हा मजकूर प्रकाशित होईल, तेव्हा भाजपचे एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (नाथाभाऊ) यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल. या पक्षांतरानं गेली जवळजवळ पावणेतीन वर्षं खडसे यांच्या मनात खदखदणार्या असंतोषाच्या भारुडाची सांगता झाली आहे. खरं तर, या सांगतेला तसा उशीरच झाला आहे. मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर अनेकदा गैरव्यवहाराच्या आरोपातून तथाकथित क्लिन चीट मिळाल्यावरही, पक्षश्रेष्ठी त्या क्लिन चीटची दखल घेत नाहीत, हे खडसे यांच्या याआधीच लक्षात यायला हवं होतं.
खडसे यांचं भाजपसाठीचं योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे. ‘शेठजी–भटजींचा पक्ष’ ही प्रतिमा बदलण्यात गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि अन्य नेत्यांनी जी काही कल्पकता दाखवली, जे काही योगदान दिलं, त्यात खडसे यांचाही वाटा आहे. ज्या उत्तर महाराष्ट्रात आमदार किंवा खासदार तर सोडा; परंतु ग्रामपंचायतीचाही एखादा सदस्य निवडून येणं भाजपसाठी अशक्य होतं, तेव्हा १९८०च्या दशकात खडसे राजकारणात आले आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून पक्षातील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
पुढे ते ग्रामपंचायतीचे सरपंच, अनेक खात्यांचे मंत्री, विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार अशा भूमिकांत महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आले आहेत. १९९५ ते ९९ आणि २०१४ ते २०१६ या काळात मंत्री असताना अर्थ, सिंचन, उच्चशिक्षण, महसूल, शेती, राज्य उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. १९९९नंतर जेव्हा सेना-भाजप युतीचं सरकार पदच्युत झालं; तेव्हा गोपीनाथ मुंडे प्रदीर्घ काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मुंडे यांचं दिल्लीच्या राजकारणात ‘प्रमोशन’ झाल्यावर विधानसभेतील विरोधी नेते पद स्वाभाविकपणे खडसे यांच्याकडे चालत आलं आणि ते मिळणं हा त्यांचा हक्कच होता.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
१९८० ते २०१४पर्यंत उत्तर महाराष्ट्रात खडसे यांनी भाजपची तळागळापासून उभारणी केली आहे. जळगावाच्या राजकारणात सुरेशदादा जैनसारख्या मातब्बराला त्यांनी नेस्तनाबूत केलं, तरी २०१४ साली भाजप-सेनेचं सरकार सत्तेत आलं; तेव्हा मुख्यमंत्रीपदानं खडसे यांना अपेक्षित हुलकावणी दिली. खरं तर गोपीनाथ मुंडे यांचं आकस्मिक अपघाती निधन झालं नसतं तर आज जे काही चित्र महाराष्ट्र भाजपच्या राजकारणात दिसतं आहे, ते दिसलंच नसतं. कारण भाजपला जर जास्त जागा मिळाल्या असत्या तर मुंडे मुख्यमंत्री होतील, हे पुरेसं स्पष्ट होतं.
त्यासंदर्भात एक सांगायला हवं. त्या काळात मी दिल्लीतच होतो. राजकीय संपादक म्हणून काम करत होतो आणि दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेत होतो. तेव्हाही खडसे यांचं नाव पक्षश्रेष्ठींच्या मनात संभाव्य मुख्यमंत्री म्हणून कधी नव्हतं, हे एकदा सांगून टाकायला हवं. गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्याच्यानंतर जी दोन नावं मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आली- त्यात एक होते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे होते विनोद तावडे. निवडणुकीच्या आणि नंतर झालेल्या सत्तेच्या साठमारीत विनोद तावडे मागे का पडले याची काही राजकीय कारणे असणार आणि त्या संदर्भात अनेक वावड्या उठलेल्या (का उठवलेल्या?) आहेत. मात्र, त्या संदर्भात ठोस असा पुरावा हाती नसल्यामुळे त्यावर भाष्य न करणं योग्य ठरेल.
थोडक्यात निकालाच्या आधीच मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या बाजूनं भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आणि अमित शहा याचं पारडं पूर्णपणे झुकलेलं होतं आणि फडणवीस मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून राज्याचा कारभार आखणार हे स्पष्ट झालेलं होतं.
भाजपमध्येच नाहीतर अन्य सर्वच पक्षांत साधारणपणे ज्येष्ठ नेत्यांना सांभाळून घेण्याची कसरत प्रत्येकच मुख्यमंत्र्याला करावी लागते. राज्याचं मुख्यमंत्रीपद एकच असतं आणि इच्छुक अनेक असतात, हा राजकारणात येणारा नेहमीचाच अनुभव आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. अघोषित असं दुसऱ्या क्रमांकाचं स्थानही त्यांना देण्यात आलं. मात्र, ते स्थान सांभाळण्याचं राजकीय कौशल्य नाथाभाऊंना दाखवता नाही आलं, हे लक्षात घेतलं पाहिजे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मुख्यमंत्री हे पद सन्मानाचं असतं, घटनात्मक असतं आणि त्या पदावर बसणारी व्यक्ती कुणीही असो तिचा तो सन्मान राखला जाणं अतिशय आवश्यक असतं; परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा नंतरही जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा अनेकदा एकेरी उल्लेख करून खडसे यांनी भाजप आणि प्रशासनातल्याही अनेक वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतली होती.
दुसरा एक भाग असा आहे की, नाराजी किंवा खदखद किंवा असंतोष लपवून राजकीय खेळ करत जाणं हे मुरब्बी राजकारण्याचं लक्षण असतं. हे गुण खडसेंमध्ये नाहीत, हे ते महसूलमंत्री झाल्यानंतर अनेकदा सिद्ध झालं. ‘पांडुरंगाची इच्छा होती की मी मुख्यमंत्री व्हावं’, ‘महाराष्ट्राची इच्छा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, अशी होती’ अशी वक्तव्ये त्यांनी अनेकदा केली. राजकारण कधीच एका सरळ रेषेत जात नसतं. तिथे शह/काटशह, डाव/प्रतिडाव असतात. कधी उघडपणे तर कधी शांतपणे प्रतिस्पर्ध्याला चिरडून टाकण्याची ती एक प्रदीर्घ आणि संयमी प्रक्रिया असते. एखादा तेल लावलेल्या पैलवान सगळीकडून अलगद सुटत ईप्सित साध्य करणारा यशस्वी राजकारणी ठरतो (पक्षी : शरद पवार!).
खडसे यांनी फुलटॉस टाकले आणि फडणवीसांनी त्यावर षटकार ठोकले, असंच घडत गेलं. पुण्याच्या एमआयडीसी जमीन प्रकरणामध्ये नाथाभाऊ सापडले. दाऊदला न केलेल्या कॉल प्रकरणात ते सापडले. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकले.
राजकारण आणि सत्तेमध्ये या गोष्टी घडतच असतात. त्या फार काही गंभीरपणे कधीच घेतल्या जात नाहीत. याचं कारण असं की, शेवटी त्या राजकीय पक्षातील नेत्याचं वजन किती आहे त्यावर हे सगळे वाद, प्रवाद, हे सगळे गैरव्यवहार अवलंबून असतात. खडसे यांना मात्र ते राजकीय वजन सिद्ध करता आलं नाही, हे कटू असलं तरी सत्य आहे. आपल्याला सत्तेतून डावललं जात आहे आणि त्यातून मुख्यमंत्रीपदासाठी डावललं गेलं, याची खदखद मनात ठेवून फडणवीस विरुद्ध पक्षातंर्गत एखाद्या मोठा गट तयार करण्यामध्ये खडसे यांना अपयश आलं. उलट सतत डावललं जातंय, अशा तक्रारी ते करत राहिले.
वस्तुस्थिती खरं तर तशी कधीच नव्हती. १९८९ ते २०१९ खरं तर असा सलग काळ ते विधानसभेचे सदस्य होते. मंत्री होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतानाच त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल अनेकदा जाहीर टिप्पणी झालेली आहे. ती जाहीर टिप्पणी करण्यात आता ते ज्या पक्षात गेलेले आहेत, त्या पक्षाचे सर्वेसर्वा, अध्यक्ष शरद पवार हेही होते. ‘विरोधी पक्ष नेते तोडपाणी करतात’, असं जाहीर प्रतिपादन शरद पवार यांनी केलं होतं आणि त्याचा कोणताही खुलासा आजवर आलेला नाही. तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांनी तर ‘विरोधी पक्षनेते दिवसा सभागृहात आरोप करतात आणि रात्री कामाच्या फायली घेऊन माझ्याकडे येतात’, असं स्पष्टच सांगून टाकलं होतं.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकणाऱ्या नरेंद्र मोदींनी संसदीय लोकशाहीचे पावित्र्य जपले आहे काय?
..................................................................................................................................................................
त्याच वेळेस खडसे हे विसरले की, त्यांच्या सुनेला लोकसभेवर संधी देण्यात आलेली आहे, त्यांच्या कन्येला जिल्हा बँकेवर संधी देण्यात आली आहे, त्यांच्या पत्नीला महानंदाचं संचालकपद बहाल करण्यात आलेलं आहे. सत्तेची बहुसंख्यपद नाथाभाऊंच्या घरामध्ये केंद्रित होत असूनही आपल्याला सत्तेतून डावललं, या खडसे यांच्या आरोपात पक्ष कार्यकर्ते आणि लोकांना कधीच तथ्य वाटलं नाही, मग ते पक्षश्रेष्ठींना वाटण्याचा तर प्रश्न उपस्थित नव्हता. आपल्या तक्रारींची दाखल पक्षश्रेष्ठी का घेत नाही, याबद्दल आत्मपरीक्षण करण्याऐवजी खडसे यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला जातीय वळण देऊन आणखीनच नुकसान करून घेतलं.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली मात्र, त्यांच्या कन्येला ती जागा देण्यात आली. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर जर खडसे यांचा इतका एकहाती प्रभाव होता, तर ते त्यांच्या मुलीचा पराभव टाळू शकले असते, पण दुर्दैवाने तसं घडलं नाही. त्यांच्या कन्येचा पराभव करण्यात त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी मदत केली, या खडसे यांच्या या म्हणण्यात तथ्य आहे, असं खरं मानलं तरी, त्याचा अर्थ पक्षातल्या लोकांच्या त्या खेळींवर मात करण्यात त्यांना यश आलं नाही, असाही आहे.
स्वत:ला अतिशय कुशल आणि मुरब्बी राजकारणी समजणाऱ्या खडसे यांनी या संदर्भात शरद पवार यांचा आदर्श कधीच डोळ्यांसमोर ठेवलाच नाही. कोणत्याही पक्षात असलं तरी मतदार कौल कधी नाकारणार नाही इतका मजबूत मतदारसंघ बांधण्याचं कौशल्य ज्याच्यात नाही, तो नेता उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपचा गड मी मजबूत केला असा दावा करतो; तेव्हा त्याचा फोलपणा त्याच्या म्हणण्यातूनच स्पष्ट होतो, हे कधीच खडसे यांनी लक्षात घेतलं नाही.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गात विभागलेला मराठा समाज एक कसा असू शकतो?
..................................................................................................................................................................
दुसरा एक भाग असा की, त्याच उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्यासारखा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी खडसे यांच्या नाकावर टिच्चून उभा राहिला. महाजन यांचं पक्षांतंर्गत वर्चस्व मोडून काढण्यात खडसे यांना कधीच किमान यश आलंच नाही. उलट जसं जसे खडसे स्वत:च्या असंतोषाच्या गाळात फसत गेले, तसं तसं महाजन यांचं स्थान सरकार आणि पक्षामध्ये बळकट होत गेलं. खडसेंनी या सगळ्या बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष केलं. पक्षासाठी त्याग करणारे आपण एक खूप मोठे नेते आहोत, या हस्तीदंती मनोऱ्यात ते कायम मग्न राहिले. परिणामी पक्षातूनही त्यांना असणारी सहानुभूती सातत्यानं कमी होत गेली.
खडसे आता (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आहेत. (महा)राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष समजला जातो; त्यात बरंचसं तथ्यही आहे आणि नाहीही! शरद पवारांच्या मराठाबहुल राजकारणाला एकनाथ खडसे आता लेवा पाटलांचा आता पाठिंबा मिळवून देतील असं म्हटलं जातं, मला तरी फारसं त्यात तथ्य वाटत नाही. जो नेता ज्या मतदारसंघातून सहा वेळा निवडून आला, ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडून आला, त्याच पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचीच कन्या उभी असताना तिला निवडून आणू शकत नाही, असं असताना तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र तर सोडाच तो मुक्ताईनगर मतदारसंघातीलसुद्धा सर्व लेवा पाटील मतदार (महा)राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळतील असं जर गृहितक कुणी मांडत असेल तर, तो भाबडेपणाचा कळसच समजायला हवा!
दुसरा भाग असा की, खडसे यांच्यासोबत किंवा पाठोपाठ भाजपमधील आणखी काही बडे मासे (महा)राष्ट्रवादीच्या जाळ्यात गावले, तरच खडसे यांचं (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमधे वजन वाढेल अन्यथा नाही.
आणखी एक भाग असा की, अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांना छगन भुजबळ यांचा अपवाद वगळता शरद पवार यांनी फार मोठी संधी कधी दिल्याचं आजवर दिसलेलं नाही. भुजबळ यांना संधी मिळाली तरी त्यांचे पंख कापलेलेच कसे राहतील याकडे शरद पवार सातत्यानं लक्ष दिलं, हे विसरता येणार नाही. ओबीसीचं कार्ड वापरत भुजबळ यांनी पंख पसरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे काय हाल केले गेले, हे सर्वांनीच पाहिलेलं आहे. त्यामुळे (महा)राष्ट्रवादीत जाऊन खडसे यांचं भवितव्य फार काही उज्ज्वल असेल, असं सध्याच्या परिस्थितीत समजण्याचं कारण नाही. फार फार तर विधान परिषदेवर जाऊन मंत्रीपद मिळवण्याची किंवा आगामी काळात राज्यसभेवर जाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा मात्र पूर्ण होऊ शकेल असं दिसतं आहे.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
(महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून खडसे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळण्याची सुतराम शक्यता नाही, याचं कारण (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदाचे अनेक प्रबळ दावेदार सध्याच आहेत. आता त्यात नंबर एकवर अजित पवार राहतात का सुप्रिया सुळे हे भविष्यात दिसेलच. त्यामुळे (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन एकनाथ खडसे यांनी आत्मघातच केला आहे, असं म्हणावं लागेल. भाजपच्या किंवा फडणवीसांच्या विरोधात (महा)राष्ट्रवादी काँग्रेसला जे जे काही बोलता येत नाही, ते ‘आतलं’ बोलण्यासाठी एक ‘पोपट’ आता (महा)राष्ट्रवादीला गावलेला आहे. भाजप व फडणवीसांच्या विरोधात खडसे जी काही टीका करतील त्याचा फायदा उठवण्याचा (महा)राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल. खडसे यांना पक्षात प्रवेश देण्यामागे (महा)राष्ट्रवादीचा तोही एक एक राजकीय कावा असणारच आणि तो असायलाच हवा आणि त्यात गैर काहीच नाही, कारण तो राजकारणाचा स्थायीभावच असतो.
आणखी एक मुद्दा असा की, खडसे यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांना नीट सांभाळून ठेवण्यास भाजपलाही अपयश आलं, हेही मान्य करायला हवं. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनाही यासंदर्भात आत्मपरीक्षणाची भूमिका घ्यावी लागणार आहे. एव्हाना ठरल्याप्रमाणे त्यांना राज्यपालपद देऊन पुनर्वसन करता आलं असतं, पण ते भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी कधीच केलं नाही. परिणामी भाजपनेच एक क्षण असा निर्माण केला की, खडसे यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही... शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या मुशीत वावरलेला, घडलेला, संस्कारित झालेला आणखी एक स्वयंसेवक नापास झाला, असाही एकनाथ खडसे यांच्या (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा अर्थ आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 29 October 2020
नमस्कार प्रवीण बर्दापूरकर!
अतिशय उत्तम लेख आहे. खडसेंची कथा व व्यथा वाचकांपर्यंत अचूक पोहोचते आहे. मला खडसे हा माणूस शिवसैनिक वाटंत आलाय. तो रस्त्यावर उतरून भिडणारा माणूस (मलातरी दिसतो) आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्याला थोड्या वेगळ्या प्रकारे सांभाळून घ्यायला हवं होतं. त्यांच्या पाय रोवून उभं राहण्याच्या गुणांचा लाभ करून घ्यायला हवा होता. तशा अर्थाचं प्रबोधन करणारा कुणी त्यांना भेटला नसावा. असो.
गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादीत जाणार अशा वावड्या उठंत होत्या, तेव्हाची गोष्ट आठवली. 'मुंड्यांना देण्यासारखं आमच्याकडे काही नाही' असं त्यावेळी शरद पवार म्हणाले होते. तोच नियम आज खडसेंच्या बाबतीत लागू पडतो. त्यांना पवारांपासून काही मिळण्यासारखं नाही. ते पवारांना जाऊन मिळालेत ते भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठीच. कितपत यश येईल ते पाहणे रोचक ठरावे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Vividh Vachak
Tue , 27 October 2020
आपण खडसे याच्या कर्तृत्वाचे उत्तम मूल्यमापन केलेत. खडसे हे पक्षांतर करणार हा अंदाजही जुना होऊन त्याला गंज चढला आहे, अशा वेळेला त्यांनी पक्षांतर केले. तेव्हा त्यांच्या या कृत्यामुळे होऊ शकणाऱ्या हानीच विचार करायला आणि त्यानुसार पावले उचलायला भाजपाकडे भरपूर वेळ होता. खडसे ह्यांच्या प्रभावापेक्षा त्यांचे उपद्रवमूल्य जास्त होऊ लागले होते. बरे, पक्षात राहूनही फडणवीसांवर तोफ डागण्याचे खडसेंनी थांबवले नाही तेव्हा बाहेर पडून यापेक्षा आणखी वाईट काय होणार आहे? असे भाजपाला वाटले असल्यास नवल नाही. जी शक्ती खडसे यांना गप्प ठेवण्यात जाईल तीच शक्ती खडसेंबरोबर जाऊ इच्छिणाऱ्या बंडखोरांना (असे बंडखोर असतील तर) काबूत ठेवण्यात लावली तर त्याचा मोबदला जास्त मिळेल असे वाटते.
Suhas Bhanage
Sat , 24 October 2020
भाजपला जर जास्त जागा मिळाल्या असत्या तर मुंडे मुख्यमंत्री होतील, हे पुरेसं स्पष्ट होतं. हे वाक्य लेखकाचे बहुतेक मुंडे वरील प्रेमा पोटी लिहिले असावे असे वाटते.मोदी ह्याची राजकीय शैली लेखकाला ही पुर्ण परीचित आहे , मुंडे ना मोदींनी मुख्यमंत्रीपद दिले नसते असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे वरिल विधान खुपचं धाडसाचे आहे असे वाटते. व्वा क्या बात है असे हे वाक्य, (राजकारण कधीच एका सरळ रेषेत जात नसतं. तिथे शह/काटशह, डाव/प्रतिडाव असतात. कधी उघडपणे तर कधी शांतपणे प्रतिस्पर्ध्याला चिरडून टाकण्याची ती एक प्रदीर्घ आणि संयमी प्रक्रिया असते. ) बाकी लेख उत्तमच.