अजूनकाही
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी शेती आणि कामगार कायद्यांविरोधी न-अभियानाची दक्षिण भारतात सुरुवात केली. कोल्हापूरमधील कागल येथील शाहू महाराज जन्मस्थळाला अभिवादन करून अभियानाची सुरुवात झाली. २४ सप्टेंबर हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा वर्धापनदिन. त्याचे औचित्य हे अभियान सुरू करण्यात आले. कोविडविषयीचे प्रतिबंधात्मक नियम पाळून हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत सुरू होते. कागल ते मुंबई असा प्रवास करून डॉ. देवी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यात जवळपास २५० ठिकाणी राष्ट्र सेवा दल, छात्रभारती, समविचारी संस्था, संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. देवी यांनी शेतकरी आणि नागरीक यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशीही शेती कायद्यांविरोधी देशव्यापी शेतकरी-कामगारांची एकजूट उभारण्याविषयी डॉ. देवी यांनी बातचीत केली. शेतकरी संघटनांच्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी अपेक्षा गणेश देवी यांनी व्यक्त केली.
महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा असूड’ या पुस्तकातील शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणं स्पष्ट करणाऱ्या उताऱ्यांचे जाहीर वाचन या आंदोलनात करण्यात आले. साने गुरुजी स्मारक, पुणे येथे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख यांच्या उपस्थितीत ‘आम्ही शेतकऱ्यांसोबत’ या अभियानाची सुरुवात ‘शेतकऱ्यांचे आसूड’ या पुस्तकातील प्रकरण वाचून करण्यात आली.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
२४ सप्टेंबरलाच राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांनी मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शेती आणि कामगार कायद्याचा निषेध करत आंदोलन करून ‘आम्ही शेतकऱ्यासोबत’ असा निर्धार व्यक्त केला.
‘कायदा नको स्वामिनाथन आयोग हवा’, ‘मी शेतकऱ्यांसोबत’ या नावानं डिजिटल पोस्टर आंदोलन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चालवण्यात आलं.
डॉ. गणेश देवी यांनी दक्षिण भारतात शेतकरी व कामगार विरोधी बिलांच्या विरोधात संवादयात्रा सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी एन. डी. पाटील यांची भेट घेतली. कामगार नेते शशांक राव, कम्युनिस्ट नेते अशोक ढवळे, भालचंद्र कानगो आणि आमदार कपिल पाटील यांच्याशी पुढील आंदोलनाबाबत चर्चा झाली. अनेक कठिकाणी कामगार संघटनाही या आंदोलनात सहभागी झाल्या.
आमदार कपिल पाटील यांनी विधानभवनात, हिराजी पाटील आणि सुभाष मोरे यांनी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये, अतुल देशमुख यांनी राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालयात, अजित शिंदे यांनी उदगीरला, शरद कोकाटे यांनी नाशिकला, अरुण लावंड, अरविंद सावला, जालिंदर सरोदे, रोहित ढाले, सचिन बनसोडे यांनी मुंबईत पोस्टर आंदोलन केलं. राज्यभर राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, शिक्षक भारती आणि समविचारी पक्ष, संघटनांनी आंदोलन केलं.
संवादयात्रा सुरू करताना देवी म्हणाले...
“शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी १५० वर्षे झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे परिश्रम आता मातीमोल होत आहेत. कोविडसारखा आजार, अर्थव्यवस्था खड्यात गेलीय, अशा स्थितीत जमिनीचे, शेतीचे कायदे बदलले तर काय होईल? सरकार त्यांचे संशयास्पद गडबड असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घाई करत आहे. ज्यांनी भारत बनवला त्यांचं स्वप्न आणि या सरकारचे उद्दिष्ट यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सरकार त्यांच्या उद्देशासाठी घोडदौड करत आहे. समाजातील कोणत्याही स्तरातील व्यक्तीचा विचार न करता कायदे केले जात आहेत. सध्या जनविरोधी कायदे करण्याचा काळ सुरू आहे. जर्मनीतही हिटलरच्या काळात असेच फटाफट कायदे झाले होते. त्याचा परिणाम काय झाला हे सर्वांना माहिती आहे.”
“शेतकरी संघटनांच्या बंदला माझा पाठिंबा आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. शिक्षण धोरण, चीन, नोटबंदी या काळातही त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. ही त्यांच्या प्रचाराची पद्धत आहे. मात्र, केवळ प्रचाराने सत्य लपवता येणार नाही. लोकांच्या विचार करण्याच्या शक्तीवर माझा विश्वास आहे. विचारांना दडपवून टाकण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. त्याची पाळेमुळे एका संस्थेकडे जात आहेत. हे समोर असतानाही त्या संस्थेचं संरक्षण करण्याचं काम होतंय.”
या शेतीकायदा निषेध अभियानात मी काय करणार आहे? याविषयी गणेश देवी यांनी अगोदरच पत्रक काढून स्पस्ट केलं होतं . ते असं-
२४ सप्टेंबर - कागल शाहू महाराजांचे जन्मस्थान येथे ‘शेतकऱ्याचा आसूड’चे जाहीर वाचन करून निषेध अभियानाची सुरुवात.
२४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर - कागल ते मुंबई असा क्रमाक्रमाने प्रवास करणार - मार्गावरच्या खेड्यात, सेवादलात शहरात शेतकऱ्यांच्या - नागरिकांच्या कायदेभंग- सभा (कोविडशी निगडित सर्व बंधने सांभाळून), त्यात शेतकऱ्यांचा आसूडचे जाहीर वाचन व त्याच्या प्रतीचे वितरण.
२ ऑक्टोबर - शेतकरी-नागरिक- समग्र जनतेच्या वतीने-महाराष्ट्र सरकारला हा कायदा महाराष्ट्रापुरता धुडकारून लावून तो राज्यात लागू करू नये, असे आवेदन देणार.
अशाच प्रकारे कर्नाटकाच्या उत्तर सीमेवरील कागल येथून कर्नाटकाची राजधानी बंगळुरूकडे कायदा निषेध अभियान पथक निघेल. त्यांना २ ऑक्टोबर संध्याकाळी बंगळुरूला जाऊन त्यांच्या कार्यक्रमात सामील होईन.
या प्रवासात माझ्याबरोबर माझी पत्नी असणार आहे. आम्ही दोघे, ज्या खेड्यांना आणि शहरांना भेट देऊ तेथील तरुण-तरुणींना ‘लग्नाचा विचार करताना जात-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करू’ असे जाहीर वचन देण्यास प्रोत्साहित करू.
.................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
पुण्यात ‘शेतकरी संवाद यात्रे’च्या निमित्ताने २९ सप्टेंबरला १) पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत संवाद फेरी, २) अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली संवाद सभा, ३) शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीच्या अंमलबजावणीसाठी बाजार समितीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन करणारे निवेदन देणे आणि ४) राष्ट्र सेवा दल कार्यालयात दुसरी संवाद सभा असे कार्यक्रम झाले. यावेळी शेतकरी-कष्टकरी एकजुटीचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांना हमीभावाचे स्पष्ट आश्वासन न देता बेभरवशाच्या बाजार स्वातंत्र्याच्या हवाली करणाऱ्या, तसेच सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांना ग्रामसभांनी ठरावाद्वारे विरोध करावा यासाठी मोहीम राबवण्याचा निर्णय झाला.
संवादयात्रा नाशिकमध्ये गेल्यानंतर
शेतकऱ्यांचे मन मोडणारा हा कायदा रद्द झालाच पाहिजे, असा डॉ. गणेश देवी यांनी निर्धार केला. केंद्र सरकारने करोनाकाळात कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेती व शेतकऱ्यांशी संबंधित १) अत्यावश्यक वस्तू कायद्यातील बदल. २) the farmers produce trade and commerce (promotion and facilitation) ordinance, 2020 (FPTC), ३) The farmers (empowerment and protection) agreement on price assurance and form services ordinance, 2020. (FAPAFS) हे अध्यादेश दोन्ही सभागृहात पारित केले आहेत आणि त्यावर आता मा. राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्यामुळे या अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. हजारो वर्षं चालत आलेली शेती, औद्योगिक क्रांती झाल्यानंतरही शेती व्यवस्था अबाधित ठेवणारा शेतकरी, जो भारताच्या ग्रामीण तसेच शहरी यंत्रणेचा अत्यावश्यक घटक आहे त्याचा शेती व्यवसाय शाश्वत ठेवण्याची कुठलीही यंत्रणा या कायद्यात नाही, म्हणून शेतकऱ्यांचे मन मारणारा हा कायदा रद्द करा, अशी मागणी करत ही संवादयात्रा सुरू होती.
संवादयात्रा नाशिकमध्ये आली असता नाशिकच्या मार्केटयार्डमध्ये समितीचे संचालक, व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी, कामगार, ग्राहक यांच्याशी संवाद साधताना डॉ. गणेश देवी यांनी ‘हा कायदा रद्द झालाच पाहिजे आणि शेतकरी उत्पादनाला हमी भाव मिळावा तसेच एकूणच शेती सक्षम होण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा’ अशी मागणी केली.
शेतकरी जगला तरच देश जगू शकतो. परंतु या कायद्याने शेतकरी समाजाला कुठलीही हमी न देता ‘करार पद्धतीने’ शेती मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काहीतरी नवीन करण्याच्या आणि दाखवण्याच्या प्रयत्नात एकूणच शेतकरी आणि त्यानिमित्ताने ग्रामीण व्यवस्था नेस्तनाबूत करण्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कटकारस्थान राबवले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या जन आंदोलनाच्या चळवळीतून गुलामगिरी नाकारून स्वतंत्र झालेला भारत देश अबाधित ठेवण्यासाठी जन आंदोलनाचा रेटा, संविधानाचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही चळवळ महत्त्वाची आहे, असे आवाहन डॉ. देवी यांनी उपस्थितांना केले.
बहुमताच्या जोरावर संसदेने शेतकरी विरोधी असलेला हा कायदा मंजूर केला, अशा या कायद्याला नाशिकमधील चापडगाव, ता. सिन्नर येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने विरोधी ठराव एकमताने मंजूर केला. महात्मा फुले यांचा ‘सत्यशोधकी’ वारसा जपणाऱ्या या गावाने संवादयात्रेच्या उपस्थितीत मंजूर केलेला हा ठराव हा देशातील पहिला विरोधी ठराव आहे, याची माहिती डॉ. देवी यांनी दिली.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
३० सप्टेंबरला संवादयात्रा नवी मुंबईत दाखल झाली.
केंद्र आणि राज्य सरकारं कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातातल्या काठपुतल्या बनतील. शेतकरी, माथाडी कामगार आणि छोटे व्यापारी या तिघांनी एकत्र यावं. कारण एपीएमसी मोडली, एमएसपी गेली तर ब्रिटिशांनी जे शेतकऱ्यांचं शोषण केलं, तशी परिस्थिती होईल. महाराष्ट्र सरकारने या कायद्यांना स्पष्ट शब्दांत नकार द्यावा, असं आवाहन नवी मुंबईत गणेश देवी यांनी केलं. अंबानी आणि अदानी हे २१व्या शतकातील इंग्रज आहेत, त्यांच्या विरोधात एकजुटीने लढावं लागेल, हा गणेश देवी यांचा सांगावा संवादयात्रेत शेतकरी, युवक यांना भावला.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी बिलांना आव्हान देण्याचा निर्णय (३० सप्टेंबर) नवी मुंबई एपीएमसी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. माथाडी कामगारांचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी मार्गदर्शन केलं. चंपारण्यला गांधींनी सुरू केलेल्या आंदोलनाची आठवण देवींनी या वेळी सर्वांना करून दिली. शशिकांत शिंदे यांनी देवी यांच्या या लढाईत सक्रिय सहभाग घेणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
शेतीसंबंधीचे तीन काळे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत लढण्याचा संकल्प या संवादयात्रेत ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी केला.
..................................................................................................................................................................
लेखक राजा कांदळकर मुक्त पत्रकार आहेत.
rajak2008@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment