एका वाक्यात सांगायचं तर माझा किंवा आपल्यापैकी कोणाचा तरी नातू वा पणतू या कादंबरीचा भविष्यातील नायक असू शकतो
ग्रंथनामा - झलक
नितीन साळुंखे
  • ‘अँथम’चं मुखपृष्ठ
  • Fri , 06 November 2020
  • ग्रंथनामा झलक अँथम Anthem आयन रँड Ayn Rand

प्रसिद्ध लेखिका, कादंबरीकार आणि विचारवंत आयन रँड यांच्या ‘अँथम’ या लघुकादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच मैत्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाला आहे. हा अनुवाद नितीन साळुंखे यांनी केला आहे. त्यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या दीर्घ मनोगताचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

आयन रँड यांचं मूळ इंग्रजीतलं ‘अँथम’ हे पुस्तक मला मिळालं साधारण जानेवारी २०१६मध्ये. ही अगदी छोटी कादंबरी, दीर्घकथाच म्हणा ना! वाचायला सुरुवात केली आणि सतत वाटत राहिलं की, मी भारताच्या नजीकच्या भविष्यकाळात डोकावतो आहे. पुस्तक आहे १९३७ साली लिहिलेलं, पण भारतातली राजकीय परीस्थिती अशीच राहिली तर २०३७ सालातला भारत कसा असू शकेल याचं चित्रण जणू त्यात केलं आहे.

एका वाक्यात सांगायचं तर माझा किंवा आपल्यापैकी कोणाचा तरी नातू वा पणतू या कादंबरीचा भविष्यातील नायक असू शकतो.

आयन रँड या ठाम व्यक्तिस्वातंत्र्यवादी. एकाधिकारशाही अथवा हुकूमशाही, मग ती कोणत्याही प्रकारची, कोणत्याही स्वरूपाची, कोणत्याही बुरख्याखाली असो, त्याचा त्यांनी त्यांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून नेहमीच विरोध केला आहे. ‘अटलास श्रग्ड’ आणि ‘फाउंटनहेड’ या कादंबऱ्यांतून हे प्रकर्षानं जाणवतं. आणि जगभरात जिथं जिथं अशी उघड अथवा बुरख्यातली हुकूमशाही असते, तिथं तिथं त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णन केलेली सामाजिक, राजकीय परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात वास्तवात आलेली दिसत राहते.

इतकंच नव्हे, व्यक्तींमधील भावनिक आणि व्यावहारिक परस्पर नातेसंबंधांचं आणि व्यक्तिगत भावभावनांचंसुद्धा अतिशय तरल चित्रण त्या करतात. आजूबाजूच्या परिस्थितीचा, धोरणकर्त्यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक धोरणात्मक निर्णयांचा बरा-वाईट परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होतो. त्यातून व्यक्तीच्या मानसिकतेवर जसा परिणाम होतो, तसाच तो परस्पर व्यक्तिगत आंतरसंबंधांवरसुद्धा होतो. यातून हुकूमशाहीत गळचेपी झालेल्या समाजाचं, माणसांचं जे चित्रण त्या करतात, ते वाचल्यावर कोणताही संवेदनशील माणूस सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.

त्यांच्या याच हातोटीनुसार हुकूमशाही राजवटींमध्ये माणसं कशी स्वतःचं माणूसपण विसरून एका साच्यात बसवली जातील यासाठीचे धोरणकर्त्यांचे जाणीवपूर्वक प्रयत्न आणि त्यातून माणसाचं टोळी अवस्थेतील अर्धपशूत होत जाणारं रूपांतर याचं प्रत्ययकारी चित्रण या पुस्तकात आहे. आताही भारतातला अजेंडा काही वेगळा आहे असं म्हणावं, तर २०१६च्या तुलनेत गेल्या तीन-चार वर्षांत एक भयकारी छाया समाजाच्या प्रत्येक क्षेत्रावर दर दिवशी अधिक गडद होताना दिसत आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

भारतात बर्फील्या हिमालयापासून ते राजस्तानातल्या टोकाचं बदलतं हवामान असलेल्या वाळवंटापर्यंत वेगवेगळं भौगोलिक वातावरण आहे. तसंच वेगवेगळ्या जातीधर्मपंथांचे लोक आहेत. त्यांच्या श्रद्धा, चालीरीती, भाषा, आचार विचार उच्चार आहार वेगवेगळे आहेत. आणि हे सगळं स्वतःचं वेगळेपण सांभाळून, इतरांच्या वेगळेपणाचा सहज स्वीकार करत, त्या वेगळेपणाचा आदर करत हे सगळे लोक बहुपेडी अशा या समाजाचा अविभाज्य भाग होऊन शेकडो हजारो वर्षे पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र राहत आले आहेत. प्रत्येकाने स्वतंत्र अस्तित्त्व जपलं असलं तरी समाज म्हणून या सर्वांच्या आशा आकांक्षा, सुखदुःख, एखाद्या मोठ्या घटनेचे त्यांच्यावर होणारे परिणाम एकच असतात. हे असं बहुविध पण एकत्र समाजजीवन हे भारतीय समाजजीवनाचं मोहवणारं सौंदर्य आहे.

रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली तेव्हा तिथल्या झार आणि झरीनाची राजवट लोकांना अपार कष्ट करूनही किमान जीवंत राहण्याइतपतसुद्धा न मिळणं, अतोनात गरिबी, बेहिशोबी पिळवणूक, आजच्यापेक्षा उद्याचा दिवस अधिक खडतर असणार आहे याची अनुभवसिद्ध खात्री या वास्तवामुळं तिथल्या विशेषतः कामगार आणि शेतकरी वर्गात असंतोषाचा दारूगोळा वर्षानुवर्षे साठत आला होता. हवी ती किंमत देऊन ही परिस्थिती बदलणं, ही त्यामुळे तिथल्या लोकांची प्राथमिकता होती. झारच्या दमन करणाऱ्या राजवटीत व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना तसंही फारसं नव्हतं. त्यामुळं संपूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याची अपेक्षा न करता सामुदायिकपणे निर्णय घेण्याचं साम्यवादी राजवटीतलं स्वातंत्र्य आणि त्या बदल्यात प्रत्येकाला जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेची हमी आणि सर्वांच्या बरोबर प्रत्येकाच्या विकासाची संधी ही अपेक्षा ठेवूनच त्यांनी संघर्ष केला.

भारतात अशी काहीच परिस्थिती नव्हती.

सर्वांनी एकत्र येऊन लढलेली स्वातंत्र्य चळवळ, त्यानंतर घटनेनं आणि त्या आधारे कायद्यानं दिलेली समानता, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवरील उन्नतीसाठी प्रत्येकाला असणारी संधी, ज्यांना जाणीवपूर्वक सामाजिक पातळीवर मागास ठेवलं गेलेलं होतं, त्यांना बरोबरीला येण्यासाठी राखीव जागांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक दिलेली संधी या सगळ्यातून, विशेषतः पेशवेकाळात अस्पृश्यतेच्या अमानवी पातळीपर्यंत पोचण्याइतपत अतोनात प्रबळ झालेली जातव्यवस्था लोकांच्या मनातून जरी नाही, तरी नाईलाजानं का होईना व्यवहारातून वेगानं दुर्बळ होत चालली होती.

नेमकं हेच घडणं पेशवाईत जातव्यवस्थेचे अतोनात, अमानुष फायदे घेतलेल्या इथल्या एका समुदायाला मान्य नव्हतं. या जातव्यवस्थेत हितसंबंध असलेल्यांनी ही व्यवस्था टिकवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरु केले. त्याचाच एक डावपेचात्मक भाग म्हणून इंग्रजी राजवट टिकावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. इंग्रजांना संपूर्ण सहकार्य केले. स्वातंत्र्य चळवळीला सर्व शक्तीनिशी सक्रिय विरोध केला.

ते सर्व प्रयत्न विफल ठरून शेवटी स्वातंत्र्य मिळालंच. मग इथल्या राजकीय प्रक्रियेचा भाग बनून सत्तेत येण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. दरम्यान लोकांचा बुद्धिभेद करून लोकांना एकेका स्वतंत्र कप्प्यात नेऊन बसवण्याचं काम ‘स्लो पॉयझनिंग’च्या पद्धतीनं सावकाशपणे सुरूच होतं.

ते आणि आपण अशी विभागणी मानसिक, भावनिक पातळीवर केली की, ते म्हणजे बाहेरचे, अशी मांडणी स्वीकारली जाऊ शकते. हे बाहेरचे म्हणजे आपले शत्रू, हा यातला अटळ असा पुढचा टप्पा असतो. कालपर्यंतचा आपला काही पिढ्यांचा शेजारी आणि सुखदुःखाचा भागीदार आता आपला शत्रू आहे, असं कमकुवत मनाची माणसं स्वीकारू शकतात. अशांची संख्या वाढत जाते तेंव्हा त्या वाढत्या संख्येचा दबाव आपोआपच यात सामील न झालेल्यांवर येत राहतो. आणि मग ही संख्या आणखीनच सतत वाढत राहते. अशी ही एक न संपणारी प्रक्रिया अव्याहतपणे सुरूच राहील, याची काळजी घेतली जाते.

बाबरी मशिदीच्या निमित्तानं ही संख्या वेगानं वाढवण्यात त्यांना यश मिळालं. त्याचा परिणाम धार्मिक आधारावर समाजात ध्रुवीकरण होण्यात झाला. याचा अपेक्षित परिणाम म्हणून सामाजिक दरी पुरेशी वाढून सत्ता तर मिळाली, पण अपुऱ्या संख्येनं मिळाली. त्यामुळे इतरांच्यात विभागून घ्यावी लागली. अशा वेळी आपला अजेंडा पुढं रेटता येत नाही. इतरांचे हितसंबंध त्यात दुखावले जातात, त्यामुळे सत्तेत भागीदार असणाऱ्या इतर घटकांकडून याला तीव्र विरोध होतो. त्यामुळे त्या वेळी अजेंडा पुढं रेटता आला नाही.

२०१४पासून मात्र सत्तेच्या रूपानं संपूर्ण सर्वंकष वरवंटा त्यांच्या हातात आल्यासारखं झालं. उच्चशिक्षित आणि सुस्थित लोकही स्वखुशीने आणि अंधपणानं कळपाचा भाग होण्यात धन्यता मानू लागले. ‘स्लो पॉयझनिंग’ तंत्राची गरजच राहिली नाही. सामूहिक वशीकरण मंत्र सापडल्यासारखं सामाजिक वातावरण निर्माण झालं. लोकांच्या उन्मादाला सामूहिक हिंसेचा सूर मिळाला. आणि या सुराला शासकीय पातळीवरच्या सोयीस्कर मौनरागाने अधिकाधिक तीव्र बनवलं. कोणी काय खावं, काय नेसावं, काय बोलावं किंवा बोलू नये, काय लिहावं किंवा लिहू नये असे, लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर अतिक्रमण करणारे अनेक मुद्दे रोज उठवले जाऊ लागले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी हिंस्त्र उन्मादी टोळ्या देशभरात सर्वत्र अनिर्बंधपणे हिंडू लागल्या. त्यांच्यावर कायद्याचे अथवा कोणाचेच कसलेच नियंत्रण नाही आणि हे म्हणजे जणू ईश्वरानेच त्यांना नेमून दिलेलं कार्य आहे, राष्ट्रकार्य आहे, असा आव यांच्या समर्थनासाठी सर्वत्र आणला गेला.

या सगळ्या सातत्यपूर्ण आक्रमक पार्श्वभूमीवर काश्मीरचं तुरुंगात रूपांतर करणं आणि नागरिक नोंदणी कायद्याने काही विशिष्टांचे नागरीकत्त्वाचे अधिकार काढून घेण्याची शक्ती घटनेची मूलतत्त्वे पायदळी तुडवून हातात घेणं, जे एन यू आणि जामिया मिलिया विद्यापीठात बाहेरचे गुंड घुसवून अराजक सदृश स्थिती निर्माण करणं  हे सगळं २०१९ मध्ये होत असेल, तर हा वेग लक्षात घेता ‘अँथम’मध्ये काल्पनिक म्हणून १९३७मध्ये जे वर्णन केलं आहे ते २०३७ मधलं संपूर्ण भारताचं वास्तव चित्रण नसेल असं म्हणणारा आपलाच आवाज, कितीही आशावाद जागवला तरीही, खोल गेलेला आणि पोकळच वाटत राहील.

कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वातंत्र्याच्या ऊर्मी माणसांच्या मनात उसळतातच. विज्ञानाची कास धरल्याने मन आणि मेंदूवरचं भ्रमाचं पटल दूर होतं. आणि साहित्य, पुस्तकं माणसाला 'स्व' ची ओळख मिळवून देतात. समाजात असूनही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून वावरायचं, आणि आपलं स्वातंत्र्य जपतानाच समाजाचा जबाबदार घटक म्हणून असलेली जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासाठी पुढे यायचं, हा व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारीच्या समतोलाचा विचार देतात. स्वतःला आणि त्याच वेळी समाजालाही विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं बळ देतात हा सारा विश्वासही ‘अँथम’च्या माध्यमातूनच आयन रँड देतात.

भ्रमाची पटलं दाट होत असतानाच्या काळात या ‘अँथम’ची, म्हणजे स्वातंत्र्याच्या गीताची मशाल हा झाकोळ दूर करेल. आदिम काळापासून सनातन विचारांच्या झंझावातात झाकोळलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम चार्वाकविचार करत आला आहे. ‘अँथम’सारखं पुस्तक लिहून आयन रँड याही या चार्वाकविचाराच्या मार्गावरील पांथस्थ ठरल्या आहेत.

..................................................................................................................................................................

‘अँथम’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5247/Anthem

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......