करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम’ या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या आठ लिहित्या लेखकांच्या आठ कथांचा अभिनव संग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
हेमंत कर्णिक
  • ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’चं मुखपृष्ठ
  • Fri , 06 November 2020
  • ग्रंथनामा शिफारस लव्ह इन द टाइम ऑफ करोना Love in the time of Corona

करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम’ या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या आठ लिहित्या लेखकांच्या आठ कथांचा संग्रह नुकताच रोहन प्रकाशनाने ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या नावाने प्रकाशित केला आहे. हा प्रयोग अभिनव वाटल्याने, या कथा वाचल्यावर केलेल्या काही नोंदी, काही निरीक्षणं आणि टिप्पण्या... जेणेकरून वाचकांना कथासंग्रहाची ओळख होईल, आणि थोडं दिशादर्शनही...

नाऊ यू सी मी... - गणेश मतकरी

संग्रहातली ही सर्वोत्तम कथा. ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याजोगी आहे. म्हणजे ती पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी पुन्हा वाचावी, असं नाही; तर सुटे सोडलेले, एकमेकांत गुंतलेले, एकातून दुसऱ्याचा थांग लागेल, असा खरा खोटा आभास निर्माण करणारे असे अनेक धागे कथेत आहेत. पुन्हा वाचताना त्यांचा नातेसंबंध उलगडण्याची, नवीनच काही जुळणी सापडण्याची शक्यता जाणवते. या शक्यतेतून आस्वाद सतत ताजा राहण्याची शक्यताही जाणवते. म्हणून ती पुन्हा पुन्हा वाचण्याजोगी आहे. नव्या वाचनात आशयाला फाटे फुटू शकतात, असं ज्या कथेबद्दल वाटतं, ती कथा नि:संशय चांगली होय.

आता ती कशी भावते, हे सांगताना अर्थातच कथेत काय घडतं, हे सांगणं चुकीचं आहे. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आवश्यक, तेवढंच सांगितलं जावं.

कथा वाचत असताना तो-त्याची बायको ही जोडी आणि त्याचे आई-बाप ही जोडी यांच्या स्टोऱ्या समांतर जाव्यात, असा आग्रह धरून कथेला एकाच चिंचोळ्या मार्गावर जखडण्याचा प्रकार करू नये! पण एका घरी कुत्रा, दुसरीकडे मांजर; जोडप्यापैकी एक घरी, एक बाहेर असं दोन्हीकडे; असं साम्य असताना एकीकडे एक अपत्य, दुसरीकडे काही नाही; बिनसण्याची प्रोसेस आणि त्याचं फलित असे फरकदेखील आहेत. अख्ख्या कथेत सेक्सचा उल्लेख नाही. नवरा-बायकोचं बिनसण्यात सेक्सचा उल्लेख नसणं खटकतं; पण मग ही कथा बिनसण्याबद्दल नसावीच, असंही म्हणता येईल. कथेला फँटसीचा अस्पष्ट स्पर्श आहे. तो मस्त आहे. मोबाइल मोडण्याची कल्पना अभिनव अजिबात नाही, परंतु ही कल्पना वापरताना दाखवलेला संयम तिला प्रभावी बनवतो.

गणेश मतकरींची ओळख आता ‘यशस्वी कथाकार’ अशी आहेच; ही कथा या ओळखीवर शिक्कामोर्तब करते.

थोडंसं अवांतर : वाचताना (नातं माहीत असल्यामुळे) रत्नाकर मतकरींची आठवण आली. गणेशचं कसब जास्त उजवं वाटलं. पण रत्नाकर मतकरींनी, मला वाटतं, ‘उपयोजित’ कथा लिहिल्या. भयकथा, धक्का कथा, वगैरे. तसं लिहिताना भय, धक्का, वगैरे परिणाम साधणं या उद्देशाकडे दुर्लक्ष होऊन चालत नाही. मग तिथून वाचकाचं लक्ष विचलित होईल, असं काहीही टाळताना त्या कथा काहीशा एकसुरी (म्हणजे कंटाळवाण्या नव्हेत), सरळसोट होत असाव्यात. गणेश मतकरी ‘विशुद्ध’ कथा लिहितात, उपयोजित नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

निके निके चालन लागी – श्रीकांत बोजेवार

ही कथा पक्की घटनाप्रधान आहे. चटकदारपणाच्या जवळ जाऊ बघणारी आहे. ती इतकी ‘ओपन एण्डेड’ आहे की, या कथानकातून पुढे वाढत जाणारी एखादी टीव्ही सीरियल होऊ शकेल. सीरिअलमध्ये पात्रांच्या वर्तनात सुसंगती नसली तरी चालतं. निवेदनाची पट्टी बदलत राहिली तरी चालतं. यातली पात्रं ठळक आहेत. लेखकाला कथा ज्या दिशेने न्यायची आहे, त्याला अनुरूप होत जाणारी आहेत. वाचकानेदेखील तशाच मनाने कथा वाचली तर त्याचं चांगलं रंजन होऊ शकतं. मग काही वर्षं तुरुंगात काढलेल्याला तिथल्या आठवणी येत नाहीत, हे खटकणार नाही. संसर्गातून कोविड होईलच आणि त्यातून मृत्यू ओढवेलच, हे गणित खटकणार नाही.

एक तुकडा आभाळाचा...  - नीरजा

कथा किंवा आणखी काही, वाचताना लिहिणाऱ्याच्या भूमिकेत जाऊन वाचलं तर त्या कलाकृतीचा आस्वाद जास्त चांगला घेतो येतो; तिच्या आशयापर्यंत जाण्याचा रस्ता सापडणं सोपं होऊ शकतं. शहाणा, सजग लेखक त्याच्या लिखाणाची शैली, लिखाणातल्या मजकुरामधले संदर्भ वाचकाला विशिष्ट दिशेने नेण्याच्या उद्देशानेच रचत असतो, असंही म्हणता येईल. आणि जोपर्यंत उलट सिद्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येक लेखक शहाणा, सजग आहेच, असं धरून चालणं हे तर प्रामाणिक वाचकाचं लक्षण म्हटलं पाहिजे.

‘बरोबर एक महिना झाला आज. रोज हॉलच्या खिडकीत येऊन बसते मी कामं आटोपल्यावर. आता तशी विशेष कामं नाहीतच काही.’

या कथेतली ही पहिली तीन वाक्यं. यातलं एकही वाक्य क्रियापदावर संपत नाही, जे कवितेत परिचयाचं असलं तरी गद्यासाठी काहीसं आगळंवेगळं आहे. संपूर्ण कथाभर ही अशी रचना करण्यामागे लेखकाचा काय हेतू असावा? कथानक, घटना, मनोव्यापार हे सगळं वाचकापर्यंत येतं, ते या अशा वाक्यरचनेच्या माध्यमातून. म्हणजे, कथेचं वाचन करताना घटना, भावना, असलं काही जाणवण्याअगोदर ही रचना अगोदर जाणिवेत शिरते. कथा प्रथमपुरुषी (याला मराठीत काही जेण्डर-न्यूट्रल प्रतिशब्द नाही का? कथेतील निवेदक बाई आहे) आहे. भावनाप्रधानता हाच या निवेदक बाईचा स्वभाव आहे आणि घडणाऱ्या घटनांना तिचा प्रतिसाद भावनिक आहे, सांगितल्या जाणाऱ्या घटनांविषयी काही ठरवताना त्या प्रतिसादाच्या या गुणधर्माला लक्षात घेणं गरजेचं आहे, असं लेखक बजावत आहे का? तसं असेल, तर कथा दोन स्तरांवर ग्रहण करावी लागेल. जग, निवेदक बाईचं जगणं, तिचे जवळचे-दूरचे लोक आणि तिच्या बाबतीत घडणाऱ्या घटना हे सगळं निवेदकाच्या चष्म्यातून कसं विशिष्ट रंग लेवून येतं; याची दखल घेत असताना प्रत्यक्षात हे सगळं कसं असेल, याचे सुगावे लेखक (म्हणजे नीरजा. पुन्हा बाईच) निवेदकाला वळसा घालून कशी देते आहे, याकडे लक्ष द्यावं लागेल. अशा कथा वाचणं अर्थातच आव्हानात्मक असतं. परंतु लेखक आणि निवेदक हे एकरूप नाहीत- नसतात, असं सुचवत त्यांच्यातलं द्वैत दाखवून देणारी शैली ‘व्यामिश्र’च असण्याची आवश्यकता नसते. आणि अशा कथासुद्धा पुन्हा पुन्हा वाचण्यालायक असतात.

या कथेत मात्र लेखकाची पूर्ण सहानुभूती निवेदकाला आहे, असंच प्रतीत होतं. ‘... म्हणजे माझ्या मनाचा घडा कच्चा असता तर बरं का. तो होता की नाही, हे मात्र शेवटपर्यंत नाही कळलं त्यांना. ते कळण्याएवढे हुशार नव्हते ते.’ याच्या तात्काळ पुढचं विधान आहे, ‘किंवा मीच त्यांना ते कळून देण्याएवढी हुशार असेन.’ म्हणजे, निवेदक प्रथमपुरुषी करण्यातून लग्नसंस्थेने आणि समाजव्यवस्थेने पुरुषाला झुकतं माप देताना केलेल्या अन्यायाविषयी मूल्यविधान करण्यापासून लेखकाची सुटका होते, इतकं कळतं. पण निवेदक ही अशी वाक्यरचना का करत रहाते, या कोड्याचं उत्तर ‘कारण ती हळवी, कवीमनाची आहे,’ असं सोयीस्कर काढावं लागतं. एकूण, ही कथा तरल, संवेदनशील कपडे चढवलेली स्त्रीवादी चाकोरीतच चालणारी कथा ठरते.

या वाक्यरचनेमुळे कदाचित स्वत:ला हळवी, कवीमनाची समजणाऱ्या स्त्रीवाचकाला कथेशी समरस होता येत असेल. हे लक्षात घेतलं, तर कथा धीट होण्याचा सतत प्रयत्न करते, हेसुद्धा लक्षात येतं. वाढलेल्या वयात नवरा गेल्यावर अंतर्मनात जपून ठेवलेल्या अबोल प्रेमाला (केवळ मनाशीच) मोकळं करून देणाऱ्या बाईची ही कहाणी आहे. ‘डोळे उघडते सकाळी तेव्हा अनेकदा अंथरूण ओलं झालेलं असतं रे या वयात.’ ही कबुली सोपी नाही.

मायं गाव कोनतं... - परेश जयश्री मनोहर

या कथेत चांगल्या, दमदार शक्यता होत्या! तपशील नीट दिले आहेत. भावनाकुलता काबूत ठेवली आहे. भाषा वास्तवाशी इमानी असल्यासारखी वाटते. परंतु एका कालबिंदूवर कथा सुरू करून ताबडतोब मागे जाऊन सर्व भूतकाळ सांगण्याची क्लृप्ती इथे काम करत नाही. कथेतील वर्तमानावर करोनाची छाया आहे; कथेचा प्राण मात्र पूर्णपणे पात्रांच्या भूतकाळात आहे. करोनावर सुरू केल्यामुळे कथा करोनाची होत नाही. इतकंच नाही; तिचा प्रवास अपेक्षित चाकोरीतून होणंही टळत नाही. शेवट वाचून तर ‘ही तर दोन ओळींची कथा आहे,’ असं वाटू लागतं. तशी ती असायला हरकत नाही; पण त्या दोन ओळींच्या मध्ये जे सामान भरायचं, त्यातच लेखकाचं कौशल्य असतं. मिलिंद बोकील यांची एक कथा होती. अशीच ‘दोन ओळींची’. निवासी शाळेत रहाणारा एक भटक्या जमातीतला मुलगा आपल्या कबिल्यात परत जाण्यासाठी पळून जातो आणि शेवटी वास्तवाचा चटका खातो, अशी सांगता येणारी. या कथेपेक्षा जास्त लांबीची. पण मधला अवकाश ताकदीने भरला होता.

बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह - प्रवीण धोपट

शीर्षकात टिंब टिंब नसलेली ही संग्रहातील पहिली कथा!

यात संवाद आहेत. नवरा-बायकोचे. पात्रं साच्यातली नाहीत. जगाचा, जगण्याचा उथळ अर्थ लावणे आणि न लावणे, यांची होता होता कथा सहज ट्रॅक बदलते आणि ‘नवरेपणा’ची होते. हा मार्गबदल होण्यात सफाई आहे; पण पुढे कथेची बोधकथा होते, तो बदल तसा नाही. चांगली चाललेली कथा बोधप्रद होते तेव्हा लेखकाचं बोट धरून कथेत, आशयात घुसलेल्या वाचकाला दु:ख झालं. कारण तोपर्यंत तो कथेत, कथेतल्या मूल्यचौकटीत रमलेला असतो.

ही कथा ‘फसली आहे’ की, लेखक अजून स्वत:ची अभिव्यक्ती शोधतो आहे की आणखी काय, हे कळण्यासाठी लेखक प्रवीण धोपट यांचं आणखी वाचण्याची इच्छा या कथेने निश्चित जागते.

जस्ट अ लव्ह स्टोरी  - प्रणव सखदेव

प्रणव प्रयोगशील लेखक आहे. भरपूर लिहितो, भरपूर लिहिणाऱ्याचं वाचताना दोन बाजूंनी भान ठेवावं लागतं. एक, या कथेत (वा कलाकृतीत) तो काय मांडतोय, म्हणजे ती कथा काय म्हणतेय याकडे लक्ष ठेवावं लागतं, (जे कुठल्याही कथेबाबत खरंच असतं) आणि दोन, लेखक करत असलेलं एकंदर लिखाण पाहून त्याच्या जीवनविषयक धारणा काय आहेत आणि एकेका कथेला जिग्सॉ पझलचा तुकडा समजून जोडणी करून त्या धारणा थोड्या थोड्या जास्त जास्त हाती लागत जातील का, हेसुद्धा जाणून घ्यावंसं वाटतं. केवळ वाचकाचं रंजन करणे, हे एकमेव उद्दिष्ट ठेवण्याच्या पुढे जाऊन स्वत:ची जीवनदृष्टी; स्वत:चं जगाविषयीचं, जगण्याविषयीचं आकलन कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाच खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणायचं असतं.

असं मनात येण्याचं कारण ही कथा. कथा वाचताना एक लक्षात येतं की, प्रणव कडक शिस्तीतून नवीन पिढीच्या मानसिकतेतूनच लिहीत असावा. अशा प्रकारच्या लिखाणातून त्या पिढीतल्या वाचणाऱ्यांशी संवाद साधला जातो, त्यातूनच काही जणांना वाचनाकडे ओढता येतं आणि मागचं संपलं आहे; जुनाट, रद्दीत जमा करण्याच्या लायकीचं झालं आहे (ज्यासाठी कालातीत हा भारदस्त शब्द वापरूही नये!), असा संदेशही अप्रत्यक्षपणे दिला जातो.

कथा प्रेमभंगाची आहे, असं तिचं मूल्यांकन ‘जुन्या’ पद्धतीने करता येईल; पण ते चुकीचं ठरेल. कथेतली ‘ती’ तर तिच्या मार्गाने पुढे गेली आहे; ‘तो’सुद्धा ‘देवदास’ झालेला नाही. तरी एकमेकांना भेटण्यात त्यांना संकोच नाही. त्याची तर सगळं मागच्यासारखं असावं, अशी अपेक्षा आहे! कधी काळी निर्माण झालेले बंध न तोडता त्यांना आवर घालत जगण्याचा आपापला रस्ता पुढे चोखाळताना ‘एकदाच आकाशाला अशी भिडे माती’ असला भंपक भावही न बाळगणे, ही नव्या मूल्यव्यवस्थेची खासियत म्हणता येईल.

या कथेत दिसणारं नवव्यवस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथा ‘सेन्शुअल’ आहे. शब्दांवाटे प्रक्षेपित होणाऱ्या भावभावनांबरोबर शरीरात उठणाऱ्या तरंगांची दखल घेणारी आहे. एरवी कथेत जेव्हा एखाद्या घटनेचं वर्णन येतं तेव्हा त्या घटनेतल्या दृष्टी, श्रवण, गंध, स्पर्श यांच्याशी संबंधित अशा अनेक घटकांना सहसा बेदखल केलं जातं. (फार तर स्पर्श सोडून, कारण स्पर्श ही नर-मादीतली आशयघन भाषा असतेच.) इथे या ऐंन्द्रिय मांडणीला एक वेगळं परिमाण मिळतं.

कथेत प्रथमपुरुषी निवेदन आहे. त्याला, म्हणजे मुख्य पात्राला सतत तिच्या बोलण्या-सांगण्यापलीकडचं बरंच काही दिसत, जाणवत रहातं. यातून तो तिच्यात किती गुंतला होता-आहे, हे सुचवलं जातं. अशी सेन्शुअल मांडणी, हाच कथेचा आशय असावा. तो व्यक्त करण्यासाठीच दोघांच्यात घडलेल्या, घडणाऱ्या घटनांची चौकट सोयीस्कररित्या वापरलेली आहे. कारण हा सेन्शुअलपणा हीच या कथेतली भावणारी बाब आहे. बाकी ‘कथानका’त फार दम आहे, असं वाटत नाही.

आणखी एक गोष्ट जाणवते. हा जो निवेदक आहे, त्याची संवेदनशीलता बाईच्या संवदेनशीलतेच्या खूप जवळ जाणारी वाटते. त्याचे प्रतिसाद, त्याचं बोलणं, त्याच्या अपेक्षा, या सगळ्यात बाईपण जाणवलं. याचा अर्थ तो स्त्रैण आहे, असं नाही. प्रत्येकच व्यक्तीत स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व असतं. मात्र, अमुक अभिव्यक्ती पुरुषतत्त्वाची आणि तमुक स्त्रीतत्त्वाची, हे ठरवण्याचे निकष निसरडे आहेत. पहिल्या पायरीवरचे निकष म्हणजे पारंपरिक गृहीतकं. बाई भावनेने उचंबळून येते, पुरुष अश्रू ढाळत नाही, वगैरे. हे तसे फार कामाचे नाहीत. पुढे? हे काम करावं लागेल. तोपर्यंत उलट न्याय लावून ‘कोणत्या अभिव्यक्तीत पुरुषतत्त्व आढळल्यासारखं वाटतं आणि कुठे स्त्रीतत्त्व, असं पहावं लागेल. हे जास्त सोपं आहे.

प्रणवच्या आणखी गोष्टी वाचणं भाग आहे. या कथेत सापडणारी वैशिष्टयं कथेपुरती आहेत की प्रणव सखदेव या लेखकाची आहेत, हे कळायला हवं. प्रणव सखदेव हा वर्तमानातला प्रातिनिधिक लेखक नक्कीच आहे.

जादूची बोट - मनस्विनी लता रवींद्र

मनस्विनीसुद्धा ‘आजच्या’ संवेदनशीलतेतून लिहिते. आज ज्या प्रमाणात समाजातल्या बाईच्या  दुय्यम स्थानाची जाणीव जागी झाली आहे, त्या प्रमाणात ते स्थान बदलण्याची प्रेरणा निर्माण झालेली नाही. त्यामुळे स्त्री लेखकाने मुख्य पात्राचे (जे बहुधा बाईच असतं) मनोव्यापार मांडले तरी कथा होते. बाईच्या, विशेषत: महानगरवासी बाईच्या अभिव्यक्तीमध्ये, आत्मजाणिवेमध्ये गेल्या काही दशकांमध्ये ठळक फरक पडला आहे. तो जाणवून दिला, की कथा आपोआप आधुनिकच काय बंडखोरही होऊ शकते. पुन्हा, या आधुनिक बाईच्या पार्श्वभूमीवर ‘जुन्या’, पारंपरिक बाईचं चित्रण केलं आणखी सोपं होतं. यातून मनस्विनी किंवा इतर लेखिका यांचा दर्जा खालचा आहे, असं मुळीच सुचवायचं नाही; त्यांना काही ठोकताळे आयते उपलब्ध आहेत, हे सांगायचं आहे. हे ठोकताळे सगळ्यांनाच उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर कोण कसा करतो/करते याकडे मात्र लक्ष द्यायला हवं. ‘बाईच्या आधुनिक जाणिवा’ यापलीकडे कुठल्याही कथेत काय, किती आहे, हे तपासायला हवं.

थोडं विषयांतर. या दृष्टीने पाहता ‘स्त्री लेखकांच्या लिखाणातील नवीन जाणिवा’ असा शोध घेण्यासाठी हा रस्ता वापरून बघता येईल. कारण, गौरी देशपांडे, मेघना पेठे (आणि अधल्या मधल्या इतर) यांच्या ललित लिखाणात बंडखोरी जरूर आहे; पण संवेदनशीलता पुरुषलक्ष्यी आहे, असं म्हणावंसं वाटतं. मनस्विनीची पिढी त्याच्या पुढे आली आहे आणि याच कथेत त्याच्याही पुढे भूमी असल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. असो.

मनस्विनीची कथा ‘पुरुषलक्ष्यी’ नाही. यात बाहेरचं जग आणि आतलं, मनातलं जग यांमधली आंदोलनं आहेत. त्यांच्या छाया एकमेकांवर पाडून फँटसी घडवण्याचा प्रयत्न नाही, दोन्ही विश्वं स्वायत्त ठेवलेली आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव अर्थातच पडतो. वास्तव जगातल्या घटना तितक्या महत्त्वाच्या नाहीत; जितक्या त्यांच्यामुळे दुसऱ्या जगात उमटणारे तरंग आहेत. एकूण, असं सुचवलं जातं की आतलं जगच खरं तर महत्त्वाचं आहे आणि तिथेच मनुष्य खरा जगत असतो. मात्र, हे प्रतिपादन एका ‘आधुनिक’ स्त्रीच्या संदर्भात होतं आणि ती तशी असल्यामुळेच ते शक्य होतं.

यातही सेन्शुअलपणा आहे; पण त्याची कुळी वेगळी आहे. इथे सेन्शुअलपणा म्हणजे तरलता असा निर्देश आहे. प्रणवच्या कथेच्या अगोदर ही कथा वाचनात आली असती तर ‘सेन्शुअलपणा म्हणजेच तरलता किंवा तरल संवेदनशीलता’ असं मनात उमटलं, ठसलं असतं. आणि प्रणवची कथा वाचल्यावर वेगळी बाजू समोर येऊन ‘तसं नाही,’ हे अधोरेखित झालं असतं. आपोआप प्रणवची कथा (आता वाटली त्यापेक्षा) जास्त प्रभावी वाटली असती. कलेच्या या मूल्यमापनाला ‘वस्तुसापेक्ष व्यक्तिनिष्ठ’, असलं काहीतरी भारदस्त नाव द्यावं का?

मनस्विनीची शब्दकळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. बाईची शब्दकळा बरेचदा तशी असते. कारण बाई, अगदी आधुनिक महानगरी बाईदेखील, परंपरेशी जवळीक साधून असते. मग पारंपरिक संज्ञा नवीन परिप्रेक्ष्यात येताना एकदम लखलखीत झालेल्या दिसतात. तसं इथे नाही. इथल्या शब्दकळेत एक ‘लहानपण’ आहे. त्यातून निरागसता अभिप्रेत आहे. त्यातून कथेतल्या प्रमुख पात्राविषयी वाचकाचं मत बनवण्याचा इरादा दिसून येतो. आणि तोच कथेचा आशय आहे.

हे याच एका कथेचं वैशिष्ट्य नाही; मनस्विनी हे असंच लिहिते. याला ‘स्वत:ची मायथॉलॉजी निर्माण करणे’ असं म्हणता येईल. पण या पद्धतीने लिहिणाऱ्याकडून मोठी अपेक्षा तयार होते: वेगवेगळ्या चौकटींमध्ये एका धाटणीचं साहित्य निर्माण करायचं, तर अगदी महाकाव्य नाही तरी काही सज्जड लिखाण होणार!

मनस्विनी लिहील, अशी अपेक्षा आहे.

कुयला - हृषीकेश पाळंदे

गोष्टीची सुरुवात ‘अनप्रॉमिसिंग’ आहे. म्हणजे कसं, तर विज्ञानाशी दुरून ओळख असलेले लोक वैज्ञानिक मांडणीने कधी कधी स्वत:च भुरळून जातात आणि रंगतदार फिक्शन सादर करावं तसं विज्ञानातील मांडणीभोवती मखरबिखर घालून तिला समोर आणतात. त्यात बहुसंख्य वाचकांना विज्ञानाची ओळख नसते, असलीच तर दुरून असते; याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न दिसतो. ही कथा अशाच वळणावर सुरू होते.

पण पुढे वाचत गेल्यावर ही भावना काही अंशी विरते. पुढे नीट ‘कथा’ आहे! संपूर्ण संग्रहात या कथेचा करोनाशी सर्वात जवळचा संबंध आहे. कथा एक फँटसी आहे. ‘अद्‌भुत’ नाही; काल्पनिक या अर्थी. (यात अद्‌भुतता आहे पण ती चवीपुरती आहे.) ती आजच्या कमर्शियल जगाचं रूपक रंगवण्याकडे झुकल्यासारखी वाटते; पण प्रत्येक तपशिलातून काहीतरी रूपकात्मक अर्थ निघतोच, असं नाही. त्याचमुळे कथा वाया गेलेली नाही. कथा निस्संकोच आहे. त्यातले ‘बोल्ड’ उल्लेख खटकत नाहीत कारण कथेतल्या वातावरणात ते नैसर्गिकपणे उमटतात.

एक खटकलेली गोष्ट. फिक्शनमध्ये काय, कसं असावं, हा लेखकाचा निर्णय असतो; पण कथेला वैज्ञानिक चौकटीची पार्श्वभूमी दिली, की त्या चौकटीला विसंगत ठरणारं कथेत नको होतं, असं प्रकर्षाने वाटतं. तसं न वाटण्यासाठी विज्ञानाला कथात्म रूप द्यायला हवं. इथे खटकलं आहे ते असं : गोष्टीला साऱ्या पृथ्वीचं परिमाण दिलेलं आहे. (आणि तसं दिलं नाही, तर गोष्ट उभी रहाणार नाही) पण मग भारत देशात जे घडतंय, तेवढ्याचीच दखल घेऊन भाष्य करणं बरोबर होईल का? बाहेरच्या जगाचं काय म्हणणं आहे? तिथे करोनाला लोक, डॉक्टर, प्रशासन, संशोधक कसा प्रतिसाद देत आहेत?

या प्रश्नांची दखल कथेत नाही. त्यामुळे फार बिघडत नाही. पण सुरुवातीला घेतलेला विज्ञानाचा आधार लंगडा पडतो. कदाचित याचमुळे कथेच्या शेवटी कथेबाहेर येऊन लेखकाच्या कथेची जोड दिली आहे. एका अर्थी ते लंगडं समर्थन वाटतं. पण मराठीत विज्ञानकथांमध्ये फार मोकळीक घ्यायला लोक बिचकतात, असं वाटतं. म्हणून या कथेचं स्वागतच करायला हवं.

समारोप

संग्रहाच्या मुखपृष्ठावरच्या चित्राच्या/फोटोच्या खाली डाव्या बाजूला ‘कथा प्रेमाच्या... कथा ओढीच्या...’ असं लिहिलं आहे. त्याचं प्रयोजन कळलं नाही. सर्व कथांमध्ये करोनाचा संदर्भ आहे; जरी करोनामुळे त्यातला आशय फुलतो आहे, असं बरेचदा नसलं तरी. पण याने काही बिघडत नाही. ज्याला ‘सायन्स फिक्शन’ म्हणतात, त्यातही सायन्स किती, कसं असावं, या प्रश्नाला नि:संदिग्ध उत्तर नाही. तसंच हे.

एका मध्यवर्ती घटनेभोवती फिरणाऱ्या विविध शैलीतल्या, त्या घटनेचे विविध पैलू न्याहाळणाऱ्या कथा एकत्र वाचणे, हा अनुभव एका बाजूने रंजक आहे आणि दुसरीकडून तुलना करायला मुबलक वाव असल्यामुळे उद्‌बोधकदेखील आहे. शिवाय, वाचकअभिरुचीच्या जास्तीत जास्त स्तरांना सामावून घेण्याचं गणितही त्यात आलेलं आहे! एकंदर, एक प्रातिनिधिक संग्रह काढल्याबद्दल रोहन प्रकाशनाला धन्यवाद!

..................................................................................................................................................................

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5246/Love-in-the-Time-of-Corona

..................................................................................................................................................................

हेमंत कर्णिक

hemant.karnik@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......