साहिरच्या गीतात कोणतीही गल्लाभरू व साचेबद्ध लेखनाची प्रेक्षकांना ‘फील गुड’ देणारी तडजोड नव्हती!
पडघम - साहित्यिक
लक्ष्मीकांत देशमुख
  • शायरे आझम साहिर लुधियानवी
  • Sat , 24 October 2020
  • पडघम साहित्यिक साहिर लुधियानवी Sahir Ludhianvi

शायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला उद्या, २५ ऑक्टोबर २०२० रोजी ४० वर्षे होताहेत. पण आजही ते रसिकांच्या मनात जिवंत आहेत. आजही त्यांची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक व ताजी आहे. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष आहे (८ मार्च २०२० ते ७ मार्च २०२१). साहिर म्हटलं की, सर्वप्रथम गुरुदत्तचा ‘प्यासा’ आठवतो. त्याचा खरा हिरो होता साहिर- त्याची गीतं. या करोना कालखंडात मी त्यांचं जीवन व शायरी- फिल्मी गीतांचा समग्र वेध घेणारे ‘हर एक पल का शायर - साहिर लुधियानवी - जीवन आणि शायरी’ हे पुस्तक लिहिले असून ते जानेवारी/ फेब्रुवारी २०२१मध्ये प्रकशित होत आहे. त्यातील हे एक प्रकरण संपादित स्वरूपात…

.................................................................................................................................................................

‘तदबिर से बिगड़ी हुई तकदिर बना ले

अपने पे भरोसा है, तो ये दाँव लगा ले!’

१९५१ साली साहिरनं ‘बाजी’साठी हे पटकथेच्या मागणीप्रमाणे गझल फॉर्ममध्ये गीत लिहिलं होतं, त्याला सचिनदेव बर्मननी आपल्या अलौकिक संगीत प्रतिभेनं क्लबसाँगचं रूप बहाल केलं होतं. पण १९५८ येता येता साहिरची बर्मदांबरोबरची दीड डझन सिनेमातली १९५१ ते १९५७ अशा सात वर्षांत लोकप्रिय झालेली युती ‘प्यासा’च्या श्रेयावरून तुटली होती. त्याच वर्षी नव्यानं जमलेली ओ. पी. नय्यरसोबतची जोडीसुद्धा ‘नया दौर’च्या श्रेयावरूनही आणि साहिरच्या नय्यरपेक्षाही अधिक मोठ्या असणाऱ्या इगोमुळे, पण स्वत:च्या शायरीचा सार्थ अभिमान असल्यामुळे फुटली होती. त्यामुळे त्याच्यासमोर आता बर्मन, नय्यर, शंकर-जरकिशन व नौशाद या टॉपच्या संगीतकारांविनाही स्वत:च्या गीतांच्या बळावर सिनेमे गाजवायचे आव्हान उभे ठाकले होते. त्याला स्वत:ला आपल्या लेखणीवर चित्रपट चालतो, हे सिद्ध करून दाखवायची वेळ आली होती.

त्यामुळे १९५८ हे वर्ष साहिरसाठी ‘मेक ऑर ब्रेक’चं म्हणजे ‘करो या मरो’चं वर्ष होतं. कारण या वर्षात त्याला शंकर-जरकिशनला वगळून खय्यामचा आग्रह धरलेला ‘फिर सुबह होगी’, म्युझिकली हिट झालेल्या ‘नया दौर’ नंतर बी. आर. चोप्राने पुढील चित्रपट ‘साधना’साठी नय्यरऐवजी साहिरच्या शायरीवर जास्त विश्वास दाखवत एन. दत्ताला संगीतकार म्हणून निवडलं होतं. तो, ‘साधना’ आणि इगो क्लॅशेस होऊन अलग होण्यापूर्वी नय्यरसोबतचा तरल ‘सोने की चिड़िया’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते. ते किती लोकप्रिय होतात व कवित्वाच्या पातळीवर जाणारी गीतं किती रसिकप्रिय होतात, व एकूणच हे तीनही चित्रपट तिकीटबारीवर कसे गाजतात, यावर साहिरची पुढील सिनेकारकीर्द अवलंबून होती. चित्रपटाच्या यशात संगीताहून भावपूर्ण गीतांचा वाटा अधिक असतो, हे त्याला बर्मन-नय्यरविना सिद्ध करून दाखवायचं होतं. म्हणून ‘बाजी’च्या गीतात लिहिल्याप्रमाणे अक्षरश: त्यानं स्वत:च्या शायरीवर व काव्यप्रतिभेवर विश्वास ठेवत परिणामाची तमा न बाळगता अट्टल जुगाऱ्याप्रमाणे डाव लावला होता.

पण इतिहास साक्षी आहे की, हे तीनही चित्रपट तिकीटबारीवर चांगले यशस्वी झाले. विशेषत: ‘साधना’. पण या व बाकीच्या दोन चित्रपटाच्या यशात साहिरच्या गीतांचा सर्वाधिक वाटा होता. इथं संगीतापेक्षाही शब्द व आशयामुळे गीतं गाजली होती. आणि साहिर व त्याच्या लाजबाब गीतामुळे हे तीनही चित्रपट आज ‘क्लासिक’ दर्जापर्यंत पोचले आहेत. त्यांची मोहिनी आजही ज्यांना चांगल्या दर्जेदार गीतांची आवड आहे, त्यांच्यावर जुन्या पिढीप्रमाणे आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

राज कपूरच्या आदर्श जगाची स्वप्न पाहणारा समाजवादी-ध्येयवादी नायकाच्या प्रतिभेला साहिरच्या गीतांनी एक वेगळी उंची दिली. खरं तर खास राज कपूरची पडद्यावरची स्वप्नाळू, ध्येयवादी, मनानं श्रीमंत असणारा व गरिबांचा बाजू घेणाऱ्या नायकाची प्रतिमा शैलेंद्र यांनी ‘मेरा जुता है जपानी’, ‘आवारा हूँ’ आदी गीतांनी रसिकांच्या मनात ठसठशीतपणे रुजवली होती. त्या प्रतिमेला साहिरनं ‘फिर सुबह होगी’द्वारा एक नवा आयाम व एक खोली दिली. राज कपूरच्या अभिनयाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून जे काही चित्रपट समीक्षक मानतात, त्यात ‘फिर सुबह होगी’चा क्रमांक बराच वर आहे. फार तर शैलेंद्रनं निर्माण केलेल्या ‘तिसरी कसम’ पाठोपाठ... या चित्रपटासाठी त्यानं रमेश सहगलला खय्यामला घ्यायला लावलं, पण तो चित्रपटाच्या यशानं आपण तिकीटबारीवर नाणं खणखणीत वाजतं हे सिद्धही करून दाखवलं.

‘फिर सुबह होगी’ चित्रपटातली साहिरची सर्व गीतं काव्यमय आणि अर्थपूर्ण होती. त्यातून त्याची समाजवादावरील श्रद्धा, गरिबांबद्दलची कणव, बेकारी व बेघरांच्या समस्येकडे लक्ष वेधताना सटीकपणे दाखवलेली विषमतेची दरी, तरीही उद्याच्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांचं उत्कट व प्रेरणादायी दर्शन...

‘फिर सुबह होगी’चं कथानक ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या जगविख्यात कादंबरीवर आधारलेलं आहे, तरी त्यात स्वातंत्र्योत्तर काळातील न परवडणारं व रोजगार पुरवण्यास अक्षम असलेलं शिक्षण, गरिबी-श्रीमंती यांमधील वाढती दरी, सामान्य माणसाचं होणारं शोषण आणि सरकारबाबतचा झपाट्यानं होणारा भ्रमनिरास यावर रमेश सहगलने कथानकाच्या ओघात प्रसंग व पात्रांच्या स्वभावचित्रणाच्या आधारे मार्मिक भाष्य केलं आहे. त्याला समर्थपणे साहिरच्या प्रगतीशील लेखन चळवळीच्या तत्त्वज्ञानाच्या वैचारिकतेची काव्यात्म जोड मिळाली आहे. मुख्य म्हणजे तोवरचा (व आजही चालू असणारा) आणि बांधलेल्या चालीवर गीत लिहिणं (ज्याला कैफी आझमीनं ‘पहले गढा खोले, फिर बाद में उस में मुर्दा फिट बिठावो’ असं उपरोधानं म्हटलं होतं.) याला इथे फाटा मिळाला होता. यातील गीतं आधी लिहिली गेली आणि मग खय्यामनं शब्दात दडलेली लय व संगीत शोधत शब्दांचं वजन व गीतांचा आशय लक्षात घेऊन त्यावर हावी न होता संगीत संयोजन केलं होतं. त्यामुळे गीतांचा आशय प्रेक्षकांच्या मनाला प्रभावित करून गेला.

खिशात पैसा नाही म्हणून घराचं भाडं देता येत नाही, म्हणून बेघर होत नायकाला फुटपाथवर झोपावं लागतं. या प्रसंगावर साहिरनं व्यंगात्मक शैलीत एक गीत लिहिलं आहे. ‘रहने को घर नही...’ गरिबांना सरकार साधं डोईवर हक्काचं छप्परही देऊ शकत नाही, (आजही भारतात ‘सर्वांसाठी घर’ हे स्वप्न साकार झालेलं नाहीय.) त्यावर साहिरचं भाष्य खूपच जळजळीत आहे, आणि गर्भित व्यंग अक्षरश: मनाला झोंबणारं आहे. हे गीत अल्लामा इक्बाल यांच्या ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा, हम बुलबुले है इसकी, ये गुलसिता हमारा’चं फर्मास विडंबन आहे. पण माझ्या मते, विडंबनापलीकडे जात एक स्वतंत्र काव्य म्हणून ते अजोड आहे.

१९०४ साली इक्बाल यांनी त्याचं अजरामर असं ‘तराना-ए-हिंद’ हे गीत लिहिलं, त्यात त्यांनी धार्मिक सौहार्दावर ‘मजहब नहीं सिखाता आपसे में बैर रखना’ असं लिहिलं होतं. पुढे त्याच इक्बालनं पाकिस्तानचा ‘हिंदू व मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत, व ते एकत्र राहू शकत नाहीत’ असं म्हणत कट्टरतेची कास पकडत ‘सारे जहाँ से अच्छा’च्या मीटरमध्येच ‘तराना-ए-मिली’ हे गीत लिहिलं. त्याच्या प्रारंभिक दोन ओळी अशा आहेत -

‘चिनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा

मुस्लिम है हम, वतन सारा जहाँ हमारा’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अर्थातच सेक्युलर व निधर्मी साहिरला हा द्विराष्ट्रवादाचा धर्मावर आधारित सिद्धान्त अमान्य होता. त्याची प्रतिक्रिया म्हणजे हे त्या गीताचं विडंबन आहे, पण त्याला आपल्या अजोड प्रतिभेनं साहिरनी नवा आशय दिला. तो असा -

‘चीनो अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा

रहने को घर नही, सारा जहां हमारा’

त्यातील पुढील कडवं अंगावर येणारं हार्डहिटींग भाष्य आहे -

‘खोली भी छिन गई है, बेंचे भी छिन गई है

जेबे हैं खाली, क्यूं देता वर्ना गाली

वो संतरी हमारा, वो पासबाँ हमारा’

यातील ‘जेबे है खाली, क्यू देता वर्ना गाली’ ही या गीताची सर्वांत दमदार ओळ आहे. जेव्हा गरिबीच्या झळा तीव्रतेनं बसतात, तेव्हा माणूस आपली भडास शिवी देऊन काढतो. ही शिवी देणे म्हणजे त्याची असहाय्यता असते. ज्या क्रूर समाज व्यवस्थेनं आपल्याला कंगाल केलं आहे, तिचं आपण काही वाकडं करू शकत नाही, ही हताश जाणीव असते. ते किती प्रभावीपणे साहिर प्रकट करतो.

पण या गीतात शेवटच्या चरणात गरिबीच्या समस्येचं उत्तरही हा आशावादी शायर असं देतो,

‘पतला है हाल अपना, लेकिन लहू है गाढा

फौलाद से बना है, हर नौजवाँ हमारा

मिलजुल के इस वतन को ऐसा सजायेंगे

हैरत से मुंह तकेगा, सारा जहाँ हमारा’

गरीब माणूस दैवाधिन असतो, कारण विपन्नावस्था व विपरीत जीवन का आपल्या वाट्यास आलं, हेच त्याला कळत नाही. मग तो आपल्या नशिबाला कोसत राहतो. पण त्यामागे सत्ताधारी शोषकाचं शोषण असतं, हे साहिर कुठेही त्याचा संदर्भ न देता कुशलतेनं ‘दो बुंदे सावन की’ या गीतात करतो. जावेद अख्तरनं म्हटलं आहे की, ही नज्म सिनेमाऐवजी पाठ्यपुस्तकातही चालली असती, एवढी ती काव्यमय, अर्थगर्भ पण आकलनास सुलभ अशी कविता आहे!

प्रचलित समाजव्रवस्था दोन समान व्रक्तींना जीवनप्रवाहात दोन भिन्न दिशेला घेऊन जाते, त्यात एकाला सुख, ऐश्वर्य व आराम मिळतो, तर दुसऱ्याला गरिबी, शोषण आणि नर्कसमान जगणं... हा आशय साहिर असा व्यक्त करतात -

‘दो बुंदे सावन की,

इक सागर की सीप में टपके और मोती बन जाए

दुजी गंदे जल में गिरकर अपना आप गवाए

किसको मुजरिम समझे कोई, किसको दोष लगाए

दो बुंदे सावन की

दो सखियां बचपन की

एक सिंहासन पर बैठे और रूपमती कहलाए

दुजी अपनी रूप के कारण गलियों मे बीक जाए

किसको मुजरिम समझे कोई, किस को दोष लगाए

दो सखिया बचपन की...’

हिंदी सिनेमात जीवनातील संकट समयी परमेश्वराला आळवणी करणारी गीते योजली जातात. उदाहरणार्थ - ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’, ‘इतनी शक्ती हमे देना दाता’, ‘अल्ला मेघ दे, पानी दे, छाया दे’ इ. साहिरनं पण ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’, ‘तोरा मनवा क्यों घबराए रे?’ सारखी गीतं चित्रपटात प्रसंगानुरूप लिहिली आहेत, पण ‘फिर सुबह होगी’ हा त्याचा स्वत:ला - स्वत:च्या कवित्वाला सिद्ध करण्याचा, तोही टॉपच्या संगीतकाराविना हा अट्टहास होता. आत्मविश्वास पण होता. त्यामुळे बेकारी व बेघरपणाला त्रासलेल्या नायकाच्या तोंडी त्या उपरवाल्याची आळवणी करणारं ठोकळेवजा गीत न लिहिता ते असं उपरोधिक शैलीत लिहिलं-

‘आसमाँ पे है खुदा, और जमीं पे हम

आजकल वो इस तरफ, देखता है कम’

त्या उपरवाल्या खुदाचं माणसाकडे लक्ष नाहीय, मग त्याची आपण का फिकीर करावी? त्याला का आळवावं? हा या गीतातला विचार त्या वेळी होता व आजही असणारा बंडखोर नवा विचार आहे, पण तो संयत आहे, उरबडवा व आंक्रदणारा नाही, तर एक सिनकीपणाचा व बेफिकिरीचा तिरकस स्वर आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : कैफी आझमी : धर्मांधतेविरुद्धचा एल्गार!
..................................................................................................................................................................

‘आजकल किसी को वो टोकता नहीं

चाहे कुछ भी किजिए, रोकता नहीं

बढ रही है लूटमार, फट रहे है बम

आसमां पे है खुदा और जमीं पे हम!’

पुढील चरणात ही बंडखोरी तीव्र होत जाते ती अशी,

‘किसको भेजे वो यहां, खाक छानने

इस तमाम भीड का हाल जानने

आदमी है अनगिनत, देवता है कम!’

पृथ्वीवरील असंख्य माणसांच्या दु:खाचं हरण करायला सिमॅटिक पंथाचा एक निर्गुण ईश्वर किंवा हिंदू धर्माचे अनेक देव पण कमी पडतात, म्हणून माणसानं फिकीर व दु:ख न करता परिस्थितीशी सामना करत जगावं असं शेवटच्या चरणात साहिर सांगतो आणि गीताला एका चिरंतनाचा स्पर्श होतो -

‘जो भी है सो ठीक है, जिक्र क्यूं करे

हम ही इस जहान की, फिक्र क्यूं करे

जब उसे ही नहीं गम, क्यूं हमे हो गम?’

पण हा चित्रपट ज्या गीतानं हिंदी सिनेमाक्षेत्रात अमर व अविस्मरणीय झाला, ते गीत म्हणजे साहिरच्या पाच टॉप गीतात समाविष्ट होणारं, कदाचित सर्वाधिक महत्त्वाचं अमर गीत आहे.

चित्रपटात नायक व नायिका परिस्थितीनं हतबल झालेले आहेत. गरिबी - बेकारीने परेशान झाले आहेत. पण तरीही मनामध्ये आशेचा दीप तेवत आहे व आज नाही, पण उद्या केव्हा तरी आपल्या स्वप्नातली सुखद व हवीशी सकाळ जरूर येणार आहे, असं ते एकमेकांना दिलासा देत म्हणतानाच ‘वो सुबह कभी तो आरेगी’ हे गीत साहिरनं लिहिलं आहे. ती हवीशी पहाट त्यांना केवळ स्वत:साठी नको आहे, तर सर्व गरीब-शोषित व पीडितांच्याही जीवनात आली पाहिजे, अशी तीव्र इच्छा आहे.

‘बीतींगे कभी तो दिन आखिर ये भूक और बेकारी के

टूटेंगे कभी तो बूत आखिर दौलत की इजारादारी के

जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी

वो सुबह कभी तो आयेगी...

मजबूर बुढापा जब सुनी राहो की धूल न फांकेगा

मासूम लडकपन जब गंदी गलियों मे भीख न मांगेगा

हक मांगनेवालों को जिस दिन सुली न दिखाई जायेगी

वो सुबह कभी तो आएगी...’

ती स्वप्नातली पहाट कशी असेल, हे गीताच्या सुरुवातीलाच साहिर सांगताना म्हणतो,

‘इन काली सदियों के सरसे, जब रात का आंचल ढलकेगा

जब दुख के बादल पिघलेंगे जब सुख का सागर झलकेगा

जब अंबर झुमके नाचेगा, जब धरती नग्मे गायेगी

वो सुबह कभी तो आयेगी !’

मुकेशचा आश्वासक स्वर, त्याला आशा भोसलेच्या धारदार आलापीची साथ, कमीत कमी वाद्यवृंद आणि सहज गुणगुणावी अशी सोपी शब्द व आशयाला केंद्रस्थानी ठेवणारी खय्यामची धून यामुळे हे गीत प्रत्येक दु:खी - कष्टी जीवाच्या काळजाचं स्वप्नं-गीत बनलं आहे. आज एकविसाव्या शतकाच्या भारतातील कोट्यवधी लोकांना चांगलं जीवन कुठे जगायला मिळत आहे? म्हणून आजही ते तेवढंच, नव्हे १९५०च्या दशकात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यापेक्षा आज हे गीत अधिक प्रासंगिक झालं आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  साहिर लुधियानवी - गरीब, शोषितांबद्दल भाष्य करताना, त्यांची दु:ख-वेदना शब्दबद्ध करताना त्याची कडवाहट व शब्दांचे फटकारे धारदार होतात!
..................................................................................................................................................................

राज्यकर्त्यांनी राज्य करताना भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे धोरणं आखावीत, अशी अपेक्षा संविधानकर्त्यांना संविधानसभेत चर्चेच्या वेळी केली होती. तसेच महात्मा गांधींच्या ‘तलिस्मान’चा विचार (‘धोरणं आखताना शेवटच्या माणसाच्या जीवनात कार फरक पडेल, त्याचा अश्रू पुसला जाईल का, हा विचार करा’) करावा अशी तमाम देशवासियांची अपेक्षा असते, आहे. त्यात साहिरच्या या गीताचा व ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा’ या गीतात साहिरनं जी अपेक्षा व्यक्त केली आहे, ती पण राज्यकर्त्यांनी राज्यकारभार करताना विचारार्थ घेतली पाहिजे, असं मला एक कलावंत म्हणून वाटतं.

माधवी पोथुकुची या चित्रपट समीक्षेनं ‘दि प्रिंट’ या वेबपोर्टलवरील आपल्या लेखात या गीतासंबंधी मार्मिक निरीक्षण नोंदवलं आहे, ते असं,

‘‘Sahir was always known for his radically left – leaning poetry, and his film lyrics were not any different. He was a staunch critic of Jawaharlal Nehru’s Government, and his more significantly for a socialist, of Nehruvian Socialism.

The song ‘Who subha kabhi to aayegi’ is haunting and criticizes the growing economic disparity of the time with millions being left with nothing, while a few flourish. In ‘Aasman pe hai Khuda’ Sahir takes on God, caustically asking when the Almighty does not care for us, why should we even bother? ‘Chino, Arab Hamara’ was probably most controversial, dripping with acidic sarcasm, Sahir parodies two of Iqbal’s poem and takes a dig at the Nehru Government for propogating idealized nationalism while ignoring the real problems of people.

In many ways, ‘Phir subah hogi’ is Sahir’s movie through and through. It is not only a great example of his range, but also his story. Like many of his comrades, Sahir hoped for a more equal future, free of capitalism and nationalism.

And today (in 2020-21) when things seem bleak, all one can do to hum to one self – Who Subah Kabhi to Aayegi.”

पण साहिर केवळ ‘वो सुबह कभी तो आयेगी’ असं स्वप्न गरिबांना दाखवत नाही तर ‘वो सुबह हमीसे आयेगी’ असा दृढ आत्मविश्वास पण देतो.

‘संसार के सारे मेहनतकश खेतोंसे मिलों से निकलेंगे

बेदर बेघर बेबस इन्सां तारिक बिलोंसे निकलेंगे

दुनिरा अमन और खुशहाली के फुलों से सजाई जाएगी

वो सुबह हमी से आयेगी

वो सुबह हमी से आयेगी’

आज असा दिलासा भारतातील करोडो भारतीयांना हवा आहे, पण दुसरा साहिर, दुसरे नेहरू (त्यांच्याबद्दल मोहभंग झाला असला तरी त्यांच्या निष्ठा व विचार खरे होते) कुठून आणायचे? हा प्रश्न आहे. असो.

‘वो सुबह कभी तो आयेगी’ हा गरिबांचा संघर्ष प्रत्ययकारिक रीतीनं दाखवणारा आहे, तसाच तो आशेचे दीप पेटवणारा संदेश देणारा चित्रपट आहे.

याबाबत एक रोचक घटना भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी सांगितली आहे. ते व अटलबिहारी वाजपेरी हे दोघे हिंदी सिनेमाचे शौकिन होते. १९५८मध्ये तेव्हाच्या जनसंघाचा दिल्लीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पूर्ण पराजय झाला होता, तेव्हा दोघे त्यातून बाहेर येण्यासाठी हा सिनेमा पाहायला गेले आणि मनातली पराजयाची खंत ‘वो सुबह कभी तो आयेगी’नं दूर झाली... स्वत: अडवाणींनी हे सांगितलं असल्यामुळे खरं मानलं पाहिजे!

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा चित्रपट १९५८चा चौथ्या क्रमांकाचा बॉक्स ऑफिसवर यश मिळवणारा ‘ज्युबिली’ चित्रपट ठरला. ‘मधुमती’, ‘चलती का नाम गाडी’, ‘यहुदी’ नंतर जवळपास एक कोटी रुपयांची कमाई या ‘वो सुबह कभी तो आयेगी’नं केली. (त्या काळी चित्रपट दहा ते वीस लाखात बनत असत.) या चित्रपटाच्या (तसंच त्याच वर्षीच्या ‘साधना’च्या पण) यशानं साहिरनं आपलं म्हणणं की, म्युझिकली हिट चित्रपटाच्या गीताच्या यशात गीतांचा व गीतकारांचा सिंहाचा वाटा असतो, हे सिद्ध करून आपलं नाणं किती खणखणीत आहे, हे दाखवून दिलं! आणि ‘अपने पे भरोसा’ ठेवत बर्मन-नय्यरशी फारकत घेतल्यावर शंकर-जयकिशनऐवजी खय्याम यांना घेत हा चित्रपट अक्षरश: आपल्या प्रेक्षकांच्या मनाचा वेध घेणाऱ्या दर्जेदार व काव्यात्म गीतांनी गाजवला. मुख्य म्हणजे गीतात कोणतीही गल्लाभरू व साचेबद्ध लेखनाची प्रेक्षकांना ‘फील गुड’ देणारी तडजोड नव्हती. प्रेक्षकांना आपल्या गीतानं अधिक समृद्ध व जाणकार करण्याची किमया साधताना गल्लाबारीवर पण साहिरनं निर्माता-दिग्दर्शकांना यश मिळवून देण्याची अवघड किमया करून दाखवली होती. आणि त्याचा गीतलेखन कारकिर्दीचा सर्वाधिक महत्त्वाचा गीतलेखनाचा कालखंड १९५८पासून जो सुरू झाला, तो १९७० पर्यंत कायम राहिला आणि नंबर वन गीतकार म्हणून साहिरचं नावं मशहूर झालं. (पुढे त्याच्या कवित्वाला जणू ओहोटी लागली, केवळ १९७३च्या ‘दाग’ व १९७५च्या ‘कभी कभी’मध्ये बहरून आली होती. असो.)

..................................................................................................................................................................

लेखक लक्ष्मीकांत देशमुख कथा-कादंबरीकार आणि ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

laxmikant05@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......