आता हे नित्याचंच झालंय. आपली प्रसारमाध्यमं, त्यातही वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या एखादी छोटीशी गोष्ट मीठमसाला लावून किंवा निरर्थक वाक्यांची भरमार करत इतकी मोठी करून सांगतात की बस्स! त्यांचं काय, त्यांना सतत कुणाला तरी डोक्यावर घ्यायला हवं असतं. त्याचे संबंधितांवर काय इष्ट-अनिष्ट परिणाम होतात, याच्याशी त्यांना काहीही कर्तव्य राहिलेलं नाही. सामाजिक जबाबदारी, बांधीलकी या गोष्टींशी आपल्याकडच्या सगळ्याच माध्यमांनी काडीमोड घेतला असल्याचं आपण नियमितपणे पाहतो आहोतच.
प्रसारमाध्यमांनी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा आधी नुसताच ‘थ्रिलर’ आणि नंतर ‘पोलिटिकल थ्रिलर’ कसा करायचा प्रयत्न केला, हे आपण नुकतंच पाहिलं आहे.
मागच्या आठवड्यात असाच एक ‘मेगा इव्हेंट’ मराठी वर्तमानपत्रांनी तयार केला.
मराठीतील ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांनी १० ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या नागपूर या कर्मभूमीकडून सोलापूर या जन्मभूमीकडे प्रयाण केलं. चाळीसेक वर्षांची वनविभागातली सरकारी नोकरी आणि निवृत्तीनंतरची वीसेक वर्षं चितमपल्ली विदर्भात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं आणि चार वर्षांपूर्वी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचं. मुलीच्या काहीशा अकाली निधनाचा धक्का आणि त्यानंतर आलेलं एकटेपण त्यांनी गेली चार वर्षं साहण्याचा प्रयत्न केला. पण वाढतं वय, तब्येतीच्या कुरबुरी त्यांना साथ देईनाशा झाल्या. तेव्हा त्यांनी सोलापूरला आपल्या पुतण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
ही एवढीच बातमी, पण दै. ‘लोकसत्ता’ या मराठीतल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्राने त्याची ११ ऑक्टोबर २०२० रोजी पहिल्या पानावर सर्वांत वरच्या बाजूला ‘एका अरुण्यऋषीचे वेदनादायी स्थलांतर’ असा अतिशयोक्त मथळा देऊन भली मोठी बातमी केली.
त्यानंतर दै. ‘लोकमत’ने १२ ऑक्टोबर रोजी पान तीनवर चितमपल्ली सोलापूरला पोहचले असल्याची बातमी केली, दै. ‘दिव्य मराठी’ने १३ ऑक्टोबर रोजी ‘सोलापूरला आल्याचा आनंदच आहे, परंतु जंगलात फिरू शकणार नाही, जंगल तर माझ्या मनातच भरलेले, त्यामुळे पुढचे लेखन इथेच…’ असा भला मोठाच्या मोठा मथळा देत पहिल्या पानावर बातमी केली. दै. ‘सकाळ’ने १२ ऑक्टोबर रोजी ‘अरण्यव्रतीचे नागपूरहून सोलापुरात आगमन’ ही बातमी पान पाचवर आणि १३ ऑक्टोबर रोजी ‘मारुती चितमपल्ली सोलापुरात दाखल’ ही बातमी पहिल्या पानावर केली. १२ ऑक्टोबर रोजी दै. ‘लोकमत’ने ‘सिद्धेश्वर तलावाच्या काठावर बसून निसर्गऋषी पूर्ण करणार वृक्षकोष’ ही बातमी पान तीनवर तर ‘एक लेखक त्याचं गाव सोडून जातो म्हणजे नेमकं काय होतं?’ हा लेख पान चारवर प्रकाशित केला. खरं तर ११ ऑक्टोबरच्या दै. ‘लोकमत’च्या ‘मंथन’ या रविवार पुरवणीत नागपूर ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने यांनी ‘पक्षी जाय माहेरा…’ हा छोटासा पण हृद्य लेख लिहिला होता. त्यामुळे त्यानंतर ‘लोकमत’ने इतकं करायची गरज नव्हती. पण ते असो. १३ ऑक्टोबर रोजी दै. ‘लोकसत्ता’ने परत ‘वनमहर्षी चितमपल्ली सोलापूरला परतल्यावर वनखात्याला उपरती!’ ही परत मोठी बातमी पान दोनवर केली. याच दिवशी दै. ‘लोकमत’ने ‘चितमपल्लींच्या संशोधनासाठी वनविभागाची यंत्रणा सज्ज’ ही बातमी पान आठवर केली.
कालच्या रविवारी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ व दै. ‘दिव्य मराठी’ या वर्तमानपत्रांनी आपल्या रविवार पुरवण्यांमध्ये चितमपल्ली यांच्यावर लेख प्रकाशित केले. म्हणजे सुरुवात दै. ‘लोकसत्ता’ने केली आणि मग इतर वर्तमानपत्रांनीही चितमपल्लींच्या सोलापूर प्रस्थानाचा आठ-दहा दिवस सतत पाठपुरावा केला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
परिणामी झालं काय? तर एक साधी घटना ‘मेगा इव्हेंट’ झाली! जणू काही याआधी मराठी साहित्यातल्या कुणा मान्यवर लेखकाने अशा प्रकारे प्रयाणच केलं नव्हतं. जी. ए. कुलकर्णी आपल्या शेवटच्या काळात धारवाडहून पुण्याला बहिणीकडे आले होते, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक गोविंद तळवलकर निवृत्तीनंतर मुंबईहून नाशिकला राहायला गेले होते. वसंत आबाजी डहाके-प्रभा गणोरकर हे साहित्यिक दाम्पत्य निवृत्तीनंतर मुंबईहून आपल्या मूळ गावी चंद्रपूरला गेलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांच्या जाण्याचे मात्र अशा प्रकारचे ‘मेगा इव्हेंट’ झाले नाहीत. ते निघण्याच्या आधी, पोहचल्यानंतर त्याच्या बातम्या वर्तमानपत्रांनी केल्या नाहीत. त्यानंतर त्यांच्यावर लेखही आले नाहीत.
पण हे सगळं मारुती चितमपल्ली यांच्या वाट्याला आलं! अशा प्रकारची प्रसिद्धी त्यांनीही कधी अपेक्षिली नसेल. कारण त्यांच्या आजवर कुठल्याही पुस्तकाला इतकी लगोलग प्रसिद्धी वर्तमानपत्रांनी दिलेली नाही. त्यामुळे या अ-कारण प्रसिद्धीचे ‘साईड इफेक्ट’ चित्तमपल्ली आणि त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागत आहेत, असं दिसतंय.
शनिवारी चितमपल्ली सोलापूरला जाण्यासाठी निघाले, तेव्हा नागपूरला त्यांचा घरगुती स्वरूपाचा निरोप समारंभ झाला, तसंच वर्धा, नांदेड या ठिकाणीही त्यांचे सत्कार झाले. रविवारी पहाटे चितमपल्ली सोलापूरला पोहोचले, तेव्हा त्याचाही सोहळा झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्याची छायाचित्रं दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. आणि सोशल मीडियावरही व्हायरल केली गेली. दुसऱ्या दिवसापासून सोलापुरातील पत्रकार, साहित्यिक, साहित्य संस्थांचे पदाधिकारी, प्राध्यापक यांनी चितमपल्लींकडे हजेरी लावायला सुरुवात केली. हिराचंद नेमचंद्र वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष यांनी सोमवारी चितमपल्ली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. याच दिवशी सोलापूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चितमपल्ली यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. बुधवारी सोलापूर विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळ कुलगुरूंसह त्यांच्याकडे जाऊन, त्यांचा सत्कार करून आले. त्याशिवाय इतरही अनेकांनी चितमपल्ली यांची भेट घेतली. काही अजूनही त्यांच्या भेटीला जात आहेत.
म्हणजे रविवारपासून चितमपल्ली यांच्याकडे जाऊन त्यांची भेट घेण्याची, त्यांना पाहण्याची, त्यांचा आदर-सत्कार करण्याची सोलापूरमध्ये जणू काही चढाओढ लागली आहे. रोज वर्तमानपत्रांत चित्तमपल्ली यांच्या आदर-सत्काराच्या बातम्या, सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट, त्यांच्यासोबतची छायाचित्रं यांचा मारा तर चालूच आहे.
चितमपल्ली यांच्या आगमनामुळे सोलापुरातल्या साहित्य वर्तुळात एकदम आनंदाचं वातावरण पसरलं, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्यासाठी प्रत्येकानेच त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वेळ खाण्याची गरज आहे का? सध्याच्या करोनाकाळ हा आपल्या सद्हेतूंना सुरक्षित अंतरावर आणि आपलं प्रेम, आपुलकी, आदर यांना कृतीपेक्षा मौनात ठेवण्याचा आहे. आपलं कितीही प्रेम असलं तरी त्याचा संबंधितांना त्रास तर होत नाही ना, याचाही विचार करायला हवा की नको? चित्तमपल्ली यांच्यासारख्या लेखनमग्न आणि वयाच्या नव्वदीत पोहचलेल्या साहित्यिकाबाबत तर हे कटाक्षानं पाळण्याची गरज आहे. सध्याच्या करोनाकाळातच नाही, तर एरवीही आणि यापुढच्या काळातही हे धोरण सोलापूरकरांनी काटेकोरपणे पाळायला हवं, असं वाटतं.
पण हल्ली सोशल मीडियामुळे कुठली गोष्ट मिरवावी आणि कुठली नाही, याला काही धरबंद राहिलेला नाही. उठसूठ कशाचाही ‘इव्हेंट’ करायचा नसतो, या बाबतीतलं तारतम्य सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्यांनी तर सोडूनच दिलं आहे की काय, अशी अनेक वेळा साधार शंका येते.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तीच भीती आता सोलापूरकर झालेल्या चित्तमपल्ली यांच्या बाबतीतही वाटू लागली आहे. चितमपल्ली मूळचे सोलापूरचे असले, सुरुवातीची २०-२५ वर्षं त्यांनी याच शहरात घालवली असली तरी गेली साठेक वर्षं ते विदर्भात होते. २०१६मध्ये मुलगी गेल्यापासून ते नागपुरात एकटेच राहत होते. मात्र या वयात त्यांनी आपल्या पुतण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या कुटुंबाचा जे आजवर अविभाज्य भाग नव्हते, तिथे रुळायला त्यांना वेळ लागणार. तो वेळ त्यांना द्यायला हवा.
शिवाय सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चितमपल्ली यांना आपलं संकल्पित लेखन पूर्ण करायचं आहे. वृक्षकोश व मत्स्यकोश या दोन महत्त्वाकांक्षी ग्रंथप्रकल्पांचा संकल्प त्यांनी केलेला आहे. ते काम त्यांना करायचं आहे. हे तसं प्रचंड मोठं काम आहे. त्यासाठीही त्यांना निवांतपणा हवा आहे.
याचा अर्थ असा नाही की, आपल्या साहित्यिकाचं कौडकौतुक करूच नये. जरूर करावं, करायलाच हवं. किंबहुना ते करण्याच्या बाबतीत मराठी माणसं बऱ्याचदा उदासीन असल्याचंच दिसून येतं. योग्य वेळी साहित्यिकांची दखल घेण्याची महाराष्ट्राला फारशी स्पृहणीय परंपरा नाही. त्यामुळे चितमपल्लींबाबत सोलापूरकरांच्या भावना, प्रेम, आपुलकी समजण्यासारखीच आहे.
पण हेही तितकंच खरं की, चितमपल्ली काही वयाच्या नव्वदीत सोलापूरकरांकडून हार-तुरे, सत्कार-समारंभ स्वीकारण्यासाठी सोलापूरला आलेले नाहीत. त्यात ही करोनाकृपाच म्हणायची की, अजून सार्वजनिक समारंभांना राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. नाहीतर या आठ-दहा दिवसांत त्यांचे दोन-चार सार्वजनिक सत्कार-समारंभही केले गेले असते!
..................................................................................................................................................................
हेही वाचा : मारुती चित्तमपल्लींचा काहीसा ‘सुशांतसिंग राजपूत’ आणि नागपूरकरांची ‘रिया चक्रवर्ती’ तर केली जात नाही ना?
..................................................................................................................................................................
प्रश्न चितमपल्लींच्या वयाचा आहे. आणि सध्याच्या करोनाकाळाचाही. अर्थात याचं भान सोलापूरकरांना नाही असंही सुचवायचं नाही. अनेकांनी हे लक्षात घेऊनच चितमपल्लींशी चांगले संबंध असतानाही त्यांच्याकडे तूर्तास जाणं टाळलेलं आहे.
या लेखाच्या माध्यमातून सुचवायचं आहे ते वेगळंच आहे. आणि ते जरा वेगळ्या स्वरूपाचं आहे.
त्यासाठी नाशिकमध्ये आग्रहानं बोलावलेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांचं काय झालं, हे माहीत करून घ्यायला हवं. नाशिककरांचं सुर्व्यांवर निरतिशय प्रेम होतं. कुसुमाग्रजांनाही सुर्व्यांचं खूप कौतुक होतं. त्यांच्या नावानं नाशिकमध्ये वाचनालय सुरू करण्यात आलं. बहुधा त्यांच्या नावानं पुरस्कारही सुरू करण्यात आला आहे.
सुर्वे नाशिककरांचेही लाडके झाले. तेथील एका माजी महापौरांनी सुर्व्यांना सरकारी घर देण्याचंही कबूल केलं होतं. पण ते झालं नाही. मात्र तरी नाशिककरांनी सुर्व्यांना नेरळहून आग्रहानं नाशिकला बोलावून घेतलं. मे २००९मध्ये ते नाशिकला राहायला गेले. सुर्व्यांसारखा निर्मळ, साधा पण कबीराच्या परंपरेचा वारसा सांगणारा पद्मश्री कवी आपल्या गावात आला, याचा नाशिककरांना खूप आनंद झाला. पण त्या हर्षोल्हासात त्यांच्याकडून थोडा अतिरेक होत गेला. त्यात सुर्व्यांकडे योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य शब्दांत ‘नाही’ म्हणण्याची कला नव्हती. तेव्हा त्यांचं वयही झालेलं होतं. म्हातारपण हे तसंही ‘नाही’ म्हणण्याची शक्ती नाहीसं करणारंच असतं. त्यामुळे सुर्व्यांना सतत नाशिककरांच्या आग्रहाला बळी पडून उठसूठ कुठल्या ना कुठल्या सार्वजनिक\न-सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावण्याची नौबत येऊ लागली.
खरं तर निवांतपणासाठी आणि लेखन करता यावं, यासाठी सुर्वे नाशिकला गेले होते. पण ते राहिलं बाजूलाच, उलटाच प्रकार सुरू झाला. व्यासपीठांवर मिरवण्याचा आणि भाषणं ठोकण्याचा सुर्व्यांचा स्वभाव नव्हता. पण तेच शुक्लकाष्ठ त्यांच्या मागे लागलं. त्याला ते कंटाळून गेले. शेवटी त्यांनी सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर २००९मध्ये नेरळला परतण्याचा निर्णय घेतला.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नव्वदच्या दशकात गोविंदराव तळवलकर ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून निवृत्त झाल्यावर नाशिकलाच स्थायिक झाले होते. तेव्हा त्यांनाही नाशिककरांच्या ‘अघोरी प्रेमा’चा सामना करावा लागला. पण तळवलकर खमके असल्याने आणि त्यांची ‘नाही’ म्हणण्याची शक्ती खणखणीत असल्याने त्यांना त्याचा फार त्रास झाला नाही. पण भिडस्त स्वभावाच्या सुर्व्यांना मात्र नाशिककरांच्या ‘अघोरी प्रेमा’चा बराच मनस्ताप झाला. अर्थात नाशिककरांचा तसा हेतू अजिबात नव्हता. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांनी सुर्व्यांवर खूप प्रेम केलं. पण प्रेम असलं तरी त्यात सुरक्षित अंतर, तारतम्य यांचीही गरज असतेच. ते मात्र काही नाशिककरांना जमलं नाही. शेवटी त्याची परिणती जी व्हायची तीच झाली.
तसं सोलापूरकरांकडून चितमपल्लींच्या बाबतीत होऊ नये असं वाटतं. अशी शंका घेणं काहींना आगावूपणाचं किंवा मूर्खपणाचंही वाटू शकतं. पण म्हणूनच तर सुर्व्यांचं उदाहरण दिलं आहे.
सोलापूरकरांनो, कृपया गैरसमज करून घेऊ नका, पण चितमपल्लींची केवळ ‘सत्कारमूर्ती’ करू नका. तुमच्या उपस्थितीमुळे आमच्या कार्यक्रमाला कसे ‘चार चाँद’ लागतील, यांसारख्या वेडगळ कल्पनांमध्ये अडकू नका. मराठी वर्तमानपत्रांनी जसा बेजबाबदारपणा केला, तसा निदान तुम्ही तरी करू नका. त्यांना त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ द्या, त्यांना लेखनासाठी निवांतपणा मिळू द्या. सत्कार-समारंभापेक्षा चितमपल्लींना त्याची जास्त गरज आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 20 October 2020
नमस्कार राम जगताप.
लेखाशी शंभर टक्के सहमत आहे. सर्जनशील व्यक्तीस सृजनाची उपासना करण्यासाठी पुरेसा एकांत मिळणं आवश्यक असतं. नेमकी हीच बाब लोकांकडून दुर्लक्षिली जाते. सर्जनशील व्यक्ती ही चित्रपटतारकांसारखी वलयांकित ( = सेलेब्रिटी ) नव्हे. तिच्या गरजा पार भिन्न असतात. पण लक्षांत कोण घेतो.
पंचवीसेक वर्षांपूर्वी अशा परिस्थितीवर एक जालीम उपाय लागू पडला असता. तो म्हणजे सत्कारसमारंभासाठी घसघशीत अर्पण मागणे. पण हल्ली लोकांच्या खिशांत बराच पैसा खुळखुळू लागल्याने हा उपायही निष्प्रभ होण्याचा धोका आहे.
आपला नम्र,
गामा पैलवान