पुष्पाताई नसणं म्हणजे...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रा. पुष्पाताई भावे (२६ मार्च १९३९ - ३ ऑक्टोबर २०२०)
  • Sat , 10 October 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली पुष्पा भावे Pushpa Bhave

म्हटलं तर हे आत्मपर आहे, पण त्यात पुष्पाताई भावे असल्यानं या कथनाला एक वेगळा संदर्भ येणार, हे उघडच आहे.

पुष्पाताईंची ओळख ओळख झाली, त्याला आता ४०वर वर्षं उलटून गेली असावीत. माझी त्यांच्याशी ओळख मृणालताई गोरे यांनी करून दिली, हे पक्कं आठवतं. ते साल बहुधा १९७९ असावं. त्यानंतरची अनेक वर्षं पुष्पाताईंची भाषण ऐकणं, त्यांच्या सहभागातून उभ्या राहणाऱ्या चळवळी बघणं; त्याच्या बातम्या करणं या भूमिकेतच वावरलो. हळूहळू बोलणं होऊ लागलं, पण त्यात माझ्या बाजूनं संकोचाचा भाग जास्त होता. (संकोच मावळण्यासाठी दहा वर्षं जावी लागली, मग माझ्या बाजूनेही संवाद सुरू झाला. तोवर मी नागपूरला पडाव टाकलेला होता.) कारण पुष्पाताईंचं बहुपेडी, विद्वत, धारदार व्यक्तिमत्त्व. कुठलाही विषय निघावा आणि बाईंना त्याची माहिती नसावी, असं कधी घडलंच नाही.

विचारवंत, समीक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ती अशा विविध रूपांत पुप्पाताईंना बघायला मिळालं. त्यांचं बहुतेक सर्व लेखनही वाचत होतो, त्यातलं काही समजत होतं, काही नाही. त्याही पलीकडे जाऊन विवेकाचा तो कणखर आवाज होता. चळवळीतील शुद्धतेची ती ज्योत होती. प्रसंगी रणरागिणी होती. एक अत्यंत जिगरबाज, लढवय्यी वृत्ती होती. त्यापलीकडे जाऊन माणूस म्हणून लोभसपणे पुष्पाताई मला कायमच भावल्या. पुष्पाताई भावे यांचं देहावसान म्हणजे आपल्यातून हे इतकं वजा होणं आहे...

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

माझं वास्तव्य प्रदीर्घ काळ नागपुरात झालं. दोन टप्प्यांत मिळून हा कालावधी साधारण साडेचोवीस वर्षांचा आहे. पुष्पाताई नागपूरला आल्या की, मी त्यांना आवर्जून भेटत असे. गप्पाटप्पा होत. त्यात माझ्या प्रश्नांचाच ओघ जास्त असे. दरम्यान आक्टोबर १९९६ ते मार्च २००३ पत्रकारितेच्या निमित्ताने मी मुंबई आणि औरंगाबादला होतो. मुंबईच्या काळात पुष्पाताईंच्या भेटी काहीशा वाढल्या. नेमकं याच काळात ‘किणी’ प्रकरण घडलं.

एकूणच सत्ताधाऱ्यांच्या आणि त्यातही विशेषत: लोकांच्या भावनेला हात घालून सत्ता प्राप्त केलेल्या एककल्ली राज्यकर्त्यांविरुद्ध उभं राहणं फार कठीण असतं. लोकशाहीवर ज्यांची निष्ठा आहे, अशा सत्ताधाऱ्यांना वैध मार्गाने होणारा विरोध थोडाफार तरी सहन होतो, पण अहंकारी, एकारलेले राज्यकर्ते मात्र विरोधाचा ‘ब्र’ही सहन करू शकत नाहीत. असे सत्ताधारी व त्यांचे समर्थक व कार्यकर्ते कायम उन्मादित असतात आणि स्वाभाविकच तारतम्य व विवेक हरवलेले असतात.

किणी प्रकरणात या सत्तांध आणि उन्मादित प्रवृत्तींविरुद्ध पुष्पाताई ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या, ते तेज आणि त्यांच्यातल्या नैतिकतेचं ते बळ डोळे दिपवून टाकणारं होतं. किणी प्रकरणानंतर पुष्पाताई भेटल्या की, त्यांना पदस्पर्श करू लागलो. इतका त्यांच्या त्या धाडसी वर्तनानं मी भारून गेलेलो होतो. त्यांना पदस्पर्श करण्याची कृती नकळत, पण अंत:करणाच्या ऊर्मीतून सुरू झाली. पुढे बेगम मंगलाही त्या नमस्कार करण्यात सहभागी झाली. आमच्या या अशा कृतीमुळे पुष्पाताई संकोचून जात.

मार्च २००३ नंतर नागपूरला आल्या की, पुष्पाताईंची एक चक्कर आमच्याकडे होऊ लागली. आमचं वसंतनगरमधलं घर तसं खूपच लहान. त्यातच भरपूर पुस्तकं, सामान आणि कँडी या श्वानाचीही भर पडलेली होती. त्या छोट्याशा घरात आमच्याशिवाय अन्य कुणी आलेलं कँडीला सहन होत नसे. आमच्या छोट्याशा हॉलमध्ये दोन पलंग आणि त्यांना जोडून डायनिंग टेबल होता. डायनिंग टेबलची खुर्ची बाजूला सरकवून तेथे घरात असलेली फिरती खूर्ची लावून काम करण्याची माझी सवय होती.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुष्पाताई आल्या की, त्या खुर्चीत बसत. आमच्या घरात अगदी डायनिग चेअरवरही पहुडलेली पुस्तकं बघून त्यांना आनंद होत असे. ‘तुझं घर वाचणाराचं आहे’, असं त्या कौतुकानं म्हणत. त्यांना ‘गोकुळ वृंदावन’ या उडुपी हॉटेलमधला उपमा खूप आवडत असे. पुष्पाताईंना साधारण मी सकाळीच घेऊन येत असे. त्या उपम्याचा नाश्ता आटोपला की, पुष्पाताई, बेगम आणि माझी गप्पांची मैफल १२पर्यंत तरी नक्कीच रंगत असे. कँडी त्यांच्या पायाशी बसून मान वेळावत पुष्पाताईंचं बोलणं मन लावून ऐकत असे. पुष्पाताई उठल्यावर मात्र तो भुंकण्यातून तीव्र नाराजी व्यक्त करत असे. पहिल्यांदा असं घडलं, तेव्हा कँडीच्या आरडा-ओरड्याचं पुष्पाताईंना खूप आश्चर्य वाटलं आणि त्या काहीशा भांबवल्याही. ‘घरात आलेला आवडता माणूस बाहेर जायला निघाला की, श्वानाला असाच राग येतो’, असं पुष्पाताईंना मी त्यावर सांगितलं. ‘माणूस आवडतं तर हा वैर्‍यासारखा का भुंकतोय?’ असा प्रश्न त्यांना पडला. नंतरच्या प्रत्येक भेटीत पुष्पाताई निघाल्या की, कँडीला ‘निघाले रे वैर्‍या’ असं आवर्जून सांगत!

नागपूरला ‘मैत्री’ नावाची एक संस्था आहे. शुभदा फडणवीस, डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर वगैरे उत्साही मंडळी काही प्रबोधनाचे तर काही गंभीर उपक्रम राबवणारी ही संस्था चालवतात. पुरोगामी डाव्या विचारांच्या लोकांचे त्यांना कायमच आकर्षण असायचं. एकदा गप्पा मारताना कोणत्यातरी निमित्तानं पुष्पाताई भावे, कुमार केतकर, भास्कर लक्ष्मण भोळे या तिघांना एकाच व्यासपीठावर आणण्याची कल्पना शुभदानं मांडली. या तिघांना एकत्र आणणं किमान माझ्यासाठी तरी मुळीच कठीण नव्हतं, कारण या तिघांशीही असणारे समान विचारी संबंध. हवं होतं ते निमित्त. तेही लवकरच मिळालं. ‘लोकसत्ता’तील माझा स्तंभ ‘डायरी’ची प्रथम आवृत्ती ग्रंथाली या वाचक चळवळीतर्फे प्रकाशित झाली. (आता पुढची सुधारित आवृत्ती पुण्याच्या देशमुख आणि कंपनीनं देखण्या रूपात प्रकाशित केली आहे.) मुंबईत प्रकाशनाचा मोठा कार्यक्रम झाला. नागपुरातही प्रकाशन करू आणि या तिघांना एकत्र आणू असं मी सुचवलं. शुभदा – अविनाश – हेमंतनी ते मान्य केलं. त्याच म्हणजे सप्टेंबर महिन्यात एका संपादकीय बैठकीसाठी आमचे संपादक कुमार केतकर नागपूरला येणार होते. संपादकीय बैठकीच्या दुसऱ्या दिवशी नेमका रविवार होता.

प्रकाशनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ वाजता ठरवला. पुष्पाताई आणि भोळेंशी बोललो त्यांनीही होकार दर्शवला. भोळे सरांच्या प्रवासाचा प्रश्नच नव्हता, कारण ते नागपुरातच होते. पुष्पाताईंनी ‘प्रवासाची सोय मी माझी करून घेईल’, असं लगेच सांगून टाकलं. चार-पाच दिवसांनी सोबत अनंत भावेही येणार असल्याचं पुष्पाताईंनी कळवलं. पुष्पाताई आणि अनंत भावे या दाम्पत्याच्या निवासाच्या सोयीचा प्रश्नच नव्हता, कारण नागपूरला आलं की, प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्याकडे उतरण्याची त्यांची रीत होती.

ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला. श्रोत्यांत महेश एलकुंचवार, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. विनय वाईकर, डॉ. श्रीकांत चोरघडे, लीलाताई चितळे, तसंच दि. भा. उपाख्य नानासाहेब घुमरे, मा. गो. वैद्य, यशवंत मनोहर आणि भाऊ लोखंडे असे अनेक मान्यवर होते. सभागृह ओसंडून भरलेलं होतं. तो जणू, संवेदनशील आणि विचारी अभिजनांचा कुंभमेळाच होता. त्यामुळे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना मला अवघडल्यासारखं झालं, पण पुष्पाताई, केतकर आणि भोळे या तिघांनीही धुंवाधार भाषणे केली. उपस्थित नागपूरकर जाम खूष झाले नसते तर नवल होते!

पुष्पाताईंना आमंत्रित करण्याची जबाबदारी मी घेतल्यानं प्रवास खर्च आणि मानधनाचं पाकीट घेऊन त्यांना भेटायला गेलो. माझ्या हातातलं पाकीट बघितल्या बरोबर त्यांनी ‘मी तुझ्या कार्यक्रमासाठी काहीही घेणार नाही’, असं निक्षून सांगितलं. मी पटवण्याचा थोडासा प्रयत्न केला, पण त्यांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. शेवटी एलकुंचवारांनी ‘प्रवीण, पुष्पा ऐकणार नाही हे तुला ठाऊक नाही का? पुरे कर तू आता.’ असं म्हणून तो विषय संपवला. रेल्वे स्टेशनवर जाताना अनंत भावे यांनी कार उपाहारगृहासमोर थांबायला सांगून रात्रीच्या जेवणाची पॅकेटस घेतली आणि पैसेही त्यांनीच दिले. पुष्पाताई आणि अनंत भावे यांचा असा हा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळाला.

अशीच एक आठवण पुष्पाताईंच्या एका अप्रतिम भाषणाची आहे. भास्कर लक्ष्मण भोळे यांचं निधन झाल्यावर त्यांच्या स्मृत्यर्थ एक व्याख्यानमाला मैत्री संस्थेनं सुरू केली. पहिल्या व्याख्यानाला पुष्पाताईंना बोलवायचं ठरलं. मी फोन केला आणि प्रयोजन सांगितल्यावर त्या अर्थातच हो म्हणाल्या. आमच्यात इकडच्या–तिकडच्या गप्पा झाल्या. त्यात समाजाच्या विविध क्षेत्राचं सुरू असलेलं सुमारीकरण (Mediocrity) असा विषय निघाला. पुष्पाताई म्हणाल्या, ‘सुमारीकरण’ हाच विषय ठेवू यात. आमची काही हरकत असण्याचा प्रश्नच नव्हता.

व्याख्यानासाठी सभागृहात महेश एलकुंचवार आणि शुभदा फडणवीस यांच्यासोबत पुष्पाताई आल्या तेव्हा त्यांच्या हातात केवळ पर्स होती. व्याख्यानाच्या नोंदीचे कागद त्यांच्या पर्समध्ये असतील असं मला वाटलं. विषय हटके असल्यानं त्यांनी त्या नोंदी काढल्या असणार असा माझा होरा होता. प्रास्ताविक, स्वागत वगैरे झालं. पुष्पाताई रिक्त हस्ते, अगदी कागदाचा चिटोराही न घेता व्याख्यानाला उभा राहिल्या.

पुढचा दीड तास त्यांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक या चारही क्षेत्रातल्या सुमारीकरणाविषयी अत्यंत तर्कशुद्ध मांडणी केली. त्यात आकडेवारी होती, उदाहरणं होती, टोमणे होते आणि जबाबदार असणारांना टोलेही होते. त्यांच्या वाणीला विलक्षण धार होती, पण आक्रस्ताळेपणाचा लवलेश नव्हता, वैयक्तिक निंदा नव्हती. विद्वत्ता, करारीपणा, ठामपणा, तर्कशुद्धता यांचा तत्पूर्वी कधीही अनुभवायला न मिळालेला. समाजाविषयी वाटणाऱ्या तळमळ आणि लोकशाहीविषयी चिंता व्यक्त करणारा पुष्पाताईंचं व्याख्यान म्हणजे सामाजिक जाणिवेचा सुंदर गोफ होता. विचारी श्रोत्यांच्या संवेदनशील मनाच्या खिडक्या त्या व्याख्यानानं नक्कीच किमान तरी किलकिल्या झाल्या असणार.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुष्पाताईंशी शेवटची भेट दीडेक वर्षांपूर्वी औरंगाबादला झाली. अनंत भालेराव स्मृती पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या औरंगाबादला आल्या होत्या. कानावर आल्याप्रमाणे करारी पुष्पाताईंच्या देहाला अनेक व्याधींनी घेरलेलं होतं, त्या थकल्या होत्या तरी आवाजातला कणखरपणा मात्र शाबूत होता. पुरस्कार स्वीकारल्यावर नेहमीच्या तर्कशुद्ध शैलीत यांनी मांडणी केली. कार्यक्रम संपल्यावर पुष्पाताईंसोबत निमंत्रितांसाठी भोजन होतं. तिथे भेट झाली. काठी टेकवत हळूहळू चालत पुष्पाताई आल्या. मला एकटाच आल्याचं बघून त्यांनी विचारलं, ‘अरे, तुझी बेगम कुठं आहे?’.

मी मंगलच्या तब्येतीबद्दल सांगितलं. माझं ऐकून घेतल्यावर त्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल सांगितलं. मंगलाशी फोनवरही बोलता येणं शक्य नव्हतं. एव्हाना बेगमचं बोलणं आम्हा दोघा–तिघांनाच समजू शकत होतं. ते ऐकल्यावर माझा हात हातात घेऊन पुष्पाताईंनी धीराचं थोपटलं. अतिशय हळव्या स्वरात पुष्पाताई म्हणाल्या, ‘मी जिना चढू शकत नाही आणि तुझी बेगम जिना उतरू शकत नाही.’ झालेला भास होता की काय तो, हे माहिती नाही, पण पुष्पाताईंचे डोळे ओलावल्यासारखे वाटले. त्यांच्या हातात असलेला माझा हात अलगद सोडवून घेत, मी पाठ फिरवली.

पुष्पाताई भावे नावाची रणरागिणी भावनाप्रधान होते, हे अनुभवणं मला तरी शक्यच नव्हतं...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......