अजूनकाही
शब्दांचे वेध : पुष्प तेरावे
‘बोलाचीच कढी बोलाचाची भात । जेउनियां तृप्त कोण झाला॥’
संत तुकाराम महाराजांचे हे शब्द कोणाला माहीत नाहीत? निव्वळ पोकळ आश्वासने देणारे बोलके ढलपे त्यांच्याही काळात होते म्हणायचे! पण यात नवल काहीच नाही. गोड गोड बोलून, प्रलोभने दाखवून एखाद्याची पाठवणी करणे, समाधान करणे, पण पाठ वळताच सारे विसरून जाणे, हा (खास करून) राजकारण्यांचा धंदा फार जुना आहे आणि तो जगात सगळीचकडे केला जातो. या मराठी ‘बोलाचीच कढी बोलाचाची भात’साठी एक चपखल इंग्रजी वाक्प्रचार आहे, ‘बा(र)मिसाईडची मेजवानी’ म्हणजेच ‘Barmecide feast’.
आता हा बा(र)मिसाईड कोण? हे आहे बारमाकी/बरमाकी या फारसी (पर्शियन) नावाचे इंग्रजी रूप. बारमाकी/बरमाकी हे इराण देशातले एक फार जुने, शक्तिशाली, आणि सुप्रसिद्ध घराणे होते. यांच्याच वंशातल्या काही व्यक्तींचा उल्लेख ‘One Thousand and One Nights’ किंवा १००१ रात्री उर्फ ‘अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी’ या सर्वपरिचित ग्रंथातही आढळतो. या अरबी कथांमधली ३२ व्या रात्रीची एका न्हाव्याच्या सहाव्या भावाची कथा तुम्हाला आठवते का? त्याचे नाव असते शाकाबाक (Schacabac) किंवा Shakashik. वाईट परिस्थितीमुळे तो गरीब बनतो आणि शेवटी भिकेला लागतो. एक दिवस तो भीक मागत मागत बा(र)मिसाईड या श्रीमंत, संपन्न व्यक्तीच्या महालात पोहचतो. तिथे तो खटपटी-लटपटी करून बा(र)मिसाईडचीच भेट घेतो आणि त्याला आपली व्यथा सांगतो. यावर अत्यंत आश्चर्याने बा(र)मिसाईड त्याला विचारतो की, मी येथे हजर असताना तुझ्यावर ही पाळी येऊच कशी शकते, तू उपाशी राहूच कसा शकतो? हा तर माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. लगेच तो नोकरांना सांगून शाकाबाकसाठी एका शाही मेजवानीची व्यवस्था करवतो. मग दोघे जेवायला बसतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
बा(र)मिसाईड आपल्या पाहुण्यासाठी एकाहून एक अशा अत्यंत स्वादिष्ट पदार्थांची फर्माईश करतो आणि त्याचे खानसामे ती त्वरेने पूर्ण करतात. चमचमित, रसिली सामिष पक्वान्ने येतच राहतात आणि बा(र)मिसाईड आग्रह करकरून ती सारी शाकाबाकला खाऊ घालतो. तो ही मोठ्या चवीने आणि आनंदाने या विलासी भोजनाचा आस्वाद घेतो. शेवटी अगदी घशापाशी अन्न आल्यावर शाकाबाक तृप्तीचा ढेकर देतो. त्यावर बा(र)मिसाईड त्याच्याकडे असलेल्या सर्वांत उंची मद्याचे बुधले उघडायला आपल्या नोकराला सांगतो आणि मग शाकाबाक त्या मद्याचे प्यालेच्या प्याले रिचवतो. पण शेवटी दारूच ती. अती झाली की चढणारच. काही वेळाने शाकाबाक मस्त झिंगतो आणि आरडाओरडा करत नाचू लागतो. आणि नाचता नाचता तो बा(र)मिसाईडच्या जवळ जाऊन खाडकन एक झापड त्याच्या मुस्कटात लावतो.
पण ...
पण हे सारे लटके असते. बा(र)मिसाईड हा जेवढा उदार आणि दयाळू होता, तेवढाच तो खोडकरही होता. त्याला लोकांची टांग खेचण्याची सवय असते. या खेपेला त्याच्या प्रॅक्टिकल जोकचा बळी ठरतो शाकाबाक. त्यामुळे बा(र)मिसाईडची ती शाही मेजवानी खोटी असते, त्याचा आग्रह खोटा असतो, त्याच्या नोकरांनी आणलेल्या त्या डिशेस खोट्या असतात, आणि ते उंची मद्यही खोटे असते. शाकाबाकला हे लगेच कळून येते. पण तोही या थट्टेत सामिल होतो आणि बा(र)मिसाईडच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिळवतो. पण अखेरीस शाकाबाकने बा(र)मिसाईडला मारलेली झापड मात्र खरी निघते. त्याने केलेली ही गुस्ताखी बघून सारे स्तब्ध होतात, नोकर त्याला पकडायला जातात. पण बा(र)मिसाईड त्यांना थांबवतो आणि हसायला लागतो. शाकाबाकच्या झिंगण्याच्या अॅक्टिंगवर तो खुश झालेला असतो. त्यामुळे त्या झापडीकडे दुर्लक्ष करून आता बा(र)मिसाईड शाकाबाकला खरोखरची शाही मेजवानी देतो.
ही गोष्ट थोडक्यात अशी आहे. यातला जो बा(र)मिसाईड आहे, तो पुढे इंग्रजी भाषेत ‘any pretended or illusory generosity or hospitality’ या अर्थाने अवतीर्ण झाला. खोटी, आभासी, लटकी दया किंवा आदरातिथ्य म्हणजे ‘Barmecide feast’. आधी जोसेफ अॅडिसन या लेखक/राजकारणी माणसाने १६ सप्टेंबर १७१३ रोजी लंडनच्या ‘The Guardian’ या नियतकालिकात ‘complaisance’ म्हणजे परोपकार, दयाबुद्धी, परेच्छापालनातली तत्परता, यावर लिहिलेल्या एका लेखात या अरबी कथेचा सर्वप्रथम उल्लेख केला होता. १८०६ मध्ये Luke Hansardने अॅडिसनचा हा लेख पुनर्मुद्रित केला. पण ‘Barmecide feast’चा पहिला उल्लेख ‘Twelfth Night, or What you will’ या कथेत आढळतो. ‘The London Magazine’ या मासिकात ही कथा जानेवारी १८२३मध्ये प्रकाशित झाली होती.
Of all the feasts and gay doings which I have known, none were like that one “Twelfth Night” which I passed at L——’s house, some five or six years ago. […]
[…] We had a supper, where joke and hospitality reigned. And there were cold meats, and sallads [sic], and pies, and jellies, and wines of all colours, mocking with their lustre the topaz and the ruby; and there were pyramids of fruit, and mountains of rich cake […]. This was no meagre shadowy banquet,—no Barmecide feast.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘Barmecide feast’ ला ‘Barmecidal feast’ असेही म्हटले जाते.
माझ्याजवळच्या एका शब्दकोशात ‘बा(र)मिसाईड’ या शब्दाची व्याख्या ‘A person who offers benefits that are illusory or disappointing’ अशी दिली आहे. आभासी, पोकळ, निरर्थक आश्वासने देणारा माणूस. आज फारसा प्रचलित नसलेला हा शब्द खरे म्हणजे जगभरातल्या राजकारण्यांसाठी आवर्जून वापरला गेला पाहिजे. भारतात तर असे हजारो बा(र)मिसाईड राजकारणी सापडतात. आधीही होते, आताही आहेत, उद्याही असतील. कोणा एका विशिष्ट व्यक्तीचे नाव घेण्यात अर्थ नाही. सर्वच राजकीय पक्षांमध्ये असे गणंग भरले असतात. त्या अरबी कथेतला जो बा(र)मिसाईड होता, तो खरे तर असा नव्हता. त्याने त्या शाकाबाकची फक्त थट्टा केली होती. पण पुढे बिचाऱ्याचे नशीब पालटले. तोपर्यंत तो एवढा श्रीमंत आणि लोकप्रिय झाला होता की, त्याच्या वैभवामुळे साक्षात राजाला म्हणजे खलिफाला असूया वाटू लागली. त्याने बा(र)मिसाईडच्या घरच्या सर्वांना कैद केले, आणि काहींना तर ठार मारले. त्यानंतर दयाळू बा(र)मिसाईडचे नावही लबाडी, फसवेगिरी, थापेबाजी, ढोंग, अप्रामाणिकपणा, अशा बाबींशी जोडले गेले. यालाच म्हणतात काळाचा महिमा!
याला आणखीही काही प्रतिशब्द आहेत. त्यातला एक म्हणजे ‘OLEAGINOUS’ ओलिअजिनस म्हणजे तेलकट (Oily). गोडगोड बोलणारे, आतून लबाडीने भरलेले पण बाहेरून संत किंवा सज्जन असल्याचे नाटक करणारे जे conmen, tricksters, घाग, ठक लोक असतात त्यांचा स्वभाव ‘OLEAGINOUS’ असतो. बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजारची एक लाडकी शिवी होती : ‘तेलकट, टकल्या, ढेरपोट्या’. त्यातल्या ‘तेलकट’चा अर्थ मला नंतर लक्षात आला.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
घरफोडे चोर अंगाला तेल लावून घरात घुसतात. म्हणजे कोणी पकडले तरी त्याच्या तावडीतून ते पटकन सुटून पळ काढू शकतात. हे खरे तेलकट चोर. मात्र अलंकारिक अर्थाने, जे लोक शब्दच्छल करून, उज्ज्वल भविष्याची गोड स्वप्ने दाखवून, समोरच्याला उल्लू बनवतात आणि कोणाच्याही पकडीत न येता आपला उल्लू सिधा करतात, ते ‘OLEAGINOUS’!
बोलाच्याच कढीला भुलू नका, बोलाच्याच भाताने पोट भरू नका, असा या सगळ्याचा अर्थ आहे. प्रश्न अमुक व्यक्ती कोणत्या विचारसरणीची अथवा पक्षाची आहे हा नसून प्रवृत्तीचा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी बा(र)मिसाईड होणारे अनेक जण आपल्या अवतीभवती फिरत असतात. त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून नेहमी सावध रहा.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment