शब्दांचे वेध : पुष्प चौदावे
काही काही गोष्टींचा साक्षात्कार अचानकच होतो. ध्यानीमनी नसताना, अगदी सहजच. “आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या काळी, असता मन भलतीच कडे”सारखी ही अवस्था असते. परवा असेच झाले.
‘वाचता वाचता’ या नावाच्या एका साहित्यविषयक समूहात कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘तेथे कर माझे जुळती’ या प्रख्यात कवितेतील शेवटच्या कडव्याचा नक्की अर्थ काय होतो, असा प्रश्न मी विचारला. खूप दिवसांपासून मला ही शंका होती. हे कडवे असे आहे -
मध्यरात्री नभघुमटाखाली
शांतीशिरीं तम चवऱ्या ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती |
दिव्यत्वाची जेथ प्रचिती
तेथे कर माझे जुळती ||
त्यावर या प्रश्नाचे एक फार छान आणि अगदी पटण्यासारखे उत्तरवजा-स्पष्टीकरण प्रा. नीतिन आरेकर यांनी दिले. ते म्हणाले -
“हा भावार्थ असा समजून घ्यावा : अतिभव्य नभ घुमटाखाली पहुडलो असताना, संपूर्ण शांततेच्या वेळी, अंधारच त्या शांततेवर चवऱ्या ढाळतो आहे, अशा वेळी त्या संपूर्ण वातावरणात मी बहिष्कृत आहे असं मला वाटतं, ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण नगण्य आहोत ही भावना मनात जागी होते. ह्या भव्यतेचा साक्षात्कार झाल्यानंतर आपसूक डोळ्यात पाणी भरतं, दिव्यत्वाची प्रचिती येते आणि त्या क्षणापाशी माझे कर जुळतात!”
हे वाचल्यावर असे माझ्याही बाबतीत कधी तरी नक्की झाले आहे, असे मला वाटू लागले. पण खूप वेळ निश्चित संदर्भ लक्षात येत नव्हता. काल अचानक संध्याकाळी आमच्या बागेतल्या सोनचाफ्याच्या झाडावर एक तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) पक्षी कुठूनतरी येऊन बसला. त्याने त्याचे ते एका संथ लयीतले ‘टुक टुक टुक’ असे एकसुरी गाणे सुरू केले. आणि माझी ट्युबलाईट पेटली. (या क्षणाला इंग्रजीत ‘the penny dropped’ असे म्हणतात.) त्या तांबटाचा तो आवाज मला माझ्या गावात, मोझरला, घेऊन गेला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
खूप वर्षांपूर्वी, मी मॅट्रिक झालो. त्या वर्षी उन्हाळ्यात एकटाच मोझरला गेलो होतो. महाविद्यालयात प्रवेश घेतला होता, पण वर्ग सुरू व्हायला वेळ होता. पावसाळा कोणत्याही क्षणी सुरू व्हायला आलेला होता. दुपारी दोन-अडीच वाजता फार उकडत होते. जेवण कधीचेच आटोपले होते. घरात करमत नव्हते आणि झोपही येत नव्हती. मग मी सरळ पायात चपला घातल्या आणि ‘वाडी’ नावाच्या आमच्या गावाला लागून असलेल्या वावराकडे निघालो. वाडीत जमीन नांगरून, वखरून झाली होती. वावर पूर्ण रिकामे होते. फक्त तिथल्या डेरेदार आंब्याच्या झाडांखाली मस्त सावली होती. मी एका झाडाखाली ताणून दिली. आंब्याची एक काडी चघळत डोळे मिटले. वऱ्हाडातले ते राक्षसी ऊन. गावात सगळे आपापल्या घरांत आराम करत होते. चिडीचूप होते सगळीकडे. एका पक्ष्याचा आवाज नाही की कुत्र्याचा. खरी नीरव शांतता होती.
आणि अचानक गावातल्या एकमेव चक्कीवाल्याने त्याच वेळी आपली चक्की (पिठाची गिरणी) सुरू केली. डिझेलवर चालणाऱ्या त्या चक्कीच्या मोटरचा अगदी एखाद्या तांबट पक्ष्याच्या ओरडण्यासारखाच ‘टुक टुक टुक’ असा आवाज माझ्या कानावर येऊ लागला. एव्हाना मी अर्धवट पेंगुळलेला होतो. चक्कीच्या या टुकटुकीमुळे मला त्या वेळी हिप्नोटाईज झाल्यासारखे वाटू लागले. आणि किती वेळ मी तिथे तसाच स्तब्ध, निःशब्द, तंद्री लागल्यासारखा पडून राहिलो. आपण कोण आहोत, कुठे आहोत, कशासाठी आहोत यातले मला काही कळेनासे झाले. गरम हवा वाहत होती, भर दुपारचे रणरणते ऊन चटके देत होते - पण मला यातले काही, काही जाणवत नव्हते. किती वेळ गेला कोण जाणे. मला जाग आली, तेव्हा संध्याकाळ होत आली होती.
परवा आरेकरांचा खुलासा वाचून इतके वर्षांनी मला असे जाणवले की, ते म्हणतात तसा ‘विश्वाच्या या पसाऱ्यात आपण नगण्य आहोत’ यासारखा हा मला त्या वेळी काहीतरी साक्षात्कार झाला असावा. अर्थात हे तत्त्वज्ञान कळण्याचे ते वय नव्हते.
पुढे बऱ्याच वर्षांनी कोकणातही एक-दोनदा असाच अनुभव मला आला होता. एका मध्यरात्री आम्ही दोघे-तिघे फिरायला गेलो. छोटेसे गाव, धूळभरला अरुंद रस्ता, दोन्ही बाजूंना दाट झाडी, आणि भयाण, अंगावर धावून येईल अशी शांतता. तेवढाच भयाण अंधार. तेव्हा मला त्या वाटेवर असेच काही तरी, एक वेगळेच फिलिंग आले होते.
आणखी एकदा कोकणातच एका उत्तररात्री समुद्रापाशी भटकायला गेलो असताना त्याच्या त्या लाटांचा घनगंभीर आवाज मला कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला होता. तेव्हा तर आकाश ताऱ्यांनी नुसते फुलून गेले होते. नागपूरला असे दृश्य कधीच बघायला मिळत नाही. त्या वेळी हे सारे विश्व किती विशाल आहे, अमर्याद आहे, अनंत आहे, तिथले हे नाद, आणि तिथली ही शांततादेखील किती अद्भुत आहे, हे अगदी तीव्रतेने जाणवले होते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मी अध्यात्माच्या वाटेला फारसा जात नाही, पण त्या वेळी खरोखर काही तरी वेगळी अनुभूती आली होती, हे निश्चित. निसर्गाच्या या लीलेत, या वैश्विक रचनेत माझे स्थान काय, मी कोण, माझा ‘वजूद’ काय आहे, याचा मला क्षणभर का होईना, पण तपास करावासा वाटला. ‘कोsहम्, कोsहम्’ असा प्रश्न साधू संतांना पडतो, तसाच मलाही पडला असावा.
अर्थात मी साधू नाही आणि संतप्रवृत्तीचा तर नाहीच नाही. पण निसर्गाच्या भव्यतेची, दिव्यत्वाची प्रचिती मला अनेकदा आलेली आहे आणि स्वतःच्या क्षुद्रत्वाच्या जाणिवेने डोळे अगदी पाणावले नसले तरी मन नक्कीच खंतावले आहे. अर्थात ऐहिक सुखोपभोगांना लालचावलेल्या माझ्यासारख्या शहरी, तथाकथित सुसंस्कृत माणसांची back to normal होण्याची एक सहजप्रवृती असते. त्यामुळे एकदा रुटीन जीवन पुन्हा सुरू झाले की, रोजच्या रहाटगाडग्यात स्वतःच्या खुजेपणाचे हे सारे साक्षात्कार लगेच विसरले जातात.
मात्र जगात असेही अनेक लोक आहेत, जे नैसर्गिक भव्यतेची, निसर्गाच्या दातृत्वाची, निसर्गाच्या शक्तीची जाणीव कधीच विसरत नाहीत. ते खऱ्या अर्थाने निसर्गपुत्र असतात. त्यांच्या मनात, हृदयात कुठे तरी एक ‘fine-tuned two-way’ रेडिओ सेट असतो. त्याच्यामार्फत त्यांना निसर्गाशी अनुसंधान साधता येते. ते निसर्गाशी, विश्वपुरुषाशी, अनंत ब्रह्मांडाशी मानसिक संवाद साधतात आणि त्यांना प्रतिसादही मिळतो.
हा अंतर्मनाचा खेळ विशेषतः आपण ज्यांना आदिवासी म्हणतो, अशा समाजातल्या लोकांना जास्त चांगला जमतो. कारण त्यांच्यावर नागरी संस्कृतीच्या बेगडी आणि आभासी, अनावश्यक संस्कारांचा परिणाम झालेला नसतो. या मंडळीत निसर्गप्रेमाची एक अनुवंशिक उपजत भावना असते. त्यांच्या शेकडो पिढ्यांनी जे पारंपरिक सामूहिक ज्ञान मिळवलेले असते, ते तसेच पुढे संक्रमित होते. यात अनेक गोष्टींचा समावेश असतो. वागण्याबोलण्याचे अलिखित नियम असतात, न्याय असतो, आचार-विचारांचे संकेत असतात, प्रेम असते, दया असते, आणि मुख्य म्हणजे निसर्गाबद्दल वाटणारा आदरयुक्त दरारा असतो. ही मंडळी झाडांवर प्रेम करतात, झऱ्यांवर प्रेम करतात, आणि जमिनीवरही. आपल्यापेक्षा त्यांची जीवनशैली वेगळी असल्याने आणि आपण आपल्या नजरेतून त्यांच्याकडे बघत असल्याने आपल्याला त्यांचे अंतरंग समजत नाही. पण हा आपला दोष आहे.
आदिवासी समाज कुठलाही असो - भारतातले भिल्ल, कोरकू, गोंड असोत, अफ्रिकेतले झुलू किंवा बांटू असोत, अमेरिकेतले रेड इंडियन असोत, किंवा ऑस्ट्रेलियातले विविध जमातींचे मूळनिवासी असोत - या साऱ्यांची निसर्गप्रेमी संस्कृती आहे. या जमातींचे समाजमन उदात्त आहे. त्यांची हृदये विशाल आहेत. आणि मुख्य म्हणजे स्वार्थ, भ्रष्टाचार, ईर्ष्या, स्पर्धा, या सारख्या दुर्गुणांपासून ते कोसो दूर आहेत. भौतिक प्रगतीपेक्षा प्रेम आणि बंधुभाव यावर आधारलेली आत्मिक प्रगती त्यांना जास्त प्रिय आहे.
म्हणून बांटू लोकांमध्ये ‘उबुंटू’ (Ubuntu)ची संकल्पना विकसित झाली आहे. उबुंटू हे नाव सध्या कंप्युटरविश्वाशी संबंधित आहे, म्हणून जास्त प्रचलित आहे. पण मुळात या ‘बांटू’ शब्दाचा अर्थ आहे- माणुसकी- बंधुभाव, परस्पर सहाय्य. जगातल्या सर्व समाजातल्या लोकांना जोडणारा, एकत्र आणणारा एक अदृष्य धागा, बंध, म्हणजे ‘उबुंटू’, अशी त्याची तात्त्विक छटा आहे. आपल्या तथाकथित सभ्य समाजातल्या प्रस्थापित धर्मांचीदेखील हीच तर शिकवण आहे. मानवता हेही शिकवतात आणि तेही. मग बांटू समाज किंवा माडिया समाज आपल्यापेक्षा कनिष्ठ आहे, हे कशावरून आणि ते ठरवणार कोण?
‘उबुंटू’ (Ubuntu) (सर्व मानवांना एकत्र जोडणारा एक अदृष्य धागा, बंध) हा अफ्रिकेतल्या बांटू आदिवासी समाजाने इंग्रजीसह जगातल्या सर्व भाषांना दिलेला एक नवा, अनोखा, सुंदर, आणि समर्पक शब्द आहे.
.................................................................................................................................................................
हेही पाहा : बा(र)मिसाईडच्या मेजवानीतला मेन्यू : बोलाचीच कढी बोलाचाची भात
..................................................................................................................................................................
असाच एक आणखी वेगळा, नवा, अनोखा, सुंदर, आणि समर्पक शब्द ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींनी जगाला देणगी म्हणून दिला आहे. हा शब्द आहे, ‘dadirri’ किंवा ‘डाडिडी’ (डा-डिड-ई). या टिपणाची सुरुवात निसर्गाच्या दिव्यत्वाच्या अनुभूतीविषयक बोरकरांच्या ज्या कडव्यापासून झाली, अगदी त्याचेच पडसाद या आदिवासी शब्दात ऐकायला मिळतात. विश्वाच्या या अमर्याद पसाऱ्यात आपले स्थान काय यावर मानवाने केलेले चिंतन आणि त्यातून उत्पन्न झालेली खुजेपणाची, क्षुद्रत्वाची, नगण्यपणाची भावना म्हणजे ‘dadirri’.
हा एक शब्द आहे, एक संकल्पना आहे, आणि एक आध्यात्मिक रिवाज पण आहे.
ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींचा गेल्या चाळीस हजार वर्षांचा इतिहास आहे. पूर्वजांच्या अनुभवांवर आधारित त्यांचे जे सामाजिक भान आणि ज्ञान आहे, ते बेमिसाल आहे, बेजोड आहे. गेल्या दोन तीनशे वर्षांत पाश्चात्य गोऱ्या लोकांनी ऑस्ट्रेलियात येऊन त्यांचे सर्वस्व हिरावून नेले. पण तोवर ही मंडळी स्वयंपूर्ण होती. त्यांची त्यांच्या परीने विकसित अशी एक संस्कृती, सभ्यता होती. त्यांच्या तत्त्वज्ञानाची एक परंपरा होती. या परंपरेचा परिपाक म्हणजे स्वतःला कस्पटासमान लेखून निसर्गापुढे लीन व्हायची त्यांची तयारी. म्हणजेच ‘dadirri’.
हा शब्द ऑस्ट्रेलियाच्या Northern Territory या प्रांतात राहणाऱ्या Ngangikurungkurr नावाच्या आदिवासी लोकांच्या बोलीभाषेतला आहे. Ngangi म्हणजे शब्द किंवा स्वर, ध्वनी; Kuri म्हणजे पाणी; आणि kurr म्हणजे खोल. खोल पाण्याचा ध्वनी. चिंतन, मनन, ध्यान करताना बाह्य जगाला विसरून स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावणे, चित्त एकाग्र करून चंचल विचारांना, मानसिक विकारांना हद्दपार करून आपल्याच मनाच्या तळाशी जाऊन अवगाहन करणे, स्वतःचा शोध घेणे, म्हणजे ‘dadirri’. हे निसर्गावर केलेल्या निःशब्द चिंतनातून साध्य होते.
पण त्या लोकांसाठी हा नुसताच आध्यात्मिक शब्द वा संकल्पना नाही. नुसतेच निसर्गाचे चिंतन करणे असाही याचा अर्थ नाही. त्यांच्या पूर्वजांनी अनुभवाधिष्ठित ज्ञान - विज्ञानाची, संगीतादी कलांची, इतिहासाची जी समृद्ध मौखिक परंपरा त्यांना दिली आहे, तिचा अभ्यास करणे, तिच्यावर चिंतन करणे, तिचे रक्षण, संवर्धन, आणि संगोपन करणे, याही आनुषांगिक बाबी त्यात अध्याहृत आहेत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अँड्र्यू टेलर म्हणतो – “Dadirri implies a sense of wonder and humility, an almost mystical awareness of one’s individual place in the great mystery of Creation. It focuses attention on both the vastness of the external worlds of time and space, and on the inner thoughts and emotions of the individual as a part of that greater whole.”
आजारी शरीर आणि मन यांना बरे करण्यासाठी औषधोपचारांसोबत जर ‘Dadirri’देखील असली, म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात ‘स्व’चा शोध घेण्याचा माणसाने जर प्रयत्न केला, तर तो फार लवकर बरा होऊ शकतो, असे आता पाश्चात्य आयुर्विज्ञान तज्ज्ञांना वाटू लागले आहे.
भारतीय अध्यात्मशास्त्रात जवळपास याच अर्थाचे विवेचन आहे, पण ‘Dadirri’च्या रूपाने त्याला आता एक चपखल असे नवे नाव प्राप्त झाले आहे.
Ngangikurungkurr या आदिवासी जमातीत जन्मलेली Miriam-Rose Ungunmerr ही एक ऑस्ट्रेलियन लेखिका आणि तत्त्वचिंतक आहे. ‘Dadirri’बद्दलची तिने दिलेली अधिक माहिती या वेबसाईटवर जाऊन वाचता येईल -
https://www.miriamrosefoundation.org.au/about-dadirri
..................................................................................................................................................................
प्रा. नीतिन आरेकरांचा उल्लेख त्यांच्या पूर्वअनुमतीने केला आहे.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment