अजूनकाही
१. जर्मनीत जाऊन हिटलर विरोधात चित्रपट बनवण्याची हिंमत संजय लीला भन्साळी करू शकतात का, असा सवाल राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांनी केला आहे. या सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पद्मावती चित्रपटाच्या सेटवर जाऊन मोडतोड केली आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही मारहाण केली. जे इतिहासात घडलेच नाही, ते चित्रपटात दाखवले जाऊ नये. आमच्या राजपूत भूमीवर येऊन आमच्या देखतच इतिहासाची मोडतोड केली जात आहे, असेही ते म्हणाले.
कालवी यांना इतिहासरत्न पुरस्कार देता येईल का? राणी पद्मिनीची व्यक्तिरेखा संपूर्णपणे काल्पनिक आहे, राजपूत इतिहासात तिचा काही उल्लेखही नाही, त्या व्यक्तिरेखेचा इतिहास ते सांगतायत. त्यांना दिव्यदृष्टी पुरस्कारही द्यायला हवा. ज्या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं नाही, त्यात काय दाखवलंय, ते त्यांच्या या दिव्यदृष्टीला दिसतंय. भन्साळींना जर्मनीला पाठवण्याऐवजी त्यांनी खुद्द जर्मनीत जाऊन असले माकडचाळे करून पाहायला काय हरकत आहे. आठवून आठवून यांना हिटलर हाच 'महापुरुष' आठवला, हेच पुरेसं बोलकं आहे.
......................................
२. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये वाहत असलेले नाराजीचे वारे कायम असून त्यात आता यात पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची भर पडली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून अलिप्त राहण्याचे अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुसाद कामत यांनी जाहीर केले होते. त्यापाठोपाठ आता नारायण राणेदेखील मुंबईतील प्रचारात सहभागी होणार नाहीत, असं सांगितलं जातं.
अरेरे, त्यामुळे आता कोकणातल्या पंजाच्या झंझावाताप्रमाणे मुंबईतही काँग्रेसचे वादळ उठवून महानगरपालिकेत एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भंगलेच म्हणायचे. काँग्रेसच्या प्रचारात दादा नाहीत म्हटल्यावर स्वबळावर बहुमत मिळवण्याची शक्यताच संपली काँग्रेसची. अरेरे!
......................................
३. महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती न करण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती सत्तेत राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.
पवार नेहमी जे बोलतात त्यात शब्दार्थापेक्षा भावार्थ महत्त्वाचा असतो. तो अगदी साधा आहे. शिवसेना सत्तेसाठी वाट्टेल त्या तडजोडी करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. ते सत्ता सोडणार नाहीत. राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाहीत. निवडणुकीनंतर सत्तेसाठी पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग खुला ठेवतील. मध्यावधी निवडणुकांची शक्यताच नाही, हे पवार सांगतायत.
......................................
४. तामिळनाडूत जलिकट्टूसाठी सर्व जण एकत्र आले आणि केंद्र सरकारला नमवले, अशी एकजूट आपल्याला हवी आहे. जलिकट्टूप्रमाणेच भाजपचा बैल उधळतोय. या बैलाला रोखा आणि रस्त्यावर उतरून लढा, असे आवाहन शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले.
एकाच गोठ्यात ढवळ्याशेजारी उभा राहून मनसोक्त चारा चरणारा पवळ्या म्हणतोय ढवळ्याला आवरा! खिशात राजीनामे घेऊन फिरतात म्हणे!! अहो हे कमालीचे हास्यस्फोटक विनोद आवरा!!!
......................................
५. मेघालयाच्या राजभवनातील सुमारे १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी थेट राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारं पत्र थेट राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्यानंतर राज्यपाल व्ही. षणमुगनाथन यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या षणमुगनाथन यांनी राजभवनाचा यंग लेडिज क्लब बनवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. राज्यपालांच्या आदेशाने मुली थेट राजभवनात येतात. अनेक मुलींची पोहोच राज्यपालांच्या बेडरूमपर्यंत आहे. रात्रपाळीला दोन जनसंपर्क अधिकारी, एक आचारी आणि एक नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महिला कर्मचारी आहेत.
त्यांच्यावर आयुष्य कोणत्या ना कोणत्या कार्याला वाहून टाकण्याचे संस्कार आहेत. आता ६८ वर्षांचं वय झाल्यामुळे वानप्रस्थाश्रमात त्यांनी उर्वरित आयुष्य महिला सबलीकरणासाठी वाहून टाकायचं ठरवलं असणार आणि मग वाहणे आणि वाहवणे यातला फरक नष्ट झाला असणार.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment