अजूनकाही
वाचनावर अतोनात प्रेम असलेल्या एका पुस्तकवेड्या माणसाचे काल निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यामुळे ते अकाली गेले असे म्हणता येणार नाही, पण ते असे एकदम, अचानकच जातील असेही वाटले नव्हते. आमचे सुधीरकाका (सुधीर देव) अतिशय उत्साही आणि हसरे होते. याआधी जीवावरच्या दोन-तीन दुखण्यांतून उठून पुन्हा ते त्याच तडफेने कामाला लागले होते. याही वेळा ते आजारपणातून बाहेर येतील अशी एक अंधुक आशा वाटत होती, पण तसे झाले नाही. काल ते गेल्याचा निरोप आल्यावर माझ्या डोळ्यांसमोर गेल्या ५० वर्षांचा मला ज्ञात असलेला सगळा इतिहास झरझर सरकून गेला.
नागपूरच्या सांस्कृतिक इतिहासात जिचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल अशा ‘माझा ग्रंथसंग्रह’ योजना (माग्रस) या नावाच्या वाचक चळवळीचे संस्थापक सुधीर देव हे मूळचे कवी होते. १९६३ साली त्यांचा ‘स्वप्नगंधा’ या नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. त्याला ज्येष्ठ कवी आणि समीक्षक भवानीशंकर श्रीधर (भ. श्री.) पंडित यांची प्रस्तावना होती. देवांच्या प्रतिभाविलासाची आणि क्षमतेची चुणूक या संग्रहातून बघायला मिळते. उदाहरणार्थ त्यांच्या एका कवितेतल्या या काही ओळी बघा-
“काळ्या काळ्या आभाळाच्या
गोऱ्या गोऱ्या छोरी
हासतात फेकुनिया
प्रकाशाची जाळी
काळी काळी रात्र झुले
अशा काळ्या वेळी
क्षितिजास बांधुनिया
सुगंधाची झोळी”
मात्र पुढे त्यांच्यातल्या कवीवर त्यांच्यातल्या पुस्तकप्रेमीने कुरघोडी केली. सुधीर देवांना वाचनाचे अतिशय प्रेम होते. पण पुस्तके विकत घेऊन स्वतःचा ग्रंथसंग्रह करण्याची त्या वेळी त्यांची ऐपत नव्हती. त्यांची नोकरी सरकारी होती, पण पाचवा - सहावा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीचा तो काळ होता. तेव्हा सरकारी नोकरांचे पगार तुटपुंजेच होते. देवांवर प्रापंचिक जबाबदाऱ्याही खूप होत्या. घर चालवायचे होते. भाड्याच्या घरात राहून, मर्यादित कमाईत त्यांना संसार करायचा होता. अशा वेळी मनसोक्त, मनासारखी पुस्तके वाचायला न मिळाल्यामुळे त्यांच्यातल्या पुस्तकप्रेमीची घुसमट होत होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
वाचनालयातून पुस्तके आणून आणून आणणार किती? पण देव कल्पक बुद्धीचे होते. खूप विचार करून त्यांना एक उपाय सुचला. ग्रंथसंग्रह चळवळीचा. आपल्यासारखे आणखी कितीतरी समविचारी लोक शहरात राहत असतील; त्यांच्या सोबतीने आपण ही चळवळ सुरू करावी असे त्यांनी ठरवले. याच संकल्पनेतून काही काळाने म्हणजे २४ ऑगस्ट १९६८ रोजी ‘माग्रस’चा जन्म झाला. यासाठी त्यांनी नागपुरातल्या तेव्हाच्या अनेक लेखक, पत्रकार, आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील अन्य काही लोकांशी वैयक्तिक संपर्क साधला. नोकरी संभाळून हे काम ते करत होते. सायकल चालवत एका संध्याकाळी आमच्या घरी ते या कामासाठी आले होते. तो दिवस मला आजही चांगलाच आठवतो. (मी तेव्हा फक्त १० वर्षांचा होतो.) माझी आई (बालकथाकार, पत्रकार, आणि स्तंभलेखिका) मालती निमखेडकर आणि माझे वडील मोरेश्वर निमखेडकर या दोघांनीही देवांच्या कल्पनेला ताबडतोब पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर हवी ती मदत देऊ केली. ही दोघे आणि त्यांच्याचसारखे आणखी काही जण हे माग्रसचे अगदी पहिल्या दिवसापासूनचे समर्थक/सदस्य बनले. (त्यानंतर अगदी अल्पावधीतच सुधीर आणि अपर्णा देव हे जोडपे आमचे फॅमिली फ्रेंड झाले.)
माग्रसची स्थापना कशाकरता झाली? नागपुरात १९६८मध्ये पुस्तकांची दुकाने अगदी एक-दोनच होती. (आणि विकत घेऊन पुस्तके वाचणारेही तसे कमीच होते.) देवांसारख्या पुस्तकप्रेमींची यामुळे फार अडचण होत असे. प्रत्येक वेळी मुंबई -पुण्याहून पुस्तके मागवणे तेव्हा शक्य नव्हते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मनात असले तरी रोख रक्कम देऊन हवी तशी पुस्तकखरेदी एकदम करणे, हेदेखील तेव्हा अनेकांना शक्य होत नव्हते. देव स्वतः या वर्गात येत होते. म्हणून मग माग्रस जन्माला आली. लोकांमध्ये वाचनप्रेम वाढावे, यासोबतच त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणे, हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी सदस्यांनी दर महा जमेल तेवढी रक्कम देवांकडे जमा करून वर्षाच्या शेवटी जमलेल्या रकमेतून हवी ती पुस्तके त्यांना माग्रसच्या माध्यमातून खरेदी करता येत होती. देव स्वतःही हेच करत. एखाद्या पुस्तकाच्या जास्त प्रती मागवल्या गेल्या तर प्रकाशकांकडून किमतीत सवलतही मिळत असे. या योजनेतून आमच्या घरी आलेली काही पुस्तके अशी होती- ‘आनंदी गोपाळ’, ‘दुर्दम्य’, ‘वाघ सिंह माझे सखे सोबती’, ‘शल्य’, ‘मृत्युंजय’, ‘गदिमा’, ‘समग्र गडकरी’, ‘पु. ल. एक साठवण’, इत्यादी. सदस्यांकडून दर महा पैसे गोळा करणे, त्याचा योग्य हिशोब ठेवणे, लिखापढी करणे, ही सारी कामे देव एकटे करत असत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
काही वर्षांतच माग्रसचे नाव सर्वदूर झाले. खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. पाच-दहा लोकांच्या सोबतीने सुरू झालेली देवांची ही चळवळ फार थोड्या काळात लोकप्रिय झाली. हळूहळू माग्रसचा पसारा आणि व्याप वाढला, नवनवीन सदस्यांची भर पडू लागली, आणि आधी विदर्भात, मग मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या अन्य शहरांत, आणि त्याहीनंतर भोपाळ, इंदोर, जबलपूर, रायपूर, दिल्ली, हैदराबाद, इत्यादी, महाराष्ट्राबाहेरच्या शहरांतही माग्रसच्या शाखा निघाल्या. नागपुरातली बरीच नामवंत मंडळी (लेखक, अभिनेते, चित्रकार, गायक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार, प्राध्यापक, प्रभृती) माग्रसचे सदस्य बनले. लवकरच या चळवळीला एक सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे मग ग्रंथखरेदी व्यवहारासोबत माग्रसतर्फे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमदेखील घेतले जाऊ लागले. एखाद्या सदस्याच्या घरी मासिक भेट होऊ लागली. आणि एक वार्षिक मेळावाही घेतला जाई. बाहेरगावच्या नामवंत लेखकांना आमंत्रित केले जाऊ लागले. मुंबई-पुण्याकडच्या वर्तमानपत्रांत आणि इतर नियतकालिकांत तसेच तिकडच्या नामवंत प्रकाशकांतर्फेही माग्रसची आदरपूर्वक दखल घेतली जाऊ लागली.
एका काळात माग्रसचे एक हजाराच्यावर सभासद होते. अपर्णाकाकू देवांनीही आपल्या पतीला या कामात जमेल तेवढी मदत केली. त्याही कविता लिहीत असत. पुढे पुढे मात्र या दोघांचे काव्य लेखन बंद झाले ते झालेच. नोकरी सांभाळून माग्रसचा कारभार सांभाळण्यातच देवांचा सारा वेळ निघून जायचा. ते खूप कल्पक डोक्याचे होते. माग्रसच्या बैठकी किंवा अन्य कार्यक्रम त्यांनी आखून दिलेल्या शिस्तबद्ध आराखड्यानुसारच चालत. या सभांमध्ये दोन-तीन पुस्तकांवर चर्चा, कविता किंवा कथा वाचन, किंवा भाषणे होत. पुढची बैठक आपल्या घरी व्हावी यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ लागत असे. फार मजा यायची त्या दीड दोन तासांत. आजवर विविध विषयांवरील शेकडो पुस्तकांची दखल या बैठकींमध्ये घेतली गेली असेल.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सुधीर देव स्वतः कवी आणि चोखंदळ वाचक असल्याने त्यांना एक विशेष सौंदर्यदृष्टी होती. त्यामुळे चांगले आणि सुमार लेखन यांची उत्तम पारख करता येत असे. माग्रसचा सितारा जेव्हा अगदी बुलंदीला पोहचला होता, तेव्हा त्यांनी माग्रसतर्फे अन्य काही कवींचे कवितासंग्रहदेखील प्रकाशित केले. लिटल् मॅगझिन्स्च्या भरभराटीच्या काळात त्यांनी ‘अक्ष’ नावाचे एक अनियतकालिक (पुढे त्रैमासिक) देखील चालवले. आणखीही काही उपक्रम त्यांनी राबवले. यात ‘मन मोकळे आभाळ’ आणि उत्तम, दर्जेदार विदेशी चित्रपटांचा आस्वाद यांचा समावेश होता. देव रसिक होते. बोलघेवडे होते. देश-विदेशात त्यांचे बरेच चहेते होते.
याचा अर्थ देवांना कोणीच हितशत्रू नव्हते असा होत नाही. माग्रसची लोकप्रियता डोळ्यात खुपणारेही अनेक लोक होते. स्वनामधन्य, बढाईखोर लेखकांना देव जास्त भाव देत नसत. अशा लोकांचा यामुळे अहंकार दुखावला जाई. त्यामुळे माग्रस सोडून जाणारेही काही लोक होते. माग्रस ही काही एखादी संस्था नव्हती. त्यामुळे देवच तिचे सर्वेसर्वा होते. काही लोक याला देवांचा एकखांबी तंबू म्हणायचे. आपल्या पुस्तकावर समीक्षण न झाल्यामुळे नाराज झालेले बरेच लेखक होते. जातीचे लेबल लावून देखील माग्रसकडे बघणारे काही ‘थोर लोक’ मला माहीत आहेत. दरमहा एखाद्या सदस्याच्या घरी होणाऱ्या मासिक बैठकीला ‘माग्रसचे हळदीकुंकू’ असे हिणवणारे लोकही मी पाहिले आहेत. पण सुधीर देवांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आपले काम सुरूच ठेवले.
मात्र साधारणपणे सन २००० नंतर माग्रसचा प्रभाव कमी होत गेला. कारण दरम्यानच्या काळात विविध वेतन आयोगांमुळे मालामाल झालेल्या मध्यमवर्गीय लोकांजवळ आता एकरकमी पुस्तक खरेदीसाठी भरपूर पैसेही आले होते आणि पुस्तकांची बरीच दुकानेही निघाली होती. टीव्ही वाहिन्यांचे जाळे पसरले होते. देवांचे वयही झाले होते. तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या होत्या. तरीसुद्धा त्यांनी नेटाने, थोडे थोडे का होईना पण माग्रसचे काम सुरूच ठेवले. अगदी दोन वर्षांपूर्वी २४ ऑगस्ट २०१८ रोजी माग्रसचा पन्नासावा वर्धापनदिन झाला, तोवर ही चळवळ खऱ्या अर्थाने अस्तित्वात होती.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘माग्रस’ : एका वाचक चळवळीची पन्नास वर्षे
..................................................................................................................................................................
खेदाची गोष्ट म्हणजे यानंतर एक-दीड महिन्यांनीच अपर्णाकाकू देव यांचे अनपेक्षित निधन झाले. तेव्हा मात्र देव नाही म्हटले तरी मनाने खचलेच. त्यांचा एकुलता एक मुलगा हैदराबादला नोकरीनिमित्त राहतो. त्याच्याकडे ते जाऊन येऊन असत. अशीच एक भेट द्यायला ते काही दिवसांपूर्वी तिकडे गेले आणि अचानक आजारी पडून तिथेच काल त्यांचे निधन झाले. सुधीर देव-पुरस्कृत माग्रस या साहित्यिक चळवळीला अशा रीतीने काल २३ ऑक्टोबरला पूर्णविराम मिळाला. माग्रसला पुनर्जीवन मिळेल का, आता कोण तिची सूत्रे हाती घेईल, तिची उपयुक्तता संपली आहे का, हे सगळे प्रश्न गैरलागू आहेत. तिची धुरा सांभाळायला आता सुधीर देव (आणि त्यांच्यासोबत अपर्णाकाकू देखील) आपल्यामध्ये नाहीत, हे वास्तव आहे.
माझ्या घरी पूर्वीपासूनच लेखन-वाचनाची परंपरा होती. सुधीर देव आमच्या जीवनात आल्यामुळे आमच्या वाचनाला आणखी एक आयाम मिळाला. माग्रसमुळे अनेक नवीन मित्रांशी आमचे संबंध जोडले गेले. माझे आई-वडील गेले, त्यानंतरही या ज्येष्ठ मंडळीनी माझ्याशी संपर्क कायम ठेवला. देवांशी तर माझा व्हॉट्सअॅपवर जवळपास रोजच संवाद सुरू असायचा. पण आता माझ्या आधीच्या पिढीशी असलेला आणखी एक दुवा काल गळून पडला, याचे मनस्वी दुःख आहे.
पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सुधीर देव नामक कल्पक डोक्याच्या कवीला माझे अभिवादन.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment