरकारने खटला दाखल केला. ज्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्रास दिला गेलाय, अशा एक डझन छोट्या-मोठ्या पत्रकारांची नावं सांगता येतील. उत्तर प्रदेशचे पत्रकार प्रशांत कनौजिया यांना नुकतंच उच्च न्यायालयानं जामिनावर सोडलंय.
खरी गोष्ट अशी आहे की, गेल्या सहा वर्षांत भाजपने नि:पक्ष पत्रकारितेची हत्या केली आहे. आज अशी परिस्थिती आहे की, देशातला कुठलाही मोठा माध्यमसमूह स्वतंत्र राहिलेला नाही. मग त्या मोठ्या वृत्तवाहिन्या असोत की वर्तमानपत्रं. त्यांनी सरकारची बाजू उचलून धरली नाही तर त्यांच्या जाहिराती बंद केल्या जातात. आणि जाहिराती बंद म्हणजे वृत्तवाहिन्या किंवा वर्तमानपत्रं यांचा धंदा बंद. त्यामुळेच तर पत्रकारितेच्या दुनियेत चढाओढ सुरू आहे की, कोण चढाओढीनं मोदी सरकारचे ‘कसिदे’ गातो. ‘कसिदा’ माहीत आहे? उर्दू शायरीमध्ये राजे आणि बादशहा यांच्या गुणगौरवासाठी कविता लिहिली जात असे, त्याला ‘कसिदा’ म्हणत. तुम्ही रात्री नऊ वाजता कुठलीही मोठी वृत्तवाहिनी चालू करा, मोठ्यातला मोठा पत्रकार तुम्हाला सरकारचं गुणगान गाताना दिसेल. जर तुम्ही चुकून रवीशकुमारसारखे सरकारचे टीकाकार झालात, तर ट्रोल तुमचं जगणं हराम करतील.
हे आहे भाजपचं पत्रकारितेवरील प्रेम!
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अर्णब गोस्वामींच्या अटेकवरून आणीबाणीचा दाखला देणाऱ्या भाजपने आधी स्वत:मध्ये डोकावून पहायला हवं. भाजपला अर्णब गोस्वामींच्या अटकेमुळे इतका त्रास का होतोय, हे न समजण्याइतके लोक मूर्ख नाहीत! गोस्वामी आणि भाजप यांच्यातील संबंध सर्वांना माहीत आहेत. ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनी सुरू करणारे राजीव चंद्रशेखर भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. गोस्वामींचं कुटुंब आसाममध्ये भाजपशी जवळीक सांधून आहेत असंही सांगितलं जातं. ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीवरून गोस्वामींनी कधी मोदींवर टीका केली? आपली नि:पक्षता दाखवण्यासाठी कधी तरी भाजपवर थोडीफार टीका केली असेल. पण गोस्वामींच्या समोर कुणी मोदींच्या विरोधात तोंड उघडू शकत नाही. ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनी ही सरकारच्या समर्थनार्थ काम करणारी वाहिनी आहे, जी संघ आणि भाजपच्या राष्ट्रवादाचा उघडपणे ‘प्रपोगंडा’ करते.
खरी गोष्ट अशी आहे की, गोस्वामींनी भारताच्या टीव्ही जगतात पत्रकारितेची एक नवी आणि अनोखी विषवेल पेरली आहे. त्यांच्या चॅनेलवर, त्यातही त्यांच्या एक तासाच्या शोमध्ये तुम्हाला बातम्या दिसत नाहीत. बातम्यांच्या नावाखाली त्यांचं भाषण ऐकायला मिळतं! तेही मुख्यत: सत्य-असत्य असं काहीही असू शकतं. ते फेक न्यूजही असू शकतं. काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपुत प्रकरणात गोस्वामींनी रिया चक्रवर्तीचं ज्या प्रकारे चारित्र्यहनन केलं, त्याला पत्रकारिता म्हटलं जाऊ शकतं?
पत्रकारितेच्या क्षेत्रातल्या सर्वांच्या हे लक्षात आलं होतं की, सुशांतसिंग आणि रिया चक्रवर्ती प्रकरण लावून धरण्यामागे दोन कारणं होती. पहिलं, बॉलिवुडच्या चटकदार, खऱ्या-खोट्या बातम्या चालवून चॅनेलचा टीआरपी वाढवायचा आणि जास्तीत जास्त पैसा कमवायचा. दुसरं, लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवायचं. म्हणजे मोदी सरकारविरोधात जनतेत संताप निर्माण होणार नाही. सुशांत-रिया पत्रकारितेचा उद्देश पैसे कमावणं आणि मोदी सरकारची सेवा करणं हाच होता. पण शेवटी सगळं प्रकरण खोटं असल्याचं सिद्ध झालं. ज्या रिया चक्रवर्तीवर सुशांतसिंगच्या हत्याचा आरोप थोपवला जात होता, त्यात तिचा सहभाग नसल्याचं सिद्ध झालं. दस्तुरखुद्द सरकारी यंत्रणेनंच हे मान्य केलं की, सुशांतसिंगची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
ही अशी आहे गोस्वामी आणि ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीच्या नि:पक्ष पत्रकारितेची झलक. या नव्या पत्रकारितेत पत्रकार अर्थात टीव्ही चॅनेलच्या अँकरला देशाचा संरक्षक बनण्याचाही अधिकार मिळालेला आहे. मग तो कुठल्याही तिखट वा अभद्र भाषेचा का उपयोग करेना! तो कुणालाही आरडाओरडा करून ‘शट अप’ करू शकतो. कारण त्याने स्वत:ला देशातील संपूर्ण जनतेचा ‘प्रवक्ता’ म्हणून घोषित केलेलं आहे. आणि तो कुणालाही आरडाओरडा करून ‘रिपब्लिक वाँटस टु नो’च्या आडून कुठलाही प्रश्न विचारू शकतो. पण ज्या व्यक्तीला प्रश्न विचारला जातो, तिला उत्तर देण्याचाही अधिकार दिला जात नाही. विशेष म्हणजे, बऱ्याचदा विरोधी पक्षाचा नेता टीव्हीवर नसतो आणि तरीही गोस्वामी ओरडून ओरडून, गळा फाडून म्हणत असतात – ‘शरद पवार, उद्धव ठाकरे, आओ, मुझे पकडो.’ कधी ते एखाद्या ‘भांडा’सारखं आपल्या वृत्तवाहिनीवर ओरडून ओरडून म्हणतात - ‘मुझे ड्रग दो, मुझे ड्रग दो!’
ही कुठल्या प्रकारची पत्रकारिता आहे, ज्यात पत्रकार ‘भांड’ होतो? गोस्वामींनी रिया चक्रवर्ती यांच्याविषयी जे प्रश्न उपस्थित केले, ते कुठल्या नि:पक्ष पत्रकाराने केले असते? त्यांना फक्त विरोधकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार कुणी दिला? जी भाषा ते सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांविषयी वापरतात, ती त्यांनी कधी नरेंद्र मोदी वा अमित शहा यांच्याविषयी वापरली आहे?
यावरून हे सिद्ध होतं की, गोस्वामी आतापर्यंत नि:पक्ष पत्रकारितेची हत्या करत आले आहेत. त्यांच्या पत्रकारितेमुळे देशात जो द्वेष आणि फाळणीसदृश वातावरण तयार होत आहे, त्याबद्दल त्यांच्याविरोधात याआधीच कारवाई व्हायला हवी होती. आत्महत्या प्रकरणात त्यांना अटक झाली आहे, त्याचा पत्रकारितेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. ज्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांनीच आपल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींना जबाबदार ठरवलं आहे. या प्रकरणाची तपासणी पूर्वीच व्हायला हवी होती. पण तेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार होतं. आणि त्यांनी हे प्रकरण थंडबस्त्यात बांधून ठेवलं होतं. आता दुसरं सरकार आहे आणि ते कायदेशीर कारवाई करत आहे.
अर्णब गोस्वामींनी जे पेरलं होतं, तेच आता उगवलं आहे. भाजप त्यांच्या माध्यमातून ‘पत्रकारितेवरील घाला’ म्हणत ढोंगीपणा करत आहे. हा सगळा ड्रामा आता लोकांच्याही लक्षात येऊ लागला आहे.
अनुवाद - टीम अक्षरनामा
..................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख https://www.navjivanindia.com/ या पोर्टलवर ६ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment