अजूनकाही
आज ‘साधना’चे माजी संपादक, समाजवादी चळवळीचे एक चिंतक अग्रणी आणि लेखक यदुनाथ थत्ते यांची ९८वी जयंती आहे, तसेच ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांची आज एकोणिसावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या दोघा दिग्गज पत्रकारांविषयी...
यदुनाथजींचे साधेपण
मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिकत असतानाच ‘साधना’चे संपादक यदुनाथ थत्ते यांच्याशी माझा संबंध आला. त्यांनी त्या वेळी बिहारमध्ये जाण्यासाठी तरुणांना आवाहन केले होते. मी त्यांना पत्र लिहून तेथे जाण्याची इच्छा दर्शवली होती, पुढे मात्र त्याबाबतीत काही करता आले नाही. पण याच काळात १९७५मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यावर आम्ही ‘साधना’ हे साप्ताहिक अधिक आवडीने वाचू लागलो. मी स्वतः महाविद्यालयात ‘भाला’ या नावाचे एक हस्तलिखित नियतकालिक चालवत होतो. त्यासाठी खूप लेख लागायचे, ते मी अनेक सहकारी मित्राकडून घेत असे, पण ‘साधना’ वाचताना माझ्या लक्षात आले की, यदुनाथ थत्ते यांनी संपादकीय लिहिताना ‘फॅसिझम’ची कोणती लक्षणे आहेत, अशी एक मालिका काही आठवडे सुरू ठेवली होती. यातील एक भाग निवडून मी माझ्या हस्तलिखित नियतकालिकात समाविष्ट केला होता.
त्यानंतर पत्रकारितेची सुरुवात होताना ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार आणि नंतर उपसंपादक म्हणून काम करताना त्यांचा परिचय झाला. ही गोष्ट १९७७-७८ची. या काळात दर शुक्रवारी ‘सकाळ’च्या संपादकीय पानावर ‘मुस्लीम मनाचा कानोसा’ या नावाचे सदर प्रकाशित होत असे. हे सदर लिहिणाऱ्या लेखकाचे नाव होते – ‘मुलक परस्त’.
हे लेखक कोण आहेत असे मी तेव्हा माझे वरिष्ठ संपादक असलेले वा.दा. रानडे यांना विचारले. ते म्हणाले की, ‘लेख देण्यासाठी ते आज-उद्या येथे येतीलच. तेव्हा परिचय करून घ्या.’ त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते लेखक आले. यदुनाथ थत्ते हे त्यांचे खरे नाव. या सदरासाठी त्यांनी हे टोपणनाव घेतले होते. मुस्लीम समाजातील संवेदना, त्यांचे ताणतणाव यांचा शोध या सदरातून घेत होते. त्यांनी त्या आठवड्याचा लेख रानडेसाहेबांना दिला, तो त्यांनी माझ्याकडे दिला. तो लेख वाचताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, पाकिटाचे पार्सलचे जे रॅपर असते त्याचे समान भाग करून कागद केले होते आणि त्यावर त्यांनी लिहिले होते. गांधीजी, साने गुरुजी यांच्याकडूनही साधेपणाची शिकवण त्यांना मिळाली होती. त्यांचे कपडेही साधे होते.
यानंतर माझा आणि त्यांचा संबंध वाढू लागला. एक तत्त्वनिष्ठ संपादक कसे काम करतो, आणीबाणीच्या काळात त्यांनी ज्या रीतीने विचारस्वातंत्र्यावर आलेले आव्हान स्वीकारले आणि त्याच्याविरुद्धची लढाई केली; हा खरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातील नाही तर भारतीय पत्रकारितेतील एक गौरवशाली असा अध्याय आहे. ‘साधना’चे संपादक म्हणून त्यांनी १९५६ ते १९८२ असे दीर्घकाळ काम केले. या साप्ताहिकाच्या संपादकपदी सर्वाधिक काळ असलेले ते संपादक होते.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
यदुनाथजींच्या आग्रहामुळे मी दोन-तीनदा त्यांच्याबरोबर मुंबईला गेलो होतो. तिथे सदानंद वर्दे यांच्याकडे त्यांचे काही काम असायचे. ते उरकून आम्ही परत येत असू.
मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बालसाहित्याला महत्त्वाचे लेखले जात नाही, असा मुद्दा घेऊन १९९० साली रत्नागिरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत यदुनाथ थत्ते यांनी उमेदवारी अर्ज भरला. समाजवादी विचारांचे मराठीतील नामवंत लेखक मधू मंगेश कर्णिक हेही या निवडणुकीत उमेदवार होते. कर्णिक यांच्या मुंबईतील अनेक लेखक-पत्रकार मित्रांनी आघाडी उघडली. ‘लोकसत्ता’चे संपादक आणि माझे बॉस माधव गडकरीसाहेब यांनी मला यदुनाथ थत्ते यांची भेट घेण्याची सूचना केली. त्या पूर्वी थत्ते यांच्याशी त्यांचे बोलणे झाले होते. त्या दिवसांत पुण्यात टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पुस्तक प्रदर्शन भरले होते. यदुनाथजींनी मला निरोप पाठवला की, ‘अरुण, तिकडे आपण भेटू.’ तिथे गेल्यावर उमेदवारी मागे घेत असल्याचे पत्र त्यांनी माझ्या हाती सोपवले. त्यानंतर रत्नागिरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कर्णिक निवडून आले.
शालेय विद्यार्थी आणि आणि कुमार वर्गासाठी यदुनाथ यांनी खूप लिहिले. ‘प्रतिज्ञा’, ‘आटपाट नगरी’, अशी त्यांची काही पुस्तके आहेत. ते साने गुरुजींचे आणि गांधीजींचे अनुयायी, कार्यकर्ते होते. ‘चले जाव’ आंदोलनात ते काही काळ तुरुंगात होते. गांधीजी आणि साने गुरुजी यांच्यावर त्यांनी चरित्रपर पुस्तके लिहिली आहेत.
पुढील वर्षी ५ ऑक्टोबरला यदुनाथजींचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी, सामाजिक संघटनांनी, राष्ट्र सेवादल यांसारख्या संस्थांनी या दृष्टीने २०२१ ते २०२२ या वर्षभरातील कार्यक्रमांची आखणी करायला सुरुवात केली पाहिजे.
अशा साध्या माणसांनी आपल्या तत्त्वनिष्ठ जीवनाने सार्वजनिक जीवनात जे सत्व निर्माण केले, तो वसा आपण काही अंशी तरी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
रामनाथजी गोएंका
‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक असलेले रामनाथजी गोएंका हे भारतीय पत्रकारितेतील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भारताच्या राज्यघटना समितीत ते सदस्य होते.
रामनाथजींचा जन्म बिहारमधला. नंतर व्यावसायिक कामांसाठी ते तत्कालीन मद्रास येथे आले. भारतात राष्ट्रीय वृत्तपत्र असले पाहिजे, असे गांधीजी जाहीरपणे म्हणत. त्यावरून प्रेरणा घेऊन १९३४ साली त्यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ हे वृत्तपत्र सुरू केले. नंतर या समूहाला त्यांनी ‘लोकशाहीचा जागल्या’ या व्यापक आणि खणखणीत भूमिकेपर्यंत उभे केले.
भारतातील एवढ्या मोठ्या वृत्तपत्र समूहाचा हा मोठा माणूस मला भेटला, तो मी ‘लोकसत्ता’मध्ये काम करायला गेल्यावर. या दैनिकाची पुण्याच्या आवृत्ती सुरू झाल्यावर त्याची आरंभीची सर्व जबाबदारी संपादक माधव गडकरीसाहेब यांनी माझ्यावर टाकली होती. माझ्या आठवणीप्रमाणे १९९०मध्ये कधीतरी पुणे आवृत्तीचे कामकाज बघण्यासाठी रामनाथजी आले होते.
पुण्याच्या लष्कर भागातील अरोरा टॉवर्समध्ये तिसऱ्या मजल्यावर ‘लोकसत्ता’चे कार्यालय होते. तिथे आम्हा सर्व सहकाऱ्यांना ते भेटले. त्यांनी शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले. तीच आमची पहिली आणि शेवटची भेट. त्यानंतर १९९१ साली याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी आली.
आणीबाणीला प्रखर विरोध करण्याचे काम ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमूहाने त्या काळात केले. रामनाथजी अजिबात डगमगले नाहीत. आणीबाणीला विरोध करणाऱ्या चळवळीचे नेतृत्व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्याकडे होते. याखेरीज नानाजी देशमुख हेही त्यांच्यासमवेत असत. रामनाथजींचे निवास्थान नरिमन पॉइंटवरील एक्सप्रेस टॉवर्समधील सर्वांत उत्तुंग ठिकाणी असलेल्या पेंट हाऊसमध्ये असे. तिथे त्यांची आणि जयप्रकाश नारायण यांची भेट आणि चर्चा होत असे.
आज ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमूहाने रामनाथजींच्या स्मरणार्थ राष्ट्रीय पातळीवर पत्रकारिता पुरस्कार सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने काही मोठ्या माणसांची व्याख्यानेही आयोजित केली जातात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गेल्या काही वर्षांत ‘इंडियन एक्सप्रेस’ने ‘लोकशाहीचा जागल्या’ म्हणून आपली भूमिका अधिक धारदार आणि टोकदार केली आहे, हे तीव्रतेने जाणवते. त्यामुळेच राजकीय प्रक्रियेतील आणि संस्थात्मक कारभारातील किमान काही सत्ये वाचकांपर्यंत पोहोचू शकतात.
रामनाथजींच्या काळात बोफोर्स प्रकरण खूप गाजले होते. ‘हिंदू’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या दोन वृत्तपत्रसमूहांनी हा विषय लावून धरला आणि त्याचा पाठपुरावा केला होता.
वृत्तपत्रांनी विरोधी आवाज आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा मतभेद हा व्यक्त केला पाहिजे, अशी भूमिका सतत मांडली जाते. ही भूमिकाच ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रसमूहाचे बळ राहिली आणि तिला बळ देण्याचे काम आपल्या हयातीत रामनाथजींनी केले!
असा हा दिग्गज वृत्तपत्र मालक होता, ज्याने ‘दुनिया मुठ्ठी में’ म्हणणाऱ्यांचीही कधी भीती बाळगली नाही आणि सत्तेवर असणाऱ्यांना बेलगाम झाले तर सोडले नाही!
..................................................................................................................................................................
लेखक अरुण खोरे ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ (पुणे) या मासिकाचे संपादक आहेत.
arunkhore@hotmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment