कुठल्याही उन्मादी प्रवाहापासून स्वत:ला वाचवणं हेच आज पत्रकारितेसमोरचं मोठं काम होऊन बसलं आहे!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • सुलेखन बाबू उडुपी
  • Sat , 24 October 2020
  • संपादकीय अक्षरनामा फेक न्यूज. Fake news पोस्ट ट्रुथ Post-truth वर्तमानपत्रे Newspaper वृत्तवाहिन्या News Channel पोर्टल्स Portal

आज ‘अक्षरनामा’ सुरू होऊन चार वर्षं पूर्ण झाली! २४ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘ ‘अक्षरनामा’चा रे टाहो…’ या पहिल्या संपादकियात आम्ही लिहिलं होतं -

“आपण कडेलोटाच्या टकमक टोकावर उभे आहोत असं नाही किंवा परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे असंही नाही. या सगळ्याकडे कसं पाहावं, त्यातून काय घ्यावं, काय घेऊ नये, हे अधिकारवाणीने सांगणारे लोक आपल्यामध्ये नाहीत, असंही नाही. फक्त झालंय असं की, मागून पुढे आलेल्या लोकांनी सगळे बुरुज किल्ले काबीज केले आहेत. कारण इतिहासाचा, अस्मितांचा, स्व-उत्कर्षाचा समंध अनेकांना लपेटतो आहे. या समंधाच्या बाधेतून आपल्यासह इतरांनाही वाचवता आलं तर पाहावं, निदान त्याबाबत सजग करावं, या दृष्टिकोनातून ‘अक्षरनामा’ची रुजुवात केली आहे.

आश्वासनं, अभिवचनं, महत्त्वाकांक्षा, ध्येय, उद्दिष्टं यांच्या अर्थांमध्ये न अडकताही असं म्हणता येईल की, एक तारतम्यपूर्ण दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न इतकाच आमचा मानस आहे. आम्हाला कुणाच्या पुढे जायचं नाही की, कुणाशी स्पर्धाही करायची नाही. कशाचा न्यायनिवाडा करायचा नाही की, कुणाची उपेक्षा करायची नाही. आम्हीच तेवढे नि:पक्षपाती असा आमचा दावा नाही आणि आम्हीच तेवढे अग्रेसर अशी अहमअहमिकाही नाही. ‘वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षाही तारतम्यपूर्ण विवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते,’ असं व्हॉल्टेअर म्हणतो. ती आपल्यापरीनं निभावण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

गेल्या चार वर्षांतली ‘अक्षरनामा’ची वाटचाल याच प्रमाणे राहिली आहे. ‘एक तारतम्यपूर्ण दृष्टिकोन’ देण्याच्या प्रयत्नापासून आम्ही कधीही परावृत्त झालो नाही, न्यायाधीशांच्या भूमिकेत शिरून आम्ही कधीही कुठल्याही घटनेचा न्यायनिवाडा करायचाही प्रयत्न केला नाही आणि रॅटरेसमध्ये धावण्याचीही महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. आम्ही समजत होतो, त्यापेक्षा बरंच जास्त महत्त्व ‘टिकून’ राहण्याला असतं, असं ‘अक्षरनामा’ सुरू झाल्यानंतर तसं लवकरच आमच्या लक्षात आलं. त्यामुळे सतत चौकार, षटकार मारण्याच्या किंवा इतरांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांपासून स्वत:ला वाचवत राहण्याचा आम्ही आमच्या परीनं आजवर आटोकाट प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राहू.

‘अक्षरनामा’ने सुरुवातीपासूनच ‘बातम्यां’ऐवजी ‘लेख’ (फीचर्स) हा पर्याय निवडला असल्यामुळे अधिकची जबाबदारी, काटेकोरपणाचं भान आणि सामग्ऱ्याने विचार, ही त्रिसूत्री आम्हाला सुरुवातीपासूनच अंगी बाणवावी लागली. हे आव्हान आम्ही आमच्या लेखकांच्या बळावर आजवर चांगल्या प्रकारे पेलण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राहू.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वर्तमानपत्रांमध्ये बातम्यांची रॅटरेस कधीच सुरू झालेली आहे, टीव्ही वृत्तवाहिन्या आणि ऑनलाइन पोर्टल्स यांच्यामध्ये तर ही रॅटेरस जीवघेण्या थराला गेली आहे. त्यामुळे साहजिकच ‘कोण कोणास काय म्हणाले?’ आणि ‘कोणा सेलिब्रेटीने काय केले?’ टाईप पत्रकारितेचा अतिरेक वाढतच चालला आहे. या अतिरेकापासून आम्ही स्वत:ला वाचवण्यात यशस्वी झालेलो आहोत. सविस्तर आणि गांभीर्यानं लिहिलेले लेख हे आमचं सुरुवातीपासून बलस्थान राहिलं आहे. या बलस्थानामुळेच गेल्या चार वर्षांत ‘अक्षरनामा’ची एक ओळख निर्माण झाली आहे. ती ओळख या पुढच्या काळातही अधिकाधिक दृढ आणि विस्तारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

सविस्तर आणि गांभीर्यानं लिहिलेले लेख मिळवणं किंवा लेखकांकडून लिहून घेणं, ही अर्थातच वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागतो. अनाहूत आलेल्या लेखांवर काम करण्यात तर सर्वाधिक वेळ जातो. पण तरीही हे किचकट काम आम्ही शक्य तेवढ्या काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं करत आलो आहोत, यापुढेही करत राहू.

‘अक्षरनामा’चं हे वैशिष्ट्य आमच्या नियमित वाचकांना नक्कीच जाणवत असेलच. ते कसोशीनं पाळण्याचा आमचा सदोदित प्रयत्न असतो. त्यामुळे आम्ही अनेकदा अडचणीतही येतो. कधी चार-पाच, तर कधी एखाद-दुसरा लेखच ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होतो, तो त्यामुळेच. लेख एका ठरावीक वेळेतच प्रकाशित करण्याचाही आमचा प्रयत्न असतो. पण त्यालाही वरील कारणांमुळे अनेकदा उशीर होतो.

पण तरीही आम्ही आजवर आमच्या उद्दिष्टांशी, धोरणांशी आणि नीतीमूल्यांशी तडजोड केलेली नाही, हे आनंदानं सांगावंसं वाटतं.

अनेक कारणं आहेत, पण अलीकडच्या काळात पत्रकारिता जास्तीत जास्त बेजबाबदार होत चालली आहे. वावदूकपणा, सवंगपणा आणि बेजबाबदारपणा ही जणू काही पत्रकारितेची त्रिसूत्रीच होऊ पाहत आहे. त्यात सध्याचा सोशल मीडियाच्या वर्चस्वाचा काळ. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बळावर सत्यापेक्षा असत्य, क्रियापेक्षा प्रतिक्रिया, वास्तवापेक्षा अवास्तव आणि घटनांपेक्षा नाट्यमयतेला अधिक महत्त्व आलं आहे. आपापले अजेंडे रेटण्यासाठी राजकीय पक्षांपासून व्यक्ती\संस्थांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाचा वापरही करत आहेत. त्यामुळे आपलं मानसिक-शारिरीक स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत चाललं आहे.

अशा काळात पत्रकारिता करणं, त्यातही जबाबदारीनं आणि गांभीर्यानं करणं हे खूपच मोठं आव्हान झालेलं आहे. पण आजच्या पत्रकारितेला या आव्हानांचा सामना केल्याशिवाय गत्यंतरही राहिलेलं नाही. फेक न्यूज, द्वेष, असत्य, सोशल मीडियाला अतोनात महत्त्व देणं, कशावरही ट्विट करणं किंवा फेबुपोस्ट लिहिणं हे अनेकांना थोरपणाचं लक्षण वाटतं… अशा कुठल्याही सवंग गोष्टींमागे न जाता गंभीरपणे काम करण्याचा प्रयत्न करणं, हे सोपं राहिलेलं नाही. किंबहुना अशा कुठल्याही उन्मादी प्रवाहापासून स्वत:ला वाचवणं हेच मोठं काम होऊन बसलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत आपण पाहतोच आहोत की, प्रसारमाध्यमांना साम-दाम-दंड-भेद अशा सर्व प्रकारच्या सरकारी बळाचा सामना करावा लागत आहे. ज्यांनी सरकारपुढे लोटांगण घातलं आहे, त्यांच्या पत्रकारितेचे कसे तीन-तेरा वाजले आहेत, हे आपल्यापैकी बहुतेक जण जाणून असणार. तसं पाहिलं तर कुठल्याही सरकारला प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य खुपत असतंच. लोकशाही देशांत सरकारला प्रसारमाध्यमांना थेट वेसण घालता येत नाही. त्यामुळे वेसण घालण्याचे नवनवे प्रकार शोधले जातात. आधीच स्पर्धा, अहमहमिका यांमुळे ‘न्यूज’ ही ‘सेवा’ (सर्व्हिस) न राहता ‘कमोडिटी’ झाली होती. अलीकडच्या काळात ती ‘सेलेबल कमोडिटी’ झाली आहे.

अशा काळात चांगली पत्रकारिता, चांगले पत्रकार आणि चांगली प्रसारमाध्यमं हकनाक बदनाम होतात. कारण ती अल्पसंख्य असतात. काही वेळा त्यांना जाणीवपूर्वकही बदनाम केलं जातं. निखिल वागळे यांनी ‘वटवाघळे’ किंवा रवीशकुमारला ‘रब्बीशकुमार’ म्हणणारे निपजतात, ते त्यातूनच. पण तरीही चांगले पत्रकार आपलं काम चांगल्या पद्धतीनं करत राहतातच. काही वाईट पत्रकारही पत्रकारितेला बदनाम करत आहेत, पण काही चांगले पत्रकार आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करत आहेतच की!

त्यात ‘अक्षरनामा’चाही खारीचा वाटा आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो.

पण ‘अक्षरनामा’सारख्या छोट्या पोर्टल्सचं शारिरीक आणि आर्थिक बळ कमी. त्यामुळे एकाच वेळी अनेक आघाड्यांचा सामना करताना बऱ्याचदा दमछाक होते. कधी कधी तातडीच्या विषयांची वेळीच दखल घेता येत नाही. काही विषय अतिशय निकडीचे असतात, पण त्यांच्यावर चांगले लेख वेळेत मिळवणं\लिहिणं शक्य होत नाही. काही कळीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणावी, असा प्रयत्न असतो, पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नाही. (आणि काही चांगल्या प्रयत्नांचीही कधी कधी म्हणावी तितकी दखलही घेतली जात नाही!) अशा प्रसंगांच्या वेळी खंत वाटते, कधी कधी पश्चात्तापही होतो. पण तुमची संसाधनं मर्यादित असतात, तेव्हा या प्रसंगांनाही तुम्हाला धीरानं सामोरं जावंच लागतं. अशा वेळी आम्हीही तेच करतो.

तरीही एक गोष्ट आम्हाला सांगायला आनंद होतो की, गेल्या चार वर्षांत ‘अक्षरनामा’ने विविध विषयांवरील साडेचार हजारांहून अधिक लेख प्रकाशित केले आहेत. निखिल वागळे, जयदेव डोळे, सुनील तांबे, प्रवीण बर्दापूरकर, अरुण खोरे, मुकेश माचकर या मान्यवर पत्रकारांपासून अमेय तिरोडकर, राजा कांदळकर, कामिल पारखे, देवेंद्र शिरुरकर, कलीम अजीम, पार्थ एम. एन., अलका धुपकर, टेकचंद सोनवणे, कीर्तिकुमार शिंदे, महेशकुमार मुंजाळे, अभिषेक भोसले, शर्मिष्ठा भोसले या तरुण पत्रकारांपर्यंत आणि संजय पवार, अवधूत परळकर, कुंदा प्रमिला नीळकंठ, परिमल माया सुधाकर, वासंती दामले, अभय टिळक, अतुल देउळगावकर, हर्षवर्धन निमखेडकर, व्ही. एल. एरंडे, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, कॉ. भीमराव बनसोड, अविनाश कोल्हे, प्रकाश बुरटे, केशव परांजपे, अलका गाडगीळ, या मान्यवर लेखकांपासून सरफराज अहमद, पंकज घाटे किशोर रक्ताटे, श्रीनिवास देशपांडे, सतीश देशपांडे, चिंतामणी भिडे, आदित्य कोरडे, नीतीन वैद्य, दत्ताहारी होनराव, मिलिंद कांबळे, हितेश पोतदार, सागर वाघमारे, भक्ती चपळगावकर, नितीन जरंडीकर, विश्वांभर धर्मा गायकवाड, किरण लिमये, संकल्प गुर्जर या तरुण लेखकांपर्यंत अनेकांनी आजवर ‘अक्षरनामा’साठी आनंदानं लेखन केलं आहे. (सर्वांचीच इथं जागेअभावी नावं घेणं शक्य नाही, ज्यांची नाहीत त्यांनीही मोलाचं लेखन केलं आहे.) चित्रपट\मालिका\वेबसीरिज यांविषयी अमोल उदगीरकर, मीना कर्णिक, सायली राजाध्यक्ष, अंजली अंबेकर, अक्षय शेलार, अनुज घाणेकर, सुरेंद्रनाथ बाबर, धनंजय श्रीराम सानप, माधवी वागेश्वरी, आफताब परभनवी यांनी वेळोवेळी लिहिलं आहे.

याशिवाय विनय हर्डीकर, कुमार केतकर, रामचंद्र गुहा, शेखर गुप्ता, रवीशकुमार, विनोद शिरसाठ, माधव दातार, अशा अनेक मान्यवर अभ्यासकांचं लेखन कधी स्वतंत्रपणे, कधी अनुवादित स्वरूपात तर कधी पुनर्मुद्रित स्वरूपात आम्ही प्रकाशित केलं आहे.

इंग्रजी-हिंदीमधून चांगले लेख, मुलाखती तर आम्ही सातत्याने अनुवादित स्वरूपात आमच्या वाचकांसाठी सादर करत आलो आहोत. त्यासाठी आमच्या अनुवादकांचं मोठं सहकार्य लाभत आलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा सिलसिला यापुढेही चालू राहिलच.

त्यासाठी वाचकांचं पाठबळ गरजेचं आहे. सध्याच्या फेक न्यूज, पोस्ट ट्रुथच्या काळात चांगली पत्रकारिता ही थोडी खर्चिक झालेली आहे. त्यामुळे अशा पत्रकारितेच्या पाठीशी वाचकांनी उभं राहण्याची नितांत निकडीची गरज आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वर्तमानपत्रांपासून ‘द प्रिंट’, ‘वायर’, ‘स्क्रोल’, ‘अल्ट न्यूज’ या राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी पोर्टल्सपर्यंत सर्वजणच वाचकांना भरीव पाठबळाविषयी आवाहनं करतात. मराठीसारख्या प्रादेशिक भाषेतील पोर्टल्ससाठीही अशाच पद्धतीच्या वाचकांच्या सहकार्याची गरज आहे. त्याविषयी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखांमधून आम्ही सातत्यानं आवाहन करतो आहोतच.

अर्थात हेही तितकंच खरं की, जोपर्यंत तुम्ही स्वत:ला पुरेसं पणाला लावत नाही, तोवर लोकही तुमच्यामागे मोठ्या प्रमाणात उभे राहत नाहीत. स्वत:ला अधिकाधिक पणाला लावत चांगली पत्रकारिता करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आलो आहोत, करत आहोत आणि यापुढेही करत राहू, एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो.

आधी नोटबंदी, आता करोना... आपल्या सर्वांसमोरची आर्थिक आव्हानं दिवसेंदिवस जटील होत चालली आहेत. पण जग पैशापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात आशेवर, भरवशावर चालतं. त्यामुळे यापुढेही आम्ही अशीच, किंबहुना यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे पत्रकारिता करत राहू, हा भरवसा आमच्या वाचकांना देऊ इच्छितो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 28 October 2020

अक्षरनामा चमू व संपादकांचे आभार. लेखकांकडून लेख लिहवून घेणं व ते तपासून प्रकाशित करणं हे डोक्याचा भयंकर भुगा पाडणारं काम आहे. ते तुम्ही अविरतपणे करीत आला आहात याचं कौतुक आहे. त्याबद्दल तुम्हां साऱ्यांचं अभिनंदन.

तसंच मला व्यक्त होण्यासाठी फुकट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Sachin Shinde

Tue , 27 October 2020

Pudhil Vatchalis Khup Khup Shubhecha.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......