१.
३१ ऑक्टोबर २०२० रोजी शॉन कॉनरी या पहिल्या जेम्स बॉन्डचं वयाच्या ९०व्या वर्षी निधन झालं. ‘माय नेम इज बॉन्ड, जेम्स बॉन्ड’ अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या ‘बॉन्ड’ चित्रपटमालिकेतला हा पहिला जेम्स बॉन्ड. असं म्हटलं जातं की, जगातल्या जवळपास ५० टक्के लोकांनी जेम्स बॉन्ड हे नाव ऐकलेलं असतं. या चित्रपटमालिकेला आजवर जे यश मिळालं, ते जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला मिळालेलं नाही. जेम्स बॉन्ड उर्फ 007चे आजवर २४ चित्रपट आले आहेत आणि पुढल्या वर्षी ‘No Time to Die’ हा २५वा चित्रपट येईल. आधीच्या चारही चित्रपटांप्रमाणे या नव्या चित्रपटातही डॅनियल क्रेग या मध्ये जेम्स बॉन्ड साकारणार आहे.
एवढे चित्रपट या मालिकेत प्रदर्शित होण्याचं आणि त्यांना एवढं यश मिळण्याचंही जगातलं हे पहिलंच उदाहरण असावं. असं का झालं असावं? तर या चित्रपटमालिकेतलं थरारक रहस्य, कुटिल कारस्थानं, बेधडक प्रणय दृश्यं, अतिशय सुंदर छायाचित्रण, हाणामारीचे कुशलतेने चित्रित केलेले प्रसंग, जेम्स बॉन्डकडे असलेली वेगवेगळी हत्यारं, त्याची बुद्धिमत्ता, जीव धोक्यात घालून आणि त्यातून सहीसलामत सुटण्याचा त्याचा अबाधित पराक्रम आणि संवाद.
याशिवाय या चित्रपटमालिकेची इतरही कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येतील. चित्रपटाची सुरुवात जेम्स बॉन्डच्या एका छोट्याशा साहसदृश्यातून होते. त्यानंतर श्रेयनामावली सुरू होते. त्यात नग्न मुलींच्या कमनीय शरीरांचा वापर केलेला असतो. पण ती दृश्यं धूसर असतात. त्यामुळे ती कामूक वाटत नाहीत.
बॉन्डपटातल्या मुली थेट ‘फ्रेंच किस’ घेताना दाखवल्या जातात. असंच हाणामारीच्या प्रसंगांचंही असतं. त्यात क्रूरता कमी आणि विनोद जास्त असतो. त्यामुळे ती भडक वाटत नाहीत. रक्ताचे वाट वाहताहेत, जखमी माणसं वेदनेनं तडफडताहेत असं बॉन्डपटात सहसा पाहायला मिळत नाही. कैद्यांचा, गुन्हेगारांचा अमानुष वाटावा असा छळ नसतो. ‘डाय अनादर डे’ या २००२ सालच्या बहुधा एकमेव बॉन्डपटात जॅम्स बॉन्ड कैदेत खितपत पडलेला दाखवला आहे. पण तो बॉन्ड असल्यामुळे त्याचा छळ चित्रपटात दुय्यम प्रसंग म्हणून श्रेयनामावली सुरू असतानाच दाखवला जातो. म्हणजे त्याला ‘अंडरटोन’ केलं गेलं आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
बॉन्डपटाची भाषा किंवा त्यातील शिव्या या अर्वाच्य म्हणाव्यात अशा नसतात. bastard, asshole, Fuck You अशा इंग्रजी चित्रपटांत सर्रास ऐकायला मिळणाऱ्या शिव्या तर अजिबातच नसतात. याचा अर्थ असे शब्द नाहीतच असं नाही, पण ते नगण्य म्हणावेत असेच आहेत.
२.
जेम्स बॉन्ड हा इयान फ्लेमिंग या कादंबरीकाराचा मानसपुत्र. ही व्यक्तिरेखा त्यांनी १९५२ साली निर्माण केली. १७ फेब्रुवारी १९५२ रोजी फ्लेमिंग यांची ‘Casino Royale’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली आणि जेम्स बॉन्डचा जन्म झाला. पुढे १९६६ पर्यंत फ्लेमिंग यांनी दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीत या मालिकेतली नवी कादंबरी लिहिली. १९६६पर्यंत या मालिकेत त्यांनी १२ कादंबऱ्या आणि दोन कथासंग्रह लिहिले. त्यांच्यानंतर किंग्जले अमिस, जॉन गार्डनर, जॉन पिअरर्सन, रेमंड बेन्सन आणि चार्ली हिग्सन यांनी या मालिकेतल्या कादंबऱ्या लिहिल्या. मधल्या काळात ख्रिस्तोफर वुड यांनी The Spy Who Loved Me आणि James Bond and Moonraker हे दोन बॉन्डपट स्वतंत्रपणे लिहिले.
बॉन्डपट मालिकेतला पहिला चित्रपट ‘डॉ. नो’ हा १९६२ साली प्रदर्शित झाला. म्हणजे फ्लेमिंग यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तब्बल १० वर्षांनी. त्यात जेम्स बॉन्डची भूमिका सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे शॉन कॉनरी यांनी केली. त्याच्या पुढच्या वर्षी ‘From Russia with Love’ (१९६३), ‘Goldfinger’ (१९६४), ‘Thunderball’ (१९६५), ‘You Only Live Twice’ (१९६७) हे चित्रपट प्रदर्शित झाले. या पाचही चित्रपटांत शॉन कॉनरी यांनी जेम्स बॉन्ड साकारला. १९६९ साली ‘On Her Majesty's Secret Service’ हा सहावा बॉन्डपट प्रदर्शित झाला. त्यात जेम्स बॉन्ड जॉर्ज लेझांबी यांनी साकारला, पण ‘Diamonds Are Forever’ (१९७१) या सातव्या बॉन्डपटात पुन्हा शॉन कॉनरी यांनी जेम्स बॉन्डची भूमिका केली. हा त्यांचा या मालिकेतला शेवटचा चित्रपट.
त्यानंतर रॉजर मूर यांनी पुढच्या सात बॉन्डपटांत जेम्स बॉन्ड साकारला. त्यानंतर टिमोथी डाल्टन यांनी दोन बॉन्डपट केले. त्यानंतरचे चार बॉन्डपट पिअर्स ब्रासनन यांनी केले. तर २००६ ते २०१५ या काळात प्रदर्शित झालेल्या २१व्या, २२व्या, २३व्या, २४व्या बॉन्डपटांत डॅनिअल क्रेग यांनी जेम्स बॉन्ड साकारला आहे. पुढच्या वर्षीच्या बॉन्डपटातही तेच जेम्स बॉन्ड असणार आहेत.
इयान फ्लेमिंगचा हा मानसपुत्र म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया या दोन महासत्तांदरम्यान निर्माण झालेल्या शीतयुद्धाच्या काळातला ब्रिटिश गुप्तहेर. त्यामुळे कुटिल कारस्थानं हा बॉन्डपटांचा अविभाज्य भाग असतो. आणि त्यात रशियनांना खलनायक दाखवलेलं असतं. पण ते असो. जेम्स बॉन्ड गुप्तहेर असल्यामुळे त्याला सतत वेषांतर करावं लागतं. त्यामुळे त्याचं राहणीमान उच्चभ्रू प्रकारात मोडणारं असतं. मनगटावर ‘रोलेक्स’ कंपनीचं महागडं घड्याळ आलं तेही त्यातूनच. ‘मार्टिनी, शेकन, नॉट स्टरर्ड’ अशी हॉटेलांत ऑर्डर देणाऱ्या जेम्स बॉन्डमुळे ही व्होडका पुढे ‘मार्टिनी जेम्स बॉन्ड’ याच नावाने ओळखली जाऊ लागली. जेम्स बॉन्ड सिगारेटही ओढतो, पण त्याला त्याचं व्यसन नाही. मग त्याला कसलं व्यसन आहे? तर प्रणय, सुंदर मुली आणि कार यांचं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
बुद्धिमान, धाडसी आणि देखणा जेम्स बॉन्ड हा लोकप्रिय न होता तरच नवल! शॉन कॉनरी यांनी साकारलेला पाचवा बॉन्डपट १९६७साली प्रदर्शित झाला, तोवर जेम्स बॉन्ड जगभर प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे निर्माते-दिग्दर्शक वेगवेगळे चमत्कार करून दाखवायच्या मागे लागले. परिणामी या उत्कृष्ट गुप्तहेर कथा असलेल्या चित्रपटमालिकेचं हळूहळू अतर्क्य आणि अचाट सिनेमांमध्ये रूपांतर होत गेलं. अलीकडच्या काळात तर ते ‘सायन्स फिक्शन’च झालेले आहेत. शॉन कॉनरी यांना या गोष्टी मान्य नव्हत्या. त्याविषयीची आपली नाराजी त्यांनी अनेक वेळा उघडपणे बोलूनही दाखवली. पण जे खपतं ते विकलं जातं, या न्यायाने बॉन्डपट थरारक, रोमांचक आणि अदभुत होतच गेले.
३.
पहिले पाच बॉन्डपट सुपरहिट झाल्यामुळे निर्मात्यांनी सहाव्या बॉन्डपटासाठी नवा चेहरा, जॉर्ज लेझांबी यांना घ्यायचं ठरवलं. ‘On Her Majesty's Secret Service’ या १९६९ सालच्या बॉन्डपटात त्यांनी जेम्स बॉन्ड साकारला, पण हा चित्रपट फारसा चालला नाही. पण असं म्हणतात की, हा चित्रपट बॉन्डपट मालिकेतला सर्वांत चांगला सिनेमा आहे. १९७१ सालच्या सातव्या बॉन्डपटात पुन्हा शॉन कॉनरी यांनीच जेम्स बॉन्ड साकारला.
शॉन कॉनरी, जॉर्ज लेझांबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रासनन, डॅनिअल क्रेग या प्रत्येक जेम्स बॉन्डबद्दल लिहिता येईल. प्रत्येकाने साकारलेला बॉन्ड वैशिष्ट्यपूर्ण आहे. शॉन कॉनरी यांचा जेम्स बॉन्ड रफ अँड टफ आहे, तर जॉर्ज लेझांबी यांचा थोडा संसारिक, रॉजर मूर यांचा जरा हलकाफुलका, विनोदी, टिमोथी डाल्टन यांच्या बॉन्डला तर ‘लिटररी जेम्स बॉन्ड’ असंच म्हटलं जातं, पिअर्स ब्रासननच्या जेम्स बॉन्ड हा आधीच्या चारही जेम्स बॉन्डचा अर्क मानला जातो. डॅनिअल क्रेगचा बॉन्डही वैशिष्ट्यपूर्ण म्हणावा असाच आहे. पण तेही असो.
१९६२पासून २०२०पर्यंत जग कितीतरी बदललं. बॉन्डपटांतही त्यानुसार बदल झाले. पण त्यातली एक गोष्ट मात्र अजूनही बदलली नाही. ती म्हणजे जेम्स बॉन्ड. तो ब्रिटिश गुप्तहेरच राहिला आहे. आणि त्याची भूमिका साकारणारे अभिनेते ब्रिटिशच राहत आले आहेत.
पण तेही असोच. बॉन्डपटांबद्दल सुरस, चमत्कारिक आणि रमणीय म्हणावं असं बरंच काही सांगता येईल. पण तो आपला विषय नाही. तेव्हा एवढ्या प्रस्तावनेनंतर आपल्या मुख्य विषयाकडे येऊ या. तो आहे शॉन कॉनरी या पहिल्या जेम्स बॉन्डचं निधन.
४.
शॉन कॉनरी यांचा जन्म २५ ऑगस्ट १९३० रोजी ब्रिटनमधल्या, स्कॉटलंड भागातल्या एडिनबर्ग या गावी झाला. त्यांचं नाव खरं नाव थॉमस शॉन कॉनरी. पहिला जेम्स बॉन्ड साकारण्याआधी कॉनरी बॉडीबिल्डर, मॉडेल आणि नाटक-चित्रपट क्षेत्रांत धडपड करणारे उदयोन्मुख अभिनेता होता. कॉनरी यांची शैक्षणिक प्रगतीही यथातथाच होती. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी आपल्या नाटकवेडापायी शाळा सोडून दिली. वेगवेगळ्या नाटक कंपन्यांमध्ये कामं केली. पण त्यांना वाचनाचं खूप वेड होतं. त्यातून त्यांनी बहुश्रुतता मिळवली. त्याच जोरावर पुढे जेम्स बॉन्ड शर्यतीत त्यांनी अनेकांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. वयाच्या ३२व्या वर्षी त्यांना बॉन्डपटातली पहिली भूमिका मिळाली आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं.
त्यांनी पहिल्या पाच बॉन्डपटात सलग जेम्स बॉन्डची भूमिका केली. त्यानंतर ‘डायमंडस आर फॉरएव्हर’ या सातव्या बॉन्डपटातही काम केलं. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी ‘नेव्हर से नेव्हर अगेन’ (१९८३) या बॉन्डपटातही जेम्स बॉन्ड साकारला. पण हा बॉन्डपट ‘अनधिकृत’ समजला जातो.
त्याबरोबर त्यांनी अल्फ्रेड हिचकॉक यांच्या ‘मार्नी’ (१९६४), ‘अ फाइन मॅडनेस’ (१९६६), ‘द मॉली मॅग्वायर्स’ (१९७०) या तीन चित्रपटांत भूमिका केल्या. पण हे चित्रपट फारसे चालले नाहीत. आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सणकून आपटले.
..................................................................................................................................................................
हेही पाहा : भारतीय वृत्तपत्रे आपली ‘विश्वासार्हता’ बुलेट-ट्रेनच्या वेगाने गमावत आहेत...
..................................................................................................................................................................
‘द हिल’ (१९६५), ‘द अँडर्सन टिप्स’ (१९७२), ‘द ऑफेन्स’ (१९७३), ‘मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस’ (१९७४), ‘झार्डोझ’ (१९७४), ‘द मॅन हू वुड बी किंग’ (१९७५), ‘द विंड अँड द लॉयन’ (१९७५), ‘रॉबिन अँड मरियना’ (१९७६), ‘द बँडिट’ (१९८१) ‘द फॅमिली बिझनेस’ (१९८९), हे त्यांचे इतर काही चित्रपट. यांमध्ये त्यांनी अपराधी, चोर, पोलीस अधिकारी अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या.
१९७१ ते १९८३ या १२ वर्षांच्या काळात कॉनरी बॉन्डपटांपासून दूर होते. या काळात त्यांनी वरील चित्रपट केले. त्यातल्या कुठल्याही भूमिकेत त्यांनी जेम्स बॉन्ड किंवा त्याच्या लकबी आणल्या नाहीत. जेम्स बॉन्ड साकारणारा हा तोच अभिनेता का, असा प्रश्न पडावा, अशा तन्मयतेनं या भूमिका त्यांनी केल्या. थोडक्यात बॉन्डपटांमुळे उदंड लोकप्रियता मिळूनही त्यांनी त्याच चौकटीत अडकून पडणे नाकारले. सतत नवनवीन प्रयोग केले. यश गिरवण्याला नकार दिला. आणि नवे प्रयोग करण्यातली जोखीम निधडेपणाने स्वीकारली.
तरीही त्यांची ओळख राहिली ती जेम्स बॉन्ड म्हणूनच. पण त्यांनी ती सतत नाकारण्याचा प्रयत्नही केला. किंबहुना बॉन्डपटात येणाऱ्या व्यावसायिकतेविषयी त्यांनी अनेकदा उघडपणे बोलूनही दाखवले होते. म्हणजे जेम्स बॉन्डने कॉनरी यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याला पुरून उरले. त्यांच्या या उमद्या वृत्तीमुळे आणि राजबिंड्या रूपामुळे ते जनसामान्यांपासून अभिजनांपर्यंत लोकप्रिय झाले असावेत. एकसाची मूर्ती व्हायला आणि तीच एकमेव ओळख मिरवत राहण्याला कॉनरी यांनी कायम नकार दिला. म्हणूनच त्यांचं जगभरच्या चित्रपटप्रेमींना कौतुक होतं.
‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ असंच कॉनरी यांचं वर्णन करावं लागेल. ताडमाड म्हणावी अशी उंची (सव्वा सहा फूट), व्यायामाने कमावलेलं बांधेसूद शरीर, शिवाय स्कॉटिश धिप्पाडपणा आणि राजबिंडं रूप… पुरुष कसा असावा तर असा… शॉन कॉनरीसारखा… असं जगभरच्या तमाम मदनिकांना वाटावं असे सारे गुण कॉनरी यांच्या व्यक्तिमत्त्वात होते.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
कॉनरी स्टॉलवर्ट नव्हते. त्यांना चित्रपटांची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे नाटक, टीव्ही आणि चित्रपट असे टप्पे पार करत ते अभिनेते म्हणून पुढे आले आणि जेम्स बॉन्ड म्हणून जगप्रसिद्ध झाले. नाटकातली माणसं चित्रपटात येतात, तेव्हा अभिनय म्हणजे काय आणि डोक्यात हवा जाऊ न देणं म्हणजे काय, याचं भान बाळगून असतात. कारण ती चांदीचा चमचा तोंडात घेऊन येत नाहीत. आपलं शरीर हेच आपलं भांडवल आहे, याचं पक्कं भान त्यांना असतं. अभिनयाची चांगली समज असते. त्यामुळे ‘हिरो’पणाची हवा त्यांना सहसा लागत नाही.
म्हणूनच की काय, पण कॉनरी यांनी योग्य वेळी निवृत्त होणं पसंत केलं. जेम्स बॉन्डछाप चित्रपटांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. निवृत्तीनंतर आलेली अनेक प्रलोभनं नाकारली. आपलं तृप्त, समाधानी आयुष्य जगण्यात त्यांनी ऐश्वर्य मानलं, नव्हे उपभोगलं!
आयुष्याच्या उत्तरायुष्यात त्यांना ब्रिटनच्या महाराणीने ‘सर’ हा ब्रिटनचा सर्वोच्च किताब देऊन गौरवलं. पण ते स्कॉटिशवादी होते. स्कॉटलंड ब्रिटनपासून वेगळा व्हावा या मोहिमेत त्यांचा सहभाग होता. तरीही त्यांना महाराणीने हा किताब द्यावा आणि त्यांनी तो स्वीकारूनही आपल्या मागणीपासून हटू नये, यातली शालीनता आणि उमदेपणा लक्षात घेण्यासारखा व ठेवण्यासारखा आहे.
आपल्या स्वप्नातला राजकुमार शॉन कॉनरी यांच्यासारखा असावा, असं सुखस्वप्न जगभरच्या दोन-तीन पिढ्यांच्या तरुणींना त्यांनी दिलं. इतकंच नव्हे तर तसा राजकुमार अजिबात वाट्याला न आलेल्या तरुणींच्याही मनात त्यांनी जागा मिळवली होती. ‘हिरो’ तर ते होतेच. पण उमदा माणूसही होते. त्यात ब्रिटिश, स्कॉटिश. शालीन, घरंदाज, परंपराप्रिय आणि अभिमानी. अभिजात सुसंस्कृतपणा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. असा अभिनेता अनेकांच्या मनातला हिरो आणि स्वप्नातला राजकुमार होणारच की! त्यांच्या निधनानंतर हिंदीतील ख्यातनाम अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी म्हटलं आहे – ‘Sean Connery was the ONLY Bond for me.’ आता ते आपल्यात नाहीत. पण तरीही त्यांची ही ओळख अनेकांच्या मनात कायम राहणार आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment