अण्णा, आजच्या गिळगिळीत अन् लिबलिबीत पत्रकारितेच्या काळात तुमची फार याद येते…
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • अनंत भालेराव
  • Mon , 26 October 2020
  • पडघम माध्यमनामा अनंत भालेराव Anant Bhalerao मराठवाडा Marathwada पत्रकारिता Journalism अग्रलेख Editorial

निर्भीड पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक अनंत भालेराव यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीपासून दरवर्षी पत्रकारिता, साहित्य, कला, समाजसेवा या क्षेत्रांतील मान्यवरांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार  आज औरंगाबादमधील ‘हिमरू’ नक्षीकामाचे आधुनिक प्रणेते अहमद कुरेशी यांना एका छोटेखानी कार्यक्रमात दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने भालेराव यांच्या पत्रकारितेविषयीचा हा लेख...

.................................................................................................................................................................

मान भरपूर, धन मात्र तुटपुंजे. कष्ट खूप, मोबदला त्या मानाने मोजका. जोखीम अफाट, कौतुक तुलनेने लटके. जबाबदाऱ्या अखंड, त्याबद्दल आभाराचे दोन शब्ददेखील मुश्किल. अपेक्षांचे ओझे अगडबंब, तुलनेने शाबासकीच्या थापा अगदी हलक्या. नाविन्याचा पुरवठा सलग, जुनेरे टाकून देणे जड... असाच काहीसा मराठी पत्रसृष्टीचा संसार देशाच्या स्वातंत्र्याच्या आसपास दिसे. महाराष्ट्र स्थापनेनंतरही तो तसाच राहिला. मुंबई सोडता अवघा महाराष्ट्र जवळपास निर्धन अन् निश्चल. त्यात मराठवाडा आणखी निवांत अन् निश्चिंत. पत्रकारितेने काही खळबळ, सनसनाटी करण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता. राजकारण सात्त्विक, तात्त्विक, लौकिक होते. विचार व भूमिका यांचा खणखणाट तेवढा सर्वत्र ऐकू येई. लोकशाही चालवणारे ती ज्यांच्यासाठी हाकत, त्यांच्यात माध्यम म्हणून कोणी प्रवेश करण्याची वेळ अथवा अवकाश अजून पक्व झाला नव्हता. नागरीकरण, औद्योगिकीकरण यांची वाटचाल गावांकडे आस्तेआस्ते होऊ लागली होती. त्यामुळे मराठी पत्रकारितेत शिरू पाहणाऱ्या व्यक्ती दोनच प्रकारच्या असत. पहिला प्रकार सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा, दुसरा ज्यांची मराठी भाषा बरी आणि थोडीफार बरी राजकीय समज असणाऱ्यांचा. अनंत भालेराव पहिल्या प्रकारामधले. हैदराबाद मुक्तिलढ्यात निजामशाहीविरुद्ध उभे ठाकलेले एक झुंझार कार्यकर्ते. निजामाच्या जुलमी राजवटीचा नि:पात करण्यासाठी हाती शस्त्र घेणारे एक स्वातंत्र्यसैनिक. केवळ स्वातंत्र्यप्राप्ती हेच त्यांचे राजकीय कार्य नव्हते. नवा देश लोकशाही समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक असावा यासाठी झटणारे ते एक विचारकही होते.

आनंद कृष्ण वाघमारे हे ‘मराठवाडा’ या साप्ताहिकाचे संस्थापक व संपादक. त्यांनी १९३८मध्ये ते सुरू केले. निजामाची राजवट कशी विविधांगांनी दडपशाही करते, त्याचे विस्तृत कथन निर्भयपणे करणारी पत्रकारिता ‘मराठवाडा’पासून आरंभली. १९५३ पासून अनंतराव त्याचे काम संपादक म्हणून पाहू लागले. त्या आधी तिथेच ते लिहीतही असत. त्या काळच्या राजकीय कार्यकर्त्यांना वाचन, लेखन, अभ्यासवर्ग या मार्गाने स्वत:ला आणि आपल्यापेक्षा लहान व नवख्या कार्यकर्त्यांना सुसज्ज करूनच कार्य करावे लागे.

अनंतराव कधी काळी शिक्षक होते. साहजिकच त्यांना हे सारे मुळीच जड गेले नाही. वडील वारकरी व कीर्तनकार. त्यामुळे संतसाहित्याचाही भरपूर संस्कार त्यांच्यावर झालेला. वाघमाऱ्यांबरोबरच गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, स्वामी रामानंद तीर्थ या उच्चशिक्षित तीक्ष्णबुद्धी नेत्यांचे त्यांना मार्गदर्शन. त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भान ठेवणे राजकीय कार्यकर्त्यांना आवश्यक असे. अनंतराव त्यात अव्वल ठरले. युवक क्रांती दल व अन्य युवक संघटना अनंतरावांना अभ्यासवर्गात बौद्धिके घेण्यास बोलावत. त्याचे कारण, अनंतरावांचा प्रत्यक्ष राजकीय कार्य आणि त्यामागील सैद्धांतिक विवेचन दोन्हींची फार निकट जाण होती.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

अनंतराव असे अभ्यासवर्ग घेणारे अथवा गंभीर महत्त्वाच्या विषयावर व्याख्यान देणारे म्हणून फार लोकप्रिय असत. मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायला ‘मराठवाडा’ दैनिकाने सलग तीन अग्रलेख लिहून विरोध करताच अनंतराव या समाजवादी कार्यकर्त्यांपासून दूर गेले. या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांना इतके वाळीत टाकले की, त्याचे नावही घेणे अपराध ठरले.

१५ ऑगस्ट १९६८ रोजी ‘मराठवाडा’ द्विसाप्ताहिकाचे दैनिकात रूपांत झाले. १४ तारखेस वाघमारे वार्धक्याने निधन पावले होते. त्यामुळे दैनिकाचे हे बाळ आपल्या पित्याच्या मृत्यूची वार्ता सांगतच जन्मले. जगात असे दैनिक नसेल जे आपल्या संपादकाच्या देहावसानाची हेडलाईन करीत वाचकांच्या हाती पडले.

दैनिक सन्मित्र कॉलनीत सुरू झाले. कार्यालयाच्या समोर एक कब्रस्तान होते. अनेक थडगी, कबरी तिथे होत्या. म्हणजे तसा निर्जनच भाग होता. रस्त्याच्या एका बाजूला माणसांनी गजबजलेले, जिवंतपणाच्या साऱ्या रसरशीत खुणा दाखवणारे एक दैनिक तर विरुद्ध दिशेला एक स्मशान - पूर्ण बेवारस. पुढे कित्येक वर्षांनी एका मुस्लीम नगरसेवकाने त्या कब्रस्तानावर स्वत: बुलडोझर चालूवून ते जमीनदोस्त केले अन् त्यावर वस्ती करवली. त्याहीनंतर २००० साली दैनिक बंद पडले आणि तीनेक वर्षे ‘मराठवाडा’ नावाची कबर तिथे दिसू लागली. थोड्या काळाने तीही नष्ट झाली अन् तिथेही वस्ती झाली.

मी १९८०च्या डिसेंबरात ‘मराठवाडा’ चा एक उपसंपादक म्हणून रूजू झालो. तत्पूर्वी किर्लोस्कर समूहाच्या ‘मनोहर’ साप्ताहिकात चांगल्या पगाराचा उपसंपादक म्हणून पुण्यात मी कार्यरत होतो. त्याआधी ‘श्रमिक विचार’ या दैनिकात व ‘साधना’ या साप्ताहिकात पत्रकारितेचे धडे आणि नोकरी असे करीत होतो. १९७८ साली पत्रकारितेचे शिक्षण घेता घेता ‘साधने’त प्रशिक्षण घेत होतो. संपादक यदुनाथ थत्ते टपालाने येणारा ‘मराठवाडा’ वाचायला देत व त्याचा अग्रलेख अनंत भालेराव या नावाने जशाचा तसा छापत. आणीबाणीत ही दोन्ही पत्रे लढलेली. सेन्सॉरच्या कात्रीत सापडलेली. एक संपादक दुसऱ्याचा कसा आदर करतो, याचा वस्तुपाठ थत्ते आम्हाला घालून देत होते. दोघेही समाजवादीच. पण दोघांचे लेखनकसब वेगळे. थत्ते विनोबांचे शिष्य. अनंतराव डॉ. राममनोहर लोहियांचे. यदुनाथजींनी मी व माझ्याआधी कितीतरी तरुण लेखक पत्रकार घडवले. औरंगाबादेत अनंतरावांनी तेच केले. पुढे अनंतराव आजारी पडले व त्यांनी यदुनाथजींना संपादक म्हणून ‘मराठवाडा’त बोलावले. पण त्यांना त्यांचे ‘आंतरभारती’चे कार्य आणि अन्य जबाबदाऱ्या यामुळे संपादकपद लवकरच सोडावे लागले. तसे ते फार काळ औरंगाबादेत राहतही नसत.

पुण्यात असताना डॉ. सविताच्या घरी अण्णा विश्रांतीला आलेले असताना मी व पत्रकारितेचे शिक्षण घेणारे तीन मित्र त्यांना प्रत्यक्ष भेटलो. आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगात जाणारा एक हिरो असा समक्ष पाहताना २१ वर्षांचा मी पार हरखून गेलो होतो. इतका की ते काय बोलले हे लक्षात राहिले नाही. कॅम्पातल्या त्या घरातून चालत चालत डेक्कनवर जाताना आम्ही चौघांनीही अशीच धडाडीची व ‘कमिटेड’ पत्रकारिता करायची असे मनोमन ठरवले होते. साऱ्यांनी ती प्रतिज्ञा पाळली. केवढा प्रभाव असतो पाहा! अनंत बागाईतकर, लक्ष्मण रत्नपारखे, सतीश जकातदार व मी पुढे पांगलो, पण लक्ष्यापासून ढळलो नाही. १९८० साली अण्णा मुकुंदराव किर्लोस्करांच्या ‘पेरणी’ या अग्रलेख संग्रहाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आले. मी ‘मनोहर’मध्येच होतो. त्यांचे भाषण व त्यांची ऐट उद्योगपती किर्लोस्करांच्या कार्यक्रमात एका समाजवाद्याने अतिशय साधेपणाने मिरवली. तो त्याग, कर्तृत्व अन् तो मान. मी तिथेच ठरवले, या माणसाबरोबर पुढे काम करायचे. गेलो!

लेखणी, वाणी व व्यक्तिमत्त्व अशा तिहेरी मोहिनीचा असा अनेकांवर अनंतरावांचा प्रभाव पडे. ‘मराठवाडा’त पगार सर्वांचाच कमी. काँग्रेस विरोधक म्हणून सरकारची खपामर्जी सतत. पण अण्णांकडे पाहत प्रत्येक जण कामाला जुंपून घेई. अंतुल्यांचे सरकार राज्यात स्थापन होताच काँग्रेसचे ‘लोकमत’ मराठवाडा प्रदेशात चालवण्याचे पक्षीय व सरकारी पातळीवर आरंभले. एक अनैतिक स्पर्धक ‘मराठवाडा’ समोर अवतरला. त्यामागे १९६८पासून अण्णांची सोबत करणारे मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाबा दळवी होते असे कोणी सांगतात. मतभेदांमुळे ते आणीबाणीतच नागपुरात जवाहरलाल दर्डा यांच्या ‘लोकमत’ला जाऊन मिळाले होते. बाबा विरुद्ध अण्णा, समाजवादी वि. समाजवादी, ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर, सवर्ण वि. दलित, जुने तंत्रज्ञान वि. आधुनिक तंत्रज्ञान अशा खोट्या लढाया उफाळल्या. दोनेक वर्षांनी अण्णांना मायस्थेनिया ग्रेविस या विकाराने ग्रासले. दैनिक काम त्यांना जमेना. टप्प्याटप्प्याने जुनेजाणते सहकारीदेखील सोडून जात राहिले. कोणी पगाराची, कोणी कुचंबल्याची, कोण नव्या कुटुंबाची, कोणी अन्यायाची तक्रार करीत गेले. ‘मराठवाडा’ची उपयुक्तता, कालोचीतता आता संपली असेही कोणी म्हणू लागले. पन्नालाल सुराणा यांच्या हाती सूत्रे देऊन १९९१च्या ऑक्टोबरात अण्णा कायमचे निघून गेले. दैनिक २००० साली बंद पडले तेव्हा विजय निरखी संपादक होते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मला प्रत्यक्ष संपादक म्हणून कार्यरत असे अण्णा तीन वर्षे पाहायला मिळाले. सर्वांत कनिष्ठ म्हणून त्यांच्या बैठकांतही मला स्थान नसे. मात्र त्यांना न त्यांचे लिखाण जवळून निरखता आले. औपचारिक कामकाज बैठकांत एक संपादक म्हणून त्यांच्या उतारवयातलाही आवाका लक्षात आला. व्यक्तीपर कधी लिहायचे नाही असे आरंभालाच मी नक्की केल्याने आठवणी, घटना, संवाद, प्रसंग, स्थळ, काळ लक्षात ठेवायचे मेंदूला वळण लावले नाही. त्यामुळे जसे वडील व आई यांच्यावर (खूप कर्तृत्ववान ते असूनही) मी लिहू शकत नाही, तसेच अण्णांचे. कोणाच्या संगतीने अथवा जवळीकीने आपले कर्तृत्व सिद्ध करू असा स्वभाव नसल्याने कित्येक जबर व्यक्तिमत्त्वे आयुष्यात येऊनही ती शब्दरूपे घेऊ शकत नाहीत. अण्णांवर मग आणखी काय लिहायचे?

आज जाणवते की, संपादक म्हणून मराठी पत्रसृष्टीत ज्या मोजक्या संपादकांनी ठसा उमटवला, त्यात अनंत भालेराव एक आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकदा, आणीबाणीत हिरावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी दुसऱ्यांदा आणि महाराष्ट्र निर्मितीसाठी केलेल्या सत्याग्रहामुळे तिसऱ्यांदा अनंतराव तुरुंगात राहून आले. संघटक, नेता, वक्ता आणि प्रचारक ही जशी एक राजकीय बाजू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होती, तशी शिक्षक, प्रबोधनकार, भाष्यकार म्हणूनही होती. त्यात अफाट वाचनाने व मराठी भाषेच्या संस्कारांमुळे अण्णांची भाषा कोणालाही हेवा वाटावी अशी सुंदर होती. त्यांचे अक्षरही रेखीव व वळणदार होते.

जर्मनी, सोविएत रशिया व भारत सरकार यांचे प्रचार साहित्य ज्या उत्तम प्रतीच्या कागदांवर येई, ते पाठकोरे घेऊन अण्णा अग्रलेख वेळेत लिहून देत. त्यांनी काय विषय हाताळलेला आहे याची उत्सुकता संपादकीय खात्यात सर्वांना जशी असे, तशी त्यावेळच्या टंकजुळणाऱ्यांनाही असे. वाचकांना तर प्रचंड उत्कंठा असे. काँग्रेसचे अनेक पुढारी तसे कबूलही करीत. आचार्य अत्र्यांची आचरट अतिशयोक्ती त्यांच्या लिखाणात कधीही आली नाही. गोविंद तळवलकरांचा खुनशी खवटपणा त्यांच्या अग्रलेखांना कधी शिवला नाही. माधव गडकरी, अनंतराव पाटील, ना. भि. परुळेकर, जयंतराव टिळक, रंगा वैद्य हे त्यांचे समकालीन कधी प्रचारकी, तर कधी बरे लिहीत. नागपूरचे मा. गो. वैद्य मात्र मराठी शैली आणि तात्त्विक बैठक या बाबतीत अण्णांशी स्पर्धा करू शकत. त्यामुळे अग्रलेखांसाठी आवर्जून वाचले जाणारे दैनिक असा कायमचा लौकिक ‘मराठवाडा’ने मिळवला. ना त्या शैलीची नक्कल कोणाला जमली, ना तेवढा दरारा कोणी मिळवला. एवढे बाबा दळवी त्यांचे सहकारी आणि समाजवादी साथी, पण त्यांची शैली अगदी रोखठोक आणि भाषणाप्रमाणे दणाणणारी होती.

अण्णा मूळचे एक शिक्षक. त्यामुळे विषय समजावून सांगायला प्रतिमा, प्रतीके, उदाहरणे, संदर्भ, म्हणी, दृष्टांत, काव्य यांचा सढळ वापर करीत. साहित्य कोठे संपतेय अन् पत्रकारिता कोठे सुरू होतेय, याचा पत्ता त्यांचे लेखन लागू देत नसे, इतकी छान गुंफण त्यांनी घातलेली असे. अग्रलेखाबाहेरचे त्यांचे लेखन त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे पक्व रसाळ आणि प्रासादिक होत गेले. खादीचा सदरा व खादीचे धोतर नेसून एक प्रवचनकार गोष्टी सांगत आहेत, असा भास सतत त्यांच्या लिखाणातून होई.

अण्णांना १९७७नंतर महाराष्ट्र ओळखू लागला. तोवर मराठवाडा एवढाच त्यांच्या ख्यातीचा विस्तार होता. पुरस्कार, सत्कार, मानसन्मान, पुढारी व सत्ताधारी यांची ये-जा आणि एक आदरणीय व्यक्तिमत्त्व असे सारे वेढे त्यांना पडले. पण त्यांचा जीव खरा रमे तो कार्यकर्त्यांत. कोणताही कार्यकर्ता येवो, अण्णा त्याची विचारपूस करून, त्याचे म्हणणे ऐकून, त्याला आधार वाटेल असे काही करून निरोप देत. त्यांचे शिफारसपत्र अथवा निरोप कोणालाही टाळता येत नसे. त्यांच्या चिठ्ठयांनी बड्या वृत्तपत्रांत नोकऱ्या मिळवणारे अनेक. त्यातले बहुतेक आता सेवानिवृत्त झाले किंवा त्या नजीक आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मराठवाडा’तला थोडका पगार, वाढती कुटुंबे व अन्य जबाबदाऱ्या त्यांना समजत व मग ते आनंदाने ‘मराठवाडा’ सोडायची परवानगी देत. काहींना मात्र त्यांनी इतके पैसे काय करायचे, चैन करायला का, असे प्रश्न विचारून टोचणी लावली. उधळपट्टी वा चैन अण्णा स्वत:ही करीत नसत अन् इतरांनाही करू देत नसते. ‘मराठवाडा’ तसा आर्थिक बाबतीत यथातथाच असे. या गरिबीची घमेंड नसे पण गर्व असे. कारण खूप पैसा भ्रष्टाचाराशिवाय जवळ येऊ शकत नाही, असा पत्रकार म्हणून सर्वांचाच अनुभव होता. अण्णा चैनी, व्यसनी, मस्तवाल लोकांना जवळही येऊ देत नसत. कित्येक काँग्रेसवाले तसे करू धजले अन् मार खाऊन माघारले.

नेमके येथेच ‘मराठवाडा’चे सारे स्पर्धक आणि टीकाकार फजित होत. गरिबीला चारित्र्याचे वावडे असते असे मानणारे ‘मराठवाडा’च्या नैतिक श्रीमंतीने दिपून जात; असेच खितपत मरा म्हणायचे! झालेही तसेच. पण हे मरण न डागाळलेले मिळाले. याचे कारण अनंतराव. अशा मृत्यूबद्दल ना कोणी उसासे टाकले ना सुस्कारे. आज फक्त मंगलस्मृती शिल्लक आहेत. अनंतरावांचे १९६८ पासूनचे जवळपास सारे सहकारी जिवंत आहेत. ‘मराठवाडा’त काही काळ येऊन काम करून गेलेले तर एका पिढीत सामावतील एवढे आहेत. सारे निष्कलंक व निष्ठावान पत्रकारिता करीत राहिले व करीत राहतात. अनंतरावांची स्मृती ती आणखी कशा प्रकारची असेल?

मृत्यू जवळ येत असल्याचे जाणवून कदाचित अण्णांनी एक महत्त्वाचे काम अंगावर घेतले. हैदराबाद मुक्ती संग्रमाचा इतिहास मराठीत लिहिण्याचे त्यांनी ठरवले. भराभरा पुस्तके मिळवली, अखेरपर्यंत ती येत गेली. लढा संपल्यानंतर ४० वर्षांनी अण्णांनी ‘हैदराबाद’ लिहायला घेतले हे केवढे तरी मोठे कार्य. स्मरणशक्तीने दगा देणे, महत्त्वाचे सोबती निधन पावणे, संदर्भ सहज हस्तगत न होणे, अशा कितीतरी अडचणी एवढ्या अंतराने लिहिणाऱ्यांपुढे असतात. पण अण्णांनी मोठ्या कसोशीने एकेक कागद व पुस्तक जमवून एक जाडजूड इतिहास रचला.

एक संपादक आपल्या कामाशी इतका तन्मय झाला की, लेखन जणू त्याचा श्‍वासोच्छवास होऊन गेलेला. रोजच्या लिखाणाव्यतिरिक्त असे काही मोलाचे अन् स्वत:ला माहीत असलेले काही लिहून ठेवावे असे किती संपादकांना वाटले? अण्णांचे हे पुस्तक, शिवाय ‘मांदियाळी’, ‘कावड’, ‘पेटलेले दिवस’, ‘आलो याचि कारणासी’ अशी पुस्तके म्हणजे पत्रकाराचे दुसरे एक कार्य. आपल्याला ठाऊक असलेला तोडकामोडका इतिहासही लिहून जायचे असते; लोक शहाणे करून सोडायचे असतात याची जाण अण्णा या पुस्तकांतूनच आपल्याला कायम देत राहतात. मुख्य म्हणजे जो इतिहास आपल्या समक्ष घडत गेला, ज्याच्यात आपलाही थोडाफार वाटा आहे याची नोंद करणे पत्रकाराचे कर्तव्य असते.

अनंतराव अनेकांना लिहीत राहा असे सांगायचे, त्यामागे हे जबरदस्त भान होते. अण्णांना पाहून एक इतिहासपुरुषही आपल्यासमोर आहे, या जाणिवेने अंग शहारून जायचे. कोणीही येवो, त्यांच्यासमोर नम्रच होई, हे या इतिहासाचे दडपण. तोही साधासुधा इतिहास नव्हे; क्रांतिकारक, सशस्त्र, रोमांचक, साहसी आणि देशाला मोठ्ठे वळण देणारा! पण अण्णा त्या इतिहासाचे प्रदर्शन अथवा प्रसिद्धी कधीही करत नसत. आपल्या नावाआधी स्वातंत्र्यसैनिक असे विशेषणही ते कधी लावून घेत नसत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘मराठवाडा’ मध्ये त्यांच्या कार्यक्रमाची बातमी त्यांच्या छायाचित्रासह छापून आली की, ते आम्हाला बोलावून ‘माझा फोटो कशाला छापला रे? यापुढे तो नको’ असे सांगत. ‘मराठवाडा’ निखालस राजकीय पत्र होते. खुद्द अनंतराव गांधी, मार्क्स, लोहिया, जेपी, एसेम जोशी, स्वामीजी आणि गोविंदभाई यांच्या विचारांनी घडलेले होते. लोकशाही समाजवाद या देशात स्थापन करणे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे या देशाचा व महाराष्ट्राचा स्वभावही अण्णा पुरता जाणून होते. परंपरा आणि आधुनिकता यांचा अनोखा मेळ ते आपल्यात वागवत. भांडवलशाही आणि शोषण यांची नाना रूपे त्यांनी न्याहाळली होती. दैनिकाचे रोजचे जगणे भांडवलशाहीच्या श्वासावर चाले; मात्र त्याचा आत्मा त्यांनी शोषणाच्या वा नफेखोरीच्या विरोधातच ठेवला. अण्णांचा हा वसा त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना नाही पेलला. विचार एकीकडे अन् वास्तव एकीकडे अशी प्रचंड ओढाताण व्हायची. तरीही अखेरपर्यंत हे दैनिक कशाला शरण गेले नाही; कारण अनंतरावांची मूस. आपल्या पश्चात या संस्थेची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी समविचारी व्यक्तींना ती सांभाळण्याची गळ घातली. पण ही मूस इतकी पक्की की सारे फिस्कटून जात राहिले.

अण्णांच्या काळात दैनिकाचे अग्रलेख काळ्याशार टंकात उभे सलग दोन कॉलमांचे असत. आज त्यांची उंची वितभर झाली असून शेजारच्या मजकुरातच त्यांचे अस्तित्व विलीन झाल्यासारखे केविलवाणे दिसत राहते. तो दोन स्तंभी, तीन-चार परिच्छेदांचा आकार पाहिला की, अण्णा आठवतात. ताठ, बुलंद, सज्जड अन् ठामपणे काही बजावणारे. अग्रलेख म्हणवताना जाणीवपूर्वक अग्रस्थानाची भूमिका घेणारे अन् व्यक्त केलेल्या मतांबद्दल सत्तेला अंगावर घेणारे. आम्हाला तसे म्हणावयाचे नव्हते किंवा नजरचुकीने असे लिहिले गेले अशा झाकपाकीला कधीही वाव न देणारे. आजच्या गिळगिळीत अन् लिबलिबीत पत्रकारितेच्या काळात अण्णा तुमची फार याद येते…

..................................................................................................................................................................

अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा’ (२०१९-२०२०)मध्ये हा लेख ‘पाहिले अनंते तैसेचि’ या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याचे लेखकाच्या पूर्वपरवानगीने इथे पुनर्प्रकाशन केले आहे.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 28 October 2020

जयदेव डोळे,

लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. तुमच्याशी कधी सहमत होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं. त्याचं प्रत्यंतर आलं. अनंत भालेरावांची ओळख करवून दिल्याबद्दल आभार.

हल्लीचे पत्रकार आपलं स्वत:चं काम सामान्य वाचकाच्या डोळ्यांतून बघंत नाहीत. याउलट अनंतराव स्वत:च सामान्य माणसाच्या भूमिकेत असल्याने त्यांनी केलेलं सामान्य जनतेचं प्रतिनिधित्व असामान्य ठरलं.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Sada Dumbre

Mon , 26 October 2020

मराठी पत्रकारितेचा अभ्यास असणाऱ्यांना ‘मराठवाडा’ पत्राचे संपादक , नामवंत पत्रकार व आघाडीचे कार्यकर्ते अनंतराव भालेराव माहीत नाहीत असे होणार नाही.जयदेव डोळे यांनी त्यांचे फार समर्पक व वस्तुनिष्ठ चित्रण या लेखात केले आहे.मराठवाडा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते आणि मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता हे खरेच.त्यासाठी राजकीयदृष्ट्या साेयीची नसलेली व मराठवाडा हे पत्र आणि व्यक्तिश: त्यांनाही संकटात टाकणारी भूमिका त्यांनी नामांतर अंदोलनात निभावली याचे कारण त्यांची जहाल तत्वनिष्ठा. अशी तत्वाधारीत भूमिका घेणारे संपादक आजकल तर दुर्मिळच पण तेव्हाही अपवादात्मकच .डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी भाषावार प्रांत रचनेला केलेला विरोधही याच प्रकारचा होता. लोकप्रिय व लोकानुनयाची भूमिका त्यांनी टाळली.सकाळच्या १९८२ मध्ये झालेल्या सुवर्ण महोत्सव समारंभात काही नामवंतांचा सन्मान करण्यात आला त्यात पत्रकारांपैकी सकाळचे सुरुवातीचे संपादक बाबासाहेब घोरपडे होते तसेच अनंतराव भालेरावही होते.वृत्तपत्रांतील जिवघेणी व्यावसायिक स्पर्धा व शतृत्व यांच्याशी परिचय असणाऱ्यांना अनंतरावांच्या या सत्काराचे महत्व व औचित्य विशद करून सांगण्याची गरज नाही. समारंभ स्थळी अनंतरावांना आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती.त्यामुळे हा प्रसंग माझ्या पक्का स्मरणात आहे.अनंतरावांचे अग्रलेख परखड असत व उर्वरित महाराष्ट्रातही त्याबद्दल कुतूहल असे.हे अग्रलेख अनंतरावांचे लेख म्हणून महाराष्ट्र टाइम्स मध्ये कधीतरी प्रसिद्ध होत आणि ते वाचणे ही एक मेजवानीच असे. सदा डुम्बरे


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......