करोनाने जगभर दखल द्यायला सुरुवात केली, त्या दरम्यान म्हणजे २० मार्च २०२० रोजी प्रसिद्ध इतिहासकार युव्हाल नोआ हरारी यांनी ‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये ‘the world after coronavirus’ असा एक दीर्घ लेख लिहिला होता. तो लेख आजही तितकाच प्रासंगिक आणि समयोचित असल्याने त्याचा हा मराठी अनुवाद प्रकाशित करत आहोत.
..................................................................................................................................................................
जगभरातील सर्वच मानव समाजाला आज एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. हे कदाचित आपल्या पिढीचे सर्वांत मोठे संकट आहे. येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यात जनता आणि सरकार यांना काही तातडीचे निर्णय घ्यावे लागतील. त्याचा जनतेवर निश्चितच प्रभाव पडेल. म्हणून येणाऱ्या काही वर्षांत जग बदललेले असेल, आणि ते बदल केवळ आरोग्य सेवेबाबतच नव्हे तर अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृतीतही हे बदल झालेले दिसतील. म्हणून आपल्याला फार झपाट्याने निर्णय घ्यावे लागतील. आपल्या अशा निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल आपल्याला जागरूक राहिले पाहिजे. जेव्हा आपण पर्यायांबद्दल विचार करत असतो, तेव्हा आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की, आपण या संकटावर कशी मात करणार आहोत? आपले लक्ष केवळ या प्रश्नावरच नव्हे तर हे संकट संपल्यानंतर आपण या जगात कसे वावरणार आहोत? या प्रश्नावर देखील विचार केला पाहिजे. संकट तर निघून जाईल, निश्चितच निघून जाईल. या संकटातून आपल्यातील बहुतेक लोक वाचतीलही, परंतु नंतर आपण या बदललेल्या जगात वावरणार आहोत.
आपत्कालीन परिस्थितीत घेतलेले बरेच निर्णय आपल्या आयुष्याचा भाग बनतील. आपत्कालाचे हे वैशिष्ट्य असते की, ते असे ऐतिहासिक निर्णय द्रुत गतीने फास्ट फॉरवर्ड (पुढे नेते) करते. सामान्यत: गेल्या काही वर्षांच्या विचारविनिमयांनी घ्यावयाचे निर्णय आपत्कालीन परिस्थितीत काही तासांत घेतले जातात. त्यामुळे अर्ध कच्च्या आणि धोकादायक तंत्रज्ञानालादेखील कामी लावले जाते. कारण काहीच न करण्याची जोखीम मोठी असू शकते. देशभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रयोगांच्या उंदरांमध्ये परिवर्तीत झालेले असतात. उदाहरणार्थ, जेव्हा प्रत्येक जण घरून काम करतो आणि फक्त दुरूनच संभाषण करतो तेव्हा काय होईल? सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन झाल्यास काय होईल? सामान्य दिवसांमध्ये सरकारे, व्यावसायिक आणि संस्था अशा प्रकारच्या प्रयोगांसाठी तयार नसतात, परंतु ही वेळ सामान्य नाही. अशा संकटाच्या प्रसंगी आपल्याला दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रथम, आम्हावर सर्वांत सक्षमपणे पाळत ठेवणारी शासकीय यंत्रणा (सर्विलान्स राज्य) हवी की, मग नागरीकत्वाच्या हक्काचे बळकटीकरण हवे, यापैकी कोणते तरी एक निवडावे लागेल. आम्हाला दुसरी निवड करावी लागेल ती म्हणजे राष्ट्रीय अलगता की मग जागतिक एकत्व हवे.
ही महामारी थांबवण्यासाठी, सर्वच लोकांनी नियमांचे पालन केले पाहिजे. हे साध्य करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे लोकांवर पाळत ठेवणे आणि नियम मोडणाऱ्या लोकांना शिक्षा करणे. आज मानव जातीच्या इतिहासात तंत्रज्ञानाने प्रथमच प्रत्येक नागरिकावर सदासर्वकाळ पाळत ठेवणे शक्य केले आहे. ५० वर्षांपूर्वी, रशियन गुप्तचर संस्था केजीबीला २४ दशलक्ष सोव्हिएत नागरिकांवर २४ तास नजर ठेवणे शक्य नव्हते. त्या वेळी केजीबी मानवी एजंट्स आणि विश्लेषकांवर अवलंबून होती आणि प्रत्येक माणसामागे एजंट ठेवणे शक्य नव्हते. आता यापुढे मात्र मानवी हेरांची आवश्यकता नाही. सरकारे सर्वत्र सेन्सर, अल्गोरिदम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर अवलंबून राहू शकतात.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी बऱ्याच सरकारांनी नवनवीन पाळत ठेवणारी साधने शोधून तशी यंत्रणा लागू केली आहे. त्यात सर्वांत जास्त चीनने प्रगती केली आहे. लोकांच्या स्मार्टफोनचे सखोल परीक्षण, कोट्यवधी कॅमेऱ्यांद्वारे, चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करून, लोकांच्या शरीराचे तापमान घेऊन आजारी लोकांचे अहवाल देणे सोपे आहे. त्यामुळे संक्रमित लोक ओळखले जातात. इतकेच नाही तर कोणाची, कोणाशी व कधी भेट झाली हे शोधण्यासाठी त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येतो. असे मोबाइल अॅप्स देखील संशोधित केले आहेत की, जे लोक संक्रमणग्रस्त असतील अशा नागरिकांपासून इतरांनी दूर राहावे म्हणून ते त्यांना इशारा देऊ शकतात.
आता असे तंत्रज्ञान केवळ चीनपुरते मर्यादित राहिले नाही. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आतापर्यंत ज्या तंत्रज्ञानाचा वापर फक्त आतंकवाद्याविरोधात केला जात होता त्याच तंत्रज्ञानाचा वापर सर्व नागरिकांवर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशास जेव्हा संसदीय समितीने परवानगी देण्यास नकार दिला, तेव्हा नेत्यान्याहू यांनी समितीला बाजूला सारले आणि त्यांना मिळालेल्या आपत्कालीन शक्तीद्वारे मंजुरी देऊन त्यास कार्यान्वित केले.
आपल्या पैकी काही जण असे म्हणू शकतात की, यात काही नवीन नाही. अलीकडच्या वर्षांत बरीच सरकारे आणि बऱ्याच मोठ्या कंपन्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी, त्यांच्यावरील देखरेखीसाठी आणि त्यांना हाताळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर करत आहेत. परंतु जर आपण जागरूक नसलो तर ही महामारी आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या हक्का विरोधातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. आतापर्यंत ज्या देशांतील नागरिकांनी अशी पाळत नाकारली आहे, अशा देशांमध्येही अशी सर्वसमावेशक पाळत ठेवणारी यंत्रणा राबवणे सोपे होईल. इतकेच नव्हे तर आतापर्यंत ‘ओव्हर द स्किन’ असलेले हे पाळत ठेवण्याचे तंत्र ‘अंडर द स्किन’ होऊन जाईल.
आतापर्यंत असे होत होते की, जेव्हा आपले बोट स्मार्टफोनवरील एखाद्या लिंकवर क्लिक करत असे, तेव्हा तुम्ही काय वाचत आहात हे सरकार जाणून घेई. परंतु करोना विषाणूनंतर मात्र इंटरनेटचे लक्ष्य बदलेल. आता सरकार आपल्या बोटाद्वारे आपल्या शरीराचे तापमान आणि त्वचेखालील रक्तदाबदेखील माहीत करून घेऊ शकेल.
पाळत ठेवण्याबद्दल समस्या ही आहे की, आपल्यावर कोणत्या प्रकारची पाळत ठेवली जात आहे आणि येत्या काही वर्षांत त्याचे स्वरूप कसे असेल हे आपल्या कुणालाही ठाऊक नसेल. पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान तीव्र गतीने वाढत आहे. दहा वर्षांपूर्वी वैज्ञानिक शोध कल्पित कथा आहेत असे वाटत होते, पण त्या आता जुन्या बातम्या झाल्या आहेत. हा मुद्दा समजून घेण्यासाठी कल्पना करू या की, समजा एखाद्या सरकारने आपल्या नागरिकांना सांगितले की, सर्व लोकांनी आपल्या शरीराचे तापमान आणि हृदयाच्या गतीचे २४ तास निरीक्षण करणारे बॉयोमेट्रिक ब्रेसलेट घालणे बंधनकारक आहे, तर मग काय होईल? ब्रेसलेटमधील डेटा सरकारी अल्गोरिदममध्ये जाईल आणि त्याचे विश्लेषण केले जाईल. आपण आजारी आहोत, हे आपणा स्वतःला कळण्यापूर्वी आपली तब्येत ठीक नाही हे सरकारला समजेल. आपण कोठे गेला होता, कोणास भेटला होता, हेदेखील त्या सिस्टीमद्वारे सरकारला कळेल. त्यामुळे ही संक्रमण शृंखला लहान केली जाऊ शकेल किंवा मग बऱ्याच वेळा तोडलीही जाऊ शकेल. अशी प्रणाली काही दिवसांत संक्रमण काढूनही टाकू शकेल. हे सर्व ऐकायला किती छान वाटते, नाही का?
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
तर मग आता त्यातील धोका समजून घ्या. तो एक भयानक पाळत ठेवण्याच्या सत्तेचा नियम सुरू करेल. उदाहरणार्थ, एखाद्यास जर हे माहीत झाले की, फॉक्स न्यूजऐवजी मी सीएनएनच्या लिंकवर क्लिक केले आहे, तर ते माझ्या राजकीय विचाराबरोबरच काही प्रमाणात माझे व्यक्तिमत्त्वदेखील समजू शकतील. तसेच मी एखादी व्हिडिओ क्लिप पाहतानाचे जर कोणी निरीक्षण करत असेल तर ती पाहताना माझ्या शरीराचे तपमान, रक्तदाब आणि हृदय गती यांवरून मला कोणत्या प्रसंगी राग येतो, मी कधी हसतो किंवा रडतो हे देखील त्याला समजू शकेल.
आपण ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की, ताप अगर खोकला येणे ही जशी एक जैविक प्रक्रिया आहे, तशीच राग येणे, आनंद होणे, कंटाळा येणे किंवा मग प्रेमाची भावना निर्माण होणे हीसुद्धा एक जैविक प्रक्रिया आहे. खोकला ओळखू शकणारे तंत्रज्ञान आपले हसणेसुद्धा ओळखू शकते. जर सरकारांना आणि मोठ्या कंपन्यांना आमचा डेटा मोठ्या प्रमाणात संग्रहित करण्याचे स्वातंत्र्य मिळाले तर मग ते आपल्याला आपल्यापेक्षाही जास्त चांगले समजून घेतील. ते आपल्या भावभावनांचा आगाऊ अंदाज घेण्यास सक्षम असतील, एवढेच नाही तर ते आपल्या भावनांशीही खेळण्यास सक्षम होतील. त्यांना जे पाहिजे ते आम्हाला विकू शकतील - मग ते उत्पादन असो की एखादा नेता. बायोमेट्रिक डेटा काढल्यानंतर केंब्रिज अॅनालिटिका पाषाण युगातील तंत्रज्ञान असल्याचे वाटू शकेल. कल्पना करा, २०३०पर्यंत उत्तर कोरियामधील प्रत्येक नागरिकाने बायोमेट्रिक ब्रेसलेट घातला आहे. त्यांच्या महान नेत्याचे भाषण ऐकल्यानंतर, ज्यांना राग आला आहे, त्याचे काम तमाम झालेच म्हणून समजा.
आणि हो, तुम्ही असे म्हणू शकाल की, बायोमेट्रिक पाळत ठेवण्याची व्यवस्था आणीबाणीस सामोरे जाण्यापुरती तात्पुरती व्यवस्था असेल. आणीबाणी संपल्यावर ही बंधने काढल्या जातील. पण नाही. अशा तात्पुरत्या यंत्रणेची अशी वाईट सवय असते की, त्या आपत्कालीन परिस्थितीनंतरही कायम राहतील. कारण नाहीतरी नवीन आणीबाणीचा धोका कायम राहत असतोच. उदाहरणार्थ, माझ्या स्वत:च्या इस्रायल देशात १९४८च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या अंतर्गत जमीन जप्त करण्याचे औचित्य सिद्ध करण्यासाठी प्रेस सेन्सॉरशिपपासून पुडिंग बनवण्यापर्यंतची अनेक कारणे दिली गेली होती. होय, मी गंमत करत नाही, पुडिंग बनवण्यासाठीसुद्धा. स्वातंत्र्याचा लढा तर आम्ही केव्हाच जिंकला. परंतु इस्त्राईलने कधीही आपत्कालीन काळ संपल्याचे जाहीर केले नाही. १९४८चे अनेक ‘तात्पुरते उपाय’ अजूनही अंमलात आहेत, ते काढले गेले नाहीत. पण २०११मध्ये पुडिंग्ज बनवण्यासाठी जमीन ताब्यात घेण्याचे कायदे मात्र रद्द केले गेले आहेत, हे कृतज्ञतापूर्वक नमूद केले पाहिजे.
करोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झाला आहे, तरीही डेटासाठी-भुकेलेली सरकारे बायोमेट्रिक पाळत ठेवणे दूर करण्यास नकार देऊ शकतात. सरकार कदाचित असा दावा करू शकते की, करोना विषाणूची आणखी दुसरी फेरी येत आहे किंवा इबोला पुन्हा आफ्रिकेत पसरत आहे, किंवा मग आणखी काहीतरी... आपण समजू शकता.
आपल्या व्यक्तिगत गोपनीयतेबद्दल बऱ्याच वर्षांपासून एक मोठा संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षात करोना व्हायरसचा संसर्ग हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. जेव्हा लोकांना व्यक्तिगत गोपनीयता की आरोग्य या दोनपैकी एकाचीच निवड करण्याचा पर्याय असेल, तेव्हा ते साहजिकच आरोग्याची निवड करतील.
.................................................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या युव्हाल नोआ हरारी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/4406/Sapiens-
..................................................................................................................................................................
वास्तविक पाहता, लोकांना आरोग्य आणि गोपनीयतेपैकी एकाचीच निवड करायला सांगणे, हेच खरे या समस्येचे मूळ आहे. कारण तसे सांगणेच मुळी योग्य नाही. आम्हाला गोपनीयता आणि आरोग्य हे दोन्ही मिळू शकतात. आम्ही सर्वसमावेशक पाळत ठेवणारी यंत्रणा लागू करून नव्हे तर नागरिकांची जाणिव जागृती वाढवून कोरोना विषाणूचा प्रसार रोखू शकतो. अलीकडच्या काळात दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चांगली उदाहरणे घालून दिली आहेत. या देशांनी काही ट्रॅकिंग आप्लिकेशन्स वापरली आहेत, परंतु त्याहीपेक्षा त्यांनी व्यापक स्तरावर चाचण्या घेतल्या आहेत, प्रामाणिक माहिती दिली आहे, जागरूक लोकांच्या ऐच्छिक सहकार्यावर ते अवलंबून आहेत.
उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी केन्द्रीयकृत पाळत ठेवणे आणि कठोर शिक्षा करणे आवश्यक नसते. जेव्हा लोकांना वैज्ञानिक तथ्य सांगितले जाते, तेव्हा ते स्वतः होऊन त्याची अंमलबजावणी करतात. जेव्हा अधिकारी सत्य बोलतात तेव्हा लोक त्या अधिकाऱ्यावर विश्वास ठेवतात आणि आपोआपच योग्य पाऊले उचलतात. त्यासाठी ‘बिग ब्रदर’च्या करड्या नजरेची आवश्यकता नसते. पोलिसी बळावर उदासीन लोकांनी केलेल्या प्रयत्नापेक्षा जागरूक असलेली जनता जेव्हा स्वयंप्रेरणेने कोणतेही कार्य करते, तेव्हा ते कार्य अधिक प्रभावी ठरते.
उदाहरणार्थ, साबणाने हात धुणे. मानवी स्वच्छतेच्या इतिहासातील ही एक मोठी प्रगती आहे. हे साधे काम दरवर्षी कोट्यवधी लोकांचे जीव वाचवते. आता आपण ही एक सामान्य गोष्ट मानतो. १९व्या शतकातील शास्त्रज्ञांनी साबणाने हात धुण्याचे महत्त्व योग्य प्रकारे समजून घेतले, परंतु त्याआधी डॉक्टर्स आणि परिचारिकादेखील एका शस्त्रक्रियेनंतर दुसरी शस्त्रक्रिया हात न धुताच करत असत. आज कोट्यवधी लोक दररोज आपले हात साबणाने धुतात, कारण ते पोलिसांना घाबरतात म्हणून नव्हे, तर त्यांना आता वस्तुस्थिती समजली आहे म्हणून. मी बॅक्टेरिया आणि विषाणूंचे जीवघेणे परिणाम ऐकले आणि वाचले आहेत, म्हणून मी नेहमी साबणाने हात धुतो. मला माहीत आहे की, साबण आजारी पाडणाऱ्या त्या बॅक्टेरिया आणि विषाणूंचा नाश करते.
लोकांनी सहमत होऊन सहकार्य करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे खूप महत्त्वाचे आहे. लोकांचा विज्ञानावर विश्वास असावा, सरकारी अधिकाऱ्यावर आणि माध्यमांवर विश्वास ठेवायला हवा. परंतु गेल्या काही वर्षांत बेजबाबदार नेत्यांच्या वर्तनामुळे लोकांचा विज्ञान, सरकारी संस्था व अधिकारी आणि माध्यमांवरील सार्वजनिक विश्वास मुद्दाम गमावला आहे. हे बेजबाबदार नेते निरंकुशपणाचा मार्ग अवलंबण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे ते असा प्रचार करत आहेत की, जनता योग्य कार्य करेल, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
.................................................................................................................................................................
‘२१ व्या शतकासाठी २१ धडे’ या युव्हाल नोआ हरारी यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5161/21-vya-shatakasathi-21-dhade
..................................................................................................................................................................
वर्षानुवर्षाच्या बेजबाबदार वर्तनातून तुटलेला विश्वास एका रात्रीतून मिळवता येत नाही. परंतु आताची वेळ सामान्य नाही. संकटाच्या वेळी मन खूप लवकर बदलते. आपल्या सख्ख्या भावा-बहिणींशी तुमचा झगडा झालेला असतो, पण एखाद्या संकटकाळात अचानक तुम्हाला असं जाणवते की, दोघांमधील प्रेम आणि विश्वास कितीतरी अतूट आहे. अशा वेळी आपण एकमेकांच्या मदतीसाठी तयार असतो. तेव्हा आताच्या संकट काळात पाळतीच्या निरंकुश सत्तेचे नियम तयार करण्याऐवजी विज्ञान, सरकारी संस्था व अधिकारी आणि माध्यमांवर जनतेचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी काम केले पाहिजे, ज्यामुळे नागरिकांना बळ मिळेल अशा पद्धतीने सरकारने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. नागरिकांनीदेखील ‘मी माझ्या शरीराचे तापमान आणि रक्तदाब मोजण्याच्या बाजूचा आहे, परंतु सरकारला सर्वशक्तिमान करण्यासाठी मी हा डेटा वापरण्याच्या बाजूचा नाही.’ आपण जाणीवपूर्वक आपला वैयक्तिक डेटा वैयक्तिक निर्णय घेण्यासाठी वापरला पाहिजे आणि सरकारला त्याचा गैरवापर करण्यापासून रोखले पाहिजे.
मी जर माझ्या आरोग्यावर चोवीस तास लक्ष ठेवले तर मी जेव्हा इतरांना धोक्याचा ठरू शकेल, हे माझ्या लक्षात येईल, तेव्हा मी इतरांपासून केव्हा वेगळा होऊ, याचा निर्णय घेण्यास मी सक्षम होईन. त्याचबरोबर आरोग्यासाठी मी कोणत्या सवयी अवलंबल्या पाहिजेत. जर मला करोना विषाणूच्या प्रसाराबद्दल विश्वसनीय डेटा सापडला आणि त्याचे विश्लेषण केले तर मी, सरकार सत्य सांगत आहे की नाही हे ठरवण्यास सक्षम होईन आणि या महामारीचा सामना करण्यासाठी माझ्याकडून योग्य पद्धती अवलंबल्या जातील. आम्ही जेव्हा जेव्हा आपल्यावरील पाळत ठेवल्याच्या पद्धतीबद्दल बोलतो, तेव्हा हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण सरकारवर देखील पाळत ठेवू शकतो.
करोना विषाणूचा प्रसार हा नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्याची एकप्रकारची परीक्षाच आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वांनी निराधार कथा आणि स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी खोटीनाटी आश्वासने देणाऱ्या नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी, वैज्ञानिक डेटा आणि आरोग्य तज्ज्ञांवर विश्वास ठेवला पाहिजे. जर आपण योग्य निर्णय घेतले नाहीत तर आपण आपले सर्वांत मौल्यवान स्वातंत्र्य गमावून बसू. आम्ही असे गृहीत धरू शकतो की, आपल्या आरोग्याचे रक्षण करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.
आता आपणाला दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्याची निवड करायची आहे. ही निवड आम्हाला राष्ट्रीय वेगळेपणा जपायचा आहे की, जागतिक एकता वाढवायची, यांच्यात करायची आहे. ही महामारी आणि त्याचा जगातील सर्वच अर्थव्यवस्थांवर होणारा दुष्परिणाम हे जागतिक संकट आहे. केवळ जागतिक सहकार्यानेच हे संकट दूर केले जाऊ शकते. सर्वप्रथम जगातील देशांना विषाणूचा सामना करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करावी लागेल. एकमेव तीच गोष्ट मानवांला विषाणूंपेक्षा वरचढ ठरवू शकते. अमेरिकेचा करोना व्हायरस आणि चीनचा कोरोना विषाणू लोकांच्या शरीरात कसे घुसायचे याची चर्चा करू शकत नाहीत. परंतु चीन अमेरिकेला काही उपयुक्त गोष्टी सांगू शकतो. मिलानच्या डॉक्टरांना सकाळी इटलीमध्ये मिळणारी माहिती संध्याकाळपर्यंत तेहरानमधील लोकांचे प्राण वाचवू शकते. या विशाणुबद्धल ब्रिटन सरकारची बरीच कोंडी होत असेल तर ते कोरियन सरकारशी याबाबत बोलू शकतील, कारण ते साधारण एक महिन्यापूर्वीपासून अशाच अनुभवातून गेले होते. पण तसे होण्यासाठी या देशात जागतिक बंधुत्व आणि मानवी एकत्वाची भावना असणे आवश्यक आहे.
यासाठी जगातील सर्वच देशांना मोकळेपणाने माहितीची देवाणघेवाण करावी लागेल, विनम्रतेने सल्ला मागावा लागेल आणि इतर जे सल्ला देतील त्यावर विश्वास ठेवण्यासारखे वातावरण तयार करावे लागेल. वैद्यकीय किटचे उत्पादन व वितरण करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. आपल्याच देशात उत्पादन आणि त्याची उपकरणे जमा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी समन्वयाने केलेले जागतिक प्रयत्न अधिक प्रभावी ठरतील. लढाईच्या वेळी जगातील देश जसे आपले उद्योग राष्ट्रीयकृत करतात, त्याचप्रमाणे कोरोना विषाणूविरूद्ध लढताना आपण फक्त आपल्याच देशात वस्तू साठविण्याऐवजी अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनाचे मानवीकरण केले पाहिजे. एक समृद्ध देश जिथे करोनाचा संसर्ग कमी आहे, त्यांनी अशा देशांमध्ये आपली उपकरणे पाठविली पाहिजेत की, जिथे संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांच्या नियुक्तीच्या बाबतीतही असेच प्रयत्न केले पाहिजेत.
विविध देशांच्या अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी जागतिक धोरणदेखील तयार केले पाहिजे; प्रत्येक देश स्वतःच्याच धोरणाने चालला तर संकट आणखी तीव्र होईल. त्याचप्रमाणे प्रवासाबद्दलसुद्धा एकमत झाले पाहिजे. प्रवासावर दीर्घ मुदतीसाठी पूर्ण बंदी आणल्यास सर्वांचेच फार मोठे नुकसान होइल आणि करोनाविरूद्धचा लढादेखील कमकुवत होईल. कारण शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि विविध वस्तूंचा पुरवठादेखील जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत करावा लागेल. प्री-स्क्रीनिंगद्वारे विविध देशांना भेटी देणे सुरू केले पाहिजे.
परंतु खंत याची वाटते की, यापैकी कोणतीही बाब घडत असल्याचे दिसत नाही. जगभरातील बहुतांश सरकारे त्यांना जणू काही पक्षाघात झाल्या प्रमाणे वागत आहेत. जगातील सात श्रीमंत देशांच्या नेत्यांची बैठक आत्ता कोठे गेल्या आठवड्यात टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यातही जगातील सारे देश एकवटून करोनाशी लढू शकतील, अशी कोणतीही योजना पुढे ठेवली गेली नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
२००८च्या आर्थिक संकटावेळी आणि २०१४ साली इबोलाच्या उद्रेकात अमेरिकेने जागतिक नेत्याची भूमिका बजावली होती, परंतु या वेळी मात्र अमेरिकेच्या नेतृत्वाने या कामात चालढकल केली आहे. त्यांच्या वागण्यातून असे दिसते की, अमेरिकेचे मोठेपण मानवतेच्या भवितव्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या ‘अमेरिका फर्स्ट’शीच अधिक जोडले आहे. त्यांच्या सध्याच्या नेतृत्वाने आपल्या जवळच्याच् सहकाऱ्यांना देखील वाऱ्यावर सोडले आहे. युरोपियन युनियनशी कोणतेही सहकार्य केले नाही आणि करोनाच्या लसीबाबत जर्मनीत तर एक विचित्र घोटाळा सुरू झाला आहे.
तेव्हा आता आपणाला जागतिक एकत्वाकडे जायचे आहे की, मग राष्ट्रीय वेगळेपणाच्या दिशेने जायचे आहे, ते निवडले पाहिजे. जर आपण राष्ट्रीय अलिप्तता निवडली तर अधिक नुकसान करून हे संकट आणखी लांबणीवर पडेल आणि भविष्यातही अशा प्रकारची अनेक संकटे येतील, त्यांच्याशीही तोंड देणे कठीण जाईल. परंतु आम्ही जागतिक एकत्व निवडल्यास, केवळ आताच्या करोनाविरुद्ध आपला मोठा विजय होईल इतकेच नव्हे तर, २१व्या शतकात पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व मिटवणाऱ्या भविष्यातील येणाऱ्या संकटासही सामोरे जाण्यास आपण समर्थ होऊ शकू.
..................................................................................................................................................................
हरारी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा राजेश प्रियदर्शी यांनी केलेला हिंदी अनुवाद www.deshvidesh.net या हिंदी मासिकामध्ये प्रकाशित झाला आहे. त्यावरून हा मराठी अनुवाद कॉ. भीमराव बनसोड यांनीकेला आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment