अजूनकाही
मानवी नातेसंबंध, भावनांचा खेळ दाखवताना त्यातून हळुवारपणे सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवायचं; वर्गसंघर्ष, पुरुषसत्ताक पद्धती, धार्मिकता, जातीव्यवस्था, राष्ट्रीयता असे अनेक कळीचे प्रश्न उभे करायचे; परंतु प्रेक्षकाला मात्र नाट्यमय कथासूत्रात गुंतवून ठेवायचं, अशी सगळी कसरत लीलया पार पाडली आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बीबीसीनिर्मित ‘अ सुटेबल बॉय’ या सहा भागांच्या वेबमालिकेने. विक्रम सेठ यांची नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचे चित्रण करणारी ही मूळ कादंबरी. ती पुस्तकरूपाने प्रकाशित झाली १९९३ साली, पण तिचा काळ आहे १९५१-५२ दरम्यानचा. मीरा नायर यांच्यासारख्या गुणी दिग्दर्शिकेने आणि अँड्रयू डेविस या लेखकाने मोठ्या कौशल्याने पडद्यावर उभी केली आहे.
दोन उच्चवर्गीय कुटुंबांतील युवा व्यक्तींची मुख्य कथानके आणि त्याला जोडलेली अनेक उपकथानके, यातून ही सामाजिक-सांस्कृतिक टिप्पणी उलगडत जाते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात मोकळा श्वास घेणाऱ्या कलकत्ता, बऱ्हाणपूर, लखनौ अशा शहरांचा प्रवास प्रेक्षकांना घडतो. स्वातंत्र्यानंतर स्वतःची ठाम ओळख, दिशा शोधणारा देश सतत कथासूत्राच्या पार्श्वभूमीवर असतो.
पहिलं मुख्य कथानक आहे लताचं. पदवी घेऊन इंग्रजी साहित्यात पुढील शिक्षण घेऊ पाहणारी लता एक प्रसन्न स्वभावाची, आयुष्य मनसोक्त जगणारी, स्वतःच्या विचाराचा आदर करणारी आणि म्हणूनच प्रवाहाच्या विरुद्ध जावं वाटलं तर गोंधळलेली युवती आहे. तिच्यासाठी ‘सुटेबल बॉय’ शोधण्याची तिच्या आईची धडपड वाढते, जेव्हा लताच्या मोठ्या बहिणीचं लग्न पार पडतं. ‘मला लग्नच करायचं नाही’ असं म्हणणारी लता तिच्या आयुष्यात हळूहळू आलेल्या तीन युवकांमुळे गोंधळते. कुणावर सर्वस्व लोटून द्यावं असं आकर्षण वाटतंय, कुठे मुलाचा धर्म वेगळा असणं आडवं येतंय, आईच्या म्हणण्यानुसार सुरक्षित आयुष्य असलेला मुलगा खुणावतो आहे, पण त्या सुरक्षित आयुष्य जगण्याच्या पलीकडे त्याचं स्वतःच्या पायावर ठाम उभं असणं तिला आवडतंय, कुठे आपल्या आवडीनिवडी जुळतात आणि ज्याच्या सहवासात छान वाटतं असा मुलगा आहे... अशा अनेक भावना-विचारांमध्ये लताचा स्वतःलाही शोधण्याचा प्रवास चालू आहे.
एकीकडे स्त्री म्हणून जी आयुष्याची परिणती अपेक्षित असते, त्या लग्न करण्याच्या दबावातून लताला तीचा जीवनसाथी निश्चित करायचा आहे, तर दुसरीकडे स्वतंत्र भारताला आपल्या पहिल्या निवडणुकीतून राजकीय ओळख निवडायची आहे. ही ओळख धार्मिक आधारावर असेल की, धर्मनिरपेक्ष असेल, श्रमिक वर्गावर होणारा अन्याय संपवणारी असेल की, भांडवली व्यवस्था मजबूत करणारी असेल, याचे सर्व कंगोरे देशाच्या राजकीय पटलावर पाहायला मिळत आहेत. लताला कथेमध्ये अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं, जिथं लैंगिक हिंसा आहे; तर देशाला धार्मिक हिंसेनं वेढलेलं असतं. लताच्या आयुष्यात असेही लोक आहेत, जे ब्रिटिश व्यवस्थेत रुळलेले आहेत, ज्यांना स्वातंत्र्याशी देणं-घेणं नाही, ज्यांची जीवनशैली स्वतंत्र भारतातल्या एका विलासी वर्गाचे प्रतिनिधित्व करते. अखेर लताचा निर्णय काय असतो? देशाचा निर्णय काय असतो? ते निर्णय घेण्याच्या मागे तर्क काय असतात? हे सगळं पडद्यावर पाहणंच रंजक.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
दुसरं कथानक आहे ‘मान’चं. प्रामाणिक, धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्या, आर्थिक समता आणू पाहणाऱ्या राज्य महसूल मंत्र्याचा मान हा तरुण मुलगा. ‘आयुष्यात काहीच विशिष्ट दिशा नाही’ असं हे पात्र असलं तरी ‘फक्त श्रीमंत बापाच्या पैशावर मजा मारणारा’ इतकंही ते सरधोपट पात्र नाही. मान समाजाने आखून दिलेल्या चौकटी न जुमानणारा आहे. त्याच्या मित्राशी धर्म, लैंगिकता या सगळ्या चौकटींच्या पलीकडे त्याचं नातं आहे, ज्या नात्याला नाव नाही. शहरातल्या सर्वांत (सु किंवा कु) प्रसिद्ध तवायफ (वेश्या) सईदाबाईच्या प्रेमात मान आकंठ बुडून जातो, तेव्हा वय, सामाजिक स्तर या सगळ्या चौकटी त्याच्या मनाला स्पर्शसुद्धा करत नाहीत. भान हरपून तो होळी साजरी करतो, भान हरपून श्रमिक महिलेवर होणारा अन्याय थांबवतो आणि भान हरपून गुन्हा करतो, प्रामाणिकपणे स्वतःचा गुन्हा कबूलसुद्धा करतो. मानला समाजाच्या नीतीनियमांनुसार ‘अनसुटेबल बॉय’ ठरवायचं की, योग्य भूमिका घ्यायला न घाबरणारा म्हणून ‘सुटेबल बॉय’ ठरवायचं या गोंधळात प्रेक्षक सतत राहतो.
मानवर नितांत प्रेम करणारी सईदाबाई म्हणूनच त्याला बहुधा ‘दाग’ म्हणून संबोधते, जे तत्कालीन उर्दू कवी होते. ब्रिटिश शासनाच्या खोल खुणा स्वतंत्र भारताच्या शासनात, न्याय व्यवस्थेत, शिक्षण व्यवस्थेत, सामाजिक परिस्थितीत सर्वत्र होत्या. असा स्वतंत्र भारतसुद्धा गोंधळलेलाच होता. चाकोरीत रहायचं की, स्वतःला काय योग्य वाटतंय, यावर आधारित आपली नवी ओळख निर्माण करायची हे शोधू पाहणारा. मानच्या भूमिकेत चढउतार आहेत, पण ‘नायक अखेरीस असा असा वागू लागला’ हा ठराविक निष्कर्ष मात्र नाही. देशाची परिस्थिती पण स्वातंत्र्योत्तर काळात काहीशी अशीच नाही का?
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मुळात भारत हा एक संघटित देश नाही, त्यात अनेक छोटे छोटे देश आहेत- प्रांत, भाषा, संस्कृती इत्यादीवर आधारित. प्रत्येकाची आपापली वेगळी कथा. तशीच या दोन मुख्य कथानकांच्या भोवती अनेक उपकथानके आहेत. यातलं प्रत्येक उपकथानक आपण तत्कालीन देशाच्या संस्कृतीशी सहज जोडू शकतो. सईदाबाई तवायफ तिच्या कलेमध्ये, बहिणीच्या जबाबदारीमध्ये आणि तिच्यावर नवाबाकडून होणाऱ्या शोषणामध्ये स्वतःचं अस्तित्व शोधते आहे. लताची आई नवऱ्याच्या गतस्मृतींमध्ये जगते आहे. हरीश नावाच्या एका होतकरू तरुणास देश अनवाणी राहू नये म्हणून बूट बनवायचा व्यवसाय घडवायचा आहे. एक तरुण साहित्यिक कल्पना विश्वात रमला आहे. घरातील मजुराला त्याची जमीन मिळवून देण्यासाठी मानचा मित्र रशीद जीवाचं रान करतो आहे. प्रत्येक उपकथानक देशाची, संस्कृतीची एक दुखरी बाजू उघड करतं. परंतु आख्खं कथानक फक्त सहा भागात बनवण्याची मर्यादा असल्याने यातील काही उपकथानकं पटकथेच्या पातळीवर अधुरी वाटत राहतात, ही एक मोठी उणीव.
पटकथेमधील अशा काही उणीवा भरून काढल्या असतील तर त्या पात्रांची निवड आणि अभिनयानं. अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुरेख मिलाफ साधला आहे. तब्बूने साकारलेली ‘सईदाबाई’, ईशान खट्टर ‘मान’ म्हणून आणि तान्या मानिक्तला ‘लता’ म्हणून त्यांचं काम इतकं चोख बजावतात की, त्यांच्या व्यक्तिरेखांची सामाजिक रूपकं तुम्ही नकळत अनुभवता. माहिरा कक्कर (लताची आई), राम कपूर (मानचे वडील), जोयीता दत्ता (सईदाची बहीण), दिनेश रिझवी (कबीर दुराणी), नमित दास (हरीश), विजय वर्मा (रशीद), शहाना गोस्वामी (मीनाक्षी), शुभम सराफ (फिरोज) यांची कामं वाखाणण्याजोगी. विनय पाठक, विजय राज, रणवीर शौरी, मनोज पाहवा, रणदीप हुडा, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, आमीर बशीर या गुणवान कलाकारांच्या भूमिका कमी लांबीच्या असल्या तरी महत्त्वाच्या आहेत. ताकदीचा अभिनय नसता तर ही मालिका नक्कीच फिकी वाटली असती, यात शंका नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
स्वातंत्र्योत्तर मोकळा श्वास आपल्याला स्थानांच्या, बारीकसारीक तपशिलांमध्ये जाणवत राहतो. चकचकीत निर्मिती मूल्य ठेवूनसुद्धा जुना काळ जसाच्या तसा उभा करता येऊ शकतो हे पटते. सईदाबाई ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा तवायफ असल्याने त्या अनुषंगाने तत्कालीन उर्दू कवी आमीर मीनाई यांचे ‘मेहफिल बरखास्त हुई’, दाग देहेलवी यांचे ‘मुझे बुरा न कहिये’ या रचनांचा पूरक वापर केला आहे. उस्ताद माजीद खान यांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमातील सारंगी वादनाचा प्रसंगाचा लताच्या हुरहूर लागलेल्या मन:स्थितीसाठी सुरेख वापर करून घेतला आहे.
गेल्या काही वर्षांतला भारत बघितला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वाढत चाललेली आहे. धार्मिक किंवा राष्ट्रीय ओळख विचारात घेऊन कलेवर, कलाकारांवर बंदी घातली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत मालिकेतील स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कलेच्या माध्यमातून जिवंत असलेले हिंदू-मुस्लीम ऐक्य मनास स्पर्शून जाते. राष्ट्रीयतेच्या अविवेकी व्याख्या आज जन्म घेत आहेत. अशा वेळेस आपली राष्ट्रीय ओळख शोधणाऱ्या स्वतंत्र भारताचे पुनरावलोकन करण्याची एक संधी प्रेक्षक म्हणून मिळते. पुरुषसत्ताक पद्धती, वर्गसंघर्ष, कडक विवाहसंस्था यातलं काय आपण गमावलं, काय कमावलं याचा नकळत आढावा घेतला जातो.
रंजक पद्धतीने, उपदेश न करता परंतु सामाजिक पद्धतीवर भाष्य करणारे कलाप्रकार हे नेहमीच दीर्घकाळ समाजाच्या स्मरणात राहणारे असतात. ‘अ सुटेबल बॉय’ हा या पठडीतलाच एक प्रयत्न समजायला हरकत नाही. तुम्हाला तुमच्या रंजनासाठी, विचार प्रक्रियेसाठी तो ‘सुटेबल’ वाटतोय का, हे जरूर पहा!
..................................................................................................................................................................
लेखक अनुज घाणेकर मानववंशशास्त्रज्ञ व समुपदेशक आहेत.
anujghanekar2@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment