ड्रेस्ड टु किल : व्हिंटेज ब्रायन ड पाल्मा
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘ड्रेस्ड टु किल’चं एक पोस्टर आणि त्यातील एक दृश्य
  • Sun , 29 January 2017
  • इंग्रजी सिनेमा न-क्लासिक ड्रेस्ड टु किल Dressed to Kill ब्रायन ड पाल्मा Brian De Palma मायकल केन Michael Caine अँजी डिकिन्सन Angie Dickinson क्वँटिन टॅरँटिनो Quentin Tarantino

रहस्यमय चित्रपटांचा एक साचा असतो आणि रहस्यमय चित्रपट बनवण्यात एक धोकाही असतो. धोका हा की, एकदा रहस्यभेद झाल्यावर त्यातली गंमत संपून जाते. त्यामुळे अशा चित्रपटांना रिपीट ऑडियन्स मिळण्याची शक्यता फारशी उरत नाही. परिणामी चित्रपटाचं यश मर्यादित राहतं. त्यातच चित्रपटाचा साचा बऱ्यापैकी ठरलेला असतो. मर्डर मिस्ट्री असली की, खून, त्या खुनाचे तीन-चार संशयित, आळीपाळीने संशयाची सुई प्रत्येकावर फिरणार आणि अनपेक्षितपणे पाचवाच कोणीतरी खुनी निघून प्रेक्षकांना बसणारा रहस्यभेदाचा धक्का. या साच्याच्या पलिकडे जाणारे चित्रपट महान ठरले. हिचकॉकचे असंख्य चित्रपट या यादीत येतात (त्यामुळेच त्रुफाँसारख्या दिग्दर्शकालाही हिचकॉकची प्रदीर्घ मुलाखत घेऊन ती पुस्तकरूपाने प्रकाशित करावीशी वाटली). पण काय होणार आहे, याचा अंदाज लागूनही, रहस्यभेदाचा पैलू फारसा ठसठशीत नसूनही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होणारा आणि आपल्या अनोख्या शैलीच्या बळावर जगभरातील प्रेक्षकांसह दिग्दर्शकांच्या नव्या पिढीला झपाटून टाकणारा दिग्दर्शक म्हणून निर्विवादपणे नाव घ्यावं लागतं ते ब्रायन ड पाल्माचं.

६० आणि ७०च्या दशकांत पुढील ५० वर्षांवर आपला ठसा उमटवणारी दिग्दर्शकांची जी नवी पिढी उदयाला आली, त्यापैकी स्टीवन स्पीलबर्ग, मार्टिन स्कॉर्सेसी, जॉर्ज लुकास, फ्रान्सिस फोर्ड कपोला हे चौघं आणि पाचवा ब्रायन ड पाल्मा. या पाच जणांनी गेल्या ५० वर्षांच्या हॉलिवुडवर आपला अमीट ठसा उमटवला. पण बाकीच्या चौघांच्या वाट्याला जितके मानसन्मान आले, जितकं घवघवीत व्यावसायिक यश प्राप्त झालं, तितकं अपवादानेच ड पाल्माच्या वाट्याला आलं असेल. तरीही सर्वाधिक प्रभावशाली दिग्दर्शकांमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. देशोदेशीच्या तरुण दिग्दर्शकांना ड पाल्माने भुरळ घातली. खुद्द हॉलिवुडमध्ये क्वँटिन टॅरँटिनोसारखा ड पाल्माचा वारसदार पुढे आला. दोघांच्याही चित्रपटांमध्ये आशयाच्या पातळीवर फारसं साम्य नाही; पण गोष्ट सांगण्याची शैली, सादरीकरणातली बेदरकारी, प्रेक्षकांविषयीची बेफिकिरी या गोष्टी मात्र मिळतीजुळत्या आहेत.

गोष्टीत फारसं नावीन्य नाही? नसू देत! हमखास मनोरंजनाचे पैलू नाहीत? काय फरक पडतो? गोष्टीच्या शेवटी काय होणार, हे आधीच कळतंय? फिकीर नॉट! ब्रायन ड पाल्माने या गोष्टींना फारसं महत्त्व दिलं नाही. मुळातच गोष्टीला त्याच्या दृष्टीने फारसं महत्त्व नव्हतं. मात्र, तरीही त्याच्या असंख्य चित्रपटांनी प्रेक्षकांना आणि जगभरातील चित्रकर्त्यांना झपाटून टाकलं. त्यातलाच एक आहे ‘ड्रेस्ड टु किल’.

चित्रपटाची कथा तशी साधीच आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यात फारशा सुखी नसलेल्या केट मिलर या महिलेचा अतिशय निर्घृण खून होतो. खून करणारी सोनेरी केसांची एक स्त्री आहे आणि तिच्या हातात धारदार रेझर आणि डोळ्यांवर गॉगल आहे. लिझ नावाची एक हाय सोसायटी एस्कॉर्ट या खुनी महिलेला लिफ्टमध्ये ओझरतं पाहते. तिने आपल्याला पाहिल्याचं खुनी महिलाही पाहते. पोलिस मात्र लिझवरच संशय घेऊ लागतात. दुसरीकडे ती महिला एकमेव साक्षीदार मिटवण्यासाठी लिझच्या मागे लागते. यात इतरही अनेक व्यक्तिरेखा आहेत. जिचा खून झाला तो मानसोपचार तज्ज्ञ, खून झालेल्या महिलेचा मुलगा, तपास अधिकारी वगैरे. ते आपापल्या परीने कथानकात भर घालत राहतात.

कथेत काडीचंही नावीन्य नाही. कागदावर तर ही कथा वाचून तिच्यापासून फार फार तर एखादा सवंग रहस्यपट बनू शकेल, असंही वाटू शकतं. त्यातच ड पाल्माची एक प्रतिमा मास्टर ऑफ एरॉटिक थ्रिलर्स अशीही आहे. पण ती त्याच्यावर अर्थातच अन्याय करणारी आहे. कारण एरॉटिक थ्रिलर्स म्हणजे सवंग मनोरंजन. त्यामुळे हे वर्गीकरण ड पाल्माला अकारण खालच्या पातळीवर आणून बसवतं. एरॉटिसिझम हा त्याच्या सस्पेन्स थ्रिलर्सचा एक पैलू निश्चित आहे, पण त्याच्या चित्रपटांना एरॉटिक थ्रिलर या श्रेणीत बसवणं योग्य होणार नाही.

ड पाल्माच्या असंख्य चित्रपटांप्रमाणेच ‘ड्रेस्ड टु किल’मध्येही कथेला फारसं महत्त्व नाही. महत्त्व आहे ते सादरीकरणाला. गोष्ट काय आहे, यापेक्षा गोष्ट सांगण्याच्या पद्धतीत ड पाल्मा माहीर आहे. त्याचं सादरीकरण शैलीदार आहे, त्यासाठी तंत्राची मदत तो घेतो; परंतु तरीही त्याचा सिनेमा तंत्रबंबाळ होत नाही, आपल्याकडच्या दिवंगत मुकुल आनंद किंवा संजय गुप्तासारखा. तंत्र वरचढ ठरलंय आणि त्या नादात आत्माच हरवलाय, असं ड पाल्माच्या चित्रपटांबाबत होत नाही. मुळात त्याच्या चित्रपटांना आत्मा छोटासाच असतो. ती कसर तो गोष्ट सांगण्याच्या पद्धतीतून भरून काढतो, कारण त्यातच त्याला जास्त रस आहे.

‘ड्रेस्ड टु किल’ची सुरुवात संपूर्णतः अनावश्यक आहे. केवळ प्रेक्षकांना धक्का देणं एवढाच तिचा हेतू आहे. पुढे एकूण कथानकाशी या प्रसंगाचा काहीही संबंध येत नाही. पण ड पाल्माला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. जिचा खून होतो, ती केट मिलर मध्यमवयीन आहे. तिला साधारण नुकताच कॉलेजात जाऊ लागलेला, पहिल्या पतीपासून झालेला पीटर हा मुलगा आहे. पहिला पती व्हिएतनामच्या युद्धात मारला गेलाय आणि दुसरा पती तिला फारसं शरीरसुख देऊ शकत नाही. ती डॉक्टर रॉबर्ट इलियट या मानसोपचारतज्ज्ञाकडून इलाज घेतेय. कशासाठी, तिला नेमका काय आजार आहे, या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या भानगडीतही ड पाल्मा पडत नाही. मात्र, तिच्या मानसोपचारतज्ज्ञाकडे येण्यातूनच पुढे कथा सरकत जाते. केवळ तेवढ्यासाठीच तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन येण्याचं प्रयोजन आहे.

एकदा एका आर्ट म्युझियममध्ये चित्र बघत असताना एका अनोळखी माणसाकडे ती खेचली जाते. त्याच्यासोबत त्याच्या घरी जाऊन दोघांमध्ये इंटरकोर्सही होतो. त्याच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिला त्याच्या टेबलाच्या ड्रॉव्हरमध्ये त्याचा मेडिकल रिपोर्ट दिसतो. त्यात त्याला शरीरसंबंधांतून होणारा आजार झाल्याचा उल्लेख असतो. ती हादरते. तशाच भिरभिरलेल्या अवस्थेत घराबाहेर पडते. लिफ्टने खाली येत असताना अचानक बोटातली अंगठी त्याच्या घरीच राहिल्याचं तिच्या लक्षात येतं. अंगठी घेण्यासाठी म्हणून ती पुन्हा लिफ्ट वरच्या मजल्यावर घेते. लिफ्टचं दार उघडतं तर समोर सोनेरी केस असलेली आणि डोळ्यांवर गॉगल चढवलेली महिला हातात धारदार रेझर घेऊन उभी. ती लिफ्टमध्ये शिरून केटवर वार करते.

काही कारणामुळे आपलीच एक पेशंट बॉबी बहुदा खुनी असावी, असा डॉ. इलियटला संशय येतो. तो बॉबीवर उपचार करणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांकडे तसं बोलूनही दाखवतो. इकडे लिझ आणि पीटर दोघे मिळून खुन्याचा छडा लावायच्या मागे लागतात.

प्रेक्षकांचे फारसे लाड न करता, तरीही त्यांचं उत्तमपैकी मनोरंजन करेल, अशा चित्रशैलीत ड पाल्माचा चित्रपट उलगडतो. कॅमेऱ्याचा नेमका वापर, प्रदीर्घ प्रसंग, संवाद अगदी कमी, आवश्यक तिथेच.. स्लो मोशन तंत्राचा प्रभावी वापर ही ड पाल्माच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये. ती ‘ड्रेस्ड टु किल’मध्येही आहेत. सोबतच स्प्लिट स्क्रीनमध्ये दोन ठिकाणचे दोन प्रसंग किंवा एकाच प्रसंगाच्या दोन बाजू दाखवण्याची त्याची सवय याही चित्रपटात दिसते.

डॉ. इलियट बाहेरची कामं आटोपून आलाय. तो फोन रेकॉर्डर सुरू करतो. त्यातून बॉबीचा आवाज ऐकू येतो. इलियट बॉबीचा मेसेज ऐकता ऐकता निर्विकार चेहऱ्याने घरातली कामं करू लागतो. बाजूच्याच अर्ध्या स्क्रीनवर लाँगशॉटमध्ये एका खिडकित लिझ आणि तिला दुर्बिणीतून बघणारी ती सोनेरी केसांची तरुणी दिसते. लिझ तिच्या शेअर ब्रोकरला फोन करून दुसऱ्या दिवसाच्या शेअर खरेदीची ऑर्डर देत असतानाच दुसऱ्या फोनवर तिला तिच्या एजंटचा कॉल येतो. इकडे पहिल्या स्क्रीनमध्ये आता बॉबीचा रेकॉर्डेड मेसेज संपल्यानंतर इलियटने टीव्ही लावलाय. टीव्हीवर लिंगबदलाचं ऑपरेशन करून घेतलेल्या एका प्रथितयश ट्रान्सजेंडर व्यक्तीची मुलाखत सुरू आहे. दोन्हीकडच्या स्क्रीन्समध्ये संवाद सुरू आहेत. दोन्ही वेगळे प्रसंग आहेत, म्हटलं तर त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. तरीही ड पाल्मा दोन स्वतंत्र, संवादी प्रसंग स्प्लिट स्क्रीनद्वारे प्रेक्षकांना दाखवतो. प्रेक्षक काय म्हणतील, त्यांचा रसभंग तर होणार नाही ना, ते वैतागणार नाहीत ना, त्यांच्या आकलनात अडथळा येणार नाही ना, समीक्षक टीका करणार नाहीत ना, असले ‘बाळबोध’ प्रश्न ड पाल्माला पडत नाहीत.

असाच ब्रिलियंट प्रसंग आहे आर्ट म्युझियममधला. तब्बल १० मिनिटांच्या या प्रसंगात एकही संवाद नाही. केट आणि तिला त्या म्युझियममध्ये पहिल्यांदाच दिसलेला तो माणूस यांच्यातला उंदीर-मांजराचा खेळ आहे. केटची भूमिका साकारणाऱ्या अँजी डिकिन्सनच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत, कॅमेऱ्याची मूव्हमेंट आहे आणि गुंतागुंत अधोरेखित करणारं पार्श्वसंगीत आहे.

हा प्रदीर्घ प्रसंग म्हणजे खास ड पाल्मा टच होता. चित्रपट आस्वादाच्या पातळीवर काहीसा फसतो तो डॉ. इलियटच्या भूमिकेत मायकल केनसारख्या तगड्या आणि नामवंत कलाकाराच्या निवडीमुळे. चित्रपटाच्या बहुतांशी भागात या व्यक्तिरेखेला फारसं महत्त्व नाही. पण मायकल केन इतकी  नगण्य भूमिका स्वीकारणार नाही, हे चाणाक्ष प्रेक्षक सहज ओळखतो. त्यामुळे अखेरचं धक्कातंत्र फारसं यशस्वी होत नाही. (स्वतःला ड पाल्माचा जबरा फॅन म्हणवणाऱ्या टॅरँटिनोने मात्र आपल्या असंख्य चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांसाठी नामवंत कलाकारांना बिनदिक्कत वापरलंय आणि या कलाकारांनीही कुठलीही खळखळ न करता टॅरँटिनोच्या चित्रपटात काम केलंय. उदा. जॅकी ब्राऊनमधली रॉबर्ट डी नीरोची व्यक्तिरेखा).

अर्थात त्यामुळे चित्रपटाची रंजकता कमी होत नाही. ‘ड्रेस्ड टु किल’ हा ड पाल्माच्या थ्रिलर मालिकेतला धमाल चित्रपट आहे. टिपिकल ‘हू डन इट’ पद्धतीचा हा चित्रपट नाही. त्यामुळेच रहस्यमय असूनही पुन्हा पुन्हा पाहताना कुठली अडचण येत नाही. उलट ड पाल्माने आता जवळपास निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती असताना हा चित्रपट व्हिंटेज ड पाल्माचा पुनःप्रत्यय देणारा आहे.

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

Post Comment

Shailendra Shirke

Mon , 30 January 2017

Zakas Chinta..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......