‘जग बदल, जाणुनी मार्क्स...’ : दत्ता देसाई यांनी छोट्या छोट्या ‘व्हिडिओज’मधून उलगडलेला मार्क्स-विचार
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अनंत फडके
  • ‘जग बदल, जाणुनी मार्क्स...’ या व्हिडिओ-मालिकेचे एक पोस्टर
  • Mon , 09 November 2020
  • कला-संस्कृती चलत्-चित्र कार्ल मार्क्स Karl Marx जग बदल जाणुनी मार्क्स Jag Badal Janunee Marx दत्ता देसाई Datta Desai

मार्क्सवादी विचार समजावून घेणे, त्याबाबत वाद-विवाद करणे, चर्चा करणे हे विशेषत: १९९०नंतर म्हणजे सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर फारसे होताना दिसत नाही. मार्क्सवादी, कम्युनिस्ट विचार म्हणजे देशद्रोही, हुकूमशाहीवादी, परकीय, रशिया-चीनची तळी उचलणारे पण तिथे फेल गेलेले इ. इ. शेलकी विशेषणे त्यांच्याबाबत वापरून ते बाजूला टाकले जायला लागले. हे विचार काय आहेत, या बद्दल काहीच माहीत नसलेले किंवा त्याबाबत फार मोठे गैरसमज असणारे लोक हे विचार वाईट, चुकीचे, घातक आहेत असे ठासून सांगत असतात! पण गेल्या काही वर्षांत पुन्हा एकदा जगात ठिकठिकाणी व भारतातही मार्क्स-विचाराबाबत पुन्हा नव्याने चर्चा होऊ लागली आहे.

कारण आज सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न तीव्र होऊ लागले आहेत आणि ते सोडवायचे तर मार्क्सवाद त्याबाबत काय सांगतो हे निदान माहीत करून घ्यावे, असे राजकीय-सामाजिक प्रश्नांबाबत गांभीर्याने विचार करणाऱ्या अनेक लोकांना वाटू लागले आहे. तसेच अनेक तरुण निरनिराळ्या चळवळींमध्ये काही काळ का होईना सामील होत आहेत. त्यातील अनेकांना अशी उत्सुकता असते. पण मराठीत सुलभपणे मूळ मार्क्स-विचार मांडणारे साहित्य फारसे उपलब्ध नाही. शिवाय मार्क्सचे स्वत:चे लिखाण मुळातून वाचून, समजावून घेणे हे अनेकांना काहीसे जड जाते. या पार्श्वभूमीवर मार्क्स-विचाराची तोंडओळख करून देणारी, त्याबाबतचे काही गैरसमज दूर करणारी ‘दत्ता देसाई यांनी उलगडलेला मार्क्स-विचार’ ही छोट्या छोट्या ‘व्हिडिओज’ची मालिका अतिशय स्वागतार्ह आहे. ‘दर्शन चलत्-चित्र’ या यूट्यूब चॅनेलमार्फत ‘जग बदल, जाणुनी मार्क्स...’ ही व्हिडिओ-मालिका ९ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेत दर शुक्रवारी संध्याकाळी ६:०० वा चार व्हिडिओ या प्रमाणे व्हिडिओज उपलब्ध होत आहेत. 

मार्क्स-विचाराची तोंड-ओळख

मार्क्स-विचाराचे सखोल अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे दत्ता देसाई निरनिराळ्या लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना एका छोट्या ग्रुपशी झालेल्या चर्चेत उत्तरे देत आहेत, असे या व्हिडिओजचे स्वरूप आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला दत्ता देसाईंना एक प्रश्न विचारला जातो आणि प्रत्येकी सुमारे दहा ते पंचवीस मिनिटांच्या मांडणीत ते या प्रश्नाला सोप्या, संवादी भाषेत, मुद्दा लक्षात येईल अशा समर्पक उदाहरणांच्या आधारे उत्तर देतात.

मार्क्स-विचाराच्या काही उत्साही हितचिंतकानी दर्जेदार चित्रण करून हे व्हिडिओज बिगर व्यापारी पद्धतीने बनवले आहेत. यापैकी वानगीदाखल काही व्हिडिओजची शीर्षके जरी पाहिली तर लक्षात येईल की, मार्क्स-विचाराबाबत नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना हे व्हिडिओज भिडतात. उदाहरणार्थ :

मला मार्क्स कसा भेटला?

मार्क्स-विचार : भारताला लागू आहे काय?

मार्क्सवाद : ‘कालबाह्य’ विचार की अस्सल मानवी आशावाद?

मार्क्सवाद : एक पोथीनिष्ठ विचार?

मानवी स्वभाव आणि मार्क्सचा माणूस

‘पाया आणि इमला’ : मार्क्सचे नेमके म्हणणे काय?

भारत आणि जातिव्यवस्था : मार्क्सचे विश्लेषण

स्त्रीचे स्थान, घरकामाचे श्रम आणि भांडवल

भांडवलशाही, छोटे उत्पादक आणि ‘निर्वाह व्यवस्था’

निसर्ग, माणूस आणि परात्मता

हे व्हिडिओज नक्कीच ऐकण्याजोगे आहेत. मात्र मुद्दे समजावून सांगत असलेल्या दत्ता देसाई यांच्यावर बहुतांश वेळ कॅमेरा फोकस करतो. खरं तर अशी मांडणी करताना खडू-फळा किंवा आजकाल अधिक प्रचलित असलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमधील चित्रे, फोटो यांची मदत घेतली तर विवेचन अधिक चांगले होते. हे व्हिडिओज बनवताना त्यापैकी अगदी छोट्या दहा मिनिटांच्या नाही, पण काही अधिक मोठे व्हिडिओ बनवले असते तर अधिक बरे झाले असते.   

निरनिराळ्या सामाजिक प्रश्नांच्या बाबत मार्क्सचे स्वत:चे म्हणणे काय आहे, हे दत्ता देसाई या व्हिडिओजमध्ये थोडक्यात मांडतात. लेनिन, स्टॅलिन, माओ इ. नेत्यांनी, तसेच भारतातील मार्क्सवादी नेत्यांनी पुढे मार्क्स-विचाराचा कसा अर्थ लावला, त्यात काय भर घातली वा बदल केले, काय कृती केल्या या गोष्टींची चर्चा या व्हिडिओजमध्ये नाही. या नेत्यांची मांडणी, त्यांचे काम, तसेच सोव्हिएत युनियन, चीनमध्ये झालेल्या घडामोडी यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यांचीही चर्चा व्हायला हवी हे अगदी खरे आहे. पण त्याआधी मुळात मार्क्स-विचार काय होता, हे थोडेसे नीट समजावून घेतले पाहिजे, हेही तितकेच खरे. आणि नेमके हेच या व्हिडिओजमुळे लक्षात येते.

दुसरे म्हणजे निसर्ग-विज्ञान असो वा मार्क्सचे समाजविज्ञान असो, त्याचा आतापर्यंत किती, कसा मानवी समाजाच्या हितासाठी उपयोग झाला आहे, एवढ्यावर केवळ त्याचे मूल्यमापन करता येत नाही. कारण तसे पहिले तर आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा सदुपयोगापेक्षा दुरुपयोगच जास्त झाला आहे. आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर हा विज्ञानाचा सर्वांत वाईट दुरुपयोग आहे. पण जगात सतत कुठे ना कुठे युद्धे चालू असतात. गेल्या तीनशे वर्षांत जेवढी मनुष्यहानी व संपत्तीची हानी युद्धांमध्ये झाली, तेवढी आतापर्यंतच्या मानवी इतिहासात दोन हजार वर्षांत मिळून झाली नव्हती. पण तेवढ्यावरून आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आपण बाद ठरवत नाही. तर जे काही चांगले व वाईट झाले ते नेमके किती, काय झाले, कसे, कशामुळे झाले, वेगळे काही होणे शक्य आहे का, याचा आपण अभ्यास करतो. जे वाईट झाले ते वैज्ञानिक विचारपद्धती मुळे झाले असे म्हणत नाही.

तीच गोष्ट मार्क्सच्या समाजविज्ञानाबाबत आहे. ‘आम्ही मार्क्स-विचाराच्या आधारे काम करतो आहोत’ असे म्हणणाऱ्या लोकांनी गेल्या दीडशे वर्षांत काय बरे-वाईट काम केले, त्याची चिकित्सा करायला हवी. स्वतःला साम्यवादी देश म्हणवून घेणारा चीन मार्क्सच्या मानवी समाजजीवनाच्या स्वप्नापासून योजने दूर का गेला आहे? सोव्हिएत रशियाचे पतन का झाले? या गोष्टी मार्क्सच्या विचारपद्धतीमुळे झाल्या, का ती नीट न समजावून घेतल्यामुळे झाल्या, हे अभ्यासायला हवे. पण त्यासाठी मुळात मार्क्सची शास्त्रीय विचारपद्धती, त्याची मूळ भूमिका समजावून घ्यायला हवी. दत्ता देसाई यांच्या या व्हिडिओ-क्लिप्स मुळे असे करायला नक्कीच चालना मिळेल.

मार्क्सच्या मांडणीबाबत हे लक्षात घ्यायला हवे की, भांडवली उत्पादन-पद्धतीची अतिशय पद्धतशीर, काटेकोर, शास्त्रीय चिकित्सा मांडण्यात अभ्यास, संशोधन करून ते त्याच्या ‘दास कॅपिटाल’ या ग्रंथामार्फत  प्रसिद्ध करण्यात मार्क्सच्या आयुष्यातील तीस एक वर्षे खर्ची पडली! आणि तरीही मार्क्स जिवंत असेपर्यंत ‘दास कॅपिटाल’च्या तीनपैकी एकच खंड प्रसिद्ध होऊ शकला! धर्म, साहित्य-संस्कृती, राजकारण, शिक्षण इ. अनेक विषयांवर त्याचे विचार हे निरनिराळ्या प्रसंगी केलेली वक्तव्ये, टीका-टिपणी या स्वरूपात आहेत. निरनिराळ्या प्रश्नांवर इतस्तत: मांडलेले हे मार्क्सचे विचार कमी-अधिक विकसित स्वरूपात आहेत. हे सर्व लिखाण वाचून, त्यांचा नीट अर्थ लावून, त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या चर्चा लक्षात घेऊन त्यांची सुलभ स्वरूपात तोंड-ओळख करून देणे हे सोपे काम नाही. पण ते दत्ता देसाई यानी समर्थपणे केले आहे. निरनिराळ्या मार्क्सवाद्यांनी या विश्लेषणाचे काम पुढे नेले याचाही वेळोवेळी दत्ता देसाई उल्लेख करतात. पण या व्हिडिओजमध्ये अर्थातच वेगवेगळ्या विषयांवरील मार्क्सच्या मूळ मांडणीची तोंड-ओळख करून देणे, यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

गुंतागुंतीच्या प्रश्नांचे भान?  

लिंग, जात, वंश यांच्या आधारे केली जाणारी पिळवणूक, दडपणूक अशा काही गुतागुंतीच्या  प्रश्नांबाबत मार्क्सचे काय विश्लेषण आहे, ते पुरेसे नसले तर निदान त्याच्या विचारांची चौकट पुरेशी आहे का? का या चौकटीत सुधारणा करणे, भर घालणे हे करायला हवे? का मार्क्सच्या वैचारिक चौकटीत या प्रश्नांचे समाधानकारक विश्लेषण करताच येत नाही? यावर वाद होत आले आहेत. उदा. मार्क्सने वर्गीय विषमता, पिळवणूक यावर सर्व लक्ष केंद्रित केले; लिंग, जात, वंश यांच्या आधारे केली जाणारी पिळवणूक, दडपणूक याचे मार्क्सने समाधानकारक विश्लेषण मांडलेले नाही असे काही जण म्हणतात. काही जण तर असेही म्हणतात की, या गोष्टींचे तसेच आज आपल्या अगदी अंगावर आलेल्या पर्यावरणीय व म्हणून मानवी विनाशाच्या धोक्यांबाबतचे समाधानकारक विश्लेषण मार्क्सच्या वैचारिक चौकटीत शक्यच नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या आक्षेपांच्या बाबत दोन भूमिका असू शकतात. एक म्हणजे बिन-वर्गीय म्हणून समजली जाणारी पिळवणूक, दडपणूक याबद्दल मार्क्सचे विश्लेषण आहे. ते आपण नीट समजावून घेण्याचा व हे विश्लेषण पुढे नेण्याचा फक्त प्रश्न आहे. दुसरी भूमिका अशी आहे की, मार्क्सच्या मांडणीत वर्गीय व बिन-वर्गीय पिळवणूक, दडपणूक याबद्दल अंतर्विरोध आहेत.

एका बाजूला त्याची वैचारिक चौकट केवळ वर्गीय वास्तवाबद्दल आहे असे वाटते, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या लिखाणात अशा काही मार्मिक टिपण्या आहेत की त्यातील मुद्दे विकसित केले तर वर्गीय व बिन-वर्गीय वास्तव या दोघांचे एकात्मिक पद्धतीने विश्लेषण मांडता येते. दत्ता देसाई यांची या व्हिडिओजमधील मांडणी मार्क्स-विचारांची तोंड-ओळख करून देण्यासाठी आहे, हे स्पष्ट आहे. असे असले तरी अनेक लोकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या प्रश्नांबाबत दत्ता देसाई यांच्या मांडणीत वरील मुद्द्यांबाबत काही एक भूमिका, भान दिसते का याबद्दल अनेकांना उत्सुकता असू शकेल. त्यांनीही हे व्हिडिओज जरूर बघावेत.

ही व्हिडिओ-मालिका तुम्ही पुढील लिंक्सवर जाऊन पाहू शकता -

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCeJamX9OvB8U6Srg0MnOVGQ

फेसबुक : https://www.facebook.com/darshanchalchitra

ट्विटर : https://twitter.com/darshanchitra

इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/darshanchalchitra

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. अनंत फडके हे सार्वजनिक आरोग्यक्षेत्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.

anant.phadke@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख