विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं असतानाच बिहारमधलं राजकीय वातावरण बदलू लागल्या असल्याच्या वार्ता आल्या आहेत. या निवडणुका जाहीर होण्याआधी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड आणि भाजप यांची युती आरामात निवडून येईल असं एकूण वातावरण होतं. माध्यमांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्याही त्याच आशयाच्या होत्या. काही बातम्या आणि चाचणी कौलात (निवडणूकपूर्व सर्व्हे) भाजपच्या जागा वाढू शकतात, असाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. मात्र पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू व्हायच्या दोन दिवस आधीच हे वातावरण बदलत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. असा बागुलबुवा निर्माण करून आपल्या हक्काच्या मतदारांना संघटित करणं आणि एकगठ्ठा मतदानाला बाहेर काढणं, ही त्यामागची भाजपची खेळी असू शकते, हे विसरता येणार नाही.
‘असं’ करण्यात भाजप हा पक्ष तसाही कसबी आहेच! मात्र असं असलं तरी, बिहारमध्ये असलेले काही मित्र आणि निवडणुकीच्या कामासाठी गेलेले काही अन्य स्त्रोत आहेत, यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे भाजप आणि जनता दल युनायटेडला निसटत का असेना बहुमत मिळेल. असं जर घडलं तर, एखाद्या राज्याचा सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम भाजपचे सुशीलकुमार मोदी यांच्या नावावर नोंदवला जाईल, कारण भाजपला जास्त जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमार होतील असं ठरलेलं आहे.
एक मात्र नक्की, जनता दल युनायटेड म्हणजे नितीशकुमार यांचा पक्ष आणि भाजप युतीला जर बिहारमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं तर येणारा काळ किमान भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फार काही चांगला नाही, असा त्याचा अर्थ असेल. भाजपने सभागृहात सर्वांत मोठा पक्ष हे स्थान मिळवूनही महाराष्ट्रात हातातोंडाशी आलेली सत्ता गमावली, हरियाणातही स्वबळावर भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यासाठी दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा टेकू घ्यावा लागला. झारखंड आणि दिल्ली निवडणुकीतही सत्तेचा सोपान चढण्यात भाजपला यश आलं नाही.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
या पार्श्वभूमीवर जर बिहार हे राज्य हातचं गेलं तर, येणाऱ्या काळात होणाऱ्या विशेषत: पश्चिम बंगाल आणि त्यासोबतच तामीळनाडू, केरळ आणि आसामच्या विधानसभा निवडणुका भाजपसाठी सोप्या नसतील.
बिहारचं राजकारण हे तसं एका अर्थाने समाजवादी चळवळीला आणि देशातल्या आमच्या पिढीच्या युवकांना प्रेरणा देणारं आणि दुसऱ्या पातळीवर त्या सगळ्या प्रेरणांचा चक्काचूर कसा होतो, याचं दर्शन घडवणारं अशा पद्धतीचं राहिलेलं आहे.
जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून सत्तरीच्या दशकात या देशातील संवेदनशील, पुरोगामी आणि विशेषत: समाजवादी विचाराच्या तरुणांना प्रेरणा मिळाली. त्यात सहभागी असणारे लालूप्रसाद यादव, शरद यादव, नितीशकुमार, रामविलास पासवान हे काही बिहारमधले नेते. या सर्वच नेत्यांनी केवळ बिहारचं नाही तर राष्ट्रीय पातळीवरही कामगिरी बजावली मात्र हे नेते आणि त्यांचे पक्ष जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित असलेल्या आदर्शवादी राजकारणाच्या वाटेवरून भरकटले हेही तेवढंच खरं.
१९९० ते २००५ अशी जवळजवळ १५ वर्षे लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. काही काळ त्यांच्या पत्नीही मुख्यमंत्री होत्या; परंतु पडद्याआडचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादवच होते. मात्र ज्या जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन केलं, त्याच भ्रष्टाचाराच्या दलदलीत लालूप्रसाद यांची राजवट फसली. लालूप्रसाद चारा घोटाळ्यांपासून अनेक गैरव्यवहारांच्या आरोपात अडकले. एकीकडे चमकदार राजकीयकामगिरी, अफाट लोकप्रियता आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराचे न्यायालयात सिद्ध झालेले आरोप, अशा विरोधाभासी परिस्थितीमध्ये लालूप्रसाद हे रांगडं व्यक्तिमत्त्व अडकलं.
लालूप्रसादांच्या मुख्यमंत्री असण्याच्या काळात बिहारची प्रतिमा ‘गुंडाराज’ अशी झाली. संध्याकाळी सात नंतर बिहारमधल्या बहुतेक सर्व शहरांमधलं जनजीवन ठप्प होत असे. राज्यातल्या गुंडावर कोणत्याही प्रकारची कारवाई न होण्याची ती १५ वर्षे होती आणि त्या राजवटीला लोक कंटाळले होते. मात्र पुन्हा विरोधाभास असा की, लालूप्रसाद यांना कंटाळलेल्या बिहारच्या जनतेनी त्यांना लोकसभेवर निवडून दिलं. एकाच राज्याच्या मतदारांच्या मनामध्ये एका नेत्याविषयी राज्यातल्या काराभाराविषयी असंतोष आणि त्याला मात्र देशाच्या राजकारणात पाठवण्याची आणि त्यातही बहुमताने पाठवण्याची झालेली घाई, हे असं बिहारचं वैशिष्ट्य होतं.
२००५पासून ते आतापर्यंत नितीशकुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. तत्पूर्वी ते केंद्रात अनेक खात्यांचे मंत्री होते. त्यांची प्रतिमा अतिशय चांगली होती. ते रेल्वेमंत्री होते तेव्हा झालेल्या एका मोठ्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हा तर त्यांची लोकप्रियता कळसाला पोहोचलेली होती. देशाला जणू दुसरे लालबहाद्दूर शास्त्री मिळाले, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं.
असे हे नितीशकुमार दुसरीकडे मात्र सत्ता प्राप्तीसाठी संधिसाधूंचे आदर्श ठरले, हा फार मोठा खेदजनक विरोधाभास होता. २००५ ते आतापर्यंत नितीशकुमार स्वबळावर मुख्यमंत्री झाले नाही तरी, भाजपच्या पाठिंबावर त्यांनी एकूण तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं. तर मधल्या काळात लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या मदतीनेही त्यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद पटकावलं. म्हणजे एकीकडे एक हात सेक्युलर म्हणवल्या जाणाऱ्या आणि दुसरीकडे दुसरा हात भाजपसारख्या हिंदुत्ववादी म्हणवल्या जाणाऱ्या, पक्षाच्या हातात, अशा पद्धतीचं राजकारण करत नितीशकुमार करत राहिले आणि सत्तेला चिकटून राहिले.
२०१३मध्ये भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं, तेव्हा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालचा जनता दल युनायटेड हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक भाग होता. पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांना विश्वासात घेतलं नाही, म्हणून तेव्हा नितीशकुमार यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनसुद्धा काढता पाय घेतला. नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेचा हा दुसरा कळासाध्याय होता.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्यावेळेस सौम्य वृत्तीच्या, सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा स्वभाव असलेल्या जयप्रकाश नारायण यांचा वारसा सांगणाऱ्या नितीशकुमार यांचं नाव भाजपेतर सर्व संमतीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणूनही चर्चेत आलेलं होतं. मात्र, या लोकप्रियतेच्या आणि उच्च स्थानी फार काळ नितीशकुमार विराजमान राहिले नाहीत. २०१४मध्ये बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि जितनराम मांझी ही सोंगटी पुढे केली. मात्र सत्तेपासून फार काळ लांब राहणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांनी पुन्हा भाजपच्या मदतीने बिहारमध्ये सत्ता स्थापन केली.
भाजपसोबत सत्तेत राहूनही नितीशकुमार यांनी बिहारच्या विकासाचं मॉडेल हे गुजरातच्या विकासाच्या मॉडेलइतकं चर्चेत आणलं. नितीशकुमार यांनी सर्वप्रथम बिहारची ‘गुंडाराज’ विळख्यातून मुक्तता केली. मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या पाच वर्षांतील त्यांची सर्वांत मोठी कामगिरी कोणती तर, बिहारमध्ये संध्याकाळी सातनंतरही रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य माणूस विशेषत: स्त्रिया मुक्तपणे फिरू शकत होत्या. व्यापारी व्यापार करू शकत होते, उद्योजक उद्योग चालवू शकत होते, मनोरंजनाच्या क्षेत्रात असलेली थिएटर्स, नाट्यगृहे ही सर्व उशिरापर्यंत चालू शकत होती. हे सर्व लालूप्रसाद यांच्या काळामध्ये पूर्णपणे दुर्मीळ झालेलं होतं. कोणत्याही गुंडावर कारवाई केल्यास सरकार कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप करणार नाही, अशी हमी नितीशकुमार यांनी पोलीस दलाला दिली होती. गुंडाराजमधून बिहारची मुक्तता केल्यावर मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी त्यांना फार कष्ट करावे लागले नाहीत. दुसऱ्या टर्मची मुख्यमंत्रीपदाची झालेली निवडणूक त्यांनी अगदी आरामात जिंकली.
तिसऱ्या टर्ममध्ये मात्र बऱ्याच उलथापालथी झाल्या. बिहारची जनताही बहुतेक नितीशकुमार यांच्या कोलांटउड्यांना कंटाळलेली असावी. एक भाग आणखी असा की, देशातल्या मोठ्या राज्यांपैकी एक बिहार राज्य आहे. बिहार राज्यात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात आहेत असे म्हटलं जातं. (त्याची खातरजमा मी केलेली नाहीये . पण, प्रकाशित झालेल्या बातम्या काही चुकीच्या नसणारच.) देशात अलीकडच्या चार-पाच वर्षांमध्ये बेकारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून आला आहे आणि त्यातच करोनाचा तडाखा बसल्यामुळे बेरोजगारांची आणखी संख्या वाढती आहे. त्याला आळा घालण्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकार दोन्ही अपयशी ठरले आहेत. बिहारमधील वातावरण बदलतंय का, हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे हा बेकार तरुण वर्ग नीतीशकुमार यांच्या विरोधात जाण्याची भीती आता व्यक्त होत आहे.
दुसरा एक भाग असा की, लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी बिहारच्या राजकारणात चांगल्यापैकी मुसंडी मारलेली आहे. तेजस्वी यादव तरुण आहेत. उच्चशिक्षित आहेत आणि तरुणाईचं मन जाणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर, बिहारच्या तरुणाईला त्यांची भुरळ पडलेली आहे, असंच वातावरण बिहारमध्ये दिसतं आहे. सत्तेत असताना तेजस्वी यांनी नितीशकुमार यांच्याशी ‘दोन हात’ केले आहेत. तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दलानं काँग्रेसशी युती केली आहे आणि काँग्रेसच्या प्रचाराची सूत्र अर्थातच राहुल गांधी यांच्याकडे आहेत.
नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ठामपणे उभा राहू शकणारा एक नेता अशी प्रतिमा राहुल गांधींनी मधल्या काळात संपादन केलेली आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनीही बिहारमधील प्रचाराची सर्व सूत्र तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवलेली आहेत. काँग्रेसला फार काही आशा या निवडणुकीत नाहीयेत. तसा मागील ३० वर्षांमध्ये काँग्रेसच्या बिहारच्या राजकारणात संकोचच झालेला आहे, पण आहे त्यापेक्षा दोन-चार जागा जरी वाढल्या तरी त्या काँग्रेससाठी बोनसच ठरणार आहेत. त्यामुळे तेजस्वी यादवला आहे तेवढी सर्व शक्ती पुरवणं काँग्रेससाठी गरजेचं आहे, याचं भान काँग्रेसच्या नेत्यांना आलं आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस युती सध्या बरीच फार्मात आली आहे, असं चित्रं एकंदरीतच बिहारमध्ये दिसतं आहे.
अशात चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानीही बऱ्यापैकी सहानुभूती मिळवण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती हाती येते आहे. या पक्षाला गेल्या तीन निवडणुकात बिहारमध्ये फार काही करता आलेलं नव्हतं, तरी या पक्षाचे सर्वेसर्वा नुकतेच दिवंगत पावलेले रामविलास पासवान यांनी भाजपसोबत युती करून केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवलेलं होतं. रामविलास पासवान हे कायम या अल्पशा जीव असलेल्या पक्षाचे नेते असूनही केंद्रात मंत्रीपद भूषविण्यात यशस्वी ठरलेले आहेत.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
महाराष्ट्रात असं कौशल्य जे रामदास आठवले यांनी दाखवलं, त्याची मोठी प्रतिमा देशपातळीवर रामविलास पासवान यांची आहे. अलीकडेच रामविलास पासवान याचं निधन झालं. तत्पूर्वीच त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी बिहारमधल्या पक्षाची सूत्रं सगळी हाती घेतलेली होती आणि नरेंद्र मोदी म्हणजे भाजप सोबत आहोत, परंतु नितीशकुमार यांच्या विरुद्ध आहोत, ही गोंधळात टाकणारी राजकीय भूमिका घेऊन सगळ्यांना चकीत केलं. त्यामुळे चिराग पासवान ही भाजपची ‘बी टीम’ आहे, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच रामविलास पासवान याचं निधन झाल्यामुळे सहानुभूतीची एक लाट निर्माण झाल्याचं चित्र बिहारच्या काही भागांमध्ये दिसतं आहे. अशा परिस्थितीत चिराग पासवान यांनी जर २०-२५ जागा घेतल्या तर बिहारच्या निवडणुकीनंतरच्या चित्रामध्ये खूप मोठी रंगत निर्माण होणार आहे.
एक मात्र खरं, आधी जे वातावरण बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पूर्णपणे नितीशकुमार आणि भाजप यांच्या बाजूनं होतं, ते आता राहिलेलं नाहीये. ते बदलण्याचं सर्व श्रेय तेजस्वी यादव आणि चिराग पासवान यांना द्यावंच लागेल. बाकी बेरोजगारी, वाढती महागाई, नितीशकुमार यांच्या कारभाराविषयी असलेली नाराजी, नितीशकुमार यांची धरसोडीची राजकीय भूमिका हेही अन्य मुद्दे आहेत. पण बिहारच्या राजकारणावर दोन तरुण प्रभाव निर्माण करू शकतात का काय, असं आता वाटू लागलेलं आहे. अर्थात नेमकं चित्र निकालानंतर स्पष्टच होईल. बिहारचा निकाल विरुद्ध गेला तर भाजपसाठी येता काळ आव्हानांचा असेल यात शंकाच नाही.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment