१.
११ ऑक्टोबर २०२० रोजी दै. ‘लोकसत्ता’ या मराठीतल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये ‘एका अरुण्यऋषीचे वेदनादायी स्थलांतर’ या मथळ्याची बातमी पहिल्या पानावर सर्वांत वरती प्रकाशित झाली. मराठीतील ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी एकाकीपणा व एकटेपणामुळे नागपूर सोडून सोलापूरला पुतण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, असा या बातमीचा विषय. चित्तमपल्ली हे मराठीतील ज्येष्ठ लेखक वयाच्या ८८व्या वर्षांत आहेत. २००६मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर जवळपास १० वर्षांनी म्हणजे २०१६मध्ये त्यांची एकुलती एक मुलगी छाया यांचे निधन झाले. तेव्हापासून चित्तमपल्ली एकटेच नागपूरमध्ये राहत होते. पण वाढतं वय आणि वयाच्या पन्नाशीत लेकीचं झालेलं निधन यांमुळे त्यांना एकाकीपण आलं. त्यामुळे अखेर त्यांनी सोलापूरला पुतण्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
आता जर एवढीच बातमी असेल तर ती मराठीतल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर, अगदी सर्वांत वरच्या बाजूला छापून येण्यासारखी आहे का? ती आतल्या पानात फार तर दोनेक कॉलमची बातमी असायला हवी होती. पण हल्ली निखळ घटना सांगण्याची पद्धत वृत्तवाहिन्यांसारखीच वर्तमानपत्रांनीही मोडीत काढली आहे. त्यामुळेच या बातमीला ‘एका अरुण्यऋषीचे वेदनादायी स्थलांतर’ असा अतिशयोक्त मथळा देऊन, मूळ घटनेला नाट्यमय करून ती सांगितली गेली. ही बातमी वाचल्यावर त्यातला नाटकीपणा लक्षात येतोच, पण वास्तवाची आणि सत्याची केलेली मोडतोडही सहजपणे लक्षात घेते.
पहिल्या वाक्यात मूळ बातमी सांगून पुढे तिचे स्पष्टीकरण करायचे असते. पण या बातमीची सुरुवातच जणू काही चित्तमपल्ली यांच्यावर गौरवपर लेख लिहायचा आहे, अशा प्रकारची आहे. तो उमाळा, उसासा टाकून झाल्यावर मग ‘आज आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या याच जिवलग शहरात आधार देणारे कुणी नसल्याने या व्रतस्थ अरण्यऋषीला वेदनादायी स्थलांतर करावे लागले. शनिवारी अतिशय जड अंत:करणाने त्यांनी नागपूर सोडून आपले मूळ गाव, सोलापूरची वाट धरली,’ अशी मुद्द्याची दोन वाक्ये बातमीत लिहिली गेली. पण पुढच्या वाक्यात पुन्हा ‘विदर्भाच्या जंगलांचे अंतरंग ज्यांनी खऱ्या अर्थाने जगासमोर उलगडले, त्या अरण्यव्रतीला (आधी अरण्यऋषी, आता अरण्यव्रती! एकदा वापरलेला शब्द परत वापरायचा नाही, म्हणून एक भनंगड विशेषण!!) त्यांच्याच आवडत्या शहरात आधार सापडू नये, ही मोठी शोकांतिका आहे,’ असा पुन्हा उमाळा काढण्यात आला आहे.
इथे तर थेट नागपूरकरांवर आरोपच केला आहे की, त्यांनी चित्तमपल्ली यांना आधार दिला नाही म्हणून जणू काही त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतला. शाब्बास, याला म्हणतात बातमी सांगण्याची कला! २००६मध्ये पत्नीचं निधन आणि त्यानंतर तब्बल १० वर्षांनी मुलीचं निधन झाल्यानंतर चितमपल्ली यांच्या कुटुंबातलं कुणीच नागपुरात त्यांच्याजवळ नसेल तर त्यांना एकाकीपण येणारच ना! त्यातही वयाच्या ८८व्या वर्षात तर खूपच एकटेपणाची, असुरक्षिततेची भावना निर्माण होणार. शिवाय थकत चाललेल्या शरीराच्या कुरबुरी डोकं वर काढत राहणार. अशा व्यक्तीसाठी नागपूरकरांनी, तिथल्या साहित्यसंस्थांनी किंवा महानगरपालिकेने दोन-चार नोकर त्यांची देखभाल करण्यासाठी दिले असते तरी चितमपल्ली यांचं एकाकीपण, एकटेपण दूर झालं असतं? चित्तमपल्लींच्या कुटुंबसदस्यांचं निधन आणि वाढतं वय ही नागपूरकरांच्या हातातली गोष्ट आहे का? त्यांनी या दोन्ही गोष्टी थांबवल्या नाहीत म्हणून त्यांची ही अवस्था झाली? बातमी सरळ सांगायची असते, त्यात कुठलीही विधाने करायची नसतात, तर्कदुष्ट निष्कर्ष तर अजिबातच काढायचे नसतात, इतका साधा कॉमनसेन्स बातमी लिहिणाऱ्याला नाही, पण किमान उपसंपादकाला, मुख्य उपसंपादकाला, ही बातमी ज्या पहिल्या पानावर लावली गेली ते पान पाहणाऱ्या उपसंपादकाला तरी असायला नको?
पुढे या बातमीत ‘मुलीच्या मृत्युनंतर नागपुरात एकटे राहणे कठीण जात होते, रात्री-बेरात्री कधीही शरीराचे दुखणे डोके वर काढायचे. एकाकीपणातून आलेली ही असुरक्षितता आपल्या प्राणीकोश, वृक्षकोशाचे काम विस्कटून टाकेल, ही भीती त्यांना अस्वस्थ करीत राहायची,’ असे म्हटले आहे. असं असेल तर मग नागपूरकरांवर आरोप कशासाठी?
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
चित्तमपल्ली सोलापूरला जात आहेत हे समजल्यानंतर नागपुरातील काही मान्यवरांनी कसा त्यांचा घरगुती स्वरूपाचा सत्कार केला, याची माहिती देणारी ‘हळवा क्षण’ या मथळ्याची एक चौकटही या बातमीत दिली आहे. खरी बातमी ही चौकटच आहे. पण फक्त या कार्यक्रमाचीच बातमी दिली असती, तर त्यात मीठमसाला कसा घालता आला असता?
तर बातमीच्या शेवटी ‘चित्तमपल्ली ज्यांना आपले आदर्श मानायचे त्या पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांनाही आयुष्याच्या अखेरी असाच एकटेपणा आला होता. दुर्दैवी योगायोग असा की, चित्तमपल्ली यांनाही एकटेपणामुळेच आपली आवडती कर्मभूमी सोडावी लागली.’ असा उसरमा काढला आहे. हे नशीबच म्हणायचे की, सलीम अली यांना आलेल्या एकटेपणामुळे मुंबईकरांना जबाबदार ठरवलं गेलं नाही. अली यांना कशामुळे एकटेपण आलं होतं, याचा उल्लेख नाही, केवळ एकटेपण एवढा तपशील मिळाला, म्हणून तो चित्तमपल्ली यांच्या एकटेपणाशी जोडून दिला गेला. व्वा रे, बातमीदार!
‘लोकसत्ता’ने रविवारी ही बातमी छापल्यामुळे आणि त्यात चित्तमपल्ली हे तसे सेलिब्रेटी लेखक असल्यामुळे त्यावर लगोलग सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अनेकांचं चित्तमपल्ली प्रेम आणि उमाळे, उसासे भळाभळा वाहायला लागले.
त्यात ‘लोकसत्ता’च्या बातमीप्रमाणेच तथ्याला धाब्यावर बसवलं गेलं. कुणीही हे लक्षात घेतलं नाही की, चित्तमपल्ली यांचं एकटेपण, एकाकीपण ही त्यांची पूर्णपणे वैयक्तिक समस्या आहे. ती दुर्दैवी आहे, हे कितीही खरं असलं तरी त्याला नागपूरकर जबाबदार नाहीत. त्यामुळे तिचं सार्वजनिक दु:खात रूपांतर करून उर बडवण्याची गरज नाही आणि नागपूरकरांच्या नावाने बोटं मोडायचीही काहीएक गरज नाही. पण चित्तमपल्ली यांच्या वैयक्तिक दु:खाचं बाजारीकरण करू नये, याचा ‘लोकसत्ता’प्रमाणेच तथाकथित साहित्यप्रेमींनाही विसर पडला. कुठलाही मॅसेज\बातमी ‘फॉरवर्ड’ करण्यासाठी आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यासाठी विचार करावा लागत नाही, किंबहुना विचार करायचाच नाही, या पद्धतीनेच सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी तो निदान चित्तमपल्ली यांच्याबाबतीत तरी करायला हवा होता, असं तरी कसं म्हणणार?
एकीकडे हा प्रकार, तर दुसरीकडे सोलापूरच्या काही उत्साही लोकांनी ‘आता चित्तमपल्ली आमच्याकडे येणार याचा आनंद आहे, पण आमच्याकडे कुठलेही अभयारण्य नाही’, असे गळे सोशल मीडियावर काढले. अहो, वयाच्या ८८व्या वर्षी चित्तमपल्लींना अभयारण्याची गरज नाही, प्रेमाच्या माणसांची, आधाराची, सोबतीची गरज आहे. म्हणूनच तर ते नागपूर सोडून सोलापूरला पुतण्याकडे आले आहेत. आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवायचं नसलं तरी निदान चित्तमपल्ली यांच्या वयाचं तरी भान ठेवायला नको का?
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मानवी स्थलांतर काय किंवा प्राणी-पक्ष्यांची स्थलांतरं काय ही बहुतांश वेळा वैयक्तिक गरजेतूनच होत असतात. त्यात अनेकदा स्वतःची सोय हाच प्रमुख घटक असतो. चित्तमपल्ली तर वयाच्या ८८व्या वर्षांत आहेत. या वयात आपल्या माणसांची सोबत, सहवास, प्रेम ही त्यांची वैयक्तिक गरज आहे. या गोष्टी त्यांना कितीही उंची महालात आणि नोकर-चाकरांच्या गराड्यात ठेवूनही मिळणार नाहीत. त्यासाठी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचीच आवश्यकता आहे.
पण इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपण्याची वृत्ती ही भारतीयांची खासीयतच आहे. त्यात सेलिब्रेटींचं वैयक्तिक आयुष्य हे जणू काही आपल्याला आंदणच दिलेलं आहे, असा आपल्या प्रसारमाध्यमांनीही (त्यातही वृत्तवाहिन्यांनी) गैरसमज करून घेतलेला आहे. ज्याला जास्त टीआरपी किंवा जे जास्त विकावू ते जास्त दाखवावं, यातून हे थिल्लर प्रकार जन्मले आहेत. त्यामुळे थिल्लरपणाच्या बाबतीत आपण जसे आहोत, तशीच आपली प्रसारमाध्यमं आणि आपला सोशल मीडिया असणार!
२.
११ ऑक्टोबर २०२०च्या ‘एका अरुण्यऋषीचे वेदनादायी स्थलांतर’ या बातमीनंतर दै. ‘लोकसत्ता’ १३ ऑक्टोबर २०२० रोजी त्या बातमीची फॉलोअप बातमी ‘वनमहर्षी चितमपल्ली सोलापूरला परतल्यावर वनखात्याला उपरती’ या मथळ्याखाली केली. ही खरं तर बातमी. ती पहिल्या पानावर यायला हवी होती. पण ती आत, पाचव्या पानावर आली. महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याचे मुख्यालय नागपूरला असून आणि या खात्यात चितमपल्ली यांनी चार दशकं नोकरी करूनही या खात्याने नोकरीत असताना आणि निवृत्तीनंतर त्यांची कशी उपेक्षा केली, याविषयीची ही बातमी. पण जी बातमी आतल्या पानात यायला हवी होती, ती पहिल्या पानावर छापली, मग तिची फॉलोअप बातमी पहिल्या पानावर कशी देणार? म्हणून मग ती आतल्या पानात दिली गेली असावी!
आधीच्या बातमीत चित्तमपल्ली यांना ‘अरण्यऋषी’, ‘अरण्यव्रती’ म्हटलं गेलं, तर या बातमीत ‘वनमहर्षी’ असा त्यांचा उल्लेख केला आहे. ‘लोकसत्ता’वाल्यांच्या दृष्टीनं या तिन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे असावेत बहुधा! असो. सोलापूरला परतलेल्या चित्तमपल्ली यांच्या वृक्षकोश व मत्स्यकोश यांच्या प्रकाशनाची जबाबदारी वनखात्याने स्वीकारली आहे, अशी वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. याच बातमीत ‘‘वृक्षकोशा’चे लेखन सिद्धेश्वर तलावाच्या काठी’ अशी लोकसत्ताच्या सोलापूरच्या वार्ताहराने दिलेली छोटीशी चौकटवजा बातमीही दिली आहे. ‘लोकसत्ता’वाल्यांना बहुधा चित्तमपल्ली यांनी सोलापूरला पुतण्याच्या घरी बसून ‘वृक्षकोशा’चं काम करणं पसंत नसावं! त्यात सोलापूरला कुठलंही अभयारण्य नसल्यानं त्यांना या तलावाच्या काठी बसून लेखन करणं भाग पाडण्यात आलं असावं! ८८ वय वर्षं असलेला साहित्यिक तलावाच्या काठी बसून लेखन करतोय, आजूबाजूला संदर्भग्रंथ मांडून ठेवले आहेत आणि तलावाच्या काठावरील झाडेझुडपं आणि तलावातील जलचर त्यांच्याकडे कौतुकानं पाहत आहेत, असं व्यंगचित्र या बातमीसोबत ‘लोकसत्ता’वाल्यांनी छापलं असतं, तर किती बहार आली असती!
३.
हा प्रकार इथेच थांबला नाही. ‘लोकसत्ता’ने अशी सणसणीत बातमी दिल्यानंतर इतर वर्तमानपत्रं मागे कशी राहणार? म्हणून मग दै. ‘लोकमत’ने १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपादकीय पानावर ‘एक लेखक त्याचं गाव सोडून जातो म्हणजे नेमकं काय होतं?’ असा ‘दृष्टिकोन’ प्रकाशित केला. तो त्यांचे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनीच लिहिला. ‘दृष्टिकोन’ असं नाव असलेल्या या सदरात त्यांनी लिहिलेला मजकूर फार भारी आहे. या तथाकथित ‘दृष्टिकोना’तून वाचकाला कुठला ‘दृष्टिकोन’ मिळतो, हे कुलकर्णी किंवा ‘लोकमत’च जाणो! त्यांनी लिहिलंय –
“एक लेखक आपली हयात ज्या गावात घालवतो ते गाव स्वत:च स्वत:च्या जिवंतपणी सोडून जातो म्हणजे काय होतं…? ज्या गावात, घरात त्यानं अनेक दुर्मीळ पुस्तकांना जन्म दिला, अमोल असा ठेवा जगाला दिला, मोठा इतिहास शब्दबद्ध केला, ते गाव, ते घर सोडून लेखक आपल्या मूळ गावी जातो म्हणजे काय होतं…? का असं एकाकीपण आयुष्याच्या शेवटाला येतं…? लौकिकार्थाने सगळं काही मिळवूनही असं काय मिळवायचं शिल्लक राहातं…? म्हणून तोच लेखक त्यासाठी स्वत:च्या जन्मगावी जायला तयार होतो…? मारुती चितमपल्ली यांनी आपली कर्मभूमी असणारं नागपूरचं घर सोडून स्वत:च्या गावी, सोलापूरच्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याची बातमी वाचल्यापासून हे अस्वस्थ प्रश्न मनात आहेत. ही अस्वस्थता निर्माण करून, आपली सगळी ग्रंथसंपदा आणि थोडेबहुत सामान घेऊन ते शनिवार नागपूरहून आपल्या गावाकडे गेलेदेखील…”
लेखाच्या पहिल्याच परिच्छेदात काय बहारदार दृष्टिकोन मांडलाय पहा! अहाहा!! कुलकर्णी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं कुणी शोधायची? दुर्मीळ पुस्तकांना कसा काय जन्म देतात बुवा? वातानुकुलित ऑफिसमध्ये खुर्चीत बसून कल्पनेच्या भराऱ्या मारायचं ठरवलं की, असं लेखन जन्माला येतं!
पुढे ते लिहितात – “… एक लेखक आपल्या आयुष्याचं ८८ वर्षांचं झाड, मुळासकट उपटून पुन्हा आपल्या मूळ गावी नव्याने लावायला जातोय…! तो ज्या गावात त्याच्या आयुष्याचं झाड पुन्हा नव्याने लावणार आहे ती माती भलेही त्याची जन्मभूमी असेल; पण ते अनुभवानं गच्च भरलेलं झाड पुन्हा त्या नव्या मातीत रुजेल का?”
चित्तमपल्ली निसर्ग-वन्यजीव अभ्यासक असल्यामुळे त्यांच्या आयुष्याला झाडाची उपमा दिली गेली असावी! ८८ वर्षांचं हे मुळासकट उपटलेलं झाड नव्या मातीत रुजेल का? असा कुलकर्णी यांना प्रश्न पडलाय. उपमांची फटाक्यांच्या माळेसारखी लगड लावायची ठरवली की, असं होतं! चित्तमपल्ली यांचं जन्मगाव सोलापूर. जन्मापासून सुरुवातीची बरीच वर्षं ते सोलापूरला राहिले. पण तरीही त्यांच्या ८८ वर्षांच्या झाडाची मुळं मात्र सोलापुरात रुजली नसावीत म्हणून कुलकर्णींना हा प्रश्न पडला असावा. शिवाय हे झाड नव्या मातीत रुजेल का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. सोलापूर ही त्यांची जन्मभूमी आहे हे माहीत असूनही. सोलापूर जन्मभूमी असेल तर ती माती नवी कशी? किंबहुना चित्तमपल्ली नावाचं झाड सुरुवातीची किमान २०-२५ वर्षं सोलापूरच्याच मातीत रुजलं नाही का? की जन्मल्याबरोबर त्यांनी नागपूरला स्थलांतर केलं?
ते पुढे लिहितात – “एक लेखक आपलं दाणापाणी संपलं म्हणून राहातं गाव सोडून जातो; त्याचा आमच्या जगण्यावर, आमच्या गावावर, आमच्या भावभावनांवर काहीच परिणाम का होत नाही…? (हा निष्कर्ष कुठल्या आधारावर काढलाय देव जाणे! सध्याच्या करोनाकाळातही नागपुरातील काही मान्यवरांनी चित्तमपल्ली यांचा घरगुती स्वरूपाचा निरोप समारंभ केला, याची माहिती बहुधा त्यांना अवगत नसावी!) आमच्या संवेदना आतून विस्कटून का जात नाहीत…? की आमची नाळ फार पूर्वीच तुटून गेलीय या सगळ्यापासून…? कळत नकळत त्या लेखकाने आमच्या असण्यावर, आमच्या वागण्या-बोलण्यावर काही परिणाम केले असतील की नाही…? याचाही विचार हल्ली मनाला का स्पर्श करत नाही…?”
चित्तमपल्ली यांच्या नागपूर सोडण्याने नागपूरकरांना काहीच वाटलेलं नाही, याची चाचपणी कुलकर्णी यांनी बहुधा नागपूरकरांची मनं तपासून केली असावी! एकदा लिहिलेला मजकूर त्यांनी परत वाचला नसावा आणि तो संपादकीय पानात लावणाऱ्यांनीही!!
“…एक लेखक असा आपली मुळं उचकटून जातो, तेव्हा आपल्या मनावर एक साधा तरंगही उमटू नये? आपल्याला काही म्हणजे काही वाटू नये? एरवी तावातावाने भांडणाऱ्या आपल्या साहित्यसंस्था? संस्कृतीच्या नावानं सतत गळे काढणारं आपलं सरकार? आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात काही व्यक्तिगत अडचणींमुळे एकांतवासाचा सामना करणाऱ्या आणि तरीही नवनव्या प्रकल्पांमध्ये जीव ओतून कार्यरत असलेल्या लेखकाच्या बाबतीत आपलं काही कर्तव्य आहे, असं यातल्या कुणालाच वाटू नये? – की सत्काराच्या शाली पांघरल्या म्हणजे संपली जबाबदारी? आयुष्याच्या अनुभवांची शिदोरी अंतापर्यंत सोबत देणारा लेखक गाव सोडून गेला तेव्हा नागपुरातल्या एकाही संवेदनशील राजकारण्याला दु:ख झालं नाही… का? कोणतंही गाव ओळखलं जातं ते तिथल्या संस्कृती, साहित्यिक, विचारवंतामुळे! बलाढ्य नेते अगर उत्तुंग इमारतींमुळे नव्हे!!”
मजकूर वाचल्यावर कुलकर्णी पत्रकार आहेत की, दुसऱ्यांची मनं वाचणारे कुणी साधुपुरुष आहेत, असा प्रश्न पडतो, नाही का? एवढं प्रश्नोपनिषद त्यांनी का उपस्थित केलं असावं, याचा पत्ता त्यांचंच शेवटचं विधान वाचल्यावर लागतो. नागपूरच्या राजकारण्यांवर टीका करण्यासाठी, हा त्यामागचा उद्देश. कुलकर्णी यांना मुंबईत बसून ही बातमी जशी वर्तमानपत्रांतून समजली असणार, तशीच ती नागपुरातल्या राजकारण्यांनाही वर्तमानपत्रांतूनच समजली असणार! पण ती वाचून झालेलं दु:ख ते बहुधा कुलकर्णी यांच्याकडे व्यक्त करायला विसरले! मात्र कुलकर्णी जर नागपूरकर, तिथले साहित्यिक, साहित्यसंस्थांचे पदाधिकारी यांची मनं वाचू शकत असतील तर त्यांना नागपूरच्या राजकारण्यांचीही मनंही वाचता यायला हवी होती, नाही का?
या ‘दृष्टिकोना’चा कुलकर्णी यांनी शेवट केलाय तो असा – “दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याल्या एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो… कसदार लेखनापायी ज्याने आपलं आयुष्य उधळलं; त्या ऋषितुल्य माणसाला आपण सोबत देऊ शकलो नाही, हेच अस्वस्थ सत्य!”
चित्तमपल्ली यांचं नागपुरातलं घर १०-२० जणांनी भरलेलं होतं? की नागपूर हेच त्यांचं घर होतं? नेमकं काय म्हणायचं आहे? त्याचा खुलासा पुढच्या वाक्यात होतो. चित्तमपल्ली यांना एकटं का वाटतं, याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा म्हणजे नागपूरकरांनी करायचा असं त्यांना म्हणायचं असावं. त्याच्या पुढच्या विधानात कुलकर्णी यांनी नागपूरकरांवर थेट आरोपच केलाय की, त्यांनी चित्तमपल्लींना सोबत दिली नाही. वयाच्या ८८व्या वर्षांत असलेल्या चित्तमपल्लींच्या दिमतीला नागपूरकरांनी चार-पाच नोकरचाकर किंवा केअर टेकर दिले असते आणि रोज पाच-पन्नास लोक त्यांची ख्याली-खुशाली विचारायला गेले असते, तर चित्तमपल्ली यांचं एकाकीपण, एकटेपण, मुलीच्या अकाली जाण्यामुळे बसलेला धक्का हे सगळं बहुधा कमी झालं असतं, असा कुलकर्णी यांचा समज असावा.
कुलकर्णी यांच्या या ‘दृष्टिकोना’ला नागपूरचे एक साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी आणि साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते १४ ऑक्टोबर २०२० रोजी ‘लोकमत’मध्ये ‘वाचकांच्या पत्रव्यवहारात’ छापून आलं आहे. ते असं –
‘व्यक्तिगत पातळीवरील क्लेशांचे सार्वजनिक प्रदर्शन केलेच पाहिजे, असा जो माध्यमांच्या आजच्या युगामुळे अकारणच पाडला गेलेला प्रघात आहे, तोदेखील तसा चुकीचाच व माध्यम प्रभावाचाच परिणाम आहे.’ असं एक नेमकं पण सौम्य विधान जोशींनी केलं आहे. ते महत्त्वाचं आहे.
४.
दै. ‘लोकसत्ता’ काय किंवा ‘लोकमत’ काय किंवा सोशल मीडियावरील हळहळे-हुळहुळे साहित्यप्रेमी काय, सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चित्तमपल्लींनी सोलापूरला स्थलांतर करण्यावरून नागपूरकरांवर तोंडसुख घेतलं आहे. जणू काही नागपूरकरांनी चित्तमपल्लींना वाळीत टाकलं होतं, त्यांची उपेक्षा केली होती आणि त्यांची आजवर दखलही घेतली नव्हती. तसं असेल तर मग चित्तमपल्ली नोकरीनिमित्ताने आणि निवृत्तीनंतरही इतकी वर्षं विदर्भात, नागपुरात कसे काय राहिले बुवा? प्रसिद्ध साहित्यिक राम शेवाळकर यांचे चिरंजीव आशुतोष शेवाळकर यांच्या घरी चित्तमपल्ली यांचा जो निरोप समारंभ झाला, तो काय ‘बरं झालं, चित्तमपल्ली नागपूर सोडत आहेत’ म्हणून झाला की काय?
नागपूर ही चित्तमपल्लींची कर्मभूमी असली तरी सोलापूर ही त्यांची जन्मभूमी आहे. कुठल्याही माणसाला आपल्या जन्मभूमीचीही ओढ असतेच की! चित्तमपल्लींना ती एकटेपणा, एकाकीपणा यांमुळे वाटली, यात नागपूरकरांचा काय दोष?
चित्तमपल्लींचा काहीसा ‘सुशांतसिंग राजपूत’ आणि नागपूरकरांची ‘रिया चक्रवर्ती’ तर केली जात नाही ना?
एखादी व्यक्ती केवळ सेलिब्रेटी असल्याने तिच्या वैयक्तिक दु:खाचा चव्हाटा करायचा नसतो. त्याला विनाकारण तात्त्विक मुलामा द्यायचा नसतो. कारण अशा वैयक्तिक दु:खाचा कितीही उदोउदो केला, त्यावरून कुणालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचं कितीही उदात्तीकरण करत गळे काढले तरी सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणात जसा काही नामचिन हिंदी-इंग्रजी वाहिन्यांचा फजितवडा झाला, तसाच होण्याची शक्यता असते.
१४ जून २०२० रोजी सुशांतसिंग राजपूत या हिंदी सिनेमातील उभरत्या अभिनेत्याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हापासून देशातील काही नामचिन हिंदी-इंग्रजी आणि त्यांच्या नादानं प्रादेशिक भाषेतील इतर वृत्तवाहिन्यांनी जो स्वत:हून तपास आपल्याकडे घेऊन ही आत्महत्या नसून हत्याच कशी आहे इथपासून रिया चक्रवर्ती ही त्याची गर्लफ्रेंड हीच त्याची मारेकरी कशी आहे इथपर्यंत आणि मुंबई पोलिसांच्या तथाकथित हलगर्जी तपासापासून हिंदी सिनेमाजगताची प्रतिमा जास्तीत जास्त मलिन कशी करता येईल इथपर्यंत जणू विडाच उचलला होता. जवळपास साडेतीन महिने हे प्रकरण या नामचिन हिंदी-इंग्रजी वाहिन्यांनी इतकं लावून धरलं होतं की, त्यात सीबीआय, अमली पदार्थविरोधी पथकापासून आणि बिहारी आयपीएस अधिकाऱ्यापासून बंगाली काळ्या जादूपर्यंत अनेक घटक सामील झाले. अखेर तीन ऑक्टोबर रोजी एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ही हत्या नसून आत्महत्याच आहे, असा ठाम निष्कर्ष जाहीर केला आणि या प्रकरणात जो संशयाच्या बेडकाचा फुगवून फुगवून बैल केला गेला होता, त्यातली सारी हवा निघून गेली. तेव्हापासून हे प्रकरण थंडबस्त्यात गेलं.
.................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या दरम्यानच्या काळात देशभरातील वर्तमानपत्रांनी या नामचिन हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर, त्यांच्या उथळपणावर चांगलंच तोंडसुख घेतलं. देशभरातल्या प्रेक्षक-वाचकांना वृत्तवाहिन्यांपेक्षा वर्तमानपत्रं किती बरी आहेत, याचा पुन्हा साक्षात्कार होऊ लागला. दरम्यानच्या काळात कल्पना शर्मा या पत्रकार महिलेने ही घाण कशी वर्तमानपत्रांतूनच वृत्तवाहिन्यांमध्ये पसरली आहे, अशा आशयाचा एक लेख ‘न्यूज लाँड्री’ या माध्यम चिकित्सा करणाऱ्या इंग्रजी पोर्टलवर लिहिला होता. १० सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या या लेखाचं शीर्षक आहे – ‘Rot that’s destroying India’s TV news came from newspapers’. पण त्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नसावं.
वर्तमानपत्रं वृत्तवाहिन्यांवर तोंडसुख घ्यायला पुढे असतात, तशी त्यांच्यावरील टीकेकडे मात्र ती बहुतांश वेळा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. सदहेतूनं आणि योग्य पुरावे, उदाहरणांनिशी केलेली टीका ही स्वागतार्ह असते. तिचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी करायचा असतो. पण आपणच शहाण्यांचे कांदे असा (गैर)समज असलेली वर्तमानपत्रं ते कसं करणार?
त्यामुळेच चित्तमपल्ली यांच्यासारख्या वयोवृद्ध साहित्यिकाच्या वैयक्तिक दु:खाची सार्वत्रिक विटंबना होते!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 16 October 2020
नमस्कार राम जगताप,
लेखाबद्दल धन्यवाद. तुमच्या या लेखाशी मी शंभर टक्के सहमत आहे. लोकसत्ता व लोकमत ने पहिल्या पानावर ज्या बातम्या दिल्या आहेत त्यास मराठीत एक अत्यंत समर्पक शब्द आहे. तो शब्द छचोर हा आहे. मारुती चितमपल्लींची वैयक्तिक अडचण ही काय सर्कशीच्या जाहिरातीसारखी धूमधडाक्यात प्रचार करायची गोष्ट आहे का! त्यांच्या खाजगी आयुष्याची बूज राखली गेली पाहिजे, याची जराही जाणीव दिसंत नाही.
अधिक काय लिहायचं. श्रीपाद भालचंद्र जोशींची संयत प्रतिक्रिया वाखाणणीय आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
Suhas Kirloskar
Fri , 16 October 2020
उत्तम आणि समयोचित लेख. लोकसत्ताच्या पहिल्या पानावर हि बातमी बघून आश्चर्य वाटले, त्याच दिवशी. कोणी वृद्धापकाळात व्यक्तिगत कारणामुळे कोणतेही गाव सोडून जात असेल तर त्याची बातमी पहिल्या पानावर कशाला? शिवाय जंगलाची आवड असणाऱ्याने दांडेली येथील जंगलात पूर्ण वेळ वास्तव्य करावयाचे ठरवले असते तर ती बातमी झाली असती, ती सुद्धा आतल्या पानावर. मारुती चितमपल्ली यांच्या भटकंती आणि अभ्यासू स्वभावाविषयी पूर्ण आदर आहेच तरीही त्यांनी जंगल जीवनाबद्दल काही अंधश्रद्धा पसरवणारे लिखाण आणि वक्तव्यही केले आहेच. शास्त्रीय दृष्टीकोन बाळगणारे आणि अभ्यासू जीवशास्त्रज्ञ त्याविषयी टीका करतात पण त्यांचे इतर अनुभव वाचनीय आहेत हे खरेच. कोण केव्हा कोणाला मोठे करेल हे काही सांगता येत नाही. वाणी जयराम वा अन्य गायिकांनी मुंबई सोडली, चित्रपट सृष्टीत गाणे सोडले ही त्यावेळी बातमी होती पण कोणी छापण्याची हिमत केली नाही. उदाहरण म्हणून हे लक्षात ठेवायला हवे.