या वर्षीचा दसरा दोन कारणांसाठी ऐतिहासिक ठरला. करोनामुळे शिवसेनेचा दरवर्षी मुंबईत, शिवाजी पार्कवर होणारा ‘दसरा मेळावा’ सावरकर सभागृहात मोजक्या ५० लोकांसमोर झाला; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूर संघ कार्यालयासमोर होणारं संचलनही त्याच कारणामुळे बंदिस्त सभागृहात मोजक्या ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. शिवसेनेचा ‘मेळावा’ आणि संघाचं ‘संचलन’ हे एक प्रकारे शक्तिप्रदर्शन असतं. त्यातही राजकीय शक्तीप्रदर्शन. (संघ राजकारण करत नाही, वगैरे गोष्टी या ऐकून सोडून द्याव्या या ‘छापा’च्या असतात, आहेत!)
या दोन्हींची स्थापनाही दसऱ्याची, त्यांच्या भाषेत ‘विजयादशमी’ची. त्यामुळे परवा शिवसेनेची स्थापना होऊन ५५ वर्षं झाली, तर संघाला ९५ वर्षं. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच मेळावा होता, तर भाजप सरकार दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आल्यानंतरचा संघाचं पहिलं संचलन. शिवसेनेचा जन्म मुंबईतला, तर संघाचा नागपुरातला. दोन्ही ठिकाणं महाराष्ट्रातलीच. मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर उप-राजधानी. दोघांची स्थापनाही मराठी माणसांनीच केली आहे.
शिवसेनेची प्रवृत्ती आणि संघाची कार्यप्रवृत्ती यांबद्दल नेहमीच उलटसुलट चर्चा होत असते. इतकी वर्षं महाराष्ट्रात भाजपबरोबर युतीत असलेल्या सेनेनं वर्षभरापूर्वी ती युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह सरकार स्थापन केलं. आणि गेलं जवळपास वर्षभर सेनेनं तुलनेनं संयमितपणाची कास धरली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पुरोगामी वर्तुळाची आणि संघ-भाजप-सेना यांच्या परंपरागत विरोधकांची काहीशी अडचण झाली आहे. शिवसेनेनं भाजपशी असलेली पंचवीसेक वर्षांची युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांशी निदान सत्तेसाठी का होईना, पण घरोबा केला, याचा त्यांना आनंद आहे. पण सेनेबद्दल मुळातच प्रेम नसल्यानं थड सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे सेनेच्या ‘दसरा मेळावा’मध्ये नेमकं काय बोलणार, याची उत्सूकता राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसारमाध्यमांना होती. अपेक्षेप्रमाणे वृत्तवाहिन्यांनी त्यांचं भाषण लाइव्ह दाखवलं, वर्तमानपत्रांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या हेडलाइन्स केल्या.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
ठाकऱ्यांची ‘ठाकरे शैली’
पुढच्या महिन्यात ठाकरे यांच्या आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच ‘मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवून आपल्याशी बोलतोय. माझा प्रयत्न असा राहणार आहे की, संयमाने बोलणार आहे,’ अशी केली. शिवाजी पार्कवर भरणाऱ्या ‘दसरा मेळाव्या’मध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भाषणं यापूर्वी ज्यांनी ऐकली आहेत, त्यांना कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण तसं संयमाचंच वाटलं असणार.
अर्थात कितीही नाही म्हटलं तरी ते ठाकरे यांचं ‘ठाकरे शैली’तलं भाषण होतं. त्यामुळे त्यात शिवाजीमहाराज, मर्द मावळा, बेडूक, षंढ, तलवार, पाठीत वार, हिंमत असेल तर समोर या (यावेळी ‘पाडून दाखवा’), हिंदुत्व, तुमचा बाप-आमचा बाप, असे शब्द किंवा शब्दप्रयोग असणार. त्याप्रमाणे ते यावेळीही होते. ‘ठाकरे शैली’ ही भाषेच्या, सभ्यतेच्या, लोकशाही संकेतांच्या मर्यादा पाळणारी नाही. कारण मुळात ठाकरे कुटुंबीय ‘लोकशाही’ऐवजी ‘ठोकशाही’चा पुरस्कार करणारे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणातही आरोळ्या, डरकाळ्या, आव्हानं, आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक आणि धमक्या या सगळ्या गोष्टी होत्या.
मात्र ‘ठाकरे शैली’ बाजूला ठेवून त्यांच्या भाषणाकडे पाहिलं तर काय दिसतं? जवळपास पाउण तास केलेल्या भाषणात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा चांगला समाचार घेतला. त्यांना त्यांची पात्रता आणि कर्तव्य अगोचरपणे का होईना सांगितलं, ते चांगले केलं. त्याची गरज होतीच. कोश्यारी यांनी स्वत:च्या हातानं, कृतीनं व तोंडानं ते एक ‘भंपक राज्यपाल’ असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्यांचा समाचार घेण्याची गरज होतीच.
नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांची टीका राजकीय शह-काटशहाचा भाग होती. त्यामुळे ती आपण सोडून देऊ. कंगणा राणावत या भंपक विधानं करणाऱ्या वावदूक नटीचा त्यांनी समाचार घेतला, तेही बरंच केलं. पण तिला इतकं महत्त्व दिलं नसतं तरी चाललं असतं. रिकामटेकड्या, वावदूक लोकांना अनुल्लेखानेच मारण्याची गरज असते.
हिंदुत्वाबद्दल मात्र ठाकऱ्यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच भाषणाचं उदाहरण दिलं. शिवसेनेची हिंदुत्वाबद्दलची भूमिका किंवा मतं ही कायमच ‘सोयीस्कर’ राहिली आहेत. ती संघासारखी जहाल, विखारी, विद्वेषी नसतील, पण म्हणून पुरस्कार करावीत अशीही नाहीत. राज्यपाल कोश्यारी यांना त्यांनी भागवतांचं भाषण ऐका असा जो उपदेश केला, त्यातून तेच दिसून येतं. ‘ठाकरे शैली’ला भाषेच्या काटेकोरपणाच्या आणि गांभीर्यपूर्वक विचारांच्या मर्यादा कधीही मानवत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार ‘अस्वीकाराहार्य’ होते, पण मंदिरं खुली करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याची काळजी जास्त महत्त्वाची, हे त्यांचं म्हणणं जास्त ‘व्यवहार्य’ आहे, हेही तितकंच खरं.
बाकी त्यांनी मोदींवरही टीका केली. त्यांच्याकडून देशाचा प्रमुख म्हणून जबाबदारपणाची, गांभीर्याची अपेक्षा केली. पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची गोष्ट केली, ते एका दृष्टीनं बरोबर असलं तरी त्याबाबतीत मोदींकडून काही सकारात्मक घडेल, अशी शक्यता मात्र नाही.
जीएसटी करपद्धतीचा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी एक येऊन विचार करण्याची गरज आहे, राज्य सरकारच्या हक्काचे पैसे केंद्र सरकार देत नाही, हा ठाकरे यांच्या भाषणातला सर्वांत चांगला मुद्दा होता. जीएसटीच्या माध्यमातून सर्व सूत्रं आपल्या हाती घेऊन केंद्र सरकार जर त्यांच्या पक्षाचं सरकार नसलेल्या राज्य सरकारची अडवणूक करत असेल, तर हा अतिशय अनिष्ट आणि घातक पायंडा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एक देश, एक कर’ ही जीएसटीची पद्धत कितीही गोंडस असली तरी त्यातून केंद्र-राज्य संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भागवतांची ‘संघशैली’
सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण नेहमीप्रमाणे हिंदीत होतं. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरची सर्व प्रसारमाध्यमं त्याची दखल मोठ्या प्रमाणावर घेतात. ते भाषण भारतभर पोहचतंही त्वरेनं. अनेक वृत्तवाहिन्यांनी अपेक्षेप्रमाणे तेही लाइव्ह दाखवलं, वर्तमानपत्रांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या हेडलाइन्स केल्या. काही इंग्रजी पोर्टल्सनी त्यावर लेखही लिहिले.
जवळपास एक तास ९ मिनिटं चाललेलं भागवत यांचं भाषण, तसं श्रवणीय नव्हतं. ज्यांना ठाकरे कुटुंबीयांची भाषणं ऐकायची सवय आहे, ते तर हे भाषण कसंबसं अर्धा तासही ऐकू शकणार नाहीत. कारण त्यात भाषेचा काटेकोरपणा, विचारांचं गांभीर्य असतं. आरोळ्या, डरकाळ्या, आव्हानं नसतात. आरोप-प्रत्योराप असतात, पण त्यांना सभ्य भाषेचा मुलामा असतो. पण तरीही भागवत यांचं भाषण हे संघस्वयंसेवक किंवा संघसमर्थक यांनाच आवडेल असंच होतं, असंच म्हणावं लागेल. तसे नसलेल्या पण ते काय म्हणतात याची उत्सुकता असलेल्यांना मात्र एवढं लांबलचक भाषण ऐकताना जरा जडच गेलं असणार हे नक्की.
भागवत यांच्या भाषणाची सुरुवात झाली, तीही करोनामुळे पाळाव्या लागलेल्या बंधनांचा उल्लेख करूनच. त्यानंतर त्यांनी कलम ३७०, राममंदिराचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या गोष्टीही कशा दसऱ्याच्या मुहूर्तावरच घडून आल्या याचा उल्लेख केला. (इथेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा राममंदिराबाबतचा निकाल सर्व भारतीयांनी स्वीकारला असा उल्लेख केला. पण ते ठीकच आहे. त्यांना तसं म्हणावं लागणार हे समजण्यासारखं आहे!)
त्यानंतर राममंदिराचा आरंभ, नागरिकता अधिनियम कायदा याही चांगल्या गोष्टी घडल्याचं त्यांनी नमूद केलं. याबाबत कुठंही त्यांनी मोदी सरकारचा किंवा नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख केला नाही किंवा त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं नाही. किंबहुना भागवत यांच्या संपूर्ण भाषणात नरेंद्र मोदी, मोदी सरकार असा उल्लेख एकदाही नाही. फक्त ‘सरकार’ असा उल्लेख त्यांनी केला, तो ‘केंद्र सरकार’ या अर्थानं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
करोना, त्याने निर्माण केलेलं संकट, त्याबाबतची भारताची परिस्थिती, त्याबाबतचे उपाय, या महामारीच्या काळात लोकांनी एकमेकांना केलेली मदत, करोनाचा धीरोदात्तपणे सामान्य जनतेनं केलेला सामना, दाखवलेलं ऐक्य याविषयी भागवत जवळपास २०-२२ मिनिटं बोलले. आणि मुख्य म्हणजे मोदी सरकारपेक्षा त्यांनी भारतीयांना त्याचं श्रेय दिलं, हा त्यांच्या भाषणातला सर्वांत चांगला भाग म्हणावा लागेल.
२४व्या मिनिटानंतर भागवतांनी चीनच्या आक्रमणाचा उल्लेख केला आणि भारताच्या जोरदार प्रत्युत्तरालामुळे चीनला धक्का बसला असंही सांगितलं! यावर संघस्वयंसेवकच विश्वास ठेवू शकताली. ‘सारे राष्ट्र में आत्मविश्वास की हवा चल रही है’ असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे काय ते त्यांनाच ठाऊक! त्यानंतर मात्र त्यांनी ‘भारत तेरे तुकडे हो’वाले संविधान, धर्मनिरपेक्षेतच्या नावाखाली समाजाला उलटीपट्टी पढवतात, असं सांगितलं. पण ते नेमके कोण, हे सांगितलं नाही. मात्र त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी ‘ग्रामर ऑफ अनार्की’ (अराजकतेचे व्याकरण) असा जो उल्लेख संविधानसभेतल्या शेवटच्या भाषणात उल्लेख केला, त्याचा दाखला दिला. त्यातून संघाला अलीकडच्या काळात आलेला डॉ. आंबेडकरांचा उमाळा पुन्हा अधोरेखित झाला एवढंच! संघप्रणीत केंद्रातल्या भाजप सरकारलाही ‘ग्रामर ऑफ अनार्की’चं उदाहरण म्हणून सांगता येईल, पण ती अपेक्षा भागवतांकडून करता येणार नाही. त्यामुळे ते असो.
त्यानंतर मात्र त्यांनी ‘हिंदुत्वाचा अर्थ पुजेशी जोडून संकुचित केला गेला आहे. हिंदुत्वामध्ये जगभरच्या विविधतेचा स्वीकार आणि सन्मान आहे. हिंदू हे कुठल्याही पंथ वा संप्रदायाचं नाव नाही. ‘हिंदू’ या शब्दामध्ये विश्वमानवतेचाही समावेश होतो. हे मनात ठेवून संघाचा व्यवहार चालतो.’ अशी विधानं केली.
असं बोलणं ही खास ‘संघशैली’ आहे. संघाच्या ‘कथनी आणि करणी’त फरक असतो. बोलायचं एक आणि करायचं एक, ही संघाची जुनी पद्धत आहे. त्यामुळे त्याबद्दलही फार बोलायची गरज नाही. मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून गेल्या सहा वर्षांत या देशातल्या मुस्लीम आणि दलितांना सतत टार्गेट केलं जात आहे. त्याबाबत संघाच्या ‘विविधतेचा स्वीकार आणि सन्मान’ तत्त्वाचं काय झालं आहे?
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पुढे ‘संविधानाच्या प्रस्तावनेत ज्याचा उल्लेख आहे, तोच आमचा आत्मा आहे, तेच हिंदुत्व आहे’ असं भागवतांनी म्हटलं, विशेषत: त्यांच्या संपूर्ण भाषणात ‘संविधाना’चा अनेक वेळा उल्लेख आला आहे. प्रत्यक्षात संघ संविधानाचा फारसा पुरस्कर्ता नाही आणि त्यांचं केंद्र सरकार तर संविधानाला जिथं जिथं बाजूला सारता येईल, तिथं तिथं सारण्याचाच प्रयत्न करत आहे. हा विरोधकांपासून देशातल्या व परदेशातल्या अनेक पत्रकारांचा आरोप आहे.
पुढे भागवतांनी ‘आत्मनिर्भर भारतासाठी स्वावलंबनाबरोबरच अहिंसेचीही गरज आहे’, असा विनोबांचा दाखला देत त्यांनी सांगितलं. ते मात्र विनोदी होतं.
नंतर भागवतांनी ‘भारतीय शेतकरी शास्त्रज्ञ, त्याची शेती प्रयोगशाळा होती’, ‘जैविक शेती ही आपली परंपरा आहे. तिची साऱ्या जगाला आस आहे’, ‘नवीन शिक्षण धोरणाचं सर्व जगानं स्वागत केलं’, अशी काही विधानं केली. ती अर्धसत्य म्हणावी अशीच आहेत.
थोडक्यात, उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यातलं भाषण ‘ठाकरे शैली’तलं होतं, तर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण ‘संघशैली’तलं होतं, असंच म्हणावं लागेल. दरवर्षी ते तसंच असतं. ‘ठाकरे शैली’ ही स्वभावत:च आक्रमक, वादग्रस्त असल्यामुळे त्यावर पुढे चार-पाच दिवस वाद-विवाद होतात. तसं ‘संघशैली’चं नाही. ती आक्रमक, वादग्रस्त सहसा नसते. त्यामुळे त्यावरून सहसा वाद-विवाद होत नाहीत. पण त्यात अर्धसत्य, अपप्रचार यांचा मात्र समावेश असतो. तो यंदाही होता.
‘ठाकरे शैली’ ही फाटक्या तोंडाची, तर ‘संघशैली’ ही आतल्या गाठीची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्या परवाच्या भाषणाचं फार कौतुक करायची गरज नाही. दोघेही तुलनेनं मवाळ बोलले, हाच काय तो त्यातल्या त्यात सुखद प्रकार. सेनेचा ‘मेळावा’ आणि संघाचं ‘संचलन’ या वर्षी व्हर्च्युअल पद्धतीनं साजरं झालं, त्यामुळे ही गोष्ट घडून आली असावी!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment