पडद्यात राहायचे की पडद्यावर? सिनेमाची छळकथा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 13 October 2020
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा Hindi Cinema सुशांतसिंग राजपूत Sushant Singh Rajput रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty कंगना राणावत Kangana Ranaut नरेंद्र मोदी Narendra Modi संघ RSS भाजप BJP

उद्योग झालेला एखादा व्यवसाय प्रचंड कर्तृत्ववान असूनही इतका विचारशून्य कसा असू शकतो? जो व्यवसाय जवळपास प्रत्येक भारतीयांच्या मनोरंजनाशी जोडला गेलेला आहे, त्याच्यापाशी काही नैतिक, वैचारिक आणि राजकीय भूमिका का नसावी? तिकडे हॉलिवुड कृष्णवर्णीय, स्त्रिया, समलैंगिकता, युद्धे, वॉल स्ट्रीट, परराष्ट्र धोरण अशा अनेक विषयांवर चित्रपटाद्वारे आपली भूमिका जगाला सांगते, तेव्हा त्याच्या नावाची भ्रष्ट नक्कल असणाऱ्या बॉलिवुडला सुशांतसिंग राजपूतच्या मृत्युच्या निमित्ताने स्वत:वरील किटाळ दूर का करता येऊ नये?

पोलीस आणि वकील यांच्यावरील चित्रपटांत त्यांची कारस्थाने आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याची क्षमता इतक्यांदा येऊन गेलीत की उबग यावा! पण अगदी तसेच कथानक छोटा पडदा किंचाळून सांगत असताना मोठा पडदा सून्न होऊन जायचे काही कारण नव्हते. शेवटी काय होणार आहे? तर चांगल्याचा विजयच होणार आहे, असा ठाम आणि नशिबावर हवाला असल्याचा दाखला चित्रपटाप्रमाणेच हिंदी चित्रपट उद्योग न बोलता देत राहिला. रिया चक्रवर्ती निर्दोष सुटेल काय, सुशांतसिंग राजपूतने खरोखर आत्महत्या केली काय, यांची उत्तरे मिळतीलच. पण एकामागून एक संशयित म्हणून नावे काय येत राहतात, व्हॉटसअॅपवरील संदेशांची देवाणघेवाण अलगद पत्रकारांपर्यंत काय पोचते, घराणेशाहीपासून अचानक सारे प्रकरण अमली पदार्थांच्या व्यवहाराशी जोडले काय जाते, बिहार आणि महाराष्ट्र यांचे नाते अकारण काय सांगितले जाते, अमुकतमुकांना पकडा कारण ती मंडळी अमली पदार्थ घेत असावीत असे कोणी काय सांगते आणि अवघी माध्यमे त्याची उजळणी काय करतात…

सगळे संतापजनक आणि उद्वेगपूर्ण. पण स्वरा भास्कर, तापसी पन्नू, जावेद अख्तर, अनुराग कश्यप व टॉक शोमधील एखाद-दुसरे कलावंत सोडता बहुसंख्य गप्प बसून राहिले. नावाचा उद्धार होत राहिला. अवघा उद्योग बदनामी सोसत राहिला. कित्येकांचे पडद्यावरील जीवन संपून जाण्याची वेळ आली. पण आपले कलावंत सारे काही सोसत राहिले. ‘सब्र का फल मिठा होता है’ असे त्यांचे तत्त्व पडद्यावर नव्हे, प्रत्यक्षात दिसले.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

निर्मात्यांची संघटना, कलाकारांची संघटना असूनही आणि एरवी येता-जाता संघटनेच्या बळावर आपली मर्जी राबवणाऱ्या अनेक मुखंडांची तोंडे बंद कशी काय राहिली? मुख्य म्हणजे कोण कोणाच्या तोंडाकडे पाहात होते आणि कोण कोणांपासून तोंड लपवत होते? आणि कशासाठी?

गेल्या सहा वर्षांत या हिंदी चित्रपट उद्योगाचा एक चापलूस, चतुर आणि चंगळवादी उद्योग असा चेहरा बनला. तो चतुर अन चंगळवादी त्यापूर्वीही होता. पण चापलूसी तो करत नसे. करणार तरी कोणाची? ना पंतप्रधान त्यात रस घेत, ना कोणी सत्ताधारी पक्ष. वाजपेयी सरकार असताना भरपूर चित्रपट राष्ट्रवाद, पाकिस्तानविरोध व मुस्लिमांना खलनायक कथानके असणारे आले. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘मंगल पांडे’, ‘मिशन काश्मीर’, ‘भगतसिंग’, ‘देव’, ‘दिवार’ अन ‘बॉर्डर’ असे कैक. पण या निर्मितीत चातुर्य होते. पंतप्रधानांना व त्यांच्या पक्षाला तसा या उद्योगाचा आधार थेट घ्यावा, असे कधी दिसले नाही. महत्त्वाचे म्हणजे वाजपेयी व त्यांच्या आघाडीतील नेते स्वयंभू आणि कर्तृत्ववान असल्याने त्यांना कोणा चौथऱ्याची गरज भासली नाही.

नरेंद्र मोदी मात्र सर्वग्रासी व सर्वंकष नेते निघाले. त्याला अर्थात त्यांची हुकूमशाही वृत्ती, तसेच कटकारस्थानांशिवाय राजकारण यशस्वी होत नसते, याचा पाठ त्यांना देणाऱ्या संघ परिवाराची शिकवण जबाबदार आहे. प्रचारासाठी हिंदी चित्रपट कलावंतांचा ताफा बाळगणे, कलाकारांना भाजपमध्ये प्रवेश देणे, उमेदवारी देताना त्यांची संख्या वाढवणे, छायाचित्र काढून घेण्यासाठी कलाकारांना आपल्या घरी आमंत्रण देणे, सेन्सॉर बोर्डसह चित्रपट उद्योगाशी संबंधित संस्थांवर दुय्यम दर्जाचे मात्र आपल्याशी इमानदार व्यक्तींची निवड करणे (आठवा गजेंद्र चौहान, पहलाज निहलानी, प्रसून जोशी) असे कार्यक्रम त्यांनी राबवले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपल्या सरकारी कार्यक्रमांवर चित्रपट काढायलाही जणू त्यांनी सुवले. ‘पॅडमॅन’, ‘सुईधागा’, ‘मिशन मंगल’, ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ आणि ‘पीएम नरेंद्र मोदी’ व ‘चलो जीते है’ हे स्वत: मोदी व आपले प्रतिस्पर्धी मनमोहनसिंग यांच्यावरही चित्रपट निघाले. सोनिया गांधींची प्रतिमा रंगवणाराही एक येऊन गेला. मध्येच ‘ठाकरे’ नावाचाही प्रकटला. बाकी दहशतवाद, इस्लाम, मुस्लीम, पाकिस्तान यांनी गच्च भरलेले तर कितीतरी प्रदर्शित झाले! त्या सर्वांमधून एक अप्रकट हिंदुत्ववाद, प्रखर राष्ट्रवाद आणि हिंसाचारावाचून खैर नाही असे संदेश दिले गेले.

निवडणुकीच्या तोंडावर २०१९पर्यंत असे प्रचारकी चित्रपट कसे येते गेले याची दखल ‘नॅशनल पब्लिक रेडिओ’, ‘साऊथ मॉर्निंग चायना पोस्ट’, ‘द हिंदू’, ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘फर्स्ट पोस्ट’ अशा इंग्रजीभाषक माध्यमांनी घेतली हे विशेष. ना हिंदी, ना मराठी, यावर काही बोलले. (मी दै. ‘दिव्य मराठी’त लिहिले होते.)

ही चापलुसी की दडपशाही की नाईलाज? तिन्हीविषयी कोणी काही बोलले नाही. सारे घाबरले होते खास! भित्रे माणसे चापलुसी फार करतात. हुकूमशाहींना दोन्ही माणसे प्रिय असतात. मोदी स्वत: प्रतिमाप्रिय, प्रसिद्धीपिपासू व आत्ममुग्ध. त्यामुळे एकाला सु‌खावले की आपले भागते हे या उद्योगाने जाणले आणि तिथेच त्याचा तोल गेला.

सत्ताधाऱ्यांशी अतिलगट नेहमीच भोवते. कलाक्षेत्राला तर फार! हिटलरच्या जवळ गेलेल्यांची पुढे फार परवड झाली. कम्युनिस्ट राजवटीतही असेच घडत गेले. निव्वळ प्रचारकी चित्रपटांनी व कलाकारांनी कला भ्रष्ट केली. त्यांचा गैरफायदा निव्वळ धंदेवाईक व केवळ कलावादी मंडळींनी घेतला. आपली जबाबदारी झटकण्याचा स्वान्तसुखाय मार्ग त्यांनी ‘तटस्थते’च्या सिद्धान्तामधून पुढे सरकवला. मनोरंजनाला विचार नसतो असे ठरवून त्यांनी कला काबीज केली. लोकही आपली सुटका करवून घ्यायला या प्रकारात सामील झाले.

राज कपूर व दिलीपकुमार यांचे बरेच चित्रपट नेहरू यांचा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांवर आधारलेले असत. मनोजकुमार उघडपणे गांधी-नेहरू-शास्त्री यांची तरफदारी करत. त्यांचाही राष्ट्रवादच होता, मात्र तो थेट हिंदुत्ववादी नव्हता. सौम्य होता. एकंदर हिंदी चित्रपटसृष्टी उदार, सहिष्णू व समतावादी वातावरण निर्मिण्याचा प्रयत्न करत होती. तीत संघ परिवार कोठेच नव्हता. असेल कसा? ताठर व तटबंद विचार प्रक्रियेतून माणसे घडवणाऱ्या संघटनेला कलेचे वावडे असते. कारण कला स्वातंत्र्याशिवाय जन्मू शकत नाही. अभिव्यक्तीला जखड बंद विचारधारा नेहमीच अधू करत असते. म्हणून संघात ना कलावंत असतात, ना संघाची एखादी कला ‘शाखा’ असते!

संघाला व हिंदुत्ववादी परिवाराला कलाक्षेत्राशी खेटता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘पुरस्कार वापसी’ करणाऱ्यांची यथेच्छ टिंगल, बदनामी करून झाली. पुरोगामी व आधुनिक विचार करणाऱ्या कलावंतांना वाळीत टाकून झाले. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, कला अकादमी, सांस्कृतिक संबंध परिषद, गांधी व नेहरू यांच्या नावाच्या संस्था अशा कैक जागी संघाने हिंदुत्ववादी लोक बसवले. त्यांना विचारवंत, साहित्यसेवक, पत्रकार, विद्वान आदी विशेषणे लावून  पत्रकारांना झळकावयास सांगितले. हिंदी चित्रपटाच्या उद्योगावर धाडी, खटले, आरोप, संशय, अटक, अफवा असे सारे प्रकार करून पाहिले. बिहार विरुद्ध महाराष्ट्र अशी दोन राज्ये भिडवून पाहिली. पण हाती काय लागले?

छळला गेलेला हा चित्रपट उद्योग आता तरी भानावर येईल काय? आपण राष्ट्रवाद, हिंदुत्व, वर्णवर्चस्व यांत फार वाहवत गेलो, असे त्याला जाणवेल काय? साहित्यक्षेत्र कधीचेच सावरले. भारतात कोणताही नामवंत व विचारी साहित्यकार संघाच्या आसपासही फिरकत नाही. संघाजवळ जाण्याने आपली स्वायत्तता आपण गमावतो अन आपली निर्मिती संघ विद्वेष व घृणा पसरवायला वापरतो, हे त्यांना समजून चुकले आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विवेक ओबेराय, अनुपम खेर, मुकेश खन्ना, अभिजीत आदी (मोदीभक्त) बाद झालेले कलाकार आहेत. कंगना बुद्धिमान अत्रिनेत्री आहे. सध्या ती भाजपभक्त झालेली असली तरी तिचे पणजोबा काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे आमदार होते आणि तिला उत्कृष्ट अभिनयाची राष्ट्रीय पारितोषिके काँग्रेसच्याच सत्ताकाळात लाभली आहेत, हे संघवाले कसे विसरतील? आता तिची मुंबईतील कारकीर्द किती उभारी घेईल, हे संघ परिवारही सांगू शकत नाही, इतका हिंदी चित्रपट उद्योग तिच्यावर संतापलेला असणार. केवळ हिंदुत्ववाद्यांच्या जीवावर तिचे चित्रपट कसे चालतील? शिवसेनेच्या विविध संघटनांशी ती कशी लढणार?

यास्तव या उद्योगातील म्होरक्यांनी आणि कर्तृत्ववानांनी आपला स्वातंत्र्यानंतरचा राजकीय वारसाच पुढे नेत राहिला पाहिजे. तो काँग्रेस अथवा गांधी-नेहरू यांच्याच नावे असावा असे कोणी म्हणणार नाही. संविधानातील मूल्ये प्रत्येक कलाकृतीतून कशी पाझरतील हे समजण्याएवढे कलाभान त्यांना असले म्हणजे पुरेसे आहे.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख