अजूनकाही
कोलकात्याची संगीत रिसर्च अकादमी (आयटीसी), मुंबईची म्युझिक फोरम आणि राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एनसीपीए) यांनी शनिवार २१ जानेवारी आणि रविवार २२ जानेवारी या दोन दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं. विषय होता (इंग्रजीतून) ‘भारतीय संगीत – तेव्हा आणि आता’. वैदिक काळापासून आजपर्यंतच्या भारतीय संगीताचा प्रवास असा हा विषय होता. पं. अरविंद परीखप्रणीत म्युझिक फोरमच्या काही बैठकांमध्ये विषय निश्चितीवर चर्चा होत होती. सामगायन, जातिगायन, प्रबंध अशा प्राचीन संगीत प्रकारांशी आजचं संगीत काय आणि कसं नातं सांगतं हे पटावं. अभ्यासक जाणकारांकडून समजून घ्यावं असा हेतू हा विषय निश्चित करण्यामागे होता.
परिसंवादाचं पहिलं सत्र होतं – ‘वैदिक संगीत ते भरतमुनींचं नाट्यशास्त्र’. कोलकात्याचे संगीत अभ्यासक पियाल भट्टाचार्य यांनी या सत्रात आपल्या संशोधनाची प्रस्तुती केली. सामक मित्र आणि शुभेंदू घोष या दोन तरुण संशोधकांनी त्यांना साथ दिली. पियाल भट्टाचार्य यांनी वैदिक संगीताचा वेध आपण कसा घेत आहोत हे श्रोत्यांना सांगितलं. ध्वनिमुद्रित स्वरूपात हे संगीत उपलब्ध असूच शकत नाही. मौखिक परंपरेनं तरी हे संगीत आज कुठे, किती प्रमाणात उपलब्ध आहे, याचा शोध पियाल यांनी घेतला. भारतात अजून काही सामवेदी-साम गायन करणारे पुरोहित आहेत. त्यांच्यापाशी गुरुमुखी विद्या आहे, प्राचीन ऐतिहासिक ऐवज त्यांनी जपला आहे, पण ते काही इतिहास संशोधक नाहीत. त्यामुळे त्यांना एक तर फार काही प्रश्न पडलेले नाहीत आणि आधुनिक संशोधकांनी त्यांना काही प्रश्न विचारले तर ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे ही मौखिक परंपरा इतिहास संशोधनासाठी पुरेशी सामग्री ठरत नाही. म्हणून या परंपरेची पडताळणी पियाल यांनी अल्प संशोधन सामग्रीबरोबर जाऊन करून पाहिली.
प्राचीन ग्रंथांत ज्या वाद्यांचा उल्लेख आहे, त्या वाद्यांची वर्णनं त्यांनी शोधली. त्या वर्णनांबरहुकूम वाद्यं आज कुठे अस्तित्वात आहेत का, याचा त्यांनी शोध घेतला. प्राचीन वाद्यांची ओळख पटवण्याच्या कामी प्राचीन शिल्पाकृती खूप उपयोगाच्या ठरल्या. या सर्व साधनांचा समन्वय साधून त्यांनी प्राचीन वाद्यांच्या प्रत्यक्ष वाजणाऱ्या प्रतिकृती निर्माण केल्या. हे काम खूपच किचकट आहे. पण संशोधन म्हणजे चिकाटी हे सूत्र त्यांनी अनुसरलं. या वाद्यनिर्मितीच्या प्रकल्पात खूपच बारीकसारीक तपशील त्यांना गोळा करावा लागला. त्या तपशीलाचं उपयोजन करावं लागलं. प्रस्तुत परिसंवादात त्यांनी प्राचीन वीणांच्या प्रतिकृती बरोबर आणल्या होत्या. सामक आणि शुभेंदू यांनी त्या वाजवूनही दाखवल्या.
राजा रविवर्मा यांनी चितारलेल्या सरस्वतीच्या चित्र-प्रतिमेत दिसते तशी ती प्राचीन वीणा दिसत नव्हती. अन्नपूर्णा देवीच्या हातात जे आयुध असतं, त्याला आपण ‘वाढपाची पळी’ म्हणतो, पण प्राचीन शिल्पांमधली वीणावादिनीच्या हातातली वीणा साधारण त्या पळीसारखीच दिसली बुवा! (आता या अन्नपूर्णेचा नीट शोध घ्यायला हवा, जिला आपण अन्नपूर्णा म्हणतो आणि तिच्या दोन हातांत मिळून तिने धरली आहे ती अन्नपूर्णेची पळी असं आपण समजतो. ती देवी वीणावादिनी असायची!) प्राचीन वीणा जरा जास्तच लांब दांड्याच्या तुणतुण्यासाररखी दिसली. असो. या एकतारी वीणेबरोबरच सामक-शुभेंदूंनी आणखी एक वेगळी वीणा दाखवली आणि वाजवली. ही दुसरी वीणा म्हणजे हार्प- विविध लांबीच्या तारांची सारणी. या तारा त्या काळी धातूच्या नव्हत्या, तर प्राणिज किंवा वनस्पतीज होत्या.
प्राचीन भारतीय वाद्यं (प्रामुख्याने वीणा) आणि गायन परंपरा यांचा मागोवा घेत पियाल ब्रह्मदेश आणि कंबोडियात पोचले. या देशांतील काही वांशिक समूहांनी जपलेल्या त्यांच्या प्राचीन परंपरा आपल्या भारतीय परंपरांशी बऱ्याच मिळत्याजुळत्या आहेत. वाद्यनिर्मिती आणि वादन या प्रदेशात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं सोपवलं जातं हे पियाल यांनी अभ्यासलं. त्या पद्धती अनुसरून त्यांनी आपल्या शिष्यांना प्राचीन वीणेची रचना आणि वादनपद्धती शिकवली.
दुसरीकडे सामक आणि शुभेंदू यांनी सामगायनाची रीतसर दिक्षा (महत्प्रयासाने!) घेतली. सामगायन प्रामुख्यानं तीन स्वरांत होतं.
चार, पाच, सहा आणि सातही सुरांचा अंतर्भाव असलेल्या सामगायन परंपरा भारतात आजही जतन केल्या गेल्या आहेत. सामक आणि शुभेंदू सामगायनाचे पाठ अजूनही घेत आहेत. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सात सुरांचे साम उपलब्ध आहेत आणि त्यांचे अजून ते शिकून व्हायचे आहेत. या दोघा तरुण संशोधकांनी बहुतंत्री वीणेच्या (हार्प) साथीनं काही सामगायन गाऊन दाखवलं. आज गायले जाणारे साम आणि त्यांचं ग्रंथांत उपलब्ध असलेलं शास्त्र यांची सांगड घालणं फारच जिकिरीचं, पण आवश्यक होतं (आहे). पियाल यांनी अनेक संदर्भ एकमेकांशी ताडून मौखिक परंपरा आणि ग्रांथिक शास्त्र यातील तफावत स्वयंप्रज्ञेनं दूर केली.
हे वीणावादनाच्या साथीनं झालेलं सामगायन कसं होतं?
आजच्या संगीत पद्धतीच्या दृष्टीनेही ते सांगीतिक सुरेल होतंच, पण अतिशय बंदिस्त (निबद्ध) होतं. आजच्या संवेदनेचं लालित्य त्यात मुळीच नव्हतं. त्यात रागाचा भास-आभास नव्हता आणि ते सप्तक संकल्पनेशी बांधलेलं नव्हतं. वैदिक संगीतात सा-रे-ग-म-प-ध-नी अशी क्रमवार स्वरव्यवस्था असलेली सप्तक ही मूलभूत अशी संकल्पना नव्हती. न्यास, विन्यास, अपन्यास अशा स्वरावलीशी संबंधित संकल्पना- नव्हे शास्त्र मर्यादाच होत्या. सप्तक नव्हतं तर काय होतं? एक-दुसऱ्याशी नैसर्गिक नातं सांगणाऱ्या स्वरांच्या जोड्या म्हणजे स्वरसंवाद हे तत्त्व होतं. जे प्रात्यक्षिक ऐकवलं गेलं, त्यात षडज-मध्यम (सा-म) हे स्वरनातं होतं (मध्यमग्राम, सा-म स्वरसंगती!)
आजच्या सांगीतिक मूलभूत संकल्पनांच्या दृष्टिकोनातून या संगीत व्यवस्थेविषयी विचारण्यासारखे प्रश्न अनेक होते, त्यातले काही विचारले गेले. परंतु संशोधक आपल्या विषयात इतके बुडालेले होते की, त्यांची उत्तरं आपल्याच प्रश्नांची उत्तरं आहेत, हे लक्षात घेणंही कठीण होतं.
संगीत ही एक कला आहे याचं भान जागृत होण्यापूर्वीची संगीताची ती स्थिती आहे, ही गोष्ट या प्रस्तुतीच्या बाबतीत लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं होतं. कर्मकांडात काटेकोरपणाला फार-फार महत्त्व असतं. वैज्ञानिक प्रयोगांत नेमकेपणाला जेवढं असतं तेवढंच! कारण कर्मकांड ही वैज्ञानिक प्रयोगांची आद्य जननीच आहे. म्हणूनच सामगायन शास्त्रबद्ध करण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न केले गेलेले दिसतात. तेजोमेघातून ताऱ्याची उत्पत्ती होतानाची स्थिती जणू संगीताच्या क्षेत्रात वैदिक संगीतात पाहायला मिळते. वैदिक संगीतात संगीतकलेचा नेमका उगम कुठे या प्रश्नावर विद्वानांनी प्रकाश टाकला आहे. सामगायन म्हणजे ऋग्वेद (किंवा अन्य वेद) यांतील ऋचांचे नियमबद्ध पठण, ज्यात त्या ऋचेच्या शब्दाइतकंच तिच्या पठणाला महत्त्व आहे. ऋचेतील शब्दांपलीकडे जाऊन या पठणात काही उच्चार केले जातात. ‘हो-वा-हो’ (हे प्रत्यक्ष ऐकावेत असेच आहेत.) हे उच्चार ही संगीतकलेची गंगोत्री मानली जाते. कारण शब्दापलीकडे जाऊन उच्चारांतून प्रस्तुतीत विस्ताराचा अंतर्भाव या ‘हो-वा-हो’नं झाला!
तर असं हे वैदिक संगीतावरचं सत्र. खरं तर या सत्रात वैदिक संगीत ते भरतमुनींचं नाट्यशास्त्र (इ.स.पू.२००, म्हणजे आजपासून २२०० वर्षे मागे) हा कालखंड लक्षात घ्यायचा होता. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात सहा प्रकरणं संगीताशी संबंधित आहेत. त्या प्रकरणांतील संकल्पनांचा उगम, वैदिक संगीतात शोधणं हे या सत्राचं उद्दिष्ट होतं. फार नेमकेपणानं हे उद्दिष्ट साध्य झालं नाही तरी या विषयात वाचन केलं तर काही अर्थ समजू लागेल, एवढी तयारी नक्की झाली.
पुढचं सत्र होतं – ‘भरतमुनींचं नाट्यशास्त्र ते धृपद गायन’. चैन्नईचे विद्वान पत्रकार, संशोधक, कलाकार पप्पू वेणुगोपाल राव यांनी या सत्रात विषय मांडला. नाट्यशास्त्रात ‘संगीत’ हा शब्द(च) नाही, तर ‘गांधर्वम’ या शब्दानं संगीतकलेचा निर्देश केला गेला आहे. तसेच राग ही संकल्पनाही नाटकशास्त्रात नाही, ती नाट्यशास्त्रानंतर कित्येक शतकांनी विकसित झाली आहे अशी माहिती (उदबोधक) या सत्रात मिळाली.
त्यानंतरचं सत्र होतं- ‘धृपद ते खयाल’. वक्ते होते बनारस हिंदू विद्यापीठाचे धृपदाचे गाढे अभ्यासक आणि गायक ऋत्विक सन्याल. दुसऱ्या दिवशी – रविवार २२ जानेवारी रोजी ‘खयाल ते ठुमरी’ आणि ‘ठुमरी ते सुगम संगीत’ ही दोन सत्रं आपल्या अदभुत गायन प्रात्यक्षिकांनी भारून टाकली ती सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी. या सर्व सत्रांबद्दल ऐकायला आवडेल का? पं. अजय चक्रवर्तींच्या खयाल-ठुमरी-ग़ज़ल व सिनेसंगीत या विषयावरच्या निरुपणाबद्दल सांगायला मलाही नक्की आवडेल.
मग, आपणही या परिसंवादात हजर राहायला हवं होतं अशी रुखरुख वाटते की नाही आता? की हा वृतान्तच बरा? सहजच बा.सी. मर्ढेकरांची एक ओळ आठवते आहे – “बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा!”
लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.
kdparanjape@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment