करोनाने केलेल्या दुर्दशेपेक्षा राज्यकर्त्यांनी केलेली दुर्दशा अधिक भयावह आहे!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
राजा शिरगुप्पे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 21 October 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना करोना व्हायरस महामारी फ्लू चीन अमेरिका भारत

साधारण गेल्या दोन हजार वर्षांतील रोगराईंचा व त्यातून निर्माण होणाऱ्या साथींचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते. या दोन्ही सहस्त्रकांत प्रत्येक शतकात एखादी तरी महामारी येऊन गेलेली आहे. या महामारीने अक्षरश: लाखो बळी घेतलेले आहेत. आज अतिशय क्षुल्लक वाटणारा आजारदेखील त्याच्या प्रथम आगमनाच्या वेळी किती भयावह होता, याचे दर्शन घडते. उदा. गेल्या शतकात आलेली ‘इन्फ्लुएन्झा’ची साथ आज ‘फ्ल्यू’ या नावाने ओळखली जाते. ज्याच्याबद्दल आज कुणालाही कसलीच भीती वाटत नाही, इतका तो सामान्य आजार झालेला आहे. पण या साथीच्या प्रथम आगमनाच्या वेळी जगभरात ४० लाखांहून अधिक माणसे मृत्यूमुखी पडली होती, हे आज कुणाला पटणार नाही.

पण या महामारीमुळेच आरोग्यविज्ञानातही खूप प्रगती झाली, वेगवेगळी संशोधने झाली आणि अनेक दुर्धर रोगांवर मानवी बुद्धिमत्तेने यशस्वी मातही केली.

या शतकातील अशाच एका महामारीला आपण नुकतेच सामोरे गेलो आहोत, जिचा जोर अजूनही ओसरलेला नाही. ‘कोरोना’ या नावाने ही महामारी जगभर विख्यात झाली आहे. अनेक लोक या करोनाची बाधा झाल्यामुळे किंवा काही वेळा तर त्याच्या धास्तीनेच इहलोकाचा निरोप घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात अगदी युद्धपातळीवर करोना विषाणूवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र अजून रामबाण लस सापडली नसली तरी या आजाराला अटकाव करण्याचे अनेक उपाय बऱ्यापैकी यशस्वीपणे राबवले जात आहेत.

संपूर्ण जग मात्र या साथीने हवालदिल झाल्यासारखे आणि मरणासन्न अवस्थेत गेल्यासारखे झाले आहे. पण आधीच्या काळात होऊन गेलेल्या महामारींशी तुलना करता ही महामारी आरोग्यविज्ञानाच्या आजच्या अत्यंत प्रगत काळातही खरोखरच एवढी दुर्धर आहे का, हा एक संशोधनाचा आणि विचाराचा भाग आहे.

मागील काळापेक्षा आजचे सामाजिक वास्तव खूप वेगळे आहे. त्यामध्ये अर्थशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत अनेक गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्याबरहुकूम आपापले स्वार्थ सांभाळण्याचे विविध पक्षांकडून व गटांकडून प्रयत्न होत आहेत. त्यामध्ये या साथीचा पद्धतशीर राजकीय उपयोग केला जातो आहे, हे ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनाही स्पष्टपणे दिसते आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

आज जग थेटपणे दोन अर्थशास्त्रीय व राजकीय तत्त्वज्ञानात विभागले गेले आहे - भांडवलशाही व समाजवादी.

या दोन्ही व्यवस्थांमध्ये लोकशाही, एकाधिकारशाही आणि हुकूमशाही अंतर्भूत आहेत, हे विशेष. या दोन्ही व्यवस्थांत येनकेनप्रकारे स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा आणि त्यासाठी दुसऱ्या व्यवस्थेला बदनाम व पराभूत करण्यात व्यग्र असतात, हेही खरे. के असे व्यग्र असणे म्हणजेच राजकारण अशीच आता विद्वानांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांची भावना झाली आहे. या दोन्ही व्यवस्थांच्या मागे असलेला विचार हा नंतर केवळ नाममात्र राहतो आणि सत्ताकारण ही एकमेव गोष्ट केंद्रस्थानी होते. ज्याचा बरा वाईट परिणाम हा प्रजेला म्हणजेच सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो.

या दोन्ही राज्यव्यवस्थांतील संघर्ष आज टोकाला पोचले आहेत. त्यातूनच आजची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्था कधी विधायक तर कधी भ्रामक मार्ग काढत असतात. मागील वर्षाच्या अखेरीपासून भांडवली व्यवस्थेमध्ये एक मोठीच आर्थिक मंदी आली आहे आणि त्यातून उद्योगांना घरघर लागली आहे. या उद्योगांवर आधारलेली सत्ताव्यवस्था त्यामुळे हबकून गेली आहे आणि सर्वसामान्य प्रजेला चुचकारण्यासाठी या परिस्थितीला आपली धोरणे नाहीत, तर नैसर्गिक कारणेच कशी जास्त कारणीभूत आहेत, हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.

या त्यांच्या हेतूला करोनाची ही महामारी सहाय्यभूत ठरते आहे. करोना एका भयावह स्वरूपात जगासमोर मांडला जातो आहे. सगळ्या सामाजिक दुर्दशेचे कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे, असे ठसवण्याचा सत्ताधाऱ्यांचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे, पण या करोनाचे नीटस अभ्यासू निरीक्षण केले तर अनेक गोष्टी समोर येतात.

पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक मंदीची सुरुवात आणि त्यानंतर करोनाचे येणे हा केवळ योगायोग नाही. आर्थिक मंदीला शोभेसे आणि सर्वसामान्यांना सहज पटेल असे कारण हवे होते. त्यामुळे सुरुवातीलाच करोनाची निष्पत्ती ही साम्यवादी राष्ट्रांकडून झाली आहे, अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात आले. चीन हा अमेरिकन भांडवलशाहीला खुपणारा सगळ्यात मोठा साम्यवादी शत्रू. सामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या दुर्दशेला ही लाल रंगाची व्यवस्था कशी कारणीभूत आहे, हे ठसवण्यासाठी चीनचा बागुलबुवा उभा करणे सोयीचे ठरले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

दुसरी गोष्ट म्हणजे स्वत:ला प्रगत म्हणवणाऱ्या देशांमध्ये या साथीचा मोठाच कहर आहे. त्या उलट मागास किंवा विकसनशील अवस्थेत असलेल्या देशांमध्ये या साथीचा जोर सापेक्षत: कमी आहे, हेही एक नैसर्गिक सत्य.

त्याचे महत्त्वाचे कारण हेच की, या प्रगत देशांमध्ये रोगावर मात करणारी संशोधने जोराची झाली. अनेक दुर्धर रोगांवर विजय मिळवला गेला. पण या रोगांच्या आधाराने जगणाऱ्या औषध कंपन्यांनी यातून आणखी एक गोष्ट साध्य करून घेतली आहे, की माणसाकडे निसर्गाने जी रोगप्रतिकारक शक्ती शाबूत ठेवली होती, तिचेच समूळ उच्चाटन करायचे. म्हणजे कुठल्याही साध्या रोगालादेखील प्रतिकार करण्यासाठी केवळ औषध कंपन्यांनी निर्माण केलेल्या औषधांवरच अवलंबून राहायचे, अशी एक पराधीन अवस्था निर्माण केली गेली.

सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये आपल्याला हे प्रामुख्याने दिसते. म्हणजे औषध कंपन्यांचे धोरण माणसे आजारी पडत राहावीत आणि आपल्या कंपन्या सशक्त व्हाव्यात हेच आहे. त्यामुळे अतिप्रगत राष्ट्रांतील रोगप्रतिकारक नैसर्गिक शक्ती गमावलेली प्रजा ही एरव्ही जो आजार सामान्य वाटला असता, त्या करोनाची बळी ठरली, पण मागास किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये अजूनही निसर्गाच्या आधाराने जगणारी किंवा तथाकथित अतिप्रगतीचा स्पर्श न झालेली जनता मात्र या साथीत बऱ्याचशा क्षमतेने टिकून राहिली हेच दिसते.

पण प्रगत राष्ट्रे ही माध्यमांद्वारे सगळ्या जगावर आपलेच अधिराज्य असल्यासारखे भासवत असल्यामुळे संपूर्ण जगच करोनाला बळी पडते आहे आणि याची पायाभरणी स्वत:ला साम्यवादी म्हणवणाऱ्या चीनी एकाधिकारशाहीने केली आहे, असाच जगभर समज पसरवला.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मध्यमवर्गीयांनो, या वर्षीच्या नोबेल(शांतता)चा अर्थ लक्षात घ्या...

..................................................................................................................................................................

या वर्षाच्या सुरुवातीला करोनाने हाहा:कार माजवल्याचे भांडवली माध्यम व्यवस्थांनी प्रचंड गदारोळ करत सांगितले. त्यामुळे आधीच इतर रोगांनी जर्जर असलेली आणि मरणाची वाट पाहत असलेली जनता… काही तर केवळ रोगाच्या धास्तीने मृत झाली. आता वर्षअखेरीस या साथीचा वेग कमी होतो आहे, असे पुन्हा एकदा माध्यमांद्वारे दिसते आहे.

खरे तर मुळातच इतर रोगांमुळे प्रतिकारशक्ती क्षीण झालेले भयग्रस्त लोक मोठ्या संख्येने या महामारीला बळी पडले आहेत, शिवाय आपल्या एकूण अपयशाला कारणीभूत ही करोनाची साथच आहे, हे सर्व राज्यकर्ते सामान्य जनांच्या गळी उतरवू शकले आहेत.

राज्यकर्त्यांनी तर या निमित्ताने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आपले राजकीय अपयश तर लपवलेच, पण जागतिक पातळीवर कम्युनिस्टांना पर्यायाने साम्यवादी तत्त्वज्ञानाला बदनाम केले आहे, तर भारतीय पातळीवर मुस्लीमधर्मीयांना आपल्या दुर्दशेचे कारण ठरवले आहे. भारताने धर्मनिरपेक्ष अशी लोकशाही व्यवस्था निवडली आहे, पण भारतीय जनतेच्या मनात मात्र ‘हे हिंदू राष्ट्र आहे आणि मुस्लीम हे आपले शत्रू आहेत’ हे अलगदपणे भारतीय राज्यघटनेला हात न लावता लोकांच्या गळी उतरवण्याचे मोठेच कारस्थान विद्यमान राज्यकर्त्यांनी बऱ्यापैकी साध्य केले आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सांगायचा मुद्दा असा की, गेल्या दोन हजार वर्षांत जगभर अनेक साथी येऊन गेल्या. त्या बऱ्यापैकी भयावह होत्याही. पण आता या शतकातील या अतिप्रगत काळामध्ये ज्या रोगाचा वापर करण्यात आला, तो रोग आहे त्यापेक्षा प्रचंड भयावह पद्धतीने माध्यमांद्वारे सर्वांसमोर उभा करण्यात आला. आणि प्रस्थापित राजकारण्यांनी त्यातून आपली पोळी भाजून घेतली आहे.

यालाच ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे’ म्हणतात. करोनाने केलेल्या दुर्दशेपेक्षा या राज्यकर्त्यांनी केलेली दुर्दशा ही अधिक भयावह आहे. करोना आता संपल्यात जमा आहे, पण ही दुर्दशा संपायला कमीत कमी दहा वर्षं लागतील.

..................................................................................................................................................................

लेखक राजा शिरगुप्पे इंग्रजीचे निवृत्त प्राध्यापक आणि प्रवासी लेखक आहेत.

rajashirguppe712@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......